जसं असायला हवं तसंच व्हावं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
7 Sep 2009 - 7:03 am

"मी कुणालाही सर्व दुःख विसरून पुढे चला असं सल्ला देत नाही.कुणालाही तुमच्या वागणुकीत आता बदलाव आणा असं सांगत नाही.किंवा तुमच्या लक्षात येत असेल ते दुःख् दूर ठेवा असंही सांगत नाही.कारण दुःखाला त्याचा समय दिला गेला पाहिजे. असं मला वाटतं."

मी आणि माझी पत्नी बरेच दिवसानी गोव्याला गेलो होतो,माझ्या वहिनीचं माहेर गोव्याचं.माझ्या लहानपणी मी
तिच्याबरोबर गोव्याला जायचो.त्यांच्या शेजारच्या घरात राहणारं पास्कल-मेरी कुटूंब आणि त्यांची तिन मुलं पावलू,ज्युली आणि सुझान त्यावेळी माझ्यापेक्षा खूपच लहान होती.पास्कल आणि मेरी तर आता खूपच थकली आहेत.ज्युलीने जवळच्या चर्चात नन होऊन लोकांची सेवा करण्याचा मार्ग पत्करला होता.ती पण आता पन्नाशीत आली होती.आणि तिची धाकटी बहिण सुझान -आम्ही तिला सुझी म्हणायचो- तिने कॉटेज हॉस्पिटलमधे नर्सचा जॉब घेतला होता.पावलू मात्र इंग्लंडला पुढचं शिकायला गेलो तो तिथेच स्थाईक झाला. तिकडेच गोर्‍या मड्डमशी लग्न करून राहिला.त्याला दोन मुलं आहेत मिशाल आणि जॉन.पावलू अधून मधून ख्रिस्मसला गोव्याला येऊन जातो.बायको आणि मुलं पण येतात.
हे सर्व मला सुझी सांगत होती.मी आणि माझी पत्नी त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो.

संध्याकाळची वेळ होती.पणजीच्या समुद्रावर मस्त गार वारे वाहत होते.सुझीला मीच म्हणालो,
"आपण समुद्रावर फेर्‍या मारायला जाऊया तेव्हाडाच व्यायाम होईल आणि आपल्याला निवांत बोलता येईल."
सुझीला माझी कल्पना आवडली.मला म्हणाली,
"अरे,पिकतं तिकडे विकत नाहीत असं काही तरी म्हणतात ना तसं आहे.इतका सुंदर समुद्र जवळ आहे पण आम्हाला कुठे आठवण येते चौपाटीवर जायची.कामाच्या रगाड्यात हे जमायचं कसं?"
थोड्या गप्पा मारत आम्ही चाललो.
"आता सूर्यास्त होई तो वाळूत बसून बोलूया"
अशी सुचना माझ्या पत्नीने केली.सुझीच्यापण तेच मनात होतं असं वाटलं.कारण व्यायामाच्या आभावी सुझीचं स्थुल शरिर तिला सहाय्य देत नव्हतं ते माझ्या लक्षात आलं होतं पण तिने सांगण्यापूर्वीच माझ्या पत्नीची सुचना तिला आवडली.
थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी सुझीला विचारलं,
"सुझी तू नर्सींगचं काम का पत्करलंस?"
"ज्युली नन झाली,तिने चर्चमधे काम करून लोकांची सेवा करायचं ठरवलं.मला लग्नं करायचं होतं आणि ज्युली सारखी लोकांची सेवा पण करायची होती.मला ह्या दोन्ही गोष्टी नर्स होऊन साध्य होत होत्या हे माझं नर्स होण्याचं मुख्य कारण आहे.माझा नवरा लुईस मुंबईला असतो मधून मधून मी त्याला मुंबईला भेटायला जाते तर कधी तो गोव्याला येतो.लुईसची पहिली बायको वारली.त्याला तिच्यापासून दोन मुलं आहेत.ती पण मुंबईला सेटल झाली आहेत.असं माझं जीवन आहे."

सुझीची ही कथा ऐकून माझ्या मनात आलं की काही लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धती किती विचित्र असतात. ती इकडे, नवरा तिकडे, मधून मधून येणं जाणं, संसार करायचा आणि लोकसेवापण करायची.मला वाटतं ह्या किरिस्तांव लोकांच्या धर्मात लोकसेवेचं महत्व म्हणजेच देवाची सेवा असं मानून जीवन जगतात.खरं ते कठीण आहे,पण ज्याची त्याची मर्जी दुसरं काय!
मी सुझीला म्हणालो,
"जीवनात सुख आणि दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे मिळत असतं.पण "सुख जवापाडे दुःख पर्वता एव्हडे" हे मात्र खरं.आणि तुझ्या ह्या कामात तसं पाहिलं तर रुग्णांना व्याधीमुळे सुखापेक्षा दुःखच जास्त असावं.आणि त्यांची सेवा करताना तुझ्यासारखीला त्या दुःखात वाटेकरी व्हावं लागणं क्रमप्रात्पच असणार नाही काय?"
कुठूनही सुझीकडून काही तरी जास्त ऐकावं म्हणूनच मी तिला असा प्रश्न टाकला.
सुझीला असा प्रश्न हवाच होता असं दिसलं.मला म्हणाली,
"मी कुणालाही सर्व दुःख विसरून पुढे चला असं सल्ला देत नाही.कुणालाही तुमच्या वागणुकीत आता बदलाव आणा असं सांगत नाही.किंवा तुमच्या लक्षात येत असेल ते दुःख् दूर ठेवा असंही सांगत नाही.कारण दुःखाला त्याचा समय दिला गेला पाहिजे. असं मला वाटतं."
माझ्या पत्नीच्या चेहर्‍यावरचा अचंबा पाहून,सुझी पुढे म्हणाली,
"दःख करणं योग्य आहे असं मी मानते.जवळ जवळ रोजच जेव्हा मी ज्या हॉस्पिट्लमधे नर्सचं काम करते तिथे जाते,तिथे मी कुणाचं तरी रडणं ऐकते,हुंदके ऐकते,मुसमुसलेलं ऐकते.एका तरूण बाईने अकाली मुलाला जन्म देऊन ते मुल गेलं, एखादा ग्रुहस्थ विधूर झाल्याने आपल्या बायकोचे कपडे हातात धरून उभा आहे,किंवा एखादी आई आपल्या मुलाच्या जळलेल्या शरिराजवळ चिंता करीत उभी आहे,अशासारखी दृष्य रोजच मला दिसतात.माझ्या विचारावर आणि माझ्या भावनावर मी नियंत्रण आणता आणता माझं उदास मन अशाच एका जागी फरपटत आणून सो्डतं की ह्या जागे पासून सुटकारा मिळावा म्हणून आकांक्षा करावी तर तिथेच दुसरी कुठचीही इच्छा-आकांक्षा मनात येणार नाही असं वातावरण करून टाकलं जातं,कधी कधी सकाळी अंथरूणातून उठायचीसुद्धा इच्छा होत नाही."

"पण मग तू हे आयुष्य जाणून बुजून का पत्करलंस?"
असा मी प्रश्न केल्यावर सुझी म्हणाली,
"असे काही दिवस येतात की मीच आश्चर्यचकीत होते आणि माझ्या मनात येतं,की माझ्या जॉबवर,माझ्या इतर संबंधावर, माझ्या स्वस्थतेवर पाणी सोडावं लागणार की काय? तरीसुद्धा असापण विचार माझ्या मनात येतो, की हीच उदासिनता मला त्यात जखडून ठेवून बरेच वेळां माझ्या जीवनात काही तरी विशेष प्रयोजन निर्माण करील की काय?ही उदासिनता खाली-हात येत नसते.मला वाटतं ह्या आपत्या,पीडा आपल्याच अंगात बळ आणण्यासाठी येतात.तोच त्यांचा येण्याचा उद्देश असावा.आणि दुसरा उद्देश असाही असावा की दुसर्‍याचं दुःखपण आपल्याला कळावं."

"किती तुझे विचार आदर्श आहेत.तुझ्याकडून हे ऐकून तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो." इती मी.
"कधीकधी हॉस्पिटलात असे रुग्ण येतात की त्यांची परिस्थितीपाहून देवाची पण मला कींव येते.आणि कधी कधी हे प्रसंग एकामागून एक येतात.डॉक्टर रुग्णाला तपासून जातात,पण सतत त्या रुग्णाकडे राहाण्याचं काम आम्हा नर्सीसचंच असतं. आम्ही त्यांची सेवा करून बरं करण्याची पराकाष्टा करीत असतो.पण शेवटी ज्याचं त्याचं नशीब म्हटलं पाहिजे.
हे असले धक्के मी आता सहन करायला सीझन झाली आहे."
पुढे सुझी सांगू लागली,
"मी लहान असतानाचा माझ्या पहिल्या प्रसंगाने मला एव्हडा धक्का दिला की मी जवळ जवळ यमसदानालाच पोहोचले असं मला वाटलं होतं. आणि आता ह्या वयावर जेव्हा मी भिती दायक गोष्टींची स्वप्नं मनात आणू लागते आणि भविष्यात माझ्या हाताबाहेर असलेल्या परिस्थितीचा विचार करू लागते तेव्हा मला दिसायला लागतं की आणखी एखादा प्रसंग माझ्या डोक्यावर लटकायला लागला आहे की काय?कधीकधी,मला वाटतं एक आठवड्याची धोक्याची सुचना मला मिळाली आहे.कदाचीत दोन आठवड्याची असेल.आणि त्यानंतर जणू मी माझ्या आतच अज्ञात होण्यासाठी सरकत चालले आहे आणि फक्त माझ्या बाहेरून कवचच शिल्लक आहे असं वाटतं.आणि नंतर कवच फुटून वर आल्यावर उदासिनता संपून माझं पुनरउत्थान झालं आहे असं वाटायला लागतं.माझ्या मलाच हंसू यायचं,किंवा नव्या दिवसाकडे आशाळभूत होऊन पहायचे."
मी म्हणालो,
"सुझी ही तुम्हा नर्सीसची कर्मकथा तू सांगीतली नसतीस तर तुमचं आयुष्यपण किती दुःखी आहे हे कळलं नसतं. शुभ्रसफेद झगा,डोक्याला सफेद पटका,कधी कधी गळ्यात स्टेथास्कोप आणि हंसरा चेहरा करून जेव्हा तुम्ही रुग्णाची विचारपूस करता त्याच्या मागे त्या रुग्णाच्या सुश्रूषे संबंधी तुमच्या मनात किती दडपण असतं हे आमच्या सारख्याच्या लक्षात येत नाही."
"आणखी पुढे ऐक" असं म्हणत सुझी म्हणाली,
"आणि ह्यातून एक गोष्ट उदयाला येते. जणू एखाद्या चित्रपटातला एखादा देखावा ज्यात हिरो शेवटी स्वतःबद्दल अभिज्ञ होतो.त्यापूर्वी तो मार खाऊन स्वतःचे हाल करून घेतो,आणि त्या मारामारीच्या संवयीने स्वतःच योध्धा होतो.आणि योग्य वेळ आल्यावर त्याला स्वतःची क्षमता काय आहे हे लक्षात येतं.आणि नंतर तो एव्हडा शांत रहातो की विरोधकाशी दोन हात करतानासुद्धा धीरगंभीर असतो.मला वाटतं माझ्या जीवनात ह्या उदासिनतेविरूद्ध झगडण्यात असंच काहीसं इनाम मला मिळालं असावं. माझ्या आतून मिळालेल्या शक्तीवर आणि मनःशांतीवर मी विसंबून राहू लागले.तसंच माझी भिती आणि संवेदना कमी होऊं लागल्या.

मला वाटतं ज्या दुःखदायी रात्रीं आपल्या जीवनात येतात त्या कसल्यातरी कोषात आपल्याला जखडून ठेवीत असाव्यात आणि ह्याच कोषात जेव्हा आपण आपल्याला सामावून घेतले गेलेले असतो त्याच कोषातून आपण नंतर आपली दुर्बलता झुगारून देतो.मला वाटतं आपल्याला होणारे हे दुःखाचे दाहच आपल्यातले आणि आपल्या जीवनातले गुणदोष सांगतात. ते हे ही सांगत असावे की बळ,समानुभूती आणि धीटपणा ह्यांची आपल्याला आपल्या वयक्तिक चैनी पेक्षा आवश्यकता आहे. आणि त्यामुळे मी असा विचार करायला प्रवृत्त होते की दुःख-दाह येतील तसे सहन करायला तयार व्हायला पाहिजे.मी ह्या सेवेला वाहून घेतलं आहे.आणि आता मला मागे पहाणे न लगे."
हे सर्व ऐकून मी सुझीला म्हणालो,
"सुझी,किती तुझे विचार उदात्त आहेत.पास्कल-मेरीने तुमच्यावर केलेले संस्कार,चर्चात जाऊन लोकसेवेचे, म्हणजेच ईश्वर सेवेचे तुम्हाला सतत मिळालेले धडे,तुझं शिक्षण ह्या सर्वांची गोळाबेरीज केली तरच तुझ्यासारखी व्यक्ती ह्या अशा उदात्त सेवेला वाहून घ्यायला तयार होते.सर्वच नर्सीस असा विचार करीत असतील असं मला वाटत नाही. खरं की खोटं?"

"खरं सांगू" सुझी म्हणाली,
"हे सर्व महत्वाचं आहे कारण आलेल्या प्रसंगांचं परत परत येण्याचं स्वरूप सुसंगत असेल तर त्या नव्याने येणार्‍या प्रसंगाला येऊं घातलेलं आहे,ह्या सत्यतेत मी जगत आहे.पण मी कदापीही भितीग्रस्त होणार नाही. शेवटी माझ्या उदासिनतेनेच मला येणार्‍या प्रसंगाला तोंड द्यायला धीर दिला आहे.आणि ते बस आहे.पण प्रत्यक्ष प्रसंग येईल तेव्हा मी तयार होऊन दिर्घ श्वास घेईनच.कारण मला माहित झालं आहे की मी जसं असायला हवं तसंच व्हावं याला मला पर्याय नाही.माझ्या नर्सींग जॉबला चिकटून राहायचं असेल तर त्यावर दुसरा उपाय नाही."
सुझीचे हे विचार ऐकून सुन्न झालेली माझी पत्नी म्हणाली,
"मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून,सुझी म्हणते तसं "जसं असायला हवं तसंच व्हावं" हा सुझीचा विचार आपण इतराना सांगूया.असं ठरवून आम्ही घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख