खूप दिवसांनी एक शाळेतला मित्र भेटला.नंतर काही दिवसांनी जवळ-जवळ रोजच गाठ-भेट पडत गेली.एक दिवस म्हणाला, "सध्या भाड्याच्या घरात रहात आहे.स्वतःचे घर घ्यावे अशा विचारात आहे.एक जरा ४-५ लाख कमी पडत आहेत.मदत मिळाली तर बरे पडेल." मी म्हणालो, बघतो, काही सोय होत असेल तर. आता माझे सगळे आर्थिक व्यवहार बायकोच्याच ताब्यात.(हे असे करायचे एक कारण आहे. ते कारण नंतर पुन्हा कधीतरी. एक लेख लिहावा लागेल.)
पैसे माझे पण जमा मात्र बायकोच्या खात्यात.(माझ्याच बायकोच्या बरे!! उगाच नसत्या शंका, कुशंका काढत बसू नका.)मग हळूच तिचे पास-बूक बघितले.त्यात ७ लाख होते. चला म्हणजे, आपल्या मित्राचे घर होणार तर.आता ५ च्या जागी ६ दिले तरी हरकत नाही.आता अडचण फक्त एकच होती आणि ती म्हणजे बायकोची परवानगी.
तुम्हाला कल्पना असेलच, की ह्या सगळ्या बायकांचे सहावे इंद्रीय फार तीक्ष्ण असते. "त म्हणजे "ताकभात" की, तलवार" हे त्या फार लगेच ओळखतात.जरा वेळ काळ बघूनच विषय काढायला हवा.
दुसर्या दिवशी हळूच (मी हिच्याशी हळू आवाजातच बोलतो.तिने तशी सक्त ताकीदच देवून ठेवली आहे.मोलकरीण सोडली, तर इतर कुणीही तिच्याशी नोठ्या आवाजात बोलू शकत नाही.)
बायकोला म्हणालो, "अगं आपले ते धाकटे चिरंजीव यंदा १०वी ला आहेत ना?"
हा सवाल कानी पडला आणि बायको भांबावली.एक तर आपल्याला नक्की मुले किती? हे तर आपल्या नवर्याच्या
लक्षात आहेच शिवाय मुले काय शिकतात? आणि ती कितवीत आहेत? हे लक्षात रहायला लागले तर. (कारण दर वेळी मी परदेशातून घरी आलो, की माझा पहिला सवाल हाच , की हा आता कितवीत आहे? आणि तो कितवीत आहे?
ती म्हणाली, "हो." आणि लगेच पुढचा सवाल आलाच, "का हो?"
{नवर्याने एखादा सवाल केला की बायको लगेच जवाब (की जबाब) देवुन ,सवाल करते.लावणीत काहीतरी असते ना? "सवाल-जवाब" अगदी तस्सेच.आमच्या घरी हे असे रोज चालत असते बघा. मी उशीरा आलो की काही तरी बतावणी करतो आणि मग ही माझी (मित्र)गण-गौळण काढते.(तरी बरं, सध्या तरी हिला माझी एकच गौळण माहित आहे.) मग काय तिचे सवाल आणि माझे जवाब असा रोज तमाशा चाललेला असतो.}
मी." काही नाही गं, आता हे दहावीचे वर्ष ना? म्हणून विचारले." आणि मग मी सवाल केला, (हिने मला ह्या सवाल-जवाबाची फार चांगली दीक्षा दिली आहे, हे आता तुमच्या चाणाक्ष बुध्धीला पटले असेलच,)
"त्याला आपण ना कुठल्या तरी मोठ्या क्लासला घालू या. काय ते अर्धा-एक लाख लागले तरी हरकत नाही. कुठल्या क्लासला घालु या? त्या "अ ब क" मध्य्रे की " क्ष ज्ञ" मध्ये? तु फक्त सांग.आपण उद्याच प्रवेश घेवून टाकू."
इथे माझ्या बायकोला फीट यायचीच बाकी होती.आपल्या नवर्याला , फक्त क्लासची नावेच नाही , तर त्यांच्या फिया किती? हे पण माहित आहे.हे जाणवून तिच्या डोळ्यात "देव प्रसन्न झाल्याचे" भाव दिसले.
ती: अहो ह्या वेळी तो, "स प क" , क्लास लावला आहे. मागच्या वेळी, की नई, त्यांची २ मुले १०३ टक्के , मिळवून पास झाली. आणि त्याचे पैसे देवून झाले आहेत, तुम्ही ना फार चिंता करू नका. मी करते सगळे व्यवस्थित. बरे आज तुम्हाला जेवायला काय हवे?"
चला म्हणजे निदान १ लाख तरी आपण नक्की देवू शकतो, हे जाणवून मी खूष झालो आणि तिच्या साठी मसाला पान आणायला बाहेर पडलो. मित्राला १ लाख देवू शकेन म्हणून फोन केला.त्या दिवशी बायकोने भजी तळली.
एक-दोन दिवस वाट बघून अजून एक विषय काढला.
मी: अगं ह्या वर्षी आपण तुझ्या आई-वडीलांना आणि माझ्या आई-वडीलांना चार-धाम यात्रेला पाठवु या का? काय १ लाख खर्च आला तरी चालेल.
ती: माझे आई-बाबा अमेरिकेला जाणार आहेत. माझ्या चुलत बहिणीकडे बारसे आहे.तिच सगळा खर्च करणार आहे.शिवाय त्यांना सगळी अमेरिका पण दाखवणार आहे.(ह्या फक्त ४ वाक्यांतच तिने माझी कशी तिरडी बांधली ते कळले असेलच. माझे आई-बाबा बघा अमेरिकेला निघाले, ते पण फुकटात, अशी माणसे जोडायची असतात, त्यासाठी मन-मिळावू पणा लागतो.तो तुमच्या आई-बाबांकडे नाही, म्हणून तुम्हाला कुण्णी-कुण्णी विचारत नाही,माझ्या चुलत बहिणीचे यजमान बघा, किती हुषार आहेत, अणि शिवाय त्यांना माणसांची किंमत पण आहे.ते नुसता पैसा-पैसा बघत नाहीत , तर वेळ प्रसंगी आपल्या बायकोच्या नातेवाईकांसाठी पण खर्च करतात.माझ्या काकांशी तुम्ही कसे वागलात, ते मी अद्याप विसरलेले नाही.इ.इ.)
आणि तुमच्या आई-बाबांना तर अजिबात नको. आईचे पाय दुखतात आणि बांबांना ऐकायला येत नाही. साधं डोंबिवली ते ठाकुर्ली , जायचे म्हटले तरी त्यांना ते झेपत नाही. मागच्या वर्षी मीच नाही का त्यांना स्पेशल रिक्षा करून "कल्याणला" नेले होते. (ह्या ६/७ वाक्यांत तिने काय-काय सांगीतले, ते बघितले. तिचं माझ्या आईवडीलांकडे किती लक्ष आहे.तिला त्यांची किती काळजी आहे.तिने कसा स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून कल्याणचे दर्शन घडवून आणले.इ.इ.)
मी: बरे बाबा. जशी तुझी मर्जी.
असे म्हणालो आणि काजु-कत्री आणयला बाहेर पडलो.मित्राला फोन करून सांगेतले की अजून १ लाख देवू शकेन. त्या दिवशी तिने घरच्या शेवयाची खीर केली होती.
एक-दोन दिवसांनी परत एक विषय काढला.
मी: अगं , हा मोठा आता १८ वर्षांचा झाला.
ती: हो खरे आहे. मग काय करू या?
मी: त्याला मोटर सायकल घेवून देवू या. १ लाखात चांगली बाईक येते म्हणतात.त्या मिसळपाव वरती छान माहिती दिली आहे. त्यांना सांगीतले तर ते मदत करायला पण तयार आहेत. आपल्याच डोबिवलीतील आहेत.
ती: काही नको. आपल्या त्या सेकंडहँड कारचे अनुभव कसे आले ते माहित आहे ना? शिवाय पेट्रोलचे दर किती वाढले आहेत.शिवाय परत पार्किगचा प्रश्न आहेच.(तुम्हाला धड सेकंडहँड कार परवडत नाही. वाढत्या महागाईचा सामना करता येत नाही. नविन जागा घ्यायची ऐपत नाही. उगाच फुकाच्या गमजा मारू नका.)
मी : ठीक आहे.
बाहेर पडलो आइस्क्रीम घेतले आणि मित्राला फोन केला. आता ३ लाख नक्की देवू शकेन.
त्या दिवशी हिने पापड तळले आणि मला आवडतात म्हणून कुर्डया पण.
एक दोन दिवस गेले आणि परत एक विषय काढला.
मी: अगं पुढल्या महिन्यात आपल्या लग्नाला १९ वर्ष पुर्ण होतील.
ती: हो ना.तुमच्या सहवासांत वर्षे कशी सरली ते कळालेच नाही.मग तुमचे काही प्लॅनिंग आहे का?
मी: हो तर, आपण युरोप टुरला जावू या का? काय २ ते ३ लाख खर्च झाले तरी चालतील.
ती: काही नको. तुमच्या बरोबर कुठेही फिरायला नको. (ह्या एका वाक्यात एक लेख दडला आहे.)
मी: बरे. राणी सरकार, जशी तुमची मर्जी.
असे म्हणून बाहेर पडलो.मित्राला फोन केला. त्याला सोय झाली म्हणून सांगीतले.येतांना बायकोसाठी गजरा घेतला.
तिने पण सातारी पध्ध्तीने कोंबडीचा रस्सा आणि तांदूळाच्या भाकर्या बनवल्या.कुठून-कुठून हे असे पदार्थ शिकते कुणास ठावूक. बहूदा "मिसळ-पाव" ह्याच साईट वर असेल. एकदा बघितलेच पाहिजे.
एक-दोन दिवसांनी मित्राचा फोन आला.शनिवरी रात्री फ्री आहेस का? मी काय लगेच तयार झालो.रीतसर बायकोकडून परवानगी घेतली आणि रात्री त्याच्या बरोबर पार्टीला गेलो.तो परस्पर कंपनीतूनच येणार होता.स्टेशनवर भेट झाली.त्याचा चेहरा रडवेला झाला होता.कारण नेमके त्याचे पाकीट मारल्या गेले होते.म्हणाला आता पार्टी रद्द करू या. मी नको म्हणालो.पार्टी केली.मीच पैसे दिले.बोलता-बोलता तो म्हणाला.उद्याच पैसे द्यायचे आहेत.त्यांना चेक चालेल.तू मला चेक दे.आपण दोघेही उद्या जावु आणि चेक देवून टाकु.पार्टी चांगलीच रंगात आली होती.खुषीत येवून मीच म्हणालो, तुला उद्या कशाला? आत्ताच चेक देतो. माझी बायको माझे सगळे ऐकते.
तसेच घरी गेलो.त्याची आणि बायकोची ओळख करून दिली.त्याने पण त्याची सगळी कहाणी सांगीतली.मी हळूच तिला
पैसे मागीतले तर नाही म्हणाली. मित्र बिचारा एव्हढेसे तोंड करून निघून गेला.
दुसर्या दिवशी....
मी: अगं आपल्या कडे पैसे असून देखील तु नाही का म्हणालीस?
ती: कुठे आहेत पैसे?
(बघा , आता तिची फक्त उत्तरे.सवाल नाहीतच.)
मी: ते ७ लाख.
ती: अहो. ते घर-खर्चा साठी ठेवले आहेत.
मी: आता कुठले खर्च? क्लासची फी तर भरून झाली.
ती: हो.पण इतरही काही गोष्टी आहेतच.
मी: हे बघ!! अशी एका वाक्यांत उत्तरे देवू नकोस.काय ते स्पष्ट पणे सांग.
ती: १०वी नंतर पुढे काय? त्याची काही सोय केली आहे का?डोनेशन साठी कुठून पैसे आणणार? ते पैसे त्यासाठी आहेत.
मी: हो. त्याला काय १ लाख लागतील. आणि मित्राची गरज तर फक्त ५ लाखाचीच आहे.मग आपण दिले तर
काय बिघडले?
(मी मनांत, काल परवा पर्यंत खर्च नाहीत , असे म्हणणारी बायको , अचानक कशी काय फिरली?)
मी: आता तुझे आई-बाबा आणि माझे आई-बाबा कुठे जाणार नाही आहेत.
ती: ते पैसे मी त्यांच्या आजारपणासाठी ठेवले आहेत.
मी: बघ आता आपण काही मोठ्या मुलासाठी बाईक नाही घेणार आहोत. मग ते पैसे देवू शकतो.
ती: माझे आणि त्याचे बोलणे झाले आहे.तो सुट्टीत काही क्लासेस लावणार आहे. एकूण ४ क्लासेस आहेत.ते पैसे आम्ही त्या साठी वापरणार आहोत.
मी: आपली युरोप टूर तर रद्द केली आहे. मग?
ती: ते पण पैसे मी खर्च केले.त्याचे दागिने वगैरे काही केले नाहीत.ते पैसे मी परवाच तुमच्या आणि माझ्या पी.पी.एफ. खात्यात जमा केले आहेत. इथे माझ्या कडे तोंडाचा चंबू करून बघू नका. मी काही फक्त पा.क्रु. वाचत नाही. इतर पण लेख वाचते.आता ह्या पुढे एकच काम करायचे. तुम्ही पैसे कमवा. ते कसे राखायचे आणि कुणाला किती आणि कसे द्यायचे, ते माझे मी बघीन.नसत्या भानगडीत पडू नका.जे काही ताटात पडेल ते खा अणि गप-गुमान झोपा.तुम्हाला आयुष्यभर उपाशी न ठेवण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या मागे नसते व्याप न लावण्याची जबाबदारी तुमची.
आयला!!! काय बायको आहे की कोण? आधी म्हणते आहेत पैसे आणि कुणाला द्यायचा विषय काढला की, लगेच नाही आहेत पैसे.
पण खरं सांगू का? त्या दिवसापासुन मी तणावमुक्त झालो बघा.च्यामारी... खिशात पैसे नसतांना पण दोन वेळा चमचमीत आणि भरपेट जेवणाची मझा काही औरच...
तुमची पण बायको अशीच वागते का हो? असे असेल तर....
हे जग फार सुंदर आहे.फार सुंदर आहे.फार सुंदर आहे.
प्रतिक्रिया
19 Apr 2013 - 4:04 am | रेवती
लेखन आवडले. मजेदार आहे.
19 Apr 2013 - 10:17 pm | सस्नेह
अगदी मजेदार.
अवांतर : मुविसाहेब, बायको चाणाक्ष मिळाली हो तुम्हाला ! नायतर तुमचा बँक बॅलन्स ७०० च्या आसपास दिसला असता...
19 Apr 2013 - 10:28 pm | श्रीरंग_जोशी
अन पर्सनल लोन / कार लोन चा मासिक हप्ता - रु.७,०००/- वगैरे ;-).
20 Apr 2013 - 11:47 pm | मुक्त विहारि
अशी चाणाक्ष बायको शोधल्यामुळे मी हुषार की... माझ्या सारखा "सहज फसणारा" नवरा मिळाल्याने, ती हुषार...
(आमचा प्रेमविवाह असल्याने ती काय किंवा मी काय इतर कूणालाही दोष देवू शकत नाही.)
19 Apr 2013 - 4:11 am | लाल टोपी
जग नक्कीच फार सुंदर आहे!!
छान लेख आवडला
19 Apr 2013 - 4:36 am | स्पंदना
किती ते गनिमीकावे ऑ?
इकडुन छुपा हल्ला, तिकडुन छुपा हल्ला? उपयोग काय?
अर्ध्या पॅरात वाट लागली नवरे बुवा!
टु गुड. अगदी खुसखुशीत झालय लेखन.
19 Apr 2013 - 5:29 am | श्रीरंग_जोशी
हेच म्हणतो (नेमके काय लिहावे, कळेचना ;-)).
मजा आली वाचताना पण मित्राला मदत केली नाहीच तुम्ही. मला गरज वाटल्यास तुम्हालाच विचारणार होतो आता दुसरा मित्र शोधायला / बनवायला हवा ;-).
19 Apr 2013 - 5:37 am | स्पंदना
तो मित्र होता का?
पार्टीला येताना नेमकं पाकिट हरवलं त्याचे? अगदी याच्याकडुन पैसे मिळणार अस वाटत असतानाही?
20 Apr 2013 - 1:53 am | जेनी...
+१ अप्पू .. मीही अगदी हाच विचार केला ..
19 Apr 2013 - 5:43 am | खटपट्या
हे जरा जास्तच विसराळूपणाचे लक्षण झाले :)
19 Apr 2013 - 7:02 am | शुचि
लेख अतिशय खुसखुशीत झालेला आहे. मजा आली वाचताना. अशी दक्ष बायको मिळण्यासाठी कोणता देव सॉरी देवी पूजली होतीत ;)
19 Apr 2013 - 8:34 am | किसन शिंदे
ह्याह्याह्या..
मस्त खुसखूशीत लिखान झालंय.
19 Apr 2013 - 8:43 am | योगी९००
एकदम मजेशीर...!!
आता माझे सगळे आर्थिक व्यवहार बायकोच्याच ताब्यात
नाव मुक्त विहारि शोभत नाही हो तुम्हाला...!!!
21 Apr 2013 - 12:07 am | मुक्त विहारि
गुंतवणूक कशी करावी ह्या विषयाच्या एका व्याख्यानाला गेलो होतो,त्यात त्या वक्त्याने सांगितले की....
" पैसे कमवायला अक्कल लागत नाही पण पैसे टिकवायला मात्र अक्कल लागते."
आता इथे माझा खूप गोंधळ झाला होता.
१. मुळात अक्कल म्हणजे काय?
२. ती कुठे मिळते?
३. तिचा (अक्कलेचा) भाव काय?
४.ती कुठे ठेवायची?
५. ती कशी , कुठे आणि किती वापरायची?
६. ती कशी साठवायची?
७. ती संपली तर दुसरी मिळते का?
शेवटी मी असे ठरवले की, हे काम बायकोलाच देवू या, तिने पण हे काम आनंदाने स्वीकारले.त्यामुळे मला फावला वेळ मिळायला लागला. तो मी कधी "फेसबुक" तर कधी "ऑर्कूट" अशा साईट वर वापरायला लागलो. म्हणुनच माझे टोपण नांव "मुक्त विहारी"..आपल्याला कसलेच पाश नाहीत...
टीप : एकदा सर्व आर्थिक व्यवहार बायकोच्या ताब्यात द्या.... मस्त फावला वेळ मिळेल...
19 Apr 2013 - 8:48 am | यशोधरा
बायको अशी वागते म्हणून तर वक्के चाललंय ना तुमचं विकाका! :D
शेवटचा कबुलीजबाब आवडला :D
19 Apr 2013 - 9:19 am | तुमचा अभिषेक
लिव्हलय बाकी छानच, पण पुरुषांचा विभाग नाव देऊन बायकांची स्तुती केलीत राव. :(
19 Apr 2013 - 3:47 pm | चुचु
=))
19 Apr 2013 - 9:43 am | अद्द्या
मुश्किल आहे पुढे असं दिसतंय :(
19 Apr 2013 - 10:46 am | स्पा
=)) =))
जबराट मुवी
पंचेस खचाखच भरलेले होते . धमाल आली
19 Apr 2013 - 11:01 am | अग्निकोल्हा
मिश्किल.
19 Apr 2013 - 12:40 pm | प्रसाद गोडबोले
भारी लिहिलय :)
19 Apr 2013 - 12:45 pm | बॅटमॅन
एकुणात काळ मोठा कठीण आहे तर =)) बराय टिप्स घ्यायला ;)
19 Apr 2013 - 2:59 pm | मृत्युन्जय
मस्त लेख हो मुवि. मजा आली. :)
19 Apr 2013 - 3:15 pm | Mrunalini
हा हा हा.. :D
मस्त झालाय लेख. टोमणे कळले होSSSSSS....
19 Apr 2013 - 3:24 pm | पैसा
पण प्रामाणिकपणे सांगा, लग्नाला किती वर्षं झाली तुमच्या? बायको एवढे पैसे मित्राला द्यायला परवानगी देईल असं तुम्हाला सुरुवातीला वाटलंच कसं? असो. देर आए, दुरुस्त आए!
19 Apr 2013 - 4:27 pm | राजेश घासकडवी
लेख बायकोला दाखवलेला नाही. दाखवेन असंही वाटत नाही. पण त्यावर प्रतिसाद द्यायचा तर तिची परवानगी घ्यायलाच हवी. पण धाग्याला पुरुष विभाग धागा नाव असल्याने तिच्या भुवया आणखीनच वर झाल्या असत्या. मग मी आयडिया केली. ती सौंदर्यप्रसाधन करत असतानाची नेमकी वेळ गाठली.
"अच्छा, तू हे नवीन क्रीम वापरायला लागली आहेस का गेले काही दिवस?"
"हो. का?" मी बाटली उचलली आणि वाचायचं नाटक केलं. कारण ती स्वयंपाक करत असताना गुपचूप मी ते आधीच वाचलं होतं.
"यात अल्फा हायड्रॉक्सी आहे का, वा!"
"...." बायकोचा एक कटाक्षच पुरेसा होता. ज्याच्याबरोबर आपण इतकी वर्षं नाइलाजाने राहिलो तो हाच? असे भाव दाटून आले होते.
"म्हणूनच तुझा स्किन टोन गेल्या काही महिन्यात सुधारलेला आहे."
"...." तिचा वासलेला आ तसाच
"अल्फा हायड्रॉक्सीने स्किन क्लीन्ज होते. ऍंटिरिंकलसाठी वापरतात ना..." या सौंदर्यप्रसाधनांबद्दल बोलताना मराठी बोलून पुरेसा परिणाम होत नाही. त्वचा स्वच्छ हा फारच मुळमुळीत शब्दप्रयोग वाटतो. म्हणजे हमामचा साबण वापरत असल्याचं फीलिंग येतं. क्लीन्ज, डिटॉक्सिफाय, मॉइश्चराइज, एक्सफॉलिएशन म्हटलं की काहीतरी खरंच जादूई परिणाम होतात असं वाटतं.
त्यानंतर मी आपलं विकीपांडित्य, गूगलपांडित्य दाखवून तिच्याशी सुमारे साडेतीन मिनिटं 'स्किन केअर' या विषयावर बोललो. त्या पाच मिनिटाच्या संवादात माझ्या इतक्या वर्षांच्या अस्तित्वाचं पाप धुवून निघालं. मला सुधारण्याचे वाया गेलेले कित्येक प्रयत्न फळले. आणि मग "अरे, तुझ्या स्किनची पण काळजी घेत जा रे. बघ तुझ्या डोळ्यांच्या बाजूला या वयातच रेषा दिसायला लागल्या आहेत...." यावर बोलल्यानंतर पुरुष विभागातल्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला "मी तुला कधी कशाला नाही म्हणते कारे?" असं लाडिक, किंचित गिल्टी स्वरात केव्हा म्हणाली हे तिचं तिलाच कळलं नाही.
19 Apr 2013 - 5:29 pm | श्रीरंग_जोशी
मुविंच्या लेखाने एक नवे दालन खुले झाले आहे पुरूषांना.
लगे रहो राजेशभाई :-).
19 Apr 2013 - 8:00 pm | शुचि
हाहाहा मस्त!
19 Apr 2013 - 8:57 pm | मुक्त विहारि
हा हा हा..
20 Apr 2013 - 12:14 am | श्रावण मोडक
नवरे सगळे असलेच!
19 Apr 2013 - 5:30 pm | प्यारे१
:)
19 Apr 2013 - 8:48 pm | उपास
खुमासदार..
20 Apr 2013 - 4:53 pm | निनाद मुक्काम प...
चाबूक
21 Apr 2013 - 12:26 am | कवितानागेश
असं करायचं असते होय?! :(
मला मुक्तविहारीणकाकूंची ट्युशन लावायला हवी. ;)
22 Apr 2013 - 11:01 pm | सोत्रि
लोल :))
-(एवढा नशिबवान नसलेला) सोकाजी