दक्षिण भारतीय पध्दतीचे गोडाचे आप्पे, नेई म्हणजे तूप... तुपात तळलेले गोड आप्पे :)
साहित्यः
१ वाटी तांदूळ ३-४ तास भिजवणे (उकडा तांदूळ ही चालेल)
३/४ वाटी चिरलेला गुळ
३/४ वाटी खवलेला ओला नारळ किंवा नारळाचे काप / तुकडे
१ केळं
१ टेस्पून तांदळाची पिठी
१ टीस्पून काजूचे तुकडे
१/२ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून खायचा सोडा
आप्पे तळायला साजूक तूप (तूप नको असल्यास तेलाचा ही वापर करु शकता, पण तूप घातल्यामुळे आप्प्यांना येणारी चव कमालीची स्वादिष्ट लागते )
पाकृ:
भिजवलेल्या तांदाळतले पाणी काढून, तांदूळ मिक्सरला कमीत-कमी पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे.
एका पॅनमध्ये गुळ घालून त्यात १/४ वाटी पाणी घालून मंद गॅसवर तो वितळेपर्यंत ढवळावे.
गुळाचे पाणी गाळून एका वाटीत काढावे, म्हणजे काही scum असेल तर गाळला जाईल.
वाटलेल्या तांदळाच्या मिश्रणात केळ्याचे काप घालून, कुस्करून एकत्र करावे.
आता त्यात खवलेला नारळ, वेलचीपूड, तुकडा काजू व लागेल तसे गुळाचे पाणी थोडे-थोडे करुन घालावे. (मिश्रण खूप सैल / पातळ झाले तर आप्पे तळताना खूप तेल पितं, त्यामुळे प्रमाण नीट बसवावे.)
गुळाचे पाणी घातल्यावर मिश्रण पातळ होतं म्हणून त्यात तांदळाची पिठी घालून नीट मिक्स करावे.
मिश्रण साधारण डोश्याच्या मिश्रणाइतपत घट्ट हवे.
सर्वात शेवटी खायचा सोडा घालून मिक्स करावे. ( खायचा सोडा घालायचा नसल्यास मिश्रण दोन-तीन तास झाकून ठेवावे.)
आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्याच्या प्रत्येक गोलात साजूक तूप सोडावे.
चमचाभर मिश्रण प्रत्येक गोलात घालून तळावे.
एका बाजून नीट शिजले की उलटवावे, गरज वाटल्यास थोडे तूप सोडावे.
दोन्ही बाजूने सोनेरी रंग आला की काढावे.
स्वादिष्ट नेईअप्पम खाण्यासाठी तयार आहेत.
प्रतिक्रिया
26 Jan 2014 - 11:17 pm | मोदक
वाह्ह्ह....
नेहमीप्रमाणे स्वादिष्ट फोटो. ;)
26 Jan 2014 - 11:29 pm | सर्वसाक्षी
मस्त प्रकार. उत्तम सादरीकरण
27 Jan 2014 - 12:00 am | रेवती
सुरेख फोटू आणि सात्विक पाकृ! करणारच करणार. तयार अप्प्यांचा फोटू ग्रेट आलाय. या पदार्थाला तोंडी लावणे काय करायचे? (हा प्रश्न आहे).
27 Jan 2014 - 12:11 am | कवितानागेश
तूप! ;)
27 Jan 2014 - 12:16 am | मोदक
लिंबाचे उपवासाचे लोणचे.
27 Jan 2014 - 1:41 pm | सानिकास्वप्निल
नेईअप्पमला स्वतःची छान चव आहे त्यामुळे मला तरी त्याच्याबरोबर काही नको असे वाटते...तरीही माऊताई आणी मोदक म्हणतात त्याप्रमाणे तूप, लिंबाचे लोणचे चालेल ही कदाचित.
27 Jan 2014 - 12:09 am | कवितानागेश
आहा! :)
27 Jan 2014 - 12:29 am | गणपा
27 Jan 2014 - 12:32 am | डॉ सुहास म्हात्रे
त्या प्लेटमध्ये नेईअप्पम दिसले की मी पण येतोच ! डब्बल घेऊन ठेवा :)
27 Jan 2014 - 12:57 pm | गणपा
काल पासुन किमान १०-१५ वेळा धागा उघडुन पाहिला. आमची प्लेट अजुन रिकामीच आहे. (हो नै तर एक्का काकांना डौट यायचा की ते यायच्या आधीच मी सगळे अप्पे गट्टम केले.)
बादवे हा प्रकार सगळ्यात पहिल्यांदा अंधेरीच्या ऑफिसमध्ये चाखला होता. दुपारच्या नाश्ट्याच्या वेळी कँटिनमधालं पोरगं नारळाच्या चटणी (चटणी कसली चोथायुक्त पाणीच ते) सोबत घेऊन यायचं. किंचीत गोड-नमकीन(मराठी?) टेस्ट मस्त वाटायची.
27 Jan 2014 - 12:36 am | मधुरा देशपांडे
आजच आप्पे किती दिवसात खाल्ले नाहीत असे म्हटले आणि योग्य वेळी पाकृ मिळाली. नेहमीप्रमाणेच सुंदर फोटू. लवकरच करून बघते.
27 Jan 2014 - 12:46 am | आयुर्हित
आ हा हा! सुंदर व चविष्ट पाकृ! काय सुरेख फोटो आलेत हो!
सोडा नकोच.मिश्रण २-३ तास झाकलेले बरे.
गुळ व साजुक तूप हा तर खूप चांगला आरोग्यदायी पर्याय आहे.
त्यात मला वाटते काजूचे कच्चे तुकडे टाकण्यापेक्षा काजुची पेस्ट किंवा भुकटी बरी.
सोबत खायला रबडी उत्तम.
फक्त यावर उतारा म्हणून आठवडाभर ५ किलोमीटर जास्तीचे चालणे करावे.
उत्तम पदार्थ दिला आपण.
धन्यवाद.
27 Jan 2014 - 8:10 am | अजया
फोटोने डोळ्याचे पारणे फिटले! जिभेचे कसे फिटायचे?!
27 Jan 2014 - 8:35 am | सस्नेह
आमच्याकडे याला 'गुलगुले' असे म्हणतात.
27 Jan 2014 - 10:46 am | इरसाल
तुम्ही जर याला 'गुलगुले' म्हणत असाल तर तुम्हाला गोड शेव पण माहित असेलच.
बादवे-तुम्ही कुठल्या ?
27 Jan 2014 - 11:07 am | विटेकर
हे " गुलगुले" नव्हेत, गुल्गुले म्ह्णजे गोड भजी... बेसनपीठापासून बनवतात.
27 Jan 2014 - 10:02 pm | सस्नेह
माझी आजी तांदळाचे पीठ भिजवून गुळाचा पाक घालून गुलगुले करायची. त्यात बेसनपीठ घालत होती की नाही आठवत नाही.
27 Jan 2014 - 9:26 am | मुक्त विहारि
झक्कास...
हा प्रकार मला अजिबात आवडत नाही...
पण लिखाण आणि फोटो, नेहमीप्रमाणे...सुसाट ....
27 Jan 2014 - 9:30 am | इन्दुसुता
पाकॄ आवडली... नक्की करणार.
गेल्या विकांताला अनन्याचे पुडिंग, काल चिली गार्लिक बेबी कॉर्न पुढल्या विकांताला हे नेईआप्पम... माझ्या जीभेची चंगळ अहे बुवा!!!!
27 Jan 2014 - 9:32 am | अर्धवटराव
है कोई जवाब?
स्वर्गीय सुख यापरतं काय वेगळं असेल??
29 Jan 2014 - 9:54 am | मृगनयनी
आय लव यु.. सानिकाताई!!!!
27 Jan 2014 - 9:46 am | कैलासवासी सोन्याबापु
तोंपासु!!!
27 Jan 2014 - 10:12 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
27 Jan 2014 - 10:58 am | सूड
शेवटचा फोटो बघून वारल्या गेले आहे. ;)
27 Jan 2014 - 11:17 am | विटेकर
फोटो , पाक कृती आणि पदार्थ देखील ! खाण्याच्या बाबतीत मी चार्वाक पंथी आहे .. जीव आहे तोपर्यन्त भरपूर तूप पिऊन घ्या !(च्यायला .. ह्या डायबेटीस च्या .. ..! )असो.
आमच्याकडे काल तिखट्वाले अप्पे होते .. झ़कास .. मजा आली.

"कानडीने केला मराठी भ्रतार" असे असल्याने अनेक कानडी पदार्थ घरीच खायला मिळतात. हल्ली ती अंजली चे नॉनस्टिक वाले अप्पेपात्र आले .. पूर्वीच्या लोखंडी पात्रात एक झकास खरपूस वास असायचा ! कमी तेलाच्या
भानगडीत त्याची मात्र हाकालपट्टी झाली !
27 Jan 2014 - 11:21 am | दिपक.कुवेत
पण काजुएवजी काळे तीळ घातले तर चवीला अधीक छान लागतील.
27 Jan 2014 - 1:46 pm | सानिकास्वप्निल
काळे तीळ घालू शकता ना पण गुळ+खोबरं+केळं ह्यासोबत दाताखाली काजू छानच लागतो :)
काळे तीळ अचप्पम मध्ये घातलेले चांगले वाटतात..अर्थात आपल्या आवडीप्रमाणे बनवावे.
धन्यवाद.
27 Jan 2014 - 12:32 pm | प्यारे१
>>>>नेई म्हणजे तूप... तुपात तळलेले गोड आप्पे
चुकीची माहिती आहे.
निजधामाला नेणारे म्हणजे नेई असे ते अप्पम म्हणून नेईअप्पम. ;)
बाकी प्रेझेन्टेशनला मार्क नाहीत. (संपलेत)
गोडाचे बुलबुले खाऊन बघितलेत. फार आवडले नव्हते. ह्याचं ठाऊक नाही.
27 Jan 2014 - 1:27 pm | नितीन पाठक
खल्ला.................स
सानिकांची डिश म्हणजे जीव जाळणे आणि पोटात खड्डा (भुकेने) पडणे. दोन्ही गोष्टी एकदम होतात. लइच त्रास होतो बघा ! आमच्या नशिबी कधी मिळेल (म्हणजे पोटात कधी पडेल) ? असे वाटते !!
27 Jan 2014 - 3:51 pm | वेल्लाभट
जबरदस्त. आमच्याकडे बरेचदा होतात नाश्त्याला.
पण काहीही म्हणा; तुम्ही टाकता ते फोटो विशेष उल्लेखनीय असतात. नेहमीच आवडतात. फस्ट क्लास.
27 Jan 2014 - 4:01 pm | सुहास..
किलर !!
27 Jan 2014 - 4:04 pm | अमेय६३७७
व्वाह, खूप छान रेसिपी आणि फोटो
27 Jan 2014 - 6:44 pm | Mrunalini
वा वा वा.. मस्तच!! तोंपासु. :D
27 Jan 2014 - 7:01 pm | अनन्न्या
भारी! नारळ-गूळ आणि तांदूळ हे एकत्र आले की तूप आलेच! खांडवी नारळाच्या दूधाबरोबर छान लागते, कदाचित या आप्प्यांबरोबरही नारळाचे दूध चांगले लागेल.
27 Jan 2014 - 7:02 pm | शिद
आमच्या गावाला हे आप्पे ताडी मिसळुन बनवतात. साधनसामुग्री थोड्याफार फरकाने सारखीच पण पिठामध्ये ताडी मिसळुन रात्रभर आंबवत ठेवतात. ताडी जितकी खट्टी (आंबूस) तितके आप्पे फुगतात ब चवीला पण छान लागतात.
27 Jan 2014 - 7:14 pm | सूड
ताडी? *bad*
27 Jan 2014 - 7:38 pm | बॅटमॅन
रेगुलर आप्पमच्या रेशिपीतही ताडी वापरली जाते असे वाचले आहे.
27 Jan 2014 - 7:43 pm | सानिकास्वप्निल
कल्लप्पम बनवताना ताडीचा वपर करतात.
27 Jan 2014 - 7:45 pm | बॅटमॅन
धन्यवाद!!
(पाककलेच्या प्रांगणात नुकता पालथा पडू लागलेला) बॅटमॅन.
27 Jan 2014 - 8:47 pm | शिद
धन्यवाद...
@सुडः ताडीचे आप्पे खाल्ले तर कळणार सुद्धा नाही सांगीतल्याशिवाय ;)
27 Jan 2014 - 11:20 pm | रेवती
तुम्ही सांगितलेले ऐकायला मनुष्य जागा असायला हवा ना! कधी नव्हे असं काही पोटात गेल्यावर कुंभकर्ण व्हायचा त्याचा!
27 Jan 2014 - 7:08 pm | अनिरुद्ध प
वा खु सा आ
27 Jan 2014 - 8:34 pm | स्वाती दिनेश
मस्त दिसत आहेत ग आप्पे,
स्वाती
27 Jan 2014 - 9:09 pm | सचिन तेली
आमची सौ तुम्ही दिलेल्या प्रत्येक पाककृती बनवते.
27 Jan 2014 - 9:35 pm | पैसा
माझ्या सासूबाईंचा फेव्हरिट पदार्थ! त्या चुलीवर लोखंडी आप्पेपात्रात करायच्या ते लै भारी लागायचं. आता गॅस आल्यावर ती चव हरवली.
27 Jan 2014 - 9:39 pm | भ ट क्या खे ड वा ला
फोटो आणि पाकृ. दोन्ही
पहिलाच फोटू पाहून तोंडाला पाणी सुटले
27 Jan 2014 - 9:42 pm | यशोधरा
दुष्ट बै कुठची!
28 Jan 2014 - 9:05 am | प्रभाकर पेठकर
आता स्वयंपाकघरातल्या भांड्यांमध्ये आप्पेपात्र, जे सर्वात मागे पडले आहे ते, शोधणे आले.
गोड वर्ज्य असल्याने तिखटमिठाचे, मिश्र डाळीचे आप्पे करावेत म्हणतो.
पण जर का गोडाचे पथ्य नसते तर गुळ, केळं, खोबर्याचे बारिक तुकडे आणि काजू म्हणजे ढिगभर आप्पे सुद्धा पुरले नसते.
पाककृती (नेहमी प्रमाणेच) सुंदर आणि चित्ताकर्षक आहे.
28 Jan 2014 - 11:13 am | सुहास झेले
जबरी..... तोंपासु !!!
28 Jan 2014 - 6:52 pm | पिंगू
जबरी आहेत. घरी आप्पेपात्र आणून ठेवले आहेच. वेळ मिळाल्यावर करुन बघेन..
28 Jan 2014 - 10:28 pm | सखी
मार डाला सानिकातै! इतके सुंदर फोटु बघुन नक्की करावेसे वाटतात, आता वेळ कधी मि़ळतो त्यावर आहे.
29 Jan 2014 - 9:03 pm | इशा१२३
आप्पे करते नेहेमीच..पण असे नेईअप्पम केले नव्हते अजुन.आता करुन बघते .
3 Feb 2014 - 12:14 am | wrushali kulkarni
करून पाहायला हवे एकदम नवीन पदार्थ आहे.
3 Feb 2014 - 11:32 am | अमृत
तांदळाचे पिठ नसल्याने किंचीत कणीक घालून केलेत.. चविला छान झाले होते! छायाचित्र टाकणार होतो पण असू देत :-) पाकृकरिता धन्यवाद!