अनाम वीरा ...

मैत्र's picture
मैत्र in जनातलं, मनातलं
2 Dec 2008 - 3:43 pm

काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती...
आणि त्यातच एक होतं -
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात...

कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे.
गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही? अनंत छंदी यांनी मदत करण्याची कल्पना मांडल्यावर हेच मनात आलं की की डिसी पी / ए टी एस प्रमुख / सिनियर इन्स्पेक्टर यांची परिस्थिती थोडी बरी असायला हरकत नाही. पण बाकी पोलिसांचे काय ?
शहीद हेमंत करकरे यांच्या अंत्ययात्रेला सामान्य मुंबइकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि मुख्यमंत्री / आर आर / ए एन रॉय यांची हजेरी. सर्व चॅनेल्स वरून थेट प्रक्षेपण.

आणि बाकी जे सुमारे वीस पोलिस मरण पावले समोरा समोर लढताना त्यांची नावे देखील ठीकपणे माहीत नाहीत. दुसर्‍या दिवशी सकाळ मध्ये ज्या व्हॅन मध्ये या तीन वरिष्ठ अधिकार्‍यांचा मॄत्यू झाला त्यात वाचलेल्या एका पोलिसाची कहाणी वाचली.
ए सी पी दाते कामा हॉस्पिटल मध्ये अडकले आहेत आणि जखमी आहेत हे कळल्याने हे सर्व तिथे गेले. तोवर तिथे परिस्थिती आटोक्यात आली. साळस्कर स्वतः चालवत होते व बाकी दोघे पुढे बसले होते. मागे चार स्टेनगन धारी पोलिस होते.
मेट्रो कडे फायरिंग चालू आहे कळल्याने हे सर्व तातडीने तिथे निघाले. वळणावर पोलिस गाडी पाहून दोन अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. यांना पिस्तुले (होय तेवढेच होते त्यांच्या कडे) काढायलाही वेळ नाही झाला. केवळ दुर्दैवी मृत्यू.
मिपावर किंवा अन्यत्र एक मत वाचनात आले की राजाचा हत्ती हेरून त्याला बाण मारून त्याच्याकरवी त्याच्याच सैन्याचा चेंदामेंदा किंवा थेट राजाला मारणे ( उदा. - हेमू आणि अकबर / नागोजी जेधे) असे शेकडो वर्ष चालले पण तरीही राजा आणि सेनापती च्या जिवाचे महत्त्व काही समजले नाही. या तिघांनी एका गाडीतून फक्त पिस्तुले घेउन जाणे हे किती चुकीचे होते हे पोलिस खात्याशी संबंध नसलेल्या मला समजणार नाही. पण अनेक आंतर राष्ट्रीय तज्ञांनी ते मांडले आहे ( विशेषत: अमेरिका आणि इस्रायल).

त्यांचे हौतात्म्य की दुर्दैवी मॄत्यू हा विचार करत असताना अखेर आज एका दुसर्‍या फौजदाराची एकाकी झुंज समजली. -
http://ibnlive.in.com/mumbaiattack/photoshow.php?id=1131
ते सर्व शब्दात सांगणे कठीण आहे. हे फोटो व त्यासोबत ची माहिती वाचा.
सीमेवर समोर शत्रू आहे आणि मरण आहे माहीत असतानाही आपले जवान जसे लढत पुढे जातात तशा शौर्याने लढलेल्या त्या शहीद असिस्टंट सब इन्स्पेक्टर ओंबळे यांना विनम्र अभिवादन.

त्या वीराचे शौर्य कदाचित इतर तीन अधिकार्‍यांच्या पदापेक्षा कमी पडले असे खेदाने म्हणावे लागेल. त्या तिघांचा कुठलाही अवमान करायचा नाही. असलेल्या बंदुका आणि जॅकेटसह स्वतः पुढे जाऊन लढणार्‍यांबद्दल, जिगरबाज आणि पदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारर्‍या अशा अतिशय दुर्मिळ असलेल्या या वीरांबद्दल काय म्हणावे.

पण त्यांची गाथा रेडिओ टी व्ही मराठी ईंग्रजी वॄत्तपत्रे महाजाल आणि पुण्याचे फ्लेक्स बोर्डस अखंड गात असताना या एकाची लढाइ अखेर एका सिटीझन जर्नालिस्ट च्या फोटो मधून आपल्यासमोर यावी याचे वाइट वाटते.
जय हिंद.

समाजराजकारणप्रकटनविचारमतप्रतिसादप्रतिक्रियावाद

प्रतिक्रिया

प्राजु's picture

2 Dec 2008 - 8:52 pm | प्राजु

नतमस्तक आहे मी तुकाराम ओंबळें समोर...
जय हिंद!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

3 Dec 2008 - 10:19 am | चित्रा

असेच आपले काम मरणाचा धोका पत्करून सांभाळणारे श्री. झेंडे.

सुदैवाने काही काळ दिग्गजांच्या मृत्युमुळे काहीसे झाकोळले गेलेले ओंबळे यांचे हौतात्म्य राजकारणातून का होईना गौरवले गेले. गिरगाव चौपाटीजवळ त्यांचा पुतळा आणि प्रेरणा स्थळ उभारण्यात आले - २६/११/११ रोजी.. ओंबळे यांना शांतताकाळातला सर्वोच्च पुरस्कार - अशोक चक्र देण्यात आला.
खटला पूर्ण करून संविधानिक दृष्ट्या काम पूर्ण करून सार्वभौमत्वावर हल्ला या आरोपाखाली कसाबला फाशी देण्यात आले.. कसाबला मृत्यूदंड देणे हा एकमेव उद्देश नक्कीच नव्हता ज्यासाठी मरण पत्करून ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले. कसाबची फाशी हे या सर्व करकरे, साळसकर, ओंबळे यांपासून ते उज्ज्वल निकम यांच्यापर्यंत सर्वांच्या इतक्या प्रचंड कामाचे, प्रयत्नांवरचे केवळ शिक्कामोर्तब.

भारताला २६/११ च्या कटाची माहिती मिळवण्यासाठी आणि जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी कसाबचा उपयोग झाला. आणि निशःस्त्र ओंबळे यांच्या ज्याला आर्मीच्या भाषेत Supreme Sacrifice - सर्वोच्च त्याग / बलिदान म्हणतात त्याचे सार्थक झाले.
मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते.

असो.. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना पुनःश्च विनम्र श्रद्धांजली.

कोणता कार्यक्रम होता ते कळू शकेन का? मला हे गाणं ऐकयचं आहे.
या घटनेतील सर्व ज्ञात -अज्ञात हुतात्म्याना विनम्र श्रद्धांजली.

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 11:47 am | ज्ञानराम

मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. .. खरं आहे.
हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना विनम्र श्रद्धांजली.