१)मुडदुश्याची आमटी.
साहित्यः-५-६ मुडदुश्या.(याला सुळे असेही म्हणतात)
२-३ वाट्या खवलेलं ओले खोबरे.
अर्धा लहान कांद उभा चिरून व उरलेला अर्धा बारीक चिरून.
एक चमचा धणे,
७-८ मिरी.
अर्धा चमचा हळद
अडीज चमचे लाल तिखट्(हिम्मत असल्यास तब्येतीनुसार)
चिंच.
फोडणीसाठी खोबरेल तेल
अर्धा चमचा तांदळाची पिठी.
कृती :-ह्या सुटी केलेल्या मुडदुश्या(सुळे)
कृती :-सर्व साहित्य(मुडदुश्या सोडून) चांगले बारीक वाटून घेणे.फोडणीसाठी खोबरेल तेल घेऊन त्यात बारीक
चिरलेला कांदा मंद गॅसवर लालसर होईपर्यंत परतावा.त्यात मग मुडदुश्या घालाव्या.व लगेच बारीक
वाटलेले वाटण घालावे.तत्पूर्वी वाटणाला तांदळाची पिठी लावावी.मिठ घालावे.चांगली उकळली व मासे
शिजले कि गॅस बंद करावा.
२)तळलेले वेर्ल्या,पेडवे व मुडदुशी.
ह्या वेर्ल्या
हे पेडवे.
साहित्यः-तांदळाची जाडसर पिठी.,हळद्,लाल तिखट,मिठ,तेल.
कृती :-माश्यांना हळद्,निखट व एक चिमूट मिठ लावावे.तांदळाच्या पिठीत घोळवून तेलात चुरचुरीत तळावे.
सोलकढी.
साहित्यः-२-३ चमचे ओल्या नारळाचा चव.
२ पाकळ्या लसूण
अगदी थोडी हिरवी मिरची.
मिठ व २-३ आमसूले.
कृती :-प्रथम एक पेल्यात आमसूले साधारण अर्धा तास आधी भिजत घालावी.त्यातच चवीप्रमाणे मिठ घालावे.
नारळाच्या चवात लसूण्,हिरवी मिरची व पाणी घालून वाटून घ्यावे.वाटपाचे पाणी आमसुले घातलेल्या
पेल्यात पिळून घ्यावे.वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.लसूण व हिरवी मिरची वाटपात न
घालता चेचून घातली तरी चालते.
मग काय कसा काय वाटला बेत?
प्रतिक्रिया
21 Jul 2011 - 8:14 am | निवेदिता-ताई
मुडदुशे म्हणजे काय????
21 Jul 2011 - 8:34 am | पंगा
.
(बस. एवढेच माहीत आहे.* कधीकाळी बहुधा खाल्लेलाही आहे, पण आता तपशील लक्षात नाहीत.
पण 'वैशिष्ट्यपूर्ण' नाव चांगलेच लक्षात राहिलेले आहे.
आणखी असेच लक्षात राहिलेले 'वैशिष्ट्यपूर्ण' नाव म्हणजे 'घोळ'. ;))
* ("कारण शेवटी आम्ही भटेंच. त्याला काय करणार?" - पु.ल. "अघळपघळ"मधून.)
21 Jul 2011 - 8:51 am | प्रचेतस
मुडदुशे म्हणजे मुडदुस झालेले मासे असावेत (ड जीवनसत्वाच्या अभावामुळे):)
21 Jul 2011 - 8:58 am | पंगा
...माशाचे तेल हाच तर ड जीवनसत्त्वाचा मुख्य स्रोत आहे ना? (चूभूद्याघ्या.)
21 Jul 2011 - 9:02 am | प्रचेतस
पण तेल तयार व्हायला तर त्यांवर सूर्यप्रकाश पडायला हवा ना?
आता हे मासे कायम अंधारातच राहत असतील तर?
21 Jul 2011 - 9:14 am | पंगा
...कोठून मिळत असावा बरे माशांना? (मुडदुशांनाच नाही, पण एकंदरीत सर्वच माशांना.) पण तरीही कॉड लिवर ऑइलचे उत्पादन भरपूर होत असावे, असे गावोगावच्या केमिष्टांच्या दुकानांतील 'सेवन सीज़'च्या पुरवठ्यांवरून वाटते.
हं, संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी सूर्य पाण्यात बुडतो, त्यानंतर मिळत असावा कदाचित.
21 Jul 2011 - 9:19 am | प्रचेतस
सूर्यास्ताच्या वेळी सूर्य बुडतानाच विशेषतः पश्चिम किनारपट्टीवरील (अरबी समुद्रातील)माशांना मिळत असावा, पण पूर्वेकडच्या (बंगालच्या उपसागरातल्या) माशांना मात्र सूर्योदयाच्या वेळी (बुडालेला सूर्य पाण्यातून बाहेर येताना) मिळत असावा. (कन्याकुमारीचे मासे कदाचित दोन्ही वेळा मिळवीत असतील)
पण हे मुडदुशे मात्र सूर्योदय वा सूर्यास्ताच्या वेळी एखाद्या अंधार्या गुहेत जाउन बसत असावेत असे वाटण्यास पुरेसा वाव आहे.
21 Jul 2011 - 10:31 am | पंगा
अंहं. बंगालच्या उपसागराकडे पूर्वेकडून (म्हणजे म्यानमार, थायलंड किंवा गेला बाजार अंदमानहून बंगालच्या किंवा एकंदरीत भारताच्या कोरोमांडेल किनारपट्टीच्या दिशेने तोंड करून) पाहिले असता, बंगालच्या उपसागरातील माशांनाही सूर्यास्ताचे नंतर सूर्य पाण्यात बुडाल्यावरच सूर्यप्रकाश मिळत असावा, अशी निरीक्षणवजा अटकळ नोंदवू इच्छितो.
(थोडक्यात काय, सगळे 'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून आहे.)
आयुष्यात मुडदुशांची एकदाच काय ती भेट झाली असता, निव्वळ तोंडओळखीच्या बळावर त्यांना त्यांच्या दिनक्रमातील या प्रकारच्या अत्यंत नाजूक अशा क्षणांबद्दल अत्यंत खाजगी अशा स्वरूपाचे प्रश्न विचारणे मला प्रशस्त वाटले नाही. त्यामुळे या मुद्द्याबद्दल दुर्दैवाने मी अनभिज्ञच आहे. कदाचित आपल्याला याविषयी काही खात्रीलायक माहिती असल्यास आपण ती येथे जरूर मांडावी.
21 Jul 2011 - 10:38 am | प्रचेतस
हाच न्याय लावला असता आफ्रिकेहून वा मध्यपूर्वेकडून पाहिला असता हे मासे सूर्यास्तानंतरच 'ड' जीवनसत्व मिळवू शकत असावेत अशीही अट़कळ मांडता येतेच.
थोडक्यात काय, सगळे 'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून आहे. हे तुमचे म्हणणे खरेच.
पूर्णपणे शाकाहारी असल्यामुळे मुडदुशांची दुरान्वयानेही कधी भेट घेण्याचा संभव आला नसल्याने खात्रीलायकरीत्या निदान मला तरी सांगता येत नाही. तथापी डिस्कव्हरीवर वा नॅट जिओ वर काही मासे समुद्रातील अंधार्या गुहांमध्ये जाउन राहतात हे पाहिले असल्याने मुडदुशांनाही अशीच सवय असल्याची वा लागल्याची शक्यता नाकारता येत नाही.
21 Jul 2011 - 10:49 am | सुनील
मुडदुशांना काणे फिश असेही एक नाव आहे. मंगळूरी मस्त्याहारी खाणावळींत हा मासा काणे फिश (किंवा lady fish) ह्या नावाने मिळतो.
सदर मासा हा मूळात काणा असल्यामुळे त्याला सूर्यप्रकाश कुठून येत आहे त्याचा नीट अंदाज येत नाही. साहजिकच त्याची पोझिशन चुकल्यामुळे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. सबब, "ड" जीवनसत्त्वाच्याअभावी तो "मुडदुशा" बनतो.
बाकी ज्योतीताई, बेत छानच वाटला. पाकृ मस्तच! (अवांतरात हे राहून जाऊ नये म्हणून ठळक केले आहे)
एखाद्या मोकळ्या वीकांताला आम्हीदेखिल निवांतपणे ह्याचा आस्वाद घेतो!
अवांतर - हे टगेखोर पर्स्पेक्टीव कुणाशीही पंगा घेण्याच्या हेतूने केलेले नाही, ह्याची नोंद घ्यावी!
21 Jul 2011 - 11:31 am | पंगा
कदाचित हे काणेपण त्यास "अ" जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येत असावे काय?
("अ" जीवनसत्त्वाच्या अभावामुळे नेमके कायकाय होऊ शकते, आणि विशेष करून काणेपण येते की नाही, याचा निश्चित अंदाज आम्हास नाही. मात्र, "अ" जीवनसत्त्व हे एकंदरीत दृष्टीशी निगडित असून त्याच्या अभावी दृष्टीशी निगडित असे विकार उद्भवू शकतात, असे ऐकलेले आहे, आणि काणेपण हाही दृष्टीशी निगडित असा एक विकार आहे, म्हणून शंका येते, एवढेच.)
तसे असल्यास, हा प्रकार '"अ" जीवनसत्त्वाच्या अभावातून उद्भवलेल्या "ड" जीवनसत्त्वाच्या अभावातून उद्भवलेला विकार' या सदरात मोडावा काय?
21 Jul 2011 - 11:21 am | पंगा
आफ्रिकेहून अथवा मध्यपूर्वेकडून बंगालच्या उपसागराकडे (आणि झालेच तर त्यातील सूर्यास्ताकडे अथवा सूर्योदयाकडे) पाहता येण्याच्या शक्यतेबद्दल साशंक आहे.
कदाचित बंगालच्या उपसागरातून थेट प्रक्षेपण करून उपग्रहाद्वारे ते मध्यपूर्वेत अथवा आफ्रिकेत पुनःक्षेपित करता आले, तर हे शक्य होईलही. मात्र त्या परिस्थितीत, निरीक्षकाच्या 'पर्स्पेक्टिव'ने निरीक्षणात (निरीक्षकाने टीव्हीकडे पाठ फिरवल्यास त्यास काहीही निरीक्षण करता येणार नाही एवढी बाब वगळल्यास) काहीही फरक पडणार नाही, उलट क्यामेरा अँगलवर सर्व अवलंबून राहील, अशी शंका येते. तूर्तास मध्यपूर्वेकडे अथवा आफ्रिकेकडे जाण्याचे तिकीट मला परवडण्यापलीकडचे आहे, तितका वेळही उपलब्ध नाही, शिवाय बंगालच्या उपसागरास अर्पण करता येण्याजोगा अतिरिक्त क्यामेराही जवळ नाही. (उपग्रहाबद्दल चौकशी करावी लागेल ती वेगळीच, पण ते कदाचित तितकेसे कठीण काम नसेलही, अशी आशा आहे. मात्र या इतर अडचणींचे निवारण तूर्तास तरी माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते.) तरी हे पडताळून पाहणे सध्या मला अशक्य आहे. आपणांस जमण्यासारखे असल्यास अनुभव अवश्य घ्यावा आणि आपला अनुभव जरूर कळवावा.
या बाबतीतील आपल्या मतैक्याबद्दल वाचून आनंद झाला.
मीडियाच्या भूलभुलैयात राहणार्या डिस्कव्हरीवरील अथवा नॅट जिओवरील माश्यांना कदाचित अशा घातुक सवयी (आणि/किंवा काळोखातले धंदे) असतीलही. शेवटी, वातावरणाचा आणि संगतीच्या काहीतरी परिणाम हा व्हायचाच. (शिवाय, मीडियाच्या प्रकाशझोतात असणार्यांना अधूनमधून अंधार्या गुहांतून लपावेसे वाटणे साहजिक आहे.)
मात्र, मुडदुशांना अजूनपर्यंत मीडियात झळकण्याची संधी मिळालेली आहे की नाही, मीडिया एक्स्पोझर आहे की नाही, तसेच मीडियाच्या भूलभुलैयातील इतर माश्यांची संगत आहे की नाही, याची पुरेशी छाननी केल्याशिवाय किंवा करण्याअगोदरच त्यांच्या चारित्र्यावर कधीही धुवून न निघण्यासारखे शिंतोडे उडवण्याची ताकद असलेले निष्कर्ष काढणे अथवा तसे अंदाज मांडणे थोडे प्रीमच्युअर (मराठी?) आणि धाडसाचे वाटते, असे सुचवू इच्छितो.
21 Jul 2011 - 12:55 pm | प्रचेतस
येथे माझा म्हणण्याच्या उद्देश थोडा निराळा होता.
ज्याप्रमाणे म्यानमार, थायलंड किंवा गेला बाजार अंदमानहून बंगालच्या किंवा एकंदरीत भारताच्या कोरोमांडेल किनारपट्टीच्या दिशेने तोंड करून बंगालच्या उपसागरात सूर्यास्त पाहता येतो.(येथे भारताच्या पूर्व किनार्यावरून विशाखापट्टणम्. चेन्नै वगैरे येथून सूर्योदय) त्याचप्रमाणे आफ्रिकेहून अथवा मध्यपूर्वेकडून अरबी समुद्राकडे सूर्योदय (येथे पश्चिम किनार्यावरून मुम्बै, कोची, मंगळूर येथून सूर्यास्त पाहता येतो). मी तेथे अरबी समुद्राचा उल्लेख केला नाही ही माझी चूक मी मान्य करतो. (अर्थात तुम्ही ते समजू शकाल हे मी तेथे गृहित धरले होते.)
अर्थात त्यामुळे उपग्रहाद्वारे पाहण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. शेवटी पर्स्पेक्टिववर असलेले अवलंबित्व आहेच.
मानवी चारित्र्यावर उडवले जाणारे शिंतोडे व प्राण्यांच्या (येथे माशांच्या) चारित्र्यावर उडवले जाणारे शिंतोडे यात फरक आहे असा माझा समज आहे. येथे मानवी चारित्र्यावर उडवलेल्या शिंतोड्यांमुळे जसा त्या व्यक्तीला त्रास होतो, रडू येते, संताप होतो तसा माशांना होत नसावा असे वाटते कारण तसे झाल्याचे आतापर्यंतरी आढळात आलेले नाही. शिवाय हे मासे अंधार्या गुहेत लपणे हा अंदाज म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे कसे असू शकेल?(हा पण तुम्ही केलेला अंदाजच ना?)
कदाचित गुहेत लपणेही त्यांना चारित्र्याचे एक लक्षण वाटत असल्यास?
21 Jul 2011 - 1:06 pm | पंगा
हम्म्म्म... हा मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे खरा.
मुडदुश्यांचे (संभाव्य) पर्स्पेक्टिव मी लक्षात घेतले नव्हते, हे मी मान्य करतो.
लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
अवांतर: चारित्र्यहननामुळे (अथवा अन्य कारणांमुळे) मुडदुश्यांना (अथवा अन्य माशांना अथवा जलचरांना) रडू आल्यास, पाण्यात ते लक्षात यावयाचे कसे?
सबब, मुडदुश्यांना चारित्र्यावर उडवलेल्या शिंतोड्यांमुळे रडू येत नाही, या निष्कर्षापर्यंत येण्याची घाई निदान मी तरी करणार नाही.
21 Jul 2011 - 1:21 pm | प्रचेतस
आपल्या पॉईंटाच्या मुद्द्याशी मीपण सहमत ;)
अतिअवांतरः मुडदुशांना पण मगरीसारखे नकाश्रू असावेत का?
21 Jul 2011 - 1:27 pm | पंगा
व्याख्येनेच, 'नक्राश्रू' हे फक्त मगरीच्याच अश्रूंना म्हणता यावे, हे उघड आहे. मुडदुश्यांच्या अश्रूंना दुसरे काहीतरी म्हणावे लागेल.
सबब, मुडदुश्यांना नक्राश्रू असणे शक्य नसावे, असा आमचा अंदाज आहे.
21 Jul 2011 - 1:30 pm | प्रचेतस
मग आपण त्यांना मुकाश्रू असे म्हणू. (शाळेत संस्कृत धडपणे न शिकल्याची आज खंत वाटतेय :( )
21 Jul 2011 - 1:43 pm | पंगा
मुकाश्रू, मुडदाश्रू... अनेक पर्यायांचा विचार करता येईल.
पारिभाषिक संज्ञा निर्माण करण्याकरिता प्रत्येक वेळी संस्कृताचीच कास कशाला धरायला पाहिजे? त्याऐवजी, मराठीतून मुडदे... आपले... मराठीतून सशक्त पर्याय निर्माण करून आपली मराठी भाषा सबळ का करू नये?
(थोडक्यात, सांगायचा मुद्दा, आमचीही संस्कृत यथायथाच.)
21 Jul 2011 - 11:52 am | विजुभाऊ
...कोठून मिळत असावा बरे माशांना?
सोप्पे आहे. सूर्यास्ताला सूर्य अरबी सागरात मावळतो. तो एकदा समुद्रात आला की मासे त्यातले ड जीवनसत्व काढून घेत असतील. तसेच सूर्य समुद्रात असताना त्यातील ड जिवनसत्व पाण्यात मिसळत असावे
21 Jul 2011 - 8:39 am | रेवती
मी शाकाहारी असले तरी हे फोटू आवडले.
21 Jul 2011 - 9:22 am | पाषाणभेद
वेर्ल्या,पेडवे हे पण मासेच का?
21 Jul 2011 - 10:55 am | मालोजीराव
वेर्ल्या,पेडवे,मुडदुश्या एक पण नाव झेपलं नाही ?
पण बघितल्यावर झक्कास वाटतंय,त्यामुळे चवीला पण तशीच छान नक्कीच असावीत.
21 Jul 2011 - 12:17 pm | नंदन
मस्त! मुडदुशांची सौम्य चव जिभेवर रेंगाळून गेली.
21 Jul 2011 - 12:30 pm | विसोबा खेचर
काय बोलू..?! शब्दच नाहीत..!
21 Jul 2011 - 1:17 pm | गणपा
वेर्ल्या,पेडवे ही नावं जरी पहिल्यांदा ऐकली असली तरी चित्रावरुन मासे ओळखीचे वाटतायत.
मुडदुश्याचं / मोदकाचं, तुप, काळीमीरी , हळद आणि कोकम लावुन नारळाच्या दुधात केलेल सार ओल्या बाळंतिणीला देतात.
21 Jul 2011 - 7:39 pm | सानिकास्वप्निल
मस्तच :)