संवादाचा सुवावो

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
3 May 2009 - 6:58 pm

ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले. पुढे 'मोगला फुलला' ही ध्वनिफित ऐकली नि ज्ञानेश्वरीच्या एकेका ओवीवरचा त्यांचा अभ्यास, त्यातल्या प्रत्येक शब्दाची केलेली फोड आणि त्याचा त्यांनी सांगितलेला अर्थ पाहून चकीत व्हायला झालं. या माणसाकडे किती नि काय काय भरलं आहे, याची जाणीव झाली नि मन त्यांच्याविषयीच्या नम्रतेने भरून गेले.

इंदूरला आल्यानंतर गेल्या वर्षी इथल्या महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे कार्यक्रम झाला. ज्ञानेश्वरीवरचेच निरूपण होते. पण हॉल तुडुंब भरला होता. लोकही अतिशय श्रद्धेने आणि लक्षपूर्वक ऐकत होते. तीन दिवस हा शब्दसोहळा चालला. या काळात त्यांना भेटायचं होतं, असं ठरवलंच होतं. एका कार्यक्रमानंतर थेट स्टेजवर गेलो नि माझा परिचय दिला. त्यांनी माझं नीट ऐकून घेतलं. मग मला शेजारीच बसवून घेतलं. हा अनौपचारिकपणा फारच भावला. मग एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात तसं बोलायला सुरू केलं. विषय मराठी भाषेचाच निघाला. हिंदी प्रांतात मराठी बोलणार्‍यांविषयी त्यांना खूप आस्था वाटली. मराठी कशी टिकतेय हे दाखवून ते म्हणाले, मराठीच्या मृत्यूची भीतीबिती बाळगायचं काही एक कारण नाही. ही सगळी शहरी भूतं आहेत. अशा बातम्या फक्त शहरात चर्चिल्या जातात. ग्रामीण भागात हीच भाषा प्रभावी नि प्रवाहीपणे बोलली जातेय. शहरात भाषक संक्रमणामुळे त्यात अनेक शब्द जोडले जात आहेत. पण शहरात अस्सल ग्रामीणपणा लेवून ही भाषा बोलली जातेय.'

इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असल्याचा विषयही मग निघाला. ते म्हणाले, 'इंग्रजी शिकण्याची धडपड शहरी भागातच आहे. ही सगळी प्रतिष्ठेची धडपड आहे. नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, या भावनेतून इंग्रजीत शिक्षण घेण्याचा प्रकार वाढत चालला आहे. थोडक्यात काय तर इंग्रजी हे चांगली नोकरी व पर्यायाने उच्च रहाणीमान मिळविण्याचे साधन आहे. नोकरी मिळवून देण्यात मराठीला मर्यादा आहेत, हे खरे. पण केवळ त्यामुळे इंग्रजी स्वीकारून मराठीला लाथाडणे योग्य नाहीये. त्यांचा विरोध इंग्रजी शिकण्याला नव्हताच.

हाच धागा धरून मी बोलता बोलता हळूच वैयक्तिक विषय काढला. म्हटलं मी सध्या इथं रहातोय. पण उद्या पुन्हा महाराष्ट्रात गेलो तर मुलीला कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचं हा प्रश्न मला नि माझ्या बायकोला पडलाय. या विषयावर खल करून नि पुष्कळ वाचून आमचाच गोंधळ झालाय. काय करू? माझ्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, हे बघ, तुम्ही घरात कोणती भाषा बोलताय यावर अवलंबून आहे. घरी मराठीतच सगळे व्यवहार चालत असतील तर तिची शाळा इंग्रजीत असल्याने काहीही फरक पडत नाही. शेवटी इंग्रजीच्या शिक्षणाने तिला नोकरी मिळणार असेल तर ती भाषा शिकलीच पाहिजे. पण घरात सर्व व्यवहार मराठीत हवेत. त्यामुळे ती मराठीपासूनही दूर जाणार नाही.' बोलता बोलता त्यांनी मला वाट दाखवून दिली होती.

मग मी नाशिकचा म्हटल्यावर विषय कुसुमाग्रजांचा निघाला. कुसुमाग्रजांविषयी त्यांना खूप ममत्व. त्यांच्या प्रेमापोटी ते अनेकदा नाशिकला येत होते. त्यांच्या काही आठवणीही सांगितल्या.

पुढे त्यांना एका स्थानिक लेखक स्नेह्याची घरी जायचं होतं. त्यांना चालायला अडचण होत होती. म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवत ते सावकाश गाडीत जाऊन बसले.

त्या पुसट होत जाणार्‍या गाडीकडे मी निवांतपणे पहात बसलो. दहा मिनिटांचा हा सहवास माझ्यात काही चैतन्य सांडून गेला. समुद्राच्या पाण्याचे चार शिंतोडे जणू अंगावर पडल्यासारखं वाटलं. एरवी स्पर्श या भावनेविषयी आपण किती कोरडे असतो. पण त्यांचा स्हेनल स्पर्श मला झालाय ही भावनाच मला खूप दिवस पुरून उरली. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकली नि माझ्यात सांडलेलं त्यांच्या स्पर्शाचं चैतन्य जागं झालं. 'हात आपसूकच संगणकाकडे वळला. 'मोगरा फुलला' लावलं नि त्यांच्या चिरपरिचित आवाजाचा स्पर्श कानात अल्लद शिरला.

रामभाऊ गेले तरी त्यांचं चैतन्य कायम आहे. ते सगळ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारात सांडलंय. पुस्तकात. आवाजात. गाण्यात. निरूपणात. आणखी कशाकशात. त्यातला एक कण माझ्यातही आलाय.

श्रीमंती यापेक्षा काही वेगळी असते का?

भाषावाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीविचारसद्भावनाप्रतिसादअनुभवमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

प्राजु's picture

3 May 2009 - 7:04 pm | प्राजु

नशिबवान आहात भोचक साहेब.
राम शेवाळकरांच्या भाषणांनी वेड लावलं होतं. त्यांचा "रावण" ऐकला.. बिभिषण ऐकला.. रावणाकडे एक दैत्य म्हणून न बघता, एक प्रजेचे कल्याण चिंतणारा राजा म्हणून पहायची दृष्टी शेवाळकरांच्या वाणीने दिली.
आपला आठवणींचा छोटेखानी लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

4 May 2009 - 6:34 am | शितल

>>आपला आठवणींचा छोटेखानी लेख आवडला.
हेच म्हणते. :)

स्वाती दिनेश's picture

3 May 2009 - 7:07 pm | स्वाती दिनेश

प्रा. राम शेवाळकरांची आठवण आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद,
त्यांना विनम्र आदरांजली.
स्वाती

धनंजय's picture

4 May 2009 - 10:03 am | धनंजय

माझेही धन्यवाद, आणि विनम्र आदरांजली.

नंदन's picture

3 May 2009 - 7:12 pm | नंदन

श्रीमंती यापेक्षा काही वेगळी असते का?

- अगदी. पूर्णपणे सहमत आहे. मनापासून लिहिलेला हा लेख अतिशय आवडला. राम शेवाळकर जेव्हा काही वर्षांपूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या संमेलनात अध्यक्षीय भाषणाआधी लताबाईंनी पसायदान गायले होते. ज्ञानेश्वरांना सुरांनी आणि शब्दांनी सामान्य मराठी जनतेपर्यंत पोचवणारे हे दोन दिग्गज एकत्र येणे हा सुवर्णयोगच म्हणावा लागेल.

लेखाच्या शीर्षकावरून ज्ञानेश्वरीत शोधल्यावर हे दोन श्लोक सापडले. प्रा. शेवाळकरांच्या वक्तृत्वाच्या शैलीला यथार्थ ठरावेत असे -

सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा ।
तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये ।
भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

यशोधरा's picture

3 May 2009 - 8:45 pm | यशोधरा

नंदन आणि मोडक साहेबांशी अगदी सहमत. हीच खरी श्रीमंती, ह्या आठवणी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील.
खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही. एखादं जपलेलं जाळीदार पिंपळपान पुन्हा एकदा पुस्तकातून काढून अलवारपणे पहावं, आणि पिंपळाची सळसळ काना- मनात पुन्हा एकदा रुजून यावी असा झाला आहे लेख.

चित्रा's picture

4 May 2009 - 6:57 am | चित्रा

श्रीमंती खरीच.
राम शेवाळकरांना आदरांजली.

श्रावण मोडक's picture

3 May 2009 - 7:39 pm | श्रावण मोडक

श्रीमंती म्हणून जपाव्यात अशा आठवणी.

अवलिया's picture

3 May 2009 - 10:42 pm | अवलिया

सहमत

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2009 - 11:06 am | परिकथेतील राजकुमार

सहमत.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

क्रान्ति's picture

3 May 2009 - 7:49 pm | क्रान्ति

प्रा. शेवाळकरांचा माझ्या बाबांशी अगदी जवळचा परिचय होता. सोलापूरला आले की ते नेहमीच घरी येत. त्यावेळी ते वणीला होते. त्या लहान वयात साहित्यातलं फारसं काही कळायचं नाही, पण त्यांचं बोलणं लहानांनाही गुंतवून ठेवणारं होतं. रामायण महाभारतातील गोष्टी, संतकथा सांगून ते आम्हाला खिळवून ठेवत. त्यांच्या अक्षर साहित्याप्रमाणेच त्यांचं अक्षर अत्यंत रेखीव, सुन्दर, वळणदार होतं. देवदयेनं आम्हालाही या महान व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाचा लाभ घडला.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

विकास's picture

4 May 2009 - 7:22 am | विकास

शेवाळकरांची जवळून झालेली ओळख येथे मिपाकरांना पण दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाचा अनुभव सीडी/कॅसेटवर घेतला आहे, तसेच एकदा सभेत पण ऐकलेले होते. मात्र भेटण्याचा योग नव्हता....

सहज's picture

4 May 2009 - 9:08 am | सहज

त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाचा अनुभव सीडीवर घेतला आहे.

अ-मोल's picture

4 May 2009 - 10:44 am | अ-मोल

ह्रदयस्पर्शी वक्त्याची ह्रदयस्पर्शी आठवण!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2009 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आठवणी शेअर केल्याबद्दल आभारी !

प्रा. शेवाळकरांना माझीही विनम्र आदरांजली !

-दिलीप बिरुटे