कोसळणारा ‘पाऊस’ : १०० वर्षांपूर्वी !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
2 Jun 2021 - 7:58 am

विदेशी कथा परिचयमाला :१
...

नुकतेच आपल्याकडे चक्रीवादळाच्या प्रभावाने काही जोरदार पाऊस झाले. किनारपट्टीच्या भागातले असे पाऊस म्हणजे निसर्गाचे रौद्र रूप असते. त्याचे कोसळणे हे भयानक असते. त्या तुलनेत माझ्या भागात झालेला पाऊस तसा मध्यमच होता. असाच एक पाऊस खिडकीतून पहात मी खुर्चीवर बसलो होतो. पावसाच्या पडण्याचा आवाज बऱ्यापैकी होता. पाऊस पाहताना मला काहीशी तंद्री लागली आणि मनाने मी कित्येक वर्षे मागे पोचलो. तेव्हाची एक आठवण अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली. तेव्हा मी वयाची पंचविशी पूर्ण केली होती आणि तो माझा वाढदिवस होता. तेव्हा सहज काकांकडे गेलो होतो. त्यांनी मला शुभेच्छा देत एक इंग्लिश पुस्तक भेट दिले. विख्यात इंग्लिश साहित्यिक सॉमरसेट मॉम यांचा तो कथासंग्रह होता – ‘पेंग्विन’ने प्रकाशित केलेला. तोपर्यंत मी मॉम यांची काही पुस्तके ब्रिटिश लायब्ररीतून आणून वाचली होती. वैद्यकीय पदवीधर असलेल्या मॉम यांनी एक दोन वर्षेच वैद्यकीय सेवा करुन डॉक्टरकीला कायमचा रामराम केला होता ! पुढे निव्वळ लेखनावरच आपली उपजीविका करीत हा माणूस तत्कालीन कोट्याधीश झाला. तेव्हा त्यांच्याबद्दल मला विलक्षण कुतूहल होते, आजही आहे. त्यांचा कथासंग्रह माझ्या पंचविशीची भेट म्हणून मिळणे हे माझ्यासाठी कमालीचे आनंददायी होते. ही भेट खरंच आयुष्यातील अविस्मरणीय ठरली.

तो कथासंग्रह चाळून पाहिला आणि त्यात असे दिसले की पहिलीच कथा अतिदीर्घ आहे. त्यानंतरच्या सर्व कथा लघुकथा म्हणाव्यात इतक्या सामान्य लांबीच्या होत्या. तर ही दीर्घकथा म्हणजे ‘Rain’. यथावकाश मोठ्या उत्सुकतेने ती वाचली - अगदी एका बैठकीत. नंतर पुनर्वाचन करताना त्यातील काही निवडक भाग वाचला. कथा संपताना जेव्हा त्यातली ‘तसली’ बाई अखिल पुरुष जातीचा ‘गलीच्छ ओंगळ डुकरे’ म्हणून उद्धार करते ते विसरणे शक्य नव्हते. तिचे ते तिरस्कारयुक्त वाक्य आणि त्यानंतरचे लेखकाचे समाप्तीचे वाक्य ही दोन्ही माझी आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली.

आताचा हा पाऊस बघत असताना पुन्हा भानावर आलो - भूतकाळातून पुन्हा वर्तमानात. आणि एक विचार उचंबळून आला. आता पुन्हा एकदा ‘Rain’ वाचली पाहिजे आणि तिच्यावर एक परिचय लेख लिहावासा वाटला. ही कथा सर्वप्रथम एका अमेरिकी मासिकात १९२१ ला प्रसिद्ध झालेली होती. म्हणजे यंदा तिला शंभर वर्षे पूर्ण झाली ! हा योगायोग मला विलक्षण वाटला. म्हणूनच निर्धार केला आणि ही कथा पुन्हा वाचायचे ठरवले. आता माझ्याजवळ ते जुने पुस्तक नव्हते. म्हणून सहज जालावर शोध घेतला आणि ती मिळाली. मग अधाशासारखी वाचून काढली. तिच्या जन्मशताब्दी निमित्ताने तिचा परिचय वाचकांना करून देतो.

ही कथा १०० वर्षे जुनी आहे. मॉम यांची एक अभिजात कलाकृती म्हणून ती नावाजलेली आहे. इंग्लिश भाषेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात ती समाविष्ट असते. गेल्या शंभर वर्षात तिच्यावर असंख्य चर्चा, वाद-विवाद व काथ्याकूट भरपूर झालेले असून ते सर्व जालावर वाचायला उपलब्ध आहेत. आपल्यातील चोखंदळ वाचकांनी ही कथा वाचलेली सुद्धा असेल. या कथेचे पुढे नाट्य, मूकपट आणि बोलपट रूपांतरही झालेले आहे. हे सर्व पाहता स्वतःवर निवेदनाचा कुठलाही निर्बंध न ठेवता मी तिच्यावर लिहिणार आहे. (तरीसुद्धा जर कोणाला ती आधी मुळातूनच वाचायची असेल तर अशा वाचकाने ती आधी वाचून मग इथे आल्यास त्याचे स्वागतच असेल !)
….
….

‘रेन’ सर्वप्रथम १९२१ साली ‘Miss Thompson’ या नावाने ‘द स्मार्ट सेट’ या अमेरिकी साहित्य मासिकात प्रसिद्ध झाली. तेव्हा त्याच्या मुखपृष्ठावर तिची लघुकादंबरी अशी जाहिरात केलेली दिसते (चित्र पहा):

ok

कालांतराने कथासंग्रहात समाविष्ट करताना तिचे ‘रेन’ असे नामकरण झालेले दिसते.

ok

प्रत्यक्ष कथेकडे येण्यापूर्वी मॉमना ही कथा कोणत्या परिस्थितीत सुचली ते पाहू. सन 1916 मध्ये मॉम व त्यांचे सचिव (वाफेवर चालणाऱ्या) बोटीतून पॅसिफिक सफरीसाठी चालले होते. तेव्हा त्यांनी अमेरिकन समोआ या बेटाला भेट दिली होती. त्याच वेळी गोवराची जोरदार साथ पसरली होती. बोटीवरील एकाला त्याची बाधा झाल्याने विलग केले होते. आता इतरांना कोणाला संसर्ग झाला आहे का ते पाहण्यासाठी त्यांचेही विलगीकरण करून बोट प्रवासात मध्येच रोखून ठेवली होती. हे विलगीकरण सहा आठवडे असल्याने बोटीवरील प्रवाशांना मधल्या ठिकाणी एका अतिथीगृहात मुक्काम करावा लागला होता.
त्यांच्या बोटीवरील सहकार्‍यांमध्ये एक धर्मप्रचारक व त्याची पत्नी आणि थॉम्पसन ही तरुणी यांचा समावेश होता. या सर्वांना मॉमनी त्यांच्या कथेतील पात्रे बनवून टाकले.

कथानक
वरील सत्य घटनेनुसार गोवराची जीवघेणी साथ चालू आहे. त्यानुसार या बोटीवरील प्रवासी मधल्याच एका ठिकाणी उतरवून तिथल्या अतिथीगृहात दाखल झालेले आहेत. त्यांचा तिथे काही काळ मुक्काम असणार आहे. संपूर्ण कथाभर सतत धोधो कोसळणारा पाऊस सोबतीस आहे.

कथेतील मुख्य पात्रे :
• डॉ. मॅकफेल (वैद्यकीय डॉक्टर) व त्यांची पत्नी.
• डेव्हिडसन व त्यांची पत्नी. हे दोघेही ख्रिस्ती धर्मप्रचारक आहेत.
• मिस थॉम्पसन उर्फ सॅडी ही वेश्या. ती तिच्या जुन्या ठिकाणी पडलेल्या पोलिसांच्या धाडीमुळे पळून आलेली आहे.

कथा सारांश
एका अर्थाने वरील दोन्ही जोडपी ही अभिजन वर्गातली आहेत. ती सभ्यता व सार्वजनिक शिष्टाचार पाळून एकमेकांशी गप्पा मारत आहेत. तर सॅडी ही ‘धंदेवाईक’च असल्याने तिचे ‘गिर्‍हाइकांशी’ बोलणेवागणे त्याला अनुरूप आहे. तिच्या खोलीतून कायम मोठ्याने ग्रामोफोन लावल्याचा आवाज येत असतो व त्या तबकडीवरील गाणी अश्लील असतात. डेव्हिडसन मुळात धर्मप्रचारक व त्याच कामासाठी देश-विदेश फिरणारे. त्यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणच्या मागास लोकांना पापपुण्य इत्यादी कल्पना शिकवून सभ्यतेने राहायला शिकविलेले असते. आताच्या मुक्कामात सॅडीचा तिच्या गिर्‍हाइकांसोबत चाललेला धुडगूस पाहून ते कमालीचे अस्वस्थ होतात. डॉक्टर व त्यांच्या बायकोलाही तिचे वागणे आवडलेले नाही पण ते तितकेसे अस्वस्थ होत नाहीत. डेव्हिडसन मात्र तिच्या तिथल्या वास्तव्याने अक्षरशः त्रस्त झालेत. ही असली बया आपल्या मुक्कामी असता कामा नये हे त्यांनी मनात पक्के ठरवले आहे. सुरुवातीस ते तिच्या खोलीत जाऊन निषेध व्यक्त करतात. पण ती निर्ढावलेली असल्याने त्यांचा अपमान करते.

डेव्हिडसन यांचा दबदबा असल्याने त्यांची त्या प्रदेशाच्या गव्हर्नरपर्यंत ओळख आहे. त्याचा फायदा उठवून ते गव्हर्नरना पटवतात. त्यानुसार गव्हर्नर आदेश काढतात की आठवड्याने येणाऱ्या अन्य एका बोटीतून सॅडीची रवानगी सॅनफ्रान्सिस्कोला करण्यात यावी. तिला तिथे पाठवल्यावर तिथल्या कायद्यानुसार तिला तिच्या गैरकृत्यांसाठी तीन वर्षे तुरुंगवास घडणार असतो. हे ऐकल्यावर सुरुवातीस सॅडी डेव्हिडसनवर क्रुद्ध होते. ती नंतर डॉक्टरना त्यांचे मन वळवण्यासाठी मध्यस्थी करायला सांगते. पण नंतर या प्रकरणाला कलाटणी मिळते. डेव्हिडसन तिने पापाचे प्रायश्चित्त घेणेच कसे तिच्या कल्याणाचे आहे हे तिला बिंबवतात. तिच्यासाठी रोज प्रार्थना करू लागतात. मग तिच्या वागण्यात सुधारणा होऊ लागते. हळूहळू तिच्या चेहऱ्यावर शरणागतीचे भाव देखील येतात. ती हा मुक्काम सोडून सॅनफ्रान्सिस्कोला जायचे कबूल करते. त्यापूर्वी तीन-चार दिवस डेव्हिडसन यांचा तिच्या खोलीतील एकट्याचा ‘वावर’ बराच वाढतो.

दरम्यान डॉक्टरना डेव्हिडसनच्या अंतस्थ हेतूबद्दल शंका येऊ लागते. हा माणूस तिच्या ‘आत्म्याच्या शुद्धीकरणा’ऐवजी तिच्यावर प्रेमाचे जाळे तर टाकत नाहीयेना असे त्यांना वाटू लागते. अखेर सॅडीची रवानगी करण्याचा दिवस येऊन ठेपतो. त्याच्या आदल्या रात्री डेव्हिडसन तिच्या खोलीतून रात्री दोन वाजता बाहेर पडतात.
सकाळ होते. डॉक्टरना जाग येते ती तिथल्या अतिथीगृहाचा मालक त्यांना जागा करायला येतो त्यामुळे. तो घाबरलेला आहे आणि तो घाईने डॉक्टरांना बरोबर घेऊन निघतो. दोघे वेगाने समुद्र किनार्‍यावर पोचतात. तिथल्या गर्दीला दूर सारल्यावर जे दृष्य दिसते ते भयानक असते. तिथे डेव्हिडसनचा मृतदेह पडलेला असतो. डॉक्टर तो वळवून पाहतात. मृताच्या गळ्यावर वस्तऱ्याने चिरल्याची भली मोठी जखम असते व त्याच्या हातात तो वस्तरा देखील. मग पुढे पोलीस वगैरे सोपस्कार होतात. आता डॉक्टरांच्या बायकोद्वारा ही बातमी डेव्हिडसनच्या बायकोला पोचवली जाते. ती अजिबात रडत नाही. उलट करारी मुद्रेने त्यांचा मृतदेह बघायला जाते. तिच्या चेहऱ्यावरचे तटस्थ खंबीर भाव पाहून डॉक्टर स्तिमित होतात. त्यांना राहून आश्चर्य वाटते.

ही सर्व मंडळी आता अतिथीगृहाकडे परततात. वाटेत सॅडीची खोली लागते. ती उघडी असते. आता तिच्या खोलीतून मोठ्या आवाजात लावलेली अश्लील गाणी ऐकू येतात. ती दारातच तिच्या पूर्वीच्या धंदेवाईक देहबोलीत उभी आहे. डेव्हिडसनबाई जवळ येताच ती अगदी गडगडा हसते आणि पचकन थुंकते. मग ती स्वतःचे तोंड हाताने झाकून वरच्या मजल्यावर पळते. त्यावर डॉक्टर संतापतात. ते तिच्या मागे धावत खोलीत घुसतात. रागाने ते अश्लील संगीत बंद करतात. त्यावर ती उद्धटपणे त्यांना म्हणते, “इथे खोलीत कशाला आलात, डॉक्टर ? तुम्हालाही ‘तेच’ हवे आहे का ?” यावर डॉक्टर भडकतात. पुढे ती अत्यंत तिरस्कारयुक्त चेहऱ्याने म्हणते,
“तुम्ही सर्व पुरुष गलिच्छ ओंगळ डुकरे आहात, अगदी सर्वजण एकाच माळेचे मणी आहात !” त्यावर डॉक्टर अवाक होतात. त्या एका वाक्याने त्यांना सर्वकाही समजून चुकते.

कथेतील अनुत्तरीत रहस्यमय प्रश्न
१. डेव्हिडसन यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला ?
२. जर आत्महत्या असेल तर ती सॅडीसोबत केलेल्या संभोगानंतरची पश्चात्तापबुद्धी सुचवते.
३. मात्र जर खून झाला असेल, तर तो सॅडीने केला की त्यांच्याच बायकोने ?

लेखकाने मोठ्या खुबीने याची उत्तरे न देता वाचकांवर सोडून दिली आहेत ! यावर अभ्यासकांत बरीच चर्चा झालेली आहे. आपणही इथे करायला हरकत नाही.

कथेतील सौंदर्यस्थळे

१.सर्व पात्रांची मार्मिक व बारकाईने केलेली वर्णने. यात मॉम यांचा हातखंडा आहे. एखाद्या पात्राच्या वर्णनातून ते आपल्यासमोर त्याची मूर्तिमंत प्रतिमा उभी करतात.
सॅडीची जी दोन्ही भिन्न रुपे रंगवलीत त्याला तोड नाही. तिचा कथांतातील तिरस्कारयुक्त भाव तर अंगावर चालून येतो (इथे विजय तेंडूलकर आठवतात). तसेच आदिवासींची ढंगदार वर्णनेही छान.
२. डेव्हिडसनच्या धर्माच्या बुरख्याआड दडलेला विषयासक्त पुरुष हे तर कथेचे बीज व बलस्थान आहे.
त्याने पूर्वी कितीही पुण्यकर्मे केलेली असली तरी संधी येताच तो स्खलनशील ठरला.

३. डॉक्टर व डेव्हिडसनच्या बायका आणि सॅडी यांच्यातील सामाजिक भिन्नता व दुरावाही छान दाखवला आहे.
४. वेश्याव्यवसाय व समाज : ‘हा व्यवसाय अजिबात चालू देता कामा नये’ हे धर्मगुरूंचे मत तर तो अटळ आहे हे पोलिसांचे मत ! “पोलिसांना वेळच्यावेळी हप्ते मिळाल्यावर ते दुसरे काय म्हणणार ?” हा संवाद वास्तववादी. असे हे सनातन प्रश्न व त्यांची ठरलेली उत्तरे.
५. वाचकाला हलवून टाकणारा व अस्वस्थ करणारा हृदयद्रावक शेवट.

कथेतील पावसाचा प्रतीकात्मक वापर
संपूर्ण कथेमध्ये ‘रेन’ हा शब्द तब्बल 26 वेळा आलाय ! कथाबीज व पावसाचा संबंध काय, यावर विद्वानांत बराच खल झालेला आहे. त्यानुसार लेखकाच्या मनात हे हेतू असू शकतील:

१. पाऊस ही निसर्गाची मूलभूत ताकद आहे पण तोच जेव्हा आभाळ फाटल्यागत अविरत कोसळतो तेव्हा तो मृत्यूचे प्रतीक बनतो.
२. बायबलनुसार पावसाचे असे कोसळणे म्हणजे देवाची शिक्षा असते.
३. पाऊस हे पश्चातापाचे अश्रू आहेत. ते पाप ‘धुऊन’ काढतात.

४. जसा कथेचा कळसबिंदू जवळ येतो तसे पावसाचे वर्णन अधिकाधिक येऊ लागते आणि त्याची वर्णनेही अलंकारिक होतात. त्यापैकी malignant हे विशेषण सर्वोत्तम आहे !
५. सारांश : या कथेत पाऊस हा क्रमाने क्रोध, शिक्षा आणि पश्चात्ताप यांचे प्रतीक बनून येत राहतो. त्याची साद्यंत वर्णने वाचकाच्या मनात खळबळ व चिंता उत्पन्न करतात.

कथेबद्दलची कुजबुज
ती ‘द स्मार्ट सेट’ मध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी जवळपास पंचवीस-तीस प्रकाशकांनी नाकारली होती म्हणे ! ( पुढे तिने कथाविश्वात इतिहास घडवला).

तर अशी ही अस्वस्थ करणारी व मनात खळबळ उडवणारी ‘रेन’. उच्चभ्रूपणा, दिखाऊ सभ्यता आणि नैतिकता यांचा बुरखा अलगदपणे फाडून दाखवणारी. मॉम यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली. परिणामकारक शेवट हे तिचे मर्मस्थान. काही अभ्यासकांच्या मते शंभर वर्षानंतर आजही ही कथा ‘जुनी’ झालेली नाही; तिची ताकद टिकून आहे. त्यातल्या शेवटच्या दोन वाक्यांमुळेच ती माझ्या आयुष्यभर स्मरणात राहिली आहे. तीच मूळ दोन वाक्ये उद्धृत करून हा परिचय संपवतो :

She answered, “You men! You filthy, dirty pigs! You`re all the same, all of you. Pigs! Pigs!”
Dr. Macphail gasped. He understood.
...........................

1. ‘रेन’ येथे वाचता येईल : https://www.lonestar.edu/departments/english/maugham_rain.pdf
2. लेखातील प्रकाशचित्रे विकीमधून साभार !

......
विदेशी कथा २ : एका आईचा सूडाग्नी

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

2 Jun 2021 - 8:19 am | गुल्लू दादा

नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. लेख आवडला.

Bhakti's picture

2 Jun 2021 - 10:12 am | Bhakti

छान लेख!

तुम्ही सर्व पुरुष गलिच्छ ओंगळ डुकरे आहात, अगदी सर्वजण एकाच माळेचे मणी आहात !

हम्म.. म्हणजे पुरुष जर गलिच्छ ओंगळ डुकरे असतील तर स्त्रिया कोण ठरतात... सॅडी कोण ठरते,

तसेही वरील वाक्य सॅडीकडे नैतिकतेची चाड जास्त आहे असे सुचवते तर तिला नैतिकता बाळगणाऱ्या लोकांचा प्रॉब्लेम का आहे ? ती इतकी नैतिक असून जर नाईलाजाने व्यवसाय करत आहे तर समाजातील नैतिक प्रवृत्ती राखणाऱ्या व्यक्ती नाईलाज म्हणून पतित झाल्या तर सॅडीला प्रॉब्लेम काय आहे ?

कुमार१'s picture

2 Jun 2021 - 11:08 am | कुमार१

तुमचा मुद्दा चांगला आहे !
मला असे वाटते....

जे गिर्‍हाईक तिच्याकडे रीतसर पैसे देऊन येते त्याबद्दल तिला काही म्हणायचं नसवे. असा माणूस प्रामाणिक आहे.
परंतु धर्माचा बुरखा पांघरलेला माणूस आहे शेवटी ढोंगी निघाला याचे दुःख तिला जास्त असावे.

गॉडजिला's picture

2 Jun 2021 - 11:21 am | गॉडजिला

मग सगळेच डुक्कर कसे ?

उद्या सेगी मुळे सगळ्या स्त्रिया टाईपकास्ट केल्या तर ?

कुमार१'s picture

2 Jun 2021 - 11:23 am | कुमार१

सहमत आहे !

गॉडजिला's picture

2 Jun 2021 - 11:33 am | गॉडजिला

मला(किमान माझ्यापुरते) माहित आहे नेमकं काय सलतयं सॅगीला... मी फक्त जरा समाजमन जाणून घ्यायला कथेतील वाक्येच ट्विस्टेड प्रश्नात पेरत आहे :)

_/\_

कॉमी's picture

2 Jun 2021 - 11:45 pm | कॉमी

कथा वाचली. रंजक कथा आहे.

मला डेव्हिडसनचा सुरुवातीपासूनच राग आला होता. मिशनरी असल्याने दबाव टाकून तो ज्या प्रकारे आपली मते इतरांवर लादत असतो त्याने चीड आली होती. त्याचे आडून आडून रेसिस्ट बोलणे सुद्धा खटकले होते. स्वतःच्या सभ्यतेच्या कल्पना नेटिवांवर लादणे सुद्धा मला आढ्यताखोर वाटले. इतकेच काय, इतक्या नेटाने तो सॅडीच्या मागे कटकट लावतो ते सुद्धा भलतंच चिरडीला आणणारे आहे.

सॅडी शेवटी इतकी आनंदी का झाली असते ह्याचे कारण मला असे वाटले-
बहुतेक सुरुवातीचे काही दिवस डेव्हिडसन काहीही अयोग्य वागत नाही आणि त्याच्या स्वतःच्या विचारांनुसारच वागतो. त्यामुळे तिला स्वतःकडे बघताना डेव्हिडसनच्या उंचीवरून पाहणे भाग पडते आणि स्वतःबद्दल लाज वाटते. पण शेवटी डेव्हिडसन मोहात पडतो ,किंवा सॅडी मोहात पाडते, आणि डेव्हिडन धाडदिशी तिच्या इतर कोणत्याही गिर्हाईकाच्या उंचीवर येतो. किंबहुना, त्यापेक्षापण खाली, कारण तिचे बाकीचे गिर्हाईक डेव्हिडसन सारखे फालतू प्रवचन देत नसतात. डेव्हिडसनच्या पतित होण्याने सॅडीचा तिच्या जुन्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर पूर्वीपेक्षा वाढतो. आणि जर डेव्हिडसन पडला, तर कोण राहील ? म्हणून "You are all the same!"

आणि मला वाटतं, सॅडी कोणी तत्ववेत्ती नाही. तसा आव सुद्धा ती आणत नाही. ती सर्व पुरुषांना डुक्कर म्हणती तेव्हा स्वतःच्या अनुभवांपालिकडे ती विचार करत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे तिच्या अनुभवांपुरते तिचे म्हणणे ठीकच म्हणायला हवे.

पावसासोबतच पाऊस थांबल्यावरचे वर्णन सुद्धा भारी आहे-When the rain stopped and the sun shone, it was like a hot-house, seething, humid, sultry, breathless, and you had a strange feeling that everything was growing with a savage violence.
वातावरण डोळ्यासमोर उभे राहते.

डेव्हिडसन चे पात्र माझ्या कल्पनेत सर ख्रिस्तोफर ली ह्यांनी निभावले. :)

कुमार१'s picture

3 Jun 2021 - 7:50 am | कुमार१

कॉमी,
तुम्ही प्रथम कथा वाचून मग इथे प्रतिसाद द्यायला आलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन !

तुमचे कथा विश्लेषण आवडलेच. तुम्ही कथेतील अजून एक सौंदर्यस्थळ पुढे आणले आहेत .
तुम्ही चोखंदळ वाचक आहात म्हणून विचारतो...

कथेतील मृत्यूबाबत आत्महत्या की खून यावर तुमचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

कॉमी's picture

3 Jun 2021 - 9:02 am | कॉमी

मला आत्महत्याच असावी असे वाटले.

गॉडजिला's picture

3 Jun 2021 - 2:26 pm | गॉडजिला

A westbound ship en route to Apia, Samoa, is temporarily stranded at nearby Pago Pago due to a possible cholera outbreak on board. Among the passengers are Alfred Davidson, a self-righteous missionary, his wife, and Sadie Thompson, a prostitute. Thompson passes the time partying and drinking with the American Marines stationed on the island. Sergeant Tim O'Hara, nicknamed by Sadie as "Handsome", falls in love with her.

Her wild behavior soon becomes more than the Davidsons can stand and Mr. Davidson confronts Sadie, resolving to save her soul. When she dismisses his offer, Davidson has the Governor order her deported to San Francisco, California, where she is wanted for an unspecified crime (for which she says she was framed). She begs Davidson to allow her to remain on the island a few more days – her plan is to flee to Sydney, Australia. During a heated argument with Davidson, she experiences a religious conversion and agrees to return to San Francisco and the jail sentence awaiting her there.

The evening before she is to leave, Sergeant O'Hara asks Sadie to marry him and offers to hide her until the Sydney boat sails, but she refuses. Later, while native drums beat, the repressed Davidson rapes Sadie. The next morning he is found dead on the beach – a suicide. Davidson's hypocrisy and betrayal cause Thompson to return to her old self and she goes off to Sydney with O'Hara to start a new life.

कॉमी's picture

3 Jun 2021 - 2:47 pm | कॉमी

कोण आहे हा समविचारी ?

गॉडजिला's picture

3 Jun 2021 - 2:48 pm | गॉडजिला

.

कुमार१'s picture

3 Jun 2021 - 3:03 pm | कुमार१

भारीच की !
ओ-हारा हे अजून एक प्रकरण वाढवले त्यांनी ....

गॉडजिला's picture

3 Jun 2021 - 5:04 pm | गॉडजिला

नॉट द पिग आफ्टर ऑल ?

Bhakti's picture

3 Jun 2021 - 3:33 pm | Bhakti

कोणता रेन?
ऐश्वर्याचा का?मला वाचताना तोच सिनेमा आठवत होता.

कुमार१'s picture

3 Jun 2021 - 3:40 pm | कुमार१

हा १९३२ चा हॉलीवूडचा आहे !

सुधीर कांदळकर's picture

3 Jun 2021 - 6:50 am | सुधीर कांदळकर

कथेतले सौंदर्य उलगडून दाखवणारा सुंदर लेख.

कथा हा प्रकार माझ्या खास आवडीचा. मळभ, कोंदलेले आकाश आणि पाऊस ही प्रतीके मनातील नैराश्य, अगतिकता, नैतिक स्खलन वगैरे दाखवण्यासाठी कथानकप्रधान कलाकृतीतून नेहमी वापरली जातात. चित्रपटातून तर आपण पाहातोच, अगदी आकाशवाणीवरील श्रुतिकांत देखील पावसाचा आवाज प्रतीक म्हणून वापरला गेलेला आहे. तसेच चकचकीत ऊन, सूर्यप्रकाश हे आशावाद, भावनांचा निचरा झालेले नितळ स्वच्छ मन, मनाची उभारी, आकांक्षा यांचे प्रतीक म्हणून वापरले जाते. सिद्धहस्त लेखक विविध निसर्गप्रतीकांचा वापर करून आपली कथा रंगवून मस्त कसदार बनवतात याचे जे छान उदाहरण आहे.

शंकर पाटील हे आपल्याला ग्रामीण, विनोदी कथाकार म्हणून ज्ञात आहेत. त्यांचा निसर्गकथा हा संपादित कथासंग्रह मला फारच आवडला होता. त्यात कोंदलेला पाऊस, कुंद हवामान वगैरेवरील शब्दचित्रे मस्त खुबीने वापरली आहेत. कालच मिपावरील दिठी हा लेख वाचला. त्यात दि बा मोकाशींच्या कथेचा उल्लेख आहे तीही कथा सुंदर आहे.

ही कथा आता उतरवून घेतली आहे. भाषेवा लहेजा अनुभवत सावकाश वाचेन.

सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

कुमार१'s picture

3 Jun 2021 - 7:56 am | कुमार१

धन्यवाद !
नेहमीप्रमाणेच तुमचा प्रतिसाद अभ्यासपूर्ण आणि उत्साहवर्धक आहे.

अगदी आकाशवाणीवरील श्रुतिकांत देखील पावसाचा आवाज प्रतीक म्हणून वापरला गेलेला आहे.

>>

हे तर फारच छान नोंदवलेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jun 2021 - 12:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

पावसाच्या वातावरणाचा वापर अनेक लेखकांनी आपल्या कथांमधे अनेक प्रकारे केलेला आहे. पण हा पाउस जरा जास्तच अंगावर आला.

याचा मराठी अनुवाद कोणी केला आहे का? कुमार सरांनी वर थोडक्यात ओळख करुन दिल्याने, इंग्रजी गोष्ट समजत होती पण वाचताना मजा येत नव्हती.

कशी बशी १०-१२ पाने वाचली.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

3 Jun 2021 - 12:39 pm | कुमार१

या कथेचा मराठी अनुवाद असल्याबाबत जालावर तरी काही माहिती मिळाली नाही.

कथा दणकून ५१ पानी (पीडीएफची) आहे खरी !

कुमार१'s picture

4 Jun 2021 - 8:22 am | कुमार१

म्हणून चित्रपट इथे आहे

अर्थात त्यात वर चर्चा झाल्यानुसार काही बदल आहे.

Nitin Palkar's picture

4 Jun 2021 - 1:06 pm | Nitin Palkar

'तुम्ही सर्व पुरुष गलिच्छ ओंगळ डुकरे आहात' या वाक्याने तेंडुलकरांची आठवण झाली खरे. सखाराम बाईंडर, सॅडी आणि चंपा असा त्रिकोणही मनातल्या मनात उभा राहिला (विनाकारण). अधिक काही लिहिण्यासाठी मूळ कथा वाचीन म्हणतोय... डालो करून ठेवली आहे.

कुमार१'s picture

4 Jun 2021 - 2:09 pm | कुमार१

नि पा, धन्यवाद.
बरेच दिवसांनी तुमची भेट झाली. मूळ कथा वाचल्यावर पुन्हा तुमचे इथे स्वागत असेलच.

सखाराम बाईंडर, सॅडी आणि चंपा असा त्रिकोणही मनातल्या मनात उभा राहिला

>>

एकदम भारी कल्पना व त्रिकोण.
पटेश !

मदनबाण's picture

4 Jun 2021 - 7:18 pm | मदनबाण

लेख आवडला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent Peale

कुमार१'s picture

8 Jul 2021 - 4:14 pm | कुमार१

पिंजरा या गाजलेल्या मराठी चित्रपटाची कथा वरील कथेशी काही अंशी साम्य दाखवते.

मुळात पिंजरा 1905 च्या Professor Unrat या परदेशी कादंबरीवर आधारित आहे

कुमार१'s picture

20 Oct 2022 - 4:12 pm | कुमार१

पाऊस धो धो कोसळत असल्यामुळे या कथेची आठवण होते.

श्वेता व्यास's picture

21 Oct 2022 - 10:41 am | श्वेता व्यास

कथेशी ओळख व कथासारांश आवडला. मूळ कथा वाचली.
डेव्हिडसन यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला ?
आत्महत्या नसावी कारण, असं कृत्य तो पहिल्यांदाच करत असता तर अपराधी भावनेने त्याने आत्महत्या केली असती, पण
डेव्हिडसनची बायको अजिबात रडत नाही. उलट करारी मुद्रेने त्यांचा मृतदेह बघायला जाते. तिच्या चेहऱ्यावरचे तटस्थ खंबीर भाव पाहून डॉक्टर स्तिमित होतात म्हणजे तो आधीपासूनच दांभिक आहे आणि बायको ते ओळखून आहे. खून कदाचित सॅडीनेच केला असावा कारण अशी ना तशी शिक्षा तर होणारच आहे, आणि ती सगळ्याच पुरुषांना वैतागली आहे हेसुद्धा तिने व्यक्त केलं आहे.

कुमार१'s picture

21 Oct 2022 - 10:55 am | कुमार१

विश्लेषण आवडले.

खून कदाचित सॅडीनेच केला असावा

>>. दाट शक्यता !

पाश्चात्त्यांच्या सगळ्या गोष्टींचा अमाप गवगवा केला जात असतो, याचे हे एक प्रातिनीधिक उदाहरण म्हणता यावे. या कथेत विशेष असे काय आहे ? यापेक्षा उदाहरणार्थ जीएंची कोणतीही कथा कितीतरी गहन आणि सरस असते (किंवा उदाहरणार्थ भाऊ पाध्ये, जयवंत दळवी प्रभृतींचे साहित्य) -- हां, शंभर वर्षांपूर्वीच्या इंग्लंडादि देशात असले काही भलतेच धक्कादायक असू शकते तो भाग वेगळा, असे 'ह्यां'चे मत.
- बाईसाहेब फुरसुंगीकर.

विविध भाषांमधील साहित्याचा इथे मराठीत परिचय करून देण्याचे धागाकर्त्याचे कर्तृत्व निश्चितच प्रशंसनीय आहे, त्याबद्दल अनेक आभार. परंतु स्वतःला जे वाटले ते इथे सांगणे, हेही मिपाच्या चवकटीत बसणारे आहेच, किंबहुना तेच मिपाचे बलस्थान आहे, असेही 'ह्यां'चेच मत.

चित्रगुप्त's picture

23 Oct 2022 - 12:16 am | चित्रगुप्त

तो बिचारा Van Gogh जिवंत असताना टाचा घासत मेला, पण आता त्याच्या चित्रांचे टी- शर्ट काय, ब्यागा काय, मग्गे काय, पंखे काय, घड्याळे काय, डब्या काय, प्लेटा काय, आणि काय काय - लोक वेड्यासारखे खरेदी करत असतात. हा सगळा अमाप गवगव्याचा महिमा आहे राव. असो.
.

.

कुमार१'s picture

23 Oct 2022 - 6:53 am | कुमार१

परंतु स्वतःला जे वाटले ते इथे सांगणे, हेही मिपाच्या चवकटीत बसणारे आहेच,

+११
स्वतःला जे वाटले ते मोकळेणानं लिहिल्याबद्दल आभार !