इंदोरची खाऊ गल्ली!

Primary tabs

kool.amol's picture
kool.amol in भटकंती
8 Apr 2019 - 4:05 pm

कधी कधी रुटीन ह्या शब्दाचा देखील कंटाळा येतो इतकं ते
चालू असतं. मागच्या आठवड्यापर्यंत आमचा दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ हाच कार्यक्रम चालला होता. अचानक तब्बल 4 दिवसांचा दौरा ठरला. तोदेखील इंदोर, उज्जैन आणि ओंकारेश्वर असा भरगच्च. आता इंदोर म्हणलं की लगेच तुमच्या समोर तिथली खादाडी आली असणार, माझ्या पण आली. आता एक जबाबदारी असते. म्हणजे नुसतच गेलो, खाल्लो आणि परतलो असं जमत नाही. तिथले सुंदर फोटो जमलंच तर व्हिडिओ, पाककृती यांची माहिती घ्यावी लागते आणि आपल्या मैत्रिणींना सांगितल्यावरच खादाडी पूर्ण होते. त्यामुळे मी देखील खादाडी व्यवस्थित प्लॅन केली.

इंदोर म्हणजे खवय्या लोकांच शहर. इथे आवर्जून भेट देण्यासारख्या 2 जागा एक म्हणजे सराफा बाजार आणि दुसरी म्हणजे छप्पन गल्ली! आता ही नावं का पडली ते सांगतो. सराफा बाजार हे खाण्याचं ठिकाण कस काय असू शकतं असा प्रश्न मलाही पडला होता. पण तीच तर गंमत आहे. इथल्या प्रसिद्ध राजवाड्याच्या मागच्या बाजूला सराफा बाजार आहे. हे मार्केट 8.30 ला बंद झालं की इथे एक एक करून आणि एक से एक खाण्याची दुकानं सुरू होतात. म्हणजे त्या सराफाच्या बंद दुकानासमोर. सराफा बाजाराची एकदम खाऊ गल्ली होऊन जाते. म्हणून याला हे नाव. रात्री 1-2 वाजेपर्यंत मग सोहळा चालू असतो. मी इथेच गेलो होतो. काही दुकानं, हातगाड्या जरी 8.30 नंतर सुरू होत असली तरी प्रसिद्ध दुकानं दिवसभर सुरू असतात. त्यापैकीच काही मोजक्या पदार्थांची ही सफर खास खादाड खाऊंसाठी सादर करत आहे...

ठीक 8 वाजता मी सराफा बाजारच्या गल्लीच्या तोंडाला उभा होतो. सगळी ज्ञानद्रिय अनुभवासाठी एकवटली होती. डोक्यात खाण्याशिवाय कुठलेही विचार नव्हते. माझ्यासोबत माझे इंदोरचे मित्र होते. जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ते माजलेले वळू कसे फुरफुरतात तसा मी देखील फुरफुरत होतो. बायको मला वेसण घालण्याचा प्रयत्न करत होती. सर्वप्रथम तिथे प्रसिद्ध असलेल्या आणि गल्लीच्या तोंडावरच असलेल्या विजय चाट हाऊस इथे मी धडकलो. कचोरी, ढोकळा हे नेहमीचं खाणं नको असं मित्राने सांगितलं आणि खोपरा पॅटिसची ऑर्डर गेली. अरुंद रस्ता, गर्दी ह्यापैकी कशाचीही पर्वा न करता मी बरोबर पॅटीसचा द्रोण उचलला. अप्रतिम तुम्हाला सांगतो. अहाहा. आतमध्ये खोबऱ्याचा भरपूर किस, चिंचेची आंबटगोड चटणी, हिरवी चटणी असं अफलातून मिश्रण. इतरही पदार्थ आहेत इथे पण हे पॅटिस सोडू नका. एकच पोट असल्यामुळे आणि इतरही पदार्थ खायचे असल्यामुळे फक्त 2च पॅटिस खाऊन जड मनाने पुढे सरकलो.

त्यानंतर गाठला कोकोनट क्रश. शहाळ्यातली मलई, पाणी इतर घटक पदार्थ एकत्र करून हा शेक बनवतात याची जास्त दुकानं नाहीत पण चव छान आहे. कल्पकतेने बनवला आहे हा शेक. भरपूर खोबरं पोटात गेलं होतं त्यामुळे मी पुन्हा माजल्या वळूसारखा फुरफुरायला लागलो.

मग आम्ही मोर्चा वळवला जोशी दहिवड्याकडे. इकडे याला दहीबडा म्हणतात आणि ते खरं देखील आहे. हा वडा खूपच बडा आहे. हा इथला सर्वात प्रसिद्ध आयटम. याच वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार आणि दह्याची चव. घट्टसर दही, छान गोड चव आणि 5 मसाले यात टाकले जातात. हे मसाले 5 बोटांच्या चिमटीत घेऊन एका विशिष्ट क्रमाने टाकले जातात. हे जोशी काका हे मसाले टाकण्याआधी दहिवड्याचा भरलेला द्रोण उंच फेकतात. थोडं सुद्धा दही सांडत नाही. मला काही ही सर्कस फारशी आवडली नाही. खेळत काय बसायचं?पण लोकांना तेच जास्त आवडत होतं. तशी फर्माईश पण करत होते लोकं. मला गंमत वाटली. पण जर तुम्ही दहिवड्याचे शौकीन असाल तर एकदा तरी हा दहिवडा खाच. इतका चविष्ट आहे तो. मोठ्या प्रयत्नांनी 2 दहिवडे रिचवले. त्यातही दुसरा बडा बायकोला खाऊ घातला. माझं प्रेम मी सिद्ध केलं.

मग मागवला, भुट्टे का किस. म्हणजे आपलं मक्याचं कणीस. हा देखील मस्त आहे पदार्थ. मक्याचा किस दुधामध्ये शिजवला जातो. आणि मग चाट मसाले टाकून द्रोणात खायला देतात. शक्यतो मधु मका वापरला जातो. वेगळी आहे चव. एकदा जरूर चाखावी अशी.

आता वळूच रूपांतर सुस्तवलेल्या रेड्यात झालं होतं. कारण पोटात जागा नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. थोडी चक्कर मारून आलो आणि एखादा पदार्थ खाता येईल अशी शक्यता निर्माण झाली. समोरच एक नवीन पदार्थ दिसला. गराडू. नाव जरा विचित्र वाटलं. हे काय आहे सांगतो. रताळ्याच्या कुटुंबातील एक कंदमूळ म्हणजे गराडू. ह्याला चांगलं वर्षभर ठेवतात आणि काढतात मग ह्याला तळतात. आणि मग मस्तपैकी मीठ आणि चाट मसाला टाकून खातात. रताळ्याला स्वतःची एक चव असते तशी ह्याला नाही. कुटुंबातल्या मठ्ठ लेकराला पाहुणे आले की कस चांगले कपडे घालून, गंध पावडर करून त्यातल्या त्यात सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करतात तसला प्रकार वाटला मला. तरीही एखादा ठोंब्या आपला पोपट करतोच तसंच काहीतरी ह्या पदार्थाचं झालंय. नाही खाल्ला तरी चालेल. ह्यावर माझं नाव लिहिलेलं होतं म्हणून मी तो खाल्ला इतकंच. आता मात्र काहीही पोटात जाणं शक्यच नव्हतं. जिभेवर सगळ्या चवी फेर धरून नाचत होत्या. शांत वाटत होतं. इतरही अनेक पदार्थ आहेत इथे चाखण्यासारखे जसं की मोठी जिलेबी किंवा आपण तिला जिलेबा म्हणू. हिचा(की ह्याचा) आकार जरा जास्तच मोठा असतो चव काही फार वेगळी नसते असं मित्राचं म्हणणं आलं. खाणं तर शक्य नव्हतंच. त्यामुळे ते टाळलं. गुलाबजाम देखील जागोजागी दिसत होते. बाकी फायर पान आणि धुवा पान आताशा मिळायला लागलेत. त्यामुळे काही मोजक्याच पदार्थांचा आस्वाद घेऊन आणि तृप्त होऊन आम्ही सराफा बाजाराचा निरोप घेतला. बाकी सराफा बाजारात जाऊन सोन्यासारखं अन्न खाण्याची ही एकमेव जागा भारतात असावी असा मला दाट संशय आहे.

श्री अन्नपूर्णा प्रसन्न!

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

8 Apr 2019 - 5:14 pm | श्वेता२४

तेवढे फोटो टाकले असते तर बरं झालं असतं

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 5:16 pm | चौथा कोनाडा

भारी खादाडी धागा !

ही जागा विलक्षण आहे, एकदा गेलं तिथं की परत परत बोलवत असते.

आता पर्यंत एकदोनदाच योग आलाय बघू पार्ट कधी जाणं होतं ते !

बाकी सराफा बाजारात जाऊन सोन्यासारखं अन्न खाण्याची ही एकमेव जागा भारतात असावी असा मला दाट संशय आहे.
+१

आम्ही ही खादाडी नाही केली कारण रात्री साडे आठनंतर!!

उगा काहितरीच's picture

8 Apr 2019 - 9:01 pm | उगा काहितरीच

फोटो फोटो !

पाषाणभेद's picture

8 Apr 2019 - 10:47 pm | पाषाणभेद

मी देखील काही वर्ष इंदूरवासी होतो. काम तसे फारसे नसल्याने मी अन ऑफीसचा माझ्या वयाच्या बरोबरीचा प्यून खाऊ गल्लीच्या अन बाकीच्या इंदूरमध्ये मनमुराद दिवसा अनेकदा भटकलेलो आहे. मुळ मध्य प्रदेशातले पण इंदूरला नोकरीला आलेले मुलं जेवढी भटकत नाहीत तेवढे आम्ही दोघे भटकलेलो आहे. पायी. अन त्यामुळे इंदूरचा कोपरा न कोपरा ओळखीचा झाला होता.
सराफ्यात रात्री बर्‍याचदा गेलो अन तेथील अनूभवही घेतला. एक लेखच लिहावा लागेल.

तुम्ही इंदूर म्हणत अन लिहीत चला. आपल्यासाठी इंदूर, ग्वाल्हेर, बडोदाच. इंदोर, ग्वालीअर, बरोडा नाही.

kool.amol's picture

9 Apr 2019 - 10:52 am | kool.amol

तुमचं बरोबर आहे. पुढच्या वेळेस काळजी घेईन. आणि एखादा लेख लिहाच. तुम्हाला जास्त माहिती आहे इंदुरची.

kool.amol's picture

9 Apr 2019 - 10:58 am | kool.amol

तुमचं बरोबर आहे. पुढच्या वेळेस काळजी घेईन. आणि एखादा लेख लिहाच. तुम्हाला जास्त माहिती आहे इंदुरची.

जेम्स वांड's picture

12 Apr 2019 - 2:43 pm | जेम्स वांड

आमच्यासाठी मुंबई पुणे नाही बॉम्बे पुनाच आहे म्हणले तर चालेल का हो?

नाही म्हणजे वादात पडायची इच्छा अन आवड दोन्ही नाही पण स्थापनकर्ते होळकर गेले सगळे लयाला, आजमितीला जे उच्चार शब्दरचना स्थानिक जनता वापरते त्याचा आदर करणे गरजेचे नाही का? मद्रासला चेन्नई केले गेले तसे पुढेमागे जर इंदौरकरांनी इंदूर केलं कागदोपत्री अन सरकारी पातळीवरून तर इंदूर म्हणायला मी पहिला असेल इतकं मात्र नक्की.

रमेश आठवले's picture

14 Apr 2019 - 6:53 pm | रमेश आठवले

बडोदा नाही बडोदे .

सोन्या बागलाणकर's picture

9 Apr 2019 - 6:50 am | सोन्या बागलाणकर

वाह!
खादाडी आवडली. इंदुरी पोह्याबद्दलही बरचं ऐकून आहे.

ठुसकीसोडा's picture

6 May 2019 - 4:30 pm | ठुसकीसोडा

कसले ते इंदोरी पोहे .. नुसती बदाबदा साखर ओततात

शाली's picture

9 Apr 2019 - 7:37 am | शाली

मस्तच!
फोटो हवेच होते.

सर्वांचे आभार. फोटो असायला हवेत हे खरंय. माझ्याकडे आहेत देखील पण मि पा वर फोटो टाकणं अजूनही जमत नाहीय. हंपीच्या लेखमालेत देखील हीच अडचण येते आहे.

ब्लॅागवर टाका फोटो. तिथून इकडे आणणे अगदी सोप्प आहे.
ब्लॅागवरच्या फोटोवर क्लिक केले की अड्रेसबारमध्ये लिंक मिळते ती
<img src="लिंक" width ="480"/>
इथे बदलून कॅापी पेस्ट करा.

अनिंद्य's picture

9 Apr 2019 - 3:31 pm | अनिंद्य

भुकेच्या वेळी हा लेख वाचून फार खा-खा झाले.

इंदोरी खानपान म्हणजे चंगळ ! आणि शाकाहारी असल्याचा कॉम्पलेक्स अजिबात न देणारे शहर.
लेखात 'सराफा'च्या कौतुकात 'छप्पन दुकान' झाकोळले गेले आहे मात्र :-)

kool.amol's picture

12 Apr 2019 - 10:46 pm | kool.amol

धन्यवाद. अहो खर तर तिथे देखील जायचं होतं पण उज्जैन, ओंकारेश्वर इथला प्लॅन असल्यामुळे इंदोरला जास्त वेळ देता आला नाही. 56 गल्ली देखील तोडीस तोड आहे असं ऐकून आहे. पुढच्या वेळेस नक्की प्लॅन करीन.

अनिंद्य's picture

15 Apr 2019 - 12:18 pm | अनिंद्य

उज्जैन + ओंकारेश्वर पण झाले तुमचे, वा !

छप्पन गल्ली नाही, छप्पन दुकान :-)

रमेश आठवले's picture

9 Apr 2019 - 11:16 pm | रमेश आठवले

इंदूरचे हे दोन पदार्थ खास. १. लच्छेदार रबडी आणि दुधा बरोबर जलेबी . मराठमोळ्या पोह्यावर शेव पेरून त्याला माळवी साज चढवला इंदौर ने.

जेम्स वांड's picture

12 Apr 2019 - 2:45 pm | जेम्स वांड

म्हणलं का बनारस सोडून दुसरीकडची आवडणं शक्य नाही आठवले काका मला तरी :)

निशाचर's picture

13 Apr 2019 - 3:35 am | निशाचर

डिसेंबरमधे प्रथमच इंदूरला गेले होते. तेव्हा दोनदा सराफ्याला जाऊन खादाडी केली होती, त्या आठवणी जाग्या झाल्या.

गराडू मलाही खास आवडलं नाही. कोकोनट क्रश आणि शिकंजी ही प्रकरणं मात्र भारी होती. बाकी खोबरा पॅटीस खावे ते कोकणातल्या गोरेगावच्या एस्टी स्टँडवरचे.

फोटो टाकण्यासाठी डॉ म्हात्रे यांचा हा धागा उपयोगी आहे. किंवा तुमची हरकत नसेल तर मी टाकेन फोटो.

kool.amol's picture

13 Apr 2019 - 3:01 pm | kool.amol

नक्की टाका फोटो. मी पण प्रयत्न करेन. फोटोसकट खादाडी असेल तर सोन्याहून पिवळं.

गोरगावलेकर's picture

13 Apr 2019 - 12:18 pm | गोरगावलेकर

मस्तच. जायला हवे एकदा.
पूर्वी मोदक यांच्या धाग्यावर याबद्दल वाचले होते आणि फोटोही पाहिले आहेत. आता मात्र फोटो दिसत नाहीत.
http://www.misalpav.com/node/31154

निशाचर's picture

14 Apr 2019 - 5:27 am | निशाचर

(वि. सू.: फोटो पाहून भूक लागल्यास मंडळ जबाबदार नाही!)

इंदूरचा सराफा आणि खाद्यसंस्कृती याबद्दल बरंच ऐकलं होतं, त्यामुळे इंदूरला जाण्याचा खादाडी हा एक हेतू होताच. सराफ्याला दोनदा गेल्यामुळे छप्पन दुकानला जायचं मात्र राहून गेलं.

इंदूरला नजरेत भरणारी स्वच्छता सराफ्यातही बर्‍यापैकी होती. कुठेही कचरा नव्हता. रात्रीची वेळ आणि गर्दी असली तरी सगळ्या वयोगटातल्या बायका आणि मुलीही होत्या. त्यामुळे बिनधास्त फिरता आलं. एकच खटकलेली गोष्ट म्हणजे रिक्षा किंवा चारचाकी गाड्यांना परवानगी नसली तरी दुचाक्या बेधडक गर्दीत घुसत होत्या.

सुरूवात केली ती विजय चाट पासून. तिथले खोबरा पॅटिस आवडले, समोसा काही खास नव्हता. चटण्या कमी दिल्या असत्या तरी चाललं असतं. सराफ्याचा फेमस जोश्यांचा दहिवडा मस्त होता, पण त्यांच्याकडचा भुट्टे का किस जास्त आवडला. मिरचीवडे मात्र नव्हते. पहिल्या दिवशी दहिवड्याचा द्रोण वर फेकणे वगैरे प्रकार नव्हता, गर्दीही कमीच होती. दुसर्‍यांदा गेलो तेव्हा तिथे पर्यटकांचा मोठा ग्रुप आलेला होता. त्या गर्दीत शिरण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि दुसरीकडे दहिवडा खाल्ला.

. . . . .

दोसे, पावभाजीपासून आम्ही लांबच राहिलो. गराडूची चव थोडी कणगरांसारखी वाटली. ते नुसतं उकडून किंवा भाजून खायला आवडलं असतं. एका ठिकाणी बटाट्याच्या पॅटिसचे बरेच प्रकार होते, खूप गर्दीही होती. तिथे छोलेपॅटिस खाल्ले ते अजिबात आवडले नाहीत. त्यापेक्षा काडीला लावून तळलेल्या बटाट्याच्या चकत्या मस्त होत्या.

. . . . .

गोडातही बरेच प्रकार होते. तिळाचं गजक चाखलं. रबडी मस्त होती, अति गोड नव्हती. गरमागरम गुलाबजाम आवडले, पण ते काय कुठेही मिळतात. दुसर्‍या दिवशी रबडी आणि मालपुवा हे कॉंबिनेशन खाल्लं. गोडात सगळ्यांत जास्त आवडली ती पियुषची चुलतबहिण शिकंजी आणि सीताफळ कुल्फी.

. . . . .

. . .

तात्पर्यः चवीनं खायला आणि रात्री भटकायला आवडत असेल तर इंदूरला गेल्यावर सराफ्याला अवश्य भेट द्यावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2019 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रबडी लैच आवडली होती मलाही. बाकी छायाचित्रांबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

15 Apr 2019 - 12:21 pm | अनिंद्य

फोटो टाकतांना मंडळाने जबाबदारी सपशेल नाकारली आहे, पण फोटो पाहून पुन्हा खा खा झाले :-)

सोन्या बागलाणकर's picture

16 Apr 2019 - 12:53 pm | सोन्या बागलाणकर

कैसी जीभ लपलपायीं! =)))

ज्योति अळवणी's picture

28 Apr 2019 - 12:32 am | ज्योति अळवणी

निशाचरजी,

तुम्ही टाकलेले फोटो आणि केलेलं वर्णन वाचून कधी एकदा इंदोरला जाते असं झालंय. पण आता मे महिन्यात खूपच गरम होईल. बघू नोव्हेंबर-डिसेंबर जमलं तर

पण वाचून आणि बघून मजा आली

अरे वा! अवश्य जा. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मस्त थंडी असेल. इंदूरच्या आसपास फिरायलाही खूप जागा आहेत.

कंजूस's picture

14 Apr 2019 - 9:48 am | कंजूस

दहीबडा बटरचा दिसतोय.

पावबटरचं कडक बटर असतं ते वापरतात. उडिदवडा नाही. फोटोत तसा वाटतोय.

बटर नाही, उडिदवडाच होता. पण हलका होता आणि पाण्यात जास्त वेळ भिजवला असावा.

सिक्रेटसुपरस्टार's picture

17 Apr 2019 - 2:10 am | सिक्रेटसुपरस्टार

सुंदर! वाचूनच भूक लागली.

कंजूस's picture

17 Apr 2019 - 8:18 am | कंजूस

>>>फोटो टाकतांना मंडळाने जबाबदारी सपशेल नाकारली आहे,>>>
कोणते मंडळ?

अनिंद्य's picture

22 Apr 2019 - 2:00 pm | अनिंद्य

फोटोसोबत असलेल्या '(वि. सू.: फोटो पाहून भूक लागल्यास मंडळ जबाबदार नाही!)' ह्या सूचनेला होता तो प्रतिसाद :-)