वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
१९८३ चा वर्ल्डकप हा पूर्वीच्या दोन्ही वर्ल्डकपच्या तुलनेत अनेक दृष्टींनी वैविध्यपूर्ण होता. १९७९ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ८ टीम्सना दोन ग्रूपमध्ये विभागण्यात आलं होतं, परंतु यावेळी प्रत्येक टीमच्या ग्रूपमधल्या दुसर्या टीमशी २ मॅचेस होत्या. इंग्लंडच्या लहरी हवामानाचा फटका बसल्यामुळे एखाद्या टीमला वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळण्याची वेळ येऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. वाईड्स आणि बंपर्सच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याच्या अंपायर्सना सूचना देण्यात आल्या होत्याच, परंतु या वर्ल्डकपमधली सर्वात नाविन्यपूर्ण बाब म्हणजे या वर्ल्डकपपासून ३० यार्डचं सर्कल अस्तित्वात आलं.