सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ७: नाको ते ताबो

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
26 Sep 2019 - 6:51 pm

७: नाको ते ताबो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको

१ ऑगस्टचा तो दिवस! गलितगात्र अवस्थेमध्ये नाकोला पोहचलो. काय दिवस गेला! संध्याकाळी जवळ जवळ अंधार पडण्याआधी नाकोला पोहचलो! आयुष्यभरासाठीची अविस्मरणीय राईड! आणि तितकीच अविश्वसनीयसुद्धा नाकोमध्ये एका हॉटेलवाल्याचं नाव कळालं होतं, पण इतकं थकलो होतो की, रस्त्यावर दिसलेल्या हॉटेलमध्येच मुक्काम केला. पोहचलो तेव्हा खूप थंडी वाजत होती. गरम पाणी होतं, त्यामुळे आंघोळ केली. हळु हळु बरं वाटलं. गरम चहा घेतला, गरम जेवण घेतलं. सगळीकडे अद्भुत दृश्ये आहेत! दुपारपर्यंत हवामान छान होतं, पण आता खूप ढग आहेत. अनेक डोंगरांवर बर्फ दिसतोय. दूरवरचे पर्वत शिखर दिसत आहेत! समोरच एका डोंगरावर खूप उंचीवर एक मंदीरही दिसतंय. थंडी वाढत जाते आहे. आणि दूरवर दरीत एका रेषेसारखी स्पीति वाहताना दिसते आहे. इथे मोबाईल नेटवर्क अगदी नसल्यात जमा आहे. अगदी अपेक्षितच होतं ते. पण मोबाईल नेटवर्क जर पूर्णच नसतं, तर ठीक होतं. अगदी क्षीण नेटवर्क आहे. त्यामुळे एसएमएस पाठवता येतील अशी अंधुक आशा आहे. पण तरीही रात्रीपर्यंत फोन लावता आला नाही. फक्त दोन एसएमएस पाठवता आले व एक आला.

एक दिवस नाकोमध्येच पूर्ण आराम केला. पाच दिवस सतत सायकल चालवल्यानंतर शरीराबरोबर मनही थकलं आहे. त्यामुळे आणि नाकोची उंची बघता हा आराम गरजेचा आहे. सकाळी नाकोची गोंपा बघण्याचीही इच्छा झाली नाही. हॉटेलच्या खिडकीतून समोरच्या रस्त्यावरून दोन सायकलिस्ट पुढे गेलेले दिसले. त्यांच्या सायकली वेगळ्या आहेत आणि सोबत सामानही नाहीय, हे मला भेटले ते नाहीत, दुसरे असणार. मध्ये मध्ये नेटवर्क येत होतं तेव्हा एसएमएस जात होता व येतही होता. मस्त आराम केला. गावामध्ये फिरण्याची इच्छाही संध्याकाळीच झाली. जेव्हा मस्त ऊन पडलं आणि ताजतवानं वाटलं, तेव्हा नाको गावात चक्कर मारली. इथे एक प्राचीन गोंपा आहे. बाजूलाच एक तलावही आहे. इथे मला दोन स्पॅनिश सायकलिस्ट थकून येताना दिसले! त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना म्हणालो की, एक दिवस इथे आराम करावा, उपयोगी पडेल. नाकोमधील एक बुजुर्ग सोशल एक्टिव्हिस्ट शांताकुमार नेगीजींचा एक कॅम्प इथे असतो, हेही कळालं. पण नीट संपर्क होत नसल्यामुळे त्यांना कोणाला भेटता आलं नाही. फक्त दोन किलोमीटर सायकल चालवून आलो. त्यामध्येच तीव्र थंडी वाजत होती. संध्याकाळी हवामान परत बिघडलं. पाऊसही झाला. हॉटेल रस्त्यावरच असल्यामुळे सतत येणारे जाणारे प्रवासी दिसत होते. एकदा एक एक्टिव्हा जवळजवळ बंद पडत असलेली चढत येताना दिसली! आणि जवळजवळ बंद पडत असूनही ती चालत पुढे गेली!

नाकोतल्या हॉटेलच्या मालकिणीसोबत थोड्या गप्पा झाल्या. त्या स्थानिक आहेत, पण हॉटेलचे इतर कर्मचारी बिहारी आहेत! हॉटेलजवळच रस्ते व अन्य बांधकामाचे मजूर झोपड्यांमध्ये राहतात. मजुरांची कुटुंबही इथेच राहतात. काम करणा-या महिला आणि अनेक मुलं! त्यांचीही अवस्था वाईटच दिसते आहे. हॉटेल मालकिणीने सांगितलं की, इथे जवळ चांगलं रुग्णालय नाही आहे. चांगल्या रुग्णालयासाठी खाली पोवारीला जावं लागतं. स्थानिक लोकांचं आयुष्यही संघर्षपूर्ण आहे. काही सुविधा नाहीत. थंडीमध्ये तर सगळे डोंगर पांढरी शुभ्र चादर ओढून झोपतात. रस्ता तसा चालू असतो, पण बाकी जीवन जणू निद्रिस्त होतं. खरंच फार अवघड प्रदेश आहे हा. एक दिवस आराम केल्यानंतर शेवटी ताजतवानं वाटलं. ताप आल्यासारखं वाटत होतं ते कमी झालं. शिवाय शरीरालाही ३६०० मीटरच्या उंचीसोबत स्वत:ला जुळवून घेण्यासाठी वेळ मिळाला. आता मी‌ तयार आहे ताबोला जाण्यासाठी! ताबोला पोहचेन तेव्हा औपचारिक क्षेत्रामध्ये स्पीति क्षेत्रामध्ये प्रवेश होईल.

३ ऑगस्टची सकाळ! निघायला तयार झालो. ताबोमध्ये नेटवर्क मिळेल, अशी आशा आहे! निघाल्यानंतर पहिले चार किलोमीटर तीव्र चढ आहे. रस्ता सतत वर चढतोय. अगदी हळु हळु सायकल चालवत राहिलो. मध्ये मध्ये थांबावंही लागतंय. चांगलं ऊन पडलंय व त्यामुळे गरमही वाटायला सुरुवात झाली. चार किलोमीटरनंतर कुप्रसिद्ध मलिंग नाला आला! तसं माहिती होतंच की, सकाळच्या वेळेत तो ओलांडणं इतकं कठीण असणार नाही. आता तसा तो इतका पागल नाला राहिलेला नाही. एके काळी ह्या नाल्याच्या फोर्समुळे बस दरीत फेकली‌ गेली होती. त्यामध्ये रस्ताही वाहून गेला. आता नवीन रस्ता काही अंतर वर जाऊन नाला ओलांडून जातो. त्यामुळे आता पहिल्याइतका धोका राहिलेला नाही. परंतु तरी इथे अनेक सूचना दिल्या होत्या की, ब्रेक तपासून घ्या, वेग कमी करा इ. इथे रस्ता जवळजवळ ३८५० मीटर उंचावर ग्लेशियरचं पाणी ओलांडून जातो. हा एक मोठा धबधबा आहे. दूरवरूनच त्याची गर्जना ऐकू येते आहे. रस्त्यावर काही ठिकाणी‌ मजूर काम करत आहेत, पण नाल्याजवळ कोणी नाहीय. नाल्याच्या पलीकडे काही मजूर दिसत आहेत. इथे पायी पायी जावसं वाटलं. नाल्यातलं काही पाणी बीआरओ पाईप लावून मोटरद्वारे खाली फेकते. चार पाच जाड पाईप आहेत तेही! तरीही‌ नाल्यामध्ये भरपूर पाणी‌ आहे. पण आता ते पसरलं आहे, त्यामुळे रस्त्यावर पाण्याचा थर जास्त मोठा नाही आहे. चप्पल घातलेली असल्यामुळे सरळ तिथून चालत गेलो. एक सेकंद भिती वाटली, पण दुस-या सेकंदाला पार गेलो! वाह! आजची मुख्य परीक्षा तर झाली!

पण त्यानंतर जो भयानक उतार सुरू झाला, तो जवळजवळ वीस किलोमीटर चांगोपर्यंत सुरू राहिला! इतका सुंदर रस्ता- सतत खाली उतरत जातोय! उतरतच जातोय! इथेही मिलिटरीच्या अनेक वाहनांना सॅल्युट केलं. नंतर एका सरदारजीचा ट्रक क्रॉस झाला! त्याने मला सॅल्युट केला आणि दोघंही खूप हसलो! असा हा रस्ता! आता स्पीति येईपर्यंत सतत तो खाली उतरेल! आणि मी जितकं खाली उतरेन तितकं नंतर मला वर चढायचं आहे! पण काय सुंदर दृश्ये! मी एका वेगळ्याच अज्ञात जगामध्ये पोहचलो आहे!

खूप वेळाने तो उतार संपला आणि मग परत गरम व्हायला सुरुवात झाली. स्पीति नदी जवळ आल्यामुळे परत थोडा हिरवा रंग दिसला. आता हॉटेल पाहिजे. पण नाही मिळालं. मग सोबतचे बिस्कीटं खाल्ले. हॉटेल मिळणार नाही, असं वाटत असतानाच चांगो गावाचं मुख्य ठिकाण आलं आणि तिथे हॉटेलही मिळालं. इथे आलू पराठा खाल्ला व परत चहा- बिस्कीटही घेतलं. इथून पुढे सुमडोपर्यंत रस्ता परत एकद तिबेटच्या अगदी जवळ जाईल. परवाच्या खाब ब्रिजसारखंच सुमडो तिबेटच्या अगदी जवळ आहे. तिबेटी/ लदाख़ी भाषेत सुमडोचा अर्थ होतो संगम! नक्कीच इथे तिबेटवरून येणारी एखादी नदी स्पीतिला मिळत असणार. इथे परत एकदा मिलिटरीचं चेक पोस्ट लागलं. त्यांना जय हिंद म्हणून पुढे निघलो. इथेही नदीने एक ब्रिज ओलांडला आणि परत वळून जायला लागली. ह्या पट्ट्यामध्ये रस्ता छानच आहे. मध्ये मध्ये बीआरओचे सुंदर विचारही आहेत- हिन्दी हमारी मातृ भाषा है, एक मात्र भाषा नही! इथे फोटोजच्या बरोबर ह्या सुविचारांचंही एक छान कलेक्शन करता येऊ शकतं.

सुमडोपर्यंत काहीच अडचण आली नाही. एका जागी हिम ऊर्जेचं केंद्रही दिसलं. सुमडोमध्ये मला एक मेजर भेटू शकत होते, पण भेट झाली नाही. काही जवानांना जय हिंद म्हणून पुढे निघालो! इथून लाहौल- स्पीति जिल्हा सुरू झाला! व्वा! रस्ता परत एकदा वळाला आणि स्पीतिसोबत पुढे निघाला. परत एकदा तिबेटचे पर्वत जवळून बघता आले. पण इथपासून रस्त्याचा दर्जा ढासळला. थोड्या वेळाने गियू गावाजवळचा नाला लागला. ह्या गियू गावामध्ये एक गोंपा आहे. इथे एक प्राचीन ममी आहे व तिचे केस अजूनही वाढतात, असं म्हंटलं जातं. ती गोंपा रस्त्यापासून आठ किलोमीटर आत असल्यामुळे गेलो नाही. ताबो अजूनही पंचवीस किलोमीटर दूर आहे. मध्ये मध्ये छोटे गावं लागत आहेत. परत एकदा फ्युएल भरलं. दुपार झाली असल्यामुळे राजमा- चावल घेतलं. त्या हॉटेलात काही फॉरेनर्सही आले आहेत आणि गमतीची गोष्ट म्हणजे ते मात्र मागून चपाती घेत आहेत! आणि मी पोटाला हलकं म्हणून भातच घेतोय. खरंच ह्या फॉरेनर्सचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इथेसुद्धा हॉटेल कर्मचारी बिहारीच आहेत!

ताबोच्या काही अंतर आधी रस्ता परत एकदा काहीशा भितीदायक जागेतून जातोय! पण मला आता काही विशेष वाटत नाही. आरामात जात राहिलो. मध्ये मध्ये चढ आहेत, पण इतके तीव्र नाहीत. ताबोच्या आधी लारी गाव आलं. खूप वेळेनंतर इथे हिरवा रंग दिसला, शेतीही दिसली! ह्या रखरखीत करड्या हिमालयात आता हिरवळ फारच विरळ झाली आहे. किन्नौरची सुरुवात आठवतेय- हिरवागार हिमालय जो चार दिवसांपूर्वीच मागे पडला! आता तर ही तिबेटची भूमी आहे! आणि नैसर्गिक दृष्टीने तर निश्चितच ह्याला विदेश म्हणायला हवं. कुठे आपण समुद्र सपाटीवरचे प्राणी आणि कुठे हा यक्ष किन्नर लोक! कुत्रे, गाय अशा जनावरांमध्ये तर खूप फरक होऊन जातो! त्यामुळे शरीरालाही त्रास होत आहे. पोटाची समस्या आहे. बघू कसं होतं पुढे. दुपार संपण्याच्या आधी ताबोला पोहचलो! आज सुमारे ६१ किलोमीटर झाले. इथेही एका हॉटेलवाल्याचं नाव कळालं होतं. पण त्यांच्या हॉटेलात जागा नव्हती. लगेचच बाजूला एक स्वस्त होम स्टे मिळाला. ताबो! वा! आज स्पीतिमध्ये पोहचलोच शेवटी! समोरच्या डोंगरावर ॐ मणि पद्मे हुम् लिहिलेलं आहे. संध्याकाळी आराम करून झाल्यावर ताबो गोंपा बघितली. हीसुद्धा अतिशय प्राचीन आहे. गोंपामध्ये तिबेटी लिपी बघून छान वाटलं! काय दिवस गेला हा पण!


बादल आवारा ताबो!


आजचे चढ- उतार

पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ८: ताबो ते काज़ा

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

क्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

सर्व भाग वाचायला घेत आहे, प्रतोक्रिया देइनच त्या नंतर

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2019 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सफर. यावेळचे फोटो खास आवडले.

दर फोटोच्या मार्गाचा नकाशा टाकता आला तर वाचनाला मदत होईल व अजून जास्त मजा येईल.

सुधीर कांदळकर's picture

28 Sep 2019 - 7:08 am | सुधीर कांदळकर

अक्षरश। थरारक आणि प्रत्ययकारी वर्णन.


कुठे आपण समुद्र सपाटीवरचे प्राणी आणि कुठे हा यक्ष किन्नर लोक! कुत्रे, गाय अशा जनावरांमध्ये तर खूप फरक होऊन जातो! त्यामुळे शरीरालाही त्रास होत आहे. पोटाची समस्या आहे. बघू कसं होतं पुढे.


वा! काय शब्दांकन आहे! हे लाईव्ह असते तर डीप्रेशन आले असते. पुभाप्र. धन्यवाद.

मार्गी's picture

28 Sep 2019 - 12:11 pm | मार्गी

सर्वांना अनेक धन्यवाद! @ डॉ. म्हात्रे सर, रस्ता इथे एकच आहे! शिमला साईडने स्पीतिकडे जाणारा एकच रस्ता. पुढच्या भागात रूट मॅप पण देतो. धन्यवाद.