बटाटावडा

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
26 Dec 2011 - 7:11 pm


बटाटे वडे आपण सगळेच जण घरीदारी खात आणि करत असतोच, त्यात नवीन असे काहीच नाही. तरीही प्रत्येक ठिकाणची खास चव जिभेवर असतेच, विशेषतः गाडीवरच्या वड्याची.. आणि घरी तस्सा वडा होत नाही असे सगळेच हळहळतात आणि पावलं परत एकदा नाक्यावरच्या गाडीवर नाहीतर टपरीवर वळतात. पण काही वेळा आणि ठिकाणे अशी असतात की तेथे अशा वडापावच्या गाड्या,टपर्‍या नसतात, :( मग वड्याची तल्लफ भागवायला बटाटे उकडत ठेवावे लागतात आणि खाताना परत तेच.. तस्सा वडा नाही झाला..
म्हणून एकदा आमच्या खास आवडीच्या वड्याच्या मालकाला त्याची कृती विचारली आणि तेव्हापासून 'घरी तसा वडा नाही होत..' अशी हळहळ संपली एकदाची..
(ज्यांना नाक्यावर, कोपर्‍यावर जाऊन चटकन वडापाव खाणं सहज शक्य आहे अशांनी पुढचे नाही वाचले तरी चालेल.. :) )
साहित्य-वड्यांसाठी:
५ ते ६ मध्यम आकाराचे बटाटे,
४ ते ५ लसूणपाकळ्या,
२ पेरं आल्याचा तुकडा,
३/ ४हिरव्या मिरच्या (मिरच्यांच्या आणि तुमच्या प्रकृतीनुसार प्रमाण कमी जास्त करु शकता)
कढिपत्त्याची २-४ पाने,
फोडणीचे साहित्य
मीठ
वरच्या कव्हरसाठी:
डाळीचे पीठ (बेसन), थोडा ओवा, थोडे तिखट, हळद, चवीनुसार मीठ
तळणीसाठी: तेल
बटाटे उकडून घ्या, साले काढून कुस्करुन घ्या.
आले+ मिरची+लसूण यांचे वाटण करुन घ्या.
नेहमीसारखी फोडणी करुन त्यात कढिपत्ता घाला व आले, मिरची व लसणीचे वाटण घाला. परता.
कुस्करलेल्या बटाट्यांवर ही फोडणी ओता, चवीनुसार मीठ घाला व कालवा.त्याचे वडे करा.
डाळीच्या पिठात ओवा,मीठ, हळद, तिखट घाला व घट्ट सर भिजवा. (पीठ घट्ट भिजवले की वड्याचे कव्हर गाडीवरच्या वड्यासारखे होते.)
तेल तापत ठेवा व एक चमचाभर मोहन डाळीच्या पिठात घाला.
तेल तापले की वडे पिठात बुडवून काढा व तेलात घाला व तळा.
आता वाट कोणाची पाहता?
चटणी बरोबर हादडा.

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

26 Dec 2011 - 7:24 pm | धमाल मुलगा

बटाटावडा नै कै, बटाटवडा म्हणायचं. (भाईकाकांनीच शिकवलंय असं म्हणायला.) :P

मी चाल्लो पाव आणायला. :)

अवांतरः स्वातीताई, रेशिपी अंमळ अपुर्ण आहे. बटाटवड्यांसोबत तब्येतीत हाणायला तळलेल्या,मीठात घोळवलेल्या मिरच्या नाहीयेत दिसत. ;)

गणपा's picture

26 Dec 2011 - 7:27 pm | गणपा

आता उद्या वडे करणे आलचं.
खालचा फोटु लैच टेंप्टिंग आहे.

आचारी's picture

26 Dec 2011 - 9:42 pm | आचारी

आजच सकाळि बटाटा वडा याच पध्दतिने केले होते......................

पिंगू's picture

26 Dec 2011 - 10:44 pm | पिंगू

संध्याकाळी सहज म्हणून २ वडापावचा फन्ना उडवून आलोय..

- पिंगू

प्रभो's picture

27 Dec 2011 - 7:07 am | प्रभो

मस्तच....गेल्या मोठ्या विकांती मित्रमंडळी जमवून मस्तपैकी ४०-५० वडे बनवून हाणण्यात आले आहेत... त्यामुळे जास्त जळजळ झाली नाही.. ;)

बटाटेवड्याबरोबर बिया काढलेले टमाटो (धम्या असंच लिहितात ना रे ), पटले नाही.
एवढ्या साध्या पाकृची तुमच्या कडुन अपेक्षा नव्हती स्वातीतै. हे म्हणजे विश्वनाथन आनंदनं हत्ती अन उंट पटावर कसे चालतात हे शिकवण्यासारखं झालं.

बाकी संध्याकाळी सहकारनगरला जाणं आलं, अगदी कोप-यावर नसलं तरी वाट वाकडी करुन जावं असं नक्कीच आहे, ( हो ना रे धमु)

स्वाती दिनेश's picture

27 Dec 2011 - 12:51 pm | स्वाती दिनेश

ते बिया काढलेले टोमॅटो नाहीत, चिरलेली लाल रंगाची भोपळी मिरची आहे.
साधी पाकृ.. ह्म्म.. कधीतरी साधं सुधं खावं माणसानं.. ;)
आणि धमु, तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, तळलेल्या, मिरच्या हव्यातच पण.. इथे आमच्याकडे मिरच्या आणायच्या झाल्या तरी लै लांब जावं लागतं आणि रविवारी वडे करायची हुक्की आली तर 'भारत बंद' सारखी स्थिती असते त्यामुळे .. :(
स्वाती

५० फक्त's picture

27 Dec 2011 - 5:57 pm | ५० फक्त

'ते बिया काढलेले टोमॅटो नाहीत, चिरलेली लाल रंगाची भोपळी मिरची आहे.' - हे आमचं असं भलं मोठ्ठं अज्ञान आहे याबाबतीत; ते अधोरेखित झालं पुन्हा एकदा.

'साधी पाकृ.. ह्म्म.. कधीतरी साधं सुधं खावं माणसानं.. ' - आम्ही भले खाउ ओ, (तसं आमच्या स्वाक्षरीतच लिहिलं आहे), पण स्वाति दिनेश या आयडिच्या नावाखाली बटाटेवडे ही पाकृ खुपलीच डोळ्यात..

सुहास झेले's picture

27 Dec 2011 - 7:22 am | सुहास झेले

तोंडाला पाणी सुटले... :) :)

दिपक's picture

27 Dec 2011 - 12:44 pm | दिपक

अगदी जिव घेणारा फोटो.. :(

विकास's picture

27 Dec 2011 - 8:17 am | विकास

तोंडाला पाणी सुटले... अजून येउंदेत

तसेच खालील गाणे आठवले ;)

पक पक पक's picture

27 Dec 2011 - 8:31 am | पक पक पक

वेगळ काहितरी बनवा हो , हे तर आपल राष्ट्रीय खाद्य आहे (कणेकरी)

प्रभाकर पेठकर's picture

27 Dec 2011 - 10:49 am | प्रभाकर पेठकर

आमच्याकडे बटाटेवड्याच्या सारणात आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीलिंबाची पाने, कांदा, मोहरी, उडीदाची डाळ, कोथींबिर, हळद, मीठ, लिंबू, साखर एवढे जिन्नस असतात.
आवडत असेल तर ओल्यानारळाचे (काड्यापेटीतील काडीच्या आकाराचे) १ सेंटी मी चे तुकडे, भाजून सालं काढलेले शेंगदाणे सुद्धा काही ठिकाणी वापरतात.
आवरणाच्या पीठात खायचा सोडा, मीठ आणि किंचित हळद घालतात. ओवा घालीत नाहीत. पीठ जरा जाडसर ठेवावे. हाताने एकाच दिशेने भराभर फेसून घ्यावे म्हणजे सोडयाची प्रक्रिया होऊन पीठ हलके होते. वडे खरपुस तळणे ही कला आहे. वड्यांचा कच्चा पिवळा रंग कमी होऊन जरा लालसर झाक येऊ लागली की वडा झाला असे समजावे.

स्वाती दिनेश's picture

27 Dec 2011 - 12:46 pm | स्वाती दिनेश

खायचा सोडा वड्यांच्या कव्हरमध्ये, भज्यांच्या कव्हरमध्ये घालतात आणि ओवा फक्त भज्यांच्या पिठात घालतात.. पण मी पिठात सोडा घालत नाही. सोडा घातला की वडे तेल पितात असे वाटते आणि ओवा घातलेली चव आवडते म्हणून कव्हरचे पिठ भिजवताना थोडा ओवा घालते.
बाकी तुम्ही म्हणता तसेच, आवड आपली आपली. .
स्वाती

वाटते काय. पितातच.
असो.
दर वेळी तुझ्या पाकृवर वेगवेगळी प्रतिक्रीया काय द्यायची असा प्रश्ण असतोच.
त्यामुळे एव्हढीच प्रतिक्रीया

तुम्हि कोल्हापुरचे का? कारण त्या भागात उडदाचि डाळ घालतात वड्या मध्ये

प्रभाकर पेठकर's picture

27 Dec 2011 - 3:47 pm | प्रभाकर पेठकर

माझं आयुष्य मुंबई-पुण्यात व्यतित होत आहे (मधे मधे मी अरबस्थानातही असतो).

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2011 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

कालच कावेरीत मस्त वडे हिडकलेले आहेत.

सुहास..'s picture

27 Dec 2011 - 11:12 am | सुहास..

ये हुव्वी ना बात !!

:)

वडे इतके चविष्ठ झाले आहेत की पहिल्या फोटुतले ९ वडे मी हादडल्याने दुसर्‍या फोटुत फकस्त २ शिल्लक राहिले आहेत... ;)
( जास्त हवरटपणा बरा नव्हे म्हणुन ते २ वडे शिल्लक ठेवले आहेत. ;) )

आचारी's picture

27 Dec 2011 - 3:41 pm | आचारी

वडा पाव म्हणजे आपला विक प्याईन्ट.........

पिलीयन रायडर's picture

27 Dec 2011 - 4:38 pm | पिलीयन रायडर

फोटो खरच छान आहेत..
पण डागदरनी वडापाव खायला बंदी घातली आहे इतके मी पोटाचे हाल केलेत...

ऋषिकेश's picture

27 Dec 2011 - 5:45 pm | ऋषिकेश

कोपर्‍यावर जाऊन चटकन वडापाव खाणं सहज शक्य असुनही पाकृ वाचली :)

मी कधीतरी रुचीपालट म्हणून बटाट्यांसोबत बारीक चिरलेला कांदाही घालतो आणि मग फोडणी देतो.
शिवाय फोडणीत कडीपत्ता चुरून घालतो. म्हणजे मधेमधे तोंडात येत नाही आणि चवही मस्त लागते.
या शिवाय क्वचित चवीत वेरीएशन म्हणून कधी फोडणीत कोथिंबीर घालतो तर कधी मेथीचे दाणे घालतो. कधी बटाट्यांसोबत थोडासा (वास येण्यापुरता) पुदीना घालतो. प्रत्येकाचा स्वाद, वास वेगळा असल्याने वडे नेहमीचेच असले तरी त्या त्या काँबिनेशनची वेगळी मजा येते.

अवांतरः वडे जरा गोरे गोरे दिसताहेत ;) जरा जास्त तळायला हवे होते असे वाटले

कॉमन मॅन's picture

27 Dec 2011 - 6:11 pm | कॉमन मॅन

फारच छान पाककृती..

अवांतर - एखादा धनाढ्य बांधकाम व्यावसायिक/किंवा कॉर्पोरेट प्रायोजक शोधतो आणि अशा चवदार वड्यांचा एमएमआरडीएच्या मैदानावर एखादा स्टॉल लावीन म्हणतो. तिथे तूर्तास अण्णांचे उपोषण सुरू असले, तरी त्या उपोषणाला हजेरी लावणार्‍या जनतेची खाण्यापिण्याची चंगळ व्हावी याकरता अण्णा 'टीम'ने तिथे काही स्टॉल्सना परवानगी दिली आहे. असा स्टॉल लावून सदर पाककृतीतील अत्यंत चवदार वड्यांचा आस्वाद उपोषणाच्या उत्सवातील काही टोपीवाल्यांना व मेणबत्तीवीरांनाही चकटफू घेता यावा इतकाच आमचा उदात्त हेतू आहे!

--कॉमॅ.

प्राजु's picture

28 Dec 2011 - 1:53 am | प्राजु

खल्लास!!

बटाटा वड्या चा विजय असो.

जियो.....

बटाटा वड्या चा विजय असो.

जियो.....

Shreyas Joshi's picture

13 Jan 2012 - 8:01 pm | Shreyas Joshi

ही तर ए क द म साधी रेसिपी आहे
आम्ही हि तर घ री च करतो
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! !