मंटी बिंटी आणि घंटी

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
1 Jan 2023 - 2:43 pm

मंटी बिंटी आणि घंटी
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मला प्राणी आवडत नाहीत अन हिने मांजर पाळलं . म्हणजे माझं काय झालं असेल ?...ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांनाच माझं दुःख कळू शकेल .
पापी पेटका सवाल साला ! हुं ! पेट !
एवढी मोठी बाई ! जी नवऱ्याला नाचवू शकते, ट्रेन करू शकते,गोंडा घोळायला लावू शकते, ती उगा एखाद्या प्राण्याच्या मागे का लागावी? तेही मी असताना ! तिला प्राण्यांची फार आवड आहे , फार कळवळा आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. खरं कारण वेगळंच होतं.
तर हिने मांजर पाळलं . पण हिला विरोध कसा करणार ? म्हणजे हिने उद्या एकशिंगी गेंडा जरी पाळला तरी हिला विरोध कसा करणार ? उगा कोपऱ्यात पडून रहावं लागेल ना ... कबूल करा न करा. घरोघरी मातीच्याच चुली ! तुमचंही तसंच असेल आणि मुळात नवरा हे बायकोचं पेटच असतं !...
आमच्या सोसायटीमध्ये, समोरच्या बिल्डिंगमध्ये रचना रहाते . रचना मतलब वो चीज , जिची रचना देवाने अगदी मन लावून केलीये. असं सगळ्या पुरुषमंडळींचं मत आहे. बायकांना विचारलं तर ते मत जुळणार नाही. पण जगात कुठलीही गोष्ट परिपूर्ण नसते . तिच्या बाबतीतही एक खोट आहे . तिच्या नवऱ्याचं थोबाड म्हणजे बुलडॉगशी स्पर्धाच ! हे सोसायटीतल्या पुरुषांचं मत. फुका जळतात साले ! हे मत मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं , तेव्हा लगेच नेटवर चेक केलं आणि मला ते अगदी पटलं. चालायचंच . हा जगाचा नियमच आहे. नाजूक पमेरिअनना बुलडॉग का आवडावेत ? ही गोष्ट न कळण्याच्या पलीकडची आहे .
आणि त्या बुलडॉगला नको तिथे तोंड घालून भुंकायची सवयच आहे . तसं - माणसांचं प्राण्यांशी जमत नाही म्हणतात ... रचनाचंही त्याच्याशी फार जमत नाही म्हणतात .
पण तो बुलडॉग असला तरी - बाहेर . घरी मात्र त्याची मांजरच आहे . म्यांव ! ...
रचना तिची रचना नेहमीच छान ठेवते. बिघडवत नाहीच. ती दिसते सुंदर, रहाते नखरेल. पण एवढंच नाही , तिच्या अंगात एक खोड आहे. तिला ना इतर बायकांना जळवायला फार आवडतं. जे काही करेल त्याची जाहिरात करायला, त्याचं गुणगान गायला, ते कसं भारी आहे हे पटवून द्यायला तिचं थोबाड - सॉरी , तिचं मुखकमल दमत नाही. ती साध्याशा वस्तूचंही असं गुणगान गाते की बस . मग भारी असेल तर विचारायलाच नको .बायका तिच्यावर जळून घेतात . तिच्या नावाने खडे फोडतात. अन तिलाच फॉलो करतात . म्हणजे तिने सुंदरशी पैठणी नेसली तर पुरुषमंडळी त्याचा आनंद लुटतात. म्हणजे त्या वस्त्राचाही अन त्या वस्त्रधारिणीचाही . म्हणजे त्यांना लगेच असं वाटत नाही कि आपणही एखादी पैठणी नेसावी . पण बायकांचं तसं नसतं.
एवढ्यात मला एक पैठणी घ्यावी लागली. गडद जांभळ्या रंगाची . महागाची . म्हणजे तुम्हाला कळलं असेलच कि रचनाने पैठणी घेतली म्हणून. नंतर त्या दुकानदाराला आमच्या सोसायटीतली बरीच पैठणीची गिऱ्हाईकं मिळाली, हे तुम्ही चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच.
माझी बायको गोड असली तरी तीही त्याच बायकांमध्ये मोडते .
पण रचनाची अशी काही ना काही नाटकं चालू असतात. मध्ये तिने केस कापले, खांद्यापर्यंत . मग पार्लरवालीचा धंदा जोरात. काही स्मार्ट बायकांनी तर पार वेण्यांचा बॉयकटच केला. तिच्यावर कडी करायला. हे म्हणजे अति होतं... आता उद्या ती शॉर्टस घालून फिरायला लागल्यावर ह्या कशावर फिरणार ?... असो शॉर्ट्सची कल्पना छान आहे. तिची रचना मेंटेन्ड आहे. बाकी बायकांना आधी जिमवाल्याचा धंदा वाढवावा लागेल.
तर तिने एवढ्यात एक मांजर पाळली. ती प्राणीप्रेमी आहे , हे नव्हतं माहिती. नाहीतर सोसायटीत नसलेली शेपटी हलवणारे बरेच प्राणी आहेत. एखादा काळी जादूवाला जादूगार असता तर तिच्या मांजराचं रूप धारण करायला बरेच जण चार पायावर तयार झाले असते !
कुठूनतरी एक मांजर आली. मोठी होती. बिस्किटाच्या रंगाची. ती रचनाने पाळली. मग काय ? आमच्या हिला मांजर पाळण्याची बुद्धी झाली. कारण इतर बऱ्याच बायकांनी लगेच कोणकोणते प्राणी, पक्षी पाळले . नेहाचं नवऱ्याशी जरा पटत नाही , तिने लव्हबर्ड्स पाळले . पाटीलकाकूंनी काकाबुवाचं न ऐकता काकाकुवा पाळला . ढमालेताईंनी मकाव पाळला . खरं तर त्यांनी साळींदर पाळायला पाहिजे होतं कारण त्यांचे कापलेले केस तसेच पिंजारलेले असतात . किंवा त्यांचा नवरा दळींदर आहे म्हणून . अन त्याच्या अंगाचा साळींदरासारखा वास येतो असा मला दाट संशय आहे . अर्थात , मी काही जवळून वास घेतलेला नाही . काकांचा नाही हो साळींदराचा ! पण दळींदर ढमाले पॅसेजमधून गेले तरी घरी बसून कळतं , ते आल्याचं .
त्यानंतर दोन दिवसांनी हिला एक बोका दिसला. हिने त्याला बोलावलं तर तो आला. हिने त्याला खायला - प्यायला घातलं तर तो आला हिच्या मागे. हिला तर कोणीही भुलतं ... म्हणून तर मीही .
तो आला ही दुपारची गोष्ट. संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आलो अन बसलो सोफ्यावर. मला काय माहिती ? दुसऱ्या क्षणाला “ आई गं.. “ करून किंचाळलो . बोकोबांनी एक पंजा ठेवून दिला होता . ओरबाडलं होतं साल्याने, माझ्या बुडावर !. बोकोबा तिथे लोळत पडले होते, मी त्यांच्या सुखसमाधीत व्यत्यय आणला होता.
मी त्याच्या शेपटीवर बसलो होतो. पुढचे चार दिवस अंघोळीच्या वेळी साबण लावताना चुरचुरत होतं. खारीच्या पाठीवर रामाची बोटं उमटावीत तसं झालं होतं . पण मला काही तिथे खारीसारखे केस नाहीत हं. त्यात ती काही पाठ नव्हती अन तो काही राम नव्हता .
तेव्हा मी त्या शहाण्याला पाहिलं . काळ्या - पांढऱ्या रंगाचा गब्दुल बोका होता तो. मस्तवालपणा तर त्याच्या नजरेतच भरला होता.
माझ्या ओरडण्याने ही आली की लगेच पळत बाहेर.
“ अहो, काय हे ? जरा बघून बसा ना .तिथे मंटी बसलायना . मुका जीव .”
च्यायला ! पंजा मारला त्याने. अन हिचं भलतंच. माझा जीव मुकाट्याने कळवळला .
मला त्या मंट्यासारखी नखं असती ना, तर मी हिला...साबण लावताना आठ दिवस चुरचुरेल असा पंजा....
अन या प्राण्यांचं कौतुक किती असतं बघा. अर्ध्या दिवसात त्याचं नामकरणही झालं होतं. म्हणे मंटी ! तो मंटी आणि ही आंटी ! त्याचे लाड सुरु झाले. अतोनात लाड !
बघा ना , नशीब कसं असतं . नाहीतर माझं .
तो एक नंबरचा आगावू होता. मी तर त्याच्या वाटेला जायचोच नाही. एक बनपाव ओरबाडून झाला होता ; तर उगा दुसरा बनपाव कशाला पुढे करायचा ?....
मंट्या दिवसभर लोळायचा . वाट्टेल तिथे. सोफा, दिवाण, टेबल, खुर्ची , हिने वाट्टेल तसे टाकलेले आणि आळशीपणामुळे मी घड्या न घालून ठेवलेले कपडे , पायपुसणं. नुसती मजाच साल्याची. ही मार्जार मंडळी आयुष्याचा बहुतेक काळ झोपण्यात घालवतात. कित्ती छान ! मला त्या मंट्याची ही गोष्ट फारच आवडली. मलाही असं लोळायला फार आवडतं. अगदी पायपुसण्यावर नाही ,पण इथेतिथे. पण त्याचं चालायचं . माझं नाही. मी लोळलो तर हिला आवडत नाही.
बरं, मंट्या दिवसभर खादाडणार , लोळणार अन रात्रीचा बोंबलत बाहेर. शहेनशहाच जसा रात्रीचा. दुसऱ्या दिवशी ओरबाडलेल्या तोंडाने हजर. दुसऱ्या बोक्यांशी भांडणं रात्रीची... मांजरांवरून !
तो एक ‘ अँग्री यंग बोका ‘ होता. सामान्य माणसाला जे करावंसं वाटतं पण तो ते करू शकत नाही . तेच हिरो करतो अन लोकांच्या गळ्यातला ताईत होतो. तसाच हा मंट्या ! तो त्या रात्रीच्या मारामारीच्या खुणा मिरवत यायचा. जे आपण माणसांच्या राज्यात करत नाही , ते हा मांजरांच्या राज्यात रोजच करायचा. रात्रीचं हिंडणं , बोक्यांशी भांडणं, मांजरींवरनं राडा. बोकोत्तमच तो ! मला त्याचं तेही फार आवडायचं.
अन एवढंच नाही. हिला त्याची काळजी वाटणार, ही त्याच्याशी लाडेलाडे बोलणार, त्याला कुरवाळणार, त्याच्या जखमांवर पावडर लावणार. जसा काही हिरोच तो !
माझं डोकं ठणाणा दुखत असलं तरी मला मात्र स्वतः च्या हाताने रुमाल बांधून गप पडावं लागतं.
पण ही मांजरं काही एकनिष्ठ नसतात – माझ्यासारखी ! मंट्या एके दिवशी गायब झाला तो परत उगवलाच नाही.माझ्या मनात आनंदाची झुळझूळ तर हिची हुळहूळ .
पण हा आनंद थोडा काळच टिकणार होता. एक म्हणता दुसरंच काहीतरी समोर उभं राहतं.रचनाचं मांजरही गोड होतं. ते बहुतेक कोणीतरी पळवलं. तिला त्याचं वाईट वाटलं आणि मला तिचं !...तिचं मांजर हरवल्यावर तिला किती दुःख झालं असेल ते मी समजू शकत होतो.
------
रविवारची सकाळ होती. सकाळचे आठ वाजले असावेत. असावेत कारण मी तर लोळत पडलो होतो. आणि जे बेडवरुन उठून खाली पडलोय म्हणता. कारण-
माझ्या गालाला ओलं नाक लागलं होतं .
“ ए , बाजूला हो. तुझ्यामुळे मला सर्दी होईल. ओलं नाक घासू नकोस. हा कसला लाड ? “मी मिटल्या डोळ्यांनी हिला ओरडलो.
त्यावर ही कुईकुई ओरडल्याचा आणि मग हिच्या हसण्याचा आवाज आला. मेरी बीवी - पहले कुत्ती बादमे डायन ? मी घाबरून ,खाडकन डोळे उघडले. तर बेडवर कुत्र्याचं पिल्लू . ते पाहूनच मी खाली पडलो होतो .
आता हे काय नवीन ? मी मनात म्हणालो.
“अहो, बघा ना कित्ती गोड आहे ! मला ही आत्ता सापडली रस्त्यावर .”
पिल्लू होतं छान. बदामी रंगाचं. गोड, गुबगुबीत. हळू आवाजात कुईकुई ओरडणारं. तिने त्याला जवळ घेतलं . कुरवाळलं.
“अस्सं? त्या रचनाने काय पाळलंय? “ माझ्या अचूक न खोचक प्रश्नाकडे तिचं पूर्ण लक्ष गेलं नाही.
“ तिने? तिनेही एक पिल्लू पाळलंय . कुत्र्याचं .”
“हं...! माझा अंदाज बरोबर होता. मग तिची पेटली.
“ तिच्या कुत्र्याचं काय ? नुसता काळुराम ! आपला डॉगी बघा ना . तिच्यापेक्षा भारी आहे ! “
खाली पडलो तरी मी लोळतच होतो . त्या पिल्लाने पुन्हा एकदा मला ओलं नाक पुसलं तसा मी उठलोच .
मग बिंटीचं हुंदडणं आमच्या घरात सुरु झालं. तिचंही लगेच नामकरण झालं . बिंटी ! तिचाही काय लाड ! तिला जवळ घेणं , कुरवाळणं, लाडेलाडे बोलणं , तिचा पा घेणं , तिचे केस विंचरणं. तिला स्पेशल डॉगफ़ूड.
माझा तर ते पाहून स्वतःबद्दलचा विश्वासच डळमळला.
बिंटीची एक गंमत होती. ती टॉयलेटमध्ये विधी न करता बाहेर पायपुसण्यावर करायची. अन नेमका माझा पाय त्याच्यावर पडायचा. असाच एकदा केकवॉक झाल्यावर मी तिला ओरडलो ; तर हिला कसला राग आला.
“ तिला कशाला ओरडता ? तुम्हाला बघून पाय टाकता येत नाही का ? मुका जीव आहे तो.”
माझा जीव पुन्हा मुकाट्याने कळवळला.
-----
नंतर तीन गोष्टी घडल्या, एक चांगली, एक वाईट आणि पुन्हा एक चांगली.
हिची आई आमच्याकडे आली होती. तिचा पाय बिंटीपायमध्ये असाच भरला. कित्ती मज्जा ! म्हातारीला असंच पाहिजे. ही चांगली गोष्ट.
पण तेव्हा ही बिंटीलाच रागवली. चक्क !
“बिनटे, काय हा घाणेरडेपणा. तुला कळत नाही ?”
मग हिची आई म्हणाली,” अगं, रागवू नकोस तिला. मुका जीव . त्यांनाही सवय लावावी लागते.त्यांना रोज सकाळी बाहेर फिरवावं लागतं.”
माझा जीव मुकाट्याने कळवळला .
झालं ! मी रोज सकाळी वॉकला जातो. तर हे काम माझ्या गळ्यात येऊन पडलं . ही वाईट गोष्ट . आणि चांगली गोष्ट ?.....रचना पण तिच्या जॅकला घेऊन सकाळी फिरायला यायची. पण ते नंतर कळलं . ही खूपच चांगली गोष्ट होती. !.
मला प्राणी आवडत नाहीत हे एक आणि माझं चालणं बोंबलायला लागलं हे दुसरं . वॉक आणि भॉक दोन्हीचा आनंदच . बिंटी काही धड चालायची नाही. वाटेत शंभरदा थांबायची . कुठेही शी – सू . ती त्यासाठी अशी बसली की - लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघायचे. जसं काही मीच ...इतर कुत्री मागे लागायची. भुंकायची . माझी तारांबळ व्हायची. पण पुढे जमायला लागलं. इतकं की एकदा त्या कुत्त्या कमीन्यांना हाकलताना मी ‘ भॉ भॉ भॉक ‘ करून ओरडलो .
माझं वॉक रहायला लागलं. तसं मी एक काम करायचं ठरवलं . थोडं लवकर उठून बिंटीला फिरवायचं. तिला घरी सोडायचं आणि मग पुन्हा वॉक .
पहिलाच दिवस. आमच्या सोसायटीसमोर छानसं मैदान आहे . झाडंबिडं असलेलं . मी बिंटीला नेलं . तर ग्राऊंडवर रचना ! … जॅकला घेऊन . माझी वेळ बदलल्याने ही गंमत घडून आली होती.
मग आमची गाठ होऊ लागली. स्मितहास्याची देवाणघेवाण होऊ लागली. मग बिंटी आणि जॅकबद्दल गप्पा होऊ लागल्या. बिंटीला जॅक भेटल्यावर आनंद व्हायचा अन मलाही ...
तिने सांगावं ,” जॅक कित्ती चांगला आहे. “
च्यायला ! स्वतःचा तो डॉगी अन दुसऱ्याच ते कुत्रं. त्यात तिला चढवून सांगायची खोडच . पण सुंदर स्त्रियांच्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं.
मग मीही सांगायचो ,” बिंटी माझ्यावाचून जरा रहात नाही !.”
खरं तर बिंटी खूप हुशार होती. ती तिच्या मालकिणीला धरून रहायची. तिला माझ्याशी काही घेणं नव्हतं. एक सकाळचं हे फिरवणं सोडलं तर .
पण आमच्या मग इतरही गप्पा व्हायला लागल्या. त्यामुळे मला बिंटी आवडायला लागली आणि तिला फिरवण्याचं कामही . आणि एके दिवशी ?... सोसायटीतल्या जळक्या पुरुषांनी आमच्या दोघांच्या भेटी आणि गप्पांबद्दल त्यांच्या बायकांना आणि त्या बायकांनी ही गोष्ट हिला सांगितली, असं तुम्हाला वाटत असेल. पण नाही. तसं झालं असतं तर ती आग असती . पण जे होऊ घातलं होतं , तो मात्र फुफाटा होता ! ...
त्या दिवशी सकाळ मस्त होती . त्यामुळे की काय , रचना अधिकच छान दिसत होती. जॅक आणि बिंटी पळापळी करत होते . ते बघून मलाही हिंदी सिनेमासारखी पळापळी करावीशी वाटत होती - रचनाबरोबर !
त्यावेळी एक छपरी पोरगं आमच्याजवळ आलं . चित्रविचित्र वाढवलेले , रंगवलेले केस . अंगाने बोंबील . रंगीबेरंगी कपडे . पँटचं कापड खाली लांबीला पुरलं नव्हतं . असा भारी अवतार !
तो म्हणाला , “ ए भिडू , ये अपना भाईका कुत्ता है . “
खरं म्हणजे तोच ‘ भाईका कुत्ता ‘ वाटत होता .
“ कोण भाई ? “
“ घंटीभाई ! “
डोक्यात टण्णकन घंटा वाजली. घंटीभाई फेमस होता. जो त्याच्याशी पंगा घेईल तो त्याची शेवटची घंटा वाजवायचा की एक्झिट !
“ हा पिल्लू पेट हाय त्याचा “
“घंटीभाईचं पेट ? असं केसाळ ? “ मी खवचटपणे विचारलं. त्यावर रचना खुद्कन हसली.
“ए , शानपत्ती नाय झाडायची, कळलं ना ? नायतर घंटीभाई तुझ्या पोटाची घंटी करेल . टोल हाय आधीच ... हे दोगंबी आमच्या भाईचे पेट आहेत. हिचं नाव मारी अन हा जुआना. “
च्या मारी ! ही जिला बिंटी म्हणत होती तिचं खरं नाव मारी होतं तर आणि जॅकचं जुआना .
“ एक हप्ता झाला ह्यांला शोधतोय . साला ! एखाद्याची घंटा वाजवणं सोपंय यार ! पण हे काम ?.... कुत्ते सुंघतात तसा आम्ही सगळा एरिया झाडला ना यार ! पार दुसऱ्या गँगच्या एरियातबी घुसलो ,” त्याची टणटण चालू होती.
“बरं बरं . छोटा घंटी....”
“ए,” तो गरजला , “ मी छोटा घंटी नाय. ओक्के ? मी बेल आयकॉन हाय.”
च्या मारी ! मला त्या बेल आयकॉनला दाबायची इच्छा झाली.
तो बेल्या पुढे म्हणाला ,” हे दोन्ही बच्चा आमाला पायजेल.”
“बरं बरं घेऊन जा,” मी म्हणालो.
“घेऊन जा नाय. ओक्के ? तू आणून सोडायचं आमच्या अड्ड्यावर “
“चालेल चालेल ,” रचना त्याला म्हणाली , “घेऊन जा तुम्ही दोन्ही पिल्लांना “.
घेऊन जा ? मला वाटलं , तीही येईल माझ्याबरोबर खरंतर . पण कसलं काय ?
माझ्या मुद्रेकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली, “ हे सोडतील दोघांना. बेलभाई, निघते मी. माझी ना ओट्स खायची वेळ झालीये . आणि ती मी चुकवत नाहीये.”
निघाली की शहाणी पटापटा ! सगळ्या बायका इथूनतिथून सारख्याच. सोसायटीमधल्या बायका तिच्यावर का जळतात , ते मला आता कळलं . ती स्मार्ट नाही ; तर ओव्हरस्मार्ट होती .
ओट खाते म्हणे ओट, हिच्या पोटात खोट !
मी त्या दोघांना घेऊन गुमान घंटीभाईकडे गेलो . त्याचा अड्डा म्हणजे एक गॅरेज होतं . फक्त बाहेरूनच. आतून मस्त आलिशान हॉल होता . घंटीभाई केस वाढवलेला . कपाळावर मोठा नाम ओढलेला बलिष्ठ माणूस होता . गळ्यात अर्थातच सोन्याच्या बऱ्याच , छोट्या मोठ्या चेन्स . त्याने एक झगमग जॅकेट घातलं होतं . तो एका मोठ्या गुबगुबीत खुर्चीवर बसला होता .
तो जोरात ओरडला ,” मारिजुआना ! “
त्याबरोबर ते दोघे गेले की त्याच्याकडे पळत , शेपटी हलवत . प्राण्यांना वाईट माणसाची ओळख उशिरानेही पटत नाही वाटतं !
त्याच्या उजव्या कानात एक छोटी घंटी त्याने डूल असल्यासाखी अडकवली होती . आधी त्याने ती घंटी नाजूकपणे टिचकवली. ती नाजूक वाजली मग तो मला डाफरला, " ए क्या रे शाणे ? माझे लॅब पळवले होय ? तेबी दोन्ही ? "
लॅब ? ह्याची लॅब ? हा रक्त सांडतो का तपासतो ? नंतर कळलं , तो लॅब्रॅडॉरला लॅब म्हणत होता .
“घंटीभाई , अहो हि बिंटी माझ्या बायकोने आणली. मला कायच माहिती नाही. मी तर तिला अपना समझके भोत प्यार किया .”
“ए, चल यार पकवू नको . आमी किडनॅपचं काम करतो , तुमि तर आमच्या बच्चीला किडनॅप केला , “ त्याचा आवाज वाढला , “ वर नावबी बदललं व्हय ? “
“ सॉरी ! घनघन-टीभाई … “
“ ए , घंटीभाई बोलायचं, इज्जतमध्ये , “ बेलभाई बोलला , “ चल फूट ले येडा ! नाहीतर भाईपण तुझं नाव बदलून टाकेल - कैलासवासी करून टाकेल ! “ त्यावर ते दोघे लय हसले .
घरी येताना मला वाटत होतं - त्यांनी त्या रचनालाच किडनॅप करायला पाहिजे होतं . एवढा राग आला होता तिचा.
घरी आल्यावर हिने दिमागची घंटी एवढ्या वेळा वाजवली की मी बधिर . तिची टणटण थांबल्यावर मी बोललॊ .
तिला सांगितलं की तो घंटीभाई आहे ... ती देवळातली घंटा नसून ती मृत्युघंटा आहे !
-----
दुसऱ्या दिवशी सकाळी मी साखरझोपेत होतो . मला स्वप्न पडत होतं - रचनाने आता इतर प्राण्यांचा नाद सोडून दिला होता. तिने मलाच पाळलं होतं . वा ! कसलं भारी ! कसली मज्जा ! तिचं जवळ घेणं ,कुरवाळणं, लाड करणं आणि गोग्गोड पा घेणं ... मी तिच्याकडे बघतोय तोच तिचा चेहरा बदलला .तो घंटीभाईचा झाला . तो माझ्याकडे बघून प्रेम चोप्रासारखं हसला आणि त्याने माझ्यावर पिस्तूल रोखून खटका दाबला . त्याच्यातून टण्ण असा घंटीचा आवाज आला …
दाराची बेल वाजली होती .
ती बेल - बेल आयकॉनने वाजवली होती . हिने दार उघडलं आणि सकाळच्या पारी त्या छपरीला दारात पाहून ही उडालीच .
“कोण - कोण तुम्ही ?”
“आपण बेलभाई ! “
“देखो भाई, तुम्ही चुकीची बेल वाजवलेली दिसतीये .... “
“ए भाभी , मी बराबर आलोय . बेल आयकॉनची बेल चुकत नसती . आपल्याला घंटीभाईने पाठवलेलं आहे . भाई बोल्ला , आमच्या मारिजुआनाला तुमच्या घरवाल्याची लई आदत पडलीये . त्यांना सकाळच्या टायमाला फिरवायला ह्यानंच यायला पायजे “
“ओ बेलबॉटमभाई , ये नई जमेगा “ , ही म्हणाली .
“ओ , बेलबॉटम नाय हां . अँकलफिट पॅन्ट हाय माजी . ओक्के ? अन भाई बोल्ला की बोल्ला , ऐकायचं . नायतर भाई घंटी ... “
“त्यांचं नाव भाई घंटी नाही , घंटीभाई आहे ना ,” मी डोक्यावरचं पांघरूण उडवत बोललो .
" ओ भेलभाई , " ही म्हणाली .
" ए भाभी, भेल नई बेल . ओक्के ? और अपने दिमागकी भेल नई करनेका क्या ? " बेल्या म्हणाला .
ओल्या भेळीतल्या मुरमुऱ्यासारखी माझी अवस्था झाली होती .
मला त्याच्यामागे जावंच लागलं . बेल आयकॉन न दाबताच माझं सबस्क्रिप्शन झालं होतं . खरं तर मारिजुआनाला फिरवायचं काम बेल्याचंच होतं . त्यानेच एकदा आळशीपणामुळे त्यांना मोकळं सोडलं होतं . मग ते हरवले होते अन आमच्याकडे आले होते . त्याने तेच काम आता माझ्या गळ्यात घातलं होतं . टपोरी असला तरी चॅप्टर होता साला !
घंटीभाईने माझं स्वागत केलं म्हणाला , “ मेरे मारिजुआनाको तो तेरी नशा हो गयी रे. “
स्वतःच्या विनोदावर तो हसला तेव्हा त्याच्या कानातली घंटी नाजूक वाजली पण मला ती धोक्याची घंटा वाट्ली .
बेल्याने एका खोलीचं दार उघडलं . बिंटी आणि जॅकने माझं भुंकून स्वागत केलं . ते शेपटी हलवू लागले . खरंच , प्राण्यांना चांगल्या माणसांची ओळख लवकर पटते .
ते मला चाटू लागले . त्यावेळी मला वाटलं- मंटी,बिंटी आणि घंटी ... मंटी, बिंटीला तर हिने पाळलं होतं पण घंटीने मलाच पाळलं होतं .
घंटीभाई मला म्हणाला , “ए , काई प्रॉब्लेम असल तर मला सांगायचं . घंटीभाई हाय तुझ्या पाठीशी . “
मला असं वाटलं , त्या रचनाच्या बुलडॉगला कुठेतरी लांब सोडून द्यायला सांगावं . किंवा सोसायटीतल्या मला त्रास देणाऱ्या लोकांची नावं सांगावीत . निदान बॉसचं किंवा गेला बाजार सासूबाईंचं तरी ; पण मी ते काही बोलू शकलो नाही .
मी म्हणालो , “भाई , ह्यांना फिरवताना कुत्री लय त्रास देतात .”
त्यावर त्याने मला एक गन दिली .
“नको नको, भाई नको . “
त्यावर तो हसला आणि त्याने ती गन माझ्यावर रोखली . मी पुन्हा म्हणालो , “ नको नको, भाई नको ! … “
अन त्याने खटका दाबला . त्यावर आतून दिवाळीची टिकली वाजली. बेल्या भाईच्या जोकवर हसला.
तो म्हणाला , “ कुत्ता लोगांनी तरास दिला तर हि रोखायची आणि ढिशक्यांव ! कुत्ते पळून जाईल .”
-----
पुढचे दोन दिवस मी मारिजुआनाला फिरवलं . डोक्यात विचारही फिरत होते .रचनाचा बदलाही घ्यायचा होता आणि ....
मी घंटीभाईची गन हवेत रोखून आनंदाने माझ्या लक्ष्यावर गोळी झाडली .
तिसऱ्या दिवशी मी घंटीभाईला म्हणालो ,” भाई , ये मारी चालती है तो सुखकी घंटी बजती है और जुआनाकी दुःखकी घंटी बजती है . “
“ क्यूँ रे ?” त्याने विचारलं .
“ उसको घुमानेके लिये रचना मॅडमही चाहिये. वो उसकी मॅडम है ना , वो उसको बहोत मिस करता है .”
जुआना रचनाचा जॅक असला तर मी जॅक स्पॅरो होतो ! …
झालं ! भाईने संगितलं ,” बेल जावो , मॅडमकोभी कलसे काम बोल देना .”
तिला निरोप द्यायला बेल्या माझ्याबरोबर आला . तिचं घर दाखवायचं होतं .
मला शेपटी नाही . नाहीतर ती कशी आनंदाने फुलून हलतीये, हे तुम्हाला दिसलं असतं.
जॅकला फिरवण्यासाठी रचनाला यावंच लागलं . घंटीभाईने तिला पाहिलं मात्र त्याच्या हृदयातल्या हजारो घंटा किणकिणल्या आणि मारिजुआनाला फिरवायचं काम त्यानेच स्वीकारलं . दोघं त्यांना फिरवायला लागले . पुढे दोघं नुसतेच फिरायला लागले .
आणि मारिजुआना ? - त्यांना फिरवायचं काम पुन्हा माझ्याच गळ्यात येऊन पडलं . घंटीभाई आणि रचनाची लैच दोस्ती झाली आहे . माझीही झाली आहे - बऱ्याच बऱ्याच श्वान मंडळींशी . पण माणसांपेक्षा इमानदारच ते . हे नक्की .
मी घंटीभाईची गन हवेत रोखतो अन फायर करतो . टिकली वाजते . मग हसतो अन म्हणतो - बायकांनो , आता करा ना कॉपी, रचनाची ! ....
पण माझ्या बायकोची आठवण आल्यावर मी तीच गन खाली करतो . माझ्या नसलेल्या शेपटासारखी .
----------------------------------------------------------------------------------------------------

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

बिपीन सुरेश सांगळे's picture

1 Jan 2023 - 2:43 pm | बिपीन सुरेश सांगळे

वर्षाची सुरुवात थोड्या हास्याने

बिपीन सुरेश सांगळे's picture

1 Jan 2023 - 2:46 pm | बिपीन सुरेश सांगळे

मिपाचे सर्व सदस्य , ऍडमिन , संपादक मंडळ , सदस्य नसलेले वाचक , माझे वाचक , प्रतिसाद्क साऱ्यांना नवीन वर्ष सुखाचे व वाचनानंदाचे जावो .

सगळ्यांना प्रतिसाद देता येत नाही
क्षमस्व

पण खूप लोक खूप विषयांवर चांगले लिहितात

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jan 2023 - 3:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

नव्या वर्षाची सुरुवात खळखळुन हसवुन केलीत!! पंचेस चांगले जमले आहेत. असेच लिहित आणि हसवत रहा.

सर्वांन्ना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

कानडाऊ योगेशु's picture

1 Jan 2023 - 5:17 pm | कानडाऊ योगेशु

धम्माल लिहिले आहे. नववर्षाभिनंदन सर्व मिपाकरांना!

शानबा५१२'s picture

1 Jan 2023 - 6:25 pm | शानबा५१२

खुप करवणुक झाली वाचुन, एक लहान विनोदी चित्रपट पाहिल्यासारखे वाटले, कथानक छान होते! :-)

सौंदाळा's picture

2 Jan 2023 - 10:35 am | सौंदाळा

भारीच

श्रीगणेशा's picture

2 Jan 2023 - 7:52 pm | श्रीगणेशा

भारी एकदम!
एक धमाल विनोदी कथा, आणि छान सुरुवात नव्या वर्षाची!

बिपीन सुरेश सांगळे's picture

3 Jan 2023 - 12:50 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचकांचा खूप आभारी आहे .

सस्नेह's picture

3 Jan 2023 - 5:17 pm | सस्नेह

धम्माल कथा हा: हा:

सोत्रि's picture

5 Jan 2023 - 7:45 pm | सोत्रि

एक नंबर! खुसखुषीत एकदम!!

- (घंटीभायचा पंटर) सोकाजी

सुजित जाधव's picture

10 Jan 2023 - 10:23 am | सुजित जाधव

तुमची रचना आवडली..

भारीच आवडली कथा... नावं तर एक एक अशी दिली आहेत सगळ्यांना कि विचारु नका 😀
मारी-जुआना आणि बेल आयकॉन वगैरे वगैरे तर क्लासच 👍

चांदणे संदीप's picture

12 Jan 2023 - 2:57 pm | चांदणे संदीप

वर्षाच्या सुरूवातीचा लेख मी खूपच उशिराने वाचला. पण धमाल आली वाचून.

सं - दी - प

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 Jan 2023 - 9:43 pm | बिपीन सुरेश सांगळे

वरील सर्व सुहृदांचे खूप खूप आभार !
असाच स्नेहा राहो .

श्वेता व्यास's picture

27 Jan 2023 - 5:15 pm | श्वेता व्यास

काय धमाल विनोदी कथा आहे, खूप मजा आली. :D

नठ्यारा's picture

14 Feb 2024 - 6:20 pm | नठ्यारा

हे कसं निसटलं बरं. जाम हसलो. छानशी ७ भागांची मालिका होऊ शकते यावर.
-नाठाळ नठ्या

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Feb 2024 - 8:09 am | बिपीन सुरेश सांगळे

ना.न
विनोदी लिहिणं अवघड वाटत
कुठेही फसतं , कळत नाही

आपल्याला कथा आवडली
हसू आलं
लेखकाला अजून काय पाहिजे ?

धन्यवाद