गंधीत आठवणी

सालदार's picture
सालदार in जनातलं, मनातलं
17 Feb 2023 - 12:27 pm

साधारण एप्रिल-मे महीन्यात परीक्षा आटोपत्या आलेल्या आणि सुटीची आतुरता लागलेली असायची. उन्हाळ्याच्या उकाड्यासोबतच सगळीकसे हवा कशी मोकळी वहात असे. अधुन मधुन घामाळलेल्या अंगावरुन एखादी हवेची झुळूक गेली की काय तो आनंद व्हायचा. पडवीत असलेले कडुलिंबाचे झाड उन्हाची दाहकता बर्‍याच अंशी कमी करायचे. आम्ही गल्लीतील सगळी मुले ह्या झाडाखालीच खेळायचो. उन्हाळ्याच्या त्या दिवसांचा गावाकडचा विशिष्ट असा गंध आजही माझ्या लक्षात आहे. उन्हाळा आला कि आजही मला तो गंध सुटीची आतुरता देऊन जातो. सुटीमधे चाखायला मिळणारे आंबे, कैरी यांचेही विशिष्ट वास मनात घर करुन आहेत.

आमच्या शेजारी सुतारकाम चालायचे आणि ते मी बर्‍याच वेळा न्याहळत रहायचो. मला त्या कामाचं खुप आकर्षण होतं. प्रत्येक लाकडाचा विशिष्ट असा वास. त्यात लाकुड ओले असेल तर वेगळा आणि कोरडे असेल तर वेगळा वास. आजही कधी मी लाकडाच्या वखारीकडुन किंवा सुतारकाम चालु असेल तेथुन गेलो तर मला तो जुना काळ आठवतो. आमच्या शेतात गायींचा गोठा होता, त्या गोठ्याचाही विशिष्ट असा वास माझ्या लक्षात आहे.

आपल्या आठवणींची जी टाईमलाईन असेल त्या टाईमलाईनवर दृश्य आठवणींसोबत ह्या गंधीत आठवणीही कोरल्या जातात हे नक्की. तुम्हाच्याकडेही अशा विशिष्ट गंधीत आठवणी असतील तर जरुर सांगा. तुम्हालाही विशिष्ट गंधासोबत विशिष्ट असा काळ आठवतो किंवा त्या काळात गेल्याचा भास होतो का?

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Feb 2023 - 12:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

नक्कीच!!
मानवी मेंदु हे एक अजब प्रकरण आहे. रंग्,रूप,वास्,चव्,स्पर्श्,ध्वनी असे सगळे मिळुन तो आठवणी तयार करतो, आणि पुढे त्यातीलच काही घटक एकत्र आले कि त्या त्या आठवणी जाग्या होतात.
१. माझी पहिली सायकल घ्यायला दुकानात गेलो असताना तिथे सगळे पॅकिंग, रबरी पार्टस वगैरे उघडतानाचा वास माझ्या डोक्यात इतका बसला होता की पुढे काही वर्षे तो वास आला की मला माझी सायकल आठवे.
२. विशिष्ट उदबत्ती किवा सेंट चा वास आल्यावर ते ते प्रसंग किवा ठिकाणे आठवतात.
३. ठराविक गाणी ऐकु आली की ठराविक व्यक्ती किवा प्रसंग आठवतात.
४. शेणाचा वास कुठेही आला तरी आमचे जुने घर आठवते. वाळक्या गवताचा विशिष्ट वास आला की सरत्या हिवाळ्यात केलेले अनेक सुंदर ट्रेक आठवतात.

असे अनेक.

गवि's picture

17 Feb 2023 - 1:26 pm | गवि

अगदी शंभर टक्के..

पेट्रोल किंवा डिझेल यांचा वास अनेकांना फार आवडतो. मीही त्यातील एक. काही लेखांमध्ये असं वाचलं होतं की हे कुठेतरी लहानपणीचे प्रवास, कौटुंबिक टूर्स यांच्याशी निगडीत असतं. खरं खोटं नक्की माहीत नाही.

त्याच प्रमाणे कॉलेजकाळात टाईमपास किंवा दुचाकी वाहन दुरुस्तीसाठी वाट बघताना म्हणून मी ज्या गॅरेजमध्ये बसत असे तिथला तो पेट्रोल, ग्रीस, धातूचे पार्टस्, ऑईल, कधी कधी तप्त इंजिन असा मिश्र वास कायमचा स्मृतीत गेला आहे. अगदी आताही मी वाहन सर्व्हिसिंगहून आणायला गेलो आणि वेटींग करावं लागलं तरी लगेच नाराज होत नाही. तो माहोल मस्त वाटतो, मुख्यत: गंधामुळे.

आणखी अनेक स्मृती असतात. सर्वच गंध हे सुगंध नसतात. शेवाळलेले पाणी, गोठ्यातले शेण आणि गुरांचा मिश्र वास. असे अनेक.

अगदी लहानपणी एका नातेवाईकांच्या न्यूज पेपर स्टॉलवर केवळ टाईमपास म्हणून बसायला जायचो (आणि हळूच किशोर, चंपक वगैरे चाळायचो) तेव्हाचा वर्तमानपत्राच्या कागद आणि शाईचा वास नाकात घुसत असे. तो फार सुखद नसेल पण आठवणीत कायमचा राहिला आहे.

बाकी केमिस्ट्री लॅबचे काय सांगावे? वासांचे भांडारच ते.

हायड्रोजन सल्फाईड, क्लोरीन, अमोनिया, स्पिरीट हे काही टॉप फेमस वास तिथले.

आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद.

सर टोबी's picture

17 Feb 2023 - 6:48 pm | सर टोबी

स्वतंत्र अस्तित्व नसते. त्या वास, चव, प्रसंग यांच्याशी घट्ट बांधलेल्या असतात आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींची पुनरावृत्ती झाली कि आठवणी आपसूक येतात. हि एक प्रकारे सर्व सजीवांचे रक्षण करणारी योजना असावी. एखादा होऊन गेलेला अपघात पुन्हा होऊ नये म्हणून तशा प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्यास आपण अधिक सजग होतो हा आठवणींचाच प्रताप.

माझ्या लहानपणी आजोळी दगडी कौलारू घर होते आणि स्वयंपाक घरात वातीचा स्टोव्ह वापरला जात असे. तो स्टोव्ह विझवला कि काजळी आणि रॉकेलचा एक विशिष्ट वास काही वेळ स्वयंपाक घरात भरून राहायचा जो मला खूप आवडायचा. एरव्ही देखील स्वयंपाक घरात गेलो कि तसाच पण मंद वास जाणवायचा. आज काँक्रीटच्या घरात आजोळची आठवण निघाली कि तो वास मला आठवतो. हा म्हणजे जागा आठवली कि शरीर पुन्हा त्या अनुभूतीची निर्मिती करीत असण्याचा प्रकार असावा.

स्यामन मासे म्हणे विणीच्या हंगामात त्यांचा जन्म जिथे झाला त्याच ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध पोहोत जातात आणि पिल्लाना जन्म देतात. आणि त्या ठिकाणाचा शोध ते वासाच्या मदतीने घेतात!

प्रसाद गोडबोले's picture

17 Feb 2023 - 7:52 pm | प्रसाद गोडबोले

माझ्याकडे पारिजातकाचे अत्तर होते. अत्तराचा प्रोब्लेम असा असतो कि, अत्तर ऑइल बेस्ड असल्याने डायरेक्ट कपड्यांवर लावता येत नाही , उलट शरीरावर लावता येते अन मंद सुगंध दीर्घकाळ टिकतो ही.

हां तर एकदा ह्या अत्तराच्या नादात बेक्कार पकडलो गेलो असतो. त्या आठवणी जाग्या झाल्या ;)

हां तर एकदा ह्या अत्तराच्या नादात बेक्कार पकडलो गेलो असतो. त्या आठवणी जाग्या झाल्या ;)

रोचक.

तपशील प्लीज.

धन्यवाद..

मदनबाण's picture

17 Feb 2023 - 10:23 pm | मदनबाण

मला याची विशेष आवड आहे,जसे जमेल तसे माझ्या कलेक्शन मध्ये भर घालतं असतो. हल्लीच यात बरीच भर पडली आहे, त्यातली काही देतो.
१]जस्मिन २] कदंब ३] हरीशृंगार म्हणजेच पारिजातक आणि क्लोन मध्ये १] Chanel's Blue [ Bleu de Chanel ] २] Invictus बाकी या सुगंधाचा शोध घेताना मला Marilyn and N°5 कळले. :)


जाता जाता :-
आज मिपावर मला 15 years 12 hours पूर्ण झाल्याचे समजले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tayc - N'y pense plus

हरीशृंगार म्हणजेच पारिजातक
हे हरसिंगार असे आहे, माझ्या डोक्यात हरीचं बसले आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gudilo Badilo Full VideoSong |DJ Duvvada Jagannadham ||

कानडाऊ योगेशु's picture

17 Feb 2023 - 7:54 pm | कानडाऊ योगेशु

लहानपणी रेल्वे प्रवासाचे आणि त्यातल्या त्यात रेल्वेतुन डोंबिवलीला जाण्याचे फार आकर्षण असायचे.डोंबिवलीतली प्रत्येक गोष्टीचे अप्रूप वाटायचे. त्याकाळातच गटारे भूमिगत करण्याचे काम चालु होते आणि गटारांचा वास नेहेमी वातावरणात असायचा. पण बालपणी त्या शहराचेच एकुण वाटणारे कुतुहुल इतके जास्त होते कि तो वास कधी दुर्गंध वाटला नाही. आजही असा गटाराचा वास आला कि एकदम त्या वयात गेल्यासारखे वाटते आणि ती मनस्थिती (कुतुहल /हुरहुर) अनुभवायला येते. विशेष म्हणजे नंतरच्या काळात कामधंद्यानिमित्त काही वर्ष डोंबिवलीत मुक्कामालाही होतो पण त्याकाळातली डोंबिवली नंतर पुन्हा अनुभवता आलीच नाही.फक्त आठवणीतुनच अनुभवता येते.
हीच गोष्ट आजोळला गेल्यावरची. राहुरी फॅक्टरीला माझे आजोळ होते आणि संध्याकाळी नेहेमी उसाच्या मळीचा वास यायचा तो ही इतका आठवणीत भिनला आहे कि आता कधी मळीचा तु परिचित वास आला कि मन राहुरी फॅक्टरीत जाते.

सुबोध खरे's picture

17 Feb 2023 - 8:18 pm | सुबोध खरे

https://www.misalpav.com/node/25432
https://www.misalpav.com/node/25466

गंध या विषयावर मी अगोदर केलेले लेखन

तर्कवादी's picture

22 Feb 2023 - 10:19 pm | तर्कवादी

लहानपणी मी उन्हाळी सुटीत आजोळी अहमदनगरला रहायला जायचो. अतिशय जुन्या अशा त्या घरातले नहाणीघर पुर्णतः बंदिस्त असे नव्हते. त्यामुळे सगळ्याच्या आंघोळी झाल्या की आई/आजी कपडे धुवायला घेत तेव्हा कपडे धुण्याच्या पिवळ्या साबणाचा वास सगळीकडे पसरे. आमच्या घरी व्हील किंवा तत्सम डिटर्जंट साबण वापरला जायचा त्यामुळे या पिवळ्या साबणाचा गंध माझ्यासाठी अनोखा असे. तसेच आजोळच्या त्या घरासमोर एक मोठा सार्वजनिक हौद होता तिथे जवळपासच्या काही बायका सकाळी कपडे धुत त्यापण बहुधा असेच पिवळे साबण जास्त वापरत असाव्यात कारण या हौदाकडूनही तसाच वास यायचा.
आताही अनेक वर्षानंतर क्वचित कधी कुठे तसल्या पिवळ्या साबणाचा वास आला की आजोळच्या आठवणी जाग्या होतात.

कंजूस's picture

23 Feb 2023 - 6:59 am | कंजूस

गंधाचे एक उदाहरण. मोती साबणाची जाहिरात यावरच टिकून आहे.

सिरुसेरि's picture

23 Feb 2023 - 2:30 pm | सिरुसेरि

गंध या विषयावरील हा लेख आठवला . https://www.misalpav.com/node/47167