आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची प्रथा आहे.
साहित्य :
पुरणः
१ ओला नारळ खरवडून
पाव किलो गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप
पारी:
गव्हाचे पिठ अर्धा किलो
१ चमचा रवा
चिमुटभर साखर
मिठ
तेल
पहिला गव्हाच्या पिठात मिठ, रवा, साखर टाकुन घ्या मग मिसळून २ चमचे तेलाचे मोहन (एका भांड्यात तेल तापवुन ते पिठावर ओता) टाका. आता थोडे थोडे पाणी टाकत पिठ घट्ट मळा. इतके घट्ट मळायचे की बोट पिठात सहज आत गेले नाही पाहीजे.
आता हे पिठ साधारण १ तास झाकुन ठेवा.
करंजीच्या आतल्या चवीसाठी (पुरणासाठी):
तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.
गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला. थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.
कढई गॅसवर ठेउन त्यात करंजी तळण्यासाठी लागणारे तेल गरम करत ठेवा. तेल चांगले कढू द्या.
पुरी करण्यासाठी लागतो तेवढा गोळा घ्या.
त्याची पोळीपाटावर पुरी एवढी चपाती लाटा.
त्या चपातीवर चमचा भरुन खोबर्याची चव मधोमध ठेवा.
आता चपातीचे एक टोक उचलून दुसर्या टोकाला मिटून पुरणाच्या कडेच्या बाजुला हाताने दाबा.
मस्त धारदार काचणीने करंजीची डिझाईन कापा.
कडेचा बाहेरचा भाग काढून एका पेपरवर झालेल्या करंज्या ठेवत चला.
पिठाचा लहानसा राई एवढा गोळा करुन तेलात टाकुन पहा तेल कढलय का ते. जर गोळा लगेच तरंगला तर तेल कढलय समजा. चिकटून राहीला तर अजुन तापू द्या.
तेल चांगले तापले की त्यात करंज्या तळण्यासाठी सोडा.
गॅस मिडीयम किंवा मंद ठेउन तिन-चार मिनीटांनी करंज्या पलटा.
करंज्यांना गोल्डन, लालसर रंग आला की झार्यात घेउन तेल निथळवा.
आता एका ताटात त्या काढून घ्या.
मोठ्या परातीत किंवा थाळ्यात वर्तमान पत्र टाकुन त्या त्याच्यावर ठेवा म्हणजे वर्तमान पत्रात अतिरिक्त तेल शोषल जाईल.
झाल्या ओल्या नारळाच्या करंज्या तयार.
ह्याच करंज्या पुरणात साखर घालून व मैद्याच्या पिठाची पारी करुनही करतात. पण मैदा, तुप, साखर हानिकारक असल्याने आम्ही वरीलप्रमाणे करतो.
प्रतिक्रिया
16 Aug 2011 - 9:25 pm | सानिकास्वप्निल
छान खुसखुशीत दिसत आहेत :)
16 Aug 2011 - 9:47 pm | प्रास
कसले भारी फोटोज् आहेत. करंज्या मस्त दिसतायत. चवीलाही छानच असतील.
आमची आई अशाच करते मात्र त्या मला खायला मिळतात ;-)
16 Aug 2011 - 11:00 pm | शुचि
सॉलीड :) ..... मला खूप आवडते करंजी.
17 Aug 2011 - 12:28 am | जाई.
काय साँलीड आहेत या करंज्या
मैदा तुप यासारखे पदार्थ न वापरुन पाकृ डायटकाँशस बनवली आहे. त्यामुळे चांगली सोय झाली.
खायला कधी येउ जागुतै?
17 Aug 2011 - 12:39 am | ५० फक्त
''काय साँलीड आहेत या करंज्या'' आयला करंज्या सॉलिड कशा असतील ओ, थोड्या पोकळ असायला हव्यात ना आतुन, जागुतै (फोटोत प्राजुतै का लिहिलंय, अर्थोत करंज्य प्राजुतैच्या कवितांइतक्यात छान झाल्यात ?) या छान छान करंज्यांचा एक तुकडा तोडलेला फोटो टाका ओ जरा.
एक शंका आहे ओ, ते तुप हानिकारक कधी पासुन झालं म्हणायचं तेला पेक्षा? वनस्पती तुप म्हणलात तर मान्य एकवेळ पण साजुक तुप नसतं ओ हानिकारक.
कु़णी करंज्यावर पिठिसाखर आणि साजुक तुप घालुन खाल्लेलं आहे काय, असल्यास कुठं ते ठिकाणं कळवा, माझ्या माहितितलं एक ठिकाण आहे त्याबद्दल सांगतो मग.
17 Aug 2011 - 8:17 am | पिंगू
जागुतै, पार्सल करुन पुण्याला पाठवून दे लवकरात लवकर..
- खादाड पिंगू
17 Aug 2011 - 11:46 am | कच्ची कैरी
वऑव करंज्या बघुन तर तोंडाला पाणीच सुटले !!!
17 Aug 2011 - 12:11 pm | इरसाल
जागूताई,
ह्या करंज्या खूप खूप आवडल्या. कधी नारळीपाकाचीही पाकृ टाक ना
नारळी पौर्णिमेला कोळीलोकांचा उत्साह बघण्यासारखा असतो.
ह्यादिवशी समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी सारे कोळीबांधव समुद्र किनार्यावर जमून नाचून गावून पूजा करून नारळ अर्पण करतात.मांडव्याला हे सगळे अगदी भरभरून अनुभवलेय.तिथेच ह्या करंज्या आणि नारळीपाकाचा फडश्या पाडलाय.
17 Aug 2011 - 12:25 pm | सुनील
अप्रतिम. माझ्या अतिशय आवडीची.
17 Aug 2011 - 3:32 pm | ज्योति प्रकाश
अप्रतिम फोटो,तसेच चव पन तशीच अप्रतिम असणारच.शेवटच्या फोटोतील प्लेट जरा पाठव पाहू ईकडे.
17 Aug 2011 - 3:57 pm | गवि
वा वा.. झक्कास.
पुरणाचे कडबूही माझा वीक पॉईंट आहे.
वर्तमानपत्रावर मात्र कच्च्या (न तळलेल्या) किंवा तयार करंज्या ठेवू नयेत असे वाटते. कच्च्या कणकेमुळे आणि नंतर तेलामुळे काही वेळातच पेपरची शाई पदार्थाला चिकटते / शोषली जाते. ती नक्कीच काहीशी हानिकारक असणार.
18 Aug 2011 - 7:56 pm | स्वैर परी
हेच म्हणनार होते. वर्तमान पत्र वापरायचे झाल्यास, कमीत कमी शाई चा भाग असलेली बाजु वापरावी. तसेच त्या अलगद/वरचेवर त्यावर ठेवाव्या, जेणेकरुन त्यांचा त्या शाईला कमीत कमी स्पर्श होईल.
18 Aug 2011 - 8:10 pm | पंगा
याव्यतिरिक्त, घरात वर्तमानपत्र कोठेकोठे वाचले जाते यावरही बरेच काही अवलंबून आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
17 Aug 2011 - 8:08 pm | पल्लवी
मला ते मोदक आणि लाडवांचे ड्बे मिळाले नाहीत अजुन ! :(
बर जाउदे, आता करंज्यांसोबत पाठव..
आणि एखाद्या डब्यात थोडा उत्साहपण पाठव तुझा थोडासा, माझ्याकडचा कमी पडतो नेहेमी !!!
17 Aug 2011 - 8:10 pm | गणपा
खूप कंट्रोल केला या धाग्यावर न येण्याचा.
मी कबुल करतो. मी हरलो. :(
19 Aug 2011 - 12:02 pm | जागु
हो वर्तमानपत्राबद्दल मी नंतर माहीती वाचली. ह्यापुढे मी वर्तमान पत्र न वापरता टिश्यु पेपर वापरणार पदार्थ काढण्यासाठी.
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
गणपा हार मे ही जीत है.
19 Aug 2011 - 12:09 pm | गवि
एवढा मोठा टिश्यू पेपर आणणे आणि वापरणे कठीण पडेल. शिवाय पर्यावरणविरोधीही होईल.
त्यापेक्षा मी स्वच्छ सुती (तेल अॅबसॉर्ब करणारा) पंचा किंवा कापड सुचवतो. नाहीतरी श्रीखंडाचा चक्का / कडधान्ये वगैरेसाठी आपण कापड वापरतोच की.
19 Aug 2011 - 12:19 pm | जागु
गवी फारच चांगला उपाय आहे. धन्यवाद.
21 Aug 2011 - 11:22 am | इंटरनेटस्नेही
अप्रतिम!