सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

प्रवासी

Primary tabs

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 6:09 am

ती पहाट निरागस होती, क्षितिजावर होती लाली
नादातुन निर्मित झाली, अनंत अगम्य भूपाळी
भोवताल न्याहळत होतो, अमृत प्राशन करताना
अमरत्व ओढुनी आलो, होतो मी कोणे काळी

असंख्य मनोहर स्वप्ने, ते लांब गहिरे श्वास
अतर्क्य, अबाधित होता, विचार-कृती सहवास
आनंद सोहळ्यामध्ये, मी भिजलो अनंत काळी
अद्वैत भोगले होते, मी काही वेळ सकाळी

दिवसा चित्र पालटले, मयसभा संपली आता
सत्य उलगडत गेले, मज प्रारब्धाची गाथा
जीव तोडून जोडून पळलो, दिवसा मी रानोमाळी
दिवसाचा जोशच न्यारा, दिवसाची नशा निराळी

ती चाहुल नश्वरतेची, नाशाचे गूढ इशारे
ते रणरणते निखारे, भयाण वादळी वारे
मिरवले मुखवटे खोटे, रमताना माया जाळी
धुक्यात हरवली स्मरणे, मी थकलो संध्याकाळी

कविता

प्रतिक्रिया

अप्रतिम!
अगदी लयीत वाचली.

आर्णव's picture

22 Feb 2021 - 3:04 pm | आर्णव

धन्यवाद.

एक जीवन.. एक सागर.. सागरात तो एकटा..
एकाकी मनास त्याच्या कोणती संवेदना!

जीवनाची गाथा. खिन्न वाटलं.

नेहमी पडणारा प्रश्न आहे हा खरंतर, पण कधी विचार केला नव्हता..

ही खिन्नता आयुष्याच्या शेवटी प्रकर्षानं का येत असावी..? फार क्वचित आनंदी वयस्क लोक्स दिसतात.

आयुष्य निरर्थक घालवलं म्हणून.. जे हवं ते करता आलं नाही म्हणून.. सगेसोयरे निघून गेलेत म्हणून.. आरोग्य वाईट झालंय म्हणून.. पैसा कमी पडतो म्हणून.. कुणाशी मी/कुणी माझ्याशी अत्यंत वाईट वागलं म्हणून.. किंवा आणिकही काही कारण असेल.

मग यावर उपाय काय? हे सगळं समजा झालंय माझ्या आयुष्यात.. तर मग मी काय करायला हवं, की ज्यामुळं मनाला उभारी देऊन पुन्हा उठून उभं राहीन मी?
जे काही शेवटचे दिवस माझे असतील, त्यात जेवढं काही मला कुणासाठी चांगलं करता येईल ते केलं पाहिजे.. नाही?

काहीही झालं तरी दररोज आयुष्याकडे मागे वळून बघतांना, मला स्वतःला कधी खेद वाटू नये असंच मी वागलं पाहिजे.

आणि पुन्हा हे सर्व वय झाल्यावरच का? आयुष्याच्या शेवट जर कधीही होऊ शकतो, तर आधीही हा विचार येऊ शकतोच की.. सगळं चांगलं असतांना सुद्धा.. नव्हे, आलाच पाहिजे. आपल्या वागण्याचा स्वतःला अभिमानच वाटला पाहिजे. जर तसं वाटत नसेल तर ज्यामुळे तसं होतंय ते वेळीच ठीक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आयुष्यातील पुढच्या दिवशी पुन्हा खेद नको.. नाही? :-)

आर्णव's picture

22 Feb 2021 - 3:05 pm | आर्णव

सत्य आहे हे. गहन विचार. धन्यवाद.

शाम भागवत's picture

22 Feb 2021 - 7:44 pm | शाम भागवत

@राघव,
आयुष्याच्या संध्याकाळी बहुतेक जणांचे असे होते खरे.

ती चाहुल नश्वरतेची, नाशाचे गूढ इशारे
ते रणरणते निखारे, भयाण वादळी वारे
मिरवले मुखवटे खोटे, रमताना माया जाळी
धुक्यात हरवली स्मरणे, मी थकलो संध्याकाळी

भारी..

विशेष म्हणजे अश्याच विचारांच्या ओळी आपण एकाच दिवशी लिहिल्या..