जू जू तुला सोडणार नाही !

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
26 Aug 2021 - 11:57 am

ऑनसाईट चे आकर्षण कोणाला नसते? मलाही होते. पण अमेरिका , यूरोप, सिंगापुर, यूएई येथे अनेकदा प्रयत्न करूनही मला कधी संधी मिळाली नाही. मी हताश झालो होतो आणि ऑनसाईट हे आपल्या नशिबात नाही असे मानून आहे ती नोकरी करत होतो. पण ६ महिन्यांपूर्वी अचानक एका दुपारी मला युगांडा मधून एक फोन आला. तिथल्या एका बँकेत त्यांना माहिती सुरक्षा सल्लागार म्हणून माणूस हवा होता. प्रथम आफ्रिकेत जायला मी नाखुषच होतो. पण जो पगार मला ऑफर केला होता तो नाकारण्यासारखा नव्हता.
शेवटी मी ती ऑफर स्वीकारली आणि rtpcr आणि यलो फिवर लस अशा अनेक दिव्यातून पार पडत युगांडात पोहोचलो. मला एका अतिशय दूरवरच्या खेड्यातील शाखेत रुजू होण्यास सांगितले. मी तिथे जाऊन रुजू झालो. मला बँकेने एक छोटेखानी घर, ३ खोल्यांचे, एक कार आणि तिथलाच एक नोकर दिमतीस दिला होता. त्याचे नाव बेन्ग्वाब्वे. तो स्थानिक बाकीगा जमातीतील असावा. मला बजावून सांगण्यात आले होते, की स्थानिक लोकांशी कामापुरते काम ठेवायचे म्हणून. जास्त त्यांच्याशी जवळीक ठेवायची नाही.
मी सुद्धा आपण भले आपले काम भले या पद्धतीने माझे तिथले जीवन सुरु केले. एक दोन महिन्यात मी रुळलो. एकच डोक्याला शॉट होता. या बेन्ग्वाब्वे चा एक लाडका कुत्रा होता. मला कुत्री अजिबात आवडत नाहीत. अजिबातच नाही. त्यात हा बेन्ग्वाब्वेचा कुत्रा माझ्यावर सारखा गुरगुरत असे. एकदा तर त्याने माझ्यावर हल्ला केला होता. बेन्ग्वाब्वेनेच त्याला कसाबसा आवरला. तरीही त्याने त्याचे दात माझ्या पोटरीत घुसवलेच! माझी त्रेधा तिरपिट पाहून बेन्ग्वाब्वे भलताच खुश झालेला मला दिसला. माझ्या पेक्षा त्याला तो कुत्रा अधिक प्रिय होता. मी काहीच बोललो नाही. मुकाट पणे रेबीज च्या लशी पोटात टोचून घेतल्या. पुढे त्या कुत्र्याला मी बिस्किटे पाव वगैरे देऊन थोडे आपलेसे केले (तुम्हाला म्हणून सांगतो ...मी नेहमी मला ज्याचा काटा काढायचाय त्याला बेसावध ठेवतो .... योग्य वेळेची वाट बघतो!)
दीड महिन्यांपूर्वी बेन्ग्वाब्वे १५ दिवस सुट्टीवर जाणार होता. त्याबदली एक दुसराच माणूस बेन्ग्वाब्वेने पाठवला होता. तोही आसपासच्या खेड्यातील असावा. त्याचे नाव चालटु का काही होते. बेन्ग्वाब्वे सुट्टीवर गेल्याच्या ३ दिवसानंतरची ही घटना आहे. एका शनिवारच्या दुपारी चालटु माझ्या कडे धावत आला. तो सीआफू आल्यात इथून २-३ दिवस बाहेर जा असे मला सांगू लागला. मला कळेनाच हा काय म्हणतोय ते.
मग मी कम्पाला मधील एका कलीग ला फोन लावून हा सीआफू काय प्रकार आहे आणि मला का २-३ दिवस बाहेर जावे लागणार आहे असे विचारले. मित्राने उलगडा केला. सीआफू ही एक आफ्रिकेत आढळणारी मुंग्यांची प्रजाती आहे. या मुंग्या लाखोंच्या संख्येने आपले अन्न शोधत एका जागेवरून दुसरीकडे प्रवास करत असतात. त्यांच्या वाटेत येणारे प्रत्येक घर, दुकान, झाड ते व्यापतात. त्यांच्या तावडीत येणाऱ्या कोणाचाही त्या फडशा पाडतात. मग तो साप, विंचू, उंदीर, कोळी, झुरळ असो नाहीतर एखादा मेलेला घोडा, हत्ती, माकड असो. या मुंग्यांच्या तावडीत सापडला की तो गेलाच. अंगाची लाही लाही होऊन तडफडून जिवंतपणी मरण हेच या मुंग्यांच्या तावडीत सापडलेल्याचे प्रारब्ध!
तर या मुंग्या आता आमच्या कॉलनीच्या दिशेने येत होत्या आणि त्यांनी कॉलनीतील सुरुवातीची एक दोन घरे व्यापली होती. माझे शेजारील घरी सुद्धा आवराआवरी सुरु होती. मला लवकरात लवकर दुसरीकडे राहायला जायला सांगून चालटू त्याच्या खेड्यात निघून गेला. तो आता ४ दिवसांनी येणार होता. मी आवरा आवर सुरु केली. मुंग्या माझ्या घरापाशी येईपर्यंत मला थोडा अवधी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडावे असा विचार करून मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी जरा उशिरानेच जाग आली. मी फटाफट आवरून बाहेर आलो. बघतो तर शेजारचे घर सामसूम होते, आणि त्या घराच्या उंबऱ्यावर दारावर मला मुंगळेच मुंगळे दिसले. या मुंगळ्यांपुढे आपले भारतातील काळे मुंगळे छोटेच पडतील! मला आता घाई करणे भाग होते. मी निघणार इतक्यात मला बेन्ग्वाब्वेच्या लाडक्या कुत्र्याची आठवण आली. ते माझ्या घराच्या ओसरीवरच पहुडले होते.
(.....त्यावेळी माझे डोळे कदाचित खुनशी भावनेने चमकले असावेत!)
हीच संधी होती. मी त्या कुत्र्याला पावाचा तुकडा दाखवून घरात घेतले. चांगले तीनचार पावाचे तुकडे, आणि दूध दिले .... (हलाल काय फक्त बकऱ्याचाच करावा असा थोडीच नियम आहे?) आणि दार खिडक्या बाहेरून लावून घेतल्या!!
.
.
.
.
.
बरोबर चार दिवसांनी मी माझ्या घरी परतलो. जरा लवकरच म्हणजे पहाटे पहाटे. घराबाहेर तरी मुंग्यांचा मागमूस नव्हता! मी दार उघडले आणि घाणेरडा दर्प आला! माझे उद्दिष्ट साध्य झालेले मला दिसले!
सहजच मी माझ्या पोटरीवरून हात फिरवला. (मनात एक प्रकारची खुनशी विजयाची भावना होती! )
पावाचे तुकडे वगैरे काही शिल्लक नव्हते. अहो त्या कुत्र्याच्या अंगावरील मासच मुंग्यांनी ठेवले नाही तर पावाचे तुकडे कसे राहतील! फक्त दुधाचे भांडे मात्र मी विसळून ठेवले.
नंतर सांगाडा बाहेर ओढून आणला आणि ओसरीत ठेवला. बेन्ग्वाब्वे ला यायला अजून ३-४ दिवस होते. त्या दिवशी दुपारी चालटू आला. त्याला मला फार कन्व्हिन्स नाही करावे लागले. पण कुत्रा असा कसा सीआफूच्या तावडीत सापडला याचे त्याला आश्चर्य वाटत असणार. माझ्याकडे जराशा नाराजीनेच तो पाहत होता. शेवटी त्यानेच सांगाडा कुठेतरी लांब जाऊन खड्डा खणून पुरून टाकला.
चार दिवसांनी बेन्ग्वाब्वे आला. मी जरा मनातून घाबरलोच होतो.
बेन्ग्वाब्वे आला तो तणतणतच! त्याच्या स्थानिक भाषेत तो मला ओरडून काही सांगत होता. बहुदा शिव्या असाव्यात. सारखे तो जू जू, जू जू असे काही बळरत होता. चालटू बेन्ग्वाब्वे चा रुद्रावतार पाहून घाबरला होता. बेन्ग्वाब्वे शेवटी ओरडून ओरडून तासाने निघून गेला. चालटू ला मी विचारले की बेन्ग्वाब्वे काय म्हणत होता.
चालटू ने इतकेच सांगितले की तो माझ्यावर "जू जू" करणार आहे. "जू जू" तुन मी कधीही वाचणार नाही. हा जू जू काय प्रकार आहे असे मी त्याला विचारले तर चालटु निराशेने मान हलवत म्हणाला "आफ्रिकेतील काळी जादू ! कळेलच तुम्हास लवकरच!"
आता मात्र मी हादरलो होतो. बेन्ग्वाब्वेच्या जवळ राहणे मला आता धोकादायक वाटू लागले. ताबडतोब हेड ऑफिस ला फोन करून माझी तब्येत ठीक नाही असे कळवले. बॉस ने मला कंपालाला बोलावले. काही दिवस तिथेच, हेड ऑफिसातून काम कर असे सुचवले. त्यातल्या त्यात ही बरी गोष्ट होती. पण मला आता युगांडात सेफ वाटेना. मी ठरवले की राजीनामा देऊन भारतात परतायचे.
मी यातील काहीही श्रद्धाला बोललो नव्हतो. आणि काय सांगणार? मी असे त्या कुत्र्याला मारले म्हणून? भारतात आल्यावर गरज पडली तर आणि आव्यश्यक तितके सांगू असे मी ठरवले.
एक वर्षाच्या आत नोकरी सोडली म्हणून मला जवळपास साडेतीन लाख रुपये बँकेला द्यावे लागणार होते. पण माझी मानसिक तयारी झाली होती. त्याच दिवशी मी रिजाइन इनिशिएट केले. बाकी औपचारिकता पूर्ण होईपर्यंत मला थांबावेच लागणार होते. HR ने मला विचारले की काय झाले, अचानक नोकरी का सोडताय असे. मी सांगितले की छातीत दुखत आहे आणि धाप लागत आहे म्हणून. ३०-४० मिनिटाच्या माझ्या अभिनया नंतर शेवटी ती मला रिलीव्ह करायला तयार झाली.
शेवटची सुरुवात त्याच दिवशीच्या रात्री झाली. ...
हातात तापलेली सुई घुसावी तसे काही करकचून चावले आणि मी जागा झालो. उजव्या हातावर लाल गांधी उठली होती. नुसती आग आग होत होती. मी बर्फाने थोडे शेकले तेव्हा कुठे बरं वाटलं! अंथरून उलगडून पहिले तर काहीच सापडले नाही. नंतर झोप अशी लागलीच नाही.
……लागली तरी "जू जू तुला सोडणार नाही! " या शब्दांनी दचकून जाग येत असे.
दुसऱ्या दिवशी बँकेत गेलो आणि माझ्या डॉकुमेंट्सचच्या प्रिंट काढू लागलो. आणि मानेच्या खाली तापलेली सुई घुसावी तसे झाले. नुसती आग आग! एखाद्याने शरीराचा लचका तोडावा तसे दुखणे! मी एका कलीग ला घेऊन वॉशरूम मध्ये गेलो आणि माझ्या मानेचा मोबाईलवर फोटो काढून घेतला. हातावर जशी काल रात्री गांधी उठली होती तशीच मानेवर होती. मी शर्ट काढून पहिला, माझ्या कलिगने पण पाहिला पण आत मुंगी, कीडा असे काही नव्हते. हातावरची गांधी अजून तशीच होती आणि दुखत होती.
.. .
.
.
.
.
आज मला भारतात येऊन ६ दिवस झालेत. हात, पाय पोट पाठ अस जवळपास सगळं शरीर लाल लाल गांधींनी भरतय!
सगळ्या टेस्ट करून झाल्यात. एक ऍलर्जीची टेस्ट पॉसिटीव्ह आलीये बस !
लेवो सिट्रिझिन, अँटी हिस्टामीन, प्रतिजैविके सुरु आहेत.
.
.
.
पण दर ४-५ मिनिटांनी पुन्हा तीच वेदना . . . कोणत्यातरी नवीन ठिकाणी ...
तापलेली सुई घुसावी तशी . . .
शरीराचा लचका तोडला जावा अशी..
असं वाटतंय की सगळ्या शरीराला मुंगळे लागलेत
...आणि माझ्या शरीराचे लचके तोडतयात!
...आणि ते मुंगळे बुजबुजतायत "जू जू तुला सोडणार नाही! जू जू तुला सोडणार नाही!"
(१७ जुलै २०२१. कौस्तुभ पोंक्षे याच्या डायरीतून..)

कथा

प्रतिक्रिया

भागो's picture

26 Aug 2021 - 12:48 pm | भागो

छान आहे. आवडली. अजून येऊ द्या!

तुषार काळभोर's picture

26 Aug 2021 - 2:53 pm | तुषार काळभोर

कथा आवडली!

वामन देशमुख's picture

26 Aug 2021 - 6:52 pm | वामन देशमुख

अप्रतिम!

मध्यंतरानंतर शेवटाचा अंदाज आला होता. नारायण धारपांची आठवण झाली.

अभिजीत अवलिया's picture

26 Aug 2021 - 7:25 pm | अभिजीत अवलिया

प्रेडिक्टेबल वाटली पण आवडली.

सोत्रि's picture

27 Aug 2021 - 7:36 am | सोत्रि

सहमत, हेच म्हणतो!

- (प्रेडिक्टेबल) सोकाजी

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2021 - 9:55 am | प्राची अश्विनी

सहमत. आवडली कथा.

तर थोरा मोठ्यांनी लिहलेले आफ्रिकन जुजू वगैरे पुस्तके.... एक से एक भंपक कहाण्या जे वाचून हसू तर येईना अन रडूही...

ही पुस्तकं प्रसिध्द झाली तो काळ आणि वाचकांचे बौध्दिक वय या दोन बाबी कदाचित त्यांना प्रसिध्द बनवून गेल्या... बरे जो पावरफुल जुजु मालक सदैव तोच जिंकणार म्हणजे उगा योग्य कोण चुक कोणाची हा विषयच नाही अथवा आपल्या धारपांच्या समर्थकथा प्रमाणे सुष्टाचा दुष्टावर विजय ही भानगडही नाही.

अत्यंत होपलेस पुस्तकं म्हणजे आफ्रिकन जूजू कथावाली पुस्तकं, बालिश सादरीकरण, ब्वाना या आफ्रिकन शब्दाचा भडिमार आणि स्वताला ठरवून बालिश बनवणे म्हणजे जूजु कथा होय...

हा धागाही तसलाच...

लिहिते झाल्याबद्दल __/\__
लेखन शैली छान आहे तुमची

आंद्रे वडापाव's picture

27 Aug 2021 - 8:00 am | आंद्रे वडापाव

जु जु म्हणजे आजपर्यंत हाच काय तो , आम्हाला ठाऊक होता ...

j

कंजूस's picture

27 Aug 2021 - 9:25 pm | कंजूस

अशा जुजु कथा असतात हे आजच कळले.

चौथा कोनाडा's picture

31 Aug 2021 - 5:27 pm | चौथा कोनाडा

बाप रे !
😱