लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ५

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
9 Apr 2014 - 9:22 pm

प्रश्न क्रमांक १७

जर एखादा लोकसभा सदस्य तिसर्‍या आणि नवव्या लोकसभांवर निवडून गेला आणि मधल्या कोणत्याच लोकसभेवर निवडून गेला नाही तर त्या सदस्याची 'गॅप' ६ (९-३) आहे असे म्हणूया. (संबंधित सदस्य तिसर्‍या लोकसभेपूर्वी आणि नवव्या लोकसभेनंतर सदस्य असू शकेल पण तिसर्‍या आणि नवव्या लोकसभांमधील कोणत्याच लोकसभेचा सदस्य नव्हता). पुढीलपैकी कोणत्या नेत्याची 'गॅप' सगळ्यात जास्त होती?

अ. आर.वेंकटरामन
ब. मानवेन्द्र शाह
क. भजनलाल
ड. बन्सीलाल
इ. विजयाराजे शिंदे

प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर १३ एप्रिल रोजी जाहिर केले जाईल.

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

10 Apr 2014 - 10:11 am | अनन्त अवधुत

या धाग्यासाठी मला "वाचनखुणा साठवा" हा पर्याय दिसत नाही.

प्रश्न क्रमांक १७ चे बरोबर उत्तर

प्रश्न क्रमांक १७ चे बरोबर उत्तर आहे: (ब)- मानवेंद्र शाह

तिहरी-गढवालचे माजी संस्थानिक मानवेंद्र शाह १९५७ (दुसरी लोकसभा), १९६२ (तिसरी लोकसभा), १९६७ (चौथी लोकसभा), १९९१ (दहावी लोकसभा), १९९६ (अकरावी लोकसभा), १९९८ (बारावी लोकसभा), १९९९ (तेरावी लोकसभा) आणि २००४ (चौदावी लोकसभा) मध्ये निवडून गेले. तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ६ होती (१०-४).

माजी राष्ट्रपती आर.वेंकटरामन १९५२ (पहिली लोकसभा), १९५७ (दुसरी लोकसभा), १९७७ (सहावी लोकसभा) आणि १९८० (सातवी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ४ होती (७-३).

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल १९८९ (नववी लोकसभा), १९९८ (बारावी लोकसभा) आणि २००९ (पंधरावी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ३ होती (१२-९).

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल १९८० (सातवी लोकसभा), १९८४ (आठवी लोकसभा) आणि १९८९ (नववी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ शून्य होती.

या प्रश्नाचे उत्तर खेडूत, अनन्त अवधुत आणि रामज्या यांनी बरोबर पाठवले.

प्रश्न क्रमांक १८ उद्या (१४ एप्रिल रोजी) पोस्ट करेन.

क्लिंटन's picture

13 Apr 2014 - 10:59 pm | क्लिंटन

विजयाराजे शिंदे १९५७ (दुसरी लोकसभा), १९६२ (तिसरी लोकसभा), १९६७ (चौथी लोकसभा), १९७१ (पाचवी लोकसभा), १९८९ (नववी लोकसभा), १९९१ (दहावी लोकसभा), १९९६ (अकरावी लोकसभा) आणि १९९८ (बारावी लोकसभा) मध्ये निवडून गेल्या. तेव्हा त्यांची गॅप ४ होती (९-५).

क्लिंटन's picture

14 Apr 2014 - 10:38 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १८

खालीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघातून भारताचे भावी पंतप्रधान, भावी उपपंतप्रधान, एक भावी मुख्यमंत्री, भावी राज्यपाल, भावी संरक्षणमंत्री, नियोजन आयोगाचे भावी अध्यक्ष, भावी दूरसंचारमंत्री आणि भावी क्रिडामंत्री वेगवेगळ्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले?

अ. लखनौ
ब. अलाहाबाद
क. नवी दिल्ली
ड. विदिशा
इ. यापैकी नाही

क्लिंटन's picture

14 Apr 2014 - 10:40 am | क्लिंटन

प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. मी १६ ते २० एप्रिल दरम्यान बाहेरगावी जाणार असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जमल्यास १६ एप्रिल रोजी दुपारपर्यंत नाहीतर २० एप्रिल रोजी जाहिर करेन. अर्थातच फोनवरून मिपावर लॉगिन करणारच आहे.पण फोनवरून उत्तर लिहिणे बहुदा शक्य होणार नाही. पुढचा प्रश्नही २० एप्रिल रोजीच.

क्लिंटन's picture

16 Apr 2014 - 1:58 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर

प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर आहे (क): नवी दिल्ली.

नवी दिल्लीमधून अटलबिहारी वाजपेयी १९७७ आणि १९८० मध्ये निवडून गेले.ते १९९८ ते २००४ या काळात भारताचे पंतप्रधान होते.

लालकृष्ण अडवाणी १९८९ आणि १९९१ मध्ये निवडून गेले. ते २००२ ते २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते (१९९८ मध्येच ते गृहमंत्री झाले.त्यांना २००२ मध्ये उपपंतप्रधान असा दर्जा दिला गेला).

सुचेता कृपलानी १९५२ आणि १९५७ मध्ये निवडून गेल्या.त्या १९६३ ते १९६७ या काळात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या.

जगमोहन १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये निवडून गेले.ते १९८४ ते १९८९ तसेच जानेवारी १९९० ते मे १९९० या काळात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. (त्यामुळे प्रश्नात भावी राज्यपाल ऐवजी माजी राज्यपाल अशी सुधारणा हवी आहे). जगमोहन पुढे अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात दूरसंचारमंत्री होते.

कृष्णचंद्र पंत १९७१ आणि १९८४ मध्ये निवडून गेले.ते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात १९८७ ते १९८९ या काळात संरक्षणमंत्री होते. तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात १९९९ ते २००४ या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.

अजय माकन २००४ आणि २००९ मध्ये निवडून गेले.ते मनमोहन सिंगांच्या मंत्रीमंडळात क्रिडामंत्री होते.

या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधूत आणि खेडूत यांनी बरोबर पाठवले.अन्य एका मिपाकराचे उत्तर चुकले.

क्लिंटन's picture

16 Apr 2014 - 2:09 pm | क्लिंटन

विअर्ड विक्स यांचेही उत्तर बरोबर होते.

क्लिंटन's picture

16 Apr 2014 - 2:16 pm | क्लिंटन

लालकृष्ण अडवाणी १९८९ आणि १९९१ मध्ये निवडून गेले. ते २००२ ते २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते (१९९८ मध्येच ते गृहमंत्री झाले.त्यांना २००२ मध्ये उपपंतप्रधान असा दर्जा दिला गेला).

राज्यघटनेमध्ये उपपंतप्रधान म्हणून कोणतेही पद नाही.तरीही आर.वेंकटरामन राष्ट्रपती असताना देवीलाल यांनी १९८९ मध्ये वि.प्र.सिंगांच्या मंत्रीमंडळात तर १९९० मध्ये चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली (जनता सरकारमध्येही चरणसिंग आणि जगजीवन राम उपपंतप्रधान होते. तसेच जनता सरकार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या औटघटकेच्या चरणसिंग यांच्या मंत्रीमंडळात यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते.या नेत्यांनी शपथ घेताना उपपंतप्रधान म्हणूनच शपथ घेतली होती की नाही याची कल्पना नाही). त्यावेळी राष्ट्रपती वेंकटरामन यांना वाटत होते की उपपंतप्रधान हे घटनेत पदच नसल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ द्यावी आणि नंतर हवे तर त्यांना उपपंतप्रधान म्हणून डेझिग्नेट करावे. ज्या पदाचा घटनेत उल्लेख नाही त्या पदाची शपथ देणे अयोग्य आहे असे त्यांचे मत होते असे त्यांच्या माय प्रेसिडेंशिअल इयर्स पुस्तकात वाचल्याचे आठवते.

महाराष्ट्रातही १९९५ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनच शपथ घेतली होती. त्यावेळीही हा मुद्दा लागू पडला असता. समजा कोणी अशी घटनेत नसलेल्या पदासाठी शपथ घेतली म्हणून त्याविरूध्द कोर्टात धाव घेतली असती तर कदाचित त्यांचे पद रद्दबादल झाले असते असे मला वाटते. घटनातज्ञांचे मत काय आहे याची कल्पना नाही.

नितिन थत्ते's picture

16 Apr 2014 - 3:34 pm | नितिन थत्ते

मुंडे यांच्या आधी १९७८ मध्ये नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले होते. अलिकडे छगन भुजबळही उपमुख्यमंत्री झाले होते. सध्याही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत.

क्लिंटन's picture

16 Apr 2014 - 2:07 pm | क्लिंटन

लखनौमधून अटलबिहारी वाजपेयी (१९९१,१९९६,१९९८,१९९९ आणि २००४) हे पंतप्रधान (यापैकी १९९१ आणि १९९६ मध्ये भावी पंतप्रधान म्हणून), हेमवतीनंदन बहुगुणा (१९७७) हे (माजी) मुख्यमंत्री तर शीला कौल (१९७१,१९८० आणि १९८४) या राज्यपाल निवडून गेल्या. पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत.

अलाहाबादमधून पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान (यातील लालबहादूर शास्त्री १९५७ आणि १९६२ मध्ये तर वि.प्र.सिंग १९८८ मध्ये भावी पंतप्रधान) तर हेमवतीनंदन बहुगुणा (१९७१) हे भावी मुख्यमंत्री निवडून गेले.पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत.

विदिशामधून अटलबिहारी वाजपेयी हे भावी पंतप्रधान १९९१ मध्ये तर शिवराजसिंग चौहान हे भावी मुख्यमंत्री १९९१ ची पोटनिवडणूक, १९९६,१९९८,१९९९ आणि २००४ मध्ये तर सुषमा स्वराज या माजी मुख्यमंत्री २००९ मध्ये निवडून गेल्या. पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत.

अनन्त अवधुत's picture

15 Apr 2014 - 4:23 am | अनन्त अवधुत

निवडणुकीसोबत नागरिकशास्त्राची कसोटी पाहणारा प्रश्न :)

क्लिंटन's picture

20 Apr 2014 - 11:40 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १९

खालीलपैकी कोणत्या राज्यात १९८४ मध्ये काँग्रेस पक्षाने सर्व जागा जिंकल्या होत्या आणि १९८९ मध्ये सर्व जागांवर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला?

अ. गुजरात
ब. मध्य प्रदेश
क. हिमाचल प्रदेश
ड. राजस्थान
इ. (क) आणि (ड) दोन्ही

नेहमीप्रमाणे प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती.प्रश्नाचे उत्तर २४ एप्रिल रोजी जाहिर करेन.

क्लिंटन's picture

25 Apr 2014 - 6:00 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १९ चे उत्तर

बरोबर उत्तर आहे- (ड) राजस्थान. १९८४ मध्ये काँग्रेसने राजस्थानातून सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या तर १९८९ मध्ये एकही जागा जिंकली नाही. १९८९ मध्ये राज्यातील २५ पैकी १३ जागा भाजपने, ११ जागा जनता दलाने तर १ जागा (बिकानेर) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकली.

१९८४ मध्ये मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही काँग्रेसने सर्व जागा (मध्य प्रदेशात ४० पैकी ४० आणि हिमाचल प्रदेशात ४ पैकी ४) जिंकल्या.पण १९८९ मध्ये पक्षाचा या राज्यांमधून पूर्ण धुव्वा उडाला नाही. पक्षाने मध्य प्रदेशातील ८ आणि हिमाचल प्रदेशातील १ जागा जिंकली. गुजरातमध्ये मुळात १९८४ मध्येच काँग्रेसने सगळ्या २६ जागा जिंकल्या नव्हत्या. १९८४ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने २४, जनता पक्षाने आणि भाजपने प्रत्येकी १ जागा जिंकली. १९८९ मध्येही काँग्रेसचा गुजरातमध्ये पूर्ण धुव्वा उडाला नाही तर २६ पैकी ३ जागा मिळाल्या.

या प्रश्नाचे उत्तर ज्ञानोबाचे पैजार, रामज्या, खेडूत, अनन्त अवधुत, विअर्ड विक्स, नितिन थत्ते आणि श्रीगुरूजी यांनी बरोबर पाठवले.सर्वांचे उत्तर बरोबर होते.

या प्रश्नाचे उत्तर काल देता आले नाही.तेव्हा या प्रश्नमंजुषेतील शेवटचा प्रश्न आताच काही वेळात प्रसिध्द करत आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Apr 2014 - 12:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

उत्तर व्य. नि वर पाठवले आहे.

या प्रश्नमंजुषेतला हा १९ वा प्रश्र्ण. पुढचा म्हणजे वीसावा प्रश्र्ण हा या मालिकेतला शेवटचा प्रश्र्ण असणार आहे.

आता पर्यंत निवडणुका या विषयावर भरपुर चर्चा केल्या असल्या तरी त्यातल्या बहुतांशी चर्चांना आकडेवारीची जोड नसायची. त्यामुळे त्या चर्चा ह्या अपुर्ण माहितीवर आणि केवळ भावनेच्या आधारावर झालेल्या असायच्या.

क्लिंटन यांच्या या प्रश्र्णमालिके मुळे निवडणुकांच्या आकडेवारी मधे रस निर्माण झाला आणि एका नव्या, वेगळ्या दृष्टीकोनातुन मी २०१४ च्या निवडणुकांकडे बघितले. काहि आकडेवारी गोळा केली. स्वत:चे काही अडाखे बांधले व त्या वर आधारीत २०१४ च्या निवडणुकांबद्दल माझे काही अंदाज तयार केले आणि आता मी आता १६ मे २०१४ ची मोठ्या उत्सुकतेने वाट पहातो आहे. तो पर्यंत अजुन काही नवे सापडते आहे का याचा शोध घेत राहीन आणि त्या नंतरही.

ही प्रश्र्ण मालिका अत्यंत रोचक होती. मि.पा. वर निवडणुकांचे वातावरण तयार करण्याची महत्वाची कामगिरी या प्रश्र्णमंजुषे मुळे सहज साध्य झाली. प्रश्र्णांचे उत्तर देताना क्लिंटन यांनी हात अखडता घेतला नाही. त्यांचे या विषयांवरचे इतर लेखही अत्यंत संतुलीत व अभ्यासपूर्वक लिहिलेले होते.

या बरोबरच विकास, श्रीगुरुजी, अतिवास, लाल टोपी, माहितगार व इतर अनेक जणांनी निवडणुका व एकंदर राजकारणाविषयीचे ज्ञान मि.पा.वर खुले केले आणि माझ्या सारख्या अनेक नवख्यांना त्याचा फायदा उठवता आला.

या सगळ्यांचे मी या निमित्ताने मनःपूर्वक आभार मानतो.

क्लिंटन's picture

25 Apr 2014 - 6:09 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक २०

सातारा (महाराष्ट्र), नवी दिल्ली (दिल्ली), लखनौ (उत्तर प्रदेश), बारामती (महाराष्ट्र), आणि गांधीनगर (गुजरात) या लोकसभा मतदारसंघांना जोडणारा एक दुवा आहे. पुढीलपैकी कोणत्या मतदारसंघांना तोच दुवा जोडतो?

अ. अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
ब. रायबरेली (उत्तर प्रदेश)
क. विदिशा (मध्य प्रदेश)
ड. अमेठी (उत्तर प्रदेश)
इ. (क) आणि (ड) दोन्ही

प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर २९ एप्रिल रोजी जाहिर केले जाईल.

क्लिंटन's picture

30 Apr 2014 - 10:10 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक २० चे उत्तर

(इ): विदिशा आणि अमेठी दोन्ही.

सातारा (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून १९७७ मध्ये काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण निवडून गेले.ते सहाव्या लोकसभेत मोरारजी देसाई पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते.

नवी दिल्ली (दिल्ली) लोकसभा मतदारसंघातून १९८९ मध्ये भाजपचे लालकृष्ण अडवाणी निवडून गेले.ते नवव्या लोकसभेत चंद्रशेखर पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते.

लखनौ (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये भाजपचे अटलबिहारी वाजपेयी निवडून गेले. ते दहाव्या लोकसभेत १९९३ ते १९९६ या काळात विरोधी पक्षनेते होते. ते १९९६ मध्येही त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते देवेगौडा आणि गुजराल पंतप्रधान असताना अकराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते होते.

बारामती (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून १९९८ मध्ये काँग्रेसचे शरद पवार निवडून गेले.ते बाराव्या लोकसभेत (१९९८-९९) विरोधी पक्षनेते होते.

गांधीनगर (गुजरात) लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये भाजपचे लालकृष्ण अडवाणी निवडून गेले.ते दहाव्या लोकसभेत (१९९१ ते १९९३ या काळात) विरोधी पक्षनेते होते. तसेच ते २००४ मध्येही त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते चौदाव्या लोकसभेतही विरोधी पक्षनेते होते.तसेच ते २००९ मध्ये ते त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते मे २००९ ते डिसेंबर २००९ या काळात पंधराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते होते.

तेव्हा या मतदारसंघांना जोडणारा समान दुवा म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी त्या पदावर असताना त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते.

विदिशा (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये भाजपच्या सुषमा स्वराज निवडून गेल्या.त्या पंधराव्या लोकसभेत डिसेंबर २००९ पासून विरोधी पक्षनेत्या होत्या.

अमेठी (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९८९ मध्ये काँग्रेसचे राजीव गांधी निवडून गेले.ते नवव्या लोकसभेत वि.प्र.सिंग पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते.तसेच याच मतदारसंघातून १९९९ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी निवडून गेल्या.त्या तेराव्या लोकसभेत (१९९९-२००४) विरोधी पक्षनेत्या होत्या.

तेव्हा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे (क) आणि (ड) दोन्ही.

या प्रश्नाचे उत्तर श्रीरंग जोशी, श्रीगुरूजी, ज्ञानोबाचे पैजार, रामज्या, खेडूत आणि अनन्त अवधुत यांनी पाठवले. यापैकी काही मिपाकरांनी केवळ विदिशा हे उत्तर दिले. काही मिपाकरांनी या मतदारसंघांना जोडणारा दुवा वेगळा आहे असे धरून प्रश्नाचे उत्तर केवळ विदिशा हे दिले. त्या वेगळ्या दुव्याविषयी स्वतंत्र प्रतिसादात लिहित आहे.

अनन्त अवधुत's picture

3 May 2014 - 7:28 pm | अनन्त अवधुत

विरोधी पक्षनेता त्या मतदार संघांमधून निवडून आल्याचा मला अंदाज आला होता आणि मी त्यानुसार विदा शोधत होतो. पण राजीव गांधी विरोधी पक्ष नेता असल्याचा विदा माझ्याकडे नव्हता. शिवाय दिल्ली आणि गांधी नगर येथून लालकृष्ण अडवाणी हे एकाच नाव वारंवार येत होते, त्यामुळे मी इतर नावांवर लक्ष दिले आणि आजी / माजी / भावी मुख्यमंत्र्यांचा दुवा माझ्या लक्षात आला

याविषयी श्री. अनन्त अवधुत यांच्या व्य.नि मधील मजकूर जसाचा तसा चिकटवतो.

**********सुरवात

या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले साम्य म्हणजे येथून आजी / माजी अथवा भावी मुख्यमंत्री निवडून आलेत.
सातारा : यशवंतराव चव्हाण - मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री १९५७ - ६० .
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री १९६० - ६२
साताऱ्याचे खासदार - ४ थी (१९६७) , ५ वी (१९७१) , ६ वी (१९७७) आणि ७ वी (१९८०) लोकसभा

नवी दिल्ली - सुचेता कृपलानी
पहिल्या (१९५२) आणि दुसऱ्या (१९५७) लोकसभेत नवी दिल्ली येथून खासदार.
१९६० मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री.

बारामती : शरद पवार
१९८४ , ९१ , ९६ ,९८ , ९९ ,२००४ मध्ये निवडून आले.
१९७८ - ८० , ८८ - ९१ , ९१ -९३ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

लखनौ - हेमावती नंदन बहुगुणा.
सहाव्या (१९७७ - ८०) लोकसभेसाठी येथून निवडून आले .
तत्पूर्वी १९७३ - ७५ ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

गांधीनगर - शंकरसिंह वाघेला
नवव्या (१९८९ - ९०) लोकसभेसाठी ते निवडून आले होते
१९९६ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले.

या मतदार संघांसारखे इतर मतदार संघ म्हणजे अलाहाबाद आणि विदिशा.
अलाहाबाद मधून हेमवती नंदन बहुगुणा (१९७१) आणि विश्वनाथ प्रताप सिंग (१९८०) हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री निवडून आले.
१९७३ - ७५ हेमवती नंदन बहुगुणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
१९८० - ८२ विश्वनाथ प्रताप सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री होताना त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला.

विदिशा येथून मध्यप्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे १० व्या (१९९१) , ११ व्या (१९९६), १२ व्या (१९९८) आणि १३ व्या (२००४) लोकसभेसाठी निवडून आले होते.
मुख्यमंत्री होताना त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला (२००५)
********* अनन्त अवधुत यांचा व्य.नि पूर्ण

यापैकी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून सुचेता कृपलानी निवडून आल्या पण त्या भविष्यात दिल्लीच्या नाही तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. मूळ प्रश्नात नवी दिल्लीऐवजी दिल्लीतील इतर मतदारसंघांचा उल्लेख असता तर या मतदारसंघांना जोडणारा हा दुवा बरोबर ठरला असता:

१. दक्षिण दिल्ली: १९९८ मध्ये भाजपच्या सुषमा स्वराज निवडून गेल्या. त्या १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तर १९८९ मध्ये भाजपचे मदनलाल खुराणा निवडून गेले.ते १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

२. दिल्ली सदरः १९९१ आणि १९९८ मध्ये भाजपचे मदनलाल खुराणा निवडून गेले.ते १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

३. बाह्य दिल्ली: १९९९ मध्ये भाजपचे साहिबसिंग वर्मा निवडून गेले.ते १९९६ ते १९९८ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

अनन्त अवधुत's picture

3 May 2014 - 7:36 pm | अनन्त अवधुत

मूळ प्रश्नात नवी दिल्लीऐवजी दिल्लीतील इतर मतदारसंघांचा उल्लेख असता तर या मतदारसंघांना जोडणारा हा दुवा बरोबर ठरला असता

मी दिलेल्या उत्तरात त्या राज्याचे मुख्यमंत्री असा उल्लेख नाही तर फक्त मुख्यमंत्री निवडून येण्याबद्दल आहे.
सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या हे मी माझ्या उत्तरात सांगितले आहे.

नवी दिल्ली - सुचेता कृपलानी
पहिल्या (१९५२) आणि दुसऱ्या (१९५७) लोकसभेत नवी दिल्ली येथून खासदार.
१९६० मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री

त्यामुळे

या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले साम्य म्हणजे येथून आजी / माजी अथवा भावी मुख्यमंत्री निवडून आलेत.

दुवा पण योग्य आहे असे मला वाटते.

क्लिंटन's picture

30 Apr 2014 - 10:24 pm | क्लिंटन

या प्रश्नाच्या उत्तराबरोबर गेले चार महिने सुरू असलेल्या प्रश्नमंजुषेची सांगता होत आहे. या प्रश्नमंजुषेनिमित्ताने लोकसभा निवडणुका आणि मतदारसंघांविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मिपावर लोकसभा निवडणुकविषयक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ही प्रश्नमंजुषा सुरू केली होती.तो उद्देश थोड्याफार प्रमाणात साध्य झाला असावा अशी अपेक्षा.
प्रश्नमंजुषेच्या प्रश्नांचे उत्तर पाठवणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार.

प्रश्नमंजुषेची कल्पना छान होती आणि उत्तरं द्यायला मजा आली! धन्यवाद.

अनन्त अवधुत's picture

3 May 2014 - 7:44 pm | अनन्त अवधुत

फार मज्जा आली. प्रश्न फार छान होते. किती तरी गोष्टी नव्यानेच कळल्या. प्रश्नांची उत्तरे शोधताना दमछाक व्हायची.
चुकत-माकत उत्तरे मिळाली कि बरे वाटायचे. हि प्रश्नमंजुषा नेटाने इतके दिवस सुरु ठेवल्याबद्दल धन्यवाद.
तुमची उत्तरे पण तपशीलवार असायची त्यामुळे वाचताना नीट कळायचे.

काय बक्षिस देणार का नाय ?