वाट चुकलेलें कोंकरूं

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जे न देखे रवी...
29 May 2009 - 2:45 pm

दिनांक २८ मे
हिन्दु हृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस.
काल त्या पुण्यश्लोकाच्या स्मरणाच्या एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला.
तिथे दोन शब्द बोलायचेही होते. मग म्हणून सावरकरांच्या साहित्य गाथेचा
धांडोळा घेत होतो. तो खालील कविता हाती लागली.
हे काय बंधु असतो जरि सात आम्हीं । त्वत्थंडिलीच दिधले असतें बळीं मी ॥
असें जावल्य शब्द लिहिणार्‍या या संन्यस्त योग्याचे हृदय असें कोमलही होते
या प्रत्ययाने मन भारावून गेले. तोच प्रत्यय समस्त सावरकर भक्तांसाठी :-

शीर्षक : वाट चुकलेले कोकरुं

कां भटकसि येथें बोलें । कां नेत्र जाहले ओले
कोणिं का तुला दुखविले । सांग रे ! १

धनि तुझा क्रूर कीं भारी । का माता रागें भरली
का तुझ्या पासुनि चुकली । सांग रे २

हा हाय कोंकरूं बचडे । किति बें बें करुनी अरडे
उचलोनि घेतले कडे । गोजिरें ३

मग थोपटुनी म्यां हातें । आणिले गृहातें त्यातें
तों नवल मंडळींना तें । जाहलें. ४

गोजिरें कोकरूं काळें । नउ दहा दिनांचे सगळें
मउ मऊ केश ते कुरळे । शोभले ५

लाडक्या असा कां भीसी । मी तत्पर तव सेवेसी
कोवळी मेथि ना खासी कां बरें? ६

बघ येथें तुझियासाठीं । आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी । कां बरें? ७

हळु दूध थोडकें प्याले । मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरूं बावरुन गेले । साजिरें ८

लटकून छातिसी निजलें । तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें । रविकरें ९

घेउनी परत त्या हस्तीं । कुरवाळित वरचेवरती
कालच्या ठिकाणावरतीं । सोडिलें १०

तों माता त्याची होती । शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे तरुंचे पाठीं । हाय रे ! ११

हंबरडे ऐकूं आले । आनंदसिंधु ऊसळले
स्तनिं शरासारखें घुसलें । किति त्वरें १२

कवि : वि. दा. सावरकर

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

29 May 2009 - 2:50 pm | लिखाळ

वाहवा .. अतिसुंदर..
अरुणराव तुमचे आनेक आभार !

जनसेवेकरिता आंतमध्ये कळवळा असावा लागतो, त्याची प्रचिती येथे येते.

>विश्व हें मुदित मग केलें । रविकरें ९<
मुदित करणे म्हणजे काय?

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

चतुरंग's picture

29 May 2009 - 6:13 pm | चतुरंग

मुदित/प्रमुदित = आनंदी
(मोद = आनंद ह्या मूळ शब्दावरुन).

चतुरंग

शाल्मली's picture

29 May 2009 - 2:56 pm | शाल्मली

वाहवा .. अतिसुंदर..
अरुणराव तुमचे अनेक आभार !

असंच म्हणते.
खूपच सुंदर कविता आहे.
धन्यवाद इथे दिल्याबद्दल!

--शाल्मली.

प्रमोद देव's picture

29 May 2009 - 2:57 pm | प्रमोद देव

सावरकरांच्या शब्दसामर्थ्याला सलाम!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मदनबाण's picture

29 May 2009 - 10:25 pm | मदनबाण

अगदी हेच म्हणतो...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अरुण वडुलेकर's picture

29 May 2009 - 4:33 pm | अरुण वडुलेकर

आनंदित केले
इथे
प्रकाशित केले असा अर्थ घ्यावा

चतुरंग's picture

29 May 2009 - 6:18 pm | चतुरंग

अरुणकाका ही अप्रतिम कविता आहे आणि ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे हा तर अपार आनंद! हे काव्य आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल शतश: धन्यवाद!

मऊ लोण्याहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥
हे तुकारामवचन सार्थ ठरवणारी कविता आहे. सावरकरच हे लिहू जाणे.

वर लिखाळ म्हणतात ते खरे आहे. समाजसेवेसाठी आणि राष्ट्रासाठी असा कळवळा हृदयात असल्याखेरीज असे काव्य होणार नाही!

चतुरंग

प्राजु's picture

30 May 2009 - 12:51 am | प्राजु

:) चतुरंग यांच्याशी सहमत आहे.
तुमचे शतशः आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

29 May 2009 - 10:45 pm | क्रान्ति

चतुरंग यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत.
अवांतर - माझ्याकडे स्वा. सावरकरांचे "मूर्ति दुजी ती" हे डॉ. ना. ग. जोशी यांनी संपादित केलेलं सावरकरांच्या निवडक कविता हे पुस्तक आहे, पण त्यात ही कविता नाही. वडुलेकर काका, धन्यवाद!

क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 4:26 am | विसोबा खेचर

स्वातंत्र्यवीरांमधल्या कवीला सलाम..!

वडुलेकरसाहेब, आपणास धन्यवाद,

तात्या.

अवांतर - केवळ आज सावरकरांचा जन्मदिन आहे म्हणून अपवादात्मक परिस्थितीत ही कविता येथे राहील. अन्यथा, हे लेखन मिपाच्या धोरणांशी सुसंगत नाही!

काय करणार साला! मालक पडलो ना, त्यामुळे धोरणांशी प्रामाणिक रहावे लागते. वडुलेकरसाहेब, आपण माझा मुद्दा समजून घ्याल अशी आशा करतो..!

तात्या.

अरुण वडुलेकर's picture

30 May 2009 - 10:13 am | अरुण वडुलेकर

तात्या,

तात्यारावांच्या कवितेलाही मिपा धोरणाचे बंधन आहे.
हिन्दुस्थान स्वतंत्र झाला तरी सावरकरांवरची बंधने तशीच ठेवली गेली होतीच,
याची आठवण झाली. असो.

मिपाच्या धोरणाप्रमाणे ही कविता गाळली जाणार असेल तर अवश्य गाळावी.
माझ्या मनांत व्यक्तिशः कसलाही राग येणार नाही.उलट प्रशासन आपल्या
धोरणांशी प्रामाणिक आहे याचा आनंद वाटतो.