सल आठवांचा...

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
18 Aug 2014 - 1:48 am

(मेहदी हसन यांनी गायलेल्या 'बेकरारी सी बेकरारी है' या गझलचा स्वैर भावानुवाद)

सखे, तुझ्या आठवांचा सल काही केल्या कमी होत नाही
विरहाची ही असह्य तगमग मनाचे अवकाश झाकोळून टाकते आहे
तो रटाळ बेजान दिवस ढळता ढळत नव्हता
अन आता तर ही काळरात्रही खायला उठली आहे...

दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी
अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी
आयुष्याच्या सारीपटावर नेहमीच रंगणारा हा डाव आता सवयीचा होत चालला आहे...

मिलनाचे स्वप्न पाहतानाच्या त्या उत्कट क्षणी मनोमन तुलाच अर्पण केलेल्या
माझ्या घायाळ झालेल्या काळजावर बेगुमानपणे तुला हवे तितके घाव घाल
तुझी अनभिषीक्त मालकी असलेल्या त्या गोष्टीवर आज माझा तीळमात्रही हक्क उरलेला नाही....

बेगडी व्यक्तित्वाचे जोखड झुगारून देत क्षणभर मोकळा श्वास घेउ पाहतो आहे
पण पद, पैसा, प्रतिष्ठा आणि विकत घेतलेल्या पुरस्कारांच्या दागदागिन्यांनी सजलेले
या कलेवराचे ओझे आज त्रिखंडात कुणाला पेलणार नाही इतके बोजड होउन गेले आहे ...

तुझी एक झलक पाहण्यासाठी आसुसलेल्या माझ्या नजरेशी सतत जीवघेणा लपंडाव खेळत असलीस
तरी अश्वत्थाम्याच्या भाळी असलेल्या चिरंतन जखमेसारखी काळजात कायमची घर करून बसली आहेस
सखे,शालीनतेचे कुळाचार जपण्याची तुझी ही अजब तर्‍हाच माझ्यासाठी अभिशाप ठरली आहे ...

मूळ प्रेरणा:

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Aug 2014 - 10:42 am | पैसा

मुक्तक आवडलं.

विलासराव's picture

19 Aug 2014 - 11:17 am | विलासराव

क्या बात है!!!!!!!!

मस्त.

जेनी...'s picture

19 Aug 2014 - 11:38 pm | जेनी...

:)

अजय जोशी's picture

25 Aug 2014 - 7:33 pm | अजय जोशी

दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी
अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी
छानच.