ऊर्जेची गणिते २: पहिला सोप्पा टेरावॉट

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
4 Apr 2010 - 12:19 am

अठराव्या शतकात कधीतरी औद्य़ोगिक क्रांती झाली आणि तेव्हापासून जग काही पूर्वीसारखं राहिलेलं नाही. माणसाने भरमसाठ जंगलतोड, वारेमाप ऊर्जावापर, बेसुमार प्रदूषण करून रम्य निसर्गाचे राडे करून ठेवलेले आहेत. त्यात गेल्या शतकात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण, रासायनिक उत्पादन, कृत्रिम पदार्थ यामुळे निसर्गाशी नातं तुटलेलं आहे. आणि आता तर ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचं अस्तित्वच त्याने धोक्यात आणलं आहे.

हे झालं पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवजातीचं चित्र. अर्थातच अतिरंजित आहे, पण त्यात तथ्यही नाही असं नाही. यावर उपाय काय? तर एक उपाय असा सांगितला जातो की ऊर्जेचा वापर करून आपण जो कार्बन डाय ऑक्साइड (याला सुटसुटीतपणे कार्बन म्हणण्याची आजकाल प्रथा आहे, ती मी पाळेन - न चा पाय मोडून.) निर्माण करतो, त्यामुळे हे सर्व होतं. तेव्हा काहीही करून कार्बन् कमी केला पाहिजे. त्यासाठी ऊर्जावापर कमी केला पाहिजे. शहरीकरणात रम्य बालपण हरवलेल्या, कॉंक्रीटच्या जंगलात घुसमटणाऱ्या व आपण आपली मुळं विसरलो अशी अपराधी भावना असणाऱ्या आपल्या मनाला हे चटकन पटतं, आकर्षक वाटतं. पण हे खरं उत्तर आहे का? त्यासाठी आपल्याला काही गणितं करून अधिक चांगलं उत्तर सापडतंय का हे पाहावं लागेल.

सुरूवातीला काही आकडेवारी. या पृथ्वीवर सुमारे ६.७ अब्ज लोक राहातात. ते सगळे मिळून सुमारे वीस टेरावॉट ऊर्जा सतत वापरत असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दरडोई हजार वॉट (एक किलोवॉट) पॉवरचे तीन दिवे दिवसरात्र सतत ढाणढाण जाळत असण्याइतकी ऊर्जा वापरतात. त्यात अर्थातच विद्युत ऊर्जेचा भाग किती आहे हा प्रश्न उत्तर द्यायला कठीण आहे. कारण मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापर हा वाहतूक व उत्पादनासाठी होतो. हिशोबाच्या सोयीसाठी एक तृतियांश ऊर्जा ही विद्युत स्वरूपात किंवा विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी खर्च होते असं धरूया. जर थोडे वेगळे आकडे असले तर या गणिताच्या आकडेस्वरूपातल्या उत्तरात फरक पडेल, पण संकल्पनेत फारसा फरक पडणार नाही असं वाटतं. जर कोणी अधिक अचूक आकडेवारी दिली तर मी ती गणितात व उत्तरात समाविष्ट करेन. नाहीतर येणाऱ्या उत्तराची एरर मार्जिन जास्त गृहित धरून आपण निष्कर्ष काढू. विद्युत ऊर्जेचा वापर आपण दरडोई सरासरी (सुमारे) एक किलोवॉट इतका करतो. म्हणजे दरडोई दर ताशी एक युनिट. आता तुम्ही म्हणाल की आमचं बिल तर तेवढं येत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे, विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी लागणारी ही संपूर्ण ऊर्जा आहे. त्यात ही सगळ्या जगाची सरासरी आहे, व इतर प्रगत देश भारताच्या कितीतरी पट अधिक वीज करतात. शिवाय काही भाग अप्रत्यक्षपणे उत्पादनासाठी वापरलेल्या विद्युत ऊर्जेत सामावलेला आहे.

प्रश्न असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी ही ऊर्जा वाचवणं हा प्रभावी उपाय आहे का? वर्षात ३६५ * २४ = ८७६० तास असतात. जगातल्या सर्वांनी तासभर ऊर्जा वापरली नाही, तरी दशसहस्रांशापेक्षा फार जास्त फरक पडणार नाही. त्यात पुन्हा उत्पादनाची ऊर्जा त्यात नाहीच - त्यामुळे तो परिणाम त्याहूनही कमी. आणि हे फक्त विजेचं - तेल, पेट्रोल वाचवण्यासाठी तुम्हाला प्रवासही कमी करावा लागणार. म्हणजे एक तास वीज वाचवली तर २० टेरावॉट सतत वापरल्याऐवजी १९.९९९५ टेरावॉट सतत वापरल्याप्रमाणे आहे... हेही सर्वांनी केलं तरच.

असल्या दशसहस्रांश वा लक्षांश टेरावॉटच्या मागे लागण्याऐवजी एक आख्खा टेरावॉट जर वाचवता आला तर? आणि तेही फारसे कष्ट न घेता?

तसा उपाय आहे. तो सर्वांना माहीतही आहे, पण आपल्याला त्याचं गणित माहीत नसल्याने तो किती प्रभावी आहे याची आपल्याला कल्पना येत नाही.

सर्वांनी झाडं लावावीत. पण किती?

एक झाड लावल्याने किती फरक पडू शकतो? याचं उत्तर आहे की सौ सोनार की, एक लुहार की या म्हणीत! मनुष्य सोनाराच्या दोन वर्षाच्या मुलाच्या खेळण्यातल्या हातोडीप्रमाणे २० टेरावॉटचे टक टक करत असतो. तर त्याच वेळी सूर्य आपल्या प्रचंड घणाने १,७४,००० टेरावॉटचे घाव घालत राहातो. ग्लोबल वॉर्मिंग होतं ते मुख्यत्वे सूर्यामुळे असं म्हटलं तर त्यात काही गैर नसावं. सौर ऊर्जा म्हटली की आपल्याला महाग सोलर पॅनेल वगैरे डोळ्यासमोर येतात. पण सूर्यप्रकाश शोषून घेऊन ती ऊर्जा साठवून ठेवणारी अत्यंत स्वस्त 'यंत्रं' आपल्याकडे पूर्वीपासूनच आहेत. आसपास असलेल्या झाडांमध्ये शेकडो टेरावॉट शोषले जात असतात. त्यातले अजून काही शोषले गेले तर त्याचा दुप्पट ते तिप्पट फायदा होईल. एक म्हणजे, उष्णता रासायनिक ऊर्जेत शोषली गेल्याने पृथ्वी तापणं कमी होईल. दुसरं म्हणजे घरं गार करण्यासाठी जी त्याहून अधिक ऊर्जा लागते ती वापरणं कमी होईल. तिसरं म्हणजे झाडं कार्बन् शोषून घेतील, त्यामुळे भविष्यातलं ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल. तर प्रश्न असा आहे की एक टेरावॉट वीज वाचवण्याचा परिणाम साधण्यासाठी प्रत्येकी किती किंवा (किती शे) झाडं लावावी लागतील?

सुर्याची पृथ्वीवर पडणाऱ्या ऊर्जेचा आपण साधारण अंदाज करू. सूर्य भर माथ्यावर असताना ती प्रत्येक स्क्वेअर मीटरला सुमारे १४०० वॉट असते. पण अर्थातच चोवीस तास ती कायम नसते, त्यामुळे बारा तास सूर्यप्रकाश गृहित धरला तर त्याचं उत्तर सुमारे साडेतीनशे वॉट इतकी येईल. पावसाळ्यात ती कमी असते वगैरे गोष्टी गृहीत धरल्या तरी ते उत्तर साधारण २५० वॉट इतकं येतं. तुम्ही जर १ स्क्वेअर मीटर इतका सूर्यप्रकाश शोषून घेतला तर तुमचा किमान २५० वॉटचा फायदा होतो. पण तो तिथेच थांबत नाही. जर ती उष्णता घरात येण्यापासून वाचवलीत तर तुम्हाला घर थंड करण्यासाठी एसी, पंखा यासाठी तितकीच कमी ऊर्जा वापरावी लागेल. घर जर थंड राहिलं, तर तुमचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा वापर करणारा फ्रिज अधिक कार्यक्षमपणे चालतो. त्यामुळे तेवढी विद्युत निर्मितीसाठी कोळसा व तेल जाळणं वाचेल. १ युनिट वीज निर्माण करण्यासाठी या प्रक्रियेतली इनएफिशियन्सी, ट्रान्समिशन लॉसेस वगैरे लक्षात घेतले तर सुमारे ५ युनिटचा कोळसा किंवा तेल लागतं. याचा अर्थ २५० वॉटमुळे तुम्ही सुमारे १२५० वॉटइतकी अधिक शक्ती वाचवाल. म्हणजे होणारा परिणाम हा जवळपास सव्वा किलोवॉटइतकी ऊर्जा न जाळण्याने होईल इतका असेल. आणि हे तासाभरापुरतं नाही, तर जोपर्यंत तुम्ही ती झाडं जगवाल तोपर्यंत दर तासाला १.२५ युनिट इतकी बचत होईल. आधी सांगितलेल्या गणिताप्रमाणे, जर जगातल्या प्रत्येकाने दरडोई १ स्क्वेअर मीटर इतकी ऊर्जा शोषून घेतली व तीमुळे वीज वाचली तर सुमारे नऊ टेरावॉट इतकी ऊर्जा वाचेल.

प्रथमदर्शनी या गणितात घोळ वाटतो. पुन्हा पुन्हा वाचून बघितलं तरी नक्की काय यावर बोट ठेवता येत नाही. थंड करण्याची ऊर्जा वाचवून आपण वापरतो तितकी सगळीच ऊर्जा कशी वाचेल? पण चूक तर काही काढता येत नाही. घासकडव्यांनी काही तरी गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं वाटतं. उत्तम. हे गणित थोडं गंडलेलं आहे, त्याचं खरं उत्तर मी तुम्हाला सांगेन. फक्त त्यापूर्वी एवढंच म्हणेन की हाच सुधृढ शंकाखोरपणा पर्यावरणवादी जेव्हा काहीतरी गणित करून सांगतील तेव्हाही ठेवा. दुर्दैवाने आपल्याला गाळीव आकडेच मिळतात, ते आकडे जितक्या काटेकोरपणे तपासले जावेत तितके जात नाहीत. ते खोटे नसतात, पण त्यातली गृहितकं फाईन प्रिंटमध्ये राहातात. पुढच्या काही लेखात पर्यावरणवाद्यांच्या असल्या गंडलेल्या गृहितकांच्या गणितांवर प्रकाश टाकता येईल का बघीन.

यात गंडलेला भाग आहे तो तुम्ही २५० वॉटची उष्णता कमी केलीत तर तितकीच वीज थंड करण्यासाठी वाचेल या गृहितकात. घर थंड करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही तितकीशी वाचत नाही - कारण ती विशिष्ट महिन्यांतच व विशिष्ट प्रदेशातच लागू असते. म्हणजे या आकड्याला सरळसरळ दहा पटीने भागावं लागतं. तरी सुमारे एक टेरावॉट उरतोच. तो खोटा नाही. या गणितातल्या त्रुटी दाखवून कोणी हा १ टेरावॉट नसून ०.१ टेरावॉट आहे असं सिद्ध करून दाखवलं तरी ०.१ टेरावॉट म्हणजे १०० गिगावॉट हे लक्षात घ्या. पन्नास कोयना प्रकल्प. कायमचे बंद. १ टेरावॉट आकडा जर बरोबर असेल तर सुमारे पाचशे कोयना प्रकल्प. कायमचे बंद.

आता तुम्ही म्हणाल की आम्ही शहरवासीय, आम्ही कुठून इतकी झाडं लावणार. तर ते तितकं बरोबर नाही. आपल्या प्रत्येक घरांना खिडक्या असतात, भिंती असतात. पुण्यात तर सर्व खिडक्यांना, ग्यालऱ्यांना ग्रिल लावण्याची सर्रास पद्धत आहे. या सर्व ठिकाणी आपल्याला मनीप्लॅंट वगैरेसारख्या वेली चढवून देता येतात. (कुठचे वेल चढवायचे याबाबत मला फारशी माहिती नाही. पण ती माहिती शोधण्यासारखी आहे) एक स्क्वेअर मीटर खऱ्या अर्थाने करण्यासाठी उभे सुमारे अडीच ते तीन स्क्वेअर मीटर करावे लागतात. (पूर्वाभिमुखी खिडक्यांना निम्माच वेळ पूर्ण सूर्यप्रकाश मिळतो, त्यात उभ्याचा फ्याक्टर वगैरे धरून...) पण जर सर्व खिडक्यांवर वेल चढवले तर पाच ते दहा स्क्वेअर मीटर अगदी अशक्य नाही. हा उपाय घरी करता येईल त्याहीपेक्षा अधिक परिणामकारकपणे वेगवेगळ्या ऑफिस बिल्डिंगींमध्ये करता येईल. अनेक कंपन्यांमध्ये दिवसभर एसी असतो. तसंच सद्यस्थितीत अनेक कंपन्याना आपली हिरवी प्रतिमाही सादर करण्याची इच्छा आहे. संपूर्ण बिल्डिंगसाठी लागणारा एसीचा खर्च व ऊर्जा यामुळे कितीतरी प्रमाणात कमी करता येईल. तुमच्या कंपनीत चौकशी करून बघा. तुमच्या बिल्डिंगला जर गच्ची असेल तर तिला वेलींचा मांडव घालून घेता येईल का याचा विचार करा, विशेषत: तुम्ही जर सर्वात वरच्या मजल्यावर राहात असाल तर.

वेली, झाडं लावण्याने नुसताच एक टेरावॉट वाचेल असं नाही, हिरवाईने वेढलेलं घर असण्यातनं जी प्रसन्नता मिळते तिची किंमत कुठच्याच एककात करता येत नाही हेही आहेच. इतकंच नाही तर ते एक प्रतीकदेखील आहे. दिवाळीत आपण पेटवलेल्या ज्योतीप्रमाणे ती हिरवी ज्योत सतत पेटती राहाते. आपल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना त्याविषयी सांगता येतं. यातूनच सकारात्मक लोकशिक्षण होतं. आपल्या घरी आलेल्यांना उत्साहाने सांगता येतं - एक स्क्वेअर मीटरची पानं फुलवा. तो एक सकारात्मक कार्यक्रम होतो. आणि ज्योतीने ज्योत पेटवता येते. प्रतीकं ही त्या प्रश्नाचा अर्क असणारी, कायम फुलणारी, काहीतरी हाताला लागणारी, डोळ्याला दिसणारी असावीत असं मला वाटतं. गांधींनी असहकार चळवळ पुकारली. ही मूलत: नकारात्मक चळवळ होती. पण त्यांनी त्या चळवळीचं प्रतीक निवडलं ते म्हणजे मीठ. त्यांनी लोकांना मीठ खाऊ नका असं सांगितलं नाही (तसं सांगणं खरं तर गांधींच्या अतिरेकी कठोर आत्मनकारी मनोवृत्तीला अधिक भावलं असतं तरीही...). ते शेकडो किलोमीटर चालत गेले, आणि समुद्रावर जाऊन त्यांनी मीठ बनवलं. एक दिवस मीठ न खाऊन जितकं लोकशिक्षण झालं असतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पट शिक्षण लाखो लोकांनी एकाच वेळी मीठ बनवण्याने झालं.

पहिल्या परिच्छेदात पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवाचं 'आपल्या स्वार्थापायी पृथ्वीची वाट लावणारा' असं विकृत चित्र बघितलं. पण त्याचबरोबर एवढं लक्षात घेतलं पाहिजे की गेली साडेचार अब्ज वर्षांच्या पृथ्वीच्या आयुष्यात तिची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. मनुष्य आत्ता आत्ता तिची काळजी घेण्याचा विचार देखील करू लागला आहे. ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. पण अजून मनुष्याची शक्ती - साधक व बाधक दोन्ही, मर्यादितच आहे. जेव्हा मनुष्यजात आपल्या सर्व जीवघेण्या प्रश्नातून मुक्त होईल तेव्हा पर्यावरणाचा नक्कीच विचार करेल. दहा अब्ज सक्षम, सुशिक्षित, समृद्ध लोक काय करू शकत नाहीत? आपल्या मध्यमवर्गीय घरात वेल लावणं आपल्याला काहीच वाटत नाही. ते प्रत्येक घरटी करणं शक्य आहे. पण हा प्रश्न एकदाचा कायमचा धसाला लावण्यासाठी गरज आहे ती म्हणजे सहारा, गोबी, थर वाळवंटात नवीन वृक्षराजी लावून त्यांचं नंदनवन करण्याचा. तसं झालं तर वर्षाला हजारो टेरावॉटचा कार्बन् शोषला जाईल. ते अशक्य नाही. त्यासाठी पैसा पाहिजे, शक्ती पाहिजे, ऊर्जा पाहिजे. पण जोपर्यंत आपल्याच घरात रोगराई, निरक्षरता, बालमृत्यू, अन्याय, गरीबी, भ्रष्टाचार, सामाजिक शोषण, बालकांवर होणारे अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत हा पैसा व शक्ती झाडं लावण्यात खर्च करता येणार नाही हे वास्तव आहे. पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आधी हे प्रश्न सोडवावे लागतील. अगदी पूर्णपणे नाही, पण निदान अमेरिकेत आत्ता ज्या पातळीपर्यंत सोडवले गेले आहेत तिथपर्यंत तरी. त्यासाठी या बाबतीत मागे असलेल्या भारत, चीन, आफ्रिकन राष्ट्रांनी तरी आधुनिकीकरण करून अधिकाधिक शिक्षण, आरोग्य व समृद्धी यावर भर दिला पाहिजे. जेव्हा सर्व जग आत्ताच्या अमेरिकेइतकं समृद्ध होईल तेव्हा पर्यावरणाचा प्रश्न हातात घेता येईल. हा दिवस दूर नाही. गेल्या तीस वर्षातला विकासाचा दर बघितला तर जगाची नव्वद टक्के लोकसंख्या त्या पातळीवर जायला अजून फारतर ५०-७५ वर्षं लागतील. तोवर आपल्याला जमेल तितकं व्यक्तिगत पातळीवर करत राहाणं व ही हिरवी ज्योत जिवंत ठेवणं हेच आपल्या हाती आहे.

तंत्रविज्ञानविचार

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

4 Apr 2010 - 12:56 am | इंटरनेटस्नेही

छान!

मेघना भुस्कुटे's picture

4 Apr 2010 - 6:56 am | मेघना भुस्कुटे

जवळ जवळ खोटा वाटावा, इतका सोपा उपाय वाटतो हा. पण तुमच्या युक्तिवादात तथ्य तर आहेच. शिवाय तुमचा उपाय तुम्ही दिलेल्या गांधींच्या उदाहरणासारखाच सोपा, सर्वांना सहजसाध्य आणि परिणामकारक वाटतो. (मी लावलेली दोन झाडं निदान ६ महिने टिकली, तर मी पुढची वटवट करीन! सध्या पुरे.)

बाकी, नवीन विषयः
एकंदरीतच युद्धखोरी वाईट असा जगाचा एकंदर सूर आहे. (आणि तो बरोबरही आहे.) पण आतापर्यंतच्या इतिहासात युद्धांची काहीतरी भूमिका तर असेलच. शिवाय सकारात्मक / नकारात्मक काहीही भूमिका असो, आपल्यातला हा युद्धखोर भाग संपूर्णपणे मिटवणं माणसाला शक्य आहे का? जर तसं झालंच, तर त्याचे इतर काय(-काय!) परिणाम होतील?
तुमच्या तर्कशुद्ध भूमिकेतून यावर काही लिहावंसं वाटलं तर लिहा.

या प्रश्नाचं सरळ साधं सोप उत्तर नाही असं आ हे

बाकी लेख आवडला...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2010 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा ! लेखाची मांडणी एकदम मस्त.
उर्जा बचतीसाठी सांगितलेले उपाय फारसे अवघड नाहीत असे लेख वाचल्यावर वाटले.

-दिलीप बिरुटे

अभिषेक पटवर्धन's picture

4 Apr 2010 - 11:29 am | अभिषेक पटवर्धन

खुपच मस्त लिहिलय...काही भाग थोडे डोक्यवरुन गेले पण सोप्या भाषेत सांगण्याचा खुप चांगला प्रयत्न.

या वरुन मागे कधीतरी वाचलेलं ancient sunlight नावाचं पुस्तक आठवलं. छान आहे. मिळालं तर नक्की वाचा.

अनिल अवचटाच्या 'कार्यरत' मधल्या 'अरुण देशपांडे' ची गणितं पण डोळे उघडणारी आहेत. उदा: शहरांमधे एक लिटर दुधामाधे तिस लिटर पाणी वाया जातं.

पाषाणभेद's picture

4 Apr 2010 - 12:08 pm | पाषाणभेद

वाचतो आहे बरं का.
लेख छानच.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

आळश्यांचा राजा's picture

4 Apr 2010 - 12:43 pm | आळश्यांचा राजा

जेव्हा सर्व जग आत्ताच्या अमेरिकेइतकं समृद्ध होईल तेव्हा पर्यावरणाचा प्रश्न हातात घेता येईल. हा दिवस दूर नाही. गेल्या तीस वर्षातला विकासाचा दर बघितला तर जगाची नव्वद टक्के लोकसंख्या त्या पातळीवर जायला अजून फारतर ५०-७५ वर्षं लागतील.

अमेरिका ज्या पद्धतीने समृद्ध झाली आहे, होत आहे; बाकीचे जग ज्या पद्धतीने समृद्ध होत आहे, त्यामुळेच तर हा पर्यावरणाचा प्रश्न मुळात निर्माण झाला! जेव्हा सर्व जग आत्ताच्या अमेरिकेइतकं समृद्ध होईल तेव्हा वेळ निघून गेलेली नसली म्हणजे ठीक! असो. दुसरे पर्याय आहेत कुठे समृद्ध व्हायला? आहेत तर ते अंमलात का येत नाहीत?

लेख चांगला. अजून अधिक विस्ताराच्या प्रतिक्षेत. समृद्ध होण्याचे पर्यायी मार्ग चर्चेत यायला हवेत असे वाटते.

आळश्यांचा राजा

राजेश घासकडवी's picture

4 Apr 2010 - 1:47 pm | राजेश घासकडवी

वेळ निघून जाणं म्हणजे नक्की काय? आत्तापर्यंतच्या कुठच्याच पर्यावरणवाद्याने पुढच्या २०० वर्षांत मानवजातीचा अंत होईल असं म्हटलेलं नाही. वादळं वाढतील, पाण्याची पातळी वाढेल, तापमान वाढेल एवढंच म्हटलेलं आहे. याचा खर्च काहीशे बिलियन डॉलर येऊ शकेल असे अंदाज आहेत. (जगाचं जीडीपी सुमारे साठ ट्रिलियन)

अमेरिकेची समृद्धी अतिरेकी ऊर्जावापरातून झाली म्हणून यापुढच्या भारत, चीनच्या समृद्धीसाठी तितकाच अतिरेकी ऊर्जावापर होईल असं गृहित धरण्यात अर्थ नाही. उदाहरणार्थ, पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या गाड्या लीटरला पाच-सात किलोमीटर द्यायच्या, फोन घरोघरी नव्हते, इंटरनेट व संगणिकीकरण म्हणजे काय हे माहीत नव्हतं. गेल्या पन्नास वर्षातल्या प्रगतीमुळे, आता गाड्या लीटरला पंधरा-वीस किमी देतात, सेलफोन लोकांच्या खिशात आहेत, व माहिती प्रकाशाच्या वेगाने हलू शकते. हे सगळं अजून सगळीकडे पोचलेलं नाही हे माहीत आहे मला, पण समृद्धीचे मार्ग तितके ऊर्जा इंटेंन्सिव्ह राहिलेले नाहीत. खूप कमी ऊर्जेत खूप अधिक गोष्टी होतात आजकाल. सौर ऊर्जेचा जगभरातला वापर दरवर्षी सुमारे ४०% नी वाढतोय (वाचल्याचं आठवतंय, नक्की खात्री करून घेण्याची गरज आहे).

सगळं जग आत्ता या क्षणी अमेरिकेइतकं प्रगत (शिक्षण, पैसा, आरोग्य वगैरे) झालं व तितकीच ऊर्जा वापरायला लागलं तर २० ऐवजी सुमारे ७५ ते १०० टेरावॉट लागतील. त्यातून जे अतिरिक्त मनुष्यबळ, पैसा व शक्ती निर्माण होईल त्यातून हजार टेरावॉट शोषणारी जंगलं सहज निर्माण करता येतील.

मुद्दा असा आहे की भेडसावणारे प्रश्न आपल्याला दिसतात, पण आत्तापर्यंत मानवाने अनेक इतर प्रश्न सोडवलेले आहेत हे लक्षात येत नाही. व का कोण जाणे, पण यावेळी ते प्रश्न न सुटण्यासारखेच आहेत यावर ठाम विश्वास ठेवणं खूप सोपं जातं.

झाडाची सौर पावर-शोषण सरासरी २५० वॉट असल्याचे गणित वर दिलेले आहे.

ऊर्जेची राशी ही बदलत नसल्यामुळे (कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी) ही सर्व शोषलेली ऊर्जा रासायनिक ऊर्जेत परिवर्तित होत असावी. (असे होत नसल्यास "ऊर्जा शोषली" या शब्दाचा अर्थ कळत नाही.) दर ४.२ कॅलरी शोषलेल्या ऊर्जेतून ~१ग्रॅम ग्लूकोज/सेल्युलोज/लिग्निन/लाकूड हे पदार्थ तयार होतात (लाकडाचे "सुके" वजन).

लेखात सांगितल्याप्रमाणे साधारण झाड जर ६ वर्षे जिवंत राहिले, तर
२५०*२४*३६५.२५*६ = १३१४९००० वॉट-तास इतकी ऊर्जा शोषतील.
म्हणजे ३१३०.७०४ किलो सुकलेले वजन असलेले लाकूड तयार होईल. झाडातील पाण्याचा अंश साधारणपणे ५०% असतो. म्हणजे या झाडाचे पूर्ण वजन ~६२०० किलो = ~६ मेट्रिक टन इतके असेल.

येथे झाडांचे वजन आणि त्यांचे आकारमान यांच्याबद्दल गणित दिसेल :
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2140927/pdf/725.pdf
(या अहवालात अमेरिकेतली aspen, bitternut, hickory, oak, ash, maple, cedar, hornbeam, and beech झाडे - बर्‍याच प्रकारची झाडे अभ्यासली आहेत. ही झाडे आंबा-फणस बगैरे झाडांच्या इतकी मोठी असतात.)

६ वर्षांत वाढलेले ६ टनांचे झाड शक्य असेल... खरेच? (साधारणपणे वृक्षारोपित झाडांचे वजन १०-१५ वर्षांत शेकडो किलो असते, हजारो किलो नव्हे.) तरी हे शक्य आहे, असे मानूया.

सहा (किंवा कितीका) वर्षांनी ते झाड मेल्यावरती, ही सर्व शोषलेली ऊर्जा कुठे जाईल - हा प्रश्न उद्भवतो. नाहिशी तर होणार नाही. मेलेल्या झाडाने मुक्त केलेली ऊर्जा शोषून घ्यायला एक झाड, आणि सौर ऊर्जा शोषून घ्यायला एक झाड, अशी त्यानंतर दोन झाडे लावावी लागतील.

म्हणजे हा टेरावॉट स्थायी स्वरूपात वाचवण्यासाठी पहिल्या वर्षी मला १ झाड लावावे लागेल, सहाव्या वर्षी २ झाडे लावावी लागतील, बाराव्या वर्षी चार झाडे लावावी लागतील, (बुद्धिबळाच्या पटाच्या एका चौकोनावर तांदळाचा एक दाणा, पुढच्या चौकोनावर दोन दाणे, पुढच्यावर चार... असे करता करता पट पूर्ण करण्यासाठी जगातले तांदूळ पुरणार नाहीत - हे गणित आपण सर्वांनी शाळेत केलेलेच असेल.)

झाडे लावली पाहिजेत, हा लेखातील मुद्दा पटतो आहे. पण ऊर्जेचे गणित काही केल्या लक्षात येत नाही आहे.

(दिवसा शोषलेली ऊर्जा काही प्रमाणात रात्री जाळून झाडे पुन्हा वातावरणात पसरवतात. बाकी रासायनिक ऊर्जा तेवढी झाडाचे वस्तुमान वाढवते. झाडे वस्तुमानाने वाढत नसली, तर "नेट" ऊर्जा मुळीच शोषली जात नसते. ऊर्जेच्या गणितामध्ये हे मुद्दे न आल्यामुळे काही हिशोब चुकले असतील का? अशी शंका येते आहे.)

- - -
झाडाने शोषलेल्या रासायनिक ऊर्जेचे गणित : आणखी एक उपयुक्त पीडीएफ दुवा
- - -

भारत, चीन, आफ्रिकन राष्ट्रांनी तरी आधुनिकीकरण करून अधिकाधिक शिक्षण, आरोग्य व समृद्धी यावर भर दिला पाहिजे.

सहमत.

("भर" म्हणजे अंदाजपत्रकाच्या/जीडीपीच्या किती टक्के? "समृद्धी" हे अंदाजपत्रकीय खाते नाही, मात्र शिक्षण आणि आरोग्य ही खाती आहेत. या खात्यांवर अंदाजपत्रकांत १००%, ८०%, ५०%...५%... नेमका किती खर्च केला तर "भर दिला" असे आपल्याला म्हणता येईल? याची योग्यता कशी ठरवावी? जर या दोन-तीन खात्यांवर १००% पेक्षा कमी खर्च अंदाजपत्रकात असला, तर उरलेल्यापैकी काही ऐवज पर्यावरणावर खर्च केल्यास हरकत नाही ना? पर्यावरणाच्या बाबतीत सुयोग्य हलका भर असलेली जीडीपीची टक्केवारी किती? ०.००१%, ०.०१%, ०.१%, १%, १०%... याची योग्यता कशी ठरवावी? हल्ली पर्यावरणावरती जीडीपीची किती टक्केवारी खर्च होते आहे?)

लेखाच्या एका भागात आकडे देऊन गणित दिलेले आहे, तर पुढच्या भागात आकडे नसलेली विधाने आहेत. त्यामुळेसुद्धा लेखाचा हा भाग समजायला मला कठिण जातो आहे.

नितिन थत्ते's picture

4 Apr 2010 - 2:31 pm | नितिन थत्ते

लेखातल्या मूळ भावनेशी सहमत आहे. झाडे जेव्हा ऊर्जा शोषतात तेव्हा त्या ऊर्जेचे रूपांतर काही प्रमानात वस्तुमानात (आईनस्टाईनच्या प्रसिद्ध समीकरणानुसार), काही प्रमाणात रासायनिक ऊर्जेत, काही प्रमाणात झाडाचे तापमान वाढण्यात आणि उरलेली झाडाच्या पानातल्या पाण्याची वाफ होण्यात खर्च होईल. याचे एकमेकांशी प्रमाण काय आहे हे माहिती नाही.

धनंजय यांनी जे गणित केले आहे ते मला कळते नाही.

तसेच ज्या प्रमाणात ऊर्जा झाडाचे तापमान वाढण्यात वापरली गेली ती ऊर्जा रात्री उत्सर्जित होईल आणि झाडाचे तापमान सकाळी पुन्हा पूर्ववत होईल.

म्हणजे झाड २५० वॅटची ऊर्जा कायमस्वरूपी शोषून घेईल हे म्हणणे बरोबर नाही.
धनंजय यांच्या काही शंकांची उत्तरे:
झाडाचे आयुष्य ६ वर्षे धरायला नको. आंबा , चिंच, पिंपळ यांसारखी झाडे लावूया.
झाड मेल्यावर त्यातली ऊर्जा लगेच मुक्त होणार नाही. ती रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात साठून राहील जोपर्यंत ते नष्ट केले जात नाही. (जाळून किंवा कुजून). त्याचे फर्निचर बनवल्यास कदाचित तेवढ्या ऊर्जेचा कायम स्वरूपी बंदोबस्त होईल.

पण आंबा चिंच वगैरे झाडांची उंची फार तर तीन मजल्यांएवढी असेल त्यामुळे इमारतींवर सावली पडल्यामुळे थंडावा राहून एसी वगैरे ऊर्जा वाचणार्‍या सेकंडरी फायद्यासाठी या झाडांचा फार उपयोग नाही. त्यासाठी मनिप्लॅट वगैरे सारके वेल गच्चीतून खाली सोडायला हवे.

आणखी प्रतिसाद नंतर अजून थोड्या आकडेमोडीनंतर देईन.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

धनंजय's picture

4 Apr 2010 - 7:40 pm | धनंजय

सौर (वस्तुमान नाही) -> रासायनिक (~१ ग्रॅम/४.२ किलोकॅलरी इतके ग्लुकोजचे वस्तुमान)

लाकूड मोठ्या प्रमाणात पाणी आणि ग्लुकोज/सेल्युलोज/लिग्निन असते.

१ वॉट-तास -> ०.२ ग्रॅम ग्लुकोजचा नेट नवनिर्माण

एक टेरावॉट सौर ऊर्जा -> दर ताशी ०.२ टेराग्रॅम ग्लुकोजचा नवनिर्माण. हे सगळे वस्तुमान कुठे राहाणार आहे, त्याचा हिशोब केला पाहिजे.

जर प्रत्येक झाड २५० वॉट (सरासरी) सौर ऊर्जा शोषत असेल, तर दर ताशी त्या झाडाचे वजन (सरासरी) ५० ग्रॅम ग्लुकोज + त्याला धरून ठेवण्यासाठी ५० ग्रॅम पाणी = १०० ग्रॅम वाढत असले पाहिजे. नेट वाढ १०० ग्रॅम.

अशी झाडे मला दाखवा. सहा वर्षे नको? पन्नास वर्षे वाढणार्‍या आंब्याच्या झाडाचे वजन दर ताशी १०० ग्रॅम वाढले, तर त्या झाडाचे वजन ४४ मेट्रिक टन इतके होईल.

ज्या अर्थी अशी महाकाय झाडे सहसा आपल्याला दिसत नाही, त्याअर्थी सामान्य झाड सौर २५० वॉट शोषून नेट रासायनिक ऊर्जेमध्ये बदलते हे गणित भलतेच चुकलेले असले पाहिजे.

सहा वर्षांचा हिशोब कशाकरिता? लेखात केला आहे म्हणून. आंबा-फणस कुठलेका झाड असले, तरी ते जेव्हाकेव्हा मरेल, तेव्हा त्यातली रासायनिक ऊर्जा कुठे जाणार आहे? झाड जळू-कुजू नये म्हणून काय करावे? प्रतिमाणशी एक महाकाय झाडाचे फर्निचर - एवढे सगळे फर्निचर कुठे ठेवावे? नवीन फर्निचरसाठी जागा करण्यासाठी जुन्या फर्निचरला मोडीतही घालता येत नाही - ते जळेल किंवा कुजेल!

- - -

झाडांची लागवड करावी, हे योग्यच. पण ऊर्जेचा हिशोब वॉट-तासांत केल्यास बरा.

वरच्या लेखात वॉटमध्ये हिशोब केल्यामुळे अनंत काळापर्यंत बेसुमार ऊर्जा वाचल्याचे चुकीचे गणित होते आहे.

नितिन थत्ते's picture

4 Apr 2010 - 8:24 pm | नितिन थत्ते

२५० वॅट हे अ‍ॅवरेज इन्सिडंट रॅडिएशन आहे. ते सगळेच्या सगळे शोषले जाईल असे घासकडवी समजतायत ते चूक आहे. हिरव्या रंगाची जी शोषणक्षमता असेल त्यानुसार शोषली जाईल.
पुन्हा ती सगळी रासायनिक ऊर्जेत रूपांतरित होईल असे समजून तुम्ही ग्रॅम काढताय. माझ्यामते त्यातली खूपशी (५०% हून अधिक? नुसता अंदाजपंचे गेस आहे. उन्हाळ्यात वणवे पेटतात यावरून केलेला) झाडाचे तापमान वाढण्यात उपयोगी येईल. ती पुन्हा रात्री उत्सर्जित होईल . काही झाडातल्या पाण्याची वाफ होण्यासाठी जाईल. म्हणजे शोषली जाऊन रासायनिक ऊर्जेत रूपांतर होणारी ऊर्जा सरासरी २५० वॅट पेक्षा खूप कमी असेल. त्यामुळे तुम्ही जी वस्तुमान वाढ काडताय ती बरीच कमी असेल.

(अवांतर : ६ अब्ज लोकांच्या अंगातून बाहेर पडणारी डिसिपेट होणारी ऊर्जा सरासरी अर्धा टेरावॅट असते असे माझे गणित आहे)

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

(केस ओढून काढणारी स्मायली)

वरील गणित हे "रेडुक्सियो आड आब्सुर्डुम" हे आहे.

२५० वॅट हे अ‍ॅवरेज इन्सिडंट रॅडिएशन आहे. ते सगळेच्या सगळे शोषले जाईल असे घासकडवी समजतायत ते चूक आहे. हिरव्या रंगाची जी शोषणक्षमता असेल त्यानुसार शोषली जाईल.

वरील लेखात २५० वॉट शोषली जाईल असे गणित आहे. ते चुकलेले आहे, असे दाखवण्यासाठी त्यातून बनलेल्या लाकडाचे वस्तुमान सांगितले आहे. ते वस्तुमान अ‍ॅबसर्ड आहे. म्हणून २५० वॉट पावर शोषली जात नाही, असा निष्कर्ष आहे.

(तुमचे म्हणणे बरोबर आहे. बहुतेक इन्सिडेंट ऊर्जा शोषली जात नाही. मग कुठे बरे जात असेल?)

पुन्हा ती सगळी रासायनिक ऊर्जेत रूपांतरित होईल असे समजून तुम्ही ग्रॅम काढताय. माझ्यामते त्यातली खूपशी (५०% हून अधिक? नुसता अंदाजपंचे गेस आहे.

रासायनिक ऊर्जा आणि तापमान-वाढ यांच्यापेक्षा वेगळी कुठली ऊर्जा आहे? (तापमान वाढीतली बहुतेक ऊर्जा पृथ्वीवरून रेडियेशन रूपाने बाहेर पडते.) २५० वॉट पावर इतकी तापमान-वाढ-ऊर्जा-सोडून अन्यत्र जाईल असे काहीसे लेखातील गणित आहे, म्हणजे ती सर्व रासायनिकच ना. की यावेगळा कुठला प्रकार आपल्याला माहीत आहे? २५० वॉट रासायनिक ऊर्जा हे मी अ‍ॅबसर्ड म्हणून दाखवले आहे. झाडावर पडणारी जवळजवळ सगळी ऊर्जा रासायनिक न होता तापमान-वाढीतच जाते, असे लेख नव्हे तर तुम्ही म्हणता - तुमच्याशी सहमत. (रासायनिक परिवर्तन न-झालेली इन्सिडेंट ऊर्जा तापमान-वाढीतच जाते असे तुम्हीही म्हणता ना? का ऊर्जेचा दुसरा कुठला प्रकार आपल्याला माहीत आहे?)

म्हणजे शोषली जाऊन रासायनिक ऊर्जेत रूपांतर होणारी ऊर्जा सरासरी २५० वॅट पेक्षा खूप कमी असेल. त्यामुळे तुम्ही जी वस्तुमान वाढ काढताय ती बरीच कमी असेल.

मस्त! हेच तर सांगतो आहे. "कित्येक टन" वस्तुमान अ‍ॅबसर्ड आहे. वस्तुमान निरीक्षणातून बघता येते. समान्य झाडांचे वस्तुमान फक्त शेकडो किलो असते. हे शेकडो किलो आगीत जळून जितकी ऊर्जा निघेल, तितकीच सौर ऊर्जा झाडाने आयुष्यभरात नेट शोषली आहे. (हे मात्र कन्झर्वेशन कायद्यामुळे तंतोतंत बरोबर आहे, अंदाजपंचे नाही.)

लेखातील टेरावॉटचा अंदाज फारफार चुकलेला आहे - कारण हिशोब अंदाजपंजे ठीक असता तर महाकाय झाडे आपल्याला दिसती. टेरावॉटचा हिशोब कदाचित शंभरपटीने चुकलेला असू शकेल.

नितिन थत्ते's picture

4 Apr 2010 - 9:55 pm | नितिन थत्ते

ओके. :)
तुमचा रोख लक्षात आला नव्हता. आता तो आला.

>>रासायनिक परिवर्तन न-झालेली इन्सिडेंट ऊर्जा तापमान-वाढीतच जाते असे तुम्हीही म्हणता ना? का ऊर्जेचा दुसरा कुठला प्रकार आपल्याला माहीत आहे

मी झाडाच्या पानातील पाण्याचे बाष्पीभवन हा ही ऊर्जाव्ययाचा एक मार्ग समजतो. तो तापमानवाढीपेक्षा वेगळा आहे असे वाटते.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

sur_nair's picture

4 Apr 2010 - 8:05 pm | sur_nair

गणित वगैरे सोडा पण प्रगतीसाठी माणसाने बेसुमार वृक्षतोड केली आहे हे खरे. याउलट वाढीव लोकसंख्या त्यामुळे उर्जेचा वाढीव वापर हेही तितकेच खरे. ग्लोबल वार्मिंग थांबवण्यासाठी निरनिराळे अतिखर्चिक आणि कधी कधी चमत्कारिक उपाय शास्त्रज्ञ सुचवतात. त्यापेक्षा झाडे लावणे हा एक सोपा उपाय आहे. त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही हे १००% खरे. शिवाय मातीची झीज (soil erosion ) झाडांमुळे थांबते. आणि महत्वाचे म्हणजे डोळ्यांना सुखद. अमेरिकेत घराभोवती झाडे लावणे सक्तीचे आहे पण भारतात असा नियम पाळला जात नाही. हिरवं पुणे आता सिमेंटच राखाडी / पांढरा पुणे झालाय. फर्ग्युसन रस्त्यावरची दोन वडाची झाडे तुटली तेव्हा जी हळहळ मनाला झाली ती सांगता येत नाही.

शुचि's picture

5 Apr 2010 - 5:40 am | शुचि

>>फर्ग्युसन रस्त्यावरची दोन वडाची झाडे तुटली तेव्हा जी हळहळ मनाला झाली ती सांगता येत नाही>>
नायर साहेब मला आपल्या भावना समजल्या. पुण्यात माझ्या घरापाशी कडूलिंबाचं झाड होतं. ते तोडायची बंदी म्हणून या वृक्षतोड करणार्‍यांनी त्या झाडाची *फक्त* साल काढली. अर्थात ते झाड झीजून झीजून मेलं हे वेगळं सांगायची गरज नाही. आम्हाला सर्वांना खूप वाईट वाटलं. प्रत्येकानी १ झाड (वृक्ष) लावावा असं वाटतं. मी अजून लावला नाहीये :(
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
But the moon is death.
Its cold rocks fill my belly as if I had
swallowed song of birds
and awakened in a tree.

नितिन थत्ते's picture

4 Apr 2010 - 8:29 pm | नितिन थत्ते

मुळात गंडलेलं गृहीतक.

माझ्या मते ग्लोबल वॉर्मिंग आपण वापरत असलेल्या २० टेरावॅट मुळे नसून वाढलेल्या कार्बन डाय ऑक्षाईड आदि वायूंमुळे आहे. त्यामुळे सुनार लोहारचं उदाहरण सयुक्तिक नाही.

हिशोब झाड किती कार्बन डायोक्साईड शोषू शकते आणि किती शोषण्याची गरज आहे (आपण किती कार्बनडायोक्साईड रोज बनवतोय) याचा करायला हवा आणि त्यानुसार झाडे किती लावायची ते ठरवायला हवे.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

राजेश घासकडवी's picture

5 Apr 2010 - 12:22 am | राजेश घासकडवी

माझ्या मते ग्लोबल वॉर्मिंग आपण वापरत असलेल्या २० टेरावॅट मुळे नसून वाढलेल्या कार्बन डाय ऑक्षाईड आदि वायूंमुळे आहे.

हे बरोबरच आहे. वीस व पावणेदोन लाख हे आकडे मनुष्याच्या एकंदरीत साधक बाधक शक्तीचा अंदाज देण्यासाठी आहेत. कार्बन् वाढला की पृथ्वीची परावर्तन शक्ती कमी होते. तो वाढण्यात या २० टेरावॉटचा थोडा हातभार आहे. तो कमी करणारी झाडं तोडण्याचाही आहे. नक्की किती हे विवाद्य आहे. (औद्योगिक क्रांतीनंतर जगाचा लागवडीखालचा - जंगलं व शेतं धरून - भाग किती कमी झाला किंवा हिरवा बायोमास किती कमी झाला हे शोधून काढणं रोचक ठरेल.)ऊर्जावापर कमी केला तर मनुष्यनिर्मित कार्बन् कमी होईल असा पर्यावरणाचा मुद्दा आहे.

माझ्या लेखात कार्बन् चा सोर्स (मनुष्याचा ऊर्जावापर) कमी करणं यापेक्षा सिंक (झाडं) वाढवणं हा सर्वांनाच फायद्याचा उपाय आहे असा रोख आहे. सोर्सला आळा घालण्याचा प्रयत्न नकारात्मक व सिंक वाढवणं सकारात्मक असं चित्र मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

राजेश

राजेश घासकडवी's picture

5 Apr 2010 - 12:12 am | राजेश घासकडवी

धनंजय व अनिल थत्ते यांनी जे गणित सांगितलं आहे ते बरोबर आहे. सर्वसाधारण वेली, झाडं उष्णता शोषून त्याचं लाकडामध्ये किंवा बायोमासमध्ये रूपांतर करण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. पानांवर पडणारी बरीच उष्णता परावर्तितच होते याबद्दल वाद नाही. माझ्या लेखात मी 'शोषली जाणं' हा शब्दप्रयोग वापरून या गोंधळात भर टाकली याबद्दल क्षमस्व.

याचा अर्थ माझं गणित चुकलं असा नाही. २५० वॅटचं जे गणित आहे, ते उष्णता पूर्णपणे झाडात शोषली जाईल यावर आधारित नाही.
ती उष्णता घरात येणार नाही यावर ते आधारित आहे. प्रत्यक्ष सूर्याची इन्सिडेंट शक्ती कमी करून ग्लोबल वार्मिंग करण्याची ही पद्धत नाही. पावणेदोन लाखात एकाने काही फरक पडत नाही. पण घरात येणाऱ्या उष्णतेमुळे तिचा प्रतिकार करण्यासाठी मनुष्य जी वीज वापरतो ती कमी करण्याची ही पद्धत आहे. ती वीज कमी झाली की त्यासाठी इंधनं जळणं कमी होईल, व त्यायोगे वातावरणात जाणारा कार्बन् कमी होईल - अशा आडवळणी मार्गाने हा उपाय जातो.

या विशिष्ट मार्गात ती उष्णता झाडात शोषली किंवा परावर्तित झाली याने फरक पडत नाही. हाच परिणाम झाडांऐवजी परावर्तक पडदे लावल्यानेही होईल. पण मग ते खूपच तांत्रिक उत्तर होईल, व अशी बिनहिरवी उत्तरं समाजमनाला तितकीशी भावत नाहीत. :)

मात्र जागतिक पातळीवर ग्लोबल वार्मिंग कमी करायचं असेल तर तेसुद्धा सूर्याची उष्णता नुसती शोषून घेऊन साधणार नाही. हवेतला कार्बन् शोषणारी झाडे लावायची व त्यायोगे ग्रीनहाऊस परिणाम कमी करायचा व अधिक उष्णता अवकाशात परावर्तित करायची हे उत्तर आहे. मी दिलेला घरगुती उपाय हा त्याच धर्तीचा पण थोड्या भिन्न प्रकारचा आहे.

पर्यावरणासारख्या क्लिष्ट विषयाची गणितं करणं, त्यामागची गृहितकं समजावून घेणं, त्यांचा योग्य अर्थ लावून त्यातून निष्कर्ष काढणं किती कठीण असतं हेही या लेखमालेत दाखवून द्यायचं आहे.

राजेश

झाडाच्या गुणवत्तेवरसुद्धा हे गणित वेगवेगळे आकडे देवु शकेल. उदा. पिंपळ, कडूलिंब, तुळस यांचे प्राणवायु देण्याचे प्रमाण वेगळे आहे त्यावरुन त्यांची उर्जा घेण्याचे प्रमाणही कमी-जास्त असु शकते, असे मला वाटते.
जर पिंपळ हे २४ तास प्राणवायु देणारे झाड आहे (ऐकीवात आहे). तर अशाप्रकारची झाडे लावण्याने नक्कीच ’कार्बन’ कमी होण्यास मदत होईल.
पण, जर मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड केली तर आपल्याला पृथ्वीला वाचवता येईल. हे ’तुम्ही अभ्यास केला तर तुमचा परिक्षेत प्रथम क्रमांक येईल’ असे म्हणण्यासारखे आहे.
असो लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण.

अवांतर: गेल्या वर्षी एका खेड्यातील सदगृहस्थाने त्याच्या लहान मुलीचा वाढदिवस आलेल्या सर्व छोट्या पाहुण्यांना रोपटी देऊन साजरा केला होता कुठल्यातरी मराठी न्युज चॅनलवर पाहिले होते.

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें.

विकास's picture

6 Apr 2010 - 2:23 am | विकास

या लेखातील झाडे लावावीत या मताशी कोणीच असहमत होईल असे वाटत नाही. पण त्या मुद्याकडे वळण्याआधी थोडे लेखातील काही विधानांबाबतः

हे झालं पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवजातीचं चित्र. अर्थातच अतिरंजित आहे, पण त्यात तथ्यही नाही असं नाही.

सर्वप्रथम पर्यावरणासंदर्भातील अनेक धोरणे ही पर्यावरणवाद्यांमुळे घेतली जात नाही आहेत तर त्यात असलेल्या शास्त्रीय अभ्यासामुळे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न आला की लगेच सर्व पर्यावरणवाद्यांच्या उरावर घालणे पण अतिरंजीत वाटते.

शहरीकरणात रम्य बालपण हरवलेल्या, कॉंक्रीटच्या जंगलात घुसमटणाऱ्या व आपण आपली मुळं विसरलो अशी अपराधी भावना असणाऱ्या आपल्या मनाला हे चटकन पटतं, आकर्षक वाटतं.

एक प्रश्न विशेष करून अमेरिकास्थित भारतीयांना: आपल्यातील किती जणांना शहरात राहणे आवडते आणि कितीजण सबअर्ब अर्थात शहरापासून लांब उपनगरात रहातात? अमेरिकेतील शहरीकरण हे बर्‍याचदा जागेची मर्यादा सोडल्यास सुसह्य असते, तरी देखील तेथे रहाण्याचा कल नसतो. ज्यांना (भारतात आणि इतरत्र) शहरीकरणात गर्दीत वगैरे रहावे लागते त्यांना घुसमटण्यामुळे अपराधी भावना नसते तर त्रागा असतो.

त्यात ही सगळ्या जगाची सरासरी आहे, व इतर प्रगत देश भारताच्या कितीतरी पट अधिक वीज करतात. शिवाय काही भाग अप्रत्यक्षपणे उत्पादनासाठी वापरलेल्या विद्युत ऊर्जेत सामावलेला आहे.

या सरासरी संदर्भात जागतीक बँकेचा (इंटरनॅशन एनर्जी एजन्सीच्या सहकार्याने) खालील आलेख बघण्यासारखा आहे. त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान हे प्रगत देश मूलभूत उर्जेचा वापर किती करतात आणि ब्रिक देश (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) किती करतात तसेच सारे जग किती करते हे समजेल. त्यात जर त्या त्या देशाच्या शिरगणतीप्रमाणे, क्षेत्रफळाप्रमाणे, अर्थव्यवस्थेप्रमाणे पाहीले तर अनेक गोष्टी समजू शकतील... तुर्तास कौन कितने पानी मे हे समजण्यासाठी इतकेच दाखवत आहे.

Data source: World Bank, World Development Indicators - Last updated March 1, 2010

वरील मुल्यमापन तसेच या संदर्भात कोण किती प्रदुषण आजही करत आहे, याची माहीती वाचल्यास, "पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आधी हे प्रश्न सोडवावे लागतील. अगदी पूर्णपणे नाही, पण निदान अमेरिकेत आत्ता ज्या पातळीपर्यंत सोडवले गेले आहेत तिथपर्यंत तरी. " हे आपले वाक्य फारच विनोदी वाटते. असो.

तेव्हा काहीही करून कार्बन् कमी केला पाहिजे. त्यासाठी ऊर्जावापर कमी केला पाहिजे.
उर्जा वापर कमी करणे याचा अर्थ वीजकपात करणे असा नाही आहे तर उर्जेचे व्यवस्थापन करणे हा आहे. ज्याचा फायदा केवळ पर्यावरणासच होत नसून उद्योगांच्या बाबतीत म्हणाल तर भागधारकांना (स्टेकहोल्डर्स ज्यात शेअरहोल्डर्सपण येतात) पैशाच्या व्यवस्थापनामुळे पण होतो. हे वास्तव आहे. म्हणूनच किती उर्जा (टेरावॅट मधे) वाचते हे महत्वाचे नसून किती कमी उर्जा ही कार्बन डाय ऑक्साईड्चे उत्सर्जीकरण न होता तयार केली गेली यात आहे अथवा कमीत कमी उर्जेत जास्तीत जास्त काम कसे करता येते यात आहे. याचे उदाहरण म्हणजे व्हाईट समोरील "नॅशनल ख्रिसमस ट्री". हे झाड, ख्रिसमसच्या हंगामात १८००० वॅट्स उर्जा जाळायचे. आता जीईच्या लाईट एमिटींग डायोड (एलईडी) च्या दिव्यांनी त्याच झाडाची त्याच काळासाठीची उर्जेची गरज ही ६००० वॅट्स झाली. त्यामुळे वास्तवात पुढील गणिते की किती (खर्‍या) झाडांनी (ख्रिसमस ट्री नाही) किती टेरावॅट उर्जा वाचते वगैरे पटली नाहीत.

ग्लोबल वॉर्मिंग होतं ते मुख्यत्वे सूर्यामुळे असं म्हटलं तर त्यात काही गैर नसावं.

गैर नसावे नाही, गैरच आहे. सुअलभीकरण करून बोलायचे झाल्यास, विचार करा: एका हॉलची किती लोक असू शकतात याची मर्यादा जर १०० असली, पण तेथे १०० च्या ऐवजी ३०० माणसे बसली, तर त्यातून निर्माण होणार्‍या कार्बन डाय ऑक्साईड वायूने काय होईल? मग एचव्हीएसी यंत्रणा कितीही योग्य असली तरी ती पुरेशी ठरेल का? आजचा जागतीक प्रश्न याच संदर्भात आहे. या संदर्भात खालील आलेख बघण्यासारखा आहे:


Fluctuations in temperature (red line) and in the atmospheric concentration of carbon dioxide (yellow) over the past 649,000 years. The vertical red bar at the end is the increase in atmospheric carbon dioxide levels over the past two centuries and before 2007.

म्हणूनच वरील लेखातील, "पहिल्या परिच्छेदात पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवाचं 'आपल्या स्वार्थापायी पृथ्वीची वाट लावणारा' असं विकृत चित्र बघितलं", "विकृत" हा शब्द खटकला.

आता परत मुळच्या मुद्यावर येऊया; "वृक्षवल्ली आम्हा सोयरी..."

सुरवातीस म्हणल्याप्रमाणे झाडे अधिक लावणे आणि त्याचे उपयोग याला पूर्णपणे पाठींबा किमान तुकारामापासून आपण समाज म्हणून देत आहोत असे समजायला हरकत नाही. ;) मात्र त्याचा संदर्भ हा उर्जेच्या गणिताशी प्रत्यक्ष नाही आहे. या संदर्भात थोडासा अनुभवः

इपिएच्या अनुदानाने या संदर्भात मी बॉस्टनजवळील समरव्हील नामक पूर्णपणे शहरी भागाचे शास्त्रीय आणि व्यवस्थापकीय दृष्टीकोनातून संशोधन केले होते. (हे संशोधन अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हील इंजिनयर्सने प्रसिद्ध देखील केले होते. शिवाय इतरत्र ही ते वापरले गेले होते. असो.) त्यात अनेक गोष्टी होत्या. फक्त एकच या सदंर्भातील गोष्ट येथे सांगतो: समरव्हील हा शहरी आणि (अमेरिकेच्या मानाने) घनदाट लोकसंख्येचा भाग असल्याने येथे एकंदरीत झाडे कमी आहेत असे वाटत होते. तरी हे शहर "ट्री सिटी युएसए" म्हणून फेडरल सरकारच्या प्रोग्रॅममधे जाहीर झालेले आहे. मग आम्ही उपग्रहाद्वारे थंडीत (पानगळीनंतरची) आणि वसंतऋतुतील छायाचित्रे घेतली. आणि आर्कजिआयएस तसेच काही विशिष्ठ संगणकीय प्रोग्रॅम्स वापरून या शहरात हिरवळ किती असते याचे दहा विभागात तसेच पूर्ण शहराचे एकत्रीत असे विश्लेषण केले. त्यातील पूर्ण शहराचे उत्तर थोडक्यात असे:

  • १८% झाडे,
  • ४८८.१ एकर वृक्षाच्छादीत,
  • एकूण कार्बन स्टोअरेज - २४,२२७.०९टन्स
  • सांडपाणी प्रदुषणातून वाचवलेले: ४,३१५,०३९ क्युबिक फीट
  • कमी झालेले हवेचे प्रदुषण ५०,६८९ पाउंड्स
  • वगैरे

हे सर्व विश्लेषण करताना वर धनंजय आणि नितीन यांनी म्हणल्याप्रमाणे, या भागातील झाडे, या भागातील हवामान, भौगोलीक तसेच औद्योगीक परिस्थिती, आदी गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या.

एका अभ्यासाप्रमाणे अशा प्रकारच्या शहरात २५% झाडे हवीत. त्यामुळे ७% कमी आहेत ही वस्तुस्थिती समजली. या संशोधनाचा उपयोग हा झाडे पुढे लावावीत का नाही या संदर्भात झाला. तरी देखील एक वेगळीच समस्या अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे लावण्यासंदर्भात आली: अमेरिकन डिसअ‍ॅबिलीटी अ‍ॅक्ट! त्या प्रमाणे जितके अंतर झाड आणि कुठल्याही प्रॉपर्टीच्या बांधापर्यंत हवे त्यापेक्षा ते कमी अंतर होऊ लागले. :(

त्या व्यतिरीक्त अजून एक अनुभव; मोठे सरकार छोट्या सरकारांना झाडे लावायला पैसे देते पण त्याची निगराणी करायला नाही. परीणामी त्याची जी लाखांच्या घरातील किंमत असते तो एक मोठा प्रश्न होतो. (अर्थात तरी देखील येथे स्थानीक सरकारे झाडे लावतात).

या संशोधनात अजून एक गंमतशीर गोष्ट म्हणजे वृक्षच्छादीत नसलेला जो भाग होता, तो सार्वजनीक नसून लोकांच्या घरामागील होता. का? कारण येथे घनदाट वस्तीमुळे गाड्या ठेवायला जागा जास्तीत जास्त करण्यासाठी अगदी कायद्यापुरती माती असलेली जमीन ठेवून उरलेले अनेकांनी काँक्रीटीकरण केले/करावे लागले...

आता तुमचा राग असलेले अनेक पर्यावरणवादी सध्या मागे लागले आहेत की ग्रीन रूफस सर्वत्र करा. त्याने उर्जा वाचेल, उन्हाळ्यात एसी कमी लागेल वगैरे... सर्व खरे आहे, पण स्ट्रक्चरल इंजिनियरींगचा विचार केल्यास अनेक घरांची छपरे अशी हिरवळ डोक्यावर ठेवूच शकत नाहीत हे वास्तव आहे. पण ते समजावणे अवघड जागेचे दुखणे होते....

असो. थोडक्यात तपमान बदलाच्या जगात, झाडे हे एक उत्तर आहे पण पूर्ण उत्तर नाही. तसेच जागतिक तापमान वृद्धीचे कारण हे नुसते नैसर्गिक म्हणणे आणि स्वतःची (माणसाची) जबाबदारी झटकणे हे काही पटत नाही.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

राजेश घासकडवी's picture

6 Apr 2010 - 8:04 am | राजेश घासकडवी

सर्वप्रथम तपशीलवार आकडेवारी व आलेख दिल्याबद्दल धन्यवाद. चित्र स्पष्ट होण्यासाठी संदिग्ध शब्दांऐवजी आकडे खूप उपयोगी असतात.

पण माझ्या विधानांविषयी तुमच्या मनात काही गैरसमज झालेले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतो.

१. पर्यावरणवाद्यांवर माझा सरसकट राग नाही. त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे. फक्त माझा मुद्दा असा आहे की पर्यावरणाचा विषय वाटतो तितका गंभीर नाही - किंवा त्याहूनही कितीतरी पटीने अधिक गंभीर विषय आहेत. ते सोडवल्याशिवाय पर्यावरणाचा मुद्दा हाती घेणं इष्ट नाही.

'आपल्या स्वार्थापायी पृथ्वीची वाट लावणारा' असं विकृत चित्र बघितलं", "विकृत" हा शब्द खटकला.

२. तुम्ही दाखवलेल्या आलेखातच दर लाख वर्षांनी जवळपास चक्रीय पद्धतीने तापमान ३ अंशानी वर जातं व खाली जातं. आणि तुम्ही फक्त चार आवर्तनं दाखवली आहेत, पृथ्वीचं आयुष्य याच्या दहा हजार पट आहे. मानवाची जबाबदारी टाळायची नाही, पण नैसर्गिक व मानवनिर्मित दोन्ही कारणांचा सहभाग आहे, व त्यांचं प्रमाण कोणालाच माहीत नाही.

३. पृथ्वीची वाट वगैरे काही लागलेली नाही. वाट लागलेली बघायची तर ६५ मिलियन वर्षांपूर्वी जेव्हा एक दगड आपटला तेव्हाचं चित्र बघा. जवळपास सगळ्या प्रजाती नष्ट झाल्या. तंत्रप्रगत माणूस असा दगड आपटणं टाळू शकेल. त्याबद्दल त्याला काही क्रेडिट द्यायला नको का? ते कोणी देत नाही.

४. ग्लोबल वॉर्मिंग सूर्यामुळेच होतं. त्याची किती ऊर्जा परावर्तित होते हे अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे कार्बन् च्या हवेतल्या प्रमाणामुळे ठरतं. तुमच्या आलेखातूनच ते गेल्या पंधरा हजार वर्षांत वाढलेलं दिसतं. ते काही सगळंच मानवाने केलेलं नाही. निसर्गचक्राप्रमाणे ते बरंचसं झालेलं आहे.

५. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेइतकी समृद्धी, संपन्नता, सुशिक्षितपणा, आरोग्य हे झाल्याशिवाय पर्यावरणाचा प्रश्न निकडीचा होत नाही असं माझं मत आहे. अमेरिकेने त्यासाठी वापरलेली ऊर्जा जरी त्यासाठी लागली तरी काही हरकत नाही. ती ऊर्जा वापरल्याने काही प्रश्न निर्माण होतील ते नंतर सोडवू. अशीच प्रगती होते.

६. झाड हे सगळ्याचंच उत्तर नाही हे मान्यच. मी झाड लावणं हे प्रतीक म्हणून वापरलं आहे. या लेखात आलेला 'झाडे लावा' हा मुद्दा खरं तर 'सकारात्मक करा' व दिवे बंद करण्यासारखं 'नकारात्मक करू नका' असा होता.

७. बोस्टनच्या अभ्यासाचा संबंध कळला नाही. किती हिरवळ/झाडी असावी हे आकडे कुठून आले माहीत नाही. पण आत्तापर्यंत बांधकाम वगैरे करताना ऊर्जेचा विचार न करता ती झाली हे पटतं. ते चित्र बदलेल असं वाटतं.

विकास's picture

6 Apr 2010 - 9:50 am | विकास

पर्यावरणाचा विषय वाटतो तितका गंभीर नाही - किंवा त्याहूनही कितीतरी पटीने अधिक गंभीर विषय आहेत. ते सोडवल्याशिवाय पर्यावरणाचा मुद्दा हाती घेणं इष्ट नाही.

Environmental impacts हे भूभागापासून ते सार्वजनीक आरोग्य ते व्यक्तिगत आरोग्य या सर्वांवर झालेले पर्यावरणीय परीणाम ह्यावर लेखमाला लिहीता येईल इतकी माहीती आहे... तुम्हाला त्यातील काहीच माहीत नाही का मान्य नाही?
तुम्ही दाखवलेल्या आलेखातच दर लाख वर्षांनी जवळपास चक्रीय पद्धतीने तापमान ३ अंशानी वर जातं व खाली जातं.

पण त्यातील शेवटचे २००६ चे तपमान हे इतर वेळेपेक्षा अधिक असलेले दिसले नाही का?

मानवाची जबाबदारी टाळायची नाही, पण नैसर्गिक व मानवनिर्मित दोन्ही कारणांचा सहभाग आहे, व त्यांचं प्रमाण कोणालाच माहीत नाही.

खालील चित्र थोडक्यात या संदर्भात माहीती सांगेल...


Modelled and observed changes in atmospheric temperature, from close to the Earth's surface to the lower stratosphere. Model results are from two sets of experiments: with "present-day" levels of atmospheric CO2 (panel a), and with present-day CO2, sulfur emissions, and stratospheric ozone depletion (panel b ). They are given as changes relative to a pre-industrial state of the atmosphere. Observed changes (panel c) are temperature trends over the period 1963 to 1988, as estimated from weather balloons. All results are for annually averaged data and are in units of°C (panels a, b ) and°C/25 years (panel c ). The patterns of change in panels b and c are similar.

त्याबद्दल त्याला काही क्रेडिट द्यायला नको का? ते कोणी देत नाही.

या वाक्याला सिद्ध करणारा काही विदा आहे का? माझ्या मते अगदी पर्यावरणवादी पण अधुनिक विज्ञानाला कमी लेखत नाहीत.

ग्लोबल वॉर्मिंग सूर्यामुळेच होतं. त्याची किती ऊर्जा परावर्तित होते हे अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे कार्बन् च्या हवेतल्या प्रमाणामुळे ठरतं.

वरील दोन्ही वाक्य ही mutually exclusive आहेत. जर कार्बनच्या (आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे इतर जे काही असेल ते) हवेतील प्रमाणाने उर्जा परावर्तीत होणे ठरणार असेल तर ग्लोबल वार्मिंग हे सूर्यामुळे होते हे कसे ठरते? आता जसे सृष्टीचा निर्माताच सूर्य म्हणल्यावर ग्लोबल वार्मिंगला पण त्याला जबाबदार ठरवायचे असेल तर गोष्ट वेगळी. बाकी ग्लोबल वार्मिंगला कारणीभूत असलेला ग्रीनहाऊस गॅस इफेक्ट, हा खालील चित्रात छान समजावून सांगितला आहे असे वाटते...

माझ्या दिलेल्या आलेखाप्रमाणे इसवीसनानंतर जोरात प्रमाण वाढलेले आहे.

पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेइतकी समृद्धी, संपन्नता, सुशिक्षितपणा, आरोग्य हे झाल्याशिवाय पर्यावरणाचा प्रश्न निकडीचा होत नाही असं माझं मत आहे. अमेरिकेने त्यासाठी वापरलेली ऊर्जा जरी त्यासाठी लागली तरी काही हरकत नाही. ती ऊर्जा वापरल्याने काही प्रश्न निर्माण होतील ते नंतर सोडवू. अशीच प्रगती होते.

वरकरणी मुद्दा पटण्यासारखा वाटला तरी त्यात जगातील ७०-८०% नैसर्गिक साधनसंपत्ती अमेरिकेनेच वापरली आहे, त्यामुळे तितकी साधनसंपत्ती इतरांना मिळणेच शक्य नाही. त्यात लोकसंख्येच्या मानाने विचार केला (पर कॅपिटा) तर भारताला अजूनच शक्य नाही. म्हणून वेगळ्या विचारांची गरज आहे.

झाड हे सगळ्याचंच उत्तर नाही हे मान्यच. मी झाड लावणं हे प्रतीक म्हणून वापरलं आहे. या लेखात आलेला 'झाडे लावा' हा मुद्दा खरं तर 'सकारात्मक करा' व दिवे बंद करण्यासारखं 'नकारात्मक करू नका' असा होता.

एक तास दिवे बंद करणे हे वीज वाचवायचा प्रयत्न नव्हता तर लोकशिक्षण देण्याचा प्रयत्न होता. त्यात नकारात्मक काय?

बोस्टनच्या अभ्यासाचा संबंध कळला नाही. किती हिरवळ/झाडी असावी हे आकडे कुठून आले माहीत नाही.

आपल्या झाडांच्या उपयुक्ततेच्या संदर्भात तत्वतः झाडांचा कसा उपयोग होऊ शकतो पण वास्तवात कशा अडचणी असू शकतात (एडीए, स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी वगैरे) ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू सांगण्यासाठी बॉस्टनच्या अभ्यासाचा संदर्भ दिला.

"शास्त्रीय आणि व्यवस्थापकीय दृष्टीकोनातून संशोधन केले होते....संगणकीय प्रोग्रॅम्स वापरून या शहरात हिरवळ किती असते याचे दहा विभागात तसेच पूर्ण शहराचे एकत्रीत असे विश्लेषण केले." या दोन वाक्यातून मला वाटते समजू शकेल हे संशोधनातून निघालेल्या विदाचे विश्लेषण करून निघालेले आकडे आहेत म्हणून.

हे सगळे तुम्ही तुमचे विचार बदला हे सांगायला लिहीत नाही आहे. तर केवळ आपल्या लेखनातील जे काही शास्त्रीय माहीतीच्या आधारे पटले नाही ते इतरांना पण वाचताना समजावे या साठी लिहीत आहे. बाकी त्यातून कुणी काय अर्थ घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. असो.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

राजेश घासकडवी's picture

6 Apr 2010 - 10:26 am | राजेश घासकडवी

प्रतिसाद लेखाएवढे व्हायला लागले की लेखकाला सांगायचं बरंच बाकी आहे, किंवा जे सांगितलं आहे ते परिणामकारक सांगितलं गेलेलं नाही असं मला वाटतं. तेव्हा मी काही मोजके मुद्दे मांडतो व आपण लेखमालेच्या पुढच्या भागांत ही चर्चा चालू ठेवू.

Environmental impacts हे भूभागापासून ते सार्वजनीक आरोग्य ते व्यक्तिगत आरोग्य या सर्वांवर झालेले पर्यावरणीय परीणाम... तुम्हाला त्यातील काहीच माहीत नाही का मान्य नाही?

दर वर्षाला दशलक्षांमध्ये लहान मुलं मरतील इतका तीव्र परिणाम मला माहीत नाही. गरीबी, कुपोषण, अज्ञान, वैद्यकीय सुविधा नसणं यामुळे सध्या दर वर्षी ते होतं.

त्यामुळे तितकी साधनसंपत्ती इतरांना मिळणेच शक्य नाही.

हे पटत नाही. सूर्याचे पावणेदोन लाख मिळतात. ते वापरता येतील. आण्विक ऊर्जा आहे. तेल, कोळसे संपलेले नाहीत.

माझ्या दिलेल्या आलेखाप्रमाणे इसवीसनानंतर जोरात प्रमाण वाढलेले आहे.

आलेख नीट मॅग्निफाय करून बघा. त्यातला शून्यचा आकडा फसवा आहे, खूपच डावीकडे आलेला आहे. शून्यची रेषा आलेखाच्या उजव्या कडेपासून सुमारे पाव मिलीमीटर इतक्या अंतरावर आहे. सहा लाख वर्षाच्या क्ष अक्ष = साधारण सहा सेमी -> दोन हजार वर्षं = साधारण ०.२ मिमी. कार्बन् वाढायला सुरूवात झाली त्याबाबतचा माझा १५००० वर्षांचा अंदाज अगदीच चुकीचा नाही. शेवटचं २००६ चं आहे ते तपमान नसून कार्बन् चं प्रमाण आहे. तुमच्या आलेखाप्रमाणे तापमान सुमारे १५००० ते २०००० वर्षांपूर्वी बेफाम वेगाने वाढलं व त्यानंतर कमी होण्याच्या मार्गावर आहे. दोन शतकाचं रिझोल्यूशन त्यात नाही.

एक तास दिवे बंद करणे हे वीज वाचवायचा प्रयत्न नव्हता तर लोकशिक्षण देण्याचा प्रयत्न होता. त्यात नकारात्मक काय?

लोकशिक्षणाचा मुद्दा बरोबरच आहे. ते कसं करावं याबाबतचा मी माझा सकारात्मक मार्ग सांगितला. आता या मुद्याची पुनरावृत्ती होते आहे असं वाटतंय.

नगरीनिरंजन's picture

25 Mar 2013 - 1:18 pm | नगरीनिरंजन

दोन शतकाचं रिझोल्यूशन त्यात नाही.

त्यासाठी तुमच्या तापमानवाढ - एक पर्स्पेक्टीव्ह या धाग्यावर मी टाकलेल्या आलेखांकडे पाहा किंवा EPAच्या वेबसाईटवर मिळतीलच.
असो.

बाकी मुळात पर्यावरणाचे नुकसान माणसामुळे होतच नसेल तर समृद्धी आल्यावर ते प्रश्न सोडवू असे म्हणण्यात हशीलच काय? सर्वत्र समृद्धी आली की आपण एन्जॉय करू. अजून ५०-५५ वर्षात ते होणार म्हणजे कदाचित मी ते पाहायला नसेन एवढेच वाईट वाटते.

राजेश घासकडवी's picture

26 Mar 2013 - 6:22 pm | राजेश घासकडवी

त्या आलेखातदेखील गेल्या दहाएक लाख वर्षांत मनुष्याने काहीही न करता अचानक (सुमारे हजारेक वर्षांत) सुमारे दहा डिग्री सेंटिग्रेडने तापमान वाढलेलं अनेक वेळा दिसतं. पंधरा हजार वर्षांपूर्वीही ते अचानक सटाक्कन वाढलेलं दिसतं. कार्बन् चं प्रमाणही त्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढलं. आत्ता दिसणारी वाढ ही मानवनिर्मित आहे हे निर्विवाद सिद्ध करणारा कुठचाच विदा सापडलेला नाही.

प्रश्न नाही असा माझा दावा नाही. तो तितकासा महत्त्वाचा नाही, किंबहुना इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासारखे आहेत ते सोडवल्याशिवाय या प्रश्नाचा अभ्यास करण्यापलिकडे फार कृती करण्याची गरज नाही असं माझं मत आहे.

चित्रा's picture

6 Apr 2010 - 5:47 am | चित्रा

झाडे लावावीत - सहमत. पण उर्जेचा अतिरिक्त वापर टाळावा - हेही म्हणावे.

सहारा, गोबी, थर वाळवंटांमध्ये झाडे लावावी असे म्हटले आहे - हे मत मला पटले नाही.

मानवनिर्मित सगळेच वाईट असे म्हणण्याचे धाडस करीत नाही, पण निसर्ग सध्या जसा आहे, त्यात फार ढवळाढवळ केल्याने प्रश्नच तयार होतात हे आपल्याला सतत दिसत आले आहे. वाळवंटाचे काही एकर भाग ओअ‍ॅसिससारखे तयार करणे आणि आख्खीच्या आख्खी वाळवंटेच हिरवी करण्याची जिद्द ठेवणे यात फरक आहे, आणि करावा.

जिथे लोकांना पाणी प्यायला मिळण्याचीही मारामार आहे तिथे वाळवंटात झाडे लावणे, ती टिकवणे हे शक्य होईल का?


संपूर्ण बिल्डिंगसाठी लागणारा एसीचा खर्च व ऊर्जा यामुळे कितीतरी प्रमाणात कमी करता येईल.

त्यापेक्षा इमारतींचे प्लॅन नीट केले तर एसीचा खर्च आणि उर्जा बरीच वाचवता येते असे माझे मत आहे. पूर्वी इमारतींच्या खिडक्यांना वरच्या बाजूला मोठे छज्जे असत. http://en.wikipedia.org/wiki/Chhajja
यामुळे आत येणारी उन्हाची तिरीप आपोआप कमी होत असे. पूर्वी बर्‍याचशा शासकीय इमारतींना कॉरीडॉर (बाहेरच्या बाजूला) असत. हल्ली भारतातली ही पद्धत नाहीशी होऊ लागली आहे. तशी झाली म्हणून हरकत नाही, पण नवीन पद्धतींमध्येही विविधता आहे, आणि विचार केल्यास बर्‍यापैकी प्लॅन करता येऊ शकते असे वाटते. उदा. हल्ली नवीन पद्धतीच्या खिडक्यांमध्ये एनर्जी एफिशियंट खिडक्या मिळू लागल्या आहेत.

विकास यांनी दिलेल्या आलेखात या शतकासाठी "रेझोल्यूशन" नाही. म्हणून हल्लीच्या काळातली माहिती असलेले आलेख देत आहे.

गेल्या ११०० वर्षांमधील तापमान (स्रोत):

वार्षिक सरासरी पृथ्वीपृष्ठ तपमान (१९०१-२००० काळातले सरासरी तापमान आलेखात य-अक्षावर "०" दुवा )

कार्बन डायॉक्साइड - वेगवेगळ्या टाइमस्केलमधले आलेख

मिथेन - वेगवेगळ्या टाइमस्केलमधले आलेख

नायट्रस ऑक्साइड -

स्रोताचा दुवा.

आलेख सुक्ष्मपणे बघण्यात काही फायदा आहे - या तीन्ही वायूंचे गेल्या काही शतकांमधले प्रमाण अभूतपूर्व आहे.

मोठ्या पल्ल्याच्या आलेखात (६ लाख वर्षांचा पल्ला) कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण १८०-३०० पीपीएम इतक्या क्षेत्रात होते.
अवघ्या विसाव्या शतकात हे प्रमाण ३२०-३८० पीपीएम क्षेत्रात आहे.

- - -
सर्व आलेख यू.एस. शासकीय : प्रत-अधिकारमुक्त.

राजेश घासकडवी's picture

7 Apr 2010 - 11:09 am | राजेश घासकडवी

कार्बन्, मिथेन व नायट्रस ऑक्साइडच्या संहतीत वाढ झालेली आहे याबद्दल वादच नाही. पण ते कारण आहे, तापमान हे कार्य आहे. खरं तर तापमान हे आणखीन कारण आहे, एकंदरीत पर्यावरणात बदल होण्यासाठी. ते बदल हे कारण आहेत मानवाच्या अगर सजीवसृष्टीच्या एकंदरीत भवितव्यासाठी. आपण इतकी तीन पातळ्या खोलवरची कारणं बघून वाद घालण्यापेक्षा ज्याला सुटसुटीत भाषेत बॉटम लाईन असं म्हटलं जातं, तीकडे पहावं असं वाटतं.

प्रश्न असा आहे की कुठचे निकष लावून मनुष्यजातीची, पर्यावरणाची भलाई होतेय की बुराई, हे निरपेक्ष रीतीने ठरवायला पाहिजे. निकष बदलत राहिले, किंवा सगळंच व्यक्तीसापेक्ष राहिलं तर कशालाच काही अर्थ राहात नाही.

राजेश

शुचि's picture

7 Apr 2010 - 4:59 am | शुचि

अ‍ॅलेक्स ग्रे ह्या कलाकाराचे "पृथ्वी आणि प्रदूषण" यावरील वैयक्तीक मत आणि भाष्य पुढील चित्रात पाहू शकता -

http://www.lila.info/images/gaia_big.jpg

त्याने या चित्रावर केलेले भाष्य - त्याची आणि त्याच्या पत्नीची अ‍ॅलीसन ग्रे ची मुलगी झेना जेव्हा जन्मास आली तेव्हा त्याला वैश्वीक आत्मा गाइया हिचा दृष्टांत झाला. गाइया ही एक वातावरणात, हवेत तरारलेला एक जीवनरूपी अश्वत्थ वृक्ष असून तिची पाळंमूळं ही कणा कणात, अणू रेणूत, सूक्ष्म पातळीवरील जड पदार्थापर्यंत पोहोचली आहेत. मग त्यात आले सागर, महासागर, दगडधोंडे, डोंगर, माती, तळी, नद्या सर्व. हा जीवनरूपी अश्वत्थ वृक्ष वनस्पतींचं, सर्व प्राणीमात्रांचं पोषण करतो. गाइया च्या हृदयात प्रेमझरा आहे जो सातत्याने वनस्पती, जीवजंतू, प्राणीमात्र जन्मास घालतो. गाइया च्या खोडात जी माता आणि बालक आहे ते प्रतीक आहे भावी मनुष्य पीढीचे.

गाइयाचे अर्धे शरीर अतिक्रमण झालेले, विध्वंस झालेले हे दर्शवतं अस्तित्वात असलेले पर्यावरणाचे प्रश्न. याच अर्ध्या भागात एक रोगट, सैतानी लिंग उत्थापित अवस्थेत चित्रात दिसतं जे प्रतीक आहे अनेकानेक उभी राहीलेली सीमेंटची जंगले यांचे ज्यांनी गाइया चा जीवनरस (दूध) केवळ पैसे आणि लालच या २ गोष्टींकरता शोषून शोषून घेतला आहे.

पण दुसर्‍या बाजूला फुललेला निसर्ग, मानवाची सकारात्मक, एकत्रीत , प्रबळ इच्छाशक्तीचे प्रतीक डोळा असलेला हात जो आशीर्वादाची मुद्रा आहे दाखवला आहे. हात म्हणजे क्रिया तर डोळा हा डोळसपणा. गाइया चा जीवनरस या भागात ओसंडून वहाताना दिसतो , प्राणीमात्रांचं पोषण करताना दिसतो.

असं काहीसं हे चित्र आहे.

(भाषांतर - साभार सॅक्रिड मिरर्स)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

मुक्तसुनीत's picture

9 May 2013 - 4:06 am | मुक्तसुनीत

सहमत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2013 - 5:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विशेषतः विकासना एक प्रश्न आहे. तुम्हाला कदाचित अधिक माहिती असेल.

टेक्सासात काही घरांना बाहेरून भिंतींवर वेली चढवलेल्या दिसतात, बहुदा आयव्ही (Ivy) प्रकारच्या असाव्यात. त्यामुळे आतलं तापमान थोडं कमी होतं का?

पुण्यातल्या माझ्या एका मित्राने हाच प्रकार केला आहे आणि त्याचा उन्हाळ्यात उपयोग होतो असं त्याचं म्हणणं आहे. उन्हाळ्यात चार वाजता त्या खोलीत आधी भट्टी तापल्यासारखं होत असे; आता तापमान फार वाढत नाही. कारण अर्थातच भिंतीवर सरळ पडणारा सूर्यप्रकाश आता वेलींवर पडतो. याचा काही शास्त्रशुद्ध अभ्यास झालेला आहे का? त्या वेलींना फार पाणी लागत नाही असं या मित्राचं म्हणणं; म्हणजे किती ते आकडे नाही विचारले. पण तो भांडी विसळलेलं पाणी त्या वेलींना घालतो. असं पाणी वापरणं बहुतेक मध्यमवर्गीयांना अशक्य नसावं. पण स्वतःचं रो-हाऊसमुळे हे करणं त्याला सहजशक्य आहे. फ्लॅटसंस्कृतीत हे थोडं कष्टाचं होईल.

मुक्तसुनीत's picture

9 May 2013 - 4:07 am | मुक्तसुनीत

सहमत.

प्रसाद१९७१'s picture

25 Mar 2013 - 9:41 am | प्रसाद१९७१

भारता सारख्या देशांनी जी १२६ कोटींची पैदास केली आहे ती बघता झाडे लावायला जागा कूठुन मिळणार?

आनंद घारे's picture

25 Mar 2013 - 6:57 pm | आनंद घारे

हा तीन वर्षांपूर्वीचा धागा पुन्हा वर आल्यामुळे मला वाचायला मिळाला. विद्वान सदस्यांनी कोष्टके आणि आलेख यांच्या द्वारे बरीच चर्चा केलेली आहेच. या शास्त्रीय स्वरूपाच्या प्रश्नावर सर्वसाधारण वाचकाला समजेल अशा सोप्या भाषेत काही महत्वाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला आहे.
१. झाडांच्या पानामध्ये असलेले क्लोरोफिल हे द्रव्य सूर्यप्रकाशामधील ऊर्जा, हवेमधील कार्बन डायॉक्साईड वायू आणि जमीनीमधून घेतलेले पाणी यांच्या संयोगाने अन्न तयार करते आणि ते झाडामध्ये साठवले जाते असे आपण शाळेत असतांना शिकलो होतो, त्यामुळे प्रत्येक झाड म्हणजे हवेमधील प्रदूषण आणि उन्हामधील ऊर्जा शोषून घेऊन प्राणवायूचा पुरवठा करणारा कायमचा कारखानाच आहे असा समज होणे शक्य आहे. पण ही क्रिया फक्त त्या झाडाची वाढ होत असतांना चालते. ती पूर्ण झाल्यानंतर ते झाड जेवढ्या गोष्टी पर्यावरणाकडून घेते तेवढ्याच त्याला परत करते. झाडे लावण्यामधून प्रदूषण कमी करायचे असल्यास त्यांची संख्या सतत वाढवत राहणे आवश्यक आहे. उपलब्ध जमीनीचा आणि पाण्याचा विचार करता ते कठीण दिसते.
२. झाडांच्या सावलीमुळे घर थंड राहील आणि त्यामुळे विजेच्या वापरात बचत होईल हे अंशतः ठीक आहे, पण आपल्या देशात एअर कंडीशनिंगवर होणारा विजेचा वापर आधीच अत्यल्प आहे. हवेचे तपमान वाढले तर सावलीखाली असलेले घरसुध्दा तापणारच आणि एअरकंडीशनरची गरज भासणारच. त्यामुळे या मार्गाने ऊर्जेची बचत होणे नगण्य आहे. उन्हामधील ऊर्जेवरच चालणारे एअर कंडीशनर तयार करून त्यांचा उपयोग करता आला तर अधिक बचत होईल. भिंतीवर किंवा छपरावर पडणा-या उन्हापासून संरक्षण मिळवण्याचे आणि एअरकंडीशनिंगवरील लोड कमी करण्याचे इतर मार्गही आहेत. उदाहरणार्थ फॉल्स सीलिंग, रिफ्लेक्टर्स वगैरे.
जंगलांची अपरिमित तोड झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगशिवाय इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि रिफॉरेस्टेशन गरजेचे झाले आहे यात शंकाच नाही. पण झाडे लावल्यामुळे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा शोषली जाऊन कित्येक टेरावॉटचा फायदा होईल वगैरे गणित मला पटत नाही.

राजेश घासकडवी's picture

26 Mar 2013 - 6:29 pm | राजेश घासकडवी

पण आपल्या देशात एअर कंडीशनिंगवर होणारा विजेचा वापर आधीच अत्यल्प आहे.

हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण प्रगत देशांच्या मानाने दरडोई वीस-पंचवीस पट कमी ऊर्जा वापरतो. म्हणजे त्यांनी जी बचत करायला हवी ती आपण आधीच मोठ्या प्रमाणात करतो. समृद्धी वाढली तरी आपण तशीच बचत करावी ही अपेक्षा अन्याय्य वाटते.

तुमचा एफिशियन्सीचा मुद्दा पटतो. माझी आकडेवारी सोप्प्या मॉडेलची आहे. ते मॉडेल नीटनेटकं करण्याची गरज आहे हे निश्चितच. म्हणूनच मी मोठा एरर बार ठेवलेला आहे. पण माझा मुद्दा उपाय काय यापेक्षा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय या विषयी होता. 'कार्बन् भरपूर वापरा आणि तो शोषून घेण्यासाठी काहीतरी तांत्रिक उपाय करा' हा सकारात्मक दृष्टिकोन झाला. 'आपण कार्बन् वापरून पृथ्वीच्या दृष्टीने पाप करत आहोत, त्यासाठी प्रायश्चित्त घ्या' हा नकारात्मक दृष्टिकोन आहे. आक्षेप त्याला आहे.