एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Nov 2022 - 10:21 am

image host

इव्हॅन तुर्गेनेव्ह
(९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३)
Turgenev: The Novelist's Novelist

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ५

त्या रात्रभर ,मला झोप आली नाही. अति क्षोभाने ! मी घाबरलो होतो म्हणून नाही. मी भित्रा नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास या द्वंद्वात माझा प्राण जाईल अशी भीती माझ्या मनाला एकदाही स्पर्ष करून गेली नाही. मी फक्त लिझाचाच विचार करत होतो. माझ्या मेलेल्या इच्छा आणि मला काय केले पाहिजे याचा. मी विचार करत होतो,
“मारावे का त्याला?” अर्थात मला त्याला मारायचे होते. सूड म्हणून नाही तर लिझाच्या भल्यासाठी. “पण तिला तो धक्का सहन होणार नाही. नको.. त्याला मारायला नको. खरे तर त्यानेच मला मारले तर बरं होईल.” मी मनात म्हटले.

प्रामाणिकपणे सांगतो, प्रिन्ससारख्या राजघराण्यातील माणसाला गावातील माझ्यासारख्या सामान्य माणसाशी द्वंद्व करावे लागणार आहे याचाच एक सूक्ष्म आनंद माझ्या मनात होत होता.

पहाट झाली तरी मी या सगळ्या प्रकरणावर विचार करतच होतो. सकाळ झाली आणि कोलोबर्डएव्हने माझ्या घरात पाऊल ठेवले. “हंऽऽ मी आलोय! प्रिन्सचा प्रतिनिधी कुठेय?” त्याने आल्या आल्या विचारले.

“अरे बाबा आत्ताशी सकाळचे सात वाजलेत. तो अजून झोपला असेल.” मी त्याच्यावर डाफरलो.

“मग त्यांना मला चहा द्यायला सांग बाबा! माझं डोकं कालच्या मद्यामुळे चढलंय. मी अजून कपडेही बदललेले नाहीत. अर्थात मी ते क्वचितच बदलतो म्हणा.” जांभया देत तो पुटपुटला. त्याला चहा देण्यात आला. त्या पठ्ठ्याने सहा ग्लास रम आणि सहा ग्लास चहा रिचवला. चारवेळा पाईप भरला (माझ्या तंबाखूने) आणि मला म्हणाला, “मी कालच एक घोडा विकत घेतलाय.. त्याला आज वठणीवर आणायचाय.” बोलता बोलता तो केव्हा घोरायला लागला हे मलाही कळले नाही. हा माझा प्रतिनिधी! शेवटी मीच उठलो आणि सगळी कागदपत्रे तयार केली. लिझाने दिलेले आमंत्रण! ही एकच चिठ्ठी आजवर मला तिच्याकडून आली होती. मी ती छातीजवळच्या खिशात ठेवणार होतो पण मी शेवटच्या क्षणाला माझा विचार बदलला आणि ती एका पेटीत टाकली. आमचे प्रतिनिधी मंद घोरत होते. मी त्याचे बराच वेळ निरीक्षण केले... मला तो माणूस आवडायचा. काही गोष्टी सोडल्यास त्याचा स्वभाव उमदा होता. १० वाजता बिझमियान्कॉफ आला. प्रिन्सने त्याला त्याचा प्रतिनिधी म्हणून निवडले होते.

आम्ही दोघांनी मिळून कॅप्टनला उठवले. तो डोळे चोळत उठला आणि त्याने डोळे किलकिले करून घुबडाच्या नजरेने आमच्याकडे पाहिले. घोगऱ्या आवाजात त्याने पहिल्यांदा काय केले असेल तर व्होडका मागितली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तो बिझमियान्कॉफबरोबर बोलणी करण्यासाठी बाहेर गेला. त्याला परत येण्यास फार फार वेळ लागला नाही. परत आल्यावर तो म्हणाला, “आज दुपारी ३ वाजता द्वंद्व होईल. पिस्तुलांनी.” मी मान हलवून होकार दिला. बिझमियान्कॉफने आमचा लगेचच निरोप घेतला आणि त्याने घोड्यावर मांड टाकली. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. अस्वस्थ वाटत होता. पण माझ्याशी फारच आदबीने वागला. पण मला लाज वाटत होती आणि मी त्याच्या डोळ्याला डोळा भिडवू शकलो नाही हेही खरे!

कॅप्टनने परत त्याच्या घोड्याविषयी सांगण्यास सुरुवात केली. अर्थात मलाही त्या विषयात गती होती आणि मलाही घोड्यांची आवड होतीच. आम्ही बराचवेळ त्या विषयावर गप्पा मारल्या, मला वाटले तो मला लिझाविषयी विचारतो की काय! पण तो एक सज्जन माणूस होता आणि त्याला कुचाळक्या करण्यात मुळीच रस नव्हता. मुख्य म्हणजे बायकांचा तो द्वेष करायचा. त्यांना सॅलड म्हणायचा. का ते त्यालाच माहीत. दुपारी दोन वाजता आम्ही जेवलो आणि तीन वाजता आम्ही ठरलेल्या जागेवर पोहोचलो. ही तीच जागा होती जेथे मी आणि लिझा फिरायला गेलो होतो. कड्याच्या थोडे अंतर आधी.

आम्ही पहिले पोहोचलो. आम्हाला फार वाट पाहावी लागली नाही प्रिन्स आणि बिझमियान्कॉफ तेवढ्यात आलेच. प्रिन्स नेहमीसारखा ताजातवाना दिसत होता आणि त्याच्या मिलिटरीच्या टोपीखाली त्याचे पिंगट डोळे आत्मविश्वासाने चमकत होते. त्याने ओठात एक सिगार धरली होती आणि तो आरामात त्याचे झुरके घेत होता. कॅप्टनला पाहिल्यावर त्याने त्याच्याशी औपचारिकपणे हस्तांदोलन केले. त्याने माझ्याकडे पाहात वाकून मला अभिवादन केले. माझा चेहेरा पांढरा फटक पडला होता आणि माझ्या हाताला थोडासा कंप सुटला होता. घशाला कोरड पडली होती. मी तोपर्यंत एकदाही द्वंद्व केले नव्हते. “अरे देवा! स्वतःला सावर. त्याला तू भित्रा आहेस असे वाटेल.” मी गर्भगळीतच झालो होतो पण तेवढ्यात मी त्या नालायकाकडे पाहिले आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो माझ्याकडे पाहून चक्क हसत होता. त्या रागाने मला परत ताळ्यावर आणले.

तोपर्यंत आमच्या माणसांनी अंतर मोजले होते आणि मध्यभागी रेषही आखली होती. पिस्तुलेही भरली. हे सगळे काम प्रामुख्याने कॅप्टनच करत होता. बिझमियान्कॉफ फक्त त्याच्यावर लक्ष ठेवत होता. दिवस मस्त होता, न विसरण्यासारखा. निळेशार आकाश हिरव्यागार पानांमधून डोकावत होते. सळसळणाऱ्या पानांच्या आवाजाने मी उत्तेजित झालो. प्रिन्स झाडाच्या एका बुंध्याला टेकून आपली सिगार ओढत होता.

“सद्‌गृहस्थांनो कृपया आपापली जागा घ्या..” कॅप्टन म्हणाला आणि त्याने आमची पिस्तुले आमच्या हवाली केली. प्रिन्सने थोडी पावले टाकली आणि तो थांबला. वळून मला म्हणाला, “तुम्ही अजूनही तुमचे शब्द मागे घेऊ शकता.” मला काहीतरी सणसणित उत्तर द्यायचे होते पण माझ्या घशाला कोरड पडली होती. माझ्या तोंडातून शब्द फुटेना. मी हातानेच त्याला काहीतरी खूण केली. प्रिन्सने परत एकदा हास्य केलं आणि तो आपल्या जागेमागे जाऊन उभा राहिला. आम्ही दोघेही आपापल्या जागेवर येण्यासाठी पावले टाकू लागलो. मी माझे पिस्तूल वर केले. मला माझ्या शत्रूच्या छातीवर नेम धरायचा होता.. पण तेवढ्यात मी पिस्तुलाला थोडेसे अजून वर केले. जणू कोणीतरी माझ्या कोपराला हलकासा धक्का द्यावा तसे..त्याचवेळी मी घोडा ओढला. प्रिन्स जरासा मागे कोलमडला. त्याने डाव्या हाताने त्याचे कपाळ चाचपडले.. कपाळाच्या डाव्या बाजूने रक्ताची बारीक धार लागली होती. त्याचा हातमोजा लालभडक झाला. बिझमियान्कॉफने त्याच्याकडे धाव घेतली.

“काही विशेष नाहीऽऽ ” प्रिन्सने टोपी काढली. टोपीला बारीकसे छिद्र पडले होते. “ती माझ्या डोक्यात गेली नाही म्हणजे फक्त थोडेसेच खरचटले असणार..” तो हसत म्हणाला.

त्याने शांतपणे खिशातून त्याचा पांढराशुभ्र रुमाल काढला आणि त्याच्या रक्ताळलेल्या कुरळ्या केसांवर धरला. मी जागेवरच गोठलो आणि त्याच्याकडे पाहिले.

“मागे जा !” कॅप्टन निर्विकारपणे म्हणाला.
मी अर्थातच त्याचे ऐकले.

“द्वंद्व चालू ठेवायचे आहे का? ” त्याने बिझमियान्कॉफला विचारले.

बिझमियान्कॉफने काही उत्तर दिले नाही पण प्रिन्सने आपल्या कपाळावरचा रुमाल न काढता, माझ्याकडे न बघता उत्तर दिले, “.. नाही संपले ते !” एवढे बोलून त्याने हवेत गोळी झाडली. झालेल्या अपमानाने माझ्या डोळ्यात अश्रू गोळा झाले. त्या माणसाने त्याच्या औदार्याने मला चिखलात लोळवले होते, माझा गळाच चिरला होता. मला निषेध व्यक्त करायचा होता.. त्याने माझ्यावर गोळी झाडावी असे माझे म्हणणे मांडायचे होते पण तो माझ्याकडे आला आणि त्याने माझा हात हातात घेतला व म्हणाला,

“सगळे संपले आहे आणि विसरायचे आहे.. बरोबर?” हे म्हणताना त्याच्या स्वरात कसलीही भावना नव्हती ना त्याचा स्वर उत्तेजित होता.
मी त्याच्या रक्ताळलेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि शरमेने खाली मान घालून त्याच्याशी हस्तांदोलन केले.

“ मला खात्री आहे हे सगळे आपल्यातच राहील आणि याची कुठेही वाच्यता होणार नाही.” प्रिन्स म्हणाला. तेवढ्यात कॅप्टन प्रिन्सला म्हणाला,

“थांबा मला ती जखम बांधू दे.” पण त्याने नम्रपणे नकार देऊन स्वतःच तो रुमाल डोक्याला गुंडाळला. जाताना प्रिन्सने परत माझ्याकडे पाहून मला वाकून अभिवादन केले. माझी हत्याच झाली होती. नैतिकतेने मला आता जगण्याचा काहीही अधिकार उरला नव्हता. मी कसा घरी आलो ते माझे मलाच माहीत..

“पण तुला कसला त्रास होतोय आता?” कॅप्टनने विचारले.

“शांत हो! ती जखम काही खोल नाही. उद्या तो नाचायला लागेल. काळजी करू नकोस. का, तो मेला नाही म्हणून तू अस्वस्थ आहेस? तसे असेल तर त्याची खंत बाळगू नकोस. तो एक चांगल्या स्वभावाचा उमदा माणूस आहे. त्यामुळे झाले ते ठीकच झाले.” कॅप्टन म्हणाला.

“ पण त्याने मला का सोडले?” शेवटी मी पुटपुटलो.

“ असं आहे तर! देवा रे! या प्रेमिकांपासून मला वाचव रे बाबाऽऽ नाहीतर हे त्या वेडापायी माझा जीव घेतील एक दिवस.” कॅप्टन हसत हसत म्हणाला.

त्या संध्याकाळी माझी जी तडफड झाली, मनात जी उलाघाल झाली त्याबद्दल मी निश्चितच लिहिणार नाही. माझा आत्मसन्मान नष्ट झाला होता आणि माझ्या अभिमानाला ठेच लागली होती. माझे मन मला खात होते म्हणून मी अस्वस्थ नव्हतो तर माझ्या मूर्खपणाच्या सारख्या होणाऱ्या जाणीवेने मी अस्वस्थ होत होतो.
“मीच याला जबाबदार आहे. मीच जबाबदार आहे...” मी पुटपुटत माझ्या खोलीत येरझारा घातल्या... किती वेळ ते मला आठवत नाही. प्रिन्स माझ्या हातून जखमी झाला आणि तरीही त्याने मला क्षमा केली. आता लिझा त्याचीच झाली म्हणायची. तिला आता कोणीही वाचवू शकत नाही ना तिला या खाईत पडण्यापासून कोणी रोखू शकत.” कितीही म्हटले तरी आमच्या द्वंद्वाची कहाणी लपून राहू शकणार नाही याची मला कल्पना होती. लिझापासून तर नाहीच नाही. “या संधीचा फायदा न उठविण्याइतका तो मूर्ख नाही.” मी मनात म्हटले. पण त्याबाबतीतही मी खोटा पडलो. आमच्या द्वंद्वाची कहाणी कर्णोपकर्णी झाली होती पण त्याला प्रिन्स जबाबदार नव्हता. दुसऱ्या दिवशी तो डोक्याला बॅडेज गुंडाळून लिझाला भेटण्यास गेला होता, सांगायचे कारणही तयार होते पण लिझाला सगळा प्रकार आधीच माहीत झाला होता. कदाचित बिझमियान्कॉफने आमचा विश्वासघात केला असेल काय माहीत. पण एवढ्या छोट्या गावात काही लपून राहील अशी आशा बाळगणे भाबडेपणा ठरेल. हा सगळा प्रकार लिझाने कसा सहन केला असेल आणि त्या कुटुंबाने कसा निभावला असेल याबद्दल तुम्ही सहज कल्पना करू शकाल. माझ्या बाबतीत बोलायचे तर आख्खे गाव माझ्याकडे एखादा राक्षस असल्यासारखे पाहू लागले. खलनायक, मत्सरी, रानटी अशा शेलक्या विशेषणांनी माझी अवहेलना होऊ लागली. माझी जी काही ओळखीची माणसे होती त्यांनी मला एखाद्या महारोग्यासारखे वाळीत टाकले! शहराच्या अधिकाऱ्यांनी प्रिन्सकडे मला शिक्षा देण्यासाठी परवानगी मागितली पण शेवटी प्रिन्समुळेच ते संकट टळले. या माणसाच्या नशिबातच माझी अवहेलना करण्याचे लिहिले असावे बहुधा. त्याच्या औदार्याने त्याने मला गप्प बसवले होते. त्याने माझ्या शवपेटीवरचे झाकण अगदी उघडता येणार नाही असे घट्ट बंद केले. ओझोगिनचे घर मला ताबडतोब बंद करण्यात आले हे सांगण्याची गरज नाही. लिझाच्या वडिलांनी माझी तेथे राहिलेली एक पेन्सिलही परत केली आणि तेथे परत पाऊल ठेवायचे नाही हे बजावून सांगितले. दमच भरला म्हणा ना! त्यांना एवढे चिडायचे काही कारण नव्हते. उलट त्यांनी माझे आभारच मानले पाहिजे होते. या प्रकरणामुळे लिझा आणि प्रिन्सकडे लोक वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. लिझाच्या वडिलांना जे जमले नसते ते माझ्या मत्सरी स्वभावाने त्यांना सहज करून दिले. लिझाच्या आणि प्रिन्सच्या नात्यावर आता समाजाचा शिक्का बसला तो माझ्यामुळे. या आधी त्यांनी लग्नाची बोलणी केली असती तर मला वाटते त्यांना नकारच मिळाला असता.. पण प्रिन्सने अक्कलहुशारीने त्या नवीन भूमिकेशी जुळवून घेतले..

पण मी... माझ्यापुरते आणि माझ्या भविष्याबद्दल बोलायचे तर मी दुःखाने वेडापिसा झालो आणि मला माझ्या भविष्यात अंधाराशिवाय दुसरे काही दिसेना. जेव्हा वेदना या टोकाला पोहोचतात तेव्हा माणूस आतून तुटतो.. एखादी वाळलेली काडी तुटावी तसा. एखादी जास्त भरलेली गाडी जशी कुरकुर करते तसे त्याच्या तोंडून उसाशांशिवाय दुसरे काहीही बाहेर पडत नाही. अशावेळी अशा माणसांनी खरे तर शांत राहावे, हास्यास्पद होऊ नये. पण नाही. या जगात हास्य अश्रूंची सोबत अश्रू आटेपर्यंत करते आणि दोन्ही मिळून तुमची दमछाक करतात. अगदी पार शेवटपर्यंत, तेव्हा तुमचा आक्रोश मरतो. पण तुम्ही म्हणाल काय भ्रमिष्ट झाल्यासारखा बोलतोय, आणि मीही आता या रडगाण्याला कंटाळलो असल्यामुळे मी आता थांबतो... असेल देवाच्या मनात तर माझी कहाणी उद्याही संपू शकेल...

मार्च २९..काल रात्री बर्फ वितळला पण आत्ता भुरुभुरु पडतोय थोडासा.
काल रात्री मी रोजनिशी लिहू शकलो नाही. गोगोलच्या नायकासारखा (डायरी ऑफ ए मॅडमन) मी अंथरुणावर पडून होतो आणि तारन्तिव्हाशी गप्पा मारत होतो. या म्हातारीची पण कमाल आहे. साठ वर्षापूर्वी तिचा नवरा प्लेगने मेला. नंतर लगेचच तिची सर्व मुले मेली पण ही अजून जिवंत आहे. तिने या जगात अडवलेल्या जागेसाठी तिला क्षमा करायला हवी. ती दिवसभर मनात आले की पाहिजे तेवढा चहा ढोसते. भरपूर जेवते आणि थंडीपासून रक्षणासाठी तिच्याकडे पुरेसे कपडे आहेत. कालच्या प्रकरणाबद्दल ती माझ्याशी बोलली असेल अशी तुम्हाला शंका येईल पण ती माझ्याशी वाद घालत होती तो माझ्या एका जुन्या भोके पडलेल्या कोटाबद्दल जो कीव येऊन मी दुसऱ्या म्हातारीला दिला होता. तिचे म्हणणे होते की त्यावर फक्त तिचाच अधिकार आहे.. कारण इतकी वर्षे तिने मला सांभाळले...इ.इ. पण ते सोडून आपण माझ्या कथेकडे वळू या...

...मागील पायावरुन गाडी गेलेलं कुत्र जसं तडफडतं तसा मी तडफडत होतो. ओझ्ाोगिनच्या घरातून हाकलून दिल्यावर एक गोष्ट मात्र मला कळली. झालेल्या जखमा कुरवाळतही माणसाला सुख मिळविण्याचा नाद लागतो. आपल्या जमातीची अवस्थाच शोचनीय आहे हे सत्य आहे. आपली जमात म्हणजे पुरुषांची! पण हे जरा तात्विक झाले नाही का? मी दिवसांमागून दिवस एकांतवासात काढू लागलो. मी बाहेर पडत नसे आणि मला ओझ्ाोगिनच्या हवेलीत काय चालले आहे किंवा प्रिन्सचे हालहवाल काय आहेत याची कल्पना यायचे काही कारण नव्हते. माझ्या गाडीवानाची त्याच काळात त्याच्या गाडीवानाच्या मावशीची ओळख झाली. त्यामुळे मला त्या हवेलीतील बातम्या कळत तर कधीकधी मला त्या घरातील माणसेही बाजारात दिसत, अर्थात मी गेलो तर! कधी कधी मला प्रिन्स आणि बिझ्ामियान्कॉफही भेटत. त्यांना मी दुरुनच अभिवादन करीत असे पण मी बोलणे टाळत असे. त्यानंतर मी लिझ्ााला एकूण तीन वेळा पाहिले; एकदा ती तिच्या आईबरोबर स्त्रियांच्या हॅटच्या दुकानात आली होती. एकदा ती तिच्या वडिलांबरोबर त्यांच्या बग्गीतून चालली होती आणि बरोबर तिची आई आणि प्रिन्सही होते. शेवटचे पाहिले ते चर्चमधे. माझा तिला भेटण्याचा काही धीर झाला नाही. मी आपले तिला दुरुनच न्याहाळले. दुकानात ती आनंदी दिसत होती आणि स्वतःसाठी काहीतरी विकत घेत होती आणि रंगीबेरंगी रिबीनी घालून पाहात होती. तिची आई तिच्याकडे कौतुकाने हसत पाहात उभी होती. दुसऱ्या वेळी ती आणि प्रिन्स बग्गीत पुढच्या बाजूला बसले होते तर तिचे आईवडील मागच्या बाजूला. ते दृष्य मी कधीच विसरणार नाही. लिझ्ााचा चेहरा नेहमीपेक्षा फिकट पडला होता. तिच्या गालावरची लाली आता निरखून पाहिली तरच दिसत होती. ती प्रिन्सशी त्याच्यावर रेलून बोलत होती. मान वाकवून मोठ्या प्रेमाने ती प्रिन्सच्या डोळ्यात पाहात होती, जणू डोळ्याने ती त्याच्याशी बोलत होती. मला तरी वाटले की ती त्या क्षणी स्वतःला प्रिन्सला अर्पण करत होती. त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकत होती. प्रिन्सच्या चेहऱ्याकडे नीट पाहाण्यास मला वेळ मिळाला नाही कारण त्यांची गाडी तेवढ्यात माझ्यासमोरून निघून गेली. पण जेवढा त्याचा चेहरा मला दिसला तेवढ्यावरून तरी मला तोही भावूक झालेला वाटला.

तिसऱ्या वेळी ती मला चर्चमधे दिसली. तिला प्रिन्सबरोबर पाहून दहा एक दिवस झाले असतील. आमच्या द्वंद्वाला तीन आठवडे झाले असतील. ज्या कामासाठी तो या गावात आला होता ते तर केव्हाच झाले होते. पण त्याने परत जाण्याचे लांबणीवर टाकले होते; त्याने म्हणे तो आजारी पडल्याचा अहवाल पाठवला होता. सगळे गाव तो लिझ्ााला लग्नाची मागणी केव्हा एकदा घालतोय त्याची वाट पाहात होता. मी स्वतः त्या बातमीची वाट पाहात होतो. एकदा का तो शेवटचा घाव माझ्यावर पडला की खेळ खल्लास. आख्खा गाव माझा शत्रू असल्यासारखा माझ्याशी वागत होता. मी गावात जाऊ शकत नव्हतो म्हणून मी अंधार पडल्यावर गावाबाहेर फिरण्यास जात असे. एकदा मात्र मी दुपारीच बाहेर पडलो. आकाशात ढग जमा झाले होते आणि पावसाची शक्यता होती. परत येताना पाऊस आलाच आणि मी चर्चमधे आसरा घेतला. संध्याकाळची प्रार्थना नुकतीच सुरु झाली होती. पावसाच्या चिन्हांमुळे फार थोडी माणसे जमा झाली होती. मी आजूबाजूला नजर फिरवली आणि तेवढ्यात एका खिडकीत मला परिचित आकृती दिसल्याचा भास झाला. मी नीट निरखून पाहिले. प्रथम मी तिला ओळखलेच नाही. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता, नजर शून्यात लागली होती, गाल खपाटीस गेले होते. “दोन आठवड्यापूर्वी मला दिसलेली लिझा, ती हीच होती का?” मी स्वतःला विचारले. तिने अत्यंत जाडेभरडे कपडे घातले होते आणि डोक्यावर हॅटही नव्हती. तिच्या चेहऱ्याची एक बाजू अंधारात होती तर एक बाजू दुधी काचेच्या तावदानातून पडणाऱ्या प्रकाशात उदास दिसत होती. ती भिंतीवरील मूर्तींकडे पाहात प्रार्थना करण्याचा निकराचा प्रयत्न करत होती. असं वाटत होती की ती निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. शेजारीच तिचा शरीररक्षक मागे हात बांधून आपल्या अर्धवट गुंगीत असलेल्या मालकिणीकडे आश्चर्याने पाहात उभा होता. तिची अवस्था पाहून माझ्या अंगावर काटाच आला. मी तिच्या दिशेने काही पावले टाकली पण कुठल्यातरी अनामिक भीतीने मी थबकलो. लिझा तेथेच अजूनही स्तब्ध उभी होती. बऱ्याच वेळाने तिच्या नोकराने तिच्या गाऊनला हलकेच स्पर्ष केला. तिने डोळे उघडले इकडे तिकडे पाहिलं, चेहेऱ्यावरून हात फिरवला आणि ती हळूहळू पावले टाकत तेथून निघून गेली. मी तिच्या माझ्यात अंतर ठेऊन तिच्या घरापर्यंत गेलो आणि मग घरी परतलो.

घरात शिरताच मी दिवाणावर स्वतःला झोकून दिले. “तिची पार कळा गेलीये! वाटोळं झालंय तिचे!” मी उद्वेगाने म्हणालो. मी खंतावून जमिनीवर नजर लावली पण त्या दुःखातही माझ्या मनात कुठेतरी बरं वाटत होतं. हे अर्थात मी कबूल करतोय कारण मी हे सगळे स्वतःसाठी लिहितोय म्हणून. या सगळ्या प्रकरणाने माझा आत्यंतिक छळ केला होता. मला सतत काहीतरी वाईट घडेल असे वाटत असे आणि कदाचित तसे झाले नसते तरच मला आश्चर्य वाटले असते.“ माणसाचे ह्रदय हे असे असते...” अशी ओळ माझी अवस्था पाहून कोणीही लिहिली असती. पण त्याची कोण पर्वा करतंय म्हणा.

शेवटी काहीतरी वाईट घडेल असे जे मला सारखे वाटत होते ते प्रत्यक्षात घडले एकदाचे. गावात बातमी पसरली की पिटर्सबर्गवरून आदेश आल्यामुळे प्रिन्स गावातून निघून गेला आहे. त्याने जाण्याआधी लिझा किंवा तिच्या आईवडिलांपुढे लग्नाचा कसलाही प्रस्ताव ठेवलेला नाही. लिझा रडत, कसेबसे दिवस व्यतीत करीत होती. प्रिन्सचे निघून जाणे अत्यंत अनपेक्षित होते. त्याच्या गाडीवानालाही आदल्या संध्याकाळपर्यंत तो जाणार आहे याचा पत्ता नव्हता. (असे माझ्या नोकराचे म्हणणे होते.) ही बातमी ऐकताच माझ्या मनाची उलघाल झाली. मी पटकन कपडे केले आणि ओझोगिनच्या घरी जाण्यास निघालो पण परत एकदा थबकलो. “लगेच जाणे सभ्यपणाचे होणार नाही” मी विचार केला. पण त्या दिवशी न जाऊन माझे विशेष नुकसान झाले नाही कारण त्याच संध्याकाळी मला एक ‘पांडोपायपोपुलो’ नावाचा एक ग्रीक माणूस भेटायला आला. हा काही कारणाने गावात अडकून पडला होता. या माणसाला गप्पाटप्पा, कुचाळक्या करण्याची अत्यंत हौस. या द्वंद्वाच्या प्रकरणात माझी सगळ्यात जास्त बदनामी केली असेल तर याने. पण आज मात्र तो माझ्या घरात न सांगता सवरता घुसलाच. आल्या आल्या त्याने माझा हात हातात घेतला व माझ्याशी जोरजोरात हस्तांदोलन केले. न सांगता आल्यामुळे माझी हजारवेळा माफी मागितली. माझे तोंड फाटेपर्यंत कौतुक केले. माझ्या धाडसाचे, निर्भयतेचे कौतुक केले व त्याचवेळी प्रिन्सची तोंड भरून निर्भत्सना केली. त्याला खलनायक म्हटले, नालायक म्हटले. ओझोगिनलाही त्याने शेलक्या शिव्या दिल्या. “दैवाने बरी चांगली शिक्षा दिली...त्याच लायकीचा आहे तो...इ. इ.” असेही म्हणाला. जाता जाता त्याने लिझाबद्दलही गरळ ओकली आणि आला तसा निघून गेला... पण त्याने मला सांगितले की ओझोगिनने प्रिन्सकडे त्याच्या आणि लिझाच्या लग्नाची गोष्ट काढली होती पण त्याने अत्यंत त्रयस्थपणे त्याला सांगितले, “मी कोणाला फसवू शकत नाही... मी लिझाला काय, कोणालाच कधीच लग्नाचे वचन दिलेले नाही.” एवढे बोलून त्याने ओझोगिनला लवून अभिवादन केले आणि त्यानंतर तो परत कोणालाच दिसला नाही.

दुसऱ्याच दिवशी मी ओझोगिनच्या हवेलीवर पोहोचलो. मला पाहताच दरवानाने ताडकन उठून आत धूम ठोकली व लगेचच परत आला. “तुम्ही आत जाऊ शकता” त्याने खालच्या आवाजात सांगितले. मी ओझोगिनच्या अभ्यासिकेत गेलो....

उरलेले उद्या.

अनुवाद: जयंत कुलकर्णी . १४/११/२०२२

कथालेख

प्रतिक्रिया

पाचही भाग सलग वाचले त्यामुळे जास्त मजा आली 👍
बऱ्याच दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले ह्याचा आनंद आहेच.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

कर्नलतपस्वी's picture

19 Nov 2022 - 8:16 pm | कर्नलतपस्वी

सलग वाचले म्हणजे संदर्भ डोक्यात असतो.
छान अनुवाद आहे.

श्वेता२४'s picture

18 Nov 2022 - 11:19 am | श्वेता२४

मीही पाचही भाग सलग वाचून काढले. सामान्य माणसाची रोजनिशी बरीच रंजक आहे. पु.भा.प्र.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत! छान लिहिलय