कुणास सांगू ? (कथा परिचय : ३)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
23 Jun 2021 - 12:28 pm

विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख :

१. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
………………………………………………….

वरील संदर्भ क्र. २ च्या प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे युरोपीय बिगर इंग्लिश कथाकारांमध्ये फ्रान्सचे मोपासां आणि रशियाचे चेकॉव्ह (Anton Chekhov) हे महान कथाकार होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकात अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या. त्यांच्यानंतरच्या पिढ्यांमध्ये कथाविश्वात त्यांच्या नावे कथाकारांची ही दोन घराणी निर्माण झाल्याचे मानले जाते. या लेखात चेकॉव्ह यांच्या एका कथेचा परिचय करून देत आहे.

सुरुवातीस थोडेसे लेखकाबद्दल.
डॉ. चेकॉव्ह हे मुळात एक वैद्यकीय व्यावसायिक होते. त्यांनी हा व्यवसाय आणि साहित्यलेखन अशा दुहेरी आघाडीवर काम केले - दोन्ही क्षेत्रात अगदी मन लावून. ते गमतीने म्हणायचे,

“वैद्यकी ही माझी बायको आहे, तर साहित्य हे माझ्या रखेलीसमान आहे !”.

त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक कथा आणि नाटके लिहिली. त्यांच्या कथांची इंग्लिश भाषांतरेही मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे इंग्लंडमध्येही त्यांना चांगली लोकप्रियता लाभली. काही वर्षांपूर्वी भारतीय दूरदर्शनवर ‘कथासागर’ सारख्या हिंदी कार्यक्रमात त्यांच्या रुपांतरीत कथा दाखविल्या होत्या. या नामवंत साहित्यिकाला जेमतेम ४४ वर्षांचे आयुष्य लाभले. क्षयरोगाने त्यांचा अकाली मृत्यू झाला.

आता त्यांच्या या कथेबद्दल.
ही १८८६ मध्ये प्रकाशित झालेली कथा आहे.
या कथेचे शीर्षक Misery असे असून त्याला पुढे असेही उपशीर्षक जोडलेले आहे :
"To whom shall I tell my grief?"

ही आयोना नावाच्या एका म्हाताऱ्या बग्गीचालकाची कथा आणि व्यथा आहे. तो गरीब असून पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करतोय. बग्गीला एक छानशी घोडी जोडलेली आहे. नुकतीच त्याच्या घरी मोठी दुर्घटना घडली आहे. त्याचा तरुण मुलगा तापाच्या आजाराने मरण पावला आहे. त्यामुळे तो अगदी शोकाकुल आहे. परंतु हातावर पोट असल्याने त्याला रोज उठून त्याचा हा धंदा करणे भागच आहे.

असाच एके दिवशी आयोना धंद्याला बाहेर पडला आहे. खूप वेळ झाला तरी अजून गिऱ्हाईक काही मिळालेले नाही. त्यामुळे तो पेंगुळलाय. तेवढ्यात लांबून एक हाक ऐकू येते, “ओ, बग्गीवाले !” मग लष्करी पोशाखातील एक अधिकारी बग्गीत येऊन बसतो. ती चालू लागते. पण आज ती काहीशी रखडतच असते. त्यावर अधिकारी त्याच्यावर खेकसतो. बग्गी पुढे चालू लागते. आज आयोनाला अगदी भडभडून येतंय. त्याला त्याच्या अंतरीचे दुःख मनमोकळेपणाने कोणाला तरी सांगावसं वाटतंय. तो हळूच मान मागे करून त्या अधिकाऱ्याकडे पाहतो. त्यावर तो गुरकावतो, “काय रे?”.
“काही नाही”, आयोनाला बोलायचेय पण कंठ फुटत नाही. शेवटी धीर करून तो म्हणतो,
“सर, काय सांगू, माझा तरणाताठा मुलगा वारला हो !” “कशाने ?”
“काय माहित, तापामुळे गेला असावा”
या संवादात गुरफटल्याने आयोनाचे घोडीवरील नियंत्रण कमी होते. ते पाहून अधिकारी पुन्हा खडसावतो,
“ ए गधड्या, नीट चालव. कुठे बघतोयस ?”
पुढच्या प्रवासात तर अधिकारी त्याचे ठिकाण येईपर्यंत डोळेच मिटून पडून राहतो. आयोनाला बोलायचे असूनही त्याचा नाईलाज होतो.

आयोनाचे पुढचे गिऱ्हाईक तीन तरुण असतात. ते कमी भाड्याच्या बोलीत त्याच्या गाडीत बसतात. ते बहकल्यासारखे वागत असतात आणि त्यांची भाषाही असभ्य असते. तेही त्या बिचार्‍याला एकीकडे दरडावत त्यांच्यात खिदळत असतात. जरा वेळाने तो हळूच त्याची दुःखद बातमी त्यांना चाचरत सांगतो. त्यावर त्यातला एक तरुण, “असं होय, आपण सगळे कधीतरी मरणारच असतो की”, अशी त्याची खिल्ली उडवतो. नंतर त्यांचे ठिकाण येते. आयोनाचे दुःख अजूनही मोकळे न होता त्याच्या मनातच राहते.

आता पुन्हा एकदा आयोना गिऱ्हाइकांची वाट पाहत एकटाच पडलाय. तो रस्त्यावरील आजूबाजूच्या लोकांकडे आशेने पाहतोय. या हजारो लोकांपैकी आपले दुःख ऐकून घ्यायला एकही जण का मिळू नये या विचाराने तो अधिकच दुःखी होतोय. तेवढ्यात त्याला एक हमाल दिसतो. हा तरी आपल्याशी सहानुभूतीने बोलेल अशा आशेने तो त्याच्याशी बोलायला जातो. पण तो हमाल त्याला कसनुसे बोलून कटवतो आणि पुन्हा निराशाच पदरी पडते. आता आयोना व्यथित मनाने घरी परतायचे ठरवतो. आज पुरेशी कमाई न करताच तो घरी येतो. घोडीला बाहेर सोडतो आणि मग शांतपणे विचार करत आतमध्ये लवंडतो. मनात त्याच्या गेलेल्या मुलासंबंधी त्रस्त करणारे विचार येत राहतात. मग मनाशी तो म्हणतो, “हे सगळे मला सविस्तर कोणाला तरी सांगायचंय, भडभडून बोलायचंय, तरच मला मोकळे वाटेल. माझे बोलणे ऐकायला जर एखादी स्त्री मिळाली तर किती बरे होईल !”

त्याला एकदम घोडीची आठवण येते आणि तो बाहेर तबेल्यात येतो. ती बिचारी शांतपणे गवत खात असते. आता तो तिच्याशीच बोलू लागतो,
“काय ग, गवत खातेस ना, खा भरपूर. आज आपल्याला ओट्स आणण्याइतके पैसे नाही मिळाले. काय करू, आता मी आता म्हातारा झालो बघ. खरेतर माझ्या जागी माझ्या मुलानेच ही बग्गी चालवायला हवी होती. त्याने खूप छान चालवली असती. आता हे बघ, माझ्याप्रमाणेच तुलाही जर एक शिंगरू असते आणि अचानक ते मरण पावले असते, तर तुला पण किती दुःख झाले असते. नाही का ? खूप अवघड असते बघ असा अपत्यमृत्यू सहन करणे”.

ok

असं बोलून तो तिच्याकडे बघतो. घोडी गवत खाताखाता त्याच्या हातावर हळूवार श्वास सोडते. आयोनाला आता अगदी मोकळे व शांत वाटते. मग तो त्याच्या मुलाची अथपासून इतिपर्यंत सर्व कथा तिला सांगत राहतो.

विवेचन
कथा साध्यासोप्या भाषेत असून ती निवेदन पद्धतीने पुढे सरकते. अधूनमधून काव्यमय भाषेत काही वर्णने येतात. कथेचा पूर्वार्ध म्हाताऱ्याच्या व्यक्तिगत दुःखाभोवती (grief) केंद्रित आहे. ते खरे तर मोकळे व्हायची गरज आहे. परंतु तशी संधीच न मिळाल्याने ते साचत जाते. कथेच्या उत्तरार्धात ती दुःखाची भावना मनोवेदनेपर्यंत (misery) पोचते. या वेदनेवर उपाय असतो तो म्हणजे साचलेले बोलून मोकळे करणे. परंतु ते घडण्यासाठी दखल घेणारा कनवाळू श्रोताच मिळत नाही. शेवटी पुरता निराश होऊन म्हातारा घोडीजवळच आपले दुःख मोकळे करतो. माणसांच्या आत्मकेंद्रित आणि भावनाहीन प्रवृत्तींवर कथेत चांगला प्रकाश टाकलेला आहे. शोकमग्न असलेल्या म्हाताऱ्या चालकाशी देखील त्याची गिर्‍हाईके ज्या तुसडेपणाने वागतात ते पाहून म्हाताऱ्याचे दुःख वाचकांपर्यंत पोचते. मानवी संवादांची गरज अधोरेखित करणारी अशी ही कथा आहे. कथेतील घटनांपेक्षाही त्यातील मुख्य पात्राच्या मनातील खळबळ व्यक्त करण्यावर लेखकाने अधिक भर दिलेला आहे.
…………………………………………………………………………………..
चित्र विकीतून साभार !

कथा परिचय: ४ : ‘भेट’ तिची त्याची

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

23 Jun 2021 - 1:20 pm | गॉडजिला

शोकमग्न स्थितीत जिथे लोकांकडुन समजुतदारपणाच्या वागणुकिची अपेक्षा असते तेथे समाज अपेक्षेला खरा उतरतोच असे नाही... अर्थात यातुन काही वेळा गोष्टी जास्त सुलभ होतात तर काही वेळा आपण त्या सुलभ करणे आपण मुद्दाम टाळतो हा भाग अलाहिदा पण कथेचा गाभा आपण छान सामजावला आहे हा गाभा थोडा विस्तारला असता तरी हरकत न्हवती.

पाषाणभेद's picture

25 Jun 2021 - 11:04 pm | पाषाणभेद

>>> शोकमग्न स्थितीत जिथे लोकांकडुन समजुतदारपणाच्या वागणुकिची अपेक्षा असते तेथे समाज अपेक्षेला खरा उतरतोच असे नाही.

अगदी खरे बोललात.
(सध्या मी याच स्थितीतून जात असल्याने आपल्या वाक्यात आणि वर असलेला बग्गीवाल्यात मी स्वःताला पाहतो आहे.)

माझ्या अनुभवाबाबत बोलाल तर काही कारणाने माझ्या पातळीवर जरी मी शोकमग्न होतो तरी जगास सामोरे जाणे कठीण न्हवते पण मला त्रास काही ठिकाणी समजुतदार लोकं वसतात असा जो माझा अनाकलनीय समज मी राखला होता त्या भ्रमाचा भोपळा फुटल्याने झाला.

व दुख्ख आणी मनस्तापामधे फरक ओळखायला मला जास्त कालावधी गेला... वरील कथेतही खरे दुख्ख मनस्ताप हा आहे.

आपणही दुख्खात आहात, त्यातुन सावरणे आपल्या हातातच आहे आणी दुख्ख दुर नको पण मनस्ताप आवर या स्थितीला समोरे जायचे नसेल तर आपण ज्या व्यक्ती अथवा समुहाकडुन या कठीण प्रसंगी थोड्या समजुतदारपणाची अपेक्षा करत आहात परंतु तेथुन जर तुमच्याबाबत थंड अथवा काहीशा नकारात्मक सुराची साद जाणवत असेल तर तुर्त तिथे थोडे अंतर ठेवा... कदाचीत तुम्ही तुमच्या दुख्खाच्या आवेगात त्याना गोंधळवणारे स्तंभित करणारे वर्तनही करुन जाल... त्यांमुळे कोणतीही तिव्र मते व्यक्त करण्यापासुन स्वतःला दुर ठेवा... (असा सल्ला देणे योग्य नाही पण व्यक्त होणे नाइलाजच असेल तर ही तिव्र मते तुमच्या ऐवजी इतर कोणी उघड व्यक्त करण्याची व्यवस्था करता येत असेल तर तसे करा)

काही काळात सर्व ठिक होइलच पण त्यावेळी साधी विचारपुस न करणारेही आपोआप जागेवर येतिल... आणि तोपर्यंत तुम्हाला तुमची आणी त्यांची व्यवस्थित जाण तयारही होइल. शोक ही अशी बाब आहे जि फक्त सामोरे गेल्याने भेदली जाउ शकते इतर कोणतेही इलाज त्यावर फार प्रभावी ठरत नाहीत.

कुमार१'s picture

26 Jun 2021 - 9:44 am | कुमार१
(सध्या मी याच स्थितीतून जात असल्याने

तुमच्या दुःखात सहभागी आहे.
आपणास त्यातून बाहेर पडायचे बळ मिळो ही सदिच्छा.

कॉमी's picture

23 Jun 2021 - 1:44 pm | कॉमी

कथेची थीम खूपच आवडली.
कथा वाचीनच, पण परिचय वाचल्यावर माझ्या डोळ्यासमोर लगेच आला तो कोरियन सिनेमा 'पॅरासाईट' मधला प्रसंग.अत्यंत गरीब कुटुंबाच्या बेसमेंटमधल्या घरामध्ये पुराचे पाणी घुसले असते. घराची अवस्था पाहून त्यांची मनोवस्था विकल असणारच. पण त्यांना कामावर जावेच लागते. (कुटुंबाचे चारही लोक एकाच श्रीमंत कुटुंबाकडे काम करत असतात.) आणि तिथे एका लहान मुलांच्या वाढदिवसाची आलिशान पार्टी असते. तिथे होणाऱ्या घटना आठवल्या.

सुरिया's picture

23 Jun 2021 - 4:08 pm | सुरिया

हीच कथा याआधी मिपावर कुठल्याश्या दिवाळी अंकात अनुवादित झालेली आहे.

कुमार१'s picture

23 Jun 2021 - 4:20 pm | कुमार१

गॉजि,
उद्घाटनाचा प्रतिसाद आणि अभिप्राय आवडला .

कॉमी,

'पॅरासाईट' मधला प्रसंग

>>अगदी अगदी ! सहमत.

सुरिया,
माहितीबद्दल आभार !

समजून घ्यायला कुणी असेल तर, पर्वता एवढे दुःख देखील, सहजासहजी पचून जाते....

सौन्दर्य's picture

23 Jun 2021 - 11:22 pm | सौन्दर्य

कथेतील दुःख बाजूला ठेवले तर विषय आणि मांडणी अप्रतिम. बोलायला कोणीही नसणे ह्यासारखी भयानक दुसरी गोष्ट नाही, म्हणूनच सॉलिटरी कनफाइनमेन्ट सर्वात जहाल शिक्षा समजली जात असावी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jun 2021 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार

आयोनाची घोडी जवळ मोकळे होण्यामागची मजबुरी देखील समजते,

नशिबाने सध्याच्या काळात व्यक्त होण्यासाठी कायप्पा, चेपु, मिपा सारखी साधने उपलब्ध्द आहेत........ नाहितर प्रत्येकाला एक एक घोडी खरेदी करावी लागली असती.

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

25 Jun 2021 - 11:58 am | मुक्त विहारि

सहमत आहे ...

सनईचौघडा's picture

26 Jun 2021 - 11:56 am | सनईचौघडा

बुवा शब्द मागे घ्या. तुम्ही कितीही म्हंटलंत तरी कायप्पा, चेपु, मिपा अशी साधनांवर व्यक्त झाल्यावर सुध्दा काही जणांना तशीच वागणुक मिळते.

आता मिपावरिल काही व्यक्तिंना इथे का बरे हद्दपार केले जातं. आहे ना तुमच्या कडे रिमोट मग नका जावु त्यांच्या धाग्यावर त्यांना उगाच डिवचुन उद्युक्त केलं जातं आणि मग तेही चवताळुन काही बाही लिहतात की त्यांना संपा. हद्दपार केलं जाते. डॉ. सुधीर ,संक्षी साहेब, ही ठळक उदाहरणे.
उदाहरणे देण्याची गरज नाहीये तुम्हाला मजलं असेलच या पाच सहा वर्षात कोण कोण गेले ते.. तेव्हा त्या प्रत्येकांना घोडीची ( कोणत्याही साधनांची) गरज आहे.

इथे संयमाने प्रतिसाद देणारे मोजकीच मंडळी आहेते जी जास्त ताणुन धरत नाहीत आणि चला तुमच्याशी पटणार नाही मी इथेच थांबतो असं बोलुन बाजुला होतात.

१ गणेशा, २) कंजुस काका , ३) प्रचेतस उर्फ वल्लीदा

जर तुम्हाला राग आला तर आधीच माफी मागतो. पण मला जे मनापासुन वाटलं ते लिहलं. मनावर घेवु नका.

धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jul 2021 - 5:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण शब्द मागे घेण्याची सुध्दा गरज वाटत नाही.

मिपा मुळे मला काही सहृद मिळाले ज्यांच्या सहवासाने माझ्या व्यक्तीगत आयुष्यात अनेक चांगले बदल झाले.

ही दुधारी तलवार आहे हे मान्यच, पण आपण ती कशी हाताळतो यावर बरेच काही अवलंबून असते.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

24 Jun 2021 - 11:29 am | कुमार१

मुवि, सौन्दर्य व ज्ञा पै,
धन्यवाद !
आपल्या तिघांचेही प्रतिसाद रोचक आहेत.
आवडले.

यानिमित्ताने मिपा या संवाद व्यासपीठाचेही आभार !

संवाद दोन व्यक्तींमध्ये होतो.संवादाला माणूस उरला नाही तर बाकीचे मुके मदतीला येऊ शकतात ..खरय शेवटी व्यक्त होणं महत्त्वाचं, साचलं की त्रास होतो..या निमित्ताने माझा संवाद साधता यायला हवा आठवला.

सतीशम२७'s picture

25 Jun 2021 - 11:07 am | सतीशम२७

https://www.youtube.com/watch?v=3VhePMakCUQ
चेकॉव्ह की दुनिया

कुमार१'s picture

25 Jun 2021 - 11:27 am | कुमार१

भक्ती >> +११

सतीश,
चांगला दुवा !
आभार

कुमार१'s picture

25 Jun 2021 - 11:27 am | कुमार१

भक्ती >> +११

सतीश,
चांगला दुवा !
आभार

पाषाणभेद's picture

25 Jun 2021 - 11:08 pm | पाषाणभेद

@कुमार१
आपण कथापरिचयाचा हा वसा घेतला आहे. फार समृद्ध अनुभव मूळ कथा न वाचणार्‍या आम्हा वाचकांना मिळतो आहे.

(एकतर मुळ कथा वाचून जुने ईंग्रजी वाचून त्यात मन रमेल असे नाही, तितका वेळ नाही, त्या कोठून मिळवायच्या असाही प्रश्न आहे, मिळतील त्या तितक्या ताकदीच्या असतील असेही नाही.
तर आमच्या वतीने तुम्ही मेहनत घेवून सादर करत आहात यातच आमचे सौख्य सामावले आहे. )

आपले आभार.

आपण जे दिवस/श्राद्धविधी वगरे करतो त्यांचा मूळ उद्देश असं मोकळं व्हावं/वाटावं असा असावा का? मनःपूर्वक विधी केल्यास मानसिक शांतता लाभते असा अनुभव आहे. थोडक्यात विधी मृताच्या नावाने पण फायदा जे जिवंत आहेत त्यांना.

जी ए कुलकर्णींच्या एका गोष्टीत वाक्य आहे- "सगळ्या जगानं सुतक पाळावं एव्हढं कुणाचही दु:ख मोठं नसतं"

गॉडजिला's picture

26 Jun 2021 - 2:23 pm | गॉडजिला

जग नाही, तर अपेक्षाभंग करणारे काही लोकच कारणीभूत ठरतात, जग तर परत उभारी घ्यायचे बळ देते.

कुमार१'s picture

26 Jun 2021 - 9:45 am | कुमार१

पाभे, मनो, कॉमी

पूरक माहिती आणि काही वेगळे विचार लिहिल्याबद्दल धन्यवाद !