'एअरपोर्ट' च्या निमित्ताने..

Primary tabs

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
22 Jun 2009 - 10:54 am

मंडळी,

मला अनपेक्षित मोठया संख्येने माझी एअरपोर्ट ही सहा भागांतली कथा ज्या ज्या सर्वांनी प्रेमाने लक्ष देऊन वाचली, तिच्यावर मला उत्साहित करणारे असंख्य प्रतिसाद, त्या त्या भागातच नव्हे तर माझ्या खरडवहीत आणि व्यक्तिगत निरोपांद्वारे कळवले, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

मला प्रथम एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, बर्‍याच जणांनी मी कथेत छायाचित्रांचा अंतर्भाव केल्याबद्दल माझं कौतूक केलं; या छायाचित्रांची कल्पना मुळची माझी नाही, त्याचं श्रेय आहे सहज आणि संदीप चित्रे यांचं. तेंव्हा माझ्या लिखाणाला वेगळं परिमाण दिल्याबद्दल त्या दोघांचे खास आभार!

आता मी एका प्रकाशित कथेबद्दल हा वेगळा धागा काढण्याचं कारण काय म्हणाल तर ते असं:

या कथेच्या उगमाबद्दल मला थोडंसं लिहायचं होतं, आणि ते शेवटच्या भागाच्या प्रतिसादांमध्येच लिहिलं असतं तर कदाचित त्यावर मला अपेक्षित असलेली चर्चा होऊ शकणार नाही असं वाटलं. आणि दुसरं म्हणजे या कथालेखनाच्या निमित्ताने मला मानवी स्वभावाविषयी थोडीशी टिप्पणी करायचीही सुरसुरी होती, तीही वेगळ्या धाग्याच्या स्वरूपात चर्चा-स्वरूपात यावी असं वाटलं. (अर्थात्, संपादकांना हा असा वेगळा धागा अप्रस्तुत वाटला तर तो त्यांनी तो कथेच्या शेवटच्या भागाच्या प्रतिसादात जरूर merge करावा, तो त्यांचा आधिकार मला मान्य आहे.)

कथेच्या उगमाविषयी थोडंसं:

तीन वेगवेगळ्या seemingly unrelated घटना आहेत - काही महिन्यांपूर्वी मी एका विमानतळावर बसलो असतांना एका दुसर्‍या भारतीयाला असंच त्याच्या मागे वॉक वे वर येऊ पहाणार्‍या एका वृद्ध स्त्रीला तिची बॅग ओढून देऊन मदत करतांना पाहिलं होतं, त्याने बॅग हातात घेऊन पट्ट्यावर पुढे जाईपर्यंत म्हातारी सावकाश पट्ट्यावर चढली, तेवढ्या अवधीत ज्यांना घाई होती असे एक-दोन जण त्यांच्या मध्ये वॉक वे वर आले. ते सर्व जण वॉक वे cross करत असतांना नेहेमीची एअरपोर्टवरची announcement मी ऐकली "...डू नॉट कॅरी एनी बिलाँगिंग्ज ऑफ अननोन पॅसेंजर्स, यू आर रिस्पाँसिबल फॉर यूअर बॅगेज..." तेंव्हा माझ्या डोक्यात क्षणभर विचार आला 'या म्हातारीने जर ती बॅग माझी नाही म्हंटलं तर या भल्या बाब्याची कसली काशी होईल!' सुदैवाने तसं काही झालं नाही, पण त्यानंतर प्रत्येक वेळा जेंव्हा जेंव्हा ती announcement मी ऐकत असे तेंव्हा मला ती एअरपोर्ट वरची घटना आठवत असे.

दुसरी घटना तशी नुकतीच घडलेली, मी महिन्यापूर्वी एका जवळच्या लग्नासाठी भारतात आलो होतो. त्यावेळी एका ज्येष्ठ नातेवाईकांनी त्यांच्या तरूण पुतण्याला बोलावून अगत्याने माझी ओळख करून दिली. त्याने महत्-उत्साहाने माझा हात हातात घेऊन अतीव प्रेमाने सर्वशक्तीनुसार घट्ट दाबून हस्तांदोलन केलं, इतकं घट्ट की माझा हात पाच मिनिटांत सुजला. (बहुतेक 'एन आर आय हाईसका, हा बघ देशी हिसका!' असं त्याला सांगायचं असावं!) दुसर्‍याच दिवशी परतीचा प्रवास असल्याने फारशी परीक्षा करायलाही वेळ नव्हता, तात्पुरते उपचार करून मी परत यायला निघालो. निघायच्या दिवशी त्या ज्येष्ठ नातेवाईकांचा फोन आला, त्यांना माझ्या हाताच्या दुखण्याची घटना कळली होती. त्यांनी उदार मनाने माझी क्षमा मागितली, म्हणाले "अरे, गैरसमज करून घेऊ नकोस, त्याला तुझ्याविषयी फार आदर आहे, खूप दिवस त्याला तुला भेटायचं होतं, you just happened to be at the receiving end of his enthusiasm, purely unintended casualty.." वगैरे, वगैरे. मी म्हंटलं 'जाऊ द्या हो, होईल बरं आराम केला की'. पण प्रवासात आणि आल्यापासूनही, आराम मिळालाच नाही आणि सॉफ्ट टिश्यू डॅमेज चं निदान झालं (नशीब hairline fracture वगैरे नाही निघालं!), [हा असाच हात दुखत असतांनाच मी ही कथा टंकली!] पण थोडक्यात, त्या तरुणाचा उत्साह होता, पण माझ्या receiving end ने मात्र फार त्रास सहन केला हो! (तो तरूण इथे मि पा वर सदस्य असेल तर आता बहुतेक nadgi-fod सारखं panja-tod असं नामाभिधान घेऊन येईल! -न. फो. हलकेच घ्या)

त्यानंतर दहा दिवसांपूर्वी वाचली ती एअरवेज च्या कर्मचार्‍यांच्या layoff ची बातमी.

या वरच्या तीन घटनांमधला सामायिक दुवा हा होता की कुठलीही गोष्ट केली (अगदी वरच्या पहिल्या दोन उदाहरणांप्रमाणे 'मुळात उदात्त' किंवा तिसर्‍या घटनेतील अपरिहार्य आणि अप्रिय), तरी त्याला consequence असतातच! आणि ते चांगलेच असतील असं नाही. आपण बरेचदा आयुष्यात 'so what, जो होगा, देखा जायेगा' अश्या वृत्तीने काहीतरी करून जातो, पण कधी कधी थबकून 'मी हे जे करतोय/करतेय, त्याने माझं स्वत:चं, किंवा इतर कुणाचं, काही long-term नुकसान होईल का' असा विचार करायला हवा असं वाटलं. 'विवेक' म्हणतात तो हाच ना? या भूमिकेतून ही कथा सुचली, ती कशी उतरली, ते तुम्ही सर्व वाचकांनी ठरवायचं. मी नक्कीच Jeffrey Archer किंवा Roald Dahl यांच्या कथांसारखा (तितक्या ताकदीचा खचितच नव्हे!) कथेच्या शेवटी twist in the tale असा प्रयत्न केला, पण केवळ एक रहस्य-कथा म्हणून हे लिखाण सोडून दिलं जावू नये, त्याच्या मागचा मानवी स्वभावाचे कंगोरे शोधण्याचा माझा प्रयत्नही वाचकांना कळावा म्हणून हा लेख-प्रपंच!

अवांतरः आपण गोष्टी तुकडया-तुकडयात ऐकतो तेंव्हा नकळत काही ग्रह/पूर्वग्रह करून घेतो; कथेतल्या म्हातारीला तिसर्‍या भागानंतर 'थेरडी', 'डेंजर म्हातारी' अशा विशेषणांनी संबोधणारे प्रतिसाद वाचले, शेवटच्या भागानंतर म्हातारी तशी वाटली का?

प्रकटनकथा

प्रतिक्रिया

सहज's picture

22 Jun 2009 - 11:34 am | सहज

लेखकाचे मनोगत आवडले.

बहुगुणी तुम्ही फार छान लिहता. अजुन येउ दे.

धन्यवाद.

सूर्य's picture

22 Jun 2009 - 11:50 am | सूर्य

शेवटच्या भागात म्हातारी डेंजर वाटली नाही.

बहुगुणी तुम्ही फार छान लिहता. अजुन येउ दे.
असेच म्हणतो.

- शशांक

Nile's picture

22 Jun 2009 - 12:38 pm | Nile

वा! मी खरंच अचंबीत होतो की काय कल्पना सुचल्यात तुम्हाला. आता नुसतं तेच नाही तर त्या घटनांना एकत्र गुंफण्याच्या कल्पकतेला ही दाद देतो. मजा आली वाचुन.
सहजरावांसारखच म्हणतो: येउ द्या अजुन. :)

(वरची कथा कुठे चांगल्या ठीकाणी प्रकाशीत (इंटरनेट नाही :) ) करण्याकरीता पाठवुन बघा! :) )

नीधप's picture

22 Jun 2009 - 4:57 pm | नीधप

वा हे पण छान.
बहुगुणी तुम्ही नमूद केलेल्या घटनांसारख्या घटना सगळ्यांनीच (निदान मी तरी) अनुभवल्या आहेत. पण गोष्ट तुम्हाला सुचली. नुसतीच सुचली नाही तर ती तुम्ही लिहीलीत आणि तीही अतिशय अप्रतिम. शेवटपर्यंत कुठेही कथेचा वेग, उत्कंठा घालवू न देता, कुठेही अतार्किक आणि खोटी न वाटू देता लिहीलीत. ह्यातच सगळं काही आलं. ग्रेट.. अजून लिखाण येऊद्या
पुलेशु!

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

रेवती's picture

22 Jun 2009 - 7:00 pm | रेवती

लेखमालेच्या उगमाचा लेखही छान!
आपण म्हणताहात तसे 'मानवी स्वभावाबद्दल असलेलं लिखाण' असाच विचार मनात आला. तीन वेगवेगळ्या अनुभवातून बांधलेली कथा फारच परिणामकारक झाली. फोटोंमुळे गोष्टीला नक्कीच उठाव आला. आपला हात दुखावलेला असतानाही केवळ वाचकांच्या आग्रहामुळे आपण टंकत होता, धन्यवाद!

रेवती

क्रान्ति's picture

22 Jun 2009 - 7:41 pm | क्रान्ति

रेवतीताईशी सहमत.
असे वेगवेगळे अनुभव एकत्र गुंफून कथा अप्रतिम झाली आहे, मानवी स्वभावाचे हे विविध पैलू कथेत खूपच परिणामकारकरित्या आले आहेत.
लेखही तसाच सुरेख.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

लिखाळ's picture

22 Jun 2009 - 10:02 pm | लिखाळ

मनोगत आवडले. तीन वेगळे प्रसंग गुंफून तयार झालेली कथा छानच.
मानवी मनाचे कंगोरे शोधण्याचा प्रयत्न खरेच चांगला आहे. पुलेशु.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2020 - 2:32 am | श्रीरंग_जोशी

आज अमेरिकेतल्या एका शहराबद्दल मिपावर कुणी भटकंती सदरात काही लिहिलय का हे शोधत असताना ही कथामालिका सापडली.
लगेच पूर्ण वाचून काढली. कथासुत्र उत्तम जुळवले आहे. शेवटचे धक्कातंत्र जोरदार आहे.

कथेच्या जन्मकथेचे मनोगतही भावले.

बहुगुणी साहेब - बर्‍याच वर्षांत तुमचे या प्रकारचे नवे लेखन मिपावर आढळत नाही. कृपया पुन्हा श्रीगणेशा करावा ही आग्रहाची मागणी.

वाह! ही लेखमाला नजरेतून सुटली होती. अप्रतिम! पंतांना धन्यवाद धागा वर आणल्याबद्दल आणि त्यांच्या बहुगुणीजींना केलेल्या विनंतीला अनुमोदन.