निसर्ग म्हणजेच मुक्ति देणारा,निवारण करणारा.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
26 May 2009 - 9:00 am

ह्यावेळी जेव्हा मी वेंगुर्ल्याला भेट दिली तेव्हा कोळी वाड्यातल्या माझ्या जुन्या मित्रांना निक्षून भेटण्याचं ठरवलं होतं.समुद्रामार्गे बाहेरून आलेला व्यापार्‍यांचा माल मांडवीवर उतरवतात.ही मांडवी म्हणजे समुद्राला मिळणारी खाडीच असते.बरेचसे कोळीवाडे ह्या मांडवीच्या परिसरात विखुरलेले आहेत.
फास्कू फर्नांडीस आणि पावलू फर्नांडीस हे दोघे भाऊ माझे जुने दोस्त आहेत.फास्कू आता इंग्लंडला स्थाईक झाला आहे असं मला कुणीतरी सांगतलं होतं.निदान पावलू भेटेल ह्या आशेने कोळीवाड्यात आज गेलो होतो.सकाळची वेळ होती.त्याच्या घरी गेल्यावर मला कळलं,पावलू आणि इतर कोळी समुद्र किनार्‍यावर गेले असून रापण ओढून दुपारच्या बाजारासाठी मासे निवडायला गेले आहेत.
वेंगुर्ल्याच्या समुद्रावर मला नेहमीच जायला आवडतं.किनार्‍यावर बरेच खपाटे लागले होते.आणि प्रत्येकाच्या रापणी ओढल्या जात होत्या.रापण ओढणं म्हणजे समुद्रात टाकलेलं जाळं ओढणं.त्यात अडकेलेले मासे किनार्‍यावर निवडून टोपल्यात जमा करायचे. किनार्‍यावर विचारत विचारत पावलूची रापण कुठे आहे ते कळलं.पावलूला हुडकून काढलं.मला बघून तो इतका खूश झाला की म्हणाला,
"चल आपण घरी जाऊया.दुपारी जेवायला आमच्याकडेच रहा.अगोदर आपण "काजूची" घेऊं या."
असं म्हणून माझ्याकडे मिष्किल बघत राहिला.मी पण हंसलो दोघे समजायचं ते समजलो.
जेवण झाल्यावर जुन्या गोष्टी निघाल्या.पावलू लहान असताना समुद्रात बुडून कालवश व्हायचा वाचला हे मला माहित होतं.पण संपूर्ण हातसा माहित नव्हता.
मी म्हणालो,
"काय रे झालं त्यावेळी? फास्कू कडून मी ऐकलं होतं.आता तू मला चांगला रंगवून रंगवून सांगशीलच कारण आता तू लेख लिहितोस लोकल वर्तमानपत्रात.मी वाचले आहेत ते."
पावलू जरा खजील होऊन मला म्हणाला,
"काय रे माझी टिंगल करतोस काय? मला आता पंचवीस वर्ष मागे जाऊन सर्व गोष्ट रंगवावी लागेल तुझ्यासाठी."
"मी आजचा दिवस तुझ्याकडेच घालवायला आलो आहे.तेव्हा मला वेळ भरपूर आहे तुला ऐकायला."
परत "काजूची" घेत घेत मला म्हणाला,
"ही घेतल्याशिवाय मला मूड येणार नाही.
निसर्गाच्या शक्तिवर माझा भरवंसा आहे.माझ्या अंतरातली घमेंड तो चांगलीच उतरूं शकतो. निसर्गाचं बळ केव्हढं तरी प्रभावशाली आणि रहस्यपूर्ण आहे आणि माझ्यात असलेला अहमगंड मिटवून टाकून ज्या गोष्टी अविनाशी आहेत आणि दृढ आहेत त्यांची रूपं मला त्याच्याकडून पहायला मिळाली.
वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनारी अगदी लहानपणा पासून वाढलेला मी. निसर्गाचा सगळ्यात आश्चर्यजनक आणि हानिकारक डावखेळणारा जो-समुद्र त्याच्या सानिध्यात वाढलेला मी."
मी म्हणालो,
"अरे तुम्ही गाबित लोक समुद्राच्या अंगा-खांद्यावर खेळणारे,मग तुला कसला आला धोका?"

"मी पट्टीचा पोहणारा.मासे पकडणार्‍या जमातीत जन्माला आलो असल्याने समुद्राच्या पाण्यावर प्रेम करीत होतो.माझ्या वडीलांबरोबर समुद्राच्या पाण्यात मी पहिली डुबकी मारली.तुला माहित आहेच तुझ्या सारखं आजकाल मी लेखन करतो.समुद्र आणि समुद्राच्या मासेमारीबद्दल पोटतिडकीने लिखाण करतो.मी समुद्राचं आनंद देण्याचं वातावरण पाहिलंय तसंच त्याचा प्रकोप आणि त्याने केलेला विनाशही पाहिला आहे."
"तू काही ही म्हण,पण मला त्या समुद्राच्या लाटाबघून धडकी भरते.आणि तुम्ही लोक बिनधास्त लहान लहान होड्या घेऊन वल्व्हत असता."
असं मी मधेच त्याला थांबवून म्हणालो.
हाताने ऐक माझं असं दर्शवीत मला पावलू म्हणाला,

"समुद्राच्या अचाट शक्तिची ओळख मला एकदा अगदी चांगलीच जाणवली त्याला बराच काळ होऊन गेला.तो सुंदर उन्हाळ्यातला दिवस होता.आकाश अगदी निरभ्र होतं.गोव्याच्या दिशेने येणारा
गरम वारा वादळी हवे सारखा वाटत होता.जरी मी त्यावेळी नुकताच पंचवीशीतला तरूण होतो तरी अगदी लहानपणापासूनची माझी समुद्राशी ओळख होतीच. मी अगदी निश्चिंत होतो.समाधान होतो.तरीसुद्धा अंगात असलेला आवेश आणि तरूण रक्ताचा जोश असतानाही मी अगदी उजाड वातावरणाचे मूलभूत धडे विसरलो होतो.-मर्यादेत राहणं आणि एकटंच नसणं.समुद्रातले दर्दी पोहणारे ह्या घमेंडीला "मार खाणं"म्हणतात. उंचच उंच लाटेला हे संबोधून आहे.ह्या शक्तिमान लाटा किती शारिरीक हानि देऊं शकतात ह्याचं वर्णन करणारा धडा ऐकताना तो धडा जास्त गहरा वाटतो.

त्यादिवशी एक उंच प्रचंड आणि सुंदर लाट येते हे पाहून मी त्या लाटेत शिरायला नको होतं.त्या राक्षसी लाटेच्या जबड्यात मी खेचला गेलो होतो.आणि वळकटणार्‍या त्या लाटेच्या घडीत माझे दोन्ही पाय सुन्न झाले होते.माझ्या दोन्ही पायांच्या संवेदना गेल्या असं वाटायला लागलं. ती फुगलेली लाट निरंतर प्रचंड व्हायला लागली तसा मी किनार्‍याकडे झेप घेण्याच्या प्रयत्नात राहिलो.आता मी त्या लाटेच्या आधीनच झालो.आणि काही क्षणात त्या प्रचंड लाटेने मला किनार्‍यावरच्या वाळूत थुंकून टाकलं.मी अगदी स्तम्भित होऊन एकडे तिकडे पहात होतो.वारा सारा पूर्वी सारखाच वाहत होता.पक्षी एकमेकाला आकाशात पकडापकडी करीत होते. दुसरी लाट आली,वळकटली गेली आणि फुटली आणि हे होत असताना सूर्य किरणं पूर्वी सारखीच चमचमत होती.प्रकृतीवाद्यांचं म्हणणं "जपून चाल करावी".मी जवळ जवळ डुबलो होतो.
समुद्रातल्या माझ्या पोहण्याच्या अनुभवाचं नांवनिशाण नव्हतं. असलीच तर माझ्या मनातली फक्त समजूत होती.अनेक क्षेत्रात मनुष्य जसा अपरिचीतासारखा असतो तसं समुद्राचं क्षेत्रपण त्याला असतं.हा समुद्र रहस्यमय असतो,त्याचं क्षेत्र अज्ञेय असून त्याच्या प्रतापाचं प्रकटन अनुभवातूनच कळतं. मी मात्र त्या समुद्राच्या सामर्थ्याला मानतो.त्याची मनोहरता-असं म्हणणं कदाचित विरोधाभासी वाटेल-पण त्या सूर्याच्या उन्हाने चमकणार्‍या दिवशी वेंगुर्ल्याच्या समुद्राकडे बघून मी निसर्गाला मुक्ति देणारा,निवारण करणारा असं मानतो.त्यादिवशी मी वेंगुर्ल्याच्या समुद्रात माझा निरर्थक समय बरबात करीत होतो, आणि मला मात्र त्याने किनार्‍यावर फेकून देऊन माझी जागा मला दाखवली.जणू त्यादिवशी त्याने मला समजावलं की,
"जा तू तुझ्या गोतावळ्यात जा,त्यांची समज घाल आणि सांग त्याना त्या क्रमावलीत त्यांची जागा कुठे उचित आहे ती.त्यामुळे आपण सर्व एकमेकाचे समर्थक राहूं."
पावलू पित पित सांगत होता.पण मीच त्याला आवर घातला.
"मी आहे आणखी कांही दिवस वेंगुर्ल्यात.येईन तुझ्याकडे गप्पा करायला"
असं सांगून मी पावलूचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

26 May 2009 - 4:22 pm | कपिल काळे

<<आणि काही क्षणात त्या प्रचंड लाटेने मला किनार्‍यावरच्या वाळूत थुंकून टाकल>>
अतिशय चपखल वाक्यरचना, माणूस निसर्गापुढे किती क्षुद्र आहे ते दाखवण्यासाठी.