शहरी माणूस.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
23 Feb 2023 - 8:40 pm

सुरुवातीला गांगरलो, भोवळलो, घुसमटलो
पण...
आता रुळू लागलोय या वस्तीत.

किती दिवसात नाही पाहिलं चांदणं
काजव्यांच लुकलुकणं
चंद्राच्या अस्तित्वाचीच आता
येऊ लागलेय शंका
सूर्याचं उगवणं, मावळणं देखील
किती दिवसात अनुभवलेलं नाही.
इथे व्यवहार चालतो घड्याळाच्या काट्यावर
त्याच्या काट्यानुसार आमचं आयुष्य
सरकत असतं पुढं पुढं
माणसांच्या गर्दीत राहून सुद्धा असतो एकटा एकटा
आसपासच्या माणसाचं अस्तित्वसुद्धा
कळत नाही आतासं.
किंवा...
तशी गरजच भासत नाही कुणाला.

रस्त्यानं चालताना
भोवळ येऊन पडत कुणी…
क्षणभर माणसांचा घोळका
त्याच्याभोवती होतो गोळा
मीही सामील होतो त्यांच्यात
चुकचुकतो, हळहळतो
क्षणभरच…
आणि काढतो तिथून पाय आपल्या घड्याळाकडे पाहत
कुणालाच नको असतं कायद्याचं लचांड
आपल्या पाठीमागे
कुणालाच गुंतायचं नसतं कायद्याच्या गुंत्यात
रस्त्यावर घडणाऱ्या कुठल्याच भल्याबुऱ्या घाटनांशी
कुणी नातं जोडत नसतो इथे
आतासा मीसुद्धा होऊ लागलोय एक
खराखुरा शहरी माणूस.

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

चांगली कल्पना/विषय आहे कवितेचा. मात्र आणखी विस्तार करायला हवा असे वाटते. कवी मुळात शहरात का आला इथपासून शहरात आणखी भले-बुरे काय काय आहे ... वगैरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2023 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता. लिहिते राहा.

आपण भलं आणि आपलं काम भलं.
एवढ्यावरच नाही राहता येत.

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त सर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर मनःपूर्वक धन्यवाद