माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७ , ... भाग ८
*************
मला घ्यायला माझे दोन सहकारी येणार होते. सगळं नीट ठरलं होतं. त्यांनी कधी मला बघितलं नव्हतं पण ते हातात पाटी घेऊन उभे राहणार म्हणाले होते. त्यामुळे ती काही चिंता नव्हती. ते प्रवासाचे दिव्य पार पडले होते. आता सरळ गाडीत बसायचं आणि तडक मुक्कामी जाऊन आडवं व्हायचं. त्या मुख्य दरवाज्याची सरकती दारं उघडली आणि...
*************
मला बाहेर यायला इतका जास्त वेळ लागल्यामुळे मी बाहेर येईपर्यंत बरेचसे प्रवासी निघून गेले होते. तेव्हा खोबारच्या विमानतळावर फारशी रहदारी नसल्यामुळे बराच शुकशुकाट पसरला होता. तुरळक गर्दी होती. मी शोधत होतो माझ्या सहकार्यांना. माझी अपेक्षा नव्हती की हारतुरे घेऊन उभे असतिल पण गेला बाजार हातात माझ्या नावाची पाटी घेऊन तरी असतिलच असतिल. बघतो तर बाहेर तसा काहीच प्रकार दिसेना. मला वाटलं की असतिल इथेच कुठे तरी, इथेच थांबू थोडा वेळ म्हणजे ते आपल्याला शोधत असतिल तर आपण सापडू त्यांना चटकन. बराच वेळ थांबलो तिथे. १० मिनिटं झाली - १५ मिनिटं झाली... २०-२५ मिनिटं झाली तसा माझा धीर सुटला. काहितरी गडबड नक्कीच होती. काय करावं? मी जरा इकडे तिकडे फिरून नजर टाकायला सुरूवात केली. काहीच उपयोग नाही झाला. आधीच सौदी अरेबिया बद्दल एक भिती असते आपल्या मनात त्यात परत आल्या आल्या एवढा मोठा दणका बसला होता की मी पार ढेपाळलो होतो. मनात विचार येत होता, 'मरू दे साला... पुढचं फ्लाईट बुक करूया आणि जाऊ परत.' पण तिकिट तरी कसं काढणार? खिशात पैसे कुठे होते तेवढे. कंपनीतून सांगितलं होतं की फक्त थोडेसे हातखर्चापुरते घेऊन ये बरोबर, आल्या आल्या तिथल्या चलनात ऍडव्हांस देऊ तुला. त्यामुळे खिशात फक्त १०० सौदी रियाल होते.
बरं त्या वेळी मोबाईल फोन्स पण नव्हते आजच्यासारखे. ज्या हॉटेल (फर्निश्ड अपार्टमेंट) मधे माझे सहकारी रहायचे आणि मी पण राहणार होतो तिथला नंबर मात्र होता माझ्याजवळ. म्हणलं बघू फोन करून. चला आता पब्लिक फोन बूथ शोधा. आपल्याकडे पब्लिक फोन बूथ पिवळ्या पाट्यांमुळे लगेच ओळखू येतात. इथे कसे ओळखायचे? फिरता फिरता एका जागी २-३ दुकानांवर 'इंटरनॅशनल कॉल केबिन' अश्या पाट्या दिसल्या. आणि त्यावरची अक्षरं फिक्कट जांभळ्या रंगात होती. चला, इथे 'कॉल केबिन्स' म्हणतात तर. आणि रंग पण कळला. नविन जगातल्या नविन खुणा शिकायाला सुरुवात केली. पॅरलिसिस मधून बरा होणारा माणूस जसा लहानपणापासून वापरलेल्या अवयवांचा उपयोग करायला परत पहिल्यापासून शिकतो तसं माझं जुन्या सगळ्या धारणा, खुणा पुसून त्या जागी नविन माल भरायचे काम सुरू झाले.
चला एकदाचा फोन बूथ सापडला. तिथे आत शिरलो. लाईनीने १०-१२ काचेच्या बंद खोल्या होत्या. काही ठिकाणी लोक आत मधे जाऊन बोलत होते. एक रिकामी केबिन पाहून मीपण घुसलो. नंबर फिरवला. एंगेज. हरकत नाही. २ मिनिटे थांबलो, परत फिरवला तर परत एंगेज टोन. असं ४-५ वेळा झालं. मला शंका आली की बहुतेक मी नंबर चुकीचा तर नाही ना लिहून घेतला? पण मग निराळा टोन येईल ना? एंगेज टोन का येईल? बाहेर आलो आणि तिथे काउंटरवरल्या भाऊला नंबर दाखवला. त्याला इंग्रजीचा गंध नसणार हे माहित होतेच, तितपत सौदी अरेबियाची ओळख तो पर्यंत झालीच होती. खाणाखुणा करून त्याला समजवलं की बाबा रे हा नंबर का लागत नाहिये ते सांग. त्याने नंबर डायल केला. परत एंगेज टोन. पण तो पठ्ठ्या काय लाईन कट करेना. ६-७ वेळा तो टोन वाजल्यानंतर अचानक समोरून कोणीतरी फोन उचलला आणि 'हॅलो' म्हणालं. मी चाट. तो कॉल केबिनवाल्याने माझ्या कडे 'चले आते है मुंह उठाके, कहा कहासे' असा एक कटाक्ष टाकला आणि फोन एका केबिन मधे ट्रांसफर केला. (भानगड अशी होती की आपल्या कडे भारतात आपण फोन करतो तेव्हा समोरून आपल्याला 'ट्रिंग ट्रिंग' अशी रिंग ऐकायला येते. गल्फ मधल्या सर्व देशांत 'बीप बीप' असा एंगेज टोन सारखाच पण जरा लांब आणि वेगळा आवाज येतो. मला वाटत होते की एंगेज टोन आहे पण ती खरी रिंगच होती.... धडा नंबर २ :) )
मी फोन उचलला आणि बोलायला लागलो. समोरचा माणूस अरबी होता हे त्याच्या उच्चारावरून लगेच कळलं. मी माझ्या सहकार्यांची नावं घेऊन ते आहेत का वगैरे विचारायला सुरूवात केली. माझ्या सगळ्या प्रश्नांवर त्याचे एकच उत्तर. 'इंग्लिझी माफी, खुल्लु माफी मौगूद' मला कळेना हा माफी कसली मागतो आहे. (अरबी भाषेत फी म्हणजे होकारार्थी आणि माफी म्हणजे नकारार्थी. आणि तो होता इजिप्शियन. इजिप्शियन अरबी भाषेत 'ज' ला 'ग' म्हणतात. म्हणजे मौगूद चा खरा उच्चार मौजूद असा आहे जो मला कळला असता कारण अरबी मौजूद आणि हिंदी मधला मौजूद एकच. खुल्लु म्हणजे 'सगळे / सर्व'. म्हणजे तो माझे सर्व सहकारी तिथे असण्या / नसण्या बद्दल काहीतरी म्हणतो आहे हे माझ्या लक्षात आले असते पण अरबीचे ज्ञान काहीच नव्हते तेव्हा.)
४-५ वेळाझटापट केल्यानंतर मी हार पत्करली, फोन आपटला आणि सरळ पैसे चुकते करून बाहेर पडलो. आता मात्र मला खूप शांत वाटायला लागलं होतं. इतका दमलो होतो (शारिरीक / मानसिक दोन्ही) की काही वाटायच्या पलिकडे गेलो होतो. अति झालं आणि हसू आलं अशी गत झाली माझी. एका कोपर्यात ट्रॉली लावली आणि शांत पणे बसलो. म्हणलं कंपनीला पण आपली गरज / काळजी असेलच ना? येतील झक् मारत शोधत आपल्याला. आपण तरी किती कष्ट करायचे? बसू निवांत. मस्त पैकी पाय वगैरे लांब करून बसून राहिलो. तेवढ्यात कानावर २-४ हिंदी वाक्यं पडली. बघितलं तर २ तरूण मुलं आपापसात बोलत होती. दिसत होते भारतिय पण बोलीचा लहेजा मात्र वेगळाच होता. त्यांचं बोलणं जरावेळ ऐकलं, आणि कळलं की ते पाकिस्तानी आहेत. तो पर्यंत पाकिस्तानी माणुस कशाला मला भेटायला. टीव्हीवर बघितलेले तेवढेच. पण कुतूहल खूप होतं. ऐकत बसलो त्यांचं बोलणं. एकदम मनात विचार आला की या पोरांना विचारून बघुया. धीर करून त्यांच्या जवळ गेलो आणि माझी अवस्था त्यांना सांगितली. मी त्यांना म्हणालो की 'माझ्या कडे फक्त हॉटेलचं नाव आणि नंबर आहे. तुम्ही मला तिथे पोचायला मदत कराल का?' दोघंही भले होते बिचारे. ते आले होते त्यांच्या बहिणीला घ्यायला. मला म्हणाले की तू थांब इथेच, आमची बहिण बाहेर आली की करू आपण काहितरी. त्या दोघांनी खरंच खूप धीर दिला मला. नाही म्हणलं तरी पाकिस्तानी म्हणजे आपल्या मनात थोडी तरी साशंकता असतेच. पण त्या दोघांनी माझ्याशी गप्पा मारून खरंच माझा ताण हलका केला. थोड्या वेळाने अजून एक विचार आला मनात. त्या दोघांना म्हणलं की मी ट्रॉली इथेच ठेवतो तुम्ही जरा लक्ष ठेवा. मी परत एकदा माझ्या मित्रांना शोधून बघतो. निघालो आणि परत एक चक्कर मारली. अपेक्षेप्रमाणे कोणी नव्हतंच. तेवढ्यात एक कॉफी शॉप दिसलं. काहितरी गरम प्यायची इच्छा झाली. आत घुसलो. विचार करत होतो की काय घ्यावं आणि सहज इकडे तिकडे बघत असताना एका कोपर्यात दोन गॅरंटीड सौधिंडियन वाटणारे महाभाग मस्त पै़की कॉफी पीत आणि वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यांच्यापैकी एकजण माझ्याकडेच बघत होता. अचानक तो उठला आणि माझ्या रोखाने आला. जवळ येऊन म्हणाला, 'बिपिन?' ...मी फक्त त्याची पप्पीच काय ती नाही घेतली. बाकी काय नाही केलं? हीच ती दोन पात्रं मला घ्यायला आलेली. मला बाहेर यायला भयंकर उशिर झाल्याने दोघेही ताटकळले होते. आणि श्रमपरिहारार्थ कॉफी पीत बसले होते. त्यांचा आडाखा पण बरोब्बर माझ्या उलट... जातोय कुठे येईल शोधत शोधत. :) काहीही का असेना, भेटले तर खरे एकदाचे.सगळे गुन्हे माफ त्यांना. मग आमच्या पाकिस्तानी नवदोस्तांना नीट 'शुक्रिया' वगैरे करून मी निघालो तिथून. जाता जाता त्या दोघां पाकिस्तान्यांनी माझ्या सहकार्यांची थोडी शाळा केलीच. :) त्यांचे शब्द होते, 'यार हमारे लोगोकी मदद और हिफाज़त हमेही करनी है. यह सौदी तो xxx होते है.' त्यांनी इतक्या सहजपणे आम्हाला त्यांच्या 'हम' मधे सामावून घेतलेलं बघून मला आश्चर्यच वाटलं. ही तर माझ्या पाकिस्तान्यांशी आलेल्या संबंधांची सुरुवातच होती. नंतर खूप जवळून बघायला मिळाले. काही माझे खूपच छान मित्रपण झाले.
एकंदरीत प्रवास संपत आला होता. खूप काही भोगलं होतं मागच्या बारा तासात. स्थानिक वेळे प्रमाणे पण ९-९.३० वाजलेच होते. टॅक्सी उभीच होती समोर. बसलो आणि निघालो. विमानतळाच्या बाहेर पडता पडताच सौदी अरेबियाचा झेंडा दिमाखात फडकत होता. 'वेलकम टू सौदी अरेबिया' अशी भलीमोठ्ठी पाटी पण होती चक्क. चला म्हणजे नविन येणार्या माणसांचे खरंच स्वागत करत नसले तरी स्वागत करायची इच्छा तरी आहे म्हणायची. 'कथनी' आणि 'करनी' मधला विरोधाभास बघून त्या परिस्थितीतही हसू आलं.
सौदी अरेबियाचा झेंडा............................................................ सौदी अरेबियामधली टॅक्सी
हवा चांगलीच बोचरी होती. अर्थात टॅक्सीत हिटर चालू असल्यामुळे बाहेरचे वातावरण काय आहे ते कळत नव्हते म्हणा. रात्रीची वेळ होती. त्यामुळे शहर नीट लक्षात येत नव्हते. आख्खं आयुष्य मुंबईत काढलेलं असूनही तिथली चमक-दमक डोळ्यांत भरत होती. रात्रीच्या अंधारातूनही एक गोष्ट ठळकपणे नजरेत भरत होती, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओळीने नारळाच्या झाडांसारखी दिसणारी झाडं (नंतर कळलं की ती खजूराची झाडं आहेत) आणि रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर पूर्ण हिरवळ आणि सुंदर फूलझाडं. कोणाला वाटेल आपण वाळवंटात आहोत म्हणून? पण एकंदरीत मला गाव आवडत होतं. लव्ह ऍट फर्स्ट साईट असं वाटत होतं. रस्त्यावर गाड्या भरपूर होत्या. रस्ते रूंद आणि आश्चर्यकारक गुळगुळित होते. टॅक्सी एका संथ लयीत एका वेगात पळत होती. मला गुंगायला होत होतं.
माझं पहिलं खोबार दर्शन असंच काहिसं होतं.
जवळ जवळ २०-२५ मिनिटांनी आमचं हॉटेल आलं सामान वगैरे खोलीत टाकलं. आंघोळ केल्याशिवाय बरं वाटणार नव्हतं. जरावेळानं बॅग उघडली, तर वरच ठेवलेला चिवडा आणि इतर खाऊ असलेला डबा समस्त उपस्थितांच्या नजरेस पडला. जवळ जवळ सगळेच घरापासून बरेच दिवस लांब रहिलेले होते. बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळले होते. त्यामुळे फारशी औपचारिकता ना पाळता आणि माझ्या परवानगीची वाट न बघता तो डबा उघडला गेला आणि बघता बघता सगळं फस्त झालं. 'नविन' घरात आल्या आल्या 'जुन्या' घराचा संबंध संपला. आता नवी विटी नवं राज्य.
मस्त पैकी आंघोळ केली आणि बेडवर येऊन पडलो. मनात विचार चालू होते, कसं असेल ऑफिस? कसे लोक भेटतील? बाजूलाच खिडकी होती. सहज लक्ष गेलं, आकाश निरभ्र होतं. छान चांदणं होतं. चंद्राची सुंदर कोर दिसत होती. खूपच प्रसन्न वाटलं... मी त्या उबदार अंथरूणात सुखावत होतो, सगळा शीण जात होता. डोळे कधी मिटले ते कळलंच नाही.
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Oct 2008 - 4:26 am | मृदुला
हाही भाग आवडला.
चंद्रकोरीचे चित्र छान.
30 Oct 2008 - 4:29 am | मदनबाण
व्वा.फारच सुरेख...
बिपिनजी लगे रहो...
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
30 Oct 2008 - 4:37 am | सुक्या
परत क्रमशः .....
अहो जरा मोठे भाग लिहा हो. एवढा छान रंगला होता हा भाग अन् लगेच क्रमशः.
(क्रमशः चा गेम कसा करावा या विचारात) सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी
31 Oct 2008 - 2:20 am | टारझन
आयला .. नुकतीच कुठं वाचायला सुरूवात केली तर क्रमश: ... बाकी स्क्रोल बटण एक सेमी झाल्याशिवाय क्रमशः न लावण्याचा फंडा गृहित धरून चित्र सारलेली चाणाक्ष वाचकांच्या ध्यानी आलंच असेल.
असो .. लिवलंय साजेसं .. पण अंमळ अखुड आहे .. निषेध ...
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा
30 Oct 2008 - 5:12 am | प्राजु
पडलास त्या नव्या घरी जाऊन.. हुश्श्श्श!!!
त्यांचे शब्द होते, 'यार हमारे लोगोकी मदद और हिफाज़त हमेही करनी है. यह सौदी तो xxx होते है.' त्यांनी इतक्या सहजपणे आम्हाला त्यांच्या 'हम' मधे सामावून घेतलेलं बघून मला आश्चर्यच वाटलं.
बघ बिपिनदा, तुलाही असंच वाटलं. मलाही इथे असंच वाटलं जेव्हा मी पहिल्यांदा कोण्या पाकिस्तानी स्त्रीच्या संपर्कात आले. खूप बरं वाटलं हे वाचून. मानसिकता बदलते याच पुनश्च प्रत्यय आला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Oct 2008 - 5:27 am | कपिल काळे
त्या पाकींबद्दल असं का वाटतं बरं. इथे माझ्या घराजवळ एक पाकिस्तानी स्टोअर आहे. बरयाच गोष्टी मिळतात. लाहोरी लच्छा पराठा तर खूबसूरत
असतो.
"त्यांना" पण वाटत असेल का "आपल्या"बद्दल असं काही?
रशीदभाईंना विचारुन सांगतो.
एक जुनी आठवण. ३२६ धावा करुन भारताने इंग्लडमध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती तेव्हाची( सौरभ ने शर्ट काढून फिरवला होता तोच सामना)
त्यावेळी, अंतिम सामन्याआधी जावेद मियांदाद भारतीय टीमच्या नेट्स मध्ये आला होता.!!
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
30 Oct 2008 - 1:51 pm | बिपिन कार्यकर्ते
कपिल, प्राजु...
पाकिस्तानी लोकांबद्दल खूप अनुभव आहेत. जमेल तसं लिहीनच.
त्यांना भारताबद्दल बेहद्द आकर्षण असतं. एक देश म्हणून त्यांचं पूर्ण भावविश्व भारत-केंद्रित असतं. त्यांची स्पर्धा फक्त भारताबरोबरच आहे. 'तुझं नी माझं जमेना परि तुझ्या वाचून करमेना' याचं भारत पाक संबंध हे एक फिट्ट उदाहरण आहे. माझ्या मते त्यांना भारतासंदर्भात एक प्रकारचा न्यूनगंड आहे. भारताविषयीच्या बर्याचश्या प्रतिक्रिया आणि मतं या न्यूनगंडातूनच तयार झालेली असतात. 'आपण त्यांच्यापासून भांडून वेगळे झालो आहोत, आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवलंच पाहिजे नाहीतर भारता सारखा 'बिग ब्रदर' आपल्याला सहज पणे खाऊन टाकेल' ही खूपच प्रबळ भावना असते. पण त्याच वेळी भाषेचे, खाण्यापिण्याचे, संस्कृतिचे बंध एवढे घट्ट आहेत की ते कधी तुटणारच नाहीत. हिंदु - मुस्लिम लफडं आहेच परत. ते मागे पडतं कधीकधी पण पुसलं मात्र जात नाही पूर्णपणे. आणि सगळ्यात मोठा अडसर 'काश्मिर' हा पण आहे. त्या बाबतीत मात्र सगळ्या प्रकारच्या पाकिस्तानींचं एकमत नक्कीच असतं.
हे आणि असे एक-दोन मुद्दे सोडले तर काही फरकच नाहिये आपल्यात आणि त्यांच्यात. फक्त आपला पासपोर्ट निळा आणि त्यांचा हिरवा, आणि आतला मजकूर थोडा वेगळा. बाकी सगळं सेमच. सुदैवाने असाच विचार करणारे बरेच पाकिस्तानी पण आहेत.
बिपिन कार्यकर्ते
30 Oct 2008 - 5:34 pm | मन्जिरि
पुन्हा पुन्हा वाचला, फारच छान. मी मझ्या दोन्ही मुला॑ना घेउन मस्कत व BANKOKला गेले होते त्याचि आटवण झालि आता ट्रोलिस भरपुर असतात, दहा बारा वर्शा पुर्वि आपल्या Airportवर त्यवरुन भा॑ड्ण व्हायचे,मुले, कमितकमि७,८ बॅगा 'हे' नेहमि प्रंमाणे मागे -पुधे गेलेले असायचे असो , त्यातहि सगळे बरोबर रहाणार असल्याचा आन्॑द होता
30 Oct 2008 - 5:32 am | रेवती
दमले तो सगळा प्रकार वाचून.
तसाही विमानप्रवास भयंकर कंटाळवाणा असतो. त्यात हे असं म्हणजे दिव्यच असतं.
दुसरोंकेसाथ बातां : माझाही जवळजवळ प्रत्येक विमानप्रवास म्हणजे एक गोष्टच होईल (क्रमशः असलेली).
पण आमच्याकडे लिहिण्याची हातोटी नै ना!;)
रेवती
30 Oct 2008 - 8:16 am | अनिल हटेला
बिपीन दा !!!
दिवाळी भेट म्हणुन खोबार चा हा भाग दिलात ,त्याबद्दल धन्यवाद !!
>>आपल्या कडे भारतात आपण फोन करतो तेव्हा समोरून आपल्याला 'ट्रिंग ट्रिंग' अशी रिंग ऐकायला येते. गल्फ मधल्या सर्व देशांत 'बीप बीप' असा एंगेज टोन सारखाच पण जरा लांब आणि वेगळा आवाज येतो. मला वाटत होते की एंगेज टोन आहे पण ती खरी रिंगच होती....
इकडे पण असाच प्रकार आहे ....
चंद्रकोर ,खोबार चे झगमगीत दर्शन अगदी प्रसन्न करणारे...
आणी मोसम कट करून क्रमशः दिल्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ( त्यापण चायनीज मध्ये)!!
(ह. घ्या. पु भा प्र..)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Oct 2008 - 8:50 am | विसोबा खेचर
मस्त पैकी आंघोळ केली आणि बेडवर येऊन पडलो. मनात विचार चालू होते, कसं असेल ऑफिस? कसे लोक भेटतील? बाजूलाच खिडकी होती. सहज लक्ष गेलं, आकाश निरभ्र होतं. छान चांदणं होतं. चंद्राची सुंदर कोर दिसत होती. खूपच प्रसन्न वाटलं... मी त्या उबदार अंथरूणात सुखावत होतो, सगळा शीण जात होता. डोळे कधी मिटले ते कळलंच नाही.
वा बिपिनशेठ, सुरेख लिहिले आहेस, प्रसन्न लिहिले आहेस! :)
पहिल्या खोबार दर्शनाचा फोटू किल्लास.. चंद्रकोरही मस्त!
तात्या.
30 Oct 2008 - 12:19 pm | बबलु
बिपिनदा.. छानच झालाय हा पण भाग.
आख्खं आयुष्य मुंबईत काढलेलं असूनही तिथली चमक-दमक डोळ्यांत भरत होती.
गुड वन.
पुढील भागाची वाट पहातोय..
....बबलु
30 Oct 2008 - 12:22 pm | डॉ.प्रसाद दाढे
हाही भाग खूप आवडला. फक्त थोडा छोटा आहे.
30 Oct 2008 - 1:53 pm | बापु देवकर
खूप आवडला
30 Oct 2008 - 2:05 pm | स्वाती दिनेश
दिवाळीभेट छान आहे रे बिपिन.. विशेषत: बायको आणि मुली तिथे आल्या असताना वेळ काढून हा भाग टंकलास.. धन्यु.
चंद्राची कोर फारच छान.. ती पाहताना तुझ्याबरोबरच आम्हालाही आलेला प्रवासचा शीण गेला,:)
स्वाती
30 Oct 2008 - 2:31 pm | ऋषिकेश
बिपीनराव,
हा ही भाग मस्त! शेवटची चंद्रकोर बघून मी जेव्हा आम्रिकेत चंद्रकोर पाहिलि तेव्हा डोक्यात विचार आला होता "आपल्या भारतातूनही दिसणारी एकमेव गोष्ट मी बघतोय :) " तो आठवला
एकदम फ्रेश लेख.. अजून येऊ दे...
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
30 Oct 2008 - 2:40 pm | सुनील
सुंदर आणि ओघवते वर्णन.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Oct 2008 - 3:08 pm | प्रमोद देव
चांगले सुरु आहे आख्यान!
30 Oct 2008 - 5:07 pm | सर्वसाक्षी
अगदी गप्पा मारल्यागत लिहिले आहे. आता पुढील भागाची प्रतिक्षा.
30 Oct 2008 - 5:24 pm | शाल्मली
आधीच्या३ भागांप्रमाणेच हा भाग पण मनोरंजक आहे.
पण पुढचा भाग आता लवकर टाका.. :)
चंद्राची कोर फारच छान.. ती पाहताना तुझ्याबरोबरच आम्हालाही आलेला प्रवासचा शीण गेला.
स्वाती ताई सारखच म्हणते.
--शाल्मली.
30 Oct 2008 - 6:02 pm | शितल
नेहमी प्रमाणे हा भाग ही मस्त लिहिला आहे.
चंद्रकोर तर मस्तच,:)
30 Oct 2008 - 10:38 pm | ब्रिटिश टिंग्या
हाही भाग आवडला!
पुढचा भाग लवकर येउ देत!
14 Mar 2009 - 12:31 am | शक्तिमान
>>आता नवी विटी नवं राज्य.
हे फारच भावले!