अंतरंग - भगवद्गीता - भाग ३

Primary tabs

शीतलउवाच's picture
शीतलउवाच in जनातलं, मनातलं
14 Feb 2022 - 9:51 pm

दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग!

दृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी! कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन. एकाला इष्ट परीणाम साधण्यासाठी दुःखांत योग्य वाटला तर दुस-याला विनोद.

अर्जुनविषाद. गीतेतील पहील्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.

विवेक… योग्य आणि अयोग्य या दोनहीतील फरक जाणण्याची बुद्धी. विवेक…. कोणतेही पाउल टाकण्यापुर्वी ब-यावाईट परीणामांचा पुरेसा विचार करायला लावणारा संयम.

विवेक…. अमानुष आणि विनाशी शक्ती बाळगणारे आणि युद्धासाठी उत्सुक असणारे इतर योद्धे आणि अर्जुन यांच्यातील फरक..

महाभारतीय युद्धातील अनेक महारथी योद्धे हे अपरिमित शक्ती आणि दिव्य अस्त्रांनी सज्ज होते. त्यातील बहुसंख्यांना त्या शक्तींच्या वापराची खुमखुमी होती. परंतु त्या शक्तीच्या आणि दिव्य अस्त्रांच्या वापराने होणा-या अपरीमित हानीची पुरेशी जाणीव कितीजणांकडे होती? प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थाच्या किंवा सुडाच्या अग्निने पेटलेला होता. दृष्टीकोन……..

सुड, शत्रुत्व, विजय हाच दृष्टीकोन म्हणून अभिव्यक्ती? जास्तीत जास्त संहार..

एक सैनिक म्हणजे एक परीवार. वास्तविक असे लक्षावधी परीवार उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य बाळगणा-या वीराचा विवेक कितीतरी जास्त पटीने जागा हवा ना? या विवेकाचे, संयमाचे दर्शन घडवणारा अर्जुन, अर्जुनविषादातून प्रकट होतो.

युद्धाची आणि संहाराची अपरीहार्यता पटल्याशिवाय तो शस्त्र उचलायला धजावत नाही. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नव्हे तर आपल्या संहारक क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास आहे म्हणून. संहाराच्या सर्वस्पर्शी विपरीत परीणामांची त्याला जाणीव आहे म्हणून.

केवळ शक्तिमान योद्धा म्हणूनच नव्हे तर एक परिपक्व, प्रगल्भ आणि विवेकी शासक म्हणून अर्जुन या अध्यायात उभा राहतो. आपण उद्याचे शासक झालो तर समाज आपलाच आदर्श समोर ठेवणार आहे, आपण जसे वागलो तसेच वागणार आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच युद्धाचे होणारे भयानक परीणाम तो निरनिराळ्या भुमिकांमधून ताडून पाहतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, मुल्यव्यवस्था अशा सर्व घटकांवरचे परीणाम.. दृष्टीकोन….

हे सर्व जाणूनही युद्ध का करायचे याचे समाधानकारक उत्तर त्याला हवे आहे. कारण एक विवेकी व्यक्ती आणि भावी शासक म्हणून या युद्धाचे नैतिक उत्तरदायित्व तर त्याला घ्यावे लागणर आहेच वर पुढील पीढीला समजावूनही सांगावे लागणार आहे. म्हणूनच हे समाधान मिळाल्याशिवाय शस्त्र उचलण्याची त्याला भीती वाटते.

दृष्टीकोन.. जिज्ञासा….

युद्धाची भीषणता, अर्जुनाची परिपक्वता याखेरीज अजूनही एक वैशिष्ट्य मांडता येईल. जे अर्जुनाच्या विवेचनातून पहील्या आणि पुढील जवळपास सर्व अध्यायात दिसुन येते.

जिज्ञासा…. ज्ञानलालसा….

महाभारतात एक कथा आहे. असं म्हणतात की कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविताना द्रोण एक युक्ती करत असत. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी भरून आणण्यासाठी ते एक एक पात्र देत असत. त्यातले अश्वत्थाम्याला दिलेले पात्र सर्वात जास्त रुंद तोंडाचे असल्याने तो सर्वात आधी पाणी भरून परत येत असे. मग इतर शिष्यवृंद येईपर्यंत द्रोणाचार्य त्याला काही खास गोष्टी शिकवत असत. फक्त अर्जुनाला ही मेख कळते. तोही अश्वत्थाम्याबरोबर पोहोचून या विशेष शिक्षणाचा लाभार्थी होतोच वर द्रोणाचार्यांचाही अधिक लाडका बनतो. ही गोष्ट किंवा पांडव भावंडात श्रीकृष्णाच्या अधिक जवळही अर्जुनच असणे. दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठीची तपश्चर्या आणि देशाटनही अर्जुनालाच करायला सांगीतले जाणे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की अर्जुन हा केवळ शक्तीमान योध्दा नव्हता तर एक जिज्ञासु अभ्यासकही होता. तसं नसतं तर केवळ “दादा सांगतोय ना” किंवा “मी सांगतोय ना” “मग कर युद्ध” असं कृष्णाने म्हटलं असतं तरी तो युद्धाला तयार झाला असता!!!

उलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.

आणि हो अर्जुनविषादच नसता तर कृष्णाने गीता सांगीतली असती का? आणि आपल्याला ती अनायासे प्राप्त झाली असती का?!!!!

त्यामुळे गीतेतील १७ अध्यायातील ज्ञान ही अर्जुनाची पर्यायाने अर्जुनविषादाची देणगी आहे.

काय आहे ही देणगी… सांख्ययोग….. पुढील भागात…

संस्कृतीधर्मप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

14 Feb 2022 - 10:09 pm | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा,तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Feb 2022 - 9:14 am | ज्ञानोबाचे पैजार

खरेतर मी अर्जुनाचा अत्यंत आभारी आहे, कारण त्याला जर विशाद झाला नसता तर हे गीतामृत आपल्या पर्यंत पोचलेच नसते.

असले युध्दप्रसंग आपल्या आयुष्यात नेहमी येत असतात. त्या करता काही १८ अक्षौहिणी सैन्याच्या मधोमध उभे रहायची गरज नाही.

कितीतरी वेळा आपण ऐन महत्वाच्या वेळी कच खातो, भावनेच्या भरात निर्णय घेतो कधी कधी अशा भावनेच्या भरात घेतलेल्या चूकिच्या निर्णयांचे समर्थनही करत रहातो, त्या वेळेला आपण सगळे अर्जुनाचीच भुमिका करत असतो आणि अशा प्रत्येक वेळी गीतारुपाने भगवंत आपल्याला सहाय्य करण्याकरता हजर असतात.

गीता २१ अपेक्षित प्रश्णसंचासारखी आहे. ऐन परिक्षेच्या वेळेला हमखास मार्गदर्शन करणारी. जसा वर्षभर अभ्यास केलेला असला तरी परिक्षेच्या आधल्या दिवशी ऐनवेळेला आपल्याला काही आठवेनासे होते, तसेच काहीसे अर्जुनाचे झाले होते. "जरा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधे उभा कर रे, बघतोच कोणा कोणात युध्दाची खुमखुमी आहे ते" असे फुशारकीने म्हणणार्‍या अर्जुनाला जेव्हा समोर पितामह भिष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य आणि इतर आप्त स्वकिय दिसतात. यांच्यावर आपल्याला आता बाण चालवायचे आहेत या कल्पनेने त्याचा शक्तीपात होतो त्याच वेळेला भगवंत त्याच्या हातात हा २१ अपेक्षीत प्रश्णसंच देतात आणि सांगतात "हे बघ आतापर्यंत अनेक वेळा तपस्याकरुन तू मिळवलेल्या ज्ञानाची ही समरी आहे. आता रडत बसू नकोस पटकन वाच आणि चल पेपर लिहायला घे."

पैजारबुवा,

धर्मराजमुटके's picture

15 Feb 2022 - 11:10 am | धर्मराजमुटके

सुंदर प्रतिसाद ! पण आपण इतके ढ असतो की अगदी अपेक्षीत प्रश्नसंच वाचून उत्तरे घोकली तरी ऐनवेळी बुद्धी धोका देते किंवा मन कच खाते.

शीतलउवाच's picture

19 May 2022 - 10:08 am | शीतलउवाच

धन्यवाद! सुंदर प्रतिसाद!

चौथा कोनाडा's picture

18 Feb 2022 - 5:21 pm | चौथा कोनाडा

पैजारबुवा,

एकदम पर्फेक्ट लिहिलंत !

शीतलउवाच's picture

19 May 2022 - 10:08 am | शीतलउवाच

धन्यवाद

शीतलउवाच's picture

19 May 2022 - 10:17 am | शीतलउवाच

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

18 Feb 2022 - 5:23 pm | चौथा कोनाडा

उलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.

व्वा, भारी, विशेष उल्लेखनीय !

शीतलउवाच's picture

19 May 2022 - 10:09 am | शीतलउवाच

धन्यवाद

तुम्ही विषाद आणि विलाप ह्या दोन भिन्न अर्थी शब्दांना एकाच तागडीत तोलले असे दिसते. अर्जुनास झाला तो खेद. विलाप नव्हे.
विलापाची सर्वोत्तम उदाहरणे स्त्री पर्वात आहेत.

शीतलउवाच's picture

19 May 2022 - 10:16 am | शीतलउवाच

धन्यवाद,
माझ्याही लेखात विषादाचा योग्य अर्थ घेतला जावा असाच विचार आहे. विलाप या अर्थाने तोलले जाते याचाच विषाद लेखात प्रकट होतोय.

नगरी's picture

19 May 2022 - 6:56 pm | नगरी

विषाद आणि विलाप मध्ये दिल्लीगट ते दिल्ली अंतर आहे

नगरी's picture

19 May 2022 - 6:59 pm | नगरी

विषाद आणि विलाप मध्ये दिल्लीगेट ते दिल्ली अंतर आहे