दलाल स्ट्रीटची काही वर्षं.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
2 Jan 2009 - 8:00 pm

http://www.misalpav.com/node/3500

http://www.misalpav.com/node/3260

http://www.misalpav.com/node/3056

कधीकधी मला वाटतं सदानंद मला आधी काही वर्षं भेटता तर .सदानंद माझ्यासारखाच बाजारातला ट्रेडर होता. त्याची आवडती थिअरी होती पट्ट्यावर धावण्याची.पट्टा म्हणजे ट्रीडमिलचा पट्टा.
तो म्हणायचा "रामदास,आपण या पट्ट्यावर हौशीनं चढतो. मग पट्टा हळूहळू फिरायला लागतो ,आपणही चालायला सुरुवात करतो.वेग वाढतो .आपले पाय पण चटचट धावायला लागतात. मशिन आणखी वेग वाढवतं आपण पळायला सुरुवात करतो.नंतर काही वेळानी पट्ट्याच्या वेगानी धावणं हे एकच ध्येय शिल्लक राहतं. पाय थकतात.तरी धावत राहतात. एकदा तरी निश्चयानी या पट्ट्यावरून उडी मारून दूर व्हावं पण नाही. आपला हट्ट आपल्याला तसं करूच देत नाही. पट्टा थांबवणं आपल्या हातात नाही. उडी तरी मारावी. थकून टॉलस्टॉयच्या गोष्टीतल्या त्या माणसासारखं आपण कोलमडतो.
तोपर्यंत दुसरा माणूस त्या पट्ट्यावर धावायला सुरुवात करतो.
मार्केट आहे ते असं .या मार्केटच्या धावत्या पट्ट्यावर हुकमत कुणीच करू शकत नाही.जे हट्ट करतात ते कोलमडतात.तरी माणसं धावत राहातात ,थकत राहतात ,संपतात.पट्टा अखंड फिरत राहतो.

******************************************************************

त्या गणपतीच्या नंतर आधी वडीलांच्या आणि माझ्यातलं अंतर आणि नंतर घर आणि माझ्यातलं अंतर वाढत गेलं.
घरी उशीरा यायला सुरुवात झाली.
थोड्याशा कारणावरून आदळ आपट व्हायला सुरुवात झाली. घरात मन रमेना.
वडील न बोलता माझ्याकडे बघत होते. त्यांनी त्यांची मत माझ्यासमोर मांडणं कधीच बंद केलं होतं.त्यांचा ज्योतीष शास्त्राचा अभ्यास चालू असायचा. मी हातात चार्ट घेऊन बघत बसायचो .रविवार कधी एकदा संपतो असं व्हायचं.आईला काय चाललं आहे हे कळायचं नाही.कुणाला आधी विचारावं हे सुचायचं नाही.
पाहुणे मंडळी घरात आली की हे कोल्ड वॉर थांबायचं.त्यांची पाठ वळली की घरात एक अस्वस्थ शांतता पसरायची. नंतर काही दिवसानी पाहुणे यायचे आहेत हे आगाऊ कळलं की मी घरातून पसार व्हायचो.
घराच्या हवेत एक विषारी ज्वर वाढत चालला होता .मनातली धुम्मस ठिणगी पडायची वाट बघत होती.
कामही फार वाढायला लागलं होतं .रात्री घरी यायला उशीर व्हायचा.वडील मी येईस्तो घरासमोर फेर्‍या मारत कसल्या कसल्या स्तोत्रांची उजळणी करत असायचे.मी येताना दिसलो की झोपायला जायचे.
आई एक दिवस मला म्हणाली " फार त्रास होतो रे यांना .जरा लवकर येत जा घरी."
त्या दिवशी काय मनात होतं ते माहीती नाही पण मी म्हटलं "आता उशीर झाला तर मुंबईतच राहत जाईन".
**********************************

दुसर्‍या आठवड्यापासून हा नविन ट्रेंड सुरु झाला. कारण नसताना कसं म्हणू पण आता कळतंय की वडलांच्या चोख इमानदारीची चिड यायला लागली होती.हातात येणारा रोकड पैसा मोहवत होता.
माझ्या मनाचं उद्दाम घोडं त्यांच्यासमोर बिथरायला लागलं होतं.घराच्या उबेत झोपण्याऐवजी बोराबाजारातल्या बकाल खाटेवर झोपणं जास्त सोयीचं वाटायला लागलं होतं.
बोरा बाजाराच्या त्या बकालीत माझी आणि जयकुमारची ओळख झाली. एकदा रात्री त्याला चार्ट बनवताना पाह्यलं .तेव्हा संगणक नसल्यामुळे चार्ट हाती बनवायला लागायचे.नगीनदास मास्टर रोड ला एका कच्छी माणसाच्या दुकानात चार्टपेपर मिळायचा .आदल्या सेटलमेंटच्या बंद भावापर्यंत छापलेला असायचा.उरलेला आठवडा आपण आपली नोंद करायची.
बाजारात टेक्नीकल ऍनालीस्ट आणि फंडामेंटल ऍनालीस्ट यांचे वेगवेगळे संप्रदाय.एक गोदावर्या उत्तर तीरे तर दुसरे गोदावर्या दक्षीण तीरे...फलशृती एकच लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे जमवायचे , सट्टा रचायचा, ब्रोकर व्हायचं,इंस्टीट्युशनल धंदा आणायचा,बदला करायचा,...अंत नसलेली आकांक्षांची यादी.
जयकुमारनी मला टेक्नीकल ऍनालीसीस शिकवलं .सोबत बाकी बर्‍याच गोष्टींची संथा पण मिळायला लागली.खरं म्हणजे जयकुमारचा भाऊ बाजारात ब्रोकर होता. जयकुमारला सट्ट्यात मार पडला होता. (नंतर कळलं की नेहमीच सट्ट्यात त्याला मार पडायचा).लोकं वसूलीसाठी भावाच्या ऑफीसात यायचे.मग हा घराबाहेर पडला. भाऊ ऑफीसात आलेल्यांना वाटाण्याच्या अक्षता लावून परतवायचा.वरवर दिसायला भाऊ वेगळे झाले होते पण आतून परत एकत्र. सट्टा सही पडला तर पे आउट च्या दिवशी सकाळी अकरा जयकुमार ब्रोकरच्या चेक घ्यायला हजर.जर मार पडलेला असला तर लॉज सोडून पळून जायचं.
याचा भाऊ प्रोफेशनल कॅटेगरीतून ब्रोकर झालेला. खंडेलवाल हरमन मध्ये कंपनी सेक्रेटरी होता. खंडेलवाल हरमन चा राईट्सचा इश्यु आला तेव्हा पोस्टातून पत्ता मिळत नाही म्हणून जेव्हढे राईट्सचे फॉर्म परत आले तिथे फर्जी सह्या मारून एलॉटमेंट आपल्या नावानी करून टाकली.जवळ जवळ दिड लाख शेअर जमा झाल्यावर राजीनामा देऊन बाहेर आला.ब्रोकर झाला .ब्रोकर झाल्यावर पळून जाता येत नाही म्हणून फक्त दलाली करायचा.
जयकुमारनी मला मुव्हींग ऍव्हरेज पासून सुरुवात करून इलीयट वेव्ह थीअरी पर्यंत सगळं काही शिकवलं .अर्थात फुकट नाही.मार्केटमध्ये हा पाउल टाकू शकत नव्हता.दर चार महिन्यानी ब्रोकर बदलायचा.त्याचं दादरला घर होतं त्याची म्हातारी आई एकटीच रहायची.ती शिवाजी मंदीरच्या मागच्या बाजूस एक चहाचं दुकान तिथे ह्याची पत्र , डिव्हीडंड वॉरंट आणि तगाद्याला आलेल्या माणसाची यादी ,वकीलाच्या नोटीसा घेऊन यायची .आई गावाला गेल्यावर हा तिथेच रहायला लागला.माझ्यावर एक काम टाकलं होतं. मी त्याचं घर संध्याकाळी सहा वाजता उघडायचो. कुणीतरी तगादा करायला यायचंच.मी त्यांचं नाव लिहून ठेवायचो.रात्री आठसाडेआठ वाजता हा लपत लपत घरी यायचा. तो आला की मी त्याला आत टाकून बाहेरून कुलुप घालायचो.किल्ली वेंटीलेटरमधून आत टाकायचो. सकाळी त्याचा नोकर साडेपाच वाजता बाहेर काढायचा. मग हा हातात बाहेर पडायचा. दुपारपर्यंत ट्रेन मध्ये बसून किंवा स्टेट बॅकेच्या हेड ऑफीससमोरच्या बागेत बाकावर अभ्यास करत बसायचा.जेवायला इन्शुरंस कंपन्या, बँका,वगैरेच्या कँटीनमध्ये.मला बागेत बसूनच वेव्ह थीअरी शिकवले आणि एक ट्रेडींग टेकनीक शिकवलं .त्याच्या जोरावर मी नंतर लाखो रुपये कमावले.
त्याचं ज्ञान एव्हढं अफ्फाट होतं की लॉईड फायनान्सच्या के.सी.गर्गना भेटल्यावर त्यांनी दोन तासाच्या मुलाखतीनंतर याला कन्सलटंट म्हणून नेमलं.लॉईड सिक्युरीटीजचा हा चीफ ट्रेडर झाला.याच्या हातात पैसे यायचे नाहीत .पे इन -आउट कंपनीची माणसं बघायची. याच्या डोक्यात एकच विचार असायचा की हातात पैसे आले की ते लंपास करायचे ते कसे ? पण यासाठी कंपनीचा विश्वास संपादन करायला हवा होता.डे ट्रेडींगमध्ये एकेका दिवसात दहा पंधरा लाख यायला सुरुवात झाल्यावर ते काम पण सोपं झालं .
गर्ग साहेब रोज भेटायचे नाहीत. इंडीयन बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेला एक साउथ इंडीयन मॅनेजर याच्या डोक्यावर बसवलेला होता.त्याला भयंकर संशय होता की हा उद्याच पळणार .म्हणून तो दर तासाला हा काय ट्रेडींग करतोय ते तपासायचा.ब्रोकरकडून डबल कन्फर्मेशन मागवायचा.जयकुमारला अर्थातच हे सोयीच नव्हतं. मग एकदा हा इंडीयन बँकेत गेला. युनीयन लीडर ला भेटला. त्याच्याकडून याला कळलं की या मद्राशाची गर्ल फ्रेंड लॉईड्स मध्ये काम करते आहे आणि निवृत्त झाला तेव्हा या मॅनेजरची काहीतरी डीपार्टमेंटल चौकशी चालू होती. एव्हढं कोलीत याला आग लावायला पुरेसं होतं . के. सी. गर्गसाहेबांच्या कानावर ही माहीती घालण्याची व्यवस्था केली. मग गर्ग साहेबांनी त्याला फ्रॅचाईजी ब्रँचेसच्या कामावर बाहेरगावी पाठवायला सुरुवात केली. जयकुमारच्या हातात शेअर डिलीव्हरी देण्या घेण्याचं काम आलं.मग फ्रॉडचं एक सोप्पं तंत्र वापरायला यानी सुरुवात केली.
शेअरची डिलीव्हरी आली की हा सगळे शेअर तपासून कम डिव्हीडंड शेअर बाजूला करायचा. ते सगळे स्वतःच्या नावावर टाकायचा. ट्रान्सफर करायचा. एक्स डिव्हीडंड झाले की कंपनीच्या नावावर विकून टाकायचा. तेच प्रेफरेंशीअल ऍलॉटमेंट मध्ये. उदा: सेसा गोवा एक नवी कंपनी काढणार होते.याने सेसा गोवाचे साठ हजार शेअर विकत घेतले.रातोरात कंपनीत जाउन ट्रान्सफर केले . दुसर्‍या दिवशी रेकॉर्ड डेट होती. तिसर्‍या दिवशी शेअर विकून कंपनी खात्यात पैसे जमा केले.सेसाच्या नव्या कंपनीचे साठ हजार शेअर याच्या नावावर आले. आता गंमत अशी की ऑडीटर दर महिन्यात सगळं काही तपासायचे. शेअर जागच्याजागी असायचे. राईट्स आणि बोनस शेअरच्या बूकक्लोजरच्या डेटप्रमाणे सगळं काही तपासलं जायचं .त्या शेअरचं रेकॉर्ड अपटूडेट असायचं . डीव्हीडंड जाहीर झाल्यानंतर चार पाच महीन्यानी येतो त्याचा कंट्रोल ठेवायची काही व्यवस्था नसायची.
अशा बारीक सारीक गल्ली रस्त्यातून यानी सहा सात लाख जमा केले.आता ही रक्कम फार लहान वाटेल पण ते साल होतं १९८९/९०.तेव्हा या रकमेत बोरीवलीत चार, डोंबीवलीत सहा आणि अंधेरीला दोन फ्लॅट यायचे. जयकुमारनी चार बंगला अंधेरीला एक फ्लॅट घेउन टाकला. सिटी बॅकेकडे भाड्यानी दिला.आणि एक दिवस लॉईड फायनान्स मधून दिसेनासा झाला.
आता एव्हढी ढापाढाप करायची म्हणजे हाताखाली असलेल्या कंपनीची माणसं वापरून चालायचं नाही. इथे त्याला माझ्यासारख्या डोक्यात वारं शिरलेल्या माणसाची मदतनीस म्हणून फार मदत व्हायची. ढापलेले शेअर, आलेले डिव्हीडंड एनकॅश करणं .माणसं सतत लागायची. याची तंत्र कळली की मदतनीस डोक्यावर बसायचे.जास्तीचे पैसे मागायला सुरुवात करायचे. याला धमकवायचे.मग हा त्यांना कामावरून काढून टाकायचा. लॉज बदलायचा. ब्रोकर बदलायचा.
आता मला पण याच्याकदून सगळी तंत्र समजायला लागली होती.
एकदा रात्री बोलता बोलता हा विषय निघाला की आता पुढे काय?
मी त्याला म्हटलं की " आता आपल्याकडे एव्हढे पैसे जमा झालेत तर ब्रोकरचं कार्ड घेऊ या. "
बराच वेळ तो माझ्याकडे तो रोखून बघत राहीला .नंतर मला म्हणाला की
"तू माझा पार्टनर आहेस असं तुला वाटतंय का?"
मला आतून एक हलका धक्का जाणवायला सुरुवात झाली.मी म्हटलं" नाही आहे का?"
तसा हा बावचळला .मला म्हणाला "बघ बाबा तू एक तर रोकडा घे आणि आपण इथेच थांबू या."
मी म्हटलं की "हीच ऑफर मी तुला दिली तर ...."
हा बाबा काहीच बोले ना.
मग मी म्हणालो "हिशोब करू या ." विषय तेव्हढ्यावरच संपला.
दोन दिवसानी मी लॉजवर रहायला गेलो होतो.जयकुमार आंघोळीला गेला होता.
सकाळी इको आला नाही.
मी लॉजवाल्याला विचारलं तो म्हणाला "साबने आजसे बंद कर दिया पेपर ..."
चहावाल्याची डायरी मागवली . चहाचं खातं ऑल पेड होतं .
लॉजचं रजीस्टर बघायची आवश्यकता नव्हतीच .पण पाह्यलं .परत ऑल पेड....
माझ्या लक्षात आलं की लॉज बदलायची तयारी होत आली आहे. यावेळी जयकुमारचा अंदाज चुकला.
त्याच्या अगोदर बॅग घेऊन मीच लॉज सोडलं.
लॉईड्सचा हिशोब , साठ हजार सेसा गोवा इन्फो आणि टेकनीकलची सगळी पुस्तकं .
आणि जयकुमारचे सगळे कपडे. दादरच्या खोलीच्या चाव्या.
कभी नाव गाडीपे तो कभी गाडी नावपे.....
व्हीटी स्टेशनच्या अमानती सामान घरात बॅगा टाकून मी लॉजवर परत आलो.
जयकुमार चादर गुंडाळून रुममध्ये बसला होता.
मला बघीतल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला .मला म्हणाला
"कमसे कम मेरी चड्डी बनयान तो रख देता यार....."
आता निगोशिएनला सुरुवात झाली.
साडेचार लाख रोख आणि लॉईड्सच्या आसपास न फिरकण्याचा वादा यावर एकमत झालं
बँकेत जाउन मी पैसे काढले.
व्हिटी स्टेशनला जाउन बॅगा घेउन आलो.
त्या दिवशी रात्री त्यानी मला कंदील मध्ये जेवायला घातलं .
जाताना मला एक गिफ्ट दिली . एक सुंदर फ्रेम.

आमच्या असोसीएशनचा हा दी एंड झाला असं मला तेव्हा तरी वाटलं पण तसं व्हायचं नव्हतं.
मी टेक्नीकल ऍनालीसीस शिकायला जयकुमारशी दोस्ती वाढवली होती पण माझं ट्रेनींग मला भलतीकडे वाहवून नेत होतं .
आता आढावा घेतो तेव्हा मला हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात तसं वाटतं.

(अपूर्ण)
******************************************************************

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

शिंगाड्या's picture

2 Jan 2009 - 8:13 pm | शिंगाड्या

चला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या लेखनाची मेजवानी आम्हाला मिळाली..
अभ्यासपुर्ण लेखन..

सुनील's picture

2 Jan 2009 - 8:15 pm | सुनील

सुंदर. फारश्या परिचित नसलेल्या दुनियेबद्दल अधिक वाचायला आवडेल. लवकर येउद्यात पुढचे भाग.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शंकरराव's picture

2 Jan 2009 - 8:24 pm | शंकरराव

कथालेखन आवडले. विषयाची मांडणी लाजवाब आहे.

आमच्या असोसीएशनचा हा दी एंड झाला असं मला तेव्हा तरी वाटलं पण तसं व्हायचं नव्हतं.

अजून कथालेखन येऊद्यात मग
पूलेशू

लिखाळ's picture

2 Jan 2009 - 8:28 pm | लिखाळ

मस्त ! बरेच दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले. नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात :)

आता आढावा घेतो तेव्हा मला हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात तसं वाटतं.

:)

पुढे वाचायला उत्सुक.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jan 2009 - 10:15 pm | llपुण्याचे पेशवेll

हम्म्म्म्म. नवीन वर्षी नवीन फ्रॉड सुरु झाला तर.
नवीन वर्षाच्या आणि नवीन लेखनाच्या हार्दिक शुभेच्छा. :)
(पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत)
पुण्याचे पेशवे
Since 1984

अवलिया's picture

2 Jan 2009 - 10:29 pm | अवलिया

जबरदस्त!!!!!!!!!!!
मान गये भाई..... :)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jan 2009 - 10:33 pm | बिपिन कार्यकर्ते

शेवटी आमच्या विनंति / धमक्यांना भीक घातली तर तुम्ही. नविन वर्षाची सुरूवार तर छान झाली. आता पुढचे भाग टाका पटापट. आणि ते 'दोयग्मा' चं काय?

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

2 Jan 2009 - 10:37 pm | सहज

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये!

जिवंत, खिळवुन ठेवणारे लेखन!

संदीप चित्रे's picture

2 Jan 2009 - 10:38 pm | संदीप चित्रे

रामदास,
कित्येक महिन्यांनतर या लेखमालेतला लेख वाचायला मिळाला.
नवीन वर्षाचे हार्दिक अभिनंदन.
नवीन भागाच्या प्रतीक्षेत...

या जगाशी संबंध कधीच नाही आला पण उत्सुकता मात्र प्रचंड आहे या बद्दल.
आपलं लेखन नेहमीप्रमाणेच खिळवून ठेवणारं आहे. सुरूवात केल्यावर "अपूर्ण" हे पाहूनच संपलं..
नव वर्षाची सुरूवात मस्त झाली पुढचे भाग लवकरच लिहाल अशी आशा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

3 Jan 2009 - 1:26 am | नंदन

फार दिवसांनी तुमच्या लेखणीतून उतरलेले हे वेगळे जग वाचायला मिळाले. पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे. जाता जाता, कुतुहल म्हणून शोधले असता एलियट वेव्ह थिअरी इथे सापडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आजानुकर्ण's picture

3 Jan 2009 - 2:31 am | आजानुकर्ण

लायर्स पोकरमधील बिग स्विंगिंग डिक्स आणि गीक्स यांची आठवण यावी असे लिखाण. फारच मस्त.

आपला
(वाचक) आजानुकर्ण

घाटावरचे भट's picture

3 Jan 2009 - 3:12 am | घाटावरचे भट

अत्यंत सुंदर लेखन. ही मालिका पुढे नेल्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील भाग लवकर टाकावेत ही विनंती.

मदनबाण's picture

3 Jan 2009 - 5:02 am | मदनबाण

व्वा,,,पुढच्या भागाची वाट पाहतो आहे... :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

एकलव्य's picture

3 Jan 2009 - 7:13 am | एकलव्य

... फॉन्झिस्टोरी आतुरतेने वाचतो आहे. गोष्ट छानच रंगली आहे.

अनिल हटेला's picture

3 Jan 2009 - 8:18 am | अनिल हटेला

पूढील भागाची वाट बघत आहे..

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jan 2009 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार

असेच म्हणतो ..

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

3 Jan 2009 - 8:30 am | विसोबा खेचर

रामदासभाऊ जियो..!

मस्त लिहिलं आहे.. शैलीही नेहमीप्रमाणेच सुंदर..
अजूनही येऊ द्या..

तात्या.

विनायक प्रभू's picture

3 Jan 2009 - 9:53 am | विनायक प्रभू

सल्फरस पास्ट ?

विसुनाना's picture

3 Jan 2009 - 10:57 am | विसुनाना

सुंदर लेखन.वेगळे अनुभव.असेच निवांत लिहित रहा. खूप!
खरेतर भरभर वाचण्याची उत्सुकता आहे. पण वांदा नथी.

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Jan 2009 - 5:18 pm | डॉ.प्रसाद दाढे

अखेर रामदासजी॑नी मौनव्रत सोडल॑! किती दिवस वाट पाहत होतो. आता सगळे जुने हिशेब चुकते करा..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2009 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रामदासराव,
लेखन आवडले !!!

-दिलीप बिरुटे

अन्वय's picture

3 Jan 2009 - 7:17 pm | अन्वय

ही सत्यघटना असेल आणि आपण मराठी असाल, तर मला आपला अभिमान आहे. प्रत्येक अमराठी व्यापाऱ्याने मराठी माणसाचा नेहमीच "गळा' घोटला आहे. आपण या व्यापाऱ्याला नागवे केले. धन्य!

अत्यंत सुरेख लेखन. कथा किंवा लेख वाचनीय कसा करावा, याचे उत्तम उदाहरण. लगेच कांदबरी लिहायला सुरवात करावी.

विजुभाऊ's picture

3 Jan 2009 - 7:46 pm | विजुभाऊ

हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात
रामदास काका काय विष्वव्यापी सत्य आहे हो.

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

चतुरंग's picture

3 Jan 2009 - 8:10 pm | चतुरंग

परिस्थितीवश माणूस काय काय करत जातो त्याचे यथार्थ चित्रण.
रामदास, अजून येऊदेत.

चतुरंग

दिनेश५७'s picture

4 Jan 2009 - 10:44 am | दिनेश५७

रामदासभाई,
झुंजूमुंजूनंतर बरेच दिवस ह्याकडे डोळे लावून बसलो होतो...
आता तहान आणखी वाढलीये. मस्त!

अरुण मनोहर's picture

4 Jan 2009 - 1:25 pm | अरुण मनोहर

हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात

रामदासजी क्या बात है! कळकट उशा मनात नकोशा वाटल्या तरी लेखकाचे कौशल्य त्या लेखनात हुबेहुब चित्रीत करण्यात आहे. तुमचे लिखाण वाचून एखादा उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान होते. (नको असलेली गाणी आणि मारामार्‍र्यांशिवाय)

श्रावण मोडक's picture

4 Jan 2009 - 1:38 pm | श्रावण मोडक

वाचायचं आहे.