उत्साहानं भारलेली डेनवरची सोळावी गल्ली

कल्पक's picture
कल्पक in जनातलं, मनातलं
17 Feb 2014 - 10:58 am

डेनवर हे अमेरिकेतील कोलोरॅडो राज्याच्या राजधानीचे शहर. कोलोरॅडो हे भौगोलिकदृष्ट्या बव्हंशी पर्वतीय राज्य. कोलोरॅडो या नदीवरून राज्याला नाव देण्यात आलं. डेनवर हे शहर समुद्रसपाटीपासून 5,280 फूट किंवा 1 मैल (1.6 कि.मी.) उंचीवर आहे. त्यामुळे या शहराला Mile High City (1 मैल उंच शहर), असं टोपण नावसुद्धा आहे. 1858 साली डेनवर शहर वसवण्यात आलं. या भागातील 500 चौरस मैलांच्या प्रदेशात डेनवर हे एकमेव शहर असल्यामुळे उद्योग, व्यापार, रोजगार, वाहतूक आणि शिक्षण या सर्व गोष्टी डेनवर येथेच केंद्रित आहेत. 13 हजार फुटांपेक्षा उंच असलेल्या आणि 50 पेक्षा जास्त हिमशिखरांच्या रॉकी पर्वतरांगांच्या कुशीत डेनवर शहर वसलं आहे. या पर्वतांवर स्कीईंग करण्यासाठी दरवर्षी देशभरातील लोक आवर्जून येतात. भौगोलिक उंचीमुळे डेनवरमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा साधारणतः 4 महिने बर्फ पडतो. हिवाळ्यात तापमान कधी कधी उणे 20 अंशांपर्यंतही जाते. उन्हाळा तसा सुसह्य असतो, पण ऊन मात्र खूप कडक पडतं. पृथ्वीवरील उत्तरेकडील भागात हा प्रदेश येत असल्यामुळे, सूर्यकिरण सरळ रेषेत पडतात. या शहराच्या कोणत्याही दिशेने क्षितिजाकडे पाहिलं, तरी उंच अशा पर्वतरांगा दिसतात. कोरडे हवामान, निळेशार आकाश आणि वर्षातील 300 दिवस लख्ख सूर्यप्रकाश, असे प्रसन्न वातावरण असतं.

शहराच्या मध्यवर्ती भागात कोलोरॅडो राज्य सरकारची कार्यालये, बहुराष्ट्रीय कंपन्या, बॅंकांची कार्यालये, असंख्य दुकाने आणि हॉटेल आहेत. "डाऊनटाऊन' हा शब्द तसा भारतीयांना अनोळखी. या शब्दाची निर्मितीही गमतीशीर आहे. उत्तर अमेरिकेतील इंग्रजी भाषक लोक प्रामुख्याने हा शब्द वापरतात. डाऊनटाऊन म्हणजे शहराचा मुख्य किंवा बाजारपेठेचा भाग. हा शब्द सर्वप्रथम 1830 च्या सुमारास न्यूयॉर्कसंदर्भात वापरला गेला. गंमत म्हणजे त्यावेळचे मुख्य न्यूयॉर्क शहर इतर उपनगरांच्या दक्षिणेला होते. त्यामुळे लोक मुख्य न्यूयॉर्कला दक्षिण दिशेमुळे डाऊनटाऊन म्हणायला लागले. नंतरच्या काळात सर्व शहरांमध्ये मुख्य शहरासाठी तोच शब्द रूढ झाला!

मुख्य शहरातील सोळावा रस्ता (किंवा 16 वी गल्ली म्हणा!) अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा रस्ता फक्त पादचारी आणि एका विशिष्ट शटल बससाठीच खुला असतो. इतर वाहनांना येथे प्रवेश नाही. दोन किलोमीटर लांबीच्या या सिमेंटच्या रस्त्यावर 300 दुकाने, 50 हॉटेल आणि विविध बॅंका, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. म्हणूनच या रस्त्याला Sixteenth Street Mall असं म्हणतात. (एकाच रस्त्यावर इतकी सारी दुकानं एकत्र असल्यामुळं त्याला एक मोठी बाजारपेठ किंवा Mall असं म्हणतात). आपल्या पुण्यातील लक्ष्मी रोड शहराचा मुख्य आकर्षणबिंदू आहे असं म्हणता येईल. या रस्त्यावरून धावणाऱ्या शटल बसला Free Mall Ride असं म्हणतात. ही बस रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विनाशुल्क सेवा पुरवते. प्रत्येक चौकात एक थांबा असतो. ही बस पर्यावरणवादी दृष्टिकोन बाळगून विजेवर चालवण्यात येते.

या रस्त्यावरील पथनाट्य, संगीत आणि कला हा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी नित्य आकर्षणाचा विषय असतो. अनेक गायक, वादक, नकलाकार, चित्रकार, शिल्पकार या रस्त्यावर आपली कला सादर करत असतात. गिटार घेऊन गाणी म्हणणारे किंवा एखादे वाद्य वाजवणारे समूह कायम दिसतात. रस्त्यावर दुभाजक म्हणून भरपूर मोकळी जागा सोडण्यात आली आहे. या जागेवर विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या असतात. मोकळ्या जागेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध खेळ आणि संगीत अनुभवण्यासाठी केलेली व्यवस्था. एका ठिकाणी पियानो ठेवला आहे. येणारे जाणारे हौशी लोक त्यावरून बोटे फिरवतात. एका ठिकाणी बुद्धिबळाचा डाव मांडला आहे. तिथे कायम हौशी बुद्धिबळपटू आणि प्रेक्षक रमलेले असतात.

या रस्त्याला लागूनच असंख्य कलादालने आहेत. तिथे कायम विविध देशांच्या चित्रकारांची प्रदर्शने भरलेली असतात. Denver Art Museum हे जगप्रसिद्ध कलादालन इथून जवळच आहे. येथे मूळ अमेरिकी, पाश्‍चात्य, युरोपीय, आफ्रिकी, पौर्वात्य अशा विविध शैलींच्या कलाकृतींचा संग्रह आहे. गेल्या आठवड्यात एका ठिकाणी लिओ नार्डो डा विंची याने चित्रे काढण्यासाठी वापरलेल्या मूळ साधनांचे आणि वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. रस्त्यालगतच विविध नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि Performing Art Complexes आहेत. तिथे कायम सिने, नाट्य, शिल्प, संगीत, वाद्य, रसिक विविध कलाविष्कारांचा आस्वाद घेत असतात. विविध विषयांवरील संमेलने भरत असतात. Denver Performing Art Complex हे अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे भव्य नाट्यगृह या रस्त्याजवळच आहे. येथे एकूण 10 रंगमंच असून एकूण 10 हजार रसिक आस्वाद घेऊ शकतात.

रस्त्याजवळच विविध वस्तू-संग्रहालये आहेत. डेनवरच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेत एक नाण्यांचे संग्रहालय आहे. तिथे अमेरिकेतील विविध प्रकारच्या चलनी नोटा आणि नाण्यांचा संग्रह आहे. सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे 3 कोटी डॉलर एवढ्या नोटांचा ढीग प्रदर्शनासाठी ठेवला आहे! डेनवर अग्निशामक दलाचे संग्रहालय हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे अग्निशामनाच्या जुन्या काळापासून ते अत्याधुनिक तंत्रापर्यंत सगळ्या वस्तूंचा संग्रह आहे. 1909 मध्ये हे संग्रहालय तयार करण्यात आले. इथे अग्निशमन विषयातील विविध छायाचित्रांचा संग्रह तसेच लहान मुलांना या विषयीची माहिती व्हावी, यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. Denver Museum of Nature and Science हेसुद्धा लोकप्रिय आहे. या संग्रहालयात डायनासोरचे दुर्मिळ अवशेष तसेच खगोलशास्त्रावरील सुंदर प्रदर्शन आहे. डेनवरचे मत्स्यालयही भागात आहे. 17 एकर पसरलेल्या मत्स्यालयात माशांच्या 500 प्रजाती जतन केल्या आहेत.

हा रस्ता म्हणजे खाद्यरसिकांसाठी मेजवानीच आहे. अमेरिकी, चिनी, भारतीय, मेक्‍सिकी, इटालीय, ब्राझिली, व्हिएतनामी, मंगोलियायी, थाई, हॉंगकॉंगचे, पेरूकडील, जपानी, जर्मन, मध्यपूर्वेतील देशांचे व स्पेनी अशा विविध देशांच्या चविष्ट पदार्थांची हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेल किंवा खाद्यपदार्थांच्या दुकानांचं वेगळं, रंजक असं वैशिष्ट्य आहे. "द मार्केट' आणि "चीज केक फॅक्‍ट्री' ही केकसाठी प्रसिद्ध असणारी दुकानं आहेत. विविध आकार, चवी आणि पदार्थ ह्यांपासून बनलेली चॉकलेट मिळणारं "चॉकलेट- फॅक्‍ट्री' हे दुकान आबालवृद्धांना आकर्षित करणारं आहे. थायलंडची एक बाई दोन रस्त्यांच्या मधल्या जागेत एक चौचाकी गाडी लावून नारळाच्या दुधापासून बनलेले खास थाई पदार्थ वेळेवर तयार करून देते.

कोलोरॅडो राज्य सरकारची मुख्य इमारत (State Capital Building) या रस्त्याच्या जवळच आहे. ही इमारत 1980 मध्ये बांधण्यात आली. इमारतीचा कळस सोन्याचा असून, 13 वी पायरी समुद्रसपाटीपासून बरोबर 1 मैल (1.6 किमी) उंच आहे. या पायऱ्यांवरून सूर्यास्त पाहिल्यास रॉकी पर्वतरांगांमागे मावळणारा सूर्य दिसतो.

16 वा आणि 15 व्या रस्त्यांना छेद देणाऱ्या आडव्या रस्त्यावर आणखी एक चमत्कारिक आणि मजेशीर अनुभव घेता येतो. या रस्त्यावरून चालताना पादचारीमार्गावरील लोखंडी झाकणखालून रेल्वे, वाघ, कोंबड्या आणि विविध प्राणी- पक्ष्यांचे आवाज येतात! पहिल्यांदाच जाणारे लोक बिचकतात आणि बुचकळ्यात पडतात. पण ही किमया डेनवर येथील ध्वनिसंयोजक जिम ग्रीन यांची आहे. त्याने 1992 मध्ये sound walk ही संकल्पना मांडली आणि पादचारी मार्गाखाली विविध आवाज ऐकवणारी यंत्रणा बसवली. त्यामुळे या पादचारीमार्गावरून कोणी चालायला लागले की सेन्सर ते ओळखतो आणि ही यंत्रणा विविध आवाज ऐकवून लोकांना sound walk चा अनुभव देते.

डेनवरचे सार्वजनिक वाचनालय या रस्त्याजवळच आहे. हे वाचनालय म्हणजे ज्ञान आणि माहितीचे प्रचंड मोठे भांडारच आहे. 1889 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या वाचनालयात 22 लाख पुस्तके, मासिके, फोटो, नकाशे, सीडी, डीव्हीडीचा अफाट संग्रह आहे. थोडक्‍यात सांगायचं म्हणजे अमर्याद ज्ञान आहे, शक्‍य आहे तेवढे घ्या! या वाचनालयात पाश्‍चिमात्य इतिहासाचा वेगळा विभाग आहे. त्यात 6 लाख छायाचित्रे आणि 3700 हस्तलिखिते आहेत. जगभरातील विविध विषयांवरील मासिकांसाठी एक वेगळा मजला ठेवला आहे. लहान मुलांसाठी एक वेगळा विभाग असून, तिथे मुलांच्या वयाप्रमाणे गोष्टी- गाण्यांचे उपक्रम आयोजित केले जातात. हे वाचनालय सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे! वाचनालयाचे आजीव सदस्यत्व मोफत आहे! हे वाचनालय लोकांच्या देणग्यांवर चालते. राज्य सरकारचा आर्थिक पुरवठा वाचनालयाला असतोच, पण लोकांनी दिलेली मदत हादेखिल वाचनालायाचा आधार आहे.

अशा वैविध्यपूर्ण गोष्टींचं केंद्रस्थान असलेला हा डेनवरचा 16 वा रस्ता कायमच पर्यटक, नोकरदार, विक्रेते, विद्यार्थी, गायक, वादक आणि विविध कलांचे रसिक या साऱ्यांनी फुललेला असतो. अमेरिकेत वृद्ध, अपंगांसाठी संपूर्ण अद्ययावत अशा यांत्रिकी सोई आहेत. त्यामुळे एखादे आजोबा कुणाच्याही मदतीशिवाय आपल्या इलेक्‍ट्रिक व्हील चेअर गाडीवरून मनमुराद फिरताना दिसतात. सोमवार ते शुक्रवार प्रामुख्याने नोकरी करणारे लोक लगबगीने घड्याळाच्या काट्यावर धावताना पहायला मिळतात आणि शुक्रवार संध्याकाळ ते रविवार रात्र वीकएंडचा आस्वाद घेणाऱ्या लोकांचा उत्साह पहायला मिळतो. सोमवार ते शुक्रवार व्यवस्थित काम करायचं. भरपूर मेहनत करायची आणि शनिवार-रविवार धमाल करायची, असा इथला एकंदरीत दिनक्रम असतो. शुक्रवारी सकाळपासूनच लोकांना शनि- रवीच्या सुट्यांचे वेध लागलेले असतात. शुक्रवारी कार्यालयातील कामं संपताना सारे एकमेकांना Have a nice weekend असे जणू काही एखाद्या सणाच्या शुभेच्छा देत आहेत. अशा उत्साहात म्हणतात. येता जाता लिफ्टमध्ये भेटल्यावर "चला शुक्रवार आला एकदाचा' असा सूर वारंवार आळवला जातो. शुक्रवारी बरेच लोक लवकर काम संपवून लवकर घरी जातात. शुक्रवार दुपारपासूनच 16 वा रस्ता प्रफुल्लित चेहऱ्यांनी फुलून जातो. वीकएंडचा उत्साह रस्त्यावर ओसंडून वाहत असतो. रस्त्यावर जणू काही एखाद्या आनंदोत्सवच सुरू झाला आहे असे वातावरण असते. या क्षणी हातात असलेल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यावा, या पाश्‍चात्य संस्कृतीचाच तो एक परिपाक असतो. संध्याकाळपर्यंत रस्त्यावरील सारी हॉटेले, कॉफीची दुकानं लोकांनी गजबजून जातात. प्रत्येक जण आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबीयांसोबत आनंदोत्सवात सामील होतो. कारण हाच कला- क्रीडा- संगीत- साहित्य- खाद्य- पर्यटनमय विरंगुळा त्यांना गेल्या आठवड्यातील श्रम विसरून पुढील आठवड्यासाठी नवीन उत्साह, ताजेपणा देतो.

निखिल वेलणकर

देशांतरलेख

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

17 Feb 2014 - 11:07 am | प्रमोद देर्देकर

ही फटु तरी टाकायचे ना राव आणि २ वेळा कशासाठी धागा काढला तुम्ही.

लेख चुकून दोनदा प्रकाशित झालाय, एक कसा काढून टाकता येईल?

कल्पक's picture

17 Feb 2014 - 11:25 am | कल्पक

या लेखाशी निगडीत फोटो इ-सकाळवर प्रकाशित झालेल्या मूळ लेखात पाहता येतील- http://online3.esakal.com/esakal/20121011/4859823802424987859.htm

आनन्दा's picture

17 Feb 2014 - 2:17 pm | आनन्दा

बाकी त्या लेखावरील ही प्रतिक्रिया भारीच !!

खूप चान वर्णन केले आहे, डेन्मार्क वर फिरून अल्यासार्काहे वाटले.

वर्णन तर आवडलेच. तदुपरि फोटो टाकले असतेत तर अजून बहार आली असती.

दिपक.कुवेत's picture

17 Feb 2014 - 7:00 pm | दिपक.कुवेत

आणि सकाळ लेखामधले फोटो पण पाहिले. बघुया जीवाची अमेरिका करायचा योग कधी जुळुन येतोय तो!

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2014 - 8:51 pm | श्रीगुरुजी

मी १९९५ मध्ये काही महिने कोलोरॅडो स्प्रिंग मध्ये राहत होतो. त्या काळात अधूनमधून डेनव्हरला जाणे होत होते. तेव्हा डेनव्हरमध्ये २ भारतीयांची किराणा मालाची दुकाने होती. त्यातले एक सरदारजीचे होते व दुसरे एका पारशी बाईचे होते. ती पारशी बाई बोलायला चांगली होती. सरदारजी मात्र अत्यंत खडूस होता. तुम्ही लिहिलेल्या १६ व्या गल्लीत गेलेलो नाही. पण तिथल्या हरेकृष्ण पंथाच्या श्रीकृष्ण मंदीरात एकदा गेलो होतो. तिथे घेरा करून शेंडी राखलेले, जानवे परिधान केलेले व सोवळे नेसलेले फिरंगी पाहून मौज वाटली होती.

कोलोरॅडो या राज्याबद्दल माझे फारसे चांगले मत नाही. तिथे वर्णद्वेष इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. सर्वसामान्य नागरिकसुद्धा वर्णाचा अहंकार बाळगताना आढळतात. भारतात हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिश्चन करून घेणार्‍या अनेक तथाकथित सेवाभावी संस्थांची कार्यालये कोलोरॅडोमध्ये आहेत. तिथून भारत व इतर गरीब देशातील इतर धर्मियांना ख्रिश्चन करून घेण्यासाठी पद्धतशीर काम चालते.

सुदैवाने मी तिथे फारच थोडा काळ होतो. तुमच्या लेखामुळे काही जुन्या कटु आठवणी जागृत झाल्या.

तुमची निरीक्षणे खरी असू शकतात. मी २ वर्षे कुटुंबासोबत डेनवर येथे राहत होतो पण आम्हा कुणालाच वर्णद्वेषाचा अनुभव आला नाही. माझ्या कार्यालयात अमेरिकन लोकांच्या टीम मध्ये मी एकटा भारतीय होतो तरी सुद्धा कधीच तसा अनुभव आला नाही. एकंदरीत शहरात वावरताना सुद्धा लोक खूप मोकळेपणाने आणि सौजन्याने वागताना आढळले. पण काही भारतीय लोकांना तसे तुरळक अनुभव आल्याचे ऐकले आहे. कदाचित डेनवरला इतर शहरांच्या तुलनेत कमी भारतीय असल्यामुळे असेल. एका अंदाजानुसार डेनवर मध्ये १४००० भारतीय आहेत. ४००-५०० मराठी आहेत. पण एकंदरीत निसर्ग, सामाजिक सुरक्षा आणि नोकरी-व्यवसाय-शिक्षण यासाठी बहुतांशी भारतीयांना डेनवर आवडल्याचे दिसले. अनेक लोक कॅलिफोर्निया सोडून डेनवरला स्थलांतरित झालेले दिसले.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2014 - 9:09 pm | मुक्त विहारि

आवडले....

रामपुरी's picture

17 Feb 2014 - 11:18 pm | रामपुरी

चान चान!

माहिती छान दिलीत हो, पण माझी डेनवरची एवढ्यातली आठवण म्हणजे फ्लाईट तासभर डिले झाली ती आहे. अर्थात त्याचा संबंध शहराशी कसा असेल? ;) माझी एक मैत्रिण ९ वर्षं डेनवरास राहून कधी अशी माहिती तिनं दिली नाही. आता मीच तिला हे सांगते. बघुया काय म्हणतीये! ;)