तपती-अंतीम भाग

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 May 2009 - 5:51 pm

तपती भाग पहिला : http://www.misalpav.com/node/7909

तिथुन पुढे ....

डीन तपतीकडे पाहातच राहीले.

"म्हणजे बेटा, तुला सगळं काही ..........?"

"हो पपा, सगळं आठवत होतं मला? कसं विसरणार होते मी ते सगळं? तुम्ही जेव्हा मला त्या अनाथाश्रमातुन घरी आणलेत तेव्हाही सगळं आठवत होतं मला? पण ते मला कुणालाच सांगायचं नव्हतं? कारण माझ्यासाठी ते एक खुप त्रासदायक असं दु:स्वप्न होतं. खरेतर मी धरुनच चालले होते की आता सगळे आयुष्य याच बरोबर काढायचे आहे. पण तुमची भेट झाली आणि सगळेच आयुष्य बदलुन गेले. मुळात वयाच्या १५ व्या वर्षी मला कोणी दत्तक घेइल ही कल्पनाच अशक्यप्राय होती. पण तुम्ही भेटलात आणि .......................... !
खरेतर भारतीय दत्तक कायद्यानुसार १० किंवा १२ वर्षापेक्षा मोठ्या मुलांना दत्तक घेता येत नाही. पण बहुदा तुमचे समाजातील स्थान आणि या दत्तकामागची भावना बघुन बाबांनी थोडंसं आउट ऑफ द वे जावुन हे घडवुन आणलं आणि माझं सगळं आयुष्यच बदलुन गेलं."

"मी आधी तुम्हाला सगळं सांगते पपा. मग तुमचा सल्ला विचारीन." तपती नकळत भुतकाळात हरवली.

"पपा आईला तर मी पाहिलेच नाही? जसं कळायला लागलं तसं दुर्गामावशीच आठवतेय मला. तिनेच सांगितलं होतं की माझी आई मला जन्म देताना बाळंतपणातच गेली, त्यानंतर मावशीनेच वाढवलं होतं मला. तुम्ही म्हणाल मावशी होती तर मग मी त्या अनाथाश्रमात कशी काय गेले? हे जाणुन घेण्यासाठी खुप मागे जावे लागेल. अर्थात ही सगळी घटना मला मावशीनेच सांगितली आहे, प्रत्यक्ष अनुभव असा नाहीच. कारण मुळात मी आईलाच बघितलेले नाही. तेव्हा मध्ये कुठे कुठे तुटकपणा जाणवण्याचा संभव आहे. आईने मावशीला सांगितलेली कहाणीही त्रोटकच होती. मी ती काही ठिकाणी दोन अधिक दोन बरोबर चार करुन सलगता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

कोकणातल्या त्या छोट्याशा खेडेगावात ही कथा सुरू होते. काळ आता माहीत नाही. पण जे घडलं त्यावरुन असं जाणवतं की अजुनही त्या गावात सुधारणेचा वारा लागलेला नव्हता. इनमिन पंचवीस तीस घरांचं गाव. गाव कसलं वस्तीच होती ती छोटीशी. कोकणातल्या कुठल्याही गावाप्रमाणे त्या छोट्याशा वस्तीतसुद्धा लोक गुण्यागोविंदाने राहात होते. विशेष म्हणजे तीसेक घराच्या या छोट्याशा वस्तीत सुद्धा वरची आळी आणि खालची आळी असे दोन प्रकार होतेच. नाही म्हणायला मधली आळीसुद्धा होती म्हणा सहा घरांची. वरच्या आळीत वतनदार सरंजाम्यांचं घर होतं. सरंजामे मुळचे देशावरचे, पण त्याचे कोणीतरी पुर्वज कोकणात येवुन स्थायिक झाले ते इथलेच झाले. पेशव्यांच्या काळात त्यांच्या कुठल्यातरी पुर्वजाला इथली वतनदारी मिळाली होती. तेव्हापासुन ते इथेच होते. आजुबाजुच्या पाच गावची वतनदारी होती त्यांच्याकडे. आता स्वातंत्र्यानंतर अधिकार संपले, पण गावच्या लोकांच्या मनातला घराण्याबद्दलचा आदर (त्याला गावातले लोक दहशत असेही म्हणत) अजुनही कमी झालेला नव्हता. त्या दरिद्री वस्तीतली त्याची आलिशान कोठी तशी विजोडच वाटायची. गावात आलेल्या पहिल्या पुर्वजाने कधीकाळी गावात महादेवाचं एक मंदीर बांधलं होतं. लोक सांगतात की खुप जागृत देवस्थान आहे हे. कोकणातील अनेक चालीरितींप्रमाणे या मंदीरातही एक सेविका राहायची. चंद्रकला, स्पष्ट आणि सरळ शब्दात तिला देवदासी म्हणता येइल. बापाने देवाला केलेला नवस फ़ेडण्यासाठी लहान्या चंद्रीचं लग्न देवाशीच लावुन दिलं आणि तेव्हापासुन चंद्रा देवाची दासी होवून राहीली ती कायमचीच. तिथेच मंदीरामागे तिचं छोटंसं घर होतं.

लोक म्हणत की.............................................
तिचे वस्तीतल्या अनेक लोकांशी तसले संबंध होते............ !

काय गंमत आहे बघा, माणुस किती धाडसी असतो, धीट असतो. देवदासी म्हणायचं आणि देवाची देण सार्वजनिक वस्तुसारखी वापरायची. मुळात एक जिवंत माणुस, अगदी देवाला का होइना पण या पद्धतीने दान करण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होतो माणसाला? एक माणुस या नात्याने, त्या परमेश्वराचेच एक अपत्य या नात्याने तिच्या देखील काही आशा-अपेक्षा, काही स्वप्ने असतीलच की! पण माणुसप्राणी एवढा स्वार्थी असतो की आपल्या स्वार्थासाठी तो देवालाही राबवायला कमी करत नाही. असो.

कुठल्या कां संबंधातुन का होइना पण चंद्राला एक मुलगी झाली होती. नंदा तिचं नाव. गावातले तथाकथित संभावित लोक आता नंदाच्या मोठे होण्याची वाट बघत होते. शेवटी देवदासीची मुलगी, तिला वेगळं अस्तित्व, वेगळं आयुष्य ते काय असणार?

पण चंद्रा सावध होती

गोरीपान, हसरी, बडबडी नंदा चंद्राचा जिव की प्राण . जे भोग आपल्या वाटेला आले ते नंदाच्या वाटेला येवू नयेत एवढीच इच्छा होती तिची. म्हणुन तिने नंदाला तालुक्याच्या गावी आपल्या चुलत बहिणीकडे शिकायला ठेवले होते. फक्त उन्हाळ्याच्या सुटीत काही दिवसांसाठी नंदा आईकडे यायची. बघता बघता दिवस कसे गेले ते कळालेच नाही. ओसरीवर खेळणारी पोर तारुण्यात आली होती.
११ वी मॆट्रिकची परिक्षा देवुन नंदा नेहेमीप्रमाणे सुट्टीसाठी आईकडे आली होती...................

.......................................................................

"नंदे, तिथं मजा येत असेल ना गं? मोठं गाव, मोठी शाळा, नवनवीन मैत्रीणी ! " शुभा विचारत होती.

वाडीत नंदाची एकच मैत्रीण होती, सावंतांची शुभदा. देवदासीची मुलगी म्हणुन साहजिकच नंदाच्या वाट्याला एकटेपणाचा शाप आलेला होता. नाही म्हणायला तिची सोबत करायला गावातले अनेक जण तयार होते.... अगदी १८ वर्षाच्या हरीपासुन ते साठी ओलांडलेल्या यशवंताआबापर्यंत. पण त्यापेक्षा नंदाने एकुलत्या एक मैत्रीणीवर समाधान मांडणे पसंत केले होते. दररोज संध्याकाळी दोघी वेशीपासल्या साकवावर बसुन असायच्या. ही जागा नंदाला खुप आवडायची. उन्मुक्तपणे वाहणारा तो ओढा बघितला की तिला खुप प्रसन्न वाटायचे. आजही दोघी साकवाच्या कडेला गप्पा मारत बसल्या होत्या. साडे सात वाजुन गेले होते, घरी परतायची वेळ झाली होती.

"नंदे, तुला कुणी भेटला नाही का गं तिथे?" शुभीने खोडसाळपणे विचारले.

"शुभे, फार वाह्यातपणा करायला लागली आहेस हा तु. आवशीला सांगु काय तुझ्या, कुणीतरी नवरा शोधा हिच्यासाठी म्हणुन?" नंदाने तिचा वार हसत हसत परतवला.

तशी शुभी...नंदे, थांब बघतेच तुला..; असे म्हणत तिच्या अंगावर धावली.

आणि नंदा हसतच मागे सरकली, त्या गोंधळात तिचा तोल गेला आणि ती वाहत्या ओढ्यात कोसळली. ओढा तसा फारसा खोल नव्हता पण पाण्याला असलेला वेग आणि प्रसंगाची आकस्मिकता यामुळे दोघीही घाबरल्या. नंदा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहात चालली होती. काठावर उभी असलेली शुभी तर प्रचंडच घाबरली होती. ती मदतीसाठी जोरजोरात हाका मारत ओढ्याच्या काठाकाठाने पळायला लागली. मधुन मधुन ती नंदाशी बोलत तिला धीर देण्याचा प्रयत्न करीत होती. ओढ्याच्या वेगामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर नंदाही वाहत चालत होती आणि तेवढ्यात, एका वळणावर कुणीतरी पाण्यात उडी मारली आणि वाहते पाणी कापत ती व्यक्ती नंदापर्यंत पोहोचली.

थोड्या वेळाने नंदा शुद्धीवर आली. डोळे उघडुन तिने आपल्या उपकारकर्त्याकडे पाहीले आणि पाहतच राहीली. पंचविसेक वर्षाचा एक देखणा तरुण तिच्याकडे पाहात उभा होता, शेजारीच घाबरलेली, किंचित लाजलेली देखील शुभी उभी होती. नंदाने डोळे उघडताच तिच्या जिवात जिव आला.

"आता कसं वाटतय तुम्हाला? आणि आत्महत्या वगैरे करायची असेल तर ओढ्याने काम नाही भागणार हो, ओढा खोल नसतो तेवढा." त्याने मिस्कीलपणे हासत विचारले.

त्याच्या मनमोकळेपणाने आधी घाबरलेली नंदा थोडीशी मोकळी झाली...आणि तिने दोन्ही हात जोडले.
"धन्यवाद, तुमचे खुप उपकार झाले. मी नंदा ! चंद्राबाईची मुलगी! "

"माहीत आहे मला. तुम्हाला कोण ओळखत नाही या गावात. या पामराला अशोक म्हणतात, अशोक सरंजामे." तो मिस्कीलपणे हासला आणि तिच्याकडे बघत - बघत तिथुन निघून गेला. त्या दिवसापासुन नंदाचं आयुष्यच बदलुन गेलं.

तिला पहिल्यांदाचा आपण सुंदर असल्याचा साक्षात्कार झाला होता. कुठल्याही स्त्रीच्या मनात जन्माला येणारी तारुण्यसुलभ लज्जा तिला जाणवायला लागली होती. नंतर अशोक असाच कुठे कुठे भेटत राहीला. त्याचा देखणेपणा, त्याचं रांगडं, मर्दानी हसणं, मोकळेपणाने बोलणं..... आपण कधी त्याच्या प्रेमात पडलो हे नंदाला कळालेच नाही. पोर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असलेल्या नंदाने अशोकलाही भुरळ घातली नसती तरच नवल होते. नंदा तर चार पावले हवेतच होती. दोघांच्या भेटी वाढल्या होत्या. ओढ्यावरचा साकव, माडांमधुन शिळ घालत वाहणारा वारा सगळीकडे त्यांच्या प्रितीच्या खुणा पसरु लागल्या होत्या. लेकीमधला बदल आईच्या ही लक्षात आला होता. वतनदाराचा पोरगा सारखा सारखा देवळाकडे यायला लागला. येता जाता चंद्राकाकु-चंद्राकाकु करत घरी येवुन बसायला लागला तसे चंद्रा अस्वस्थ होवू लागली. सगळं आयुष्य नशीबाशी झट्याझोंब्या घेण्यात गेलेली चंद्रा 'त' वरुन 'ताकभात' ओळखण्याइतकी सुज्ञ नक्कीच होती. तिने पोरीला समजावण्याचा प्रयत्न करून पाहीला. पण नंदा समजावण्याच्या पलिकडे गेली होती.

"तुझं एक काहीतरीच असतंय बघ आई, अगं जग कुठल्या कुठे चाललय. आजकाल देवदासीसारख्या प्रथा कधीच बंद झाल्यात आणि अशोकचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहोत. त्याने महादेवाचा बेल उचलुन वचन दिलंय मला तसं.मला खात्री आहे, तो मला वार्‍यावर सोडणार नाही याची." नंदाचा आपल्या प्रेमावर ठाम विश्वास होता. दिवस जात होते. आता सगळ्या गावात चर्चा होवू लागली होती. त्यामुळे एक फायदा असा झाला होता की नंदाला गावातल्या दुसर्‍या कोणाचाही त्रास होत नव्हता. सरंजाम्यांशी कोण वाकडे घेणार? पण तोटा असा झाला होता की यातुन गावाने निष्कर्ष काढला होता की वळणाचं पाणी वळणावरच गेलं. देवदासीची पोरगी दुसरं काय करणार. बडं कुळ गाठलं तिनं. पण नंदाने अशा वावड्यांकडे लक्ष देणं सोडुन दिलं होतं, अलिकडे फक्त सुख-स्वप्नात रमणं एवढंच तिचं विश्व उरलं होतं.

कसं असतं ना? ज्या वयात माणुस व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनांनी भारलेला असतो, पछाडलेला असतो त्याच वयात एखाद्या परक्या व्यक्तीच्या आवडी निवडी आपल्याला इतक्या आवडु लागतात की आपण आपल्या आवडी निवडी, आपली मते विसरून त्या व्यक्तीच्या आवडी निवडी, त्याची मते जपायला लागतो. त्याला हवे नको ते पाहताना आपली मते विसरतो. त्याच्या सुखातच आपलं सुख मानायला लागतो. यालाच प्रेम म्हणतात का?

चंद्राची काळजी वाढत होती. सरंजाम्यांना ती पक्की ओळखुन होती. गावातल्या अनेक लोकांबरोबर सरंजाम्यांनीही तिला सोडले नव्हते. काय होणार पोरीचे? हाच विचार कायम मनात असे आजकाल चंद्राच्या.

पण निसर्ग काही थांबत नाही. दोन तरुण मने किंबहुना तरूण शरीरे जवळ आली की जे व्हायचे तेच झाले. एके दिवशी सकाळी सकाळी नंदा परसात उलट्या काढताना दिसली. नंदाला विचारले असता ती हमसुन हमसुन रडायलाच लागली. शेवटी चंद्राची शंकाच खरी ठरली होती. आपले काम साधल्यानंतर अशोकने नंदाला पद्धतशीरपणे आपली सरंजामी वृत्ती दाखवली होती.

"हे बघ नंदे, बोलुनचालुन देवदासीची जात तुझी. हे पाप माझंच आहे कशावरुन. कुणा कुणाला लागुन असशील तु गावात कोण जाणे!" अगदी निर्लज्जपणे हसत हसत अशोकने नंदाला आपली जात दाखवली.
..........

"न्हाय मालक, माझी पोर न्हाय तसली. अवो तिला न्हानपणापासनं या समद्यापासुन लांबच ठेवलीया मी. गावात कुनालाबी इचारा की!"

खरेतर चंद्राने नंदाला गर्भ पाडायचा सल्ला दिला होता. पण नंदा तयारच नव्हती. खुप समजावुनही पोर ऐकत नाही म्हंटल्यावर चंद्रा नंदाला सरंजाम्यांच्या वाड्यावर घेवून आली होती. अशोकने तिच्याशी लग्न करावे म्हणुन विनवायला. पण अपेक्षेप्रमाणेच अशोकने उडवून लावले होते. थोरले सरंजामे तिथेच उभे होते. चंद्राने आशेने त्यांचाकडे पाहीले.

"चंद्रे, माज आलाय तुला आन तुज्या लेकीला. आपली पायरी सांभाळुन राहा. सरंजामेंच्या घरात अंगवस्त्र ठेवण्याची प्रथा आहे, अंगवस्त्राशी लग्न लावण्याची नाही. सरंजामे कुळ कुठे आणि तु, एक देवदासी कुठे. तुझी इच्छाच असेल तर एक उपकार करू आम्ही तुझ्यावर. तुझी लेक अशोकरावांना आवडलीय. तिला ठेवायला तयार आहोत आम्ही! कधी कधी आमच्या पण उपयोगी पडेल." सुपारीचे खांड तोंडात टाकता टाकता थोरल्या सरंजाम्यांनी घाव घातला. तशी चंद्रा रागाने उसळली....

"अरं मुडद्या, माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळं करताना नाय रे आठवला तुला कुळाचा अभिमान!" रागारागात चंद्रा अशोकच्या अंगावर धावुन गेली. ती एकदम अंगावर आल्याने घाबरुन दचकलेल्या अशोकने तिला दुर ढकलली. चंद्रा थेट तशीच भिंतीवर जावुन डोक्यावरच आदळली. तो वर्मी बसलेला फटका बहुदा तिला सहन झाला नाही .............

आणि तिथेच नंदा पोरकी झाली.

"आई....................., नंदा आईकडे झेपावली आणि प्रसंगाची गंभीरता सरंजामेंच्या लक्षात आली. त्यांनी रागारागाने अशोककडे पाहिले, तसा अशोक चपापला.

"बाबासाहेब, मी मुद्दाम नाही केले ते. रागाच्या भरात..............."

"ते विसरा आता, हे कसं निस्तरायचं ते बघा !" थोरले सरंजामे संतापले होते. आधीच त्यांच्या नावाने गावात वातावरण गढुळले होते. त्यात चिरंजिवांचे हे प्रताप.

"त्यात काय मोठंसं बाबासाहेब, दुसरीला पण संपवु आणि प्रेतं देवु टाकुन लांब कुठेतरी, किंवा पुरुन टाकु रानात." अशोक बेफिकीरपणे उदगारला. तसे थोरल्या सरंजाम्यांनी त्याच्याकडे रागाने बगितले......

"तुझी अक्कल कुठे शेण खायला गेलीय का? दोघी एकदम गायब झाल्यातर लोकांना संशय येइल. वातावरण पहिल्यासारखं राहीलेलं नाही. एक काम कर, त्या पोरीला बंद कर आतल्या खोलीत, आणि पोलीसांना बोलव" सरंजाम्यांचे डोळे चमकायला लागले होते.

"बाबासाहेब, पोलीस............" अशोक चमकला.

"तु सांगितलं तेवढं कर!"

आईचा मृत्यु सहन न झालेली नंदा शुद्ध हरपुन पडली होती. चंद्रा तिथेच जमीनीवर पालथी पडली होती. थोरल्या सरंजाम्यांनी तिथेच असलेला मोठा अडकित्ता उचलला आणि जोर लावुन चंद्राच्या डोक्यावर झालेल्या जखमेवरच मारला आणि नंतर त्यावरचे आपले ठसे पुसून नंदाच्या हातात दिला.

ते बघितल्यावर अशोकला समजले आपला बाप खरोखर बाप आहे म्हणुन.

कोर्टात केस उभी राहीली. स्वत:च्या प्रेमप्रकरणाआड येणार्‍या सख्ख्या आईचा खुन करणारी हृदयशुन्य, निर्दय मुलगी म्हणुन नंदावर खटला चालु झाला. बिचार्‍या नंदाने सत्य सांगायचा खुप प्रयत्न केला. पण सरंजामेंचा पैसा आणि गावातली त्यांची दहशत सत्याला पुरून उरली. त्यांनी सहजपणे नंदाला चंद्राच्या डोक्यात अडकित्ता मारताना पाहणारे आय विटनेस उभे केले. केस रंगवण्यात आली ती म्हणजे.........

कायम नंदाच्या पाळतीवर असलेल्या चंद्राने रात्रीच्या वेळी सरंजाम्यांच्या घरात अशोकच्या भेटीला आलेल्या नंदाला बघितले. नंदामागोमाग तीही सरंजामेंच्या घरी आली आणि तिला आपल्यातला आणि सरंजाम्यांच्यातला फरक समजावण्याचा, तिला अडवण्याचा प्रयत्न केला. पण सरंजाम्यांच्या दौलतीची राणी होण्याचा ध्यास घेतलेल्या नंदाने रागारागात तिथल्याच मोठ्या अडकित्त्याने प्रत्यक्ष आईवरच घाव घातला आणि त्यातच चंद्राचा मृत्यु झाला. पोलीसांना पण व्यवस्थित मॅनेज केलेले असल्याने खोटे पुरावे उभे करणे अवघड गेले नाही. केस लगेचच निकालात काढण्यात आली.

व्यभिचारी, निर्दय आणि मातृद्रोही नंदाला स्वत:च्या सख्ख्या आईचा खुन केल्याच्या आरोपाखाली सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

अशोकबरोबर लग्न करुन सुखाने संसार करण्याची स्वप्ने बघणारी नंदा .........................

कारागृहातच तिला एक नवी मैत्रीण भेटली. दुर्गा....
कुठल्यातरी छोट्याशा गुन्ह्यासाठी सहा महिन्याची शिक्षा होवून तुरुंगात आलेली दुर्गा, अल्पावधीत नंदाची जिवलग मैत्रीण बनली. नंदाची कहाणी समजल्यावर तर ही मैत्री खुपच दृढ झाली. गरोदर असलेली नंदा बाळाला जन्म देताना बाळंतपणातच गेली. जाता जाता तिने दुर्गाकडुन वचन घेतले होते आपल्या बाळाचा सांभाळ करायचे. तशा सुचना करणारे एक विनंतीवजा पत्र तिने तुरुंगाधिकार्‍यांना लिहुन दिले होते.

ती गोरी गोमटी पोर घेवुन दुर्गाने थेट आनंदाश्रम गाठला. पाटीलबाबा नामक एका देवमाणसाने समाजातील अनाथ, निराश्रीत मुलांसाठी हा अनाथाश्रम चालवला होता. दुर्गाने मुलीला त्यांच्या स्वाधीन केले आणि तिच्या संगोपनासाठी दरमहा ठराविक रक्कम पाठवायची खात्री देवून दुर्गाने भरल्या अंतकरणाने त्या लेकराचा निरोप घेतला........

तपतीचे डोळे भरून आले होते. कुठल्याही क्षणी ती रडेल असे वाटत होते.

"एक गोष्ट नाही उमजली बेटा. दुर्गाने तुला आपल्या घरी घेवुन न जाता त्या अनाथाश्रमात का सोडले? " डीनना बरेच आश्चर्य वाटल्याचे त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

"पपा, खरे सांगायचे तर या प्रश्नाने जवळजवळ बारा वर्षे माझाही पिच्छा पुरवला होता. कारण दुर्गामावशीने या बारा वर्षात मला कधीही आपल्या घरी नेले नव्हते. नेहेमी तिच अनाथाश्रमात येवुन भेटायची. हळु हळु करुन तिनेच आईची सर्व कहाणी, सगळी कैफियत मला सांगितली होती. अशोक सरंजामे या माणसाबद्दल माझ्या मनात असलेला सगळा संताप, सगळा तिरस्कार दुर्गामावशीचीच देणगी होती. मी कित्येक वेळा तिच्याबरोबर तिच्या घरी जायचा हट्ट धरत असे. पण प्रत्येक वेळी ती काहीतरी थातुरमातुर कारणे देवुन मला घरी न्यायचे टाळत असे. मी बारा वर्षीची असताना तिचा मृत्यु झाला . तेव्हाच समजले मला या सगळ्यांचे कारण."

"पपा, दुर्गामावशी वेश्या होती व्यवसायाने. कुठल्यातरी दुर्धर रोगाने वारली ती. तिच्या त्या परिस्थीतीचा मला वाराही लागु नये म्हणुन तिने मला आपल्यापासुन दुरच ठेवले होते. खरेच सांगते पपा, आई नाही आठवत मला पण त्या दिवसात दुर्गामावशीच माझी आई होती, माझे सर्वस्व होती. तिने जर आईबद्दल मला काही सांगितले नसते तर मी तिलाच माझी आई समजत राहीले असते. मला कधीही काहीही कमी पडु दिले नाही तिने. मला वाटतं दुर्गामावशी गेल्यानंतर तीन एक वर्षांनी बाबांनी माझ्या शिक्षणासाठी म्हणुन तुमच्याकडे मदत मागितली आणि तुम्ही आलात ....."

"हो बेटा, तुला भेटायला म्हणुन आलो आणि का कोण जाणे तुझ्याबद्दल एक विलक्षण आपुलकी, प्रेम वाटले. माझा पेशा डॉक्टरचा. त्यात संसाराची कुठलीही बंधने नकोत म्हणुन मी लग्नदेखील केले नव्हते. पण तुला त्या दिवशी भेटलो तेव्हा तु म्हणालीस की मला डॉक्टर व्हायचेय. तेव्हा ठरवलं कि आजपासुन ही माझी लेक आणि बाबांशी बोलुन सरळ तुला दत्तकच घेतलं. आता तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच राहीलेला नाही."

"पपा खरे सांगु, पहिल्यांदा जेव्हा तुमच्या बरोबर आले ना, तेव्हा मनात माझ्या आईचाच विचार कायम असायचा. आईच्या आयुष्याची धुळधाण करणार्‍या त्या नराधमाबद्दल मनात प्रचंड द्वेष, तिरस्कार, घृणा होती. मनात केवळ सुडाचा विचार होता. तो द्वेषच माझ्या जगण्याचा आधार होता. ज्या माणसाने माझ्या आईला, आजीला इतका त्रास दिला त्याचा सुड घ्यायचा, आजीला-आईला न्याय मिळवुन द्यायचा असा काहीसा बालीश विचार मनात होता. त्यात तुम्ही मला दत्तक घ्यायची इच्छा जाहीर केलीत. ही खुप मोठी संधी होती माझ्यासाठी. कारण तेव्हा तसं काहीच कळत नव्हतं. सुड घेणार म्हणजे मी नक्की काय करणार? हे मलाच माहित नव्हतं. फ़क्त त्या माणसाबद्दल एक प्रचंड राग होता मनात. त्यामुळे त्यावेळेस तुमचा आधार खुप मोलाचा वाटला मला. तुमची मुलगी या नात्याने समाजात एक स्थान मिळणार होते. माझ्या मनातला हेतु पुर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ आणि माध्यम मिळणार होते. केवळ तो एक उद्देष्य ठेवुन मी तुमच्याबरोबर यायचे मान्य केले.

पण खरे सांगते पपा, तुम्ही माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलुन टाकलात. माझ्या मनातली सुडाने पेटलेली तपती, हे नाव मला आश्रमाच्या बाबांनी दिले होते.... ते म्हणायचे माझी लेक सुर्यासारखी तेजस्वी होणार आहे, जणु सुर्याची कन्याच..म्हणुन माझे नाव तपती ठेवले होते त्यांनी..
तुम्ही या तपतीला जगण्याचे एक नवीन उद्दीष्ठ्य दिलेत. प्रेम, माया, वात्सल्य या सगळ्या भावनांशी नव्याने ओळख करुन दिलीत. मुळ म्हणजे स्वतःवर आणि या जगावर प्रेम करायला शिकवलेत.
तुमच्यामुळे तर ती सुडभावनेने पेटलेली तपती, मनाच्या कुठल्यातरी एका अंधार्‍या कोपर्‍यात दडुन बसली. तुम्ही एका नवीन तपतीला जन्म दिलात. जीला आयुष्याबद्दल प्रेम आहे, जन सामान्यांबद्दल विलक्षण आस्था, माया आहे. तुम्ही मला केवळ डॉक्टर नाही बनवलं तर एक परिपुर्ण माणुस बनवलंत. मी सगळा भुतकाळ विसरले होते बाबा. अशोक सरंजामे हे नाव देखील विसरले होते. पण भुतकाळ सहजासहजी आपला पिच्छा सोडत नाही हेच खरे. माझा भुतकाळ पुन्हा एकदा माझ्या वर्तमानात समोर येवुन उभा ठाकलाय. ज्या माणसाचा मी कायम तिरस्कार केला, तो आज माझ्यासमोर गलितगात्र होवुन पडलाय. आज त्याचं आयुष्य माझ्या हातात आहे पपा, आज तो पुर्णपणे माझ्यावर अवलंबुन आहे. परमेश्वराचा न्याय किती विलक्षण असतो ना. ज्याने माझ्या आज्जीला मारले, जो माझ्या आईच्या आयुष्याच्या धुळधाणीला कारणीभुत आहे त्या माणसाचे जगणे मरणे आज माझ्या शल्यक्रियेतील कुशलतेवर अवलंबुन आहे."

तपतीचे डोळे एका वेगळ्याच भावनेने चमकत होते. डीन ना तिच्या डोळ्यातली ती चमक थोडीशी वेगळीच वाटली.

"तु काय ठरवले आहेस बेटा? आणि म्हणुन तु ऑपरेशन करायला नकार देते आहेस का? तसं असेल तर माझी इतक्या वर्षाची तपश्चर्या वाया गेली असेच म्हणावे लागेल. तपती, बेटा एक लक्षात ठेव प्रथम तु एक डॉक्टर आहेस, पेशंट समोर आला की त्याला वाचवण्यासाठी शक्य ती सर्व धडपड करणे हेच तुझे प्रथम कर्तव्य ठरते. अशा वेळी तु जर माघार घेणार असशील ती देखील सुड भावनेपायी तर मला खुप वाईट वाटेल बेटा. माझी सगळी मेहनत पाण्यात गेली असेच म्हणावे लागेल."

"नाही पपा, माझी भिती वेगळीच आहे. ऑपरेशन टेबलवर जर माझ्यातली नंदाची मुलगी जागी झाली तर.....? म्हणुन मी हे ऑपरेशन करायचे टाळते आहे. पपा, प्लीज मला समजुन घ्या."

डीनसरांचे डोळे आनंदाने चमकले, त्यांनी पुढे होवुन तपतीच्या डोक्यावर थोपटले...

"तपु, मला अजुनही असे वाटते की हे ऑपरेशन तुच करावेस. माझा माझ्या लेकीवर, नव्हे डॉ. तपतीवर पुर्ण विश्वास आहे. ती भावना आणि कर्तव्य यात कधीही गल्लत करणार नाही याची खात्री आहे मला. बाकी तुझी मर्जी. मी तुला फोर्स करणार नाही. निर्णय तुला घ्यायचाय. वेळ फार कमी आहे. ऑल दी बेस्ट, बेटा." डीन उठले आणि केबिनच्या दरवाज्याकडे निघाले तेवढ्यात केबिनचा दरवाजा धाडकन उघडला आणि एक सिस्टर घाई घाईत आत शिरल्या ...

"सर डॉ.उपासनी तुम्हाला शोधताहेत, ते सकाळी अ‍ॅडमिट झालेले पेशंट सरंजामेसाहेब त्यांची तब्येत खुपच बिघडलीय, उपासनीसर म्हणताहेत लगेच ऒपरेशन करावे लागेल. प्रोसीजर साठी तुमची परवानगी हवीय त्यांना त्यासाठी ते तुम्हाला आणि तपती मॅडमना शोधताहेत. त्यांच्यामते ही केस खुप क्रिटिकल आहे, फक्त तपतीताईच .................

डीन नी तपतीकडे वळुन बघीतले. तोपर्यंत तपती केबीनच्या दारापर्यंत पोहोचली होती.

"सिस्टर वेंटीलेटरची ऎरेंजमेंट करा.. जादा रक्ताच्या बाटल्या तयार ठेवा. राजु, सदानंद... पेशंटला ६ नं. ओ.टी. मध्ये हलवा. सिस्टर, प्लीज उपासनीसरांनाही तिथेच यायला सांगा आणि तोपर्यंत तुम्ही पेपर्स तयार करुन पेशंटच्या कुटुंबियांची सही घ्या."

डीन सर कौतुकाने आपल्या लेकीकडे पाहात होते. तपतीने एकदाच वळुन त्यांच्याकडे पाहीले. आता तिच्या डोळ्यात एक शांत पण ठाम अशी चमक होती. झरकन ती निघुन गेली. डीन प्रसन्नपणे हसले, आता ती फक्त डॉ. तपती होती.

समाप्त.

कथा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

25 May 2009 - 5:59 pm | घाशीराम कोतवाल १.२

आप्ण बोललो होतो काय तरी लोच्या हाय तपती आणी अशोक सरजांमे मधे काहि तरी कौटुंबिक रीलेशन आहे
बाकि कथा एकदम जबर्दस्त आहे फारच वेगवान कथानक कुठेच तोल जाउन दिला नाहि लेखकाने
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2009 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

मालक तपतीला दत्तक घेतले आहे हे सुद्धा फ्लॅशमागे मध्ये दाखवायची काय आवश्यकता होती ते कळाले नाही. म्हणुनच असेल भवतेक पण डॉ. तपतीच्या दु:खात पुर्णपणे सामील होता आले नाही येव्हडे मात्र खरे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 9:55 am | विशाल कुलकर्णी

तपतीला तिच्या वयाच्या १५ व्या वर्षी दत्तक घेतले आहे. तो उल्लेख मला फक्त तिचे डीनशी असलेले नाते अधोरेखित करण्यासाठी करायचा होता. पण ते जर फ्लॅशच्या ऐवजी आजच्या कालात घेतले असते तर मग त्यानंतरच्या तपतीच्या आयुष्याचा आढावा घेणेदेखील अपरिहार्य झाले असते. आणि मला ही कथा फक्त तपतीच्या आयुष्यात आलेल्या त्या एक प्रसंगापुरतीच मर्यादित ठेवायची होती. तसे केले असते तर कथा अजुन खुप वाढवता आली असती पण मग भरकटण्याचा धोका होता, म्हणुन तो मोह टाळला. धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"

अनंता's picture

25 May 2009 - 7:08 pm | अनंता

आवडले :)

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

क्रान्ति's picture

25 May 2009 - 7:49 pm | क्रान्ति

तपती आवडली. :)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

मदनबाण's picture

26 May 2009 - 2:02 am | मदनबाण

दोन्ही भाग आवडले... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

मितालि's picture

26 May 2009 - 5:45 am | मितालि

अश्विनि भावे चा नवीन चित्रपट "कदाचित" पाहुन तर नाही ना सुचली ही कथा???? असो...

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 9:57 am | विशाल कुलकर्णी

मी अजुन तरी "कदाचित" पाहिलेला नाही. पण कथानक ऐकुन आहे जे या कथेपेक्षा खुप वेगळे आहे. असो धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"

भाग्यश्री's picture

26 May 2009 - 11:03 am | भाग्यश्री

कदाचित बराच वेगळा आहे आय थिंक..
कथा सही!

www.bhagyashree.co.cc

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 11:44 am | विशाल कुलकर्णी

धन्स भाग्यश्री,
आता कुठे माझ्या जिवात जिव आला. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

दिपक's picture

26 May 2009 - 10:22 am | दिपक

चित्रपटाला शोभेल अशी कथा. आवडली. :)

अमोल केळकर's picture

26 May 2009 - 1:12 pm | अमोल केळकर

दोन्ही भाग आवडले. मस्त कथा
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

जयवी's picture

26 May 2009 - 2:19 pm | जयवी

विशाल आवडली तुझी तपती :) छान लिहिलं आहेस !! असाच लिहिता रहा :)

मि माझी's picture

26 May 2009 - 3:40 pm | मि माझी

मस्त कथा..
>>कसं असतं ना? ज्या वयात माणुस व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनांनी भारलेला असतो, पछाडलेला असतो त्याच वयात एखाद्या परक्या व्यक्तीच्या आवडी निवडी आपल्याला इतक्या आवडु लागतात की आपण आपल्या आवडी निवडी, आपली मते विसरून त्या व्यक्तीच्या आवडी निवडी, त्याची मते जपायला लागतो. त्याला हवे नको ते पाहताना आपली मते विसरतो. त्याच्या सुखातच आपलं सुख मानायला लागतो. यालाच प्रेम म्हणतात का?

छान लिहल आहे.

मी माझी..
चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..