कायदा

anandkale's picture
anandkale in जनातलं, मनातलं
21 Feb 2019 - 7:07 pm

तो दिवस मी कधी विसरणार नाही. त्या दिवशी खंड्या शाळेत जरा ऊशीराच आला, कपडे सुध्दा चुरगाळलेले होते. मागच्या बाकावर जाऊन एकटाच बसला, कुणाशी काही बोललासुध्दा नाही.
मधल्या सुट्टीत पोरांचा गराडा खंड्याभोवती पडला. सगळे नेहमीप्रमाणे खंड्याची टवाळी करू लागले. सुताराचा सुशील त्यात नेहमीप्रमाणे पुढे होता.
" काय बाप मेल्यासारखा तोंड करून बसलाय बघा"
बाप हा खंड्याचा वीक पाॅईट. खंड्याचा बाप मिलेट्रीत होता. कुठेतरी काश्मीरमधे अतिरेक्यांशी लढत होता. काही शौर्यपदकेही खंड्याच्या बापाच्या नावावर होती. गावातल्या ज्या काही थोड्या लोकांचा पेपरात फोटो आला होता त्यात खंड्याचा बाप एकदम नामचिन होता. एरवी खंड्या त्या टवाळखोरांच्या वारयाला उभा रहात नसे पण त्या दिवशी काही न बोलता तो खाली मान घालून बसून राहीला होता.
"माचीस पिक्चर पाहिला का बे? त्यात कसा दाखिवला बाॅम्ब लावून मिलेट्रीवाल्यांना ऊडवतात .ढिचक्यांव"
नेहमीप्रमाणे खंड्या दुर्लक्ष करून वर्गाबाहेर पडेल या अंदाजाने मी वर्गाबाहेर ऊभा होतो इतक्यात सुश्याने खंड्याची काॅलर पकडली.
"तुझ्याशी बोलतो बे. जब बाॅस कुछ पूछता हैं तो मूं खोलके जवाब देनेका."
अंगाला हात लागेपर्यंत दुर्लक्ष करायचे आणि अंगाला जर कुणी हात लावला तर त्याला सोडायचे नाही अशी खंड्याच्या बापाची शिकवण होती. काही कळायच्या आतच सुश्याच्या थोबाडावर ठोसे पडले होते. नाक फुटून रक्ताची धार लागली होती. जमिनीवर पडलेल्या सुशाची अवस्था सशासारखी जाली होती. त्याच्या ढुंगणावर दोन सणसणीत लाथा मारून त्याच तिरीमिरीत खंड्या दफ्तर घेऊन बाहेर पडला.
ऊठायची ताकद नसलेल्या सुशाभोवती पोरांचा गराडा पडला होता . त्याच्या गराड्याचा वेढा फोडून माझे दप्तर घेऊन मी बाहेर पडेस्तवर खंड्या तरातरा जाधवांच्या फॅक्ट्रीपर्यंत पोचला होता.
खंड्या थांब मीपण येतोय म्हटलं पण खंड्या थांबला नाही.अक्षरशः वाट फुटेल तिथे चालत राहिल्यासारखा जात राहीला. शेवटी धावतपळत मी त्याला शंकराच्या देवळापासच्या पांदीवर गाठलाच.
आता थांबतोस का बाबा, दम लागलाय मला म्हटल्यावर
खंड्या जरा हळू झाला आणि शेवटी शेतातल्या पंपाजवळच्या गवताच्या पेंढीवर पडून हमसून हमसून रडायला लागला .
"अरे मला काही सांगशील कां?"
"लंबू हत्ती, सूं सूं फुर्र, व्हॅ....."
आता याचं रडं थांबायला वेळ लागेल, एकदा रडायला लागलं की थांबतच नाही येडं. पण खरं सांगायचं तर लंबू हत्ती ऐकून माझ॔ टेन्शन कमी झालं. माझे बाबा म्हणाला असत तर मी खराच टेन्शनमधे आलो असतो.
हा लंबू हत्ती आम्हा पोरांचे आकर्षण होता . गावाबाहेरच्या देवळाजवळ एका झोपडीत त्याच्या माहूत सिध्दरामैया आणि झोपडीबाहेरच्या चिंचेच्या झाडाखाली लंबू हत्ती रहात. रामैयाची बायको कधी कुणाला दिसली नाही पण त्याच्या मुलाला परदेशात चांगल्या पगाराची नोकरी होती. कधीतरी पोराला ईंग्रजीत पत्र लिहून घ्यायला तो माझ्या बाबांकडे येई .
एरवी शाळा सुटली की आम्हा लंबूच्या झाडाकडे धाव घ्यायचो. हळूहळू घाबरत घाबरत लंबूच्या सोंडेला हात लावण्यापर्यंत माझी प्रगती झाली होती. खंड्या मात्र लंबू हत्ती चा जिगरी दोस्त झाला होता. त्याच्या सोंडेवरून ओढून पाठीवर बसणे, ऊभे रहाणे हे तर काही च नाही, एकापेक्षा एक कसरती करायचा. काही लोक तर त्याला ज्युनिअर माहूतच म्हणत.
"माहौत बनके कुच अच्चा नै मिलता। पडौ लिकौ अऊर कुच अच्चा बनौ।" असे रामैया आलेल्या प्रत्येक पोराला बजावायचाच .
आमच्या गावचे राजे कुठूनतरी हत्ती आणि हे माहूत कुटुंब घेऊन आले. हत्ती आणि माहुतांच्या दोन पिढ्या राजवाड्यातल्या हत्तीखान्यात सुखाने नांदल्या. हळूहळू राजवैभवाला उतरती कळा आली आणि रहाता राहिले रामैया आणि लंबोदर उर्फ लंबू. रामैयाचा मुलगा स्काॅलरशिप मिळवून चांगला शिकून परदेशात स्थाईक झाला. रामैयाला स्वतःबरोबर नेण्याची मुलाची फार इच्छा होती पण आपण गेलो तर लंबोदरचे काय होईल या चिंतेने रामैया काही जायला तयार नव्हता. शेवटी लंबोदरलाही सोबत नेण्याच्या बोलीवर म्हातारा तयार झाला. मुलाने तिकडच्या सर्व परवानग्या ही मिळवल्या पण हत्तीचा कायदेशीर मालक रामैया नसल्याने इकडच्या लोकांनी त्याला जाऊ दिले नाही.
"कुचबी करो वकीलसाब , मंग्तै ऊत्ना पयसा देतै लैकिन अप्पा और लंबूका पेपर्स बनवा दो" असे म्हणत रामैयाचा मुलगा राजू माझ्या माझ्या बाबांकडे आला होता पण प्रयत्न करूनही काही फायदा झाला नाही. हत्तीवर पोटच्या पोरापेक्षाही जास्त माया केली तरीही कायद्यासमोर माहूत हा हत्ती साठी ठेवलेला नोकर होता.
दरमहा हजारेक डॉलर पाठवायचा राजू बापाला की निदान बापाचे शेवटचे दिवस तरी सुखात जावेत. आपल्यानंतर लंबूचे काय होणार या काळजीने रामैया ते सर्व पैसे वाचवून बॅकेत टाकायचा आणि स्वतः एकवेळ जेवून रहायचा.
रोज सकाळी लंबूला घेऊन रामैया भाजीमार्केटला जायचा. तिथले दुकानदार आधल्या दिवसाची न खपलेली फळे व भाज्या कमी किंमतीत किंवा कधीकधी फुकट देत.
केळी, नारळ आणि ऊस हे लंबूचे फेवरीट. यापैकी काही बाजारात दिसले तरी लंबू अगदी लहान मुलासारखा हट्ट करून ते मिळवायचा .
इकडे खंड्याचे रडे थांबल्यावर सगळा ऊलगडा झाला . नेहमीप्रमाणे सकाळी बाजारात लंबू आणि रामैया फळे घेत
असताना कुठल्यातरी आचरट . ट्रकवाल्याने नारळाच्या आकाराचा दगड लंबूच्या सोंडेत दिला. एरवी लंबू नारळ सोंडेतच धरून फोडत असे पण नारळ फुटेना म्हणून त्याने तो दगड तोंडात घातला. कुत्सितपणे हसत तो ड्रायव्हर पळून चालला होता आणि लंबूने तो दगड सोंडेनेच लांब फेकला तो नेमका त्या माणसाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला. हत्तीने टाकलेला दगड तो, कवटी फुटून जागेवरच मेला तो माणूस . त्याच्याबरोबरच्या इतर ड्रायव्हर आणि क्लीनर लोकांनी एकदम दंगा सुरू केला . इतक्यात कुणीतरी सिध्दरामैयाच्या डोक्यात काठी घातली आणि लंबू आणखीनच बिथरला. लंबूच्या समोर येण्याची कुणाची छाती नव्हती पण पाठीमागून त्याला बडवणारे वीर काही कमी नव्हते.
भरीत भर म्हणजे काही ट्रकवाले त्यांच्या लाॅरीत पंक्चर काढायचा लोखंडी राॅड घेऊन लंबूला पाहिजे तसा मारत होते.
या धामधुमीची खबर लागताच खंड्या दप्तर टाकून तिथे धावला . लंबूला चुचकारून कसातरी बाहेर काढेपर्यंत खंड्याचे कपडे चुरगाळले. चिंचेच्या झाडापर्यंत लंबू पोहोचेपर्यंत पोलीस तिथे पोहोचले होते, त्यांच्याकडे हत्तीला बेशुध्द करणारी बंदूक होती . हत्तीला मारू नका म्हणत मधे तडमडलेल्या खंड्याला दोन मुस्कुटात मारून पोलिसांनी बाजूला केले आणि लंबूला बंदुकीने बेशुध्द करायचे इंजेक्शन टोचले.
संध्याकाळी बाबा रामैयाला जामिनावर सोडवून आमच्या घरी घेऊन आले. त्याच्यावर हिंस्र जनावर घेऊन पोलिसांची परवानगी न घेता गर्दीच्या ठिकाणी गेल्याचा आरोप ठेवून त्याला अटक केली होती. त्याला हत्तीपासून पाचशे मीटर लांब रहाण्याच्या अटीवर जामीन मंजूर झाला होता. संध्याकाळी लंबूला नगरपालिकेच्या आवारात जेरबंद करून ठेवलेला पाहून माझा जीव कसनुसा झाला. मला तर रात्री जेवणच गेले नाही. रात्री रामैयाला ताप भरला. बेशुध्दीत बडबड करीत होता
" राजासाबका सब कुच सरकारजमा किये तो हम लोग किधर जानेका, हमारा लंबूका हत्तीखाना लेको नगरपालिका बनाये वौ, अऊर राजासाबका जिगर का टुकडा लंबू, ऊस्कू भिकारी बना दिये। अब्बीबी देको ऊसका दातके वासते उसकू मार जाईंगे। मै आएगा लंबू, तेरे को लैकैच जायेगा। " असे काहीसे रात्रभर चालले होते.
सकाळी बाबानी रामैयाला हाॅस्पिटलला नेले आणि राजूला फोन करून सगळी हकीकत कळवली . पेपरमधे खुनी हत्तीवर मोठी बातमी आली होती. ती वाचली तर लहान मुलेसुध्दा त्याच्या अंगावर खुशाल खेळत यावर विश्वास बसणार कुणाचा .
खंड्या त्या दिवसापासून शाळेत आलाच नाही. त्याचे बाबा त्यांना सर्वाना त्यांच्या बदलीच्या गावी घेऊन गेले. मास्तरांनी वर्गात सगळ्यांना सांगितले की वन खात्याचे लोक लंबूला दूरच्या जंगलात नेऊन सोडणार आहेत. पण खरी गोष्ट मला माहिती होती. बाबा राजू ला बाजूला घेऊन इंग्लिशमधे सांगत होते त्यांना वाटलं मला समजणार नाही पण थोडं थोडं कळालच. बाबा सांगत होते की लंबू हत्ती आता मोठा झाला होता आणि माणसांत वाढल्याने त्याला जंगलात सोडलं तरी तो परिस्थिती शी जुळवून जगू शकणार नव्हता. त्याला मारून टाकणार हे कळल्यावर फार विचित्र असे काहीतरी वाटले.
बाजारात ऊस, केळी नारळ, दिसले की लंबू आणि खंड्या आठवतात. परवाच टी व्ही वर सव्वीस जानेवारीची परेड दाखवली . त्यात पहिले पथक हत्तीवर स्वार झालेल्या ऐटबाज सैनिकांचे होते ते पाहून एकदम लंबूवर बसून ऊस खाणारा खंड्या आठवला आणि एकदम रडू आले. काय झालं रे म्हणून आईनी जवळ घेतले पण खरे काय झाले ते फक्त बाबांनाच समजले . माझ्या डोक्यावरून हात फिरवत ते आईला म्हणाले
" आपल्याला वाटतं शामराव मोठा झाला पण अजुनी थोडा लहानच आहे. शिकेल जगाचा कायदा हळूहळू "
समाप्त

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

21 Feb 2019 - 9:17 pm | आनन्दा

....

शब्दानुज's picture

21 Feb 2019 - 10:35 pm | शब्दानुज

आवडली..

जगाचे काही कागदे शिकताना मोजावी लागणारी किंमत फार जबरदस्त असते.

anandkale's picture

21 Feb 2019 - 11:02 pm | anandkale

dhanyavad

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2019 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

:(

कथा आवडली.

कपिलमुनी's picture

22 Feb 2019 - 12:18 am | कपिलमुनी

छान लिहिले आहे .

रुपी's picture

22 Feb 2019 - 2:01 am | रुपी

सुरेख!

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

22 Feb 2019 - 2:29 am | झपाटलेला फिलॉसॉफर

खूप चांगली कथा आहे ...

अर्धवटराव's picture

22 Feb 2019 - 9:20 am | अर्धवटराव

भावस्पर्षी.

प्रमोद देर्देकर's picture

22 Feb 2019 - 9:33 am | प्रमोद देर्देकर

मस्त

यशोधरा's picture

22 Feb 2019 - 9:38 am | यशोधरा

:(
कथा खरी नसावी, अशी आशा आहे.

कथा पूर्णपणे कल्पित आहे. सत्याशी थोडाफार संबंध असलाच तर लहानपणी एका सर्कशीतल्या हत्तीला केवळ तो माजावर आल्याने साखळदंड बांधून जेरबंद करून ठेवलेले पहिले होते. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

शामरावच काय माझ्याही डोळ्यात पाणी आले. मस्त.
लिहीत राहा

anandkale's picture

22 Feb 2019 - 7:38 pm | anandkale

धन्यवाद

उपेक्षित's picture

22 Feb 2019 - 1:06 pm | उपेक्षित

खूपच मस्त, नकळत मालगुडी डेज ची आठवण आली. असेच लिहित राहा

खूप छान आहे कथा. भावस्पर्शी.

मिलिट्रीत बाप असणाऱ्या मुलाला कोणी "बाप मेल्यागत काय ~~" असं बोलत नाही चुकूनही.

कदाचित माझ्या गावातली मुले जास्त व्रात्य असतील. पण मुद्दा बरोबर वाटतो.

विशुमित's picture

22 Feb 2019 - 3:10 pm | विशुमित

आवडली..!!

मराठी कथालेखक's picture

22 Feb 2019 - 7:41 pm | मराठी कथालेखक

छान लिहिलंय...

anandkale's picture

22 Feb 2019 - 7:41 pm | anandkale

धन्यवाद. आपल्या प्रतिसादाने प्रोत्साहन मिळाले

नावातकायआहे's picture

22 Feb 2019 - 9:55 pm | नावातकायआहे

कथा आवडली.

हत्ती लागले दगड आणि नारळातला फरक न समजायला तो काय माणूस थोडाच आहे?

हृदयस्पर्शी कथा.. सुंदर..

बबन ताम्बे's picture

24 Feb 2019 - 7:22 am | बबन ताम्बे

आवडली !

तुषार काळभोर's picture

24 Feb 2019 - 8:50 am | तुषार काळभोर

खूप आवडली