गैरफायदा

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 Aug 2009 - 6:16 pm

"ए पारोश्या, आपण परवा कुठल्या रिसोर्टला भेटलो होतो रे?" ग्लासमधला स्कॉचचा शेवटचा घोट संपवता संपवता रणजीतरावांनी होरमसजीला विचारले. तसा म्हातारा पारशी भडकला.

"ए मर्गठ्ठे के बच्चे, परत जर आपल्याला पारोसा बोलेल ना, तर तुला माज्या बायडीचा गाना ऐकवायला बसवेल हा मी! आन साला कायपण बोलतो काय? आपण कदी भेटला होता काय आजतक या क्लबच्या भायेर?"

"नाही रे बाबा, हिटलरचा काँन्संट्रेशन कँप परवडला तुझ्या शिरीनचं गाणं ऐकण्यापेक्षा! पण असं काय करतो होरमस, गेल्या आठवड्यात नाही का भेटलो आपण? गेल्या महिन्यापासुन चाललं होतं आपलं, एक संध्याकाळ या क्लबच्या बाहेर कुठेतरी एन्जॉय करायची म्हणुन! साले तुम्ही लोक तर मागे लागला होता ना? काय रे जोशा, तुला तरी आठवते का नाही?" रणजीतराव बुचकळ्यात पडले होते.

"रणजीत, एक तर तुला स्कॉच चढलीय किंवा तु म्हातारा झालायस. आपले भेटायचे ठरले होते पण ऐनवेळी सॅम आजारी पडल्यामुळे सगळा बेत तुच कॅन्सल केलास ना?" मेजर जोशी रणजीतरावांना वेड्यात जमा करायच्या मुडमध्ये होते.

"आयला खरेच आपण नाही भेटलो? मला हे पुन्हा व्हायला लागलं की काय? साली त्या बापटाची ट्रिटमेंट घेतल्यापासुन गेली कित्येक वर्षे हा त्रास नव्हता झाला यार!" रणजीतराव शुन्यात नजर लावीत म्हणाले.

तसे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या.

"कसली ट्रिटमेंट रे रणजीत?" सॅमने विचारलं.

"अरे बर्‍याचदा मी बर्‍याच गोष्टी विसरुन जातो. आणि खुपवेळा अनेकदा घोकलेली एखादी गोष्ट मी प्रत्यक्ष अनुभवलेली नसतानाही ती अनुभवली आहे असे गृहीत धरुन बसतो. खुप वर्षापुर्वी मी जेव्हा तीन बत्तीला पोलीस ठाण्याला सब इन्स्पेक्टर म्हणुन होतो तेव्हा एका नालायकाने माझ्या या समस्येचा पद्धतशीरपणे फायदा घ्यायचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने माझा पेशाने मानसोपचार तज्ञ असलेला एक मित्र राजेंद्र बापट याच्या मदतीमुळे मी त्या केसमधुन बाहेर पडु शकलो. नंतर बापटनेच मानसोपचार करुन त्या आजारातुन माझी मुक्तता केली होती. गेली कित्येक वर्षे अजिबात त्रास नव्हता, आता पुन्हा सुरु झाला की काय? साला, बापटला फोन करायला पाहीजे आजच!" रणजीतराव थोडेसे चिंतीत झाल्यासारखे वाटले.

"यार रणजीत, वो किस्सा तो सुनाओ...! ऐसा क्या हुवा था!"

सॅमने विचारले तसे रणजीतरावांच्या चेहर्‍यावर एक मिस्किल हास्य आले.

"सॉलीड किस्सा आहे तो. जोशा, मस्त अडकलो होतो मी त्या प्रकरणात.पण उससे पहले गोविंद, और एकेक पेग स्कॉच हो जाये विथ युअर स्पेशल तंदुरी! तोपर्यंत पापड, शेंगा काहीतरी दे."

रणजीतराव त्या आठवणीने बहुदा रंगात आले होते. तसे सगळेच सरसावुन बसले.
बघा, साधारण तीस एक वर्षापुर्वीची घटना आहे ही. नुकतेच पोलीस डिपार्टमेंट जॉईन केले होते मी. त्या दिवशी रात्र पाळी होती. चौकीत रिपोर्ट केला आणि पेट्रोलिंगला म्हणुन बाहेर पडणार एवढ्यात हवालदार कदम सांगत आले.............
...................................................................................................................

"निंबाळकर साहेब, तुमच्यासाठी फोन आहे, क्राईम ब्रांचवरुन! कुणीतरी वैद्य म्हणुन साहेब आहेत फोनवर!"

निंबाळकरांनी फोन घेतला...

"नमस्कार सब इन्स्पेक्टर रणजीत निंबाळकर, तीन बत्ती पोलीस चौकी....बोला मी आपली काय मदत करु शकतो?"

"निंबाळकर साहेब, मी इन्स्पेक्टर अजिंक्य वैद्य बोलतोय.... तुम्ही आत्ता वेताळ चौकी पोलीस स्टेशनला येवु शकाल का? एक इमर्जन्सी आहे?"
आवाजात विनंतीवजा जरब होती. त्या येवु शकाल का? मध्ये "याच" असा गर्भित भाव दडलेला होता. पोलीसखाते जॉईन केल्यापासुन निंबाळकरांना अशा सुचना आणि विनंत्यांची चांगलीच सवय झाली होती.

"येस सर, आय विल बी देअर इन हाफ अ‍ॅन अवर!"

निंबाळकरांनी आपली पी कॅप चढवली, कंबरेचे रिव्हॉल्वर पुन्हा एकदा चेक केले आणि कॉन्स्टेबलला हाक दिली.

"जाधव, गाडी काढा आपल्याला वेताळचौकी पोलीस ठाण्याला जायचय लगेच! इन्स्पे. वैद्यांनी बोलावलय कुठल्यातरी कामासाठी. च्यायला नस्ता ताप डोक्याला." निंबाळकर करवादले.

"आयला तो वैद्यसाहेब लै खडुस माणुस हाये सायेब? जरा जपुनच राहा."

"तु कसा काय ओळखतोस रे या वैद्य साहेबांना?"

"चार वर्षे काढलीत साहेब त्यांच्या हाताखाली. लै कडक माणुस! सोता येक पैसा खाणार न्हाय की दुसर्‍याला खाऊ देणार नाही. दर सा महिन्यांनी फुटबॉल होतो बगा त्येंचा." जाधवने माहिती पुरवली तसे निंबाळकरांचा चेहरा उजळला.

"अरे मुर्खा, मग खडुस काय म्हणतोस? अशा लोकांचीच खरी गरज आहे पोलीसखात्याला. मला आवडेल त्यांना भेटायला.चल लवकर काढ गाडी!"

असा माणुस काहीतरी तसेच कारण असल्याशिवाय आपल्याला तातडीने बोलावणार नाही याची निंबाळकरांना खात्री पटली होती.
मुळात निंबाळकरांचा स्वभाव वैद्यांशी मिळता जुळता असाच होता. घरची प्रचंड श्रीमंती, शेकडो एकर शेती, नोकर-चाकर याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा सोडुन हा माणुस पोलीसखात्यात शिरला होता. गुन्हेगारीबद्दल प्रचंड त्वेष बाळगुन असलेले निंबाळकर म्हणजे चालता बोलता ज्वालामुखीच होते. पण फक्त गुन्हेगारांसाठी, इतरांशी बोलताना मात्र हा माणुस एखाद्या लहान बाळासारखा सरळ असायचा. त्यामुळे इन्स्पे. वैद्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटताच त्यांना भेटायची उत्सुकता लागली होती.

वेताळचौकी पोलीस ठाण्याच्या पायर्‍या चढताना निंबाळकरांच्या मनात इन्स्पे. वैद्यांचाच विचार होता. चौकीच्या दारातच एक पन्नाशीच्या घरातले गृहस्थ एका बाईच्या कडेवर असलेल्या लहान बाळाशी लाडीक आवाजात गप्पा मारीत होते. बाजुच्या बाकावर दोन तीन माणसे, खाली बसलेल्या काही बायकांचे गळा काढुन रडणे असले पोलीस चौकीवर नेहेमी आढळणारे दृष्य इथेही होते. निंबाळकर साहेब आत शिरले. त्यांचा युनिफॉर्म बघुन लगेच तिथल्या हवालदार, कॉन्स्टेबल्सनी त्यांना कडक सॅल्युट ठोकला.

"अरे, वैद्य साहेब कुठे आहेत? त्यांचा फोन आला होता मघाशी मला, मी सब. इन्स्पे. निंबाळकर, तीन बत्ती पोलीस चौकी!" निंबाळकरांनी एका कॉन्स्टेबलला विचारले.

"ते काय साहेब, त्या लहान बाळाशी खेळताहेत ना तेच वैद्य साहेब!"

"अच्छा कुणी नातेवाईक आहेत का त्या बाई त्यांच्या?"

"कुठलं हो साहेब, एका आरोपीची बायको आहे ती. त्याला कालच्याला पकडलाय सायबांनी चोरीच्या आरोपावरुन. सकाळी असा तुडवलाय त्याला. आन आता बगा त्येच्या पोराला कसं लहान पोर होवुन खेळवताहेत."

निंबाळकरांनी वैद्यांसमोर उभे राहुन कडक सॅल्युट मारला...

"सर, आय एम सब. इन्स्पे. निंबाळकर.....!"

"ओह, येस मि. निंबाळकर, ग्लॅड टु मीट यु ! तुमच्याबद्दल ऐकलेय मी त्या चकण्या रंग्याकडुन, छान वाटलं ऐकुन. तुमच्यासारखी माणसं हवीत पोलीसखात्याला."

"चकणा रंग्या" हे खुप कुप्रसिद्ध नाव होतं. हा माणुस दगडी चाळीसाठी काम करायचा. खंडणी वसुलणे, लोकांना धमक्या देणे, कुणाचे हात पाय तोडणे हा रंग्याच्या हातचा मळ होता. त्याला निंबाळकरांनी गोव्यात जावुन पकडला होता. त्यावेळी निंबाळकरांना गोळी देखील लागली होती.

"रंग्या कुठं भेटला तुम्हाला?" निंबाळकरांनी उत्सुकतेने विचारले "तो तर येरवड्याला होता ना?"

"अशा माणसांना लगेचच जामीन मिळतो निंबाळकर, हीच तर पोलीस खात्याची शोकांतिका आहे. आपण प्राणांची कुरवंडी करुन, प्रसंगी स्वतःचा जिव धोक्यात घालुन गुन्हेगार पकडायचे, आणि मग वरुन कुणाचा तरी फोन आला की सोडुन द्यायचे. जावु द्या मी तुम्हाला दुसर्‍याच एका महत्त्वाच्या कामासाठी बोलावले होते. या आपण चहा घेत घेत बोलु. ३१४४ दोन स्पेशल सांग रे. " इन्स्पे. वैद्यांबरोबरच निंबाळकरही त्यांच्या केबीनमध्ये शिरले.

"बसा निंबाळकर साहेब, सावंतराव त्या गोडबोलेला घेवुन या हो इकडे!"
थोड्याच वेळात केबिनचा दरवाजा उघडला गेला आणि हवालदार सावंतराव एका माणसाला घेवुन आत आले. त्याला बघितले आणि निंबाळकर चमकलेच.

"अरे गोडबोलेदादा तुम्ही?"

"आपण या ग्रुहस्थाला ओळखता निंबाळकर?" वैद्यांचा प्रश्न.

"हो तर, अहो खुप चांगलाच ओळखतो, हे अरविंद गोडबोले. मी राहतो तिथुन जवळच एका चाळीत राहतात. खुप गोड गळा आहे त्यांचा. नामदेवांची भजने खुप उत्तम गातात. पण हे इथे कसे? तुम्ही यांना कुठल्या आरोपाखाली वगैरे अटक तर केलेले नाही ना? वैद्यसाहेब, अहो हा खुप सज्जन माणुस आहे हो!" निंबाळकर एका दमातच सगळे काही बोलुन गेले.

"माफ करा निंबाळकर, पण आम्ही गोडबोलेंना एका खुनाच्या आरोपाखाली अटक केलेय. दोन दिवसांपुर्वी आमच्या परिसरात एका गायिकेचा खुन झालाय. त्या आरोपाखाली आम्ही गोडबोलेंना अटक केलीय."

"पण वैद्यसाहेब......!"

"एक मिनीट निंबाळकर माझं पुर्ण सांगुन झालेलें नाही अजुन. गोडबोलेंनी खुनाची स्विकृती दिलीय....!"

"काय...?" निंबाळकर उडालेच, त्यांनी अविश्वासाने गोडबोलेंकडे पाहीले, त्यांच्याशी नजर मिळाली आणि गोडबोलेंनी आपली नजर झुकवली.

"गोडबोले, अहो काय केलंत हे आणि कशासाठी? अहो मागच्या आठवड्यात तर आपण भेटलो होतो नानाचौकात. तुम्ही विचारलत की पुढच्या गुरुवारी संध्याकाळी माझ्या बरोबर येणार का म्हणुन? अच्छा, म्हणजे तीच ही गायिका तर?"

"एक मिनीट निंबाळकर, ती ही गायिका.....? म्हणजे.....

"तुम्ही त्या गायिकेला ओळखता? इति वैद्य

"हो परवा दिवशी आम्ही तिचं गाणं ऐकायला जमलो होतो. प्लीज गैरसमज नको वैद्यसाहेब, त्या बाई चांगल्या वयस्कर आहेत, पण गाणं खुप सुरेख गातात."

आता गोडबोले चमत्कृत झाल्यासारखे बघायला लागले निंबाळकरांकडे.

" निंबाळकर , असं काय करताय? आपण कुठे भेटलो त्या बाईंना. तुम्ही कधी ऐकलात तिचा आवाज...?"

"एक मिनीट गोडबोले, तुम्हाला विचारलाय त्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. निंबाळकर तुम्ही कधी भेटलात त्या बाईंना?" वैद्यांनी संशयित स्वरात विचारले.

"अहो कालच्या शनिवारी आम्ही तिचं गाणं ऐकलं आणि तिच्या गोड गळ्याबद्दल तिचं अभिनंदनही केलं. ५००० रुपये बिदागीदेखील दिली. तीन जण हजर होतो आम्ही या कार्यक्रमाला."

"काहीतरी काय बोलताय निंबाळकर साहेब, अहो त्या बाईंच्या गाण्याला तुम्ही कुठे होतात.आणि तीन जण कुठले? दोन जण होतो आम्ही फक्त. तुम्ही कुठे होतात? मी आणि अभ्यंकर... आम्ही दोघे तर होतो फक्त."

"काय बोलताय गोडबोले? असं कसं...., रमेशला विचारा ना तुम्ही! तो पण होता म्हणे या कार्यक्रमाला.आणि अभ्यंकर कुठे होता तेव्हा?" निंबाळकर उत्तेजीत स्वरात म्हणाले.

"कोण रमेश?" एकाच वेळी गोडबोले आणि वैद्य दोघांनीही एकच प्रश्न विचारला तसे निंबाळकर चमकले.

"निंबाळकर, तुमच्या माहितीसाठी म्हणुन सांगतो, आजुबाजुच्या लोकांच्या सांगण्यावरुन त्या दिवशी बाईंच्या गाण्याला फक्त दोन माणसे आली होती. त्याच दिवशी मैफील संपल्यावर त्या बाईंचा खुन झाला. त्या दोघांपैकी एकजण हा गोडबोले होता...दुसरा कोण ते आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हते. आज सकाळी मला एक फोन आला आणि त्या अनामिक फोनकर्त्याने मला सांगितले की तो दुसरा माणुस म्हणजे ........ तुम्ही होता! पण गंमत म्हणजे खुनाचा आरोप स्विकारणारे गोडबोले त्यादिवशी तुम्ही त्यांच्याबरोबर होता हे मात्र मान्य करायला तयार नाहीत." वैद्यांनी एका दमात सगळे सांगुन टाकले.

"थोडं मी बोलु साहेब...! गोडबोले मध्येच बोलले.

"गो अहेड!" वैद्यांनी परवानगी दिली, केस भलतीच इंटरेस्टिंग होत चालली होती. गोडबोले म्हणताहेत दोनच माणसे होती आणि आजुबाजुची माणसेही त्यांच्या म्हणण्याची पुष्टी करताहेत. त्यांच्या मते निंबाळकर त्या बैठकीला हजर नव्हते, कुणीतरी अभ्यंकर म्हणुन त्यांच्या सोबत होते. तर निंबाळकरांच्या मते ते स्वतः त्या बैठकीला होतेच पण हा अभ्यंकर मात्र नव्हता, कुणीतरी रमेश नावाचा अज्ञात इसम मात्र हजर होता, ज्याला गोडबोले ओळखत नाही. च्यायला काहीतरी विचित्रच त्रांगडं होतं.

"त्याचं असं झालं साहेब, आमचा म्हणजे मी आणि निंबाळकरसाहेब, एक कॉमन मित्र आहे. शशांक अभ्यंकर. शशांकला गाण्याची भयंकर आवड. या गायिकेचं गाणं ऐकायला जायची टुम देखील त्यानेच काढली होती. तसा मला यात फारसा रस नाही आणि खरे सांगायचे तर शशांकवर माझा फारसा विश्वासही नाही. कारण आमचा मित्र असला तरी तो माणुस तसा फारसा चांगला नाही. पण अगदीच मागे लागला तेव्हा मी एक दिवस निंबाळकरांना विचारले, म्हणलं त्यांच्यासारखा पोलीसखात्यातला माणुस बरोबर असला म्हणजे बरं. पण निंबाळकरांनी सरळ सरळ नकार दिला, ते म्हणाले मला असल्या गोष्टीत स्वारस्य नाही आणि महत्वाचे म्हणजे सद्ध्या मी एका केसमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे मला वेळही नाही. तुम्ही दुसर्‍या कुणालातरी घेवुन जा बरोबर. म्हणुन शेवटी मी एकट्यानेच अभ्यंकरबरोबर जायला तयार झालो.

साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा त्या बाईचा मृत्यु माझ्या हातुन जरुर झालाय, पण मी तिचा खुन नाही केला तो निव्वळ एक अपघात होता. झाले असे की मी आणि शशांक त्या बाईंचे गाणे ऐकायला गेलो. बाईचा गळा खुपच सुरेख होता हो. त्यांनी त्या दिवशी असा काही यमन लावला की मी बेहोशच होवुन गेलो. चार्-पाच तास कुठे गेले काही कळालेच नाही. गाणे संपले आणि त्या बाईंचे मानधन द्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आले की शशांक पाकीट घरीच विसरुन आला होता. माझ्याकडेही नेमके चार्-पाचशेच होते. मग शशांकच म्हणाला...

"गोडबोले, तुम्ही दहा मिनीट थांबा इथेच, मी आत्ता पैसे घेवुन येतो"

आणि तो पैसे आणायला म्हणुन निघुन गेला. तो गेल्यावर थोडावेळ ती बाई व्यवस्थित होती, मग अचानक जवळ येवुन बसली आणि अंगचटीला यायला लागली. साहेब, मी संगीतवेडा माणुस! मला गाण्याची नशा पुरेशी आहे, त्यापुढे कुठल्या गोष्टीत मला रस नव्हता. त्यात मी बाल ब्रम्हचारी ! मी त्या बाईंना समजावुन सांगायचा खुप प्रयत्न केला पण बाई ऐकेच ना. सारखी अंगचटीला यायला लागली. म्हणुन मी घाबरुन तिला जोरात धक्का दिला, तशी ती जावुन भिंतीला धडकली आणि खाली पडली. तिच्या डोक्यातुन रक्त येत होते. पण ती जिवंत होती साहेब. मी घाबरुन तसाच तिथुन पळालो. खुप घाबरलो होतो त्यामुळे कुणालाच काही बोललो नाही. नंतर दुसर्‍या दिवशी तुमच्या पोलीसांनी मला पकडलं तेव्हा मला कळालं की बाईंचा मृत्यु झाला होता. पण साहेब एवढं मात्र नक्की की निंबाळकर आमच्याबरोबर नव्हते.

बस्स, एवढीच कहाणी आहे माझी आणि तीच सत्य आहे, यात निंबाळकर कुठेही नाहीत. आता निंबाळकर साहेब तुम्ही मला एक सांगा तुम्ही हा जि रमेश, रमेश म्हणताहात तो कोण? कारण मी कुठल्याच रमेशला ओळखत नाही.
गोडबोलेंचा शेवटचा प्रश्न निंबाळकरांसाठी होता.

निंबाळकरांच्या चेहर्‍यावर भले मोठे प्रश्नचिन्ह होते.

गोडबोलेदादा, तुम्ही का खोटे बोलताय मला कळत नाही? तुमच्याबरोबर मी आणि रमेश दोघेही त्या बैठकीला होतो आणि अभ्यंकर मात्र नव्हता. त्याला नेमके त्या दिवशी दिल्लीला जायचे काम निघाले म्हणुन तो येवु शकला नाही.आणि रमेशला तुम्ही ओळखत नाही असे कसे म्हणता? तुम्हीच तर त्याची आणि माझी ओळख करुन दिली होती. ईलेक्ट्रॉनिक गॅझेटसचे पीसीबीज बनवतो तो. मेकर्स टॉवर्समध्ये ऑफीस आहे त्याचे.

मी तुम्हाला सांगतो, वैद्यसाहेब काय झाले ते! त्यादिवशी दादांनी मला गाण्याबद्दल विचारले आणि मी नकार दिला, कारण खरोखरच मी एका केसमध्ये व्यस्त होतो. आणि मला गाण्यातलं खरंच फारसं काही कळत नाही. जे कानाला चांगलं वाटतं ते गाणं छान एवढेच माझे या क्षेत्रातले ज्ञान. पण नंतर राहुन राहुन मला वाटायला लागलं की आपण गोडबोलेदादांना नाही म्हणायला नको होतं कारण त्यांनी एवढ्या विश्वासाने माझी सोबत मागितलेली. पण दुसरा पर्यायच नव्हता मी खुपच व्यस्त होतो. पण मनाला ती खुटखुट लागुन राहीली होती. त्यातच मला रमेश भेटला, आधीतर मी त्याला ओळखलेच नाही. पण नंतर त्यानेच परेडच्या वेळी झालेल्या ओळखीची आठवण करुन दिली तेव्हा माझ्या लक्षात आला. तो खुपच आग्रह करायला लागला. म्हणाला...

"गोडबोलेदादांचं गाण्याचं वेड तुम्हाला माहीतच आहे. पण एकटे त्या अभ्यंकरसाहेबांबरोबर जायची त्यांची तयारी नव्हती. म्हणुन तुम्हाला विचारले त्यांनी. तुम्ही नको म्हणालात म्हणुन खुपच वाईट वाटलं त्यांना. थोडासा वेळ काढा ना साहेब, तासभर थांबुन निघुन आलात तरी चालेले, तेवढेच त्यांना बरे वाटेल."

त्यानंतर रमेश, दोन वेळा भेटला मला. प्रत्येक वेळी त्याचा आग्रह वाढलाच होता. शेवटी मी गोडबोलेदादांसाठी म्हणुन जायचे कबुल केले. संध्याकाळी सहा वाजता आम्ही तिथे गेलो.

तुम्ही गोडबोलेंना कळवले होते की तुम्ही येताय म्हणुन? मध्येच इन्स्पे. वैद्यसाहेबांनी शंका विचारली.

नाही ना! रमेश म्हणाला की मी काहीही करुन गोडबोलेदादांना अभ्यंकरसाहेबांबरोबर घेवुन येतो. आत्ताच त्यांना सांगायलाच नको तुम्हीही येताय म्हणुन. तुम्हाला अचानक तिथे बघितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल. मी बरं म्हटले."

त्यानंतर चार पाच वेळा रमेशचा फोन आला, पहिल्यांदा काहीतरी वेळ बदलली म्हणुन. मग एकदा सहजच आठवण करुन द्यायला म्हणुन. मग एकदा मी तुम्हाला घ्यायला येतो हे सांगायला म्हणुन. शेवटी शशांकला ऐनवेळी दिल्लीला जायचे असल्याने त्याला यायला जमणार नाही आणि आपण तिघेच जाणार आहोत हे सांगायला म्हणुन. पण शेवटी आम्ही गेलो. आधी रमेश मला घेवुन त्या बाईंच्या घरी सोडुन आला आणि मग जावुन गोडबोलेदादांना घेवुन आला. आम्हाला वाटल्याप्रमाणेच गोडबोलेदादांना आश्चर्याचा धक्काच बसला मला तेथे पाहुन. मग ठरल्याप्रमाणे मी अर्धा-पाऊणतास तिथे बसुन निघुन आलो. त्यानंतर तिथे काही घडले असेल तर मला त्याची कल्पना नाही.

इन्स्पे. वैद्यांनी गोडबोल्यांकडे पाहीले. ते डोके धरुन बसले होते.त्यांनी एकदा मान वर करुन अविश्वासाने निंबाळकरांकडे पाहीले आणि वैद्यांकडे वळुन म्हणाले.

"साहेब, निंबाळकर मला धाकट्या भावासारखे आहेत. मी असा सडाफटिंग माणुस. सगळं आयुष्य एकट्याने गेलेला. या माणसाने जीव लावला. पण आज निंबाळकर खोटे का बोलताहेत मला कळत नाही. त्यादिवशी मी आणि शशांक दोघेच होतो. आणि नंतर काय झालं ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. मी या मृत्युला कारणीभुत झालेलो असलो तरी हा खुन मी जाणुन्बुजुन केलेला नाही, तर तो एक दुर्दैवी अपघात होता. बस्स यापुढे मला काही सांगायचे नाही."

"ओक्के, आपण एक काम करु या? आपण आता थेट अभ्यंकरच्या घरी धाड मारुया. निंबाळकर तुम्ही चला माझ्याबरोबर. ३१४४ गोडबोलेंना सेलमध्ये घेवुन जा. गोडबोले आपण आम्ही परत आल्यावर बोलु.त्या रमेशबद्दलही तेव्हाच बोलु."

"साहेब मी अजुनही सांगतो मी कुठल्याही रमेशला ओळखत नाही, त्याची निंबाळकरांसोबत मी ओळख करुन दिलेली नाही." इति गोडबोले.

"ठिक आहे, आपण बोलु नंतर!" वैद्य म्हणाले आणि चौकीच्या बाहेर पडले निंबाळकरही त्यांच्या मागेच बाहेर पडले.

इन्स्पे. वैद्य आणि निंबाळकर शशांक अभ्यंकरच्या ब्लॉकवर पोहोचले तेव्हा संध्याकाळचे चार वाजायला आले होते.
वैद्यांनी बेलचे बटन दाबले तसा आत कुठेतरी गायत्री मंत्राचा ध्वनी उमटला. काही क्षणानंतर दार उघडले. दारात एक तरुण स्त्री उभी होती. ती शशांकची पत्नीच होती.

"कोण पाहीजे, हे घरी नाहीत!"

"हे बघा बाई मी शशांकचा मित्र आहे आणि त्याच्याकडे आमचे थोडेसे काम होते, म्हणुन आलो होतो." वैद्यांनीच उत्तर दिले.

"हे तर गेल्या शुक्रवारीच दिल्लीला गेलेत. उद्या परवाच येतील आता परत."

इन्स्पे. वैद्यांनी निंबाळकरांकडे पाहीले... निंबाळकरांनी डोळे मिचकावले. त्यातुन "बघा, मी सांगितलं होतं ना?" असा अर्थ अभिप्रेत होत होता.

"कठीण आहे निंबाळकर, तुम्ही म्हणताय त्यावर विश्वासही ठेवता येत नाहीये. कारण आजुबाजुचे लोक सांगताहेत की त्यादिवशी फक्त दोनच माणसांना त्या बाईंच्या घरात शिरताना पाहण्यात आलेलं होतं. आणि त्यांच्यापैकी कुणीही परत जाताना लोकांनी पाहीला नाही. बाईंच्या घरासमोरचा पानवाला साक्ष आहे या गोष्टीला. पण हे जर खरं असेल तर.... माफ करा, पण गोडबोलेंइअतकेच तुम्ही देखील संशयाच्या चक्रात अडकताय. कारण का कोण जाणे मला ठामपणे असे वाटतेय, की गोडबोलेंनी हा खुन केलेला नाही!"

"आय होप, यु विल को-ऑपरेट. एवढी केस सॉल्व्ह होइपर्यंत तुम्ही शहर सोडुन जाणार नाही आहात्.कारण आता तुम्हीही माझ्या लिस्टवर आहात. आणि हो, प्लीज लक्षात घ्या, मी इन्क्वायरी बोलुन केस सॉल्व्ह होईपर्यंत तुम्हाला सस्पेंड करण्याची मागणीही करु शकलो असतो. पण तुमचे आतापर्यंतचे रेकॉर्ड जर लक्षात घेतलं तर मला एक अंधुकशी आशा वाटतेय तुमच्या निर्दोष असण्याबद्दल. त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवुन मी तसे काहीही करणार नाहीये. प्लीज, को-ऑपरेट." वैद्यांचा आवाज कमालीचा गंभीर झाला होता.

"थॅंक यु सर, काळजी करु नका, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. फक्त एक विनंती आहे. ऑफ द रेकॉर्ड मीही थोडासा तपास केला तर चालेल?" निंबाळकरांनी विनंतीच्या स्वरात विचारले.

"नो....! अजिबात नाही. माफ करा निंबाळकर, पण जर खरोखर तुमचा यात काही हात असेल तर तुम्ही पुरावे नष्ट करु शकता. तेव्हा घटनास्थळ किंवा संबंधितांच्या आसपासही फिरकण्याची मी तुम्हाला परवानगी देणार नाही. आणि माझं तुमच्यावर पुर्ण ल़क्ष असेल. तुम्ही काही दिवस रजा घेवुन घरीच का बसत नाही? ती सोय मी करेन." इन्स्पे. वैद्य. ठामपणे नकार देते झाले.
"ठिक आहे सर! अ‍ॅज यु विश!" निंबाळकरांनी ओढलेल्या स्वरात स्विकृती दिली आणि वैद्यांची रजा घेतली.

त्यावेळी वैद्यांनी निंबाळकरांच्या डोळ्यांतली ती आगळी-वेगळी चमक पाहिली असती तर ...................................

क्रमशः

विशाल कुलकर्णी

कथाअनुभव

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

31 Aug 2009 - 6:36 pm | श्रावण मोडक

ताणू नका पुढच्या भागासाठी.
निंबाळकर आणि वैद्य दोघंही ओळखीचे आहेत. क्रमशः टाकून न लिहिलं तर सेक्शन ४२० लागू होऊ शकतं. :)

अजुन कच्चाच आहे's picture

31 Aug 2009 - 8:14 pm | अजुन कच्चाच आहे

मस्तच!
लवकर येवूद्या पुढच.
.................
अजून कच्चाच आहे.

सागर's picture

31 Aug 2009 - 8:54 pm | सागर

विशालभौ ,

मस्त लिहिलं आहे... पुढचा भाग लवकर द्या.

तुमच्यासारख्या लेखकांची पण गरज आहे असेच म्हणतो ;)

- सागर

अनिल हटेला's picture

31 Aug 2009 - 9:21 pm | अनिल हटेला

पहिला भाग वाचुन मजा आली....
लवकर पूढचा भाग टाकावा ,अशी विनंती... :-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

निखिल देशपांडे's picture

31 Aug 2009 - 9:23 pm | निखिल देशपांडे

पुढचा भाग लवकरच टाका हो...
मस्त रंगली आहे.

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आलयावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

प्राजु's picture

31 Aug 2009 - 9:29 pm | प्राजु

कथा मस्त वळण घेते आहे.
लवकर लिही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

31 Aug 2009 - 9:46 pm | प्रकाश घाटपांडे

कथा छान वळण घेतीय. फ्लॅश बॅक मदी. खास विशाल टच
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रमोद देव's picture

1 Sep 2009 - 8:17 am | प्रमोद देव

राजेंद्र बापट(मुक्तसुनित),निंबाळकर(टारुशेठ),अभ्यंकर(तात्या),गोडबोले,जोशी....
आहे काय हे प्रकरण? ;)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

सहज's picture

1 Sep 2009 - 8:21 am | सहज

क्रमशः काय? मग वर गैरफायदा भाग १ लिहायला काय...

घ्या घ्या लेको वाचकांचा गैरफायदा!

विशाल कुलकर्णी's picture

1 Sep 2009 - 9:24 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद.
सहजराव, वर जर भाग १ वगैरे टाकले असते, तर तुम्ही उघडले असते का हे पान? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दशानन's picture

1 Sep 2009 - 9:29 am | दशानन

+१

गुड आयडिया..... माझ्या सारख्या होतकरु लेखकांना चांगली आयडिया दिली तुम्ही :D

____________

कथा बीज चांगले आहे.... पण राहून राहून वाटत आहे कुठे तरी वाचले आहे... कुठे तरी पाहिले आहे (चित्रपट इत्यादी)

नावं.... ज ब रा !
पण त्या निंबाळकर प्राण्यापासून जपून रहा... लै डेंजर ;)

अवलिया's picture

1 Sep 2009 - 11:29 am | अवलिया

अगदी हेच्च लिहीणार होतो !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

चतुरंग's picture

1 Sep 2009 - 12:07 pm | चतुरंग

'भाग १' असे वर लिहिले तरी लेखक्/लेखिका कोण आहे त्यावर पान उघडायचे ठरते बर्‍याचदा. तुम्ही चांगले लिहिता त्यामुळे तुम्हाला टेंशन नको.
(उगीच गादी १, गादी २ ..गादी ४२० असे असेल तर मग्...अवघड आहे)

चतुरंग

आशिष सुर्वे's picture

1 Sep 2009 - 10:39 am | आशिष सुर्वे

कथा छान रंगतेय.
पहिला भाग अधाशासारखा वाचला.. आता दुसर्‍याची वाट पहातोय..
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

ऋषिकेश's picture

1 Sep 2009 - 1:04 pm | ऋषिकेश

कथा छान रंगतेय.
पहिला भाग अधाशासारखा वाचला.. आता दुसर्‍याची वाट पहातोय..

+१ अस्सेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
दूपारचे १२ वाजून ५९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक परिचीत ध्वनीमालिका "टँङ टडँग .. टडँग टडँग टडँग ... टडाटडँग...."

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2009 - 11:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विशालभय्या, पुढचे भाग लवकर टाका हो.

अदिती

महेश हतोळकर's picture

1 Sep 2009 - 11:30 am | महेश हतोळकर

मस्त रंगलीय कथा! पु. भा. प्र.

sneharani's picture

1 Sep 2009 - 12:03 pm | sneharani

पुढचे भाग लवकर टाका.

विशाल कुलकर्णी's picture

1 Sep 2009 - 1:56 pm | विशाल कुलकर्णी

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

श्रद्धादिनेश's picture

1 Sep 2009 - 2:10 pm | श्रद्धादिनेश

विशाल सॉलेड इंटरेस्टींग झालाय पहीला भाग्...लवकर उत्सुकता संपवा आता

आशिष सुर्वे's picture

1 Sep 2009 - 6:01 pm | आशिष सुर्वे

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !

सोपस्कार राहुदेत.. पुढचा भाग लवकर टाका नायतर तुमच्या 'मेंदू'मध्ये 'अ‍ॅक्सेस' करून तो (पुढचा भाग) काढून घ्यावा लागेल.. हा हा हा!!

परत एकदा म्हणतो.. झकास लेखन!!

(चू.भू.द्या.घ्या.)
-
कोकणी फणस

योगी९००'s picture

1 Sep 2009 - 7:08 pm | योगी९००

आयला...रोज ४-५ वेळा तरी मि.पा. उघडून दुसरा भाग आला आहे का ते पहातो..

लय भारी..विशालभाऊ..

खादाडमाऊ

विशाल कुलकर्णी's picture

2 Sep 2009 - 9:19 am | विशाल कुलकर्णी

आमच्याकडे एक नवीन इंजीनिअर भरती झालाय. त्याच्या ट्रेनिंगमध्ये गुंतलोय जरा. एक दोन दिवसात मोकळा झालो की दुसरा भाग टाकतोच. तोपर्यंत क्षमस्व. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"