‘भेट’ तिची त्याची (कथा परिचय: ४ )

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
6 Jul 2021 - 4:25 pm

विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख :

१. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! (https://www.misalpav.com/node/48861)
२. एका आईचा सूडाग्नी (https://www.misalpav.com/node/48900)
३. कुणास सांगू ? (https://www.misalpav.com/node/48952)
..........

या लेखमालेत आतापर्यंत आपण इंग्लीश, फ्रेंच आणि रशियन अशा प्रसिद्ध लेखकांच्या गाजलेल्या प्रत्येकी एक कथांचा परिचय वाचला आहे. या लेखात कथा परिचयासाठी एका अमेरिकी लेखकाची निवड केलेली आहे - O Henry. हे खरे तर त्यांचे टोपण नाव. त्यांचे खरे नाव William Porter असे होते. त्यांनी लेखन करताना अनेक टोपणनावांचा वापर केलेला आहे. त्यापैकी सदर नाव विशेष लोकप्रिय झाले. हे टोपण नाव त्यांनी का घेतले याच्याही अनेक दंतकथा प्रचलित आहेत.

हेन्री यांनी विपुल कथालेखन केलेले असून त्या व्यतिरिक्त कविता आणि अन्य काही लेखनही केलेले आहे. त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये अशी सांगता येतील :

१. खेळकर व रंजक कथनशैली आणि प्रसंगांची शानदार वर्णने २. श्रमजीवी वर्गातील कथापात्रे
३. वाचकाला आश्चर्यचकित करून आनंद देणारा कथेचा शेवट

अशा या प्रसिद्ध कथालेखकाच्या एका तितक्याच गाजलेल्या कथेचा परिचय या लेखात करून देतो. कथेचे नाव आहे The Gift of the Magi.

कथा सारांश :
जेम्स आणि डेला हे कष्टकरी कुटुंब असून त्यांची आर्थिक प्राप्ती बेतास बात आहे. ही कथा घडते ख्रिसमसच्या आदल्या दिवशी. या सणाच्या दिवशी त्या दोघांनाही एकमेकांना काहीतरी छानशी वस्तू भेट द्यायची आंतरिक इच्छा आहे. जेम्स कामावर गेलेला आहे तर डेला घरी आहे. तिने तिच्या घरखर्चातून काही तुटपुंजी बचत केलेली आहे. आता ती पैशांचा डबा उघडून पाहते आणि तिच्या लक्षात येते, की त्यात अवघे १ डॉलर्स आणि ८७ सेंट्स शिल्लक आहेत.

आता ती त्या रकमेकडे पाहून खूप विचार करते, की तिच्या लाडक्या नवऱ्याला एवढ्याशा छोट्या रकमेतून काय भेटवस्तू आणू ? विचार करून तिला खूप वाईट वाटते. मग ती आरशासमोर उभी राहते. त्यांच्या घरात एक आरसा आहे. परंतु तो इतका अरुंद आहे की त्यात एका वेळेस एखादा माणूस एका वेळेस त्याचे प्रतिबिंब पूर्णपणे पाहूच शकत नाही ! आरशापुढे उभे राहिल्यावर डेलाच्या मनात एकदम एक कल्पना चमकून जाते. ती स्वतःचे बांधलेले केस पटकन मोकळे सोडते. ते खूप लांब असल्याने आता छानपैकी खालपर्यंत रुळतात. ती अभिमानाने तिच्या केशसंभाराकडे पाहते. या गरीब कुटुंबाकडे संपत्ती नसली तरी त्यांच्याकडील दोन गोष्टींचा मात्र त्यांना विलक्षण अभिमान होता. त्यापैकी एक म्हणजे डेलाचे केस तर दुसरी म्हणजे जेम्सकडे असलेले वडिलोपार्जित सोन्याचे घड्याळ. डेलाला मनातून वाटे की एखाद्या महाराणीला सुद्धा आपल्याइतके सुंदर केस असणार नाहीत. तर जेम्सच्या मनात असा विचार येई की एखाद्या राजाकडेसुद्धा आपल्या इतके भारी घड्याळ असणार नाही !

डेलाने एकवार तिच्या लांबसडक, अगदी गुडघ्याच्याही खालीपर्यंत लोंबलेल्या केसांकडे प्रेमभराने पहिले. क्षणभर तिने विचार केला आणि तिच्या डोळ्यातून एक दोन अश्रूही गळाले. पटकन तिने ते केस पुन्हा व्यवस्थित डोक्याशी बांधले. आता मनात तिने एक निर्णय घेतला होता. घाईतच तिने कोट व hat चढवली आणि ती रस्त्याने धावतच दुकानांच्या भागात पोचली. तिथे तिला एक केस व सौंदर्यप्रसाधनांचे दुकान दिसले. ती घाईने आत शिरली आणि तिथल्या बाईंना तिने अधीरतेने विचारले,
“माझे केस तुम्ही विकत घेणार का ?”

त्या उत्तरल्या, “अर्थात, तोच तर माझा व्यवसाय आहे !”

मग त्या दुकानदार बाईंनी तिचे केस मोकळे सोडून त्यांच्या वजनाचा अंदाज घेतला. त्या केसांचे त्या वीस डॉलर्स देतील असे त्यांनी डेलाला सांगितले. ती लगेच तयार झाली. तिच्या कापलेल्या लांबसडक केसांच्या बदल्यात तिला वीस डॉलर्स मिळाले. ते घेऊन ती भेटवस्तूंची अनेक दुकाने पालथी घालू लागली. आता तिला नवर्‍यासाठी काहीतरी छान घेता येणार होते. एका दुकानात तिला घड्याळाचा एक छान सोनेरी पट्टा दिसला. जेम्सकडे जरी ते वडिलोपार्जित भारी घड्याळ असले तरी त्याला चांगला पट्टा नव्हता. त्यामुळे तो ते कोटाच्या खिशात ठेवत असे. त्याला ते घड्याळ खूप बहुमूल्य वाटे. तो एरवी वेळ बघताना, आपल्याला कोणी बघत नाहीये ना, अशी खात्री करून हळूच ते घड्याळ बाहेर काढी आणि वेळ बघे. आताचा सोनेरी पट्टा पाहिल्यावर डेलाला अत्यानंद झाला आणि ती मनात म्हणाली,

“ माझ्या जेम्ससाठी हीच सर्वोत्तम ख्रिसमसची भेट राहील”.

मग तिने 21 डॉलर्स मोजून तो पट्टा विकत घेतला. आता अत्यंत आनंदी मनाने पर्समध्ये फक्त 87 सेंट्स उरलेल्या अवस्थेत ती बागडत घरी पोचली.
आता ती शांतपणे आरशासमोर उभी राहिली. आताच्या तिच्या आखूड केसांमुळे ती एखाद्या शाळकरी मुलासारखी दिसत होती. हे रूप पाहिल्यावर नवरा काय म्हणेल या विचाराने ती अस्वस्थ झाली. संध्याकाळचे सात वाजले. तिने दोघांचे जेवण तयार ठेवले होते. तिच्या मनात धाकधूक होती की जेम्सला हे आवडणार नाहीच. तिने नवा सोनेरी पट्टा हातात ठेवला आणि दाराजवळ बसून त्याची वाट पाहू लागली. तेवढ्यात तो आला. त्याने तिला तिला पाहिले मात्र आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. काहीसा विस्फारून आणि विचित्रपणे तो तिच्याकडे पहातच राहिला.

मग ती त्याला म्हणाली, “माझ्या या रूपाचं तू वाईट वाटून घेऊ नकोस. अरे, तुझे माझ्या केसांवर प्रेम होते हे मला माहित आहे. पण केस काय पुन्हा उगवतीलच ना. आज ते विकून जे पैसे मिळाले त्यातून मी तुझ्यासाठी सुंदरशी भेट आणलीय बघ. आता रागावणार नाहीस ना ?”

त्यावर जेम्सने तिला मिठीत घेतले. एका हाताने त्याने त्याच्या कोटाच्या खिशात हात धरून हळूच एक वस्तू बाहेर काढली. ती कागदात गुंडाळलेली होती. त्याने ती टेबलावर टाकली. तो म्हणाला, “अगं वेडे, केसांचं काय घेऊन बसलीस. तू अशीही मला खूप आवडतेस, प्रिये. आता मी बघ, तुझ्यासाठी काय आणले ते. तिने अधीरतेने ती वस्तू उचलून त्यावरील कागद काढला. आत पाहताक्षणी ती एकदम आनंदाने ओरडली पण दुसऱ्याच क्षणी रडू लागली.

जेम्सने तिला काय आणले होते बरे ? एक सुंदर भारी कंगव्याचा संच ! त्यांना काही रत्ने लावलेली होती. खूप दिवसांपासून तिच्या मनात तसा संच घ्यायचे होते. पण पैशाअभावी जमत नव्हते. आज तो संच खुद्द तिचा आहे, पण त्याचा वापर करायला ती आपले केस गमावून बसली होती ! तरीसुद्धा तिने प्रेमभराने ती भेटवस्तू छातीशी घट्ट धरली व त्याला म्हणाली, “अरे, माझे केस तसे खूप वेगाने वाढतात बघ !”
मग तिने त्याच्यासाठी आणलेला सोनेरी पट्टा त्याला दाखवला. तो चमचम करीत होता. ती म्हणाली, “बघ किती छान आहे. खूप दुकाने पालथी घातली मी तो मिळवायला. आता तू तुझ्या घड्याळ्याला लावून ते छानपैकी हातावर बांध बघू. आता तू दिवसातून शंभर वेळा सुद्धा वेळ बघू शकशील !”
जेम्सने एक दीर्घ उसासा टाकला व तो खाली बसला. तो म्हणाला, “अगं आता या दोन्ही भेटवस्तू आपण जरा बाजूलाच ठेवू बघ. काय सांगू तुला, माझे सोन्याचे घड्याळ विकून त्याच पैशांनी मी तुला ख्रिसमसची भेट आणलेली आहे !!”

इथे जेम्स व डेलाच्या ख्रिसमस भेटीची कहाणी संपते.

पुढे लेखकाने केलेली टिपणी महत्त्वाची आहे आणि त्यातून कथेच्या शीर्षकाचा उलगडा होतो. बायबलनुसार ‘द मॅगी’ म्हणजे तीन शहाणी माणसे अर्थात सत्पुरुष. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी त्याच्यासाठी सोने व सुगंधी द्रव्यांच्या भेटी आणल्या होत्या. ती माणसे एक प्रकारे देवदूत होती. म्हणून त्यांच्या भेटी अमूल्य मानल्या जातात. तद्वत, या कथेतील दोघांनी एकमेकांसाठी भेटवस्तू आणताना स्वतःजवळील सर्वात मौल्यवान वस्तूचा त्याग केलेला आहे. त्यामुळे ही दोघेदेखील ‘द मॅगी’ प्रमाणे शहाणी माणसेच ठरली आहेत.
...

तर अशी ही सुंदर प्रेमकथा. स्वतःपेक्षाही आपल्या जोडीदारावर अधिक प्रेम करणारे दाम्पत्य त्यात आपल्याला भेटते. ही कथा भेटवस्तूच्या संदर्भात एक मौलिक संदेश देते. प्रत्यक्ष वस्तूपेक्षाही देणारी व्यक्ती ही अधिक मौल्यवान आहे याचीही जाणीव आपल्याला कथा वाचल्यावर होते. 1905 मध्ये प्रथम प्रकाशित झालेली ही कथा इंग्लिश साहित्यात खूप गाजली. नंतर जगभरात त्या कथेची असंख्य माध्यम रूपांतरे झालेली आहेत. त्यामध्ये कथन, नाट्य, मालिका व चित्रपट या सर्वांचा समावेश आहे. इंग्लिश भाषेच्या शालेय अभ्यासक्रमातही ही कथा नेमलेली असते. 2004 मधील आपल्याकडील रेनकोट हा हिंदी चित्रपटही (अजय देवगण, ऐश्वर्या राय) या कथेवर आधारित आहे.
.................................................

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

6 Jul 2021 - 4:44 pm | गुल्लू दादा

आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2021 - 5:17 pm | चौथा कोनाडा

सुंदर कथा आहे. फार वर्षांपुर्वी वाचली होती असं पुसटसं आठवतंय.
आपल्या जवळील सर्वात मौल्यवान वस्तूचा त्याग करायला खरंच आभाळा एवढं हृदय पाहिजे.
धन्यवाद या कथा-धाग्यासाठी !

तेंव्हा पासुनच मनात घर करुन राहिली आहे... ओ हेन्रीची आहे हे माहित न्हवते. ओ हेन्री, मोपासा वगैरे अनेकांच्या कथा घरात जि मासिके येत त्यातुनच अनुवादीत स्वरुपात वाचायला मिळाल्या. एकूणच अशा सदाबहार कथां मधुन मला बालपणी परदेशातील लोक हे अत्यंत समजुतदार व अनुभवातुन शहाणे झालेले लोक असतात असा समज द्रुढ झाला होता. त्या अभिव्यक्ति वाचुनच माझे पाश्चात्य संस्क्रुतीबाबत आकर्षण वाढले होते...

Bhakti's picture

6 Jul 2021 - 6:39 pm | Bhakti

प्रत्यक्ष वस्तूपेक्षाही देणारी व्यक्ती ही अधिक मौल्यवान आहे याचीही जाणीव आपल्याला कथा वाचल्यावर होते.
अत्यंत प्रसिद्ध कथा आहे ही.छानच!

कुमार१'s picture

6 Jul 2021 - 7:02 pm | कुमार१

दर्दी वाचक असलेल्या वरील सर्व प्रतिसादकांचे आभार !

ही बहुपरिचित कथा इथे घेण्याचा मोह मला आवरला नाही :)

मदनबाण's picture

6 Jul 2021 - 7:23 pm | मदनबाण

कथा वाचताच हे गाणं आठवल ! कथानक जुळतं म्हणुन चटकन आठवलं... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Teri Mitti Female Version - Kesari | Arko feat. Parineeti Chopra | Akshay Kumar | Manoj Muntashir

कुमार१'s picture

6 Jul 2021 - 8:16 pm | कुमार१

अगदी अनुरूप दुवा
छानच !

Bhakti's picture

6 Jul 2021 - 9:05 pm | Bhakti

Same pinch ;)
हेच गाणं द्यायला आले होते.
कथेमुळे खुप दिवसांनी पाहिले गेले.

टर्मीनेटर's picture

6 Jul 2021 - 8:31 pm | टर्मीनेटर

परिचित कथेचा पुनःपरिचय आवडला!
नक्की आठवत नाही पण कदाचित ११वी किंवा १२वी च्या इंग्लिश विषयाच्या पुस्तकात आम्हाला हा धडा होता बहुतेक किंवा लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात असल्याप्रमाणे अनुवादीत कथेच्या रूपात वाचली गेली असावी.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2021 - 9:04 am | श्रीरंग_जोशी

हृदयस्पर्शी कथेची ओळख करुन देणारा लेख आवडला.
तुम्ही लिहिल्याप्रमाणे या कथेची अनेक रुपांतरे झाली आहेत. त्यापैकी एक आम्ही टिव्हीवर दोन वर्षांपूर्वी पाहिले होते. युटुयूबर ते उपलब्ध आहे.

कुमार१'s picture

7 Jul 2021 - 9:32 am | कुमार१

टर्मि, आभार .

श्री जो,
यु ट्यूब दुवा छान, धन्यवाद !

मित्रहो's picture

7 Jul 2021 - 12:04 pm | मित्रहो

एका सुंदर कथेचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद

तुषार काळभोर's picture

7 Jul 2021 - 4:57 pm | तुषार काळभोर

तुम्ही रेनकोटचा उल्लेख केल्याने आज पहिल्यांदा रेनकोट चित्रपटाचं विकी पान वाचलं.
चित्रपट सुद्धा तितकाच सुंदर असावा, असं वाटलं.
पण असे भावनिक चित्रपट पाहवत नाहीत.

धन्यवाद !!

कुमार१'s picture

8 Jul 2021 - 8:16 am | कुमार१

मित्र, तु का :
धन्यवाद.

चित्रपट सुद्धा तितकाच सुंदर असावा, असं वाटलं.

चांगला आहे.
मला आवडला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jul 2021 - 8:35 am | ज्ञानोबाचे पैजार

ही कथा ऐकलेली होती पण तरी सुध्दा परत वाचायला आवडली.
रेनकोट चांगला सिनेमा आहे. त्यातली गाणी पण मस्त होती.
शुभा मुदगल ने गायलेले "मथुरा नगरपती" हे गाणे तर मला फारच आवडते.
धन्यवाद कुमार सर
पैजारबुवा,

सुधीर कांदळकर's picture

10 Jul 2021 - 11:08 am | सुधीर कांदळकर

मी महाजालावर वाचलेली सर्वोत्कृष्ट कथा. 'द सुव्हेनीर' या नावाच्या कथेशी व या कथेशी माझ्या मनात नावाचा गोंधळ झाला होता. त्या कथेत ते जुन्या काळातले खिशात ठेवायचे सोन्याचे घड्याळ होते आणि त्या विकलेल्या घड्याळ्याची सोन्याची साखळी ती भेट देते.

एका मस्त कथेची आठवण ताजी करणारी, ओ हेनरीच्या भावस्पर्शी भाषेची आठवण करून देणारे मस्त लिखाण. धन्यवाद.

कुमार१'s picture

10 Jul 2021 - 12:37 pm | कुमार१

बुवा, सुधीर
धन्यवाद.

हेनरीच्या भावस्पर्शी भाषेची आठवण

+ १११

कुमार१'s picture

10 Jul 2021 - 12:37 pm | कुमार१

बुवा, सुधीर
धन्यवाद.

हेनरीच्या भावस्पर्शी भाषेची आठवण

+ १११

इतर वाचकांप्रमाणे मी देखील ही कथा आधी वाचली होती.
छान परिचय करून दिलात. याचे ऑनलाईन पुस्तक जरूर व्हावे.

कुमार१'s picture

13 Jul 2021 - 10:07 am | कुमार१

नियमित प्रतिसाद आणि सदिच्छाबद्दल धन्यवाद !

कुमार१'s picture

13 Apr 2022 - 11:24 am | कुमार१

O Henry यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक कथा पारितोषिक दरवर्षी दिले जाते. यंदाचे पारितोषिक बंगाली लेखक अमर मित्रा यांना मिळाले आहे
अभिनंदन !