वेताळ टेकडी-ए आर ए आय टेकडीचा सत्यानाश

अनंतफंदी's picture
अनंतफंदी in जनातलं, मनातलं
6 Feb 2023 - 3:24 pm

संध्याकाळी पाय मोकळे करावे म्हणुन म्हटले जरा लांबवर फिरायला जावे. कौतुकाने कोथरुडच्या वेताळ टेकडी/परमहंस्/ए आर ए आय टेकडीवर फिरायला गेलो. बरीच मंडळी वरच्या दिशेने चढत होती. चढावर तुरळक झाडी होती. पण म्हटले सध्या हिवाळा आहे, पावसाळ्यात पुन्हा हिरवेगार होईलच की. वर जाऊन भिंतीपलीकडे गेलो मात्र सगळी कडे धूर पसरलेला दिसत होता. कोथरुड कचरा डेपो एका बाजुला असल्याने पहीले वाटले त्याचा- धूर असावा. पण नाही, पुढे गेल्यावर लक्षात आले की काही हौशी थेरडे मुद्दाम थिकठिकाणी गवत एकत्र करुन जाळत होते. विचारले का? तर म्हणे आम्ही ईथे खूप झाडे लावली आहेत, ती जागा मोकळी व्हावी म्हणुन. पण आमचे "कंट्रोल्ड बर्निंग " असते म्हणे. म्हणाजे काय? त्यांनाच ठावे. त्या धगीपासुन कशीतरी सुटका मिळवुन पुढे गेलो तर जागोजागी हीच परिस्थिती.
1

3

गवताचे पट्टे च्या पट्टे जाळलेले, धुमसत असलेले. त्यात किती किडे ,मुंग्या, अळ्या मरुन गेले/गेल्या असतील पत्ताच नाही. अजुन पुढे जे सी बी ने काहीतरी खोदकाम चालु होते, त्याला विचारले हे काय काम बाबा? तर म्हणे ही पुर्वीची परदेशी झाडे खुप वाढलीत, ती उपटुन त्या जागी देशी झाडे लावायची आहेत.
2

या उद्योगात चांगली दम धरलेली झाडेही हाळ लागुन जळत आहेत.
4
एक बाजु मागच्या काही वर्षात मेट्रोच्या डेपोने खाल्लीच आहे, अक्षरशः त्या बाजुचा लचका तोडलाय. पावसाळ्यात लँड स्लाईड होण्याची दाट शक्यता.

दुसर्‍या बाजुने बंगल्यांची कुंपणे वरपर्यंत सरकत आली आहेत. थोडक्यात काय? टेकडी जणु काही अखेरच्या घटका मोजतेय. आपल्या मुलांसठी कदाचित तिचे फोटोच शिल्लक असतील, असा विचार करुन काही फोटो काढले आणि खिन्न मनाने खाली आलो. (समाप्त)

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

तर्कवादी's picture

6 Feb 2023 - 5:09 pm | तर्कवादी

दुसर्‍या बाजुने बंगल्यांची कुंपणे वरपर्यंत सरकत आली आहेत. थोडक्यात काय? टेकडी जणु काही अखेरच्या घटका मोजतेय. आपल्या मुलांसठी कदाचित तिचे फोटोच शिल्लक असतील, असा विचार करुन काही फोटो काढले आणि खिन्न मनाने खाली आलो. (समाप्त)

टेकडी सपाट होण्यापुर्वी टेकडीचाही फोटो काढून ठेवा !!
तीन महिन्यांपुर्वी माझे बंगळूरला जाणे झाले तेव्हा तिथे त्याआधी पुण्यात काही वर्षे राहिलेला आणि आता एखाद वर्षापासुन बंगळुर मध्ये असलेला आमचा जुना सहकारी भेटला तेव्हा तो म्हणाला बंगळूरमध्ये खूप झाडे आहेत, पुण्यापेक्षा जास्त. तेव्हा ते काही खरे वाटले नाही पण नंतर त्याच्या बोलण्यात तथ्य असल्याचे जाणवले. फार काय ब्रिगेड टेक गार्डन या परिसरातल्या कार्यालयात आम्ही जात होतो (आमच्या ग्राहकाच्या कार्यालयात) त्या परिसरातही खूप जुनी झाडे असल्याचे जाणवले, नकळत हिंजवडी फेज १ मधल्या क्युबिक्स आयटी पार्कशी (ब्ल्यु रिज) तुलना केली गेली. क्युबिक्समध्ये फक्त मुद्दाम शोभेसाठी लावलेली झाडे/फुलझाडे वगैरे आहेत, नैसर्गिक वृक्षसंपदा अजिबात नाही. बंगळूरमध्ये मी फार जास्त फिरलो नसलो तरी प्रथमदर्शनी मत बनले आहे की वृक्षसंपदा बर्‍यापैकी जतन करुनही विकास केला जावू शकतो याचे उदाहरण तिथे दिसते.

कर्नलतपस्वी's picture

6 Feb 2023 - 6:03 pm | कर्नलतपस्वी

पुर्वी म्हणजे सन सत्तरच्या आगोदर पौड रस्त्यावरील सैनीक काॅलोनी मधे मित्राकडे जाताना एम ई एस ते नळस्टाॅप असा चढ होता. सायकलवर दम लागायचा. एकुलती एक काॅलोनी होती. सरकारने माजी सैनीकाना वसाहती करता जागा दिली होती. आता जायचे तर सापडत नाही. एम आय टी काॅलेज जवळच कुठे आहे म्हणतात.

लोकसंख्येत वाढ झाली आणी पर्यावरणात घट.

कालाय तस्मै नमः

रामचंद्र's picture

6 Feb 2023 - 6:06 pm | रामचंद्र

तिथं स्थानिक नसलेल्या प्रजातींची झाडे बरीच आहेत हे खरंच पण आगी लावून नष्ट करण्याचा प्रकार अघोरी वाटतो. त्यापेक्षा सिम्बायोसिस-बीएमसीसी टेकडीवर काहीजण (सर्व वयाचे) अशी जाळपोळ न करता चिकाटीने देशी झाडे लावून ती जपत आहेत ते अनुकरणीय आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

6 Feb 2023 - 8:33 pm | हणमंतअण्णा शंकर...

कधी कधी आवश्यक असते विशेषतः वणव्याची भिती असेल तर कन्ट्रोल्ड बर्निंग करून चरे पाडतात जेणेकरून जंगल पेटले तर वणवा बंदिस्त राहावा आणि लवकर विझवता यावा.

परंतु वरील प्रकार करणार्‍या महाशयांना मियावाकी गार्डन नावाची आता भारता सगळीकडे रूळलेली पद्धत ठाऊक नाही असते दिसते. अशा मूर्खांनाच कंट्रोल्ड पद्धतीने सहारात प्लँट करावे.

या टेकडीचा माझा अनुभव :

पानगळ झालेल्या झाडांना सुकली म्हणून मिठ्या मारून पाणी घालणारे एक 'कपल' पाहिले आणि मला व माझ्या दोस्ताला हसू की रडू हे कळेना.

याव्यतिरिक्त दुसर्‍या एका टेकडीचा माझा अनुभव :

मला एकदा अचानक 'रोज एक झाड' नावाची कल्पना सुचली. म्हणजे वर्षभर रोज एक झाड लावायचेच. तशी एक चळवळ उभी करायची म्हणजे पन्नास माणसांनी हे व्रत घेतले तर रोज पन्नास झाडे लावून होतील. त्या हिशोबाने ३००*५० = १५००० झाडे एका वर्षात लावून होतील आणि एकतरी टेकडी एका वर्षात बर्‍यापैकी हिरवी होऊ शकेल. म्हणून मी नर्सरीतून पाच 'भारतीय' झाडे आणली. सोसायटीच्या वॉट्सग्रुपात जाहिरात केली. करके देखो असं एक थोर महात्मा सांगून गेलेत त्यामुळे फार विचार केला नाही. म्हंटलं, पुण्यात पाऊस बराच आहे तर सर्वसाधारण वडा पिंपळासारखी झाडे जगतीलच. झाडे रुजावीत म्हणून जून हा महिना निवडला.

पश्चिम पुण्याजवळ सिंबायोसिस जवळची एक टेकडी होती.

तीन दिवशी मी उत्साहाने टेकडीच्या मध्यभागावर झाडे लावली. त्याचे फोटो टाकले. सोसायटीतल्या एकाने इंटरेस्ट दाखवला. त्यानेही मग काही झाडे विकत घेतली.

चौथ्या दिवशी सकाळी दारावर टकटक झाली.
क्ष्क्ष्क्ष्क्ष चांदेरे नामक तिथले गुंठामंत्री दोन जवानमर्द पोरं घेऊन घरी आली. घरी मी एकटाच होतो.

गुंठामंत्री स्पष्ट म्हणाला - तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो तुमच्या जागेत घाला.
मी म्हणालो - जिथे मार्किंग नाही तिथून मी झाडे लावत आहे. जर उद्या तीही जागा डेव्हलप करायची असेल तर नंतर झाडे काढून टाकता येतील. मी अतिक्रमण करत नाही.
एक जवानमर्द म्हणाला - ए भोसडीच्या सरळ सांगितलेलं कळत नाही का?
गुंठामंत्री त्याला खोटं खोटं थांबवत म्हणाला - मी बोलतोय की, तू कशाला आवाज चढवतोय?
गुंठामंत्री मला - हे बघ बाळा, तू अजून लहान आहेस म्हणून तुला मायेने सांगतोय. लग्न झालंय का? घरी बायकोपोरं आहेत का? गावात सुखानं राहायचं आहे का नाही? नको ते धंदे करू नकोस. जा ती झाडं उपटून ये संध्याकाळपर्यंत. बघतोय मी तुला जातायेता टू व्हीलर वर.

अर्थात त्या टेकडीवर मी अतिक्रमण करत आहे म्हणून मी घाबरून ती झाडे उपटून आलो.
नंतर ती टेकडी व्यवस्थित कातरून तिथे एक मोठे अ‍ॅडवेंचर पार्क झाले. मी लावलेली झाडं ही वनजमिनीवरच होती हेही मला नंतर कळाले.

अशा पद्धतीने हात दाखवून अवलक्षण केले आणि अर्थात नंतर हळूच देश सोडला.

रामचंद्र's picture

7 Feb 2023 - 12:18 am | रामचंद्र

ती टेकडी बहुतेक हिंजवडी भागातली असावी. सदर असामी कोण असावी याची अंधुक कल्पना आली.

पानगळ झालेल्या झाडांना सुकली म्हणून मिठ्या मारून पाणी घालणारे एक 'कपल' पाहिले आणि मला व माझ्या दोस्ताला हसू की रडू हे कळेना.

श्री हणमंतअण्णा शंकर.., माहितीसाठी धन्यवाद.
नक्की कोणाल्या मिठ्या मारल्या होत्या? झाडांना मिठ्या मारणारी चिपको चळवळ प्रशिध्द आहे.

गुंठामंत्री मला - हे बघ बाळा, तू अजून लहान आहेस म्हणून तुला मायेने सांगतोय. लग्न झालंय का? घरी बायकोपोरं आहेत का? गावात सुखानं राहायचं आहे का नाही? नको ते धंदे करू नकोस. जा ती झाडं उपटून ये संध्याकाळपर्यंत. बघतोय मी तुला जातायेता टू व्हीलर वर.

असली धमकी दिली आहे, ते सांगायला पोलिसात गेले असता तर तुमच्यावर पोलिस फिदीफिदी हसले असते. असो-