एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Nov 2022 - 6:30 pm

image host

इव्हॅन तुर्गेनेव्ह
(९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३)
Turgenev: The Novelist's Novelist

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ३

...आम्ही बराच वेळ फेरफटका मारला. संध्याकाळ झाली आणि तोपर्यंत आम्ही फार कमी बोललो होतो. अनुभव नसलेले प्रेमिक जसे गप्प असतात तसा मीही चूपचाप चालत होतो आणि तिला बहुधा मला काही सांगायचेच नसेल. पण ती कशावर तरी विचार करीत होती खास ! मधूनच ती मान हलवत होती आणि जे पान तिने तोडले होते त्याच्याशी चाळा करत होती. मधेच ती काहीतरी निर्णय घेतल्यासारखे भराभरा पुढे जायची आणि एकदम माझ्यासाठी थांबायची. भुवया उंचावून माझ्याकडे पाहायची आणि लोभस, अर्थहीन हसायची. कालच संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून टॉलस्टॉयची ‘प्रिझनर ऑफ कॉकेशस’ वाचली होती. किती उत्सुकतेने आणि लक्ष देऊन ती माझे बोलणे ऐकत होती. नाजूक हातावर हनुवटी रेलून ती माझे बोलणे ऐकत होती आणि तिचे उरोज टेबलावर विसावले होते! म्मोठे लोभस दृष्य! कालच्या वाचनाबद्दल तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; ती लाजली. काहीतरी विचारायचे म्हणून तिने विचारले,

“तुम्ही निघताना बुलफिंचला काही रायचे दाणे टाकले होते का?”

एवढे विचारून तिने कुठले तरी गाणे तिच्या सुमधूर आवाजात गुणगुणण्यास सुरुवात केली पण ती लाजून लगेचच गप्प झाली. ती राई पार करून आम्ही एक चढ चढून एका कड्यावर आलो. खाली वळणे घेत एक नदी वाहात होती आणि त्याच्या पलिकडे नजर जेथपर्यंत पोहोचत होती तेथपर्यंत गवताचे अफाट कुरण पसरले होते. वारा आला की पाण्यावर लाटा उठाव्यात तशा लाटा त्या गवतावर उठत होत्या तर वारा पडल्यावर एकदम चादर पांघरल्यासारखे ते स्तब्ध होई. त्या गवतात मधे मधे छोट्या छोट्या घळी एकमेकात मिसळत होत्या. या कड्यावर आम्ही म्हणजे मी आणि लिझा प्रथम पोहोचलो; ते दोघे मागे राहिले कारण मादाम ओझोगिन तशा हळूहळू चालत होत्या. आम्ही बाहेर आलो आणि थांबलो. आमचे डोळे आपोआप किलकिले झाले. आमच्या समोर लाल रंगाच्या ऊबदार धुक्यात सूर्याचे लालबुंद बिंब समोरच्या डोंगरात बुडत होतं. क्षितिज आणि आकाशाला जणू आगच लागली होती. तिरप्या सूर्यकिरणांमुळे त्या कुरणातील अंधाऱ्या जागाही उजळून निघाल्या होत्या आणि जेथे पाणी गवतात लपले नव्हते तेथे ते सोनेरी शाल पांघरून त्या घळीच्या कुशीत विसावले होते. स्तब्ध! आम्ही तेथे त्या तेजात निथळत उभे होतो. त्या निसर्ग सोहळ्याचे वर्णन करणे माझ्या शक्तिच्या पलिकडचे आहे. मला तर वाटते त्या दृष्याचेे कोणीच वर्णन करू शकणार नाही. असे म्हणतात, आंधळ्या माणसाच्या पापण्यांवर सूर्यप्रकाश पडला की त्याला ट्रंपेट वाजल्याचा भास होतो. हे खरं आहे का खोटं, याची मला कल्पना नाही पण त्या दिवशी त्या लाल तेजामधे, कसलेतरी आव्हान होते हे निश्चित. मी आनंदाने चित्कारलो व लगेचच लिझाकडे पाहिले. ती थेट सूर्याकडे पाहात होती. तिच्या डोळ्यात सूर्याची टिंबांएवढी प्रतिबिंबे चमकत होती. ते दृष्य पाहून ती अवाक झाली होती, तिला त्या दृष्याची धुंदी चढली होती. तिने मला कसलाच प्रतिसाद दिला नाही. फार वेळ सूर्याकडे न पाहता तिने मान खाली झुकवली. मी माझा हात तिच्यापुढे केला; ती वळली आणि तिला एकदम रडू फुटले. मी तिच्याकडे स्तिमित होत पाहात राहिलो. तेवढ्यात काही पावलांवर बिझमियान्कॉफचा आवाज आला आणि तिने स्वतःला सावरले. घाईघाईने डोळे पुसले आणि थरथरत्या, अश्रूंनी थबथबलेल्या पापण्यांमधून, माझ्याकडे एकदा पाहिले. मादाम ओझोगिन, बिझमियान्कॉफच्या हाताचा आधार घेत, हळूहळू चढ चढत वर आल्या आणि त्या दोघांनीही तो देखावा डोळे भरून पाहिला आणि निसर्गाचे गोडवे गायले. मग त्या वृद्धेने लिझाला काही प्रश्न विचारले आणि तिनेही काही उत्तरे दिली. मला आठवतंय लिझाचा कापरा आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तोपर्यंत उजेड कमी होऊ लागला आणि आम्ही माघारी फिरलो. मी परत लिझाच्या हातात हात दिला. राईमधे अजून पुरेसा उजेड होता आणि मला तिची अंगकाठी स्पष्ट दिसत होती. बिचारीला लाजिरवाणे वाटत असावे कारण तिने डोळे अजून वर केले नव्हते. तिचा उजळलेला चेहरा मला अंधारातही स्पष्ट दिसत होता जणू काही ती अजून त्या सूर्यकिरणांखालीच न्हात होती. पण तिचा हात आता माझ्या हाताला स्पर्ष करीत नव्हता. बराच वेळ गेला आणि माझे ह्रदय इतक्या जोरजोरात धडधडत होते की मला बोलायचे होते तरी शब्द सुचत नव्हते.
झाडांमधून आम्हाला आमची बग्गी दिसू लागली. गाडीवान वाळूच्या रस्त्यावरून ती बग्गी हाकत आमच्याकडेच येत होता..“लिझाव्हेटा किरिलोव्हना” मी शेवटी न राहावून विचारले,

“तुम्ही का रडला?”

“मलाच माहीत नाही.” थोडावेळ विचार करून ती म्हणाली. हे म्हणताना तिच्या डोळ्यात अजून अश्रू होते पण नंतर तिच्या नजरेत कसलासा बदल झाला आणि ते परत
निर्जिव झाले.

“तुम्हाला निसर्ग आवडतोय असं दिसतंय.” मी बडबडलो. खरे तर मला तसलं काहीच म्हणायचे नव्हते म्हणून मी शेवटचे शब्द ओठातल्या ओठात पुटपुटलो. तिने मान हलवली. त्यानंतर मात्र मी एकही शब्द बोलू शकलो नाही. मी कशाची तरी वाट पाहात होतो. प्रेमाच्या कबुलीची किंवा ती कबुली देणाऱ्या नजरेची तरी. पण लिझाने जी मान खाली घातली ती परत वर केली नाही. मी परत एकदा तिला बोलते करण्याचा निष्फळ प्रयत्न केला, “पण का रडलीस?” माझ्या या प्रश्नाने तिला स्वतःची शरम वाटली. हो! मी पाहिले ना!

पंधरा मिनिटात आम्ही सगळे बग्गीत बसून घराकडे निघालो होतो. परतीच्या मार्गावर घोड्यांनी दुडकी चाल धरली होती. आम्ही रात्रीची दमट हवा कापत घराकडे चाललो होतो. मी अचानक बडबडण्यास सुरुवात केली. कधी बिझमियान्कॉफशी बोल तर कधी लिझाच्या आईशी बोल. बोलताना मी लिझाकडे एकदाही पाहिले नाही ना तिला उद्देशून काही बोललो. पण तिने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही हे मला समजत होते. घरी परतल्यावर ती सावरली पण तिने नंतर माझ्याबरोबर वाचन करण्याचे टाळले आणि ती झोपायला गेली. मी ज्या दुभंगलेल्या नजरेविषयी बोललो होतो ती भावना आता तिच्या मनात उतरलेली दिसत होती. ती आता लहान राहिली नव्हती. माझ्यासारखी तिलाही कशाची तरी अपेक्षा होती. तिला फार काळ थांबावे लागले नाही.

पण त्या रात्री मी तरंगतच घरी आलो. माझ्या मनातील सगळ्या शंका फिटल्या, मनातील गोंधळ संपला, सगळ्या शंका दूर झाल्या. लिझामधील बदल हा स्त्रियांमधील लाजरेपणा आणि घरंदाजपणामुळे आला असणार हे मी मनोमनी जाहीर करून टाकले. मी हे अनेक वेळा कथा कादंबऱ्यांतून वाचले नव्हते का? प्रेमाच्या पहिल्या अनुभवाने कुठलीही स्त्री प्रथम बावचळून जाते आणि मग शंकेखोर होते. हे ठरल्यामुळे मी मनोमन खूष झालो आणि पुढील आयुष्याचे इमले बांधायला लागलो.
पण कोणी माझ्या कानात खरं काय आहे ते कुजबुजले, “मित्रा, हे सगळे तुझ्यासाठी नाही. तू या म्हातारीच्या संगतीतच या भयाण घरात शेवटचा श्वास घेणार. ही म्हातारीही तुझ्या मरणावरच टपलेली आहे. एकदा का तू मेलास की ती तुझे बूट विकण्यास मोकळी.”

रशियन भाषेत म्हणच आहे, “ जे माहीत नाही हे एखाद्याला कसे माहीत असणार...” असो उद्या बघू...

मार्च २५. बर्फाची पांढरीशुभ्र दुलई.
मी काल जे काही लिहिले होते ते वाचल्यावर मी सगळी वहीच फाडण्याच्या बेतात होतो. मला वाटले माझी सांगण्याची रीत कंटाळवाणी आणि नको तितकी भावनाप्रधान आहे. पण दुर्दैवाने माझ्या त्या काळातील इतर आठवणीत दुःखाशिवाय काही नसल्यामुळे ‘लेरमॉन्टॉफ’ म्हणतो त्याप्रमाणे जुन्या जखमांच्या व्रणांना कुरवळल्यावर वेदना होतात आणि आनंदही मिळतो. मग मी का माझ्या जखमांच्या खपल्या काढू नको? पण लोकांनी सहानुभूती दाखवावी असे मला मुळीच वाटत नाही म्हणून मी आता त्रयस्थ म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

त्या बर्चच्या राईतील सैर होऊन आठवडा उलटला आणि माझ्या स्थितीत मात्र काहीच बदल झाला नाही पण लिझामधील बदल मात्र मला दिवसेंदिवस जाणवत होता. मी अगोदरच सांगितले आहे की या बदलाचा मी माझ्या सोयीचा, पुरुषी अहंकाराला अनुसरून, विपरीत अर्थ लावला होता. एकलकोंड्या आणि बुजऱ्या म्हणजे जे स्वतःवरील प्रेमामुळे भित्रे झालेले असतात त्यांचे दुर्दैव हे असते की त्यांनी कितीही डोळे मोठे केले तरी त्यांना जे पाहिजे तेच दिसते. एखाद्या रंगीत काचेतून पाहिल्यासारखे. ही काच डोळ्यासमोरून काढता येते हे त्यांच्या गावीही नसते त्यामुळे त्यांचे विचार आणि त्या विचारांचे रंग त्यांच्या पावलोपावली अडथळे निर्माण करतात.

आमची ओळख झाली तेव्हा लिअचा माझ्यावर विश्वास होता आणि ती माझ्याशी मनमोकळेपणाने वागत असे. एखाद्या लहान मुलीसारखे; तिला मी आवडत होतो, पण त्यात एखाद्या लहान मुलीची निरागसता किंवा ओढ होती. पण तिच्यात ज्या क्षणी तो बदल झाला तेव्हापासून तिला माझ्या संगतीत अवघडल्यासारखे वाटू लागले. तिने ते बोलून दाखवले नाही, पण ती अचानक अजाणतेपणे मला टाळू लागली. तिला काहीतरी पाहिजे होते. पण काय? बहुतेक ते तिलाच माहीत नव्हते. पण मी मात्र तिच्यावर आलेल्या या संकटाने मोहरून उठलो होतो. आनंदाने बेहोष झालो होतो. पण माझ्या जागी कोणीही असते तर त्याचीही अशीच अवस्था झाली असती. तोही असाच फसला असता. स्वतःवर कोण प्रेम करत नाही? माझे जखमी पंख मिटल्यावर हे मला सगळे उमजले असे म्हणण्यात आता काही अर्थ नाही. कारण खरे सांगायचे तर माझ्या पंखात तेवढे बळच नव्हते.

माझ्यात आणि लिझात जो गैरसमज निर्माण झाला होता तो एक पूर्ण आठवडाभर टिकला. अर्थात त्यात काही आश्चर्य नाही म्हणा. माझ्यासारख्या माणसांचे असले एकतर्फी गैरसमज वर्षभरही टिकू शकतात. कोण बरं म्हटले होते की सत्य हे नेहमीच वास्तव असते... असत्य हे सत्याइतकेच वास्तव (जरी जास्त नसले तरी) आहे. मला आठवतंय आठवडाभर माझ्या ह्रदयात तिच्या आठवणीने हूरहूर होत होती. पण माझ्यासारख्या एकाकी माणसाला त्याच्या डोळ्यासमोर काय घडते आहे हे समजू शकते, पण आत काय चालले आहे हे मात्र त्याला उमजू शकत नाही आणि शिवाय अजून एक महत्वाचा प्रश्न आहे , “प्रेम करणे हा पुरुषाचा स्थायिभाव आहे का? ते नैसर्गिक आहे का?” प्रेम हा एक रोग आहे आणि रोगासाठी कुठेही कसलेही नियम लिहिलेले नाहीत. समजा माझ्या ह्रदयाचा ठोका कधी कधी चुकला असेल; पण त्या वेळेस माझ्या शरीरात उलथापालथ झालेली असते. अशावेळी माणसाला काय बरोबर आणि काय चूक हे कसे उमजणार, त्याच्या मागची कारणे कशी समजणार? प्रत्येक वेगवेगळ्या जाणीवेचा अर्थ कसा काय उमजणार त्याला?

पण हे सगळे समज गैरसमज, चिंता एका दिवशी दूर झाल्या खऱ्या. एका दिवशी मला आठवतंय सकाळ होती, साधारण ११ वाजले असतील. मी ओझोगिनच्या घरात पाऊल टाकणार तेवढ्यात मला आतून एक अनोळखी मोठा आवाज ऐकू आला. दरवाजा उघडला आणि घराच्या मालकाबरोबर एक रुबाबदार तरूण बाहेर आला. त्याचे वय असेल अंदाजे २५. त्याने तेथेच एका बाकावर पडलेला त्याचा मिलिटरी कोट अंगावर घाईघाईने चढवला. किरिला मॅटव्हेव्हिचचा आपुलकीने निरोप घेतला व बुटांचा खाडखाड आवाज करीत बाहेर पडला. जाताजाता त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले व त्याच्या टोपीला हात लावला.

“कोण?” मी ओझोगिनला विचारले.

“राजघराण्यातील एक सरदार! प्रिन्स!” त्याने चिंतातूर चेहेऱ्याने उत्तर दिले. “पिटर्सबर्गमधून याला सैन्यात रंगरूट भरती करण्यासाठी पाठवले आहे म्हणे. अरे पण आपले नोकर कुठे उलथले? त्याला कोट चढविण्यासाठी कोणी पुढे कसे नाही आले?”

मग आम्ही हॉलमधे प्रवेश केला.

“याला येऊन बरेच दिवस झालेत का?” मी संशयाने विचारले.

“कालच संध्याकाळी आलेत म्हणेे. मी त्यांना माझ्या घरातील एक खोली देऊ केली पण त्यांनी नकार दिला. मोठा उमदा माणूस दिसतोय.”

“तुमच्याकडे किती वेळ होते ते?” मी परत विचारले.

“एक तासभर असेल. त्यांनी मला ऑलिपिया निकितिनाशी ओळख करून देण्याची विनंती केली.”

“मग दिली का तुम्ही ओळख करून?”

“अर्थातच..”

“आणि त्याची आणि लिझाव्हेटाशी ओळख झाली का नाही?” मी सहज विचारतोय असं भासवत विचारले.

“अर्थातच झाली ना! तिच्याशी पण त्याची ओळख झालीच.” मी थोडावेळ काहीच बोललो नाही.

“ते येथे किती दिवस राहणार आहेत? काही कल्पना?” मी विचारले.

“दोन तीन आठवडे राहायला लागेल अस वाटतंय खरं.” एवढं बोलून ते कपडे बदलण्यासाठी घाईघाईने वर गेले.

मी हॉलमधे विचार करत बऱ्याच येरझारा घातल्या. या माणसाच्या येण्याने माझ्यावर फार काही परिणाम झाला नाही. म्हणजे त्या दृष्टिकोनातून. एखादा अपरिचीत माणूस आपल्या वर्तुळात घुसला तर जेवढा परिणाम होतो तेवढा अर्थातच झाला. कदाचित मॉस्कोच्या सामान्य माणसाला पिटर्सबर्गच्या उमद्या अधिकाऱ्याचा हेवा वाटल्यामुळे थोडाफार परिणाम झालाही असेल. हा राजपुत्र आमच्याकडे क्षुद्र म्हणूनच पाहणार. मी त्याला काही क्षणच पाहिले असणार, पण तेवढ्यात तो रुबाबदार, तरतरीत आणि रीतिरिवाजात तरबेज आहे हे मी जाणले.

त्या हॉलमधे येरझारा घालताना मी एका आरशासमोर थांबलो. खिशातून एक छोटा कंगवा काढून मी माझे केस जरा विसकटले आणि माझ्या छबीकडे पाहात मी अचानक तंद्रीमधे माझ्या रुपाचा विचार करू लागलो. मला आठवतंय माझे जास्त लक्ष माझ्या नाकाकडे गेले होते. त्या फताड्या नाकामुळे माझा चेहेरा अजूनच मोठा दिसत होता. तेवढ्यात आरशात मला दरवाजा किलकिला झालेला दिसला. दरवाजा उघडला आणि लिझा त्यात अवतरली. मला माहीत नाही, की तिला पाहताच मी का वळलो नाही आणि तिला का अभिवादन केले नाही ते. मी आरशात तिला न्याहाळत होतो. लिझाने दरवाजातून मान डोकावली आणि माझ्याकडे पाहिले. भुवया उंचावून, तिने दाताखाली ओठ चावला आणि श्वास रोखून, हलक्या पावलाने ती दरवाजामागे नाहीशी झाली. जाताना दरवाजाचा आवाज होणार नाही याची काळजी घेत तिने तो लोटून घेतला. नजरेसमोर नको असलेल्या माणसाशी बोलावे लागू नये म्हणून त्याला टाळताना जसा चेहरा होतो तसा भाव तिच्या चेहेऱ्यावर उमटला. शंकाच नाही. जास्त कटकट न होता सुटका झाली याचा आनंद तिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसला. थोडक्यात काय ती मुलगी माझ्या प्रेमात पडली नव्हती हेच खरे. बराच वेळ मी त्या निर्जीव दरवाजावरची नजर काढू शकलो नाही. मग त्याचे आरशात एक पांढऱ्या डागात रुपांतर झाले. मी आरशात माझ्या प्रतिमेकडे पाहिले, मान खाली घातली व घरी परतून माझ्या दिवाणावर अंग झोकून दिले. माझे ह्रदय भरून आले होते. इतके की मला श्वास घेणेही जड जात होते आणि रडताही येत नव्हते. पण कशासाठी मला रडायचे होते? “काय असेल...” हाताची छातीवर घडी घालून, दिवाणावर उताणा पडून, मी परत परत स्वतःला विचारत राहिलो. “असेल का ते तसे? असेल का ...?”

मार्च २६ बर्फ वितळतोय...
दुसऱ्या दिवशी बराच विचार करून आणि स्वतःची समजूत काढून मी ओझोगिनच्या घरात पाऊल ठेवले. दोन आठवड्यापूर्वी जसा मी त्यांना वाटलो होतो तसा मी आता राहिलो नव्हतो. माझ्या जुन्या सवयींपासून, मी माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रेमभावनेमुळे दूर होतो, त्या सवयी अचानक परत आल्या आणि एखाद्या घरमालकाने गावाहून परत आल्यावर घराचा ताबा घ्यावा त्याप्रमाणे त्यांनी माझा ताबा घेतला. माझ्यासारख्या लोकांवर सत्यापेक्षा त्याच्या स्वतःच्या मतांचा जास्त प्रभाव पडतो हे माझ्या लक्षात आले आहे. काल संध्याकाळपर्यंत मी सुखात न्हात होतो आणि त्याचे रुपांतर आता दुःखात झाले होते. पण मला या निराशेसाठी खोटी सबब सापडत नव्हती. त्या सरदारपुत्राचा हेवा करणे शक्यच नव्हते आणि त्याच्या नुसत्या आगमनाने लिझाच्या मनातून माझी प्रतिमा उखडून टाकली गेली असेल असे मला वाटत नव्हते. थांबा.. मी काय म्हटले? तिच्या मनात माझी प्रतिमा होती? मला आठवले..मग त्या बर्चच्या झाडातून मारलेल्या फेरफटक्याचा अर्थ काय होता? आणि तिच्या चेहेऱ्यावरील आरशात दिसलेले भाव? पण बर्चच्या राईतून मारलेल्या फेरफटक्याचा विचार काही माझ्या मनातून जाईना. अरे देवा! ” मी मोठ्याने म्हणालो. किती सामान्य बुद्धीचा माणूस आहे मी. सुतावरून स्वर्ग गाठण्याचाच हा प्रकार म्हणायला हवा. अर्धवट विचार आणि त्याचे मी काढलेले अर्थ यांच्या वावटळी माझ्या मनात एका सुरात भिरभिरू लागल्या. मी ओझोगिनच्या घरी परतलो तेव्हा मी पूर्वीचाच संशयी, आतल्या गाठीचा माणूस झालो होतो. जसा मी लहानपणापासून होतो.
घरातील सगळी मंडळी बैठकीच्या खोलीतच होती. एका कोपऱ्यात बिझमियान्कॉफ बसला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावरून तरी ते कशाने तरी खूष झाले आहेत असे दिसत होते. विशेषतः ओझोगिन. त्याला मला कधी एकदा सांगतोय असे झाले होते, सरदारपुत्राने आदली पूर्ण संध्याकाळ त्यांच्या समवेत व्यतीत केली होती. ‘अच्छा! म्हणून तुम्ही सगळे एवढे खूष आहात तर’ मी मनात म्हटले. प्रिन्सच्या दुसऱ्या भेटीने मी चकित झालो खरा. तो परत येईल असे मला वाटले नव्हते. आमच्यासारख्या माणसांचे असेच असते. ज्या गोष्टी सर्वसाधारणपणे घडणे अपेक्षित असतात त्या घडणार नाहीत असा आमचा होरा असतो. मी खचलो व फुरंगुटलो पण आव मात्र आणला एका दिलदार माणसाचा. मला लिझाला तिच्या विश्वासघाताबद्दल शिक्षा करायची होती. पण याचाच अर्थ मी प्रेमभंगाने जास्त दुःखी झालो नव्हतो. माझ्यात सूडबुद्धी अजून जागी होती. असं म्हणतात की खऱ्या प्रेमात वेदनाही आनंद देतात; पण माझ्या बाबतीत मात्र असे मानणे म्हणजे मूर्खपणा होता. लिझाने निरागसपणे माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. फक्त मादाम ओझोगिनने मात्र मी एकदम गप्प बसलेला पाहून काळजी व्यक्त केली आणि माझी चौकशी केली. मीही कडवट हास्य करत त्यांना उत्तर दिल, “देवाच्या कॄपेने मादाम, मी एकदम ठीक आहे.” ओझोगिन मी काही बोलत नाही हे पाहून बिझमियान्कॉफशी बोलू लागले. तोही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. तेवढ्यात एका नोकराने येऊन प्रिन्स आल्याची बातमी दिली. ओझोगिन ताडकन उठले व घाईघाईने त्याचे स्वागत करण्यासाठी सरसावले! मी तिरक्या नजरेने पाहिले लिझानेही लाजून गडबडीने आपले कपडे सावरले. प्रिन्स आले. त्याने लावलेल्या अत्तराचा वास घरभर दरवळला. त्याच्या नुसत्या आगमनाने वातावरण प्रसन्न झाले.

अर्थात, मी काही वाचकांसाठी कादंबरी लिहीत नाही. मी माझ्यासाठी लिहितोय, त्यामुळे साहित्यातील अलंकार वापरण्याची मला मुळीच गरज वाटत नाही. त्यामुळे मी आडवळणाने न सांगता स्पष्टच सांगतो की लिझा पाहताक्षणीच प्रिन्सच्या प्रेमात पडली होती आणि तोही तिच्या प्रेमात. अर्थात याला कारणे दोन होती. एक तर त्याला तेथे दुसरं काही करण्यासारखे नव्हते पण मुख्य कारण होते म्हणजे लिझा होतीच तेवढी लोभस. त्यामुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले यात विशेष काही नाही. बहुधा या चिखलात एवढे सुंदर कमळ पाहण्यास मिळेल अशी कल्पनाच त्याने केली नसावी आणि तिनेही आजवरच्या आयुष्यात राजघराण्यातील पुरुष पाहिला असेल की नाही याची शंकाच आहे. एवढा रुबाबदार, हुशार, उमदा तर मुळीच नाही.

अभिवादनाचा कार्यक्रम उरकल्यावर ओझोगिन यांनी माझी प्रिन्सशी ओळख करून दिली. त्यानेही नम्रपणे स्वतःशी ओळख करून दिली. रितीरिवाजाप्रमाणे त्याला सगळ्यांशीच नम्रपणे वागावे लागत होते. अगदी या खेडवळ माणसांबरोबरही. सर्वसामान्य माणसांना त्याच्यासमोर अवघड वाटणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत होता. किंबहुना तो त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवत होता...

ती संध्याकाळ म्हणजे... आमच्या लहानपणी आमचे एक शिक्षक आम्हाला एका शूर, तरुण लॅस्सेएमोनियन माणसाच्या मनोधैर्याची एक गोष्ट सांगायचे त्याची आठवण मला झाली. त्यात त्याने एक चोरलेला कोल्हा शर्टाच्या आत लपवला होता. पकडला गेल्यावर स्वतःची इभ्रत राखण्यासाठी कोल्हा आतडी कुरतडत असतानासुद्धा त्याने गुन्हा नाकबूल केला. अशी काहीतरी गोष्ट होती ती. माझीही अवस्था अशीच झाली होती. त्या संध्याकाळी लिझाला प्रिन्सच्या शेजारी प्रथम बसलेली पाहून माझ्या भावना दडवताना माझी तीच अवस्था झाली. फक्त आतड्यांऐवजी ती भावना माझे ह्रदय कुरतडत होती.

क्रमशः
अनुवाद : जयंत कुलकर्णी ११/११/२०२२

कथालेख