चंद्राद्वारे ज्येष्ठा चांदणीचे पिधान

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
3 Feb 2024 - 5:55 pm

५ फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार

✪ पिधान ह्या खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी
✪ नुसत्या डोळ्यांनी पहाटे हे दृश्य बघता येईल
✪ पहाटेच्या आकाशात शुक्र व मंगळ बघता येतील
✪ त्याबरोबर सप्तर्षी, वृश्चिक, स्वाती- चित्रा, अभिजीत, मित्र, अनुराधा आदि तारे, तारकासमूह बघण्याची‌ संधी
✪ M 7 आणि ओमेगा सेंटारी तारकागुच्छ बघण्याची संधी

सर्वांना नमस्कार. येत्या सोमवारी पहाटे म्हणजे ५ फेब्रुवारी २०२४ च्या पहाटे आकाशामध्ये एक खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी आहे. चंद्र जेव्हा एखाद्या ग्रहाला, लघुग्रहाला किंवा ता-याला झाकतो तेव्हा त्या अविष्काराला पिधान म्हणतात. ५ फेब्रुवारीच्या पहाटे साधारण ४:४६ वाजता ज्येष्ठा हा तारा चंद्रामुळे झाकला जाईल. झाकला जाताना तो चंद्राच्या प्रकाशित भागामागे गेलेला दिसेल आणि ५:५९ वाजता तो चंद्राच्या अप्रकाशित भागामागून परतही येताना दिसेल. त्यावेळीही पुरेसा अंधार असल्यामुळे त्याचे हे झाकले जाणे व परत बाहेर येणे दोन्ही नुसत्या डोळ्यांनी बघता येईल.

हे दृश्य पहाटेच्या आकाशात दक्षिण- पूर्व दिशेला बघता येईल. ह्यावेळी चंद्राची सुमारे २९% प्रकाशित कोर दिसेल. ज्येष्ठा तारा वृश्चिक तारकासमूहातला तेजस्वी असा लाल राक्षसी तारा आहे आणि नुसत्या डोळ्यांनी तो लालसर दिसतो. चंद्रामागे झाकला जाईपर्यंत चंद्राच्या तेजामध्येही तो दिसू शकेल. आणि बाहेर आल्यावर परत दिसू लागेल. बायनॅक्युलरसोबत हे दृश्य आणखी सुंदर बघता येईल. दिसत असलेला तारा अक्षरश: एका क्षणात नजरेआड होतो आणि काही वेळाने परत शून्यातून एकदम प्रकट होताना दिसतो असं हे सुंदर दृश्य असतं.


पिधान होण्याच्या आधी चंद्र व ज्येष्ठा साधारण असे दिसतील.

(माझ्या टेलिस्कोपमधून चंद्र- मंगळ पिधान बघण्याचा अनुभव इथे वाचता येईल व व्हिडिओ बघता येईल: http://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/blog-post_18.html ब्लॉगवर माझे आकाश दर्शनाशी संबंधित लेखही वाचता येऊ शकतील. अशाच चंद्र व शुक्र पिधानाचा लेख इथे वाचता येईल: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/10/thrilling-experience-of-watc...)

चंद्र आकाशामध्ये आयनिक वृत्तानजीक दर तासाला साधारण अर्धा अंश पूर्वेकडे सरकत असतो. आयनिक वृत्तालगत असलेल्या ज्येष्ठा (Antares), चित्रा (Spica), विशाखा (Libra) अशा ता-यांना तो अनेकदा झाकत असतो. चंद्रामुळे अशा प्रकारे अनेक अंधुक तारे रोजच झाकले जात असतात. ज्येष्ठा तारा तेजस्वी असल्यामुळे चंद्रामुळे झाकला जाईपर्यंत तो स्पष्ट दिसेल. विशेष म्हणजे सूर्यापेक्षा हजारो पट आकाराने मोठा असलेला हा तारा आपल्यापासून ७०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि तरीही तो इतका तेजस्वी दिसतो. आणि इतक्या अंतरामुळे आपण त्याला आज बघत असलो तरी हा प्रकाश ७०० वर्षांपूर्वी त्या ता-याकडून निघालेला असतो.

ह्यावेळी आकाशामध्ये इतरही खगोलीय ऑब्जेक्टस बघायची संधी आहे. पश्चिमेला मघा तारा (Regulus), पूर्वा व उत्तरा फाल्गुनी (Denebola) नक्षत्रातले तारे दिसतील. उत्तर पश्चिमेला मावळतीला आलेले सप्तर्षी (Ursa Major) दिसतील. साधारण डोक्यावर तेजस्वी स्वाती तारा (Arcturus) व किंचित दक्षिणेकडे तेजस्वी चित्रा तारा (Spica) दिसेल. ज्येष्ठाच्या पूर्वेला अनुराधा नक्षत्रातले (Beta Scorpii) तारे दिसतील. आकाश स्वच्छ असेल व प्रकाश प्रदूषण नसेल तर ज्येष्ठाच्या पूर्वेला मूळ नक्षत्रालगतचा तेजस्वी तारकागुच्छही (M 7) दिसेल. त्याबरोबर दक्षिणेकडे ओमेगा सेंटारी (Omega Centauri) हा बंदिस्त तारकागुच्छही बायनॅक्युलरच्या मदतीने बघता येऊ शकेल. त्याशिवाय दक्षिण क्षितिजालगत मित्र व मित्रक तारे (Alpha and Beta Centauri) आणि त्रिशंकू तारकासमूहही (Crux) नुसत्या डोळ्यांनी बघता येऊ शकेल. मित्र म्हणजे अल्फा सेंटारी हा पृथ्वीला सूर्यानंतरचा सर्वांत जवळ असलेला 4.3 प्रकाशवर्ष अंतरावरचा तारा आहे. त्याशिवाय पूर्वेला अभिजीत (Vega) हा तेजस्वी तारा क्षितिजालगत दिसेल. चंद्राच्या थोडं पूर्वेला तेजस्वी शुक्र आणि उजाडण्याच्या थोडं आधी पूर्व क्षितिजावर उगवलेला मंगळ ग्रहही बघता येईल.

तेव्हा आकाशातील ही आवर्जून अनुभवण्यासारख्या घटनेचा आनंद नक्की घ्या. त्यासह इतरही तारे- नक्षत्र बघता येतील. ही पोस्ट आपल्या जवळच्यांसोबत शेअर करू शकता. धन्यवाद.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्सचं आयोजन.)

भूगोलविज्ञानलेखबातमी

प्रतिक्रिया

आभार. पाहण्याचा प्रयत्न करतो.

कर्नलतपस्वी's picture

3 Feb 2024 - 8:51 pm | कर्नलतपस्वी

+1

अनन्त्_यात्री's picture

4 Feb 2024 - 7:35 am | अनन्त्_यात्री

धन्यवाद! आकाशदर्शनासाठी मुंबईच्या आसपास एखादे ठिकाण कोणते ते कृपया कळवा. शाळेत असताना वांगणीला आकाशदर्शनासाठी गेलो होतो, पण सध्या तिथेही वाढलेल्या वस्तीमुळे नीटसे आकाशदर्शन होऊ शकत नाही असे ऐकले आहे.

आता शहरांतून आकाशातील तारे दिसत नाहीत.

खिडकीतून चंद्र दिसतो. पण वृष्चिक रास १९९५ पासून दिसेनाशी झाली.

मार्गी's picture

4 Feb 2024 - 7:51 pm | मार्गी

@ अनन्त यात्रीजी, हो, वांगणी पूर्वी खूप प्रसिद्ध होतं. तिथे आताही तसं बरं आकाश असतं. आणि अगदी नवी मुंबईतूनही चांगलं आकाश असताना मी मध्यम तेजस्वीतेचे तारे बघितले आहेत.

@ कंजुसजी, खरं आहे. पण तरीही आकाश निरभ्र असताना कृत्तिका शहरातून दिसतात. मंद तारेही कधी कधी दिसतात. आणि पहाटे तुलनेने आकाश अजून चांगलं असतं. त्यामुळे ही घटना तर नक्कीच बघता येईल अशी आहे.

हा हिन्दीचा परिणाम होऊ लागला आहे का? आजकाल बर्याच ठिकाणी अशी वाक्यरचना दिसू लगली आहे.
कधी कधी वाटते की चहा प्यायलो ऐवजी चहाला प्यायलो म्हणतील कोणितरी.

कंजूस's picture

5 Feb 2024 - 3:40 pm | कंजूस

हे कानडी व्याकरण आहे.
मला दोन तिकिटे द्या हे कानडीत " मला दोन तिकिटांना द्या" असं असतं. एरडु तिटिटवन्नु कोंडी.

मार्गी's picture

6 Feb 2024 - 5:15 pm | मार्गी

खरंच! मलाही नंतर लिहीताना हे खटकलं. एका ठिकाणी पोस्ट करताना दुरुस्तही केलं. धन्यवाद @ अनामिक सदस्य जी!

बाकी हे पिधान खूप छान दिसलं. अनेकांनी फोटोजही घेतले आहेत. मी नेमका ट्रेनमध्ये होतो म्हणून मला नाही बघता आलं.

धन्यवाद.