एक तरी शिवी अनुभवावी..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
29 Oct 2023 - 11:48 am

धर्मेंद्रचे दोन्ही हात वरती लोखंडी चौकटीला बांधलेले. त्याच्या मानेला,ओठाला रक्त. त्याच्यावर गन रोखलेली. गब्बर बसंतीला म्हणतो,"नाचो,जबतक तेरे पाॅंव चलेंगे ,इसकी साॅंस चलेगी!" आणि विरु ऊर्फ धरमिंदर ओरडतो,"बसंती,इन कुत्तोंके सामने मत नाचना!"तरी बसंती त्याचे प्राण वाचवायसाठी नाचते.

शोले मधला हा सीन सर्वांना तोंडपाठ आहे. (शोले न पाहिलेला माणूस भारतात नाही. अशी वदंता आहे.) असा एकही सिनेमा
नसेल ज्यात धर्मेंद्रने "कुत्ते,कमीने" ही शिवी दिली नसेल.

सिनेमातला प्रत्येक हिरो,हिराॅईन,व्हिलन शिव्या देतोच. एवढंच काय, जगात कुठेही असा माणूसच सापडणार नाही,ज्यानं आयुष्यात कधी कुणाला शिवीच दिली नाही. आणि असाही माणूस नसेल ज्यानं कधी कोणाची शिवी खाल्ली नसेल. आपले पंतप्रधान मोदीही आपल्या भाषणात सांगतात,"मैं दिनभर विपक्षकी इतनी गालियाॅं खाता हूॅं।"

शिवी दिली की मन मोकळं होतं.मनातल्या दबलेल्या भावनांचं विरेचन होतं. मनात कोंडलेला संताप,राग, तिरस्कार, शत्रुत्व अशा सर्वच निगेटिव्ह भावनांचा निचरा होतो. मनावरचं ओझं उतरतं. तो एक शिष्टसंमत नसलेला मानसोपचार आहे. अनेक मारामाऱ्या,हिंसक घटना फक्त दूर राहून मनसोक्त शिव्या दिल्याने टळल्या आहेत.

शिव्या अनेक प्रकारच्या असतात. शिवी देण्यामागे दुसऱ्याची अवहेलना करणे, अपमान करणे, निंदानालस्ती करणे,त्याचे अवगुण दाखवणे,त्याचे वाईट चिंतणे हा हेतू असतो. अगदी सौम्य शिवी म्हणजे "मूर्ख,दीडशहाणा" काही शिव्या प्राणीवाचक असतात."गाढवा,कुत्र्या,डुकरा,घोड्या."त्यातून जरा लागट शिव्या म्हणजे,"नीच, नालायक,हलकट."

त्याहून वाईट शिव्या म्हणजे आई बहिणीवरुन दिलेल्या शिव्या. आणि अगदी ऐकवणार नाहीत अशा लैंगिक अवयवांवरुन दिलेल्या शारीरिक संबंधावरुन दिलेल्या, अश्लील शिव्या. शिव्या देताना समोरच्याच्या मर्मावर आघात केला जातो. आई हा माणसाचा "हळवा कोपरा "असतो. आईबद्दल माणसाच्या मनात अपार प्रेम,माया,आदर असतो. ती त्याचं मर्मस्थान असते. त्या मर्मावर आघात झाला की माणूस विद्ध होतो. कोलमडून पडतो. ती शिवी त्याला कमालीची झोंबते. तोच तर शिवी देणाऱ्याचा हेतू असतो. म्हणून मग आईवरुन शिवी दिली जाते.

मानवी संस्कृतीत काही शारीरिक संबंध निषिद्ध मानले जातात.उदा.भाऊबहीण, पितापुत्री,आई मुलगा.इ.इ इतर जनावरांमध्ये ते तितकेसे निषिद्ध नसतात. उदा. कुत्री,मांजरं आणि इतर सर्व जीव. आपल्याच मुलापासून मांजरीला पिल्ले होणे अगदीच अशक्य नाही. म्हणून मग अशा निषिद्ध संबंधावरुन शिव्या दिल्या जातात.

कित्येक शिव्या आपल्या नकळत आपण देत असतो. तुम्हांला आश्चर्य वाटेल पण "अरेच्या"हा शब्दही एका लांबलचक शिवीचा अवशिष्ट -शिल्लक राहिलेला-तुकडा आहे.

फार प्राचीन काळी म्हणजे वेदकालापासून शिव्या अस्तित्वात आहेत. अश्वमेध यज्ञात एका विशिष्ट विधीत निंदाव्यंजक शब्दांचा वापर केला जायचा. शाकुंतल नाटकातील कण्व मुनींचा शिष्य रागाच्या भरात दुष्यंत राजाला उद्देशून अपशब्द वापरतो.मृच्छकटिक नाटकातील शकार हे पात्र अपशब्द वापरते. जारण मारण मंत्रात "नाशय,उच्चाटय"असे निंदाव्यंजक शब्द वापरले गेले आहेत. संस्कृत वाङ्मयात 'हे,गर्दभ,शूकर, मूर्खशिरोमणी" अशा शिव्या दिल्या आहेत.

आपल्या महाराष्ट्रात आणि देशात अशी गावं आहेत की जी वेशीवर एकत्र येऊन दुसऱ्या गावातल्या लोकांना म्हणजे दोन गावातले लोक एकमेकांना मनसोक्त शिव्या देतात. फार कशाला आपल्या संतांनी विठ्ठलाला सुद्धा शिव्या दिल्या आहेत. कित्येक भक्त स्वतःला उद्देशून शिव्या देताना आढळतात.

शिव्या ह्या सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहेत. प्रत्येक भाषेत शिव्या आहेत आणि जगाच्या पाठीवर सर्व देशांत शिव्या आहेत. शहरात, ग्रामीण भागात सर्वत्र शिव्या आहेत. दोन मित्र एकमेकांना खूप वर्षांनी भेटले की संभाषणाची सुरुवातच एकमेकांना मिठी मारुन आणि शिव्या देत करतात. अतिग्रामीण भागातील आई सुद्धा स्वतःच्या लेकराचं कौतुक करताना त्याच्या गालावर चापट मारत ,"कुणी काढलं रे तुला!" असं सहज बोलून जाईल. क्रिकेटमध्ये किंवा इतर कोणत्याही क्रीडाप्रकारात आपला देश हारतोय कळलं लोक भावनेच्या भरात खेळाडूंना शिव्या घालतात. राजकारणात तर विचारूच नका.गद्दार ,ढेकूण, डुक्कर,प्रेतं अशा अनेक शिव्या दिल्या जातात.

पण शिष्टसंमत भाषेतच सभ्य माणूस बोलत असतो. त्यात शिव्यांना मज्जाव आहे. त्यातूनही "गोलपिठा"सारख्या पुस्तकात शिव्या असतात. तर पुलं सारखा खट्याळ लेखक म्हैस कथेत "बा"चा "बा"ची-बाचाबाची अशी मिश्किल कोटी करुन जातो.
तेव्हा शिव्या द्यायच्या नाहीत हे खरं,पण भावनेच्या भरात आली एखादी तोंडात तर द्या हासडून ! व्हा मनमोकळे!

कारण.... कारण... एक तरी शिवी अनुभवावी...!!

मांडणीसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

उत्तम लेख. शिव्या दिल्याने भावनांचा निचारा होतो हे मान्य.
श्री बिपिन कार्यकर्ते यांनी खोबार (?) मालिकेत तत्सम विषयावर लिहिले होते.

--

त्याहून वाईट शिव्या म्हणजे आई बहिणीवरुन दिलेल्या शिव्या. आणि अगदी ऐकवणार नाहीत अशा लैंगिक अवयवांवरुन दिलेल्या शारीरिक संबंधावरुन दिलेल्या, अश्लील शिव्या. शिव्या देताना समोरच्याच्या मर्मावर आघात केला जातो. आई हा माणसाचा "हळवा कोपरा "असतो. आईबद्दल माणसाच्या मनात अपार प्रेम,माया,आदर असतो. ती त्याचं मर्मस्थान असते. त्या मर्मावर आघात झाला की माणूस विद्ध होतो. कोलमडून पडतो. ती शिवी त्याला कमालीची झोंबते. तोच तर शिवी देणाऱ्याचा हेतू असतो. म्हणून मग आईवरुन शिवी दिली जाते.

हे पुर्णतः खरे नाही. शिवी काय, त्याबरोबरच ती कोणी दिली आणि कोणाला दिले हे सुध्दा महत्वाचे आहे.
उदाहरणार्थ
१. तथाकथीत सवर्णाने दलिताला शिवी दिली तर तो गुन्हा ठरतो. पण तीच शिवी दलिताने दलिताला दिली तर तो गुन्हा ठरत नाही.
२. गोर्या युरोपियनला नाझी म्हणुन म्ह्टले ते आईवरील शिवीपेक्षा वाईट समजले जाते.
३. श्री हरभजन सिंग यांनी श्री अ‍ॅन्ड्रु साईमंड यांना माकड म्हटल्यामुळे गदारोळ निर्माण झाला होता. श्री सिंग यांनी पंजाबीमधुन आईला शिवी दिली असे सांगुन स्वत:ची सुटका करुन घेतली. https://www.theguardian.com/sport/2008/jan/30/cricket

बसवला टेंपोत हि मिसळपाववरची फेमस शिवी होती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2023 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी, नेहमीप्रमाणेच वेगळा विषय. शिव्यांबद्दल मागे कोणी एक मिपाकर प्रचेतस नामक आयडीने वीरगळावर आईवरुन दिलेला शाप शिव्या शिळा आठवण झाली. आईवरुन शिव्या दिल्या की त्या थेट पोचतात, आई हा प्रत्येकाचा हळवा कोपरा. शिवी दे, पण आईवर नाय द्यायची. आणि दिली की त्यावरुन भांडण तर, अनेकांची होतात.

लहानपणी कितीतरी शिव्या दिल्या आणि खाल्ल्या आहेत. शिव्या जशा द्यायच्या असतात, तशा खायच्याही असतात, हे समजूनच शिवीगाळ करावी लागते. गाडी चालवतांना चूकीच्या साईडने कोणीतरी येतो तेव्हा, कोणीतरी आडवा तिडवा येतो तेव्हा, कोणीतरी रस्त्यात गाडी उभी करुन गप्पा मारत असतो तेव्हा हलक्या फुलक्या शिव्या येतातच.

बावळट, येडपट, अडाणी असा स्तर आताशी उंचावला आहे, हल्ली इतकाच तो काय फरक झालेला असतो. पण, तेही फार कमी. वयपरत्वे राग व्यक्त होण्याचं प्रमाण होत जात असावं, मन की बात मनमे. असं सगळं.

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार, संकेत हे अ.द.मराठे यांच्या पुस्तकात तर, अनेक शिव्यांची तपशीलवार ओळख होते.

आजी लिहिते राहा. तुम्ही काही तरी, वेगळं लिहिता म्हणून निवांत वाचून प्रतिसाद लिहावा लागतो. तेव्हा लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर's picture

31 Oct 2023 - 9:03 pm | टर्मीनेटर

आईवरुन शिव्या दिल्या की त्या थेट पोचतात, आई हा प्रत्येकाचा हळवा कोपरा. शिवी दे, पण आईवर नाय द्यायची. आणि दिली की त्यावरुन भांडण तर, अनेकांची होतात.

+१
भांडणं मारामाऱ्या पर्यंत ठीक आहे पण वेळप्रसंगी खुनही केले जातात.

असो, लेख आवडला हो आजी 👍

(एकेकाळी भरपूर अर्वाच्य शिव्या देणारा) टर्मीनेटर 😀

सुबोध खरे's picture

30 Oct 2023 - 10:02 am | सुबोध खरे

शिवी त्याच्या दर्जावरून हलकी किंवा भारी समजू नये.

वाहत्या रस्त्याच्या मध्यभागी कानाला भ्रमणध्वनी लावून माझ्या मोटारसायकलच्या पुढे अचानक आलेल्या एका तिशीच्या आसपास वय असलेल्या विशाल महिलेला मी शांत शब्दात, "आजी, आता वय झालंय तुमचं! बघून रस्ता ओलांडायला पाहजे!" असे म्हटल्यावर संतापाने तिचं तोंडातून शब्द फुटेनासा झाला होता.

मोटार सायकल पुढे गेल्यावर मागून आवाज ऐकू आला, "मेल्या, आजी कुणाला म्हणतोस?"

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2023 - 5:32 pm | चौथा कोनाडा

मस्त माहितीपुर्ण लेख !

म्हांला आश्चर्य वाटेल पण "अरेच्या"हा शब्दही एका लांबलचक शिवीचा अवशिष्ट -शिल्लक राहिलेला-तुकडा आहे.

मला नाही वाटत असं असेल म्हणून !
या विषयी आणखी तपशिलात जाऊन (सभ्य भाषेत) कोण सांगु शकेल ?

कॉमी's picture

2 Nov 2023 - 11:58 pm | कॉमी

अरेच्चा - अरे च्या... च्यायला.

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2023 - 6:13 pm | चौथा कोनाडा

व्वा ! च्या ... मा...री, असंय होय !

उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून शिवी हा एक महत्वाचा "हिंसक" भाग आहे. ह्यावर भरपूर रिसर्च झाला आहे. स्टीवन पिंकर महोदयांनी ह्यावर विपुल लेखन तसेच व्याख्याने दिली आहेत. जरूर ऐका.

काही शेकडा वर्षे मागे जा. तुम्ही एक पुरुष आहात आणि कुठेतरी दुसऱ्या पुरुषा बरोबर तुमचा वाद होतो. आता, तुम्ही निमूट पणे हार मान्य केली तर तुम्ही बीटा आणि तो अल्फा सिद्ध होतो. त्यामुळे, तुम्हाला त्या वादांत हार मानणे तुमच्या फायद्याचे नाही. इतर लोक तुमच्याकडे बारकाईने पाहत आहेत. आता तुमच्याकडे एक उपाय उरतो तो म्हणजे ठोसा मारणे. पण एकदा तुम्ही ठोसा मारला तर दुसरी व्यक्ती लाथ मारेल, मग तुम्हाला शस्त्र काढावे लागेल. मग तुमच्यापैकी एक मृत्युमुखी पडेल.

ह्यावर सोपा उपाय म्हणजे फक्त शिवी द्या. शिवी हा एक शाब्दिक ठोसा आहे. त्यावर दुसरी व्यक्ती आणखीन शिवी देईल त्यावर तुम्ही आणखीन शिव्या देऊ शकता. जो पर्यंत कुणी ठोसा मारत नाही तो पर्यंत फक्त शिव्यांचे ठोसे मारणे आपल्या हिताचे आहेत. इथे तुम्ही "प्रतिकार" केला हे सुद्धा दिसते आणि त्यांत escalation ची रिस्क सुद्धा नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात शिव्या देणे हे किमान पुरुष मंडळींच्या हिताचे आहे. लहान मुलांना शिव्या देऊ नये असे संस्कार दिले तरी त्याच वेळी योग्य परिस्थितीत शिव्या त्यांनी दिल्याचं पाहिजेत नाहीतर अनेकदा "ठोसा" हा एकमेव उपाय त्यांच्या हाती राहतो जो चांगला नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2023 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> काही शेकडा वर्षे मागे जा.

आताही असेच असते कमी जास्त प्रमाणात बातम्या वाचल्या बघितल्या की लक्षात येते फार फरक नाही.

>>>तुम्ही एक पुरुष आहात आणि कुठेतरी दुसऱ्या पुरुषा बरोबर तुमचा वाद होतो. आता, तुम्ही निमूट पणे हार मान्य केली तर तुम्ही बीटा आणि तो अल्फा सिद्ध होतो. त्यामुळे, तुम्हाला त्या वादांत हार मानणे तुमच्या फायद्याचे नाही. इतर लोक तुमच्याकडे बारकाईने पाहत आहेत. आता तुमच्याकडे एक उपाय उरतो तो म्हणजे ठोसा मारणे. पण एकदा तुम्ही ठोसा मारला तर दुसरी व्यक्ती लाथ मारेल, मग तुम्हाला शस्त्र काढावे लागेल. मग तुमच्यापैकी एक मृत्युमुखी पडेल.

>>>खरंय, किरकोळ गोष्टी जीवावर बेततात.

-दिलीप बिरुटे

विविध शब्द वापरून मानवी मनावर प्रभाव पाडला जाऊ शकतो. लहान मुलाशी बोलताना "शी" तीच गुरांच्या बाबतीत शेण होते, नगर व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सांडपाणी तर वैद्यकीय दृष्टिकोनातून मल, फॉर्मल भाषेंत विष्ठा आणि शिवीच्या बाबतीक गू. एकच वस्तू पण शब्द वापरा प्रमाणे भावना बदलतात.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Nov 2023 - 6:27 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत. महाराणी प्रसूत होते तर सामान्य बाई बाळंत होते. कुत्री व्याते

सर्वसाक्षी's picture

2 Nov 2023 - 10:11 pm | सर्वसाक्षी

ज्या मित्राचा फोन आला असता प्रतिक्षिप्त क्रियेने आपल्या तोंडुन हॅलो ऐवजी कचकचीत शिवी उत्तरादाखल जाते असा एकही मित्र नसलेला मनुष्य खरोखर हतभागी!
संभाषणाची सुरुवात आणि अखेर जर शिवीने होत असेल तर ते जिवलग मित्र, बाकी सगळे स्नेही, सवंगडी, परिचीत वगैरे..
खरंच सांगतो, अशा एका मित्राचा एकदा सकाळी सकाळी फोन आला. उचलला तर काय? एकदम सोज्वळ भाषा! मी कानाला लावलेला फोन समोर धरला आणि खात्री करुन तो फोन त्याचाच आहे ना याचे खात्री करुन घेतली. मग हळूच विचारलं अरे कुठे बाहेर आहेस का? आजूबाजूला कुणी पाहुणे वगैरे आहेत का? गाडी चालवताना अशा मित्रवर्यांचे फोन आले तर कॉल उचलताक्षणी समोरच्याला बोलाची संधी न देता ओरडून सांगावं लागतं की गाडी चालवत आहे, हपीसला निघालो आहे आणि बरोबर काही सत्पुरुष आणि कुलीन स्त्रिया आहेत.
तर शिव्यांची मनमोकळी देवाणघेवाण हे घट्ट मैत्रीचं लक्षण आहे जिथे कुठल्याही औपचारिकतेला थारा नाही. अशा मित्रांशी बोलल्यावर खूप बरं वाटतं. विशेष्तः दिवसभर औपचारिक, सावध, शिष्टसंमत बोलून झाल्यावर रात्री अशा मित्राचा फोन ही संजीवनी असते.
माझ्या अशा एका मित्राला करोनाकाळात एकाएकी जबरदस्त मानसिक दडपण आलं. ठणठणीत असणार्‍या जीवाला फोनवर बोलताना धाप लागू लागली. आपल्या मुलीची प्रकृती नाजूक आहे, ती चार चौघांसारखी नाही; आई नव्वदीत आहे, आणि यापैकी कुणाला करोना झाला तर? या चिंतेने तो ग्रासला आणि असा विपरीत परिणाम दिसू लागला . एका मित्राची आई गेली तेव्हा तो आणि त्याची पत्नी तिथे भेटले आणि ही सगळी हकिगत समजली. मी त्याला सांगितलं की त्याला काही झालेलं नाही तर भितीने घरात बसून असल्याने तो मित्रांच्या प्रेमळ संवादांना मुकतोय आणि यावर सोपा उपाय म्हणजे आपण किमान दिवसाआड तरी रात्री फोनवर बोलू, मनसोक्त शिव्या घालू (आतल्या खोलीत बसून) जरा रोजचे शब्द कानी पडले की तब्येत सुधारेल.

प्रचेतस's picture

3 Nov 2023 - 3:15 pm | प्रचेतस

ह्या संदर्भात रा. चिं. ढेरे यांनी आपल्या "शिवी आणि समाजेतिहास" ह्या निबंधात ज्ञानेश्वरांच्या 'खर दृष्टांताचे उदाहरण दिले आहे.

ते म्हणतात सकळांना आपल्या करुणेच्या मायेत घेणार्‍या, सकळांचे इष्ट चिंतिणार्‍या ज्ञानदेवांनीही आपल्याला सौम्यसा धक्का दिलेला दिसतो.

खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें ।
तऱ्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥ ७०६ ॥
तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं ।
व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी ॥ ७०७ ॥

गाढवीण गाढवाला स्पर्श करु न देता उसळून मागील लाथेने त्याचे नाकाड फोडते तरिही ज्याप्रमाणे गाढव मागे हटत नाही त्याप्रमाणे विषयासक्त पुरुष जळत्या आगीसारख्या स्त्रीदेहाचा उपभोग घेण्यास सरसावतो आणि ही व्यसनी अलंकारासारखी मिरवतो.

हा खर दृष्टांत म्हणजे ज्ञानदेवांनी विषयलंपटांना दिलेली एक तिखट शिवीच आहे असे म्हणावे लागेल.

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2023 - 6:12 pm | चौथा कोनाडा

+१ ... माहितीपुर्ण !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2023 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

कित्येक शिव्या आपल्या नकळत आपण देत असतो. तुम्हांला आश्चर्य वाटेल पण "अरेच्या"हा शब्दही एका लांबलचक शिवीचा अवशिष्ट -शिल्लक राहिलेला-तुकडा आहे.
हे माझ्यासाठी नविन आहे ! पूर्ण शिवी काय असावी ? असं विचार करुन देखील काही सुचलं देखील नाही ! ज्ञान वर्धन करावे !
बाकी या विषयावर अमुल्य रत्न मिपावर उपलब्ध आहेच :- शिव्यांना शिवी देऊ नका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures

शशिकांत ओक's picture

8 Nov 2023 - 11:09 am | शशिकांत ओक

जिव्हासफाई एक अभियान
कदाचित काहींना आठवेल... काही काळापूर्वी या धाग्यावर २१ हजारहून अधिक टिचक्या पडल्या होत्या.
कधी सकारण तर कधी अभावितपणे भाषेला धार आणायला जिव्हा लवलवते. तो जिव्हा'ळ्याचा विषय बनतो. कळतं पण वळतं नाही असेही होते! मग उपाय काय?

माझ्या या लेखावर भरपूर प्रतिसाद आपण दिलेत. वाचनेही खूप जणांनी केली. आपणा सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानते. आणि एक सांगायचे झाले तर "अरेच्या"प्रमाणेच"अरे"हा सुद्धा शिवीचा एक तुकडा आहे.बाकी ठीक.असाच लोभ असावा.