पुस्तक परिचयः करूणाष्टक- लेखकः व्यंकटेश माडगुळकर

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
16 Jan 2024 - 10:52 pm

करुणाष्टक ही स्वातंत्र्यपूर्व काळात घडणाऱ्या एका गरीब ब्राह्मण कुटुंबाची कहाणी आहे. ह्या कुटुंबातला एक मुलगा आठवणी सांगतो आहे. ह्या आठवणी पूर्णपणे कौटुंबिक आहेत. आई, वडील, आजी आणि दोनतीन मुलांचं कुटुंब एका खेडेगावात राहत असतं. वडील कारकून. परिस्थिती बेताचीच. नव्या गावी बदली होते. मग तिथे नवीन बिऱ्हाड वसवतात. मग जे घरगुती प्रसंग घडू शकतील ते घडत राहतात.
mipa

लेखकाच्या वडिलांची तालुक्याला बदली झालेली असते.. ट्रंका, पोती, गाठोडी यामध्ये सामान भरून आई, वडील, आजी व मुले असं कुटुंब तालुक्याला चाललेलं आहे.. इथून कथेला सुरुवात होते. आजीचा हा पहिलाच गावापासून दूर असा मोठा प्रवास असतो, त्यामुळे ती गोंधळून गेलेली असते. तिची सून म्हणजे लेखकाची आई आजीला सांभाळत असते, सावरत असते. रेल्वे रूळ ओलांडत असताना कशालातरी थटून ती रुळावरच पडते. तिच्या मनगटाला मार लागतो. या प्रसंगाचे वर्णन करताना लेखक लिहितात, आपल्या गावातून जणू उपटून आणावं तसं तिला आणलं गेलं होतं. या प्रसंगानंतर मूळं उघडी पडलेल्या वेलीसारखी आजी सुकत सुकत गेली.

आपलं गाव, ओळखीचे लोक, गावकरी, नातेवाईक, गुरे ढोरे, हिरवी रानं असं सगळं काही सोडून नोकरीच्या गावी आल्यावर आजीला फारच एकाकी वाटू लागतं, ती अचानक गप्प गप्प होते.

नवीन घर काही सोयीचं नसतं. ते घर फारच एकाकी असतं., आसपास शेजार नसतो. लेखकाच्या आईला दुरून पाणी आणावं लागतं, तेपण रात्रीच्या वेळी. घराच्या भोवताली नाना प्रकारच्या झाडांची, वेलींची वर्दळ होत असे. त्यामधे लाल तोंडाची मुंगसं बिळं करून राहत. तिथे नाग, धामिन सारखे प्राणी वारंवार दृष्टीला पडत.

गावातील ओढ्याला बारा महिने पाणी नसायचं त्यामुळे ओढ्याच्या पत्रात जागोजागी खोल झरे काढून त्यावर लाकडी पंप बसवला होता. पाळी येईल त्याने या पंपाच्या तोंडाशी बसायचं आणि पाणी घेऊन घागर भरायची. आणि एक डोक्यावर व दुसरी कमरेत पकडुन चढ चढून घरी आणायची. लेखक सांगतात, या पाणी भरण्याचा आईला एवढा धसका की ती मध्यरात्री वैगेरे कधीही उठायची आणि घागर घेऊन ओढ्यावर जायला निघायची. आभाळ बघून किती वाजले ते बघायचे आणि दिशा उजळल्या आहेत, डोळ्याला दिसतंय असं बघून बाहेर पडायची.

एका मध्यरात्री ती अशीच जागी झाली. उशीला ठेवलेली चिमणी अंधारात चाचपडत लावून मंद प्रकाशात जेव्हा तिची नजर दाराकडे गेली तेव्हा तिच्या छातीत धस्स झालं, तोंडाला कोरड पडली व कपाळावर घाम जमला. बाहेरच्या दरवाजाच्या बाजूच्या भिंतीवरून भलामोठा नाग वरच्या भिंतीवरून खाली लोंबत होता. खाली येण्यासाठी आधार शोधत होता. त्यादिवशी वडील व लेखकाचा मोठा भाऊ घरी नव्हते. आई घाबरून गेली, तिला भीतीने हुडहुडी भरली. थोड्या वेळाने बंद दाराच्या सापटीतून तो सळासळा खाली उतरला आणि दाराच्या कणसाला वेढे घालून बसला. आई टक्क जागी राहिली.

आईला या ओसडीतल्या घरात आपण राहू नये असं वाटायला लागलं. तिला कसले कसले भास होऊ लागले. इतरांसाठी ते भास होते पण तिला मात्र ते सारे सत्यच होते. एकदा भर पौर्णिमेच्या रात्री घागर घेऊन ती बाहेर पडली व घरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर एक अनोळखी बाई तिला सामोरी आली. पाठीवरचे केस मोकळे, कपाळावर मळवट व हिरव्या रंगाच्या कोऱ्या वस्त्रात होती ती बाई. ती आईला बोलली, "माघारी फिर, अजुन मध्यरात्र आहे." तिने घरी येऊन ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडिलांनी बाहेर होऊन पहिलं पण त्यांना तसं काहीच दिसलं नाही.

पुढे मुलांची आजारपणं, नव्या भावंडांचे जन्म आणि जुन्यांचे मृत्यू हे प्रसंग येतात.

एकदा नवरा परगावी गेल्यावर खायचे-प्यायचे वांदे झाल्यावर एका भिक्षेकऱ्याकडून भिक्षा मागण्याची वेळ येते

ss
sds

गावात प्लेगची साथ येते, दुष्टपुष्ट व धडधाकट माणसं जांघेत, काखेत गाठ व सणसणून ताप येऊन देवाघरी जाऊ लागतात. तेव्हा हे कुटुंब शेतात झोपडी बांधून राहतं. या प्रसंगाचे वर्णन करताना लेखक लिहितात,

आपल्या मुलखातून परमुलखात जगायला आलेले भटके धनगर, गाढवी सोनार किंवा फासेपारधी जसे रानात वस्ती टाकून राहतात तसे आम्ही राहिलो होतो. ते रात्री दिवा लावत नाहीत, दिवस मावळायच्या आत चार घास तळहाताचीच थाळी करून खातात व पाखरासारखे झोपून जातात. आम्ही दिवा लावत होतो, ताटं-वाट्या घेऊन जेवत होतो, माझा मोठा भाऊ कंदील पुढे ठेऊन रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करीत होता.

गरिबीमुळे घडू शकणारे प्रसंग येतातच – पैशाच्या ओढाताणीमुळे मोठ्या मुलाला वसतिगृहात जावं लागणं, दुसऱ्याला शिक्षण लवकर पूर्ण करून नोकरीला लागावं लागणं वगैरे होतं.

पुढे लेखकाच्या वडिलांची साखरगडला बदली होते, देवस्थानचा वहिवाटदार म्हणून.. हा कादंबरीतील एकमेव बरा प्रसंग..

तिथे वडिलांना देवस्थानच्या खजिन्याची जबाबदारी मिळते. पडकामधली हलकी घरे, प्लेगची साथ यातून साखरगडला झालेली बदली अक्षरशः स्वप्नवत होती. चारमजली वाडा, लाकडी दरवाजे, पहऱ्यावरचे रामोशी, चौक, सोपे, वरच्या मजल्यावरील बैठकी, हंड्या, झुंबरे आणि राजघराण्यातील व्यक्तींची जिवंत वाटावी अशी तैलचित्रे यांचे तपशीलवार वर्णन माडगूळकरांनी केले आहे. त्या भल्यामोठ्या वाड्याची देखभाल करण्याचे काम त्यांच्या वडिलांना देण्यात येते. वेगवेगळ्या कामांसाठी वाड्यात बारा पंधरा नोकर होते.

गडावरच्या देवीचं नवरात्र येई तेव्हा नऊ दिवस उत्सव चाले, वाड्यात रोज दोनदोनशे लोकांच्या पंगती उठत. नवरात्र उत्सवात आणि एरवी विशेष प्रसंगी देवीचे एकशे आठ मानकरी गडावर जमत. गड आणि गडावरचं देवालय माणसांनी फुलून जाई.

इथे आल्यावर आईच्या चेहऱ्यावर तेज आले, वागण्यात विशेष आब आला. ती चांगली उजळ आणि किंचित स्थूल दिसायला लागली, ती आता 'वहिवाटदारीणबाई' झाली होती. तिच्या दिमतीला सखुबाई नावाची एक अनुभवी कुणबीण नित्य असे. या अल्पकाळाच्या ऐश्वर्याच्या आधाराने तिने आपल्या धाकट्या दिराचे लग्न मोठ्या थाठामाठात पार पाडले. पुढे या वास्तव्यातल्या सुखालाही ग्रहण कळा लागली. जामदारखाण्यातल्या दगिण्यातून पन्ना रत्न हरवले. अनुभवी लखोबाच्या (पट्टेवाला) कसून केलेल्या शोधामुळे ते सापडले खरे; पण दरम्यानचा काळ कसोटीचा गेला. यातच माडगूळकरांचे वडील बंधू मॅट्रिक नापास झाले. अपमानित होऊन त्याने घर सोडले. साखरगडची तीन साडेतीन महिने संपल्यानंतर वडिलांची बदली पुन्हा मुळ जागी झाली. औटघटकेचे वहिवाटदार पुन्हा कारकून झाले.

गरिबीच्या जोडीला दुर्दैव सुद्धा ह्या कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेलं. त्यामुळे चोरीचा आळ येण्याची शक्यता, मोठ्या मुलीची लग्न लवकर न जुळणं. मुलांची जुळली तर सुनांशी खटके उडणं, मुलांना धंद्यात खोट येऊन वडिलोपार्जित संपत्ती विकायला लागणं आणि अगदी शेवटी वृद्धापकाळी मुलांचे मृत्यू.!!

गांधी हत्येनंतर गांधींच्या “अहिंसक” अनुयायायांनी महाराष्ट्रभर ब्राह्मणविरोधी दंगली केल्या. ब्राह्मणांची घरं जाळली, हत्या झाल्या. त्या आगीत हे कुटुंबसुद्धा पडलं. काहीतरी किडूकमिडूक जमा करून उभारलेला संसार सुद्धा दंगलखोरांनी जाळून टाकला.

आई आणि तिची आठ मुले याभोवती या कादंबरीचे कथानक फिरते. प्रत्येक मुलाच्या रूपाने आई जणू एकेक नवे आयुष्य अनुभवते. चिकाटीने व जिद्दीने ती आयुष्य जगते. या साऱ्याचे लहान मुलाच्या दृष्टीने केलेले चित्रण या कादंबरीत अनुभवायला मिळते.

पोटासाठी बिऱ्हाड घेऊन फिरत राहणाऱ्या कुटुंबाची कहाणी या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळते. ही फक्त एका कुटुंबाची कहाणी न ठेवता या कादंबरीच्या सहाय्याने लेखकाने त्या काळातील वातावरण, समाजजीवन, चालीरीती, तेव्हाचा निसर्ग व माणसे यांचेसुद्धा रेखाटन केलेले आहे..

धन्यवाद..!!

मांडणीलेखमाहिती

प्रतिक्रिया

मिसळपाव's picture

17 Jan 2024 - 8:33 am | मिसळपाव

बनगरवाडी वाचलं आहातंच आणि आता हे. याच बरोबर "सत्तांतर", "वावटळ" आणि "कोवळे दिवस" ही पुस्तकं पण जरूर वाचा. धाकट्या माडगूळकरांचं आणिकही भरपूर लेखन उपलब्ध आहे, अतिशय वाचनीय आहे. पण ही तीन पुस्तकं अगदी अजिबात चुकवू नका.

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

धर्मराजमुटके's picture

17 Jan 2024 - 10:13 am | धर्मराजमुटके

माडगूळकर बंधूंचे साहित्य म्हणजे उत्तमच असणार याची १००% खात्री. पुस्तक परिचय आवडला.

कर्नलतपस्वी's picture

17 Jan 2024 - 11:07 am | कर्नलतपस्वी

व्यंकटेश माडगूळकर यांचे साहीत्य म्हणजे शंभर नंबरी सोनं.
मस्त परिक्षण.

यादीच्या बादलीत टाकून ठेवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2024 - 2:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम लिहिलंय. आभार. व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी असंच आहे.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

रामचंद्र's picture

17 Jan 2024 - 4:28 pm | रामचंद्र

मागं एका दिवाळी अंकात व्यंकटेश माडगूळकर ('करुणाष्टक') आणि दुर्गा खोटे अशा दोघांच्या आत्मकथेतले भाग वाचल्याचं आठवतं. त्या दोन्ही कथनांत वीसेक वर्षांचं अंतर आहे. पण भिन्न पार्श्वभूमी असलेल्या दोन व्यक्तींचं आयुष्य किती वेगळं असू शकतं ते जाणवून शाळकरी वयात तेव्हा खूपच आश्चर्य वाटलं होतं.
माडगूळकरांचाच 'मंतरलेले बेट' हा अनुवादही वाचनीय आहे. एका लहान मुलाच्या नजरेतून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळातल्या न्यूयॉर्क शहरातल्या आपल्या आठवणी त्यात आहेत.

नठ्यारा's picture

17 Jan 2024 - 8:17 pm | नठ्यारा

शब्दात कटुपणा न येऊ देणे हीच खरी करुणा. मनांत आणलं असतं तर विद्रोही धर्तीने कडवाष्टकही लिहिता आलं असतं. मात्र तिकडे लेखकाचा कल नसल्याचं जाणवतं.

-नाठाळ नठ्या

मुक्त विहारि's picture

17 Jan 2024 - 10:03 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

श्वेता व्यास's picture

18 Jan 2024 - 3:08 pm | श्वेता व्यास

पुस्तक परिचय आवडला. वाचण्याच्या यादीत जोडलंय.

सुजित जाधव's picture

20 Jan 2024 - 9:25 am | सुजित जाधव

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार..