एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ६ (शेवटचा)

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Nov 2022 - 5:26 am

image host

इव्हॅन तुर्गेनेव्ह
(९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३)
Turgenev: The Novelist's Novelist

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ६

मार्च ३०. बर्फ.
.... हंऽऽ मी काय सांगत होतो, मी त्याच्या अभ्यासिकेत प्रवेश केला. स्वतःचे कपडे सावरत तो धडपडत उठला आणि घाईघाईने त्याने पुढे येऊन हात पुढे केला. अरे देवा! त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर कुठले भाव होते हे माझे मलाच पाहता आले असते तर किती मजा आली असती. बहुधा माझ्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद थोडा का होईना पसरला असावा, किंवा त्याच्याविषयी वाटणारी कीव आणि आनंद याचे मिश्रण असावे ते! किंवा कोणावर तरी उपकार करतोय याचा अभिमानही असावा... ओझोगिनची मात्र मला पाहताच पंचाईत झाली. ते एकदम गप्प झाले . ते माझी नजर चुकवू लागले. जागेवरच चुळबुळ करू लागले. मला त्यांची परिस्थिती दिसत होती. खरं सांगायचे तर मला त्यांची किंव आली. माझ्या लक्षात आले की ते उगीचच मोठ्याने बोलत होते आणि न थांबता गुळमुळीत बडबडत होतेे. कशाचाच कशाला पत्ता नव्हता. पण त्यांनी घाईघाईने माझी क्षमा मागितली आणि उरलेला वेळ ते हे जग कसे दुटप्पी आहे, निष्ठूर आहे, विश्वासघातकी आहे यावर बोलत होते. मधेच त्यांनी पळून गेलेल्या पाहुण्याचाही ओझरता उल्लेख केला. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते लपविण्यासाठी त्यांनी तपकीरीची चिमूट नाकाशी धरली. ते रशियन हिरवी तपकीर ओढत, ज्याने म्हाताऱ्या लोकांच्या डोळ्यात लगेच पाणी येते. अश्रूंची जाणीव होताच ते एकदम बोलायचे थांबले. ते अश्रू मला दिसू नयेत म्हणून काहीतरी कारणाने त्यांनी तोंड फिरविले.

मी मात्र त्या माणसाला आदराने वागवले. त्यांची, त्यांच्या पत्नीची आणि मुलीची ममतेनेे विचारपूस केली. आणि एका अडचणीच्या प्रसंगी संभाषणाचा रोख शेतीकडे वळवला. मी नेहमीचेच कपडे घातले होते पण माझ्या औदार्यपूर्ण वागण्यामुळे माझी मान थोडीशी का होईना ताठ झाली होती. ते साधे कपडे मला भरजरी कपड्यासारखे वाटत होते. शेवटी तुम्हाला काय वाटते हे तुमच्या मनावर अवलंबून असते हेच खरे. पण लिझाला परत भेटण्याच्या कल्पनेने मी थोडासा हळवा झालो. माझी सुटका केली ती ओझोगिनने. त्याने मला लिझाच्या आईकडे जाण्याचे सुचवले. ती मूर्ख बाई मला पाहताच इतकी घाबरली की तिचे डोकेच चालेना. पण एकाच गोष्टीवर जास्त विचार करण्याची तिच्या बुद्धीची क्षमता नसल्यामुळे ती तशी पटकन सावरली. शेवटी एकदाचे मी लिझाला पाहिले.... तिने आमच्याच खोलीत प्रवेश केला.

मला वाटले की तिच्यात मला एक खजील झालेली, पश्चात्ताप झालेली, एक स्त्री दिसेल. मी अगदी तिला उदार अंतःकरणाने क्षमा करण्याच्या तयारीत होतो. खोटे कशाला बोलू? माझे प्रेम होते तिच्यावर आणि तिच्यासाठी मी काहीही करण्यास तयार होतो. पण घडले ते विपरीतच.. मी तिला वाकून अभिवादन केल्यावर तिने माझ्याकडे पाहून एक निर्विकार हास्य केले आणि अत्यंत कोरड्या स्वरात म्हणाली, “अच्छा ! तू आहेस तर तोऽऽ”. एवढे बोलून तिने माझ्याकडे पाठ केली. ते हास्यही अगदी बळजबरीने केल्यासारखे ओठावर उसने आणले होते. आणि खरे सांगायचे तर तिच्या ओढलेल्या चेहऱ्यावर ते अगदी भयानक वाटत होते. ते काहीही असो. माझे स्वागत असे होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. तो धक्का सहन न झाल्यामुळे मी तिच्याकडे पाहातच राहिलो. किती बदल झाला होता तिच्यात! पूर्वीची मुलगी आणि आत्ताची बाई यांच्यात शोधूनही मला काही साम्य आढळेना. ती आता हडकुळी झ्ााल्यामुळे उंच भासत होती, लुसलुशीत ओठ आता सुकले होते. तिची पूर्वीची बालीश नजर आता ठाम व करारी वाटत होती. तिचे आपोआप बोलणारे डोळे आता निर्जीव वाटत होते. मी रात्रीच्या जेवणाला त्यांच्याकडेच थांबलो. ती दोन तीन वेळा आमच्या खोलीत आली पण माझ्याकडे दुर्लक्ष करत तिने इतरांच्या मोजक्या प्रश्नाला मोजकीच उत्तरे दिली व लगेच निघून गेली. माझ्यावर रागावण्याइतकीही माझी लायकी नाही हे तिने दाखवून दिले होते. जरी मी तिच्या प्रियकराला जवळजवळ ठारच केले होते तरीही. शेवटी माझा संयम संपला आणि मी माझ्या ओठातून काहीतरी आकसखोर शब्द बाहेर पडले. ती शहारली. तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. खिडकीकडे जात कापऱ्या आवाजात म्हणाली, “तुला काय म्हणायचे ते म्हण, पण तुला एकदाच सांगते. त्या माणसावर मी मनापासून प्रेम केले आणि करत राहीन आणि या प्रकरणात त्याला दोष द्यायचा प्रयत्न करू नकोस... आणि केलास...” पण तिला पुढे बोलता आले नाही. तिचा कंठ दाटून आला, डोळे ओले झाले आणि ती खोलीतून निघून गेली. आझोगिनचा या सगळ्यामुळे गोंधळ उडाला. मी त्या दोघांशी हस्तांदोलन केले, एक उसासा टाकला आणि आकाशाकडे पाहून वर हात फेकले व तेथून निघालो.

मला आता खूपच अशक्तपणा जाणवतोय. पूर्वीसारखे सविस्तर लिहिण्याचा मला आता उत्साह राहिलेला नाही आणि माझ्यात तेवढी शक्तीही राहिली नाही आणि ओझोगिनच्या घराला दिलेल्या शेवटच्या भेटीनंतर माझ्या डोक्यात चाललेल्या संघर्षाला आता मीच कंटाळलो आहे. माझ्या मनात आता लिझा प्रिन्सवरच प्रेम करत होती आणि करत राहील याबद्दल पुसटशीही शंका उरलेली नाही. माझ्या नाठाळ मनाला परिस्थितीने वठणीवर आणले आणि मी नशिबाला शरण गेलो. आता तिच्या प्रेमाचे मला स्वप्नही पडणार नाही याची मला खात्री आहे. मला आता फक्त तिच्याशी मैत्री करायची आहे किंवा ओळख तरी ठेवायची आहे. गमावलेला विश्वास परत मिळवायचा आहे. असं म्हणतात विश्वास हा प्रेमाचा पाया असतो. पुढे काय होईल काही सांगता येत नाही. या सगळ्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली नाही ती म्हणजे आमच्या द्वंद्वानंतरच लिझा माझा द्वेष करू लागली होती. त्या अगोदर असे नव्हते. दुर्दैवाने ही बाब माझ्या फार उशीरा लक्षात आली..

मी पूर्वीसारखाच ओझोगिनच्या घराला भेट देण्यास सुरुवात केली. ओझोगिन माझ्याशी पूर्वीपेक्षा जास्तच आपुलकीने वागत होते. ते लिझाचा हात माझ्या हातात देतील असा विचार माझ्या डोक्यात घोळू लागला होता आणि तेही साहजिकच होते. अर्थात आमचा जोडा थोडाफार विजोड दिसला असता, नाही असं नाही, पण मला वाटते त्यांना आता ते चालले असते बहुतेक; गावात आता माझे प्रचंड कौतुक होत होते तर लिझा अणि प्रिन्सचा धिक्कार होत होता. लिझा मात्र मला तशीच वागवीत होती. बहुतेक वेळा ती गप्प असे. जेव्हा तिच्यासमोर जेवण आणले जाई तेव्हा जेवत असे. ती तिचे दुःख प्रकट करत नसे पण मला माहीत होते की ती अंतर्यामी अत्यंत दुःखी होती. एखादी मेणबत्ती जळावी तशी अंतर्यामी जळत होती. मला तिच्या वडिलांचे खरोखरंच कौतुक वाटे. तिचे हे वागणे ते बिचारे आनंदाने सहन करीत. तिची आई जेव्हा जेव्हा तिच्या दुःखी मुलीकडे पाहात असेे तेव्हा तेव्हा ती डोळ्यातून टिपे गाळीत असे. पण लिझा एका माणसाला मात्र कधी टाळत नसे - बिझमियान्कॉफ. ओझोगिन मात्र त्याच्याशी तुटकपणे वागत असे. कधी कधी तर त्याचा अपमानही करीत असे. आमच्या द्वंद्वामधे प्रिन्सचा प्रतिनिधी म्हणून त्याने जी भूमिका बजावली होती त्यासाठी त्यांनी त्याला शेवटपर्यंत माफ केले नाही. पण तोही हे सगळे सहन करत, निर्लज्जपणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत हवेलीवर येत राहिला. माझ्याशी मात्र आता तो परक्यासारखा वागत असे. हे मला जरा विचित्रच वाटलं. मला नंतर नंतर त्याची भीतीच वाटू लागली. हे सगळे असे पंधरा दिवस चालले होते. बऱ्याच रात्री तळमळत काढल्यावर मग मात्र मी या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी लिझाला भेटण्याचे ठरवले. मला माझे ह्रदय तिच्यापुढे मोकळे करायचे होते. मला तिला सांगायचे होते “मागे काय झाले असेल ते असेल, गावात काय चर्चा होत असेल ती असेल पण तू जर माझ्याशी लग्न केलेस तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. मी तुझा विश्वास संपादन करण्यात निश्चितच यशस्वी होईन.” मी शपथेवर सांगतो, मला असे वाटत होते की मी तिच्यावर आता उपकारच करतोय. प्रेम म्हणजे काय हे जगाला दाखवून देतोय. जरी तिच्या प्रियकराने तिला फसवले असले तरी मी तिच्याशी लग्न करणार होतो. पण तिला भेटण्याचे मुख्य कारण होते, ते म्हणजे मला आमच्यातील गैरसमज दूर करायचे होते आणि माझ्या प्रेमाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावायचा होता.

त्या हवेलीच्या मागेच एक मोठी बाग होती ज्याच्या टोकाला चाफ्याच्या झाडांची दाटी होती. ती जागा तशी निर्जन होती व त्याची देखभालही कोणी करीत नसे. या झाडांच्या मध्यभागी एक लताकुंज होता जो मुख्य बागेपासून एका लाकडी कुंपणाने अलग केला होता. लिझा बऱ्याच वेळा या बागेत एकटीच फिरायला जात असे. कधी कधी ती कित्येक तास या बागेत काढी. तिच्या वडिलांना हे माहीत होते आणि त्यांनी सगळ्या नोकरांना तिच्यावर लक्ष देण्याचा हुकूम केला होता आणि त्याच वेळी तिला त्रास देऊ नये असेहेी बजावून सांगितले होते; “तिला स्वतःच्या दुःखावर जरा फुंकर घालू देत.” तेे म्हणाले होते. जेव्हा ती घरी दिसत नसे तेव्हा ती हमखास बागेत असे. अशावेळी मागील दरवाजात असलेली घंटा वाजवली की घरी परत येई. तिच्या हातात एखादे वाळलेले पान असे आणि चेहरा तसाच गंभीर, उदास असे. एक दिवस ती घरात नाही असे पाहून मी ओझोगिनचा निरोप घेतला आणि घाईघाईने बाहेर पडलो पण त्याच पावली उलट फिरून मी परत बागेत शिरलो. नशिबाने मला कोणी पाहिले नाही म्हणून बरं. जास्त वेळ न घालवता मी चाफ्याच्या बनात शिरलो. माझ्यासमोर रस्त्यावर लिझा पाठमोरी उभी होती. माझ्या ह्रदयातील धडधड वाढली. माझ्या ह्रदयाच्या ठोक्यांचा आवाज मलाच ऐकू यायला लागला. मी तिच्यापासून थोड्या अंतरावर थांबलो आणि एक मोठा सुस्कारा टाकला. मी क्षणभर विचार केला आणि तिच्या दिशेने पाऊल टाकणार तेवढ्यात... तिने कशाचा तरी कानोसा घेण्यास सुरुवात केली. मी थबकलो. लाकडावर किंवा दरवाजावर कोणीतरी दोनदा ठकठक केल्याचा आवाज मला आला. लिझाने हलक्या हाताने दोन टाळ्या वाजवल्या. मी चक्रावून गेलो. काय चालले आहे हे? तिला कोणी पछाडले तर नाही ना? माझ्या मनात विचार आला. तेवढ्यात दार उघडल्याचा अस्पष्ट आवाज झाला आणि त्या कुंपणाआडून बिझमियान्कॉफ अवतरला. मी पटकन एका झाडामागे लपलो. लिझा शांतपणे, हलक्या पावलाने त्याच्याकडे वळली. त्याने तिच्या कमरेभोवती हात लपेटला आणि ती दोघेही त्या रस्त्यावर चालू लागली. मी आश्चर्याने पाहात राहिलो. ते थांबले. त्यांनी सावधपणे सगळीकडे नजर टाकली आणि ते त्या पुष्कर्णीत अदृष्य झाले. या पुष्कर्णीत एक छोटीशी खोली होती जिच्यावर जाई जुईच्या वेलींनी जाळी धरली होती. खोलीला एकच खिडकी होती आणि मध्यभागी एक जुनाट मेज़ होते आणि बसण्यास एक लाकडी ओंडका होता ज्यावर शेवाळे जमले होते. बाजूला दोन दिवाण पडले होते. पूर्वी उन्हाळ्यात ते येथे चहा पिण्यास जमत. पण आता ती खोली मोडकळीस आली होती. दरवाजा लागत नव्हता आणि त्याची चौकट भिंतीतून निखळली होती. खिडकीची चौकट तर लोंबकळत होती, एखाद्या जखमी पक्षाच्या पंखाप्रमाणे ! मी हळूच त्या खोलीपाशी गेलो आणि खिडकीच्या फटीतून पाहू लागलो. लिझा एका दिवाणाच्या काठावर बसली होती. तिची हनुवटी तिच्या छातीला टेकली होती. तिचा उजवा हात तिच्या मांडीवर होता. बिझमियान्कॉफनेे तिचा डावा हात आपल्या हातात हळूवारपणे धरला होता. तो मोठ्या प्रेमाने व करुणेने ओथंबलेल्या नजरेने तिच्याकडे पाहात होता.

“आज कसं काय वाटतंय तुला?” त्याने विचारले.

“तसंच! आयुष्यात भयंकर पोकळी निर्माण झ्ााल्यासारखं वाटतंय मला. त्या पोकळीची मला भीती वाटते.” ती कापऱ्या, थरथरत्या आवाजात पुटपुटली. बिझमियान्कॉफने काहीच उत्तर दिले नाही.

“तुला काय वाटतं, तो लिहील का मला परत?”

“मला नाही वाटत लिझा, तो तुला परत लिहील.” ती क्षणभर गप्प बसली.

“आणि लिहिणार तरी काय म्हणा? त्याने मला पहिल्या पत्रातच सगळे सांगितले होते. मी त्याची पत्नी नाही होऊ शकले पण मी आनंदात होते. सुखात होते.” बिझमियान्कॉफने खाली मान घातली. तेवढ्यात ती चिरकलेल्या आवाजात म्हणाली,

“त्या च्युल्काटुरीनचा तर मी तिरस्कारच करते. अत्यंत नीच माणूस आहे तो! त्याच्या हातावर मला त्याचे रक्त दिसते. पण काय सांगावे जर ते द्वंद्व झाले नसते तर आजच्या परिस्थितीत मी त्याला ‘हो’ ही म्हटले असते. जेव्हा प्रिन्स घरी आला आणि मी त्याचे रक्त पाहिले तेव्हाच मी त्याची झाले.

“च्युल्काटुरीनचे तुझ्यावर प्रेम आहे.” बिझमायन्कॉफ म्हणाला.

“मी त्याचा तिरस्कार करते. मला आता कोणाच्या प्रेमाची गरज नाही.” ती क्षणभर थांबली आणि पुढे म्हणाली, “ तू सोडून... हो तुझ्या प्रेमाशिवाय मी जगूच शकले नसते. तू होतास म्हणून मी जिवंत तरी आहे. या सगळ्या प्रकरणात नाहीतर मी आत्महत्याच करायचे ठरवले होते. तू धीर दिलास म्हणून..” एवढे बोलून ती जरा शांत झाली. बिझमियान्कॉफने तिच्या हातावर प्रेमाने थोपटले. “लिझा, ती काही मदत नव्हती...लक्षात घे..” तेवढ्यात तिने त्याचे बोलणे अर्ध्यावर तोडले. “तू नसतास तर मी मेलेच असते. तुला सगळं माहीतच आहे...बिझ.. तुला आठवतंय का त्या दिवशी तो किती रुबाबदार, देखणा दिसत होता ते.” असे म्हणून ती स्फुंदत रडू लागली.

“बोल! बोल! लिझा तुझे मन मोकळे कर तेवढेच तुला बरं वाटेल.” बिझमियान्कॉफ म्हणाला. तिने त्याचा हात प्रेमाने कुरवाळला,

“तू फार प्रेमळ आहेस बिझ ... एखाद्या देवदूतासारखा तू माझ्या मदतीला धावून आलास. पण मी तरी काय करू? मी मरेपर्यंत त्याच्यावरच प्रेम करणार. मी त्याला क्षमा केली आहे. त्याला कसं विसरू मी! देव त्याला सुखात ठेवो. त्याला त्याच्या मनासारखी पत्नी मिळो. माझी फक्त एकच इच्छा आहे... त्याने मला विसरु नये.” तिचे डोळे डबडबले..“चल आपण बाहेर जाऊ.” बिझमियान्कॉफने तिचा हात उचलून तिच्या हाताचे हलक्याने चुंबन घेतले.

“मला कल्पना आहे सगळेजण मला दोषी मानतात. मानू देत.. मी अशी काय कुढत बसली आहे असं विचारतात. पण त्यांना बरे वाटावे म्हणून मी सुखाचे नाटक कसं करू? नाही.. नाही... त्याने माझ्यावर जास्त काळ प्रेम केले नाही हे खरं पण त्याने माझ्यावर मनापासून प्रेम केलं हे ही खरं आहे. त्याने माझा विश्वासघात केला नाही हेच खरं आहे. त्याने कधीही मला लग्नाचे वचन दिले नाही. माझ्या स्वतःच्या मनातच असं काही नव्हतंऽऽ. फक्त माझ्या बिचाऱ्या वडिलांना तसं व्हावे असं वाटत होते. त्यात त्यांचीही काही चूक नाही. याच जागी मी त्याला शेवटचे भेटले. चल जरा पाय मोकळे करू.”

ते उठले. मी पटकन कसाबसा बाजूला झालो आणि झाडामागे लपलो. ते चालू लागले आणि त्यांच्या पावलांच्या आवाजाने ते बाहेर पडले एवढे मात्र मला समजले. मी जे पाहिले त्याने धक्का बसून त्या ठिकाणी खिळलो होतो. माझे डोकेच चालेना. तेवढ्यात मला परत पावलांचा आवाज ऐकू आला. मी झाडामागून पाहिले, लिझा आणि बिझ .. त्याच रस्त्याने परत येत होते. दोघेही त्रासलेले दिसत होते. त्यांच्यात काहीतरी महत्वाचे बोलणे झालेले असणार. बिझमियान्कॉफच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तो बहुधा रडला असणार. लिझा थांबली. तिने त्याच्याकडे एकदा रोखून पाहिले आणि मला ती काय म्हणाली ते अगदी स्पष्ट ऐकू आले.

“बिझमियान्कॉफ मी तुझ्या लग्नाच्या मागणीला होकार देते... तुला जर फक्त मला मदत करायची असती तर कदाचित मी नाही म्हटले असते. पण तुला सगळं माहीत असताना तू माझ्यावर प्रेम केलेस. तुझ्याइतका विश्वासू जीवनसाथी मला मिळेल असं वाटत नाही. मी करेन तुझ्याशी लग्न.”

बिझमियान्कॉफने तिच्या हाताचे हलकेच चुंबन घेतले. तिने त्याच्याकडे पाहून एक मंदस्मित केले पण त्यात प्राण नव्हता. बिझमियान्कॉफ झाडीत नाहीसा झाला आणि मी पण तेथून निघून गेलो. मी जे लिझाला म्हणणार होतो, बरोबर तेच बिझमियान्कॉफ तिला म्हणाला आणि मला जे उत्तर लिझाकडून अपेक्षित होते, तेच उत्तर लिझाने त्याला दिले होते. आता या प्रकरणात मी स्वतःला क्लेष करून घेण्याचे काही प्रयोजनच उरले नव्हते. पंधरा एक दिवसांनंतर त्यांचे लग्न झाले. ओझोगिनला तिचे लग्न होईल का नाही याचीच काळजी असल्यामुळे तो कुठल्याही जावयावर खूष होता. अर्थात तेही साहजिकच होते म्हणा..

हंऽऽऽ आता मला सांगा मी एक क्षुल्लक, फालतू, अतिसामान्य माणूस आहे का नाही? या सगळ्या प्रकरणात मी कसली भूमिका बजावली? प्रिन्सच्या भूमिकेबद्दल काही बोलायलाच नको.. बिझमियान्कॉफने जी भूमिका बजावली तीही बुद्धीगम्य आहे. पण मी? मी का त्यात अडकलो? माझा बग्गीला जोडलेला पाचवा घोडा का झाला? छ्या ! फारच भयंकर.. आता काय? आता नदीवर नावाडी म्हणतो तसं...
वल्हव रे! वल्हव रे!
अजून एक दिवस
मग अजून एक दिवस...
अंतापर्यंत..
मग उरणार नाही
कटूता, सूख आणि दुःख...
वल्हव रे! वल्हव रे!
अंतापर्यंत..

मार्च ३१
परिस्थिती वाईटच आहे.... मी या ओळी आता बिछान्यात पडून लिहितोय. कालपासून हवा बदलली. आज उन्हाळ्यात असावी इतकी हवा गरम आहे. सगळीकडे बर्फ वितळतोय, बर्फाचा तुटण्याचा आवाज आसमंतात भरून राहिला आहे. गार पाण्यातून वाफेचे लोट आकाशाला भिडायला चालले आहेत... हवेत ओल्या नांगरलेल्या जमिनीचा सुवास. सूर्य वरून आग ओततोय. मला तर माझे शरीर कुजतंय असं वाटतंय.

मी रोजनिशी लिहिण्यास घेतली आणि मी काय लिहिले आहे पाहा. मी लिहिली माझ्या आयुष्यातील फक्त एक घटना! मी बडबडत होतो आणि माझ्या आठवणी जाग्या होत गेल्या. मी निवांत लिहित राहिलो जणूकाही माझे सारे आयुष्य माझ्यासमोर पडले आहे. बघता बघता आता लक्षात येतंय, की नाही... आता फारच थोडे क्षण उरले आहेत. मृत्यू समीप येत चाललाय... माझी वेळ संपली. माझी वेळ संपली आहे हेच खरं...

पण मी हे सगळे लिहिण्यात काय चूक केली? मी जे काही सांगितले त्याने आता कोणाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? मृत्यू समोर दिसत असताना सगळे अभिमान गळून पडतात. मी अधिकाधिक विनम्र होत चाललो आहे. मला आता तारतम्य आले आहे... पण आता उशीर झाला. सगळे विचित्रच.. मी निर्जीव होतोय पण माझ्या मनाला भयंकर भीतीने ग्रासले आहे. हो भीतीने! माझ्या तोंडातून शब्द उमटत नाही, मी भेदरलेल्या नजरेने सगळीकडे पाहातोय. सगळ्या वस्तू आता मला अधिकच प्रिय वाटू लागल्यात..मला माझ्या खोलीकडे पाहावत नाही. तिच्या आठवणींचा मी आता निरोप घेणार आहे. हे माझ्या डोळ्यांनो हे सगळे एकदा शेवटचे पाहून घ्या. माझा प्राण आता मला सोडून जातोय. प्रवासाला निघालेल्या माणसाला किनारा जसा दूरदूर जाताना दिसतो तसा. माझी म्हातारी मोलकरीण किंवा दाया म्हणा, टेबलावरची उकळणारी चहाची किटली, खिडकीसमोर असलेले जर्मानियमचे भांडे आणि माझा गरीब बिचारा कुत्रा... ट्रेसॉर, ज्या पेनाने मी हे लिहितोय ते पेन, माझा स्वतःचा हात... कदाचित आज माझा शेवटचा दिवस असेल मग हे काहीही मला दिसणार नाही. मरणाच्या गप्पा मारायला सोप्या असतात पण जिवंत माणसाला मरणे म्हणजे मरणयातनाच असतात. ट्रेसॉर तू का बाबा माझ्याकडे पाहून शेपटी हलवतोयस? का माझ्या पलंगाला तुझे अंग घासतो आहेस? तुझे दुःखी डोळे मला पाहावत नाहीत...जरा दुसरीकडे पाहा... तुला माझी कींव येतेय का? का तुला अगोदरच कळले आहे की तुझा मालक आता काही तासांचाच सोबती आहे? आता या आठवणी काही आनंददायी नाहीत पण काय करणार, माझ्याकडे दुसऱ्या आठवणीच नाहीत सांगायला.. पोकळी, एक भयंकर पोकळी. भीतीदायक पोकळी. लिझाला काय म्हणायचे होते ते मला आत्ता कळतंय..
अरे देवा ! मी आता मरतो...
माझे ह्रदय,
त्याला कोणाला तरी त्यात जागा द्यायची होती,
त्याला वाटत होते,
कोणीतरी माझ्यावर प्रेम करावे.
ते आता धडधडायचे थांबेल.
थांबण्याआधी त्याला एकदा तरी सुख म्हणजे काय हे कळेल का?
शक्यता नाही.
जर कोणी माझ्यासाठी विरहगीत गायले,
तर मी सगळ्यांना क्षमा करून टाकेन...
पण मरण्यात फार मोठा शहाणपणा नाही हे निश्चित...

मला वाटतंय मी भ्रमात काहीबाही बरळतोय!

मी आता माझ्या आयुष्याचा, माझ्या बागेचा, माझ्या चाफ्याचा निरोप घेतो.. मित्रांनो वसंत ऋतूत फुलायला विसरू नका. चांगल्या लोकांना तुमची सावली द्यायला विसरू नका... तुमच्या पानांची सुमधूर सळसळ, त्याच्या संगिताने त्यांचे मन रिझविण्यास विसरू नका बरं! मी सगळ्यांचाच निरोप घेतो आता...येतो !
लिझा! येतो मी! मी हे दोन शब्द लिहिले आणि खरं सांगतो मला हसूच फुटले. हे कसे अगदी पुस्तकी झालं! हो ना? एक भावनेला हात घालणारी कादंबरी आणि शेवट एका निरोपाच्या पत्राने...

उद्या एप्रिलची पहिली तारीख. उद्या मरेन का मी? अशुभ... पण माझ्यासाठी तेच ठीक आहे...
डॉक्टर आज काय बडबडत होते बरं...

एप्रिल १
संपले! संपले माझे आयुष्य. आज मी मरणार हे निश्चित. बाहेर किती गरम होतंय! का माझी छाती श्वास घेत नाही..? मला वाटतंय माझ्या जीवनाच्या विनोदी नाटकाच्या शेवटच्या प्रवेशावर आता पडदा पडणार आहे..

माझ्या मृत्युनंतर मी सामान्य राहणार नाही ही एक फार मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. सूर्य किती प्रखरतेने आग फेकतोय.. त्या किरणांवरून तर माझा पुढचा प्रवास नाही ना?

आज सकाळी तारन्तिव्हाचा निरोप घेताना ती माझ्या पायावर वेडीपिशी होत कोसळली. तिला माझ्या अगोदर मरायचे होते म्हणे! मी हसलो आणि तिच्याकडून ती माझ्या कुत्र्याची काळजी घेईल असे वचन घेतले.

माझ्या हातातून आता पेन गळून पडतंय.. मला वाटतं आता जायची वेळ आली आहे.. मी मरतोय.. मरतोय..

संपादकाची टीप :
या पत्राच्या शेवटी एका समोर पाहणाऱ्या माणसाचे रेखाटन आढळले. कुरळे केस, मोठ्या रुबाबदार मिशा आणि लांबसडक पापण्या... सूर्याच्या किरणांसारख्या. चित्रातील डोक्याखाली खालील ओळी लिहिल्या होत्या -

वरील हस्तलिखीत मी वाचले आहे आणि त्यास अनुमोदन देतो.
- पिटर झुडोटाउशीन.
नमस्कार !
पण वरील ओळींचे हस्ताक्षर मुख्य मजकुराच्या हस्ताक्षराशी मेळ खात नसल्यामुळे हे कोणीतरी नंतर लिहिले असावे असे अनुमान निघते. शिवाय मि. च्युुल्काटुरीन यांचा मृत्यू त्याच रात्री म्हणजे एक एप्रिलला त्यांच्या वडिलोपार्जित इस्टेटीवर झाला असल्यामुळे हे (शेवटच्या तीन ओळी) त्यांनी लिहिले नाही हे निश्चितपणे म्हणता येते...

समाप्त.
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

कथालेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Nov 2022 - 9:12 am | प्रचेतस

ओघवता आणि सुरेख अनुवाद. ही रोजनिशी खूप आवडली. शेवट एकदम जबरी.

श्वेता२४'s picture

30 Nov 2022 - 2:02 pm | श्वेता२४

पण शेवटच्या ओळींचा अर्थ काही कळला नाही. कोणी विस्कटून सांगेल का?

श्वेता व्यास's picture

2 Dec 2022 - 9:40 am | श्वेता व्यास

खूप सुंदर अनुवाद.
दिवाळी अंकाच्या गडबडीत ही लेखमाला वाचायची नव्हती, म्हणून शेवटचा भाग येईल तेव्हा वाचू ठरवलं होतं.
खरोखर निवांत आस्वाद घेत वाचन करावं अशी कथा आणि अनुवाद आहे.
धन्यवाद.