मैने प्यार किया

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
6 Feb 2009 - 11:31 pm

प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनार्‍यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं. वह्यापुस्तकांतून 'आज़ कुठे कधी भेटायचं' ठरवणाऱ्या चिठ्ठ्या पास करणं हे प्रेम असतं; दूधवाला, किराणा सामान, डॉक्टर, इलेक्ट्रिसिटी यांची बिलं त्या त्या पाकिटात भरून ठेवताना चुकणारे हिशेब आणि त्यावरून ऐकू येणारे 'तू म्हणजे ना डोक्याला ताप आहेस नुसता/ती!', हे प्रेम असतं; आणि ज्या भावलीसाठी आजीकडून स्वेटर विणून घेतला, तिच्या डाव्या डोळ्याच्या ज़ागी दिसत असणारं नुसतंच भोक आणि डोक्यावरचे तुरळक केस यांची पर्वा न करता तिला कुशीत घेऊन झोपणं, हे सुद्धा प्रेमच असतं. इतकं विविधांगी प्रेम कसं बरं सेम असू शकेल? मी प्रेम केलंय ते अशा सेम नसलेल्या प्रेमावर.

प्रेम ही संकल्पना, किंवा तिचा आपण लावत असलेला अर्थ, या दोन गोष्टी एकत्र किंवा आळीपाळीने स्थलकालपरत्त्वेच नव्हे तर वयपरत्त्वेही बदलत असतात, असं माझं ठाम मत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडलो, तेव्हा भातुकली खेळणार्‍या माझ्या बालमैत्रिणीच्या प्रेमात पडलो होतो; भातुकली खेळताना ती ज्या रिअल लाइफ़ 'सांसारीक' सिच्युएशन्स तयार करायची, त्यांच्या प्रेमात पडलो होतो; की भातुकलीसाठी तिच्या घरून मिळणार्‍या 'पेप्पी' आणि 'अंकल चिप्स'च्या प्रेमात पडलो होतो, हे सांगणं कठीण आहे. आमच्याच काही मित्रमैत्रिणींची त्या 'अंकल चिप्स'सारखीच कुरकुरीत प्रेमं (प्रेम या शब्दाचं अनेकवचन काय आहे हो?) आम्ही आज़ही एन्जॉय करतो. तेव्हा आम्हा दोघांची एक प्रतिक्रिया नेहमीच असते - "आपलं 'लफ़डं' कधी झालंच नाही!" पोरं कसली दिवटी आहेत, याची ज़ाणीव आमच्याआमच्या आईबाबांना वेळीच झाल्याने भातुकलीमधले आमचे 'आई-बाबा' हे रोल्स 'ताई-दादा' मध्ये बदलणे, हे असं लफ़डं न होण्याचं कारण असावं. लफ़डं हे 'प्रेम इन इटसेल्फ़' आहे, असं मला नेहमीच वाटत आलंय. प्रेमाची खुमारी लफ़ड्यात अनुभवायला मिळण्याचं भाग्य फार कमीज़णांच्या नशिबात असतं. तुमचंआमचं लफ़डं सलमान-कतरीनाच्या लफ़ड्यासारखं स्टारडस्ट किंवा चित्रलेखाच्या मुखपृष्ठावर झळकणारं, झगझगीत नसलं तरी किमान आईबाबांपासून चोरून ठेवण्यासारखं, मित्रमैत्रिणींच्या कौतुकाचा आणि वाती वळताना साठेमामींच्या जिव्हाळ्याचा विषय ठरू शकणारं नक्कीच असतं. मराठीच्या पुस्तकातली बालकवींची 'पारवा' तोंडी परीक्षेला आहे, हे माहीत असूनही पाठ नसते, आणि करताही येत नाही. पण परदेसमधलं 'दो दिल मिल रहे हैं' अथपासून इतिपर्यंत मुखोद्गत व्हायला अजिबात कष्ट पडत नाहीत. क्लास बंक करून प्लाझाला पिक्चर बघायचा. मग बिल्डिंगखाली आल्यावर आधी वर कोणी ज़ायचं आणि मग अर्ध्या तासाने कोणी ज़ायचं याचं प्लानिंग करायचं. झालंच तर गणपतीच्या मखराची सज़ावट करताना, तिची किंवा त्याची आयडिया कितीही आवडली, तरी मुळीच पाठिंबा न देता इतरांवर त्याचा निर्णय सोपवून, 'मी डावा गाल खाज़वला म्हणजे मला तुझी आयडिया आवडली', हे प्लान करायचं. किती ही सृजनशीलता! प्रेमात पडल्यावर काय काय पापड लाटावे लागतात, हे त्या बिचाऱ्या प्रेमवीरांनाच ठाऊक असतं. आणि त्यांच्या या धाडसाला 'लफ़डं' म्हणून सारी दुनिया या प्रेमाला एक नकारात्मक छटा देऊन टाकते. अशा कित्येक लफ़ड्यांवर मी मनापासून प्रेम केलंय - स्वत:ची नसली तरी!

'बाज़ारात दालचावलचे भाव काय आहेत', किंवा 'प्रेम कशाशी खातात कळतं का तुला' वगैरे घिसेपिटे प्रश्न प्रेमात तहानभूक हरवलेल्यांना कसे हो पडणार? आपल्या जानेमनला शाहरूख 'जाम म्हणजे जाम' इतका (कदाचित आपल्यापेक्षाही जास्त!) आवडतो, हे माहीत असलं की 'कुछ कुछ होता है' बघताना तिकिटावर किती उडाले की उडवले, याचा विचार करायचा नाही, हे त्यांना कळतं. त्याचबरोबर जिप्सीतली पावभाजी या महिन्याच्या उरलेल्या पॉकेटमनीत बसणार नाही, हे सुद्धा त्यांना नक्कीच माहीत असतं. त्याला आवडतो म्हणून मी माझा मोरपिशी पंजाबी घालायचा नि त्यावर काळी ओढणी घ्यायची; आणि तिला आवडत नाही म्हणून मी पर्पल लूज़र घालायचा नाही, हे त्यांना कळतं. पहिल्या मज़ल्यावरून ती बघते आहे म्हणून चौकात क्रिकेट खेळताना आपली विकेट ज़ाऊ द्यायची नाही हा त्याचा निर्धार असतो - बॉल मांड्यांवर ज़बरी शेकत असला तरी! आणि वर्गात बसून असाइनमेंट पूर्ण करत असला, तरी त्याचं लक्ष नाटकाच्या तालमीत आहे, हे माहीत असल्याने डायलॉग विसरायचा नाही, याकडे तीही कटाक्षाने लक्ष देते. शाळाकॉलेजातून बाहेर पडल्यावर नोकऱ्या केल्या, गाठीशी चार पैसे ज़मायला लागले, आणि घरच्यांनी स्थळं बघायला सुरुवात केली, की घरी सांगायचं हा बेत तर कितीतरी आधीपासून तयार असतो. नव्या ज़मान्यातले साहित्यविश्वातले कित्येक अनामिक कवी हे प्रेमाचीच देणगी आहेत. चार ओळी असोत किंवा चाळीस; छंदात असो वा नसो, गझल असो की मुक्तक की चारोळी; पण ते कविता करतात आणि स्वतःला व्यक्त करतात. सुरात गाता येत नसलं तरीही ऑर्केस्ट्रा ऑडिशन्ससाठी किंवा अभिनयाचं अंग नसतानाही नाटकासाठी नाव देतात. असं अचूक प्लानिंग, असंख्य तडज़ोडी शिकवणारं प्रेम, काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतःचं वेगळं अस्तित्त्व निर्माण करण्याची ऊर्मी ज़ागवणारं प्रेम, असंख्य कवितांमधून व्यक्त होणारं प्रेम - या प्रेमावर मी प्रेम केलंय. डाळतांदळाचे भाव आणि गझलेचं व्याकरण माहीत असूनही!

कधीकधी नकोसं वाटतं असं प्रेम करणं. जेव्हा कुणी अमृता देशपांडे, रिंकू पाटील जिवंत ज़ाळली ज़ाते. जेव्हा आपण हृतिक रोशनसारखे दिसत नाही किंवा आपल्याकडे होंडा सिविक नाही, हे कोणालातरी कळतं. आमच्या वयात वर्षाचं अंतर आहे; ती जैन आहे, मी कोकणस्थ चित्पावन आहे आणि आम्ही पुढे गेलोच तर नक्की कोणालातरी हार्ट ऍटॅक येणार, याची ज़ाणीव होते. तिचे बाबा लार्सन ऍंड टूब्रोमध्ये जी एम आहेत आणि माझे बाबा मंत्रालयात हेडक्लार्क, हे लक्षात येतं. आधीचं गुलाबी लफ़डं नुसतं लफ़डं राहत नाही, तर त्याचं 'सॉलिड प्रकरण' बनतं, कधीकधी दारावर पोलीसही येतात. मोरपिशी पंजाबी घालावासा वाटत नाही की जिप्सीत ज़ावंसंही वाटत नाही. क्रिकेट खेळताना क्लीन बोल्ड होऊनही फरक पडत नाही. मग एकमेकांच्या सुखासाठी प्रार्थना करत प्रेमवीर आपापल्या रस्त्याने चालू पडतात. पण प्रेमाची अनुभूती घेऊन आणि त्या अनुषंगाने मिळणारे 'लाइफ़ मॅनेजमेंट'चे धडे घेऊनच.
============================================================================================================
इतक्या गहन आणि सर्वांगसुंदर विषयावर सर्वसमावेशक धडी देणारा मी कोणी 'लव्ह गुरु' नाही. पण काल राजेसाहेबांनी कथन केलेला मेडिएटेड् प्याचप् चा अनुभव आणि 'मी मराठी' या त्यांच्या नव्या संकेतस्थळाभोवतीचा रेखीव बदाम यावरून मला काही वर्षांपूर्वी माझ्या जालनिशीवर नि मनोगतावर पूर्वप्रकाशित असलेल्या या पानाची आठवण झाली. तेच मिपाकरांसाठी येथे डकवले.
============================================================================================================

वावरसमाजजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनविचारमत

प्रतिक्रिया

शंकरराव's picture

6 Feb 2009 - 11:39 pm | शंकरराव

मतप्रदर्शन आवडले, लेख मस्तच आहे....
माराठी अंतर्जालावर प्रेमाचा प्रवाह स्वागतार्ह्य आहे.
'मी मराठी' ला शुभेच्छा !

शंकरराव.

प्राजु's picture

7 Feb 2009 - 8:36 am | प्राजु

प्रेमासारख्या विषयावर वेग्ळ्या प्रकाराने केलेली मांडणी आवडली.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बबलु's picture

7 Feb 2009 - 1:18 pm | बबलु

मस्त लेख.

....बबलु

मदनबाण's picture

7 Feb 2009 - 1:44 pm | मदनबाण

मस्त लेख...

(१४ तारीख जवळ येत आहे.. :X )
मदनबाण.....

:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

अवलिया's picture

7 Feb 2009 - 2:25 pm | अवलिया

छान लेख बेला.... मस्त

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

सहज's picture

8 Feb 2009 - 6:26 am | सहज

असेच म्हणतो.

गणा मास्तर's picture

7 Feb 2009 - 3:48 pm | गणा मास्तर

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

दशानन's picture

7 Feb 2009 - 3:51 pm | दशानन

सुंदर !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

मीनल's picture

7 Feb 2009 - 6:39 pm | मीनल

लेख आवडला.
मीनल.

शितल's picture

7 Feb 2009 - 11:15 pm | शितल

सहमत. :)

गोमट्या's picture

8 Feb 2009 - 6:58 am | गोमट्या

सहमत.

गोमट्या

एक's picture

9 Feb 2009 - 8:57 am | एक

झकास जमला आहे. प्रत्येकालाच आपलं प्रेम इतरांपेक्षा वेगळं वाटतं.
स्वःताचं घर सदाशिव पेठेत असलं तरी तिला सोडायला मिळेल म्हणून युनिव्हर्सिटी रोड पर्यंत स्कुटर ने जायचं (आणि त्या साठी घरातच रहाणार्‍या आजीला थोड्यावेळासाठी औंधला स्थलांतरीत करायचं)
ह्या गोष्टीपण करायला लागतात.

कालच सारसबागेत फिरत होतो तेव्हा बरीच अशी दृष्य बघितली. तो/ती एका विशीष्ट बाकड्याजवळ किंवा मंदिरातल्या एका खांबाजवळ आधीच येवुन बसलीये. मग थोड्यावेळाने इकडून तिकडून मोबाईल होतात.
बर्‍याच प्रतिक्षेनंतर (म्हणजे या मर्त्य जगातले फक्त ५ मिनिटं) तो/ती येते. थोडीशी चिडचिड. मग दोघेही जोडीने पटकन दर्शन घेतात (दर्शन = उजवा हात एकदा नाकाला आणि छातीला लावणे, १ मिलीसेकंद डोळे मिटणे) आणि मार्गस्थ होतात. फार फार मजा वाटली आणि जुने दिवस आठवले. पण आमच्यावेली मोबाईल नव्हते हो. काय चिडचिड व्ह्यायची. या नवीन पिढीत पेशन्सच नाहीत. म्हणून आमचं तत्यांचं अजिबात सेम नाही.
गेले ते दिवस :(
एकेकाळी "नाथा कामत", "होशवालों को मधला आमिर" स्वःता अनुभवला होता. त्याच्याच आठवणी काढायच्या आणि "सुखान्तिके" नंतरचा वर्तमान काळातला "डेलिसोप" अनुभवायचा :(

लेखाने खपली काढली..

(अवांतर: लेखाचं शिर्षक वाचून वाटलं की ही अनाऊन्समेंट आहे कि काय? ;))

सुनील's picture

9 Feb 2009 - 10:59 am | सुनील

वॅलेंटाईन दिवसाच्या सुरुवातीलाच आलेला हा समयोचित लेख!

एक्-दोन नव्हे, अनेक आठवणी जाग्या झाल्या. पण ते असो!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.