आवाज बंद सोसायटी - भाग ३

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
12 Apr 2021 - 2:28 pm

याआधीचे दोन भाग:
http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १
http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २

व्याख्या व विकास

एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात. आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात. माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. जेव्हा आवाजाची तीव्रता जास्त असते आणि ऐकणार्यांना त्रास होतो, तेव्हा त्यास गोंगाट म्हणतात.

आपले कान २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपनक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.

एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होते. आवाजाची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. आवाजाचा वेग ३४३ मीटर प्रती सेकंद तर तासाला १२३५ किमी इतका असतो.

निर्वातपोकळी मधील ध्वनीची गती शून्य मीटर प्रति सेकंद आहे, कारण आवाज निर्वातपोकळी मध्ये प्रवास करू शकत नाही. आवाज एका लाटेसारखे आहे. ध्वनीलहरी पाणी किंवा हवेसारख्या माध्यमांच्या कणांच्या कंपनातून पसरते. निर्वातपोकळी रिक्त जागा असल्याने, ध्वनीलहरी त्यातून पसरू शकत नाहीत.

अनावश्यक, गरजेचा नसलेला किंवा जास्त मोठा आणि त्रासदायक आवाज ज्याचा मानवी आरोग्यावर, वन्यजीवनावर आणि पर्यावरणीय गुणवत्तेवर हानिकारक परिणाम होऊ शकतो, अशा आवाजाला ध्वनी प्रदूषण म्हणतात.

आपल्या सभोवताली खूप प्रकरचे आवाज होत असतात जसे की प्राण्यांचे, झाडांचे, माणसांचे, पक्ष्यांचे आवाज, मोटरगाडी, काही यंत्रे, दुरध्वनी, दुरदर्शन आदींमधले आवाज इत्यादी. आवाज किंवा ध्वनीची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने आवाजाची पातळी दिवसाला ४५ डीबी आणि रात्री ३५ डीबी पर्यंत निश्चित केली आहे. ध्वनीची पातळी विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास ध्वनी प्रदूषण होते. सर्व साधारणपणे ८० डेसिबलच्या पुढे असणार्‍या आवाजामुळे मानव तसेच इतर सजीवांच्या जिवनशैलीवर परिणाम होतो.
===================================================================

कारणे व स्त्रोत

आवाज निरनिराळ्या प्रकाराचे असतात. हळू आवाज, कुजबूजणे, संभाषण, सहन करण्याइतपत मोठे, गोंगाट ते अगदी कानाला इजा होईल इतके मोठे आवाज असू शकतात.

आवाजाचे दोन मुख्य स्त्रोत आहेत.

१. घरातील आवाज जसे की घरातील व्यक्तींमधील संवाद, रेडीओ, टिव्ही, कुलर, मिक्सर, स्पीकर, व्हॅक्यूम क्लीनर, वॉशींग मशीन इत्यादींचा आवाज. यातील कोणत्याही आवाजाचे स्वरूप गोंगाटाकडे वाढले, तर ते आवाज त्रासदायक होतात. अगदी रेडीओ, टिव्ही, कुलर, मिक्सर, स्पीकर, व्हॅक्यूम क्लीनर, वॉशींग मशीन इत्यादींचा आवाज जरी तुम्हाला सामान्य वाटत असला तरी डेसीबल मिटरच्या आकड्यांत तो ध्वनी प्रदूषणाकडे वळलेला असू शकतो.

२. बाहेरील आवाज जसे की, सार्वजनीक कार्यक्रम, औद्योगीक आणि व्यावसायीक आवाज, बाजार, शॉपींग मॉल्स, बांधकामाच्या जागा, तेथील यंत्रे. छापखाने, वाहनांचे आवाज.

कोणताही उत्सव, सभा, संमेलन यातील आवाजामुळे आसपासच्या रहिवाशांना त्रास होतो. काही उत्सवांदरम्यान फटाके फोडले जातात. लग्नसमारंभात मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा फटाके वाजवून आणि दणदणीत गाणी वाजवून दिल्या जातात. आजकाल एखाद्या गल्लीत कुणाचातरी वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री बाराच्या ठोक्याला फटाके फोडले जातात. उद्योंगामधल्या यंत्रातील आवाजामुळे तेथील कामगारांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परीणाम होतो. बांधकामाच्या ठिकाणी अनेक यंत्रे आवाज करत असतात. वाहनांचे निरनिराळ्या प्रकाराच्या इंजीनाचे आवाज तसेच हॉर्न, सायरन इत्यादीच्या आवाजामुळे त्या रस्त्यावरील नागरीकांचे जगणे असह्य होत असते.

मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर खेडेगाव किंवा गावाजवळील जंगलातील काही भाग येथे वाढलेले ध्वनी प्रदूषण एक मोठी समस्या बनलेली आहे. सजीव तसेच पर्यावरणासाठी ध्वनी प्रदूषण हा एक अदृश्य धोका आहे. ध्वनी प्रदूषण दिसू शकत नाही, परंतु ते पृथ्वीवर आणि समुद्राखाली दोन्ही ठिकाणी आहे. ध्वनी प्रदूषण त्रासदायक आवाज आहे. त्यामुळे मानव आणि इतर जीवनांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

साधारणपणे शांत वातावरणातही, अचानक जोरात असणारा आवाज ऐकू आला तर तो आपल्या श्रवणशक्तीवर परीणाम करू शकतो.

आता आपण आवाजाचे आणि ध्वनी प्रदूषणाचे विविध प्रकार याविषयी माहिती घेऊ या .

आवाजाचे प्रकार:

आवाजांचे वेगवेगळ्या प्रकारचे ४ आवाज आहेत: सतत, निरंतर असणारे आवाज, मधूनमधून येणारे आवाज, आवेगपूर्ण, उन्माद असणारे आवाज आणि कमी वारंवारता असणारे आवाज.

१. सतत, निरंतर असणारे आवाज: सततचा आवाज म्हणजे काम न थांबवणाऱ्या, बंद न पडणार्‍या यंत्रांद्वारे सतत निर्माण होणारा आवाज. उदा. कारखान्याची उपकरणे, इंजिनाचा आवाज किंवा पंखा, ए.सी. आणि व्हेंटिलेशन सिस्टीम.
२. मधूनमधून येणारे आवाज: आवाजाच्या या प्रकारातआवाजाचे प्रमाण झपाट्याने वाढते किंवा कमी होते. उदा. जवळून जाणारी ट्रेन, सायकलींमध्ये चालणारी कारखान्याची उपकरणे किंवा तुमच्या घराच्या वरून उडणारी विमाने.
३. आवेगपूर्ण, उन्माद असणारे आवाज: आवेगपूर्ण आवाज हा अचानक आणि वेगवान रितीने कानावर येतो. उदा. स्फोट किंवा बांधकाम उपकरणे, ट्रॅक्टर, मातीकाम करणारे वाहन किंवा घराशेजारील व्यक्ती ड्रील मशीन वगैरे वापरत आहे तो आवाज.
४. कमी वारंवारता असणारे आवाज: कमी वारंवारतेचा आवाज म्हणजे आपल्या परिसरात असणार्‍या पार्श्वभूमीवरील (background) आवाज होय. उदा. जवळपासच्या एखाद्या पॉवरस्टेशनमधील रोहीत्राचा (transformer) आवाज किंवा मोठ्या डिझेल इंजिनांचा आवाज. यामुळे आपल्याला सतत कमी वारंवारतेच्या (frequency) आवाजाचा सामना करावा लागतो. आवाजाचा स्रोत कमी करण्यासाठी हा सर्वात कठीण प्रकारचा आवाज आहे. हा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत सहज पसरू शकतो.

शहरात खालील ४ प्रकारच्या आवाजांमुळे आपण ध्वनी प्रदूषणास दररोज हातभार लावत असतो.

ध्वनी प्रदूषणाचे प्रकार:

औद्योगिक ध्वनी प्रदूषण, वाहतूकीमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि परिसरातील ध्वनी प्रदूषण अशा तीन मुख्य प्रकारांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे वर्गीकरण करता येते.

१. औद्योगिक ध्वनी प्रदूषण औद्योगिक यंत्रसामग्री आणि उपकरणे चालविण्यामुळे होते. यात सतत आवाज येऊ येत असतो. उदाहरणार्थ, २४/७ चालणारे एक्झॉस्ट पंखे, बांधकामात वापरण्यात येणारी यंत्रसामग्री.

२. वाहतुकीचा आवाज हा वाहन आणि त्यासंबधातून उत्पन्न होणारा आवाज आहे. यामध्ये मोटार इंजिन, रेल्वे, विमान चालण्याचा आवाज, वाहतूक कोंडीदरम्यान ऐकू आलेला हॉर्नचा गोंगाट आणि रहदारीस अडथळा होण्याच्या दरम्यान ऐकण्यात येणारा आवाज यांचा समावेश आहे.

३. ध्वनीप्रदूषणाचा शेवटचा प्रकार म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परीसरातील, वातावरणातील आवाज. उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूला मोबाईल, टीव्ही, रेडीओ इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर होत असतो. संभाषण, संवाद इत्यादींमधून होणारा आवाजाचा गोंधळ यात मोडतो.

आताच आपण पाहिले की, ध्वनीप्रदूषणाचे प्रकार प्रत्यक्षात त्याच्या स्रोतांशी संबंधित आहेत. ध्वनीप्रदूषणाचे स्रोत जाणून घेतले की त्याचे दुष् परिणाम कसे कमी करायचे हे आपल्याला शिकता येईल.

जेव्हा ध्वनी पातळी त्याची सुरक्षित सीमा ओलांडते तेव्हा धूम्रपानाप्रमाणे, ध्वनी प्रदूषण त्याच्या सभोवती असणार्‍या संबंधीत किंवा संबंध नसणार्‍या सजीवांवर परीणाम करते.

इतर प्रदूषणाप्रमाणे ध्वनी प्रदूषण ही भारतातील एक मोठी समस्या आहे. सण, समारंभ, उत्सव यावेळी उत्पन्न होणारे तीव्र आवाज, होणारे ध्वनी प्रदूषण भारत सोडून जगात इतरत्र कोठेही नसावेत. आपल्या भारतीयांत आवाज करणे, गोंगाट करणे हे एक आनंदाचे प्रतिक असते. जन्माला येण्यापासून म्रृत्यू पर्यंत, सकाळपासून रात्रीतही, कोणताही सण असो, यात्रा असो, उत्सव असो आपल्या भारतीय समाजाला कोणते ना कोणते वाद्य वाजवावेसे वाटते. फटाके आणि लाउडस्पीकर यांचा आपल्याकडे सढळ हाताने वापर होतो. त्यासंबधी कायदे आहेत पण प्रत्यक्ष वापर करणारे ते निर्बंध पाळत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे आणि लाउडस्पीकर वाजवणे याला कायद्याने परवानगी लागते हे कुणाच्या गावीही नसते. नेते आणि पुढारी यांना मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर भाषण देणे म्हणजे शक्तीप्रदर्शन वाटते. निवडणूकांच्या काळात प्रचारसभा असोत किंवा एखादा उद्घाटन समारंभ असो, जितका जास्त जमाव, जितका जास्त आवाज तितक्या प्रमाणात त्या प्रसंगाचे यश मानले जाते. एखाद्या कार्यक्रमासाठी न्यायालयाने लाउडस्पीकरला परवानगी दिलेली असेल तरी आवाजाच्या डेसीबल मर्यादेकडे कुणाचेच लक्ष नसते. यामुळे परीसरात काळजी करण्याइतके ध्वनी प्रदूषण होते.

त्याचमुळे भारतातील ध्वनी प्रदूषण ही संवेदनशील सामाजीक समस्या आहे असे देखील म्हणता येईल. आपल्याकडे कित्येकांना अवाजवी आवाज कमी करण्यास सांगितले की राग येतो. त्यामुळे भांडण, मारामारी अगदी खून करण्यापर्यंच्या बातम्या आपण वाचल्या असतील. इतरांच्या मनाचा विचार करून सौजन्य दाखवून स्वत:च आधीच आवाज कमी करणे हे अपमानास्पद वाटते. मोबाईलवर हळू आवाजात बोलणे, टीव्हीचा आवाज मर्यादीत ठेवणे, संवादात योग्य आवाजाची पातळी राखून ठेवणे हे गरजेचे आहे. सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे.

भाग तिसरा समाप्त.

(क्रमशः)

समाजजीवनमानआरोग्यराहणीऔषधोपचारप्रकटनलेखसल्लामाहितीआरोग्य

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

12 Apr 2021 - 3:49 pm | मराठी_माणूस

सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे.

बरोबर.
हे प्रशिक्षण मुलांना शाळेतच दिले गेले पाहीजे. हा त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असला पाहीजे. म्हणजे पुढील आयुष्यात ह्यामुळे भांडण, मारामार्‍या हे टाळले जाउ शकते.

आमच्या सोसायटीत रोज संध्याकाळी खाली जी थोडीशी मिकळी जागा आहे तिथे लहान मुले खेळत असतात. प्रचंड आरडाओरड , दंगामस्ती चालु असते. त्या कर्कश्श आवाजात लिफ्ट ची वाट बघणे सुध्दा अशक्य होते.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:39 pm | मुक्त विहारि

पालकांची आहे

मराठी_माणूस's picture

13 Apr 2021 - 1:32 pm | मराठी_माणूस

हो. पण ते तिकडे ढुंकुन ही पहात नाहीत.

चौकटराजा's picture

12 Apr 2021 - 7:27 pm | चौकटराजा

संचार बन्दी धुडकावून बावधन येथे बगाड जत्रा केली त्यात ६१ लोक करोनाग्रस्त झाले.
मास्क लाव असे सांगितल्या मुळे एक सज्ञान मुलाने दोन अज्ञान मुलाना बरोबर घेऊन एका मुलाचा खून केला.
एम पी ए सी च च्या परिक्षेसाठी आन्दोलन केले त्यात ३५ जण करोनाग्रस्त झाले.
उपासमारीने मरण्यापेक्षा करोनाने मरेन अशी उक्ती
आपल्या समाजात स्त्रिया पुरुषां पेक्षा मास्क चा नियम अधिक गम्भीरपणे पाळतात .
समाजात एक विशिष्ट असा तरुणाचा गट असतो ! कमरेखाली जीन ,पायात चप्पल व इन न केलेला शर्ट असा पोशाख असतो . हा गट कसलेही सामाजिक नियम पाळत नाही .त्याला साथ असते पानवाले, चायवाले, वडापाव वाले जे त्याना मास्क लावा असे गोडीने देखील सुचवीत नाहीत.
भारत देश ,इमारती ,धरणे ,रस्ते ,बागा ,रुग्णालये ,शिक्षणसन्स्था ( फक्त इमारती ) याबाबत खरेच प्रगति करीत आहे पण राजकारणी व नागरिक या बाबतीत एकदम कंडम देश आहे आपला !!

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:36 pm | मुक्त विहारि

"सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे."

प्रचंड सहमत ....

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2021 - 1:17 pm | चौथा कोनाडा

उत्तम माहितीपुर्ण मालिका.
हे प्रदुषण वाढत गेले तर व्यापारी तत्वावर सायलेंट झोन तयार होतील व त्यातील शांततेसाठी प्रवेश हवा असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागतील.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2021 - 11:31 am | प्रकाश घाटपांडे

ज्या लोकांना गोंगाट असल्याशिवाय चैन पडत नाही. अशा लोकांवर काही प्रयोग झाले आहेत का? पुष्पक सिनेमात जसे कमल हसनला जशी शांत वातावरणात झोप लागली नाही म्हणून त्याने गोंगाटाची व्यवस्था केली.