कॉमर्सच्या बारावीला मार्कांचं एवढं काही कौतुक नसतं. तरी बोर्डात येणं भारीच! दहा मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपमध्ये नमिताच बोर्डात आली होती. "माहेश्वरी आहे." कुळ्या म्हणाला. "कॉमर्सच्या बोर्डात नाही आली तर उपयोग काय मारवाडी असण्याचा?" सगळे जोरजोरात हसले. नमितासुद्धा, पण डोळ्यांत थोडी उदासी होती.
बाकीच्यांना बरे मार्क होते तसे, भारी काही नाही. सीए करायचं. "झावरे" लावायचा, का "जोशी", का "अग्रवाल" हे ठरंत होती. नमिता एकटीच बसली होती, कडेला.
क्लासचं विचारल्यावर म्हणाली, "काय पप्पा म्हणतील तसं..."
आठवड्यातच तिची लग्नपत्रिका सगळ्यांना पोस्टाने आली. लातूरचा तेलाचा व्यापारी होता. क्लासहून परस्पर सगळे रिसेप्शनला गेले. फोटोत पाठीवर सॅक घेतलेले, हसरे नऊ जण आणि टिकल्याटिकल्यांच्या साडीतली न हसणारी दहावी नमिता…
.
(पण नमिताची कथा इथेच संपत नाही...)
प्रतिक्रिया
2 Jan 2014 - 8:37 pm | अत्रुप्त आत्मा
बय्रापैकी जमलय!
2 Jan 2014 - 9:07 pm | आतिवास
अशा अनेक 'नमिता' आठवल्या :-(
2 Jan 2014 - 9:12 pm | यशोधरा
ह्म्म्म..
2 Jan 2014 - 10:25 pm | चित्रगुप्त
नमिता म्हणजे आम्हाला ही नमिता वाटली:
.jpg)
2 Jan 2014 - 10:28 pm | आदूबाळ
असल्या नमिता सीए व्हायला कसल्या येतायत डोंबल...
2 Jan 2014 - 10:37 pm | कानडाऊ योगेशु
हे चित्र पाहून मि.पा च्या संस्थापकांची आठवण आली आणि ड्वाले पाणावले.
(ही नमिता हिच्यावर आमचा भारी जीव असे काहीसे ऐकु आले.)
2 Jan 2014 - 10:37 pm | सस्नेह
गोष्ट छान आहे. पण कोणत्या काळातली आहे ?
अलिकडच्या पोट्ट्या पंचविशी झाल्याशिवाय लग्नाचंच काय, लिविनचंसुद्धा नाव काढत नाहीत !
2 Jan 2014 - 10:50 pm | मी-सौरभ
बाकी कथांपेक्षा थोडी कमी परिणाम्कारक वाटली :)
2 Jan 2014 - 10:56 pm | पियू परी
पण नमिताची कथा इथेच संपत नाही...
>> क्रमशः आहे का?
3 Jan 2014 - 12:01 am | अमित खोजे
छान जमली आहे. आवडली. कमी परिणामकारक यासाठी वाटली असावी कारण शेवटचा twist बाकीच्या गोष्टींसारखा नाही कारण हि खरी कथा असावी
3 Jan 2014 - 12:44 am | शुचि
खूप आवडली कारण अशी एक अर्चना पाहीलेली आहे. अगदी अस्साच किस्सा.
3 Jan 2014 - 3:46 pm | मदनबाण
नमिता {नमिथा} वर हा धागा असणार नाही हे कंसातले शतशब्द कथा वाचुन कळले,बाकी खालच्या पेठकर काकांच्या प्रतिसादाशी सहमत !
@शुचि
ढालगज चा बदल केला आहे ते कळले,पण लिखाण बंद का ?
3 Jan 2014 - 9:48 pm | शुचि
आता सुरु करीन. पुढचा लेख नक्की टाकेन. :) आपुलकीने विचारल्याबद्दल धन्यवाद.
3 Jan 2014 - 6:39 am | जेपी
आवडली .
दहावी तली नमिता पण बघतली आहे पण सिंधी होती . :-)
3 Jan 2014 - 7:26 am | कैलासवासी सोन्याबापु
छान कथा आहे!!! जमलंय!!
3 Jan 2014 - 10:28 am | तिमा
लेखकाचे नांव बघताच अपेक्षा वाढल्या. आणि पूर्णही झाल्या. जरा सिरीयस होत होतो तेवढ्यात चित्रगुप्तांची नमिता दिसली!
3 Jan 2014 - 10:32 am | सुहास..
थोडक्यात !
3 Jan 2014 - 11:03 am | पैसा
अशा अनेक सत्यकथा पाहिल्या आहेत आजूबाजूला. :(
3 Jan 2014 - 12:05 pm | वेल्लाभट
जमलंय........ शेवट पंच जमलाय ....
गुड...
3 Jan 2014 - 12:39 pm | आंबट चिंच
शतशब्द कथा म्हणजे काय पण? शतशब्दचा अर्थ काय? मध्ये कोणी तरी भली मोठी कथा एकाच दमात संपवली होती. तर ही चार ओळी आहे म्हणुन म्हटले?
3 Jan 2014 - 1:07 pm | आदूबाळ
http://www.misalpav.com/node/24179
मराठीत/मिपावर हा प्रकार आणणार्या आतिवासताई आणि त्याला "शतशब्दकथा" हे समर्पक नाव सुचवणारे (बहुदा) चिगो.
3 Jan 2014 - 1:37 pm | कवितानागेश
छान जमलीये.
3 Jan 2014 - 1:55 pm | बॅटमॅन
मस्त जमलीये. अशा सत्यकथा पाहिल्यात.
3 Jan 2014 - 2:23 pm | प्रभाकर पेठकर
>>>> टिकल्याटिकल्यांच्या साडीतली न हसणारी दहावी नमिता…
वाक्य मनाला चटका लावणारं आहे. पण आजच्या काळात तेलाचा व्यापारी नवराही तिला पुढे शिकविण्याच्या मार्गात अडथळा बनणार नाही असा विश्वास वाटतो. दुसरे, तेलाचा व्यापारी आहे म्हणजे व्यवसायात त्याला अकाउंट्स सांभाळणे, व्हॅट, सर्विस टॅक्स, इन्कमटॅक्स आदी अनेक बाबींसाठी घरचीच साहाय्यक मिळू शकेल. लग्न झाले म्हणजे करिअर संपले किंवा डबल ग्रॅजुएशन केले आणि स्वतंत्र नोकरी केली म्हणजेच करिअर घडविले हा विचार अत्यंत चुकीचा आहे. मारवाड्यांच्या बायकांना अत्यंत कुशलतेने घर सांभाळून दुकान सांभाळताना पाहिले आहे. त्या बिचार्या शिकलेल्याही नसतात जास्त. त्याच बरोबर मराठी आणि गुजराथी कुटंबात डॉक्टर झालेल्या बायकांना घर आणि मुलंबाळं साभाळतानाही पाहिलेलं आहे.
कथेला, 'शत' ह्या कुंपणात ठेवण्याच्या नादात (कथा इथेच संपत नाही {मग का संपविली?}), तोकड्या विचारांनी, चुकीचे चित्र समोर उभे केले आहे.
कथा नायिका कुठल्या शहरातील आहे हे सांगितलेले नाही पण नवरा 'लातूरचा' (म्हणजे दुय्यम शहरातला. मुंबई-नाशिक-पुण्याचा नाही) 'तेलाचा व्यापारी' दाखवून अकारण असमतोल वाढविण्याचा केलेला चुकार प्रयत्न प्रकर्षाने जाणवला.
शतकथेचा मोह सोडून, कथेतील सर्व पात्रांना आणि घटनांना योग्य तो न्याय देऊन, समतोल राखून नविन पूर्ण कथा लिहावी, अशी विनंती करतो.
3 Jan 2014 - 3:40 pm | आदूबाळ
शतशब्दकथा हा "फॉर्म" एकदा हाताळून बघायचा होता. नेहेमीचा पाल्हाळिकपणा आवरून १०० शब्दात आशय बसवता येतो का हे पहायचं होतं.
लातूर हे शहर "दुय्यम" नाही, "तेलाचा व्यापारी" असण्यात असमतोल नाही ही पश्चातबुद्धी / वयाने, अनुभवाने आलेलं शहाणपण आहे. नमिताची तेव्हाची मनोभूमिका काय असेल? आपले चार मित्र लौकिकार्थाने करियर करू बघतात, आपण त्यांच्याइतकेच - किंबहुना जास्त - लायक आहोत, तरी "पप्पा म्हणतात म्हणून" आपल्याला लग्न करावं लागतंय, हे तिच्यासाठी क्लेशकारक असणार ना? ही कथा हे एक "पॉईंट स्टेटमेंट" आहे. नमिताच्या आयुष्यातल्या एका क्षणाचा फोटो आहे. नमिता पुढील आयुष्यात काय करते (किंवा करत नाही) हे कथेच्या मर्यादेपुरतं गैरलागू आहे.
"पोलिटिकली करेक्ट" कथा लिहायचा विचार नव्हता. किंबहुना "पोलिटिकली करेक्ट" ललितलेखन कसं करता येईल हाच प्रश्न विचारावासा वाटतो.
तुमचा आणि तुमच्या सूचनेचा पूर्ण आदर राखून असं सांगावंसं वाटतं की हे लेखन हा "मारवाडी समाजातील शिक्षित स्त्रियांचा समाजशास्त्रीय आढावा" नसून "ललितलेखन" आहे.
3 Jan 2014 - 6:04 pm | प्रभाकर पेठकर
>>>>"पोलिटिकली करेक्ट" कथा लिहायचा विचार नव्हता. किंबहुना "पोलिटिकली करेक्ट" ललितलेखन कसं करता येईल हाच प्रश्न विचारावासा वाटतो.
'पोलीटेकली करेक्ट' कथा म्हणजे काय? माझ्या प्रतिसादात तसा उल्लेख कुठे आला आहे?
>>>>हे लेखन हा "मारवाडी समाजातील शिक्षित स्त्रियांचा समाजशास्त्रीय आढावा" नसून "ललितलेखन" आहे.
तुमचा लेख, "मारवाडी समाजातील शिक्षित स्त्रियांचा समाजशास्त्रीय आढावा" ह्या विषयाला वाहिलेला आहे असे मी कुठे म्हंटले आहे? ललितलेखन म्हणून नक्कीच स्विकारार्ह आहे. पण त्याला 'शतशब्दांत' कोंडताना कथेचे लालित्य घुसमटून तर्कसंगतता हरवून बसलं आहे. असो.
कथा आवडली होती पण जरा 'मोकळेपणा' यावा म्हणून कांही शेरे मारले आहेत. पटत नसल्यास आग्रह नाही. आहे तशीही सुंदरच आहे.
4 Jan 2014 - 2:33 am | अर्धवटराव
नमिताची केवळ शिक्षणाची हौस रुद्ध झाली नाहि तर तिची शैक्षणीक जीवनाची संधी कायमची हुकली. मित्र-मैत्रीणी, स्पर्धा, बॅचलर लाइफमधील कॉलेजच्या मौजमजा, आपले कौशल्य पणाला लावायला आवश्यक ति उसंत, केवळ स्वतःपुरती असलेली अकौण्टीबिलीटी, या सगळ्या अनुभवातुन तावुन-सुखावुन निघाल्यावर येणारा आत्मविश्वास व स्वतःची ओळख, पुढे शक्य असल्यास त्याला अनुकुल असा लाईफ पार्ट्नर शोधायची संधी... सगळं एका झटक्यात खल्लास.
3 Jan 2014 - 7:24 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत
3 Jan 2014 - 3:33 pm | प्रिती
श्री प्रभाकर पेठकर यांचे विचार खुप आवडले. करिअर आणि शिक्षण यातिल मेळ साथता यायला हवा
3 Jan 2014 - 6:16 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
मुळात माझा स्वतःचा जिवनप्रवास 'वाट फुटेल' तिथे असा होत गेला आहे.
अकरावी नंतर सायन्स शाखेला प्रवेश (स्वतःच्या आवडीनेच) पुढे अपयश आल्यावर नोकरी. नोकरीतील गरजेनुसार कॉमर्स शाखेची पदवी. पण कारकुनी करण्याचा कंटाळा आणि संगणकाची आवड ह्यामुळे कोबोल प्रोग्रॅमिंग शिकून घेतलं पण तेवढ्यात आखाती प्रदेशातील नोकरीच्या संधीमुळे पुन्हा कारकुनी क्षेत्रात. नंतर संधी मिळताच परदेशातच दुकानदारी. कुवेत युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक अस्थिरते मुळे दुकान बंद करुन उपहारगृह व्यवसायात आलो आणि गेली २२ वर्षे जम बसविला आहे. असो.
आईची शिकवण होती. आयुष्याचा प्रवास नदी प्रमाणे असावा. ध्येय ठरवून वाटेत येणार्या अडथळ्यांना 'वळसे' देत उद्देशाकडे जात राहावं. तेच आजपर्यंत करत आलो आहे. प्रगतीचा एक रस्ता बंद झाला तर दुसरा शोधायचा. रडत बसायचं नाही, थांबायचं नाही.
3 Jan 2014 - 7:30 pm | अनिरुद्ध प
आपले अनुभव आवडले,मी शक्यतो आपले प्रतिसाद जरुर वाचतो,ते मलातरी खूपच दिशादर्शक वाटतात.
3 Jan 2014 - 9:49 pm | शुचि
खूप सुंदर प्रतिसाद.
3 Jan 2014 - 10:25 pm | इन्दुसुता
पेठकरांशी कथेबाबत असहमत ( जीवनाविषयी सहमत).
ही कथा हे एक "पॉईंट स्टेटमेंट" आहे. नमिताच्या आयुष्यातल्या एका क्षणाचा फोटो आहे. नमिता पुढील आयुष्यात काय करते (किंवा करत नाही) हे कथेच्या मर्यादेपुरतं गैरलागू आहे.
हे अगदी व्यवस्थित ( शब्दांचा पसारा न वापरता) प्रतीत होते आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
4 Jan 2014 - 2:30 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद, इन्दुसुता.
>>>> फोटोत पाठीवर सॅक घेतलेले, हसरे नऊ जण आणि टिकल्याटिकल्यांच्या साडीतली न हसणारी दहावी नमिता…
कथा चांगली आहे हे माझ्या वरील प्रतिसादात आले आहेच. फक्त वरील वाक्यातील नकारात्मक संदेश मला खटकला. 'लातूरच्या एका तेलाच्या व्यापाराशी एवढ्या हुषार मुलीचे लग्न झाले आणि तिचे आयुष्य बरबाद झाले' अशा चुकीच्या संदेशाला अधोरेखित केले आहे ते पटत नाही.
>>>>ही कथा हे एक "पॉईंट स्टेटमेंट" आहे. नमिताच्या आयुष्यातल्या एका क्षणाचा फोटो आहे.
हा, 'क्षणा'चा फोटो बराच बोलका आहे. असो.
4 Jan 2014 - 3:40 am | खटपट्या
१००% सहमत
मोठ्या पदव्या घेवून गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवणे म्हणजे करिअर. असे समीकरण झाले आहे. एखादा व्यवसाय सुरु करून नावारूपास आणण्यामध्ये खरा कस लागतो.
एखादे किरणा मालाचे दुकान किवा उपहार गुह यशस्वी रित्या चालवणे म्हणजे करिअर नव्हे काय?
4 Jan 2014 - 2:48 pm | इन्दुसुता
धन्यवाद पेठकर.
"मोठ्या पदव्या घेवून गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवणे म्हणजे करिअर.
एखादे किरणा मालाचे दुकान किवा उपहार गुह यशस्वी रित्या चालवणे म्हणजे करिअर नव्हे काय? "
इथे मुद्दा तो नाहीच.
"'लातूरच्या एका तेलाच्या व्यापाराशी एवढ्या हुषार मुलीचे लग्न झाले आणि तिचे आयुष्य बरबाद झाले' " असा संदेश अधोरेखित होतो असे मला वाटले नाही... तसे वाटले असते तर ते चुकीचे आहे असेच म्हटले असते.
म्हणजे, मुलगा लातूरचा तेल व्यापारी नसून मुंबईचा तेल व्यापारी असता / कुठल्या इतर मोठ्या शहरातील इतर व्यापारी असता तरी नमिताला तिच्या आयुष्याविषयी त्याक्षणी काय वाटले असते याबद्दल "ही कथा हे एक "पॉईंट स्टेटमेंट" आहे" असे मला तरी जाणवले.
4 Jan 2014 - 4:20 pm | आयुर्हित
खूप छान जमली हि कथा. अशीच एक नमिता पाहिली आहे जवळून.त्यामुळे कितना दर्द होता हे ये पता है! डोळ्यात टचकन पाणी आणले हो कथेने!
ह्यात लग्न कोणाशी होत आहे आहे हे महत्वाचे नाही, तर त्या वयात college मध्ये जाऊन खूप काही शिकायची,मित्रमैत्रिणीसोबत धम्माल करायची व आपल्या भविष्याबद्दल स्वप्न पाहण्याची एक वेगळीच मजा असते. आणि एका झटक्यात परिस्थिती हे सारे बदलून टाकते.
हि सारी इच्छा नकळत मारून टाकावी लागणे, ह्या सारखे दु:ख कोणतेच नाही.
एक गाणे आठवले :
सो गया, ये जहां, सो गया आसमान सो गयी हैं सारी मंझिले, सो गया हैं रास्ता....
गीतकार: जावेद अख्तर, गायक:अलका-नितीन-शब्बीर, संगीतकार:लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट:तेजाब - 1988
http://www.youtube.com/watch?v=L4FmY6tuCcs&feature=share
4 Jan 2014 - 4:39 pm | प्यारे१
समाजात बर्याच ठिकाणी दिसणारी गोष्ट आहे. पेठकर काकांचा दृष्टीकोन थोडा वेगळा आहे.
आठवलं म्हणून सांगतो. जैन समाजातल्या ओळखीतल्या एकीनं असा छान नोकरी करणारा, व्यवसाय नको असलेला, उच्चशिक्षित मुलगा मिळावा म्हणून लग्न बरंच लांबवलं.
१९९९-२००० साली किराणा दुकानदाराचं स्थळ नाकारलेलं तेच २०११ ला परत आलं. १२ वर्षांनी तेच स्थळ. लग्न झालंय.
8 Jan 2014 - 7:05 pm | चित्रगुप्त
रमाबाई रानडे आठवल्या.
8 Jan 2014 - 7:50 pm | सिद्धेश महजन
तुम्हा सगळ्यांच्या १ गोष्ट लक्षात येत नाही आहे का? लातूरचा मुलगा, नवर्याला धंद्यात मदत, गलेलट्ठ पगार म्हणजेच यश का?या शक्यते बरोबरच
हि शक्यताही असूच शकते कि १२वि नंतर लग्न म्हणजे १७/१८व्या वर्षीच लग्न. फारच छोट वय आहे हे. खूप लवकर आहे. प्रत्येक जन MATURED असतोच अस नाही. नक्कीच घरच्यांनी हिला न विचारता लग्न ठरवलं आहे.
हि tragedy असू शकते.