"त्या" सिनेमातून आपोआप दिसणारा "तो" काळ

Primary tabs

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
22 Jan 2022 - 1:12 pm

"हम आपके है कौन" म्हणजे "नदीया के पार" चा remake हे अनेकांना माहीतच असेल इथं. तो बघताना काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणवल्या. त्यांची इथं नोंद,यादी करतोय. हम आपके है कौन १९९४चा. त्याचे बडजात्या निर्माते (राजश्री प्रॉडक्शन). हा बॉक्स ऑफिसवर सुपर्डुपर हिट असला तरी मुळात ह्याच राजश्री प्रॉडक्शनच्याच १९७०च्या काळात आलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. तो मूळ सिनेमाही भारतभर गाजला. विशेषत: उत्तर भारतात किंवा इतरत्रही ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा,जाणीवांशी जोडून घेणारं पब्लिक जिथं आहे, अशा ठिकाणी. टीनेजरी,नवतरुण दिसणारा "सचिन" त्यात आहे (म्हणजे सध्याचे टि व्ही वरचे "महागुरु").

ही कथा एक अर्थानं तेव्हाच्या, 1970sमधल्या ग्रामीण (विशेषतः गायपट्ट्यातल्या म्हणजे cow belt म्हटलं जातं त्या BIMARU, उत्तरेतल्या राज्यांची) त्या भारताची wishful thinking असावी. शेती करणाऱ्या सख्ख्या भावाभावात भांडणं असू नयेत. काकांशी अगदी सौहार्दाचे संबंध असावेत, वगैरे.ही
प्रजा "संस्कारी" असावी. अशी ती ह्यांची मनोमन इच्छा.

"दारिद्र्य" , "साधेपणा" आपोआप चांगला उतरलाय क्यामेऱ्यात. म्हणजे कुटुंब दरिद्री नाहीये तेव्हाच्या मानानं, तेव्हा एकूणच भारत फुल्ल दरिद्री होता. म्हणजे शेणानं सारवलेल्या जमिनी किंवा कुडाच्या भिंती ह्याला दारिद्र्य म्हणतोय असं नव्हे. त्या सिनेमातलं कुटुंब हे शेती बाळगून आहे (अगदी भले थोरले जमीनदार नसले तरी अगदी टोकाचे दरिद्री शेतमजूरही ते नाहित) म्हणजे ते त्या व्यवस्थेच्या मानानं मध्यमवर्गीय आहेत. जमीन, बैलगाडी बाळगून असणारे गंगा प्रदेशातले उच्चवर्णीय , नदीच्या शेजारीच वस्ती (पर्यायानं फार मोठी नसली तरी अतिसुपीक जमीन अन बऱ्यापैकी पाण्याचा access) अन शेती असणारे "तिवारी" , "वैद्यजी" हे ग्रामीण अर्थानं दरिद्री नाहीत. सुखवस्तू आहेत. .

पण एकूण व्यवस्थेतच जबरदस्त मागासपणा आहे. विशेष आधूनिक काळ तिथपर्यंत पोचलाच नाहिये. दारिद्र्य (खरं तर मागासपणा) त्या काळात, म्हण्जे १९७० च्या दशकांत त्या भागात , बहुतांश भारतात सार्वत्रिक आहे. ते इतकं सार्वत्रिक आहे, की सगळेच तसे असल्यानं काहीतरी मिसिंग आहे, कशाचातरी अभाव आहे, ही भावनाच नाही.
अख्ख्या सिनेमात डांबरी रस्ते कुठंच नाहीत. सगळे कच्चेच आहेत. धक्के खात बैलगाडीतून जायचं आहे. नदीच्या आल्याड पल्याड सासर माहेर आहे. नदीवर पूल नाही. नाव वल्हवत जायचं. कल्पना करा. दरवेळी इकडून तिकडं जायचं तर फक्त नाव आहे. पाश्चात्य/प्रगत जग सोडून द्या. अगदी आपल्याकडेही पुणे किंवा मुम्बईत राहणारी कुठलीही व्यक्ती महिन्याभरात शेक्डॉ वेळेस नदी अन खाडी वरचे पूल ओलांडत असेल. कल्पना करा, हे पूल अस्तित्वच नाहियेत. तर काम करनं, कामाला येणं जाणं कसं राहिलं असतं?? शाळेत कसे गेले असता? नोकरी धंद्याचं काय? अन दवाखाने? अन तुमच्या आवडत्या ठिकठिकाणच्या भाज्या,फळं....किती गोष्टी उपलब्ध असू शकल्या असत्या तुम्हाला? बहुतेक चुलीवरचा तो "रम्य" , नोस्टॉलजिक स्वयंपाक आहे. (अर्थात प्रत्यक्ष चूल फारशी दिसत नाही. पण एकूण वातावरण, संदर्भ ह्यावरुन जाणवतं) "चूलीवरच्या स्वयंपाकाबद्दल अतिप्रेम अन नॉस्ट्ल्जिआ असणाऱ्यांना बहुतांश वेळा चूल फुंकण्याचा अन तिथं भाकऱ्या थापण्याचा अनुभव नसतो. नुसता खायचा अनुभव असतो" असं चूल सोडून स्टोव्ह अन गॅस सिलिंडर वापरु लागलेल्या मंडळींनी ऐकवल्याचं आठवतं. :) .
गाव, साधेपणा, नाती हे सगळं त्या दर्शकांना स्क्रीनवर बघून मस्त वाटत असावं. पण तेव्हाही रेल्वेचे डबे भरभरुन गायपट्ट्यातले,BIMARU राज्यातले मजूर मिळेल त्या मार्गानं मुंबई सारख्या महानगरातल्या झोपडीत राहायला तयार असत. this says something.
सिनेमात "चांगली पुरुषसत्ताक" व्यवस्था काय ते दिसतंय अजूनही "मूल्य" तीच पॉप्युलर दिसतात. धाकट्यांनी मोठ्यांचे "उपकार" स्मरावेत. त्यांच्यासाठी त्याग करायची तयारी दाखवावी. मोठ्यांनीही त्यामागचा भाव जाणून गौरव करावा. पण प्रत्यक्ष त्यागाची वेळ येऊच देऊ नये. दिलेली अवास्तव, अवाजवी ऑफर (स्वतःला फुकट मिळणारी संपत्ती किंवा इतर बाबतीतला त्याग ) स्वीकारु नये. भरतानं रामाला राज्य ऑफर करावं, पण रामानं ते घेऊच नये, काहीसं तसंच. म्हणजे मुळात conflict होणारच नाहीत; अशी ही समजूत. प्रत्यक्ष घडला तर कसं हँडल करायचं ह्याचं उदाहरण नाही. पण धाकट्यानं आपला त्याग करावा असं सूचन आहे.
पत्नीचा मृत्यू झाल्यास धाकट्या मेव्हणीशी संसार थाटणं ही प्रथा,संकेत त्या काळात, त्या समाजात, त्या भागात प्रचलित असावा. अगदीच सहजी सामान्य बाब म्हणूण येतो.
"हम तुम्हारे है कौन" हा संवाद देखील काही महत्वाच्या क्षणी येतो.
"व्या ख्ख्यां व्या ख्ख्यां" म्हणून खास शैलीत खोकणारे एक शेटजी "हम आपके है कौन" मध्ये आहेत. सलमान- माधुरी पाहिल्यांदा भेटतात, त्याच्या आधीच्या दृश्यात हे शेटजी दिसतात. ही खोकायची स्टाईल देखील ह्या सिनेमासारखी त्या मूळ कथेत आहे. पण त्यामागचं तिथलं कारण गमतीशीर आहे. कुणी पुरुष, त्यातही सासरे,व्याही,चुलत सासरे वगैरे सिनिअर मंडळी मुद्दम घसा खाकरत,हलकं खोकत आपण येत असल्याचं सुचवतात जरा लांबूनच. ह्याचा अर्थ म्हणजे महिलांनी आता डोईवरुन पदर घ्यायचा आहे. किंवा खोकून आत येणं म्हणजे सध्या एखाद्या खोलीत डोकावण्यापूर्वी नॉक नॉक करायचा संकेत आहेत, आपण येत असल्याचं सांगणं आहे, काहिसा त्या पद्ध्तीचा शिष्टाचार.
.
हल्लीच्या काळात दिवस गेल्याचं कळल्याबरोबर आता पूरक पोषक आहार असतोच, पण नियमित चकरा सुरु होतात डॉक्टरांकडे. आणि प्रसूती तर बाय डिफॉल्ट इस्पितळातच होते. अख्ख्या सिनेमात आधुनिक वैद्यक (ज्यास बोली भाषेत "ॲलोपॅथी" म्हणतात) ति नजरेस धड पडत नाही. स्त्री गरोदर असताना तर नाहीच; पण प्रसूती वेळीही अगदीच सामान्य बाब म्हणून तिला घरीच ठेवून घेतलं जातं. ह्या काळात मदत करायला इतर ज्येष्ठ, अनुभवानं माहिती असणाऱ्या स्त्रिया असतातच. शिवाय धाकटी बहिणही असते. पण दिसत नाही ते इस्पितळ..... अन प्रसूती घरीच.
बरं, हे सगळं आहे म्हणजे सिनेमाचा विषय भीषण दारिद्र्य, मागासापणा दाखवायचा असाही नाहीये. सदर कुटुंब तिथल्या मानानं काही दरिद्री अतिशोषित गटातलं असल्यानं त्यांना सुविधा परवडत नाहीत असं नाहीये. त्या भागात सुविधा अस्तित्वातच नाहीयेत.

अर्थात जोहर चोप्रा ह्यांच्या अलीकडच्या काही सिनेमांइतकं किंवा राजश्रीच्याच नव्या सिनेमांइतकं कृतक,खोटेपणा त्यात वाटत नाही.
अवांतर (ह्या सिनेमाशी असंबंधित) -
पूर्वी ... म्हणजे मीनाक्षी शेषद्री, माधुरी, श्रीदेवी ह्यांच्या काळापर्यंत काही सिनेमात उच्चशिक्षित, श्रीमंत दाखवलेलं ओढूनताणून केल्यासारखं, हास्यास्पद वाटे. पात्रे जे हाय फाय इंग्लिश बोलू पहात ते व्यंगचित्र असल्यासारखं वाटे.आताच्या सिनेमातलं दारिद्र्य हास्यास्पद वाटतं. (उदा- आशिकी 2 मधलं नायिकेच्या घरातलं धमाल दारिद्र्य. त्यांनी ते शिरेसलीच दाखवलेलं आहे. पण हास्यास्पद आहे)
.

इतिहाससमाजजीवनमानविचारलेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 Jan 2022 - 7:37 am | तुषार काळभोर

नदिया के पार हा अतिशय सुंदर चित्रपट आहे. त्यातील मागासपण खटकत नाही, ते त्रासदायक देखील नाही. ते असणं, हे चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. त्याचवेळी त्या अभावांना ग्लोरीफाय केलेलं नाही.

(दुर्दैवाने तीस वर्षांनी स्वदेसमध्येही तशीच परिस्थिती होती.
अजूनही रस्ते, पायाभूत सुविधा यात फारसा फरक पडला नसावा.)

हो..खूपच छान आहे चित्रपट. पाहून आता बरेच दिवस झाले, त्यामुळे खूप आठवत नाही, पण साधना सिंगचे कामही खूपच आवडले होते.

चौथा कोनाडा's picture

23 Jan 2022 - 12:45 pm | चौथा कोनाडा

सुरेख लेख !

💖

दोन्ही चित्रपट आवडले होते.
नदिया के पार आता देखिल पाहणं सुखद आहे. "हम आपके" चकचकीत असला तरी, मुल्यं तिच होती. कदाचित म्हणूनच हा ही सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला.
नुकताच "बालीकावधू" पाहिला (पहायचा राहूनच गेला होता) त्यातले ही त्यावेळचे वातावरण बघताना अतीव सुख मिळतं !

प्रचेतस's picture

24 Jan 2022 - 9:21 am | प्रचेतस

काय रे मनोबा..!
किती दिवसांनी दिसलास. लिहित राहा.

सौंदाळा's picture

24 Jan 2022 - 12:08 pm | सौंदाळा

छान लेख
'हम आपके है कौन' हा 'नदियां के पार' चा रिमेक आहे - माहित नव्हते
महागुरुंमुळे हा सिनेमा बघितला नाही कधी आणि टीव्ही वर कधी लागल्याचे आठवत नाही.

राघव's picture

25 Jan 2022 - 2:18 am | राघव

असं जुना काळ उभा करणं मोठं जिकिरीचं काम असतं.
आजकाल तर अशी बनवलेली अनेक सेट्स असतात. वेगवेगळ्या कोनातून तीच जागा नव्यानं दाखवल्यासारखं करतात. जसं "हम आपके है कौन" मधलं माधुरीचं माहेर आणि सासर. दोन्ही घरं एकसारखीच असल्याचं जाणवतं, नक्की काय ते माहित नाही.
बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी, बासु चॅटर्जी ही मंडळी असा काळ उभा करण्यात अगदी "माहिर" होती.
"व्योमकेश बक्षी" तर बराच नंतर बनलेली सिरिअल होती, तरीदेखील जुना काळ असल्याचं जाणवतं.

यावरून काही हॉलीवूडपट आठवलेत!

टॉम हँक्स चा:- Bridge of Spies
टॉम हँक्स/मेग रायन चे :- You Have Got Mail! , Sleepless in Seattle
मॉर्गन फ्रीमनचा :- Lean On Me
जो पेस्सीचा :- My Cousin Vinny
विल स्मिथ चा :- The Pursuit of Happyness

चौकस२१२'s picture

25 Jan 2022 - 5:13 am | चौकस२१२

असं जुना काळ उभा करणं मोठं जिकिरीचं काम असतं.
आजकाल तर अशी बनवलेली अनेक सेट्स असतात.

दिवसेंदिवस जरी तंत्रणन्यान विकसित होत असले तरी ( म्हणजे सेट वर जळमटे किंवा जुना रंग पोत दाखवता येणे ) काम अवघड होतंय कारण जुने ते जपलेले नाहीये म्हणून
त्यामाम्नाने भन्साळींनी बाजीराव मस्तानी मधील अनेक विशेष म्हणजे वाड्यातील अंतर्गत दृश्यात कला दिग्दर्शन चांगले केले होते रंगसंगती + प्रकाशाचा उत्तम उपयोग .. त्यामानाने पानिपत मध्ये नुकताच रंगवलेले सेट आहे हे कधी कधी कळत होते