खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
4 May 2023 - 2:38 pm

खंडाळा स्टेशन

मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे. या प्रवासावर आधारित गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली आहेत.

देशाच्या अंतर्गत भागातून ब्रिटनला निर्यात करायचा कच्चा माल लवकरात लवकर विविध बंदरापर्यंत पोहोचवता यावा. तसेच ब्रिटनहून आलेल्या पक्क्या मालाचे भारताच्या विविध भागांमध्ये असलेल्या बाजारपेठांमध्ये वेगाने वितरण करणं शक्य व्हावं, या हेतूनं ईस्ट इंडिया कंपनीने भारतात लोहमार्गांचे जाळे विणण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी महत्त्वाची बंदरं आणि भारताचे अंतर्गत भाग, तसेच लष्करी दृष्टीनं महत्वाच्या ठिकाणांना जोडणारे लोहमार्ग प्राधान्याने बांधण्यास सुरुवात झाली होती. 16 एप्रिल 1853 ला पहिली प्रवासी रेल्वेगाडी सुरू झाल्यानंतर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या पुण्याला मुंबईशी लोहमार्गाने जोडण्याची आवश्यकता कंपनीला वाटत होतीच. त्या दृष्टीनं तातडीनं काम हाती घेण्यात आलं.

असं असलं तरी मुंबई-पुणे अशी थेट रेल्वेगाडी सुरू झाली नव्हती. कारण खंडाळा आणि कर्जतदरम्यानच्या बोर घाटातील (खंडाळा घाट) काम अजून झालेलं नव्हतं. या मार्गावरचा हाच सर्वात आव्हानात्मक टप्पा होता. सुरुवातीला खोपोलीवरून खंडाळ्यापर्यंत मार्ग टाकण्यासाठीचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामध्ये असं लक्षात आलं की, तीव्र चढ असल्यामुळं खोपोली-खंडाळा असा मार्ग टाकणं शक्य नाही. कारण या टप्प्यात रेल्वेगाडीला कमीतकमी अंतरात खडा चढ चढावा लागणार होता. त्यामुळं पळसधरीहून खंडाळ्यापर्यंत लोहमार्ग टाकण्याचं काम सुरू झालं. या टप्प्यामधला लोहमार्ग 1:36 एवढ्या तीव्र चढ-उताराचा, दऱ्या-खोऱ्यांतून जाणारा, अवघड वळणांचा, अनेक लहान-मोठे पूल आणि बोगद्यांमधून जाणारा असल्यानं तो पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागला. या कामासाठी तब्बल 42 हजार कामगारांनी मेहनत घेतली होती. मुंबई-पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांना हा मार्ग जोडणार असल्यानं तो सुरुवातीपासूनच दुहेरी करण्यात आला होता.

14 मे 1863 ला मुंबई-पुण्यादरम्यानचा संपूर्ण मार्ग नियमित वाहतुकीसाठी खुला झाला. परिणामी तीन दिवसांचा प्रवास फक्त ६ तासांवर आला. तीव्र चढ असल्यामुळं त्याकाळी वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या रेल्वेगाडीला एका दमात घाट चढता येत नसे. त्याचबरोबर मंकी हिलपासून खंडाळ्यापर्यंत सरळ मार्ग टाकायचा म्हटलं तर मध्येच अतिशय उंच डोंगरांचा अडथळा होता. यातून मार्ग काढण्यासाठी मंकी हिलनंतर एक रिव्हर्सिंग स्टेशन सुरू करण्यात आलं. मंकी हिलच्या पुढे घाट चढत गाडी या रिव्हर्सिंग स्टेशनवर आली की, तिथं इंजिनात पाणी भरलं जाई आणि गाडीची दिशा बदलून ती पुण्याच्या दिशेने जाई. पुण्याहून मुंबईकडे जातानाही या स्थानकात गाडीची दिशा बदलली जात होती. विद्युतीकरणाच्यावेळी 1927 मध्ये मंकी हिलजवळ दोन नवे बोगदे खोदण्यात आले आणि त्यानंतर रिव्हर्सिंग स्टेशन बंद करण्यात आले.

बोर घाटामधल्या लांबलचक बोगद्यातून वाफेच्या इंजिनाची रेल्वेगाडी जात असताना कोळशाच्या धुराचा प्रवाशांना विशेषत: साहेब लोकांना त्रास होत असे. त्याबाबत त्यांनी जी.आय.पी. रेल्वेकडे तक्रारीही केल्या होत्या, पण त्या काळात काही पर्यायही नव्हता. पुढं भारतात 3 फेब्रुवारी 1925 ला मुंबई आणि कुर्ल्यादरम्यान विजेवर चालणारी पहिली रेल्वेगाडी सुरू झाल्यावर मुंबई-पुणे आणि मुंबई-इगतपुरी मार्गांचं प्राधान्यानं विद्युतीकरण करण्यात आलं. 1929 मध्ये पुण्यापर्यंतचं विद्युतीकरण पूर्णही झालं.

खंडाळ्याच्या घाटात सुरुवातीला रेल्वेगाडीला पुढच्याच बाजूला इंजिनं जोडली जात असत. त्यामुळं घाट चढत असताना गाडीच्या मागील बाजूवर येणाऱ्या अतिरिक्त भारामुळं इंजिन आणि डब्यांना जोडणारी कपलिंग तुटण्याची बरीच शक्यता असे. तसे झाल्यास डबे खाली वेगानं घसरत जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.

मुंबई-पुणे दरम्यान 1929 पासून वापरात असलेल्या 1500 व्होल्ट डी.सी. विद्युत कर्षणप्रणालीचे 25 के.व्ही. ए.सी. प्रणालीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळं आता या घाटात उच्च क्षमतेची अत्याधुनिक इंजिनं नियमितपणे दिसू लागली आहेत.

खंडाळ्याच्या घाटामधल्या रेल्वेमार्गाशी संबंधित ऐतिहासिक पाऊलखुणांवर आधारित मी बनवलेला व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/lD3OlL8Jhck

इतिहासमुक्तकप्रकटनसमीक्षालेखअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

गवि's picture

4 May 2023 - 2:59 pm | गवि

उत्कृष्ट माहिती.

यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला.

प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत.

उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे.

हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात.

त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात.

युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात.

मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे.

भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल.

https://aisiakshare.com/node/7815

एक अंश:

खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो.
कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल?
वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत.

बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau's picture

4 May 2023 - 10:41 pm | dadabhau

लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पराग१२२६३'s picture

4 May 2023 - 11:17 pm | पराग१२२६३

मराठीत बोर म्हटलं जात असलं तरी इंग्रजीत याचं स्पेलिंग Bhore असं केलं जातं. त्यामुळे मराठीतही भोर असं नाव रुढ होत आहे.

dadabhau's picture

5 May 2023 - 6:45 pm | dadabhau

म्हनुन मग आपन पण हे असे चुकीचे शब्द रुळ्वायचे का?

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 1:39 pm | कर्नलतपस्वी

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही.

घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ's picture

5 May 2023 - 3:43 pm | विजुभाऊ

मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते.
बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात.
रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते
इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो.
दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

dadabhau's picture

5 May 2023 - 6:52 pm | dadabhau

त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

कंजूस's picture

5 May 2023 - 4:29 pm | कंजूस

लक्ष्मण (मराठी उच्चार लक्षुमण) तामिळ लट्_चि_मण.

सुबोध खरे's picture

6 May 2023 - 9:43 am | सुबोध खरे

मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता.

त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात.

उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे.

सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो

तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो.

पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात.

राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले.

हेही ठीक आहे

merta road janction हे मेडता रोड आहे.

गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत

माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात.

बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे.

सर्वात वरकडी म्हणजे

marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

कंजूस's picture

6 May 2023 - 12:30 pm | कंजूस

ही नदी कोणती? मांडवी?

गवि's picture

6 May 2023 - 12:56 pm | गवि

हो

बोका's picture

6 May 2023 - 7:29 pm | बोका

असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.

कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.

पराग१२२६३'s picture

11 May 2023 - 3:37 pm | पराग१२२६३

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे यावर आधारित व्हिडिओचा भाग दुसरा.
https://youtu.be/LSy4a3BBybI