मोगरा फुलला (ऐसी अक्षरे ..मेळवीन -८)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
27 Feb 2023 - 10:29 pm

m

एका निळाशार डोहात बुडून जावं,तळाशी माउलीची भेट घ्यावी.शिंपला हाती घेत काठाशी यावं.त्यात चमचमता निळा मोती असावा.तो मोती मोगराच्या फुलांच्या राशीत अलगद ठेवावा.असा भास मुखपृष्ठ पाहील्यापासुनच होतो.
लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) ह्यांचे ज्ञानेश्वर चिंतनाचे फलित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक १९७५ साली प्रथम प्रकाशित झाले.
ज्ञानेश्वरकालीन काळाचा मागोवा ,कावेरी (रुक्मिणीची सखी),भट्टदेव (साऱ्या कुटुंबाचे हितचिंतक)या काल्पनिक पात्रांचे स्वगत माध्यमातून कोमल,संवेदनशील ,काव्यशब्द लयीनी यात साकारले आहे.
माउलींची रसाळवाणी,अल्प वयातच अगम्य प्रतिभा सर्वश्रुत आहेच.अशी दीप्तिमान तेजस्वी निवृत्ती,ज्ञानेश्वर,मुक्ताई,सोपान चार अपत्ये ज्या दाम्पत्यांची त्यांच्याविषयी कुतुहूल या पुस्तकाद्वारे शमते.

रुक्मिणी आणि विठ्ठलपंतयांच्या प्रपंचाचे सर्व उतार चढाव वाचतांना मनास अनेक गाठी पडतात खऱ्या.पण विठ्ठलपंतांच्या शास्त्रोक्त ग्रंथ अभ्यास या लेकुरांनी आपल्या दिव्य सिद्धीने आभालासम विशाल तर केलाच पण तत्कालीन जनमाणसात शुद्ध बीज रोवले.
दाम्पत्यांचा प्रपंच,प्रपंच त्याग,शास्त्रोक्त प्रायश्चित्त,पुन:श्च समाजाकडून अवहेलना,मुलांच्या भविष्यासाठी देहांत प्रायश्चित्त या अवस्था मनी काजळीसारखा अंधार घेऊन येते.ज्याचे काजळ आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालते.त्रांब्यक,काशी,आळंदी या ठिकाणची परिस्थिती वर्णन करतांना समाजातील विविध कर्मकांड –श्रद्धा ,शैव –वैष्णव धारा यांचे चित्रण दिसते.
ज्ञानदेवांच्यावेळी गर्भार असतांना रुक्मिणीची स्वधुंद अवस्था,ज्ञानेश्वर जन्मवेळीचे वर्णन अलौलील शांतीदूत अष्टमीला भूमंडळी येणार याची अनुभूति देते.
लहानपणापासून वडिलांच्या शिकवणीतून असंख्य श्लोक कंठस्थ असणारा ज्ञानदेव माता पिता नन्तर सदैव शिव समाधीत लीन निवृत्तीला गुरु आणि साक्षात आदिमाया मुक्ताईचा माय बाप होतो.

शुधीपत्रासाठी पैठणला पायी निघालेले चारही भावंड ,पंडितांच्या सभेत रेड्यामुखी वेद वद्वाणारे भावंडांना “सूर्यासम तेजस्वी तुम्ही यापुढेही जनास कीर्तन,भक्तीरसात लीन करावे”असा संदेश स्वीकृत करतात.
प्रवरातीरी पोहचता पैस खांबाला पाचूची पालवी फुटते,ज्ञानेश्वर मुखी अमृतवाणी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी जन्म घेते.रोज गीतेतील एका अध्यायाचे निरुपण ऐकतांना जनांचे कानच शब्द होतात.पुढे अमृतानुभव गुरुआज्ञेने घडतो.

“शब्दास आपण बहु मानतो ,तो आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण करवून देतोम्हणून,पण जो स्वसंवेद्य आहे,स्वत:ला जाणणारा आहे.त्यास ज्ञानाचे ओझेच होईल .”
“समोर ज्ञानाचे कल्लोळ उसळत असता त्यास अज्ञान नाव कोण्हे दिले?,ते अज्ञान शब्दाचे सांकडे येक्या अंगास सारून आता प्रकाशाची कवाडे उघडिली जात आहेत.”
--मोगरा फुलला

आळंदी येता क्षमा याचना जणांकडून मागितली तर जातेच पण अवघी नगरी आनंदाच्या लाटांत बुडते.
ज्ञानदेवा मनी पंढरपुरीचा विठ्ठल त्याचा परमभक्त नामदेव याचे भेट घेण्याचे येते.ज्ञानेश्वर-नामदेव ही जोडगोळी पुन्हा उत्तरेत तीर्थाटन करतात.नामदेवाच्या मनाचे कवाडे गुरु ज्ञानेश्वर विस्तृत करतात.जनाईचे चिंतन ऐकतात.या क्षेत्री अनेक अभंग रचना माउली घडवतात.
“मोगरा फुलला,फुले वेचिता बहरू कळीयांसी आला”

आता जे नेमिले ते पूर्ण केले,काही उणे नाही ,ज्ञानदेवांस या देहाचा मोह नाही तर भारच होऊ लागला.गुरु आशीर्वादाने त्रयोदशीस सिद्धेश्वर बेटी,इंद्रायणी काठी संजीवन सोहळा ठरला.
मेघांसही अश्रू झरू लागले.

ज्ञानदेवान्मुखी आनंद दाटला होता.सत,चित,आनंद एकवटणार होते.ते पसायदान मागत होते...आणि सांगतही होते.
“संसारी असावे ,पण असोन नसल्यासारखे,प्रभूचिंतन सोडू नये”
“स्वकर्मे त्यागू नये”

“पाळिले पोसिले चालविला लळा|
बा माझ्या कृपाळू निवृत्तीनाथा
ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा
पाद्पद्मी ठेवा निरंतर||”
______ज्ञानेश्वर माउली

माउलीने आपले कमलनेत्र अलगद मिटून घेतले.

--भक्ती
२७/०२/२३

मुक्तकसाहित्यिकप्रकटनविचारआस्वाद

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

27 Feb 2023 - 10:59 pm | कर्नलतपस्वी

गो नी दांडेकर यांचे तुका आकाशा एवढा हे पुस्तक सुद्धा खुप सशक्त आहे. तुकाराम वाणी ते तुकाराम महाराज हा सर्व प्रवास अत्यंत साध्या सोप्या शब्दात जगनाडे महाराजांच्या तोडून वदवून घेतला आहे.

लेख आवडला. पुस्तक शोधून नक्कीच वाचेन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2023 - 8:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

गोनीदांच्या रसाळ शैलीत असणारी हीमोगरा फुलला, तुका आकाशाएव्हढा आणि आनंदवनभुवनी ही तिन्ही पुस्तके वाचणे म्हणजे एक प्रत्ययकारी अनुभवच आहे.
छान लिहित आहात.

कुमार१'s picture

7 Mar 2023 - 11:18 am | कुमार१

छान लिहिले आहे.