बापू सोनावणे..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
27 Oct 2008 - 6:07 pm

हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे! :)

तात्या अभ्यंकरांचे गणगोत, व काही व्यक्तिचित्रे :

बुवा
पाटणकर आजोबा
नान्या
साधना कोळींण
नेनेसाहेब!
----------------------------------------------------------------------------------------------

बापू सोनावणे!

एक काळा ढुस्स माणूस. कोळश्याच्या रंगाची आणि बापूच्या रंगाची स्पर्धा केली असती तर बापू अगदी सहज जिंकला असता. गोलमटोल चेहेरा, देहयष्टीही तशीच गोलमटोल. बुटका. सोनेरी काड्यांचा चष्मा, गळ्यात जाडजूड सोन्याची चैन (बापू चेनचा उच्चार 'चैन' असाच करतो,), मनगटात सोन्याचं ब्रेसलेट, दोन्ही हातातल्या बोटात मिळून पाचसहा चांगल्या जाडजूड सोन्याच्या आंगठ्या. बापूचा काळा ढुस्स रंग आणि त्याच्या अंगावरल्या सोन्याचा पिवळाजर्द रंग या काळ्या-सोनेरी रंगाच्या चमत्कारिक कॉम्बिनेशनमध्येच लोकांना बापूला पाहायची सवय होती!

"अरे बापू, तू असा काळाकुट्ट आणि त्यावर ते पिवळंजर्द सोनं हे काहिच्याकाहीच दिसतं बघ! छ्या! शोभत नाही तुला सोनं!"

असं मी म्हटलं की बापूचं त्यावर पिचक्या आवाजातलं तुटक उत्तर,

"दिसू दे ना कायच्याकाय! काय फरक पडतो?!"

बापूला अशी तुटक आणि लहान लहान वाक्य बोलायची सवय आहे. आवाजाचा टोन अत्यंत लहान, बर्‍याचदा आत गेलेला,पिचका! सफारीसूट हा बापूचा नेहमीचा पोषाख.. सोन्यानाण्याने मढलेला काळाकभिन्न बापू सफारीसुटारच सगळीकडे फिरतो!

बापू हा माझा शाळेपासूनचा मित्र. त्याची आणि माझी अगदी खास गट्टी. गळ्यात गळे घालून ती कधी आम्हाला दाखवता आली नाही परंतु आजही अगदी दोनचार दिवसात एकमेकांना भेटलो नाही तर आम्हाला चैन पडत नाही. माझा फोन नाही गेला, तरी बापूचा हमखास येतोच. तोही तुटक. "संध्याकाळी भजीपाव खायला भेट रे..!" इतकाच. कांदाभजी आणि पाव बापूला अत्यंत प्रिय! :)

शाळेमधल्या संस्कृत, गणीत, भाषा, व्याकरण, वह्यांची टापटीप इत्यादी गोष्टींचा मला आणि बापूला अगदी मनसोक्त तिटकारा. तरीही शाळेत त्या गोष्टींना फाट्यावर मारून चालत नसे. झक मारत, लक्ष देऊन सगळा अभ्यास करावा लागे. त्यामुळे बापू हा माझा समदु:खी होता. तसे आम्ही दोघेही 'ढ' आणि 'उनाड' याच कॅटॅगिरीत जमा. "अभ्यास करून कुंणाचं भलं झालंय?" हे आम्हा दोघांना जोडणारं कॉमन तत्वज्ञान! त्यातूनच आमची गट्टी जमली असावी. मी जातपात मानत नाही, परंतु जन्माने ब्राह्मण असल्याचा टिळा होताच माझ्या कपाळावर. परंतु वर्गातल्या इतर हुशार ब्राह्मण मुलांनी मला कधीच जवळ केलाच नाही. ती मुलं माझ्याशी सतत एक अंतर राखूनच असायची. त्यामुळे सोनावणे, शिंदे, कोळी, नाखवा याच मुलांनी मला जवळ केला, याच मंडळीत मी मनापासून रमलो. बापूही त्यांच्यातला एक.

"भडव्या तू भट, आणि इतका 'ढ' कसा रे?" हा तुटक प्रश्न तेव्हासुद्धा मला बापू अनेकदा विचारी! :)

आज बापू हा माझा शेयरबाजाराच्या धंद्यातील अशील आहे. त्याच्या सगळा पोर्टफोलियो मीच सांभाळतो.

"बापू, हे तुझं स्टेटमेन्ट. अमूक शेयर घेतले, अमूक विकले. सध्या मार्केट खूप पडलं आहे त्यामुळे घेतलेल्या शेयरचे भाव सध्या खाली असून ते शेयर नुकसानीत आहेत.."

"मार्केट पडलं?", "मग तुझा उपयोग काय?", झक मारली आणि तुला काम दिलं!"

पिचक्या आवाजात नेहमीप्रमाणे बापूने दोनचार तुटक वाक्य टाकली! जणू काही मार्केट मीच पाडलं असाच बापूचा समज असावा! :)

"आता मार्केट बरंच खाली आहे. अजून काही पैशे असतील तर दे. चांगला चांगला माल सस्त्यात मिळतो आहे. एखाद लाख असले तरी पुष्कळ आहेत.."

अनेक तेज्यामंद्या बघितल्यामुळे, शिवाय माझी मुळातली जन्मजात तेजडिया वृत्ती, आणि आज ना उद्या घेतलेल्या गुणी शेयरना मजबूत भाव येईल, असा मार्केटवरचा दृढ विश्वास मला गप्प बसू देईना!

"एक लाख?", माझ्या बापाचा माल की तुझ्या रे?"

"बघ बुवा! असतील तर दे..!"

असा आमचा संवाद झाला. बापूला भेटून मी घरी आलो. अर्ध्यापाऊण तासातच बापूचा १२ वर्षाचा छोकरा माझ्या दारात हजर. त्याने एक पाकिट माझ्या हातात दिलं. आत बघतो तर लाखाचा चेक!

दहावी नापास झाल्यावर बापूने अक्षरश: अनेक धंदे केले. आंबे विक, फटाके विक, वडापावची गाडी लाव, कुठे मुल्शीपाल्टीच्या होर्डिंग्जचा सबएजंट हो, कुठे पेन्टिंगची लहानमोठी कामं घे, अश्या अनेक धंद्यात बापू आजही आहे. पण बापूच्या हाताला यशच भारी! भरपूर पैसा मिळत गेला, आजही मिळतो आहे. आज बापू ही बिल्डर लायनीतली एक बडी आसामी आहे. बड्या बड्या राजकारण्यात नी सरकारी अधिकार्‍यात बापूची उठबस आहे. बापू ही नक्की काय नी किती पोहोचलेली चीज आहे याची एक लहानशी झलक मला एकदा मिळाली तो किस्सा..

मी एकदा असाच सहज गप्पा मारायला म्हणून बापूच्या घरी गेलो होतो. हेल्मेट न घालता स्कूटर चालवल्याबद्दल माझं लायसन हवालदाराने पकडलं होतं. गाडीचे पेपर्सही जवळ नव्हते. 'ऑफीसला येऊन पेपर दाखवा, दंड भरा आणि लायसन घेऊन जा..' असा हवालदाराने दम दिला होता! बोलता बोलता हा सगळा किस्सा मी सहज बापूला सांगितला.

"हेल्मेट नाय?", डोसकं फोडून घेशील केव्हातरी!"

बापूची नेहमीची तुटक वाक्य सुरू झाली. जरा वेळाने बापूने डायरी पाहून एक फोन नंबर फिरवला.

"साळूके साहेब आहेत का? द्या जरा!"

"नमस्कार साळूंकेसाहेब. सोनावणे बोलतो. काय नाय, एक लायसन सोडवायचं होतं. अभ्यंकर नावाचा आरोपी आहे . जरा बघाता का?"

बापूने पोलिसातल्या कुठल्यातरी इसमाला फोन लावला होता.

"धन्यवाद साहेब. आत्ता लगेच पाठवतो अभ्यंकरला."

"जा आत्ता लगेच. साळूंकेना भेट. ट्रॉफिकला पीएसाअय आहेत. त्यांचाकडन लायसन घे!"

पोलिसांच्या मगरमिठीतून एक नवा पैसा न देता, बसल्या जागी एक फोन करून लायसन सोडवणारा बिल्डरलाईनमधला बापू हा सामान्य इसम नव्हे याची मला खात्री होतीच! ट्रॉफिकच्या साळूंकेने एका मिनिटात माझं लायसन माझ्या हातावर ठेवलं अन् तिथून मी निसटलो.

"ट्रॉफिक", "चैन", हे बापूचे खास उच्चार. दारूच्या पेगचा उच्चारदेखील बापू "प्याग" असाच करतो.

बापूचं घर आज भरलेलं आहे. बिल्डरलाईनमधल्या बापूने बक्कळ पैका कमावला आहे. चाळीशीच्या बापूला चांगली चार मुलं आहेत. बापूची बायको सदा हसतमुख. बापू मला कधी कधी रविवारचा त्याच्या घरी जेवायला बोलावतो. मला मटणातल्या नळ्या आवडतात हे बापूला माहीत आहे. जेवायच्या आधी बापू बाटली काढणार. स्वत:चा, माझा पेग भरणार! लगेच सोबत खाण्याकरता बायकोला ऑर्डर - "ए, सुकं मटन आण.." मटणाचा उच्चार बापू 'मटन' असा करतो.

जरा वेळने,

"ए, ताटं आण."

त्याचा तो पिचका, खोल गेलेला आवाज बापूच्या बायकोला मात्र बरोब्बर ऐकू जातो! :)

मी जेवायला बसलो की बापू बायकोला म्हणणार,

"ए, त्याला नळी दे!"

"नको रे बापू, ऑलरेडी दोन नळ्या आहेत माझ्या पानात! तू घे की.."

बापूच्या बायकोनं केलेलं फस्क्लास मटण आणि त्यातल्या नळ्या चापण्यात मी गुंग असतो. काळा ढुस्स बापू गालातल्या गालात मिश्किलपणे हासत मला मटण चापताना पाहून खुश होतो. वर पुन्हा,

"साल्या, तू खाऊन खाऊनच मरणार..." अश्या शुभेच्छाही देतो! :)

माझ्या गणगोतातला हा बापू रंगवताना तो कुणी संत, महात्मा, सज्जन, पापभिरू माणूस आहे असा माझा मुळीच दावा नाही. नगरसेवक मंडळीत, मुल्शीपाल्टीत, सरकारदफ्तरी, "वजन" ठेवणे व आपलं काम साधून घेणे ही बिल्डरलाईनमधली अपरिहार्यता बापूलाही चिकटली आहे. हल्लीच्या जगात ती लाईनच तशी आहे, त्याला बापूचाच काय, कुणाचाच विलाज नाही. नायतर धंदा करणंच मुश्किल, अशातली गत!

तरीही आमचा बापू खूप गुणी आहे, अत्यत कष्टातून वर आलेला आहे. बापूचा बाप चांभार होता. रस्त्याच्या कडेला बसून चांभारकी करून बापूच्या बापाचा सात मांणसांचा संसार झाला. बापू हा तिसरा की चवथा! परंतु लहान वयातच वडापाव, आंबे, फटाके, असे नाना धंदे करून बापूने सगळ्या घरादाराला हातभार लावला. सुदैवाने बापूच्या पदरात यशाचं मापही अगदी भरपूर पडत गेलं. हा हा म्हणता दिवस बदलले. ठाण्या-मुबई-पुण्यात बापूचे काही प्रोजेक्ट्स उभे राहिले. बापू चांगला पैसेवाला झाला, पण कधी कुणाशी माजोरीपणे वागला नाही. बापाच्या पश्चात भावाबहिणींचं अगदी यथास्थित केलंन, कुणाला काही कमी पडू दिलं नाही.

"काय बापू? दोन दिवस कुठे होतास? तुझा मोबाईलही लागत नव्हता.."

"आयटमला घेऊन खंडाळ्याला गेलो होतो. गेम वाजवायला!"

बापूने हे उत्तर अगदी सहज दिलं!

"अरे काय रे हे बापू? अरे चांगली चार पोरं तुझ्या पदरात आहेत, चांगली बायको आहे घरी! शोभतात का तुला हे असले धंदे?"

"मग काय झालं? मला मजा करायची होती. म्हणेल ते पैशे टाकून नेली एका पोरीला! त्यात बिघडलं कुठे?" जुलुम जबरदस्तीचा सौदा थोडीच केलाय?"

पिचक्या आवाजात चारपाच तुटक वाक्यात समर्थन करून बापू मोकळा!

"साला आपला काही पैसा कष्टाचा, काही हरामाचा. त्यातला हरामाचा पैसा हा असाच जाणार! तो थोडाच टिकणार आहे?!"

खरं सांगतो मंडळी, नीती-अनिती, व्यभिचार, या शब्दांच्या व्याख्याही बापूला माहीत नाहीत. खरंच माहीत नाहीत. पण हरामाचा पैसा टिकत नाही, तो असाच या ना त्या मार्गाने खर्च होतो हे तत्वज्ञान बापूला कुणी शिकवलं होतं कुणास ठाऊक?

चालायचंच! बापू जो आहे, जसा आहे, माझा आहे! प्रत्येक माणसात गुणदोष असतात, तसे बापूतही आहेत. आमच्या मैत्रीवर त्याचा काहीच फरक पडत नाही! "चूतमारिच्या, एक नंबरचा कंजूष तू! चल, दारू पाज..!" असं मला म्हणणारा, "आयटमला घेऊन गेम वाजवायला खंडाळ्याच्या बंगल्यावर गेलो होतो.." असं म्हणणारा बापू, बांधकाम साईट सुरू असलेल्या कुणा कामगाराची आई सिरियस झाली, तेव्हा रात्री दोन वाजता खिशात काही पैसे घेऊन तिला हास्पिटलात ऍडमिट करायलाही जातो..!

असो, बापू सोनावणे ही काळी, बुटकी, जाडजूड अजब व्यक्ति मला आवडते आणि तिचाही माझ्यावर अत्यंत जीव आहे एवढंच मला ठाऊक आहे!

गेल्या तीनचार दिवसात बापू भेटला नाही. आज बहुदा त्याचा फोन येईल,

"तात्या, संध्याकाळी भजीपाव खायला भेट रे..!"

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

27 Oct 2008 - 6:25 pm | शैलेन्द्र

मस्त

सर्वसाक्षी's picture

27 Oct 2008 - 6:27 pm | सर्वसाक्षी

जबरदस्त व्यक्तिचित्र!

अत्यंत अकृत्रिम आणि ओघवती भाषा हे तुझे वैशिष्ठ्य. बाकी तुझा लोकसंग्रह हेवा करण्यासारखा आहे. माणसे जोडावीत तर तात्याने!

रामदास's picture

27 Oct 2008 - 6:54 pm | रामदास

शक्य तितके बेसीक कलर वापरून केलेले पोर्ट्रेट.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Oct 2008 - 7:51 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते

विसुनाना's picture

29 Oct 2008 - 11:33 am | विसुनाना

कलर बेसिक आहेतच. पण बेसिक कलरची माणसेच ढोबळमानाने समाजात खूप दिसतात.
व्यक्तिचित्र चांगले वाटले.

धोंडोपंत's picture

27 Oct 2008 - 7:08 pm | धोंडोपंत

वा तात्या,

क्या बात है! व्यक्तिचित्र छान रंगले आहे. बापू सोनावण्याला आमची दाद आणि तुमच्या लेखनालाही.

मजा आली. एक एक नमुने असेच दाखवत जा. खास कोकणी शैलीत.

आपला,
(वाचक) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2008 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज आलेले शब्द,सोपे संवाद, लिहिण्याची जबरदस्त शैली, यामुळेच तात्यांच्या गणगोतातील माणसं आपली वाटतात.
उगाच का आम्ही तात्यांना, आंतरजालावरील व्यक्तीचित्र लिहिणारा एक दादा माणूस म्हणतो. :)

-दिलीप बिरुटे
(तात्याच्या लेखनाचा फॅन)

प्राजु's picture

27 Oct 2008 - 7:33 pm | प्राजु

ओघवतं, रसाळ.... उत्तम व्यक्तीचित्र.
तात्या,माणसांच्या स्वभावातले बारकावे टिपावेत तर तुम्ही असंच म्हणेन.
आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

27 Oct 2008 - 8:02 pm | श्रीकृष्ण सामंत

वा! तात्याराव,
अतिशय मग्न होऊन लिहिलेलं व्यक्तिचित्रण वाचून बापू हुबेहूब डोळ्या समोर आणलात.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

baba's picture

27 Oct 2008 - 8:38 pm | baba

तात्या, आवडला तुमचा बापू ..

(तुमच्या फॅनच्या संख्येत वाढ होतेय.. ;))

...बाबा

बेसनलाडू's picture

27 Oct 2008 - 10:50 pm | बेसनलाडू

(वाचक)बेसनलाडू

चित्रा's picture

28 Oct 2008 - 5:06 pm | चित्रा

बापूचे व्यक्तिचित्र आवडले.

स्वाती दिनेश's picture

27 Oct 2008 - 11:01 pm | स्वाती दिनेश

आवडला बापू ..
पण ती रौशनी म्हणे दिवाळीत भेटायला येणार होती तिचे काय झाले?
लिव की पुढचे भाग..
स्वाती

नंदन's picture

28 Oct 2008 - 1:23 pm | नंदन

असेच म्हणतो. बापू सोनावणेंचे व्यक्तिचित्र आवडले. आता रौशनी, नल्या लळीत या मंडळींची वाट पाहतो आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

28 Oct 2008 - 1:30 pm | ऋषिकेश

बापू सोनावणेंचे व्यक्तिचित्र आवडले. आता रौशनी, नल्या लळीत या मंडळींची वाट पाहतो आहे

असेच म्हणतो :)

-(सहमत) ऋषिकेश

छोटा डॉन's picture

28 Oct 2008 - 1:42 pm | छोटा डॉन

बापु सोनावणेचे सरळ साध्या सोप्या भाषेत लिहलेले व्यक्तिचित्र आवडले ...
मस्त आहे एकदम ...

आता रौशनी, नल्या लळीत या मंडळींची वाट पाहतो आहे

+१, असेच म्हणतो.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सहज's picture

28 Oct 2008 - 7:02 am | सहज

व्यक्तिचित्र स्पेशलिस्ट तात्या.

नेहमीसारखेच सफाईदार.

:-)

केशवसुमार's picture

29 Oct 2008 - 6:46 pm | केशवसुमार

व्यक्तिचित्र स्पेशलिस्ट तात्या.

नेहमीसारखेच सफाईदार.

तात्याशेठ,
तुमचा बापू आवडला..
(वाचक)केशवसुमार

येडा खवीस's picture

28 Oct 2008 - 12:52 pm | येडा खवीस

बापु सोनावणे...

तात्या कौतुकाला शब्दच नाहीत....दिवाळीच्या "सात्विक" फ़राळावर बापुच्या "मटना"चा तुम्ही दिलेला उतारा लय भारी!!

तात्याचा पंखा झालोय

येडा खवीस
(जय महाकाल)
http://sachinparanjpe.wordpress.com

मनीषा's picture

28 Oct 2008 - 1:09 pm | मनीषा

बापू चं व्यक्तिचित्रण आवडले ..
भाषा आणि वर्णनशैली ... सुरेख !!!!

घाटावरचे भट's picture

28 Oct 2008 - 1:17 pm | घाटावरचे भट

लैच भारी तात्या!!!! :)

--घा. भ.

चतुरंग's picture

28 Oct 2008 - 4:13 pm | चतुरंग

बापूची भेट आवडली! :) तुझी लेखणी चालली की मात्र वाचत रहावसं वाटतं बरं!

(खुद के साथ बातां : अरे रंग्या, त्या रौशनीचं काय झालं? येते आहे ना. पुढल्या दिवाळीला रे!! ~X( ;) )

चतुरंग

विसोबा खेचर's picture

29 Oct 2008 - 7:59 am | विसोबा खेचर

आवर्जून प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्व रसिक वाचकवरांस अनेक धन्यवाद,

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

मदनबाण's picture

29 Oct 2008 - 8:23 am | मदनबाण

बापू आवडला..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सुबक ठेंगणी's picture

6 Jun 2009 - 6:12 am | सुबक ठेंगणी

हेच म्हणते..

अनिल हटेला's picture

29 Oct 2008 - 10:00 am | अनिल हटेला

बापू आवडला !!

व्यक्तीचित्रणात तात्या एकदम स्पेशालीस्ट आहात !!

(शिकाउ )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दत्ता काळे's picture

29 Oct 2008 - 12:40 pm | दत्ता काळे

खरं सांगतो मंडळी, नीती-अनिती, व्यभिचार, या शब्दांच्या व्याख्याही बापूला माहीत नाहीत. खरंच माहीत नाहीत. पण हरामाचा पैसा टिकत नाही, तो असाच या ना त्या मार्गाने खर्च होतो हे तत्वज्ञान बापूला कुणी शिकवलं होतं कुणास ठाऊक?

फार छान.

राघव's picture

29 Oct 2008 - 4:25 pm | राघव

लय ब्येस!!
चालायचंच! बापू जो आहे, जसा आहे, माझा आहे! प्रत्येक माणसात गुणदोष असतात, तसे बापूतही आहेत. आमच्या मैत्रीवर त्याचा काहीच फरक पडत नाही! "चूतमारिच्या, एक नंबरचा कंजूष तू! चल, दारू पाज..!" असं मला म्हणणारा, "आयटमला घेऊन गेम वाजवायला खंडाळ्याच्या बंगल्यावर गेलो होतो.." असं म्हणणारा बापू, बांधकाम साईट सुरू असलेल्या कुणा कामगाराची आई सिरियस झाली, तेव्हा रात्री दोन वाजता खिशात काही पैसे घेऊन तिला हास्पिटलात ऍडमिट करायलाही जातो..!
पुलंच्या रावसाहेबांची आठवण झाली ही विचारसरणी बघून :)
मुमुक्षु

शेणगोळा's picture

30 Oct 2008 - 5:39 pm | शेणगोळा

तात्या,

ज ह ब र्‍या हा लिहिलंय.

बापू सोनावणे डोळ्यासमोर उभा राहिला.

हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे!

म्हणजे काय? रेषेवरील उभी की आडवी अक्षरे हा काय प्रकार आहे?

सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.

विनायक प्रभू's picture

30 Oct 2008 - 5:46 pm | विनायक प्रभू

हा काही तरी आपल्या तुपल्याला माहित नसलेला जुना हिशेब आहे.

दिनेश५७'s picture

31 Oct 2008 - 6:06 pm | दिनेश५७

तात्या तुला (कोकणातला ना?) एकदा भेटायचंय..कसं कळवशील? उदय पण आपला एक्दम मित्र आहे.

विसोबा खेचर's picture

4 Nov 2008 - 1:19 am | विसोबा खेचर

हा आमचा बापू सोनावणे! :)

आजच मी अन् बापू गिरगावातल्या समर्थ भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथे बापू मन लावून "मटन" चापत होता तेव्हा मी त्याला माझ्या मोबाईलने टिपला! :)

तात्या.

पर्नल नेने मराठे's picture

9 Jun 2009 - 6:14 pm | पर्नल नेने मराठे

कलर गया तो पैसा वापस :P

चुचु

लढ बाप्पू!! :)

चतुरंग

प्राजु's picture

4 Nov 2008 - 1:37 am | प्राजु

हा तुमचा मित्र तुम्हाला अगदी शोभून दिसतो..:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

खरा डॉन's picture

4 Nov 2008 - 5:53 am | खरा डॉन

आयला प्राजु तु पण शालजोडीतुन हाणतेस की...कोल्हापुरची लवंगी मिर्ची आहेस खरी

मिसळ's picture

4 Nov 2008 - 8:55 pm | मिसळ

तात्या,
अफलातून लिहिले आहेस. बापूला सलाम.
- मिसळ.

विसोबा खेचर's picture

5 Jun 2009 - 3:53 pm | विसोबा खेचर

परवा बर्‍याच दिवसांनी मी अन् बापू मुंबैत काही कामानिमित्त गेलो होतो. मला एक गब्बर क्लाएंट बापूनं मिळवून दिलान. त्यानंतर त्याच्या नेहमीच्या पिचक्या आवाजात,

"भोसडचोदीच्या, तुझं काम केलं आता दारू पाज!"

असा हुकूम केला. आम्ही मस्तपैकी दारू पियालो. ('प्यायलो' च्या ऐवजी बापू नेहमी 'पियालो' असंच म्हणतो.) आणि नंतर गिरगावातल्या समर्थ भोजनालयात जेवायला गेलो. तिथे चिंबोर्‍यांचं फक्कडसं कालवण, सोबतीला कर्ली आणि मांदेली फ्राय, चपात्या, भात अश्या फर्मास मेनूवर तुटून पडलो. दोघांची पोटं तुडुंब भरल्यानंतरचा हा फोटू! समर्थच्या संज्यानं हा फोटू खेचलान! :)

यन्ना _रास्कला's picture

6 Jun 2009 - 11:46 am | यन्ना _रास्कला

दोसदार नाय त्ये त भाउ सोभ्तात येक्मेकान्च. तात्या मेल्यामधी बिछ्डल
होत का तुमी दोगबी.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

श्रावण मोडक's picture

6 Jun 2009 - 12:36 pm | श्रावण मोडक

एक झाकावा, दुसरा काढावा! ;)

स्वानन्द's picture

9 Jun 2009 - 8:04 pm | स्वानन्द

पोट बघा पोट दोघांचं. कुणालाच झाकता येणार नाही :)

वेताळ's picture

6 Jun 2009 - 1:23 pm | वेताळ

खरोखर दिसतय की तुमच्या दोघाची पोटं अगदी तुडुंब भरली आहेत.
आणि काय हो तात्या पहिल्या फोटुत नळ्यातला गर तुम्ही ओरपुन राहिलेल्या नळ्या बापुंच्या ताटाजवळ टाकल्या काय? =))
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

9 Jun 2009 - 3:47 pm | पर्नल नेने मराठे

कोम्पितीषनच आहे पोटान्ची :D
चुचु

विसोबा खेचर's picture

9 Jun 2009 - 5:54 pm | विसोबा खेचर

बापु-तात्या,,,,, जोडी,,खिल्लारी,,,, असच म्हणते,,,

हम्म! बैलांची खिल्लारी जोडी!

आम्हाला 'बैल' म्हटल्याबद्दल धन्यवाद..! :)

आपला,
(गायप्रेमी) तात्यासांड! :)

श्रीयुत संतोष जोशी's picture

6 Jun 2009 - 6:24 am | श्रीयुत संतोष जोशी

व्वा तात्या,
झक्कास.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अरुण वडुलेकर's picture

6 Jun 2009 - 11:01 am | अरुण वडुलेकर

बापूही आणि तात्या तुम्हीही.
तुमच्या लेखनशैलीला सलाम.

हर्षद बर्वे's picture

9 Jun 2009 - 3:42 pm | हर्षद बर्वे

मैत्र जिवांचे... फोटोआधी नुकत्याच खाल्लेल्या जिवांसकट...:)
तात्या तू़मची दोघांची मैत्री निरंतर टिकावी....
एच.बी.

mamuvinod's picture

9 Jun 2009 - 3:51 pm | mamuvinod

अहो दोन मिनि. मध्ये पन्नास प्रतिक्रिया सदर लेखनाला.

निशिकान्त's picture

17 Sep 2013 - 12:44 am | निशिकान्त

"साला आपला काही पैसा कष्टाचा, काही हरामाचा. त्यातला हरामाचा पैसा हा असाच जाणार! तो थोडाच टिकणार आहे?!"

छान लिहिलय तात्या.