मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

नालायक .

Primary tabs

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
4 Jan 2021 - 5:53 pm

नालायक .

प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधव यांना स्वतःबद्दल खूप अभिमान होता.

आज सकाळी सुद्धा ते सकाळी आपला नेहमीचा पाळायचा व्यायाम करून घरात आले तेव्हा त्यांच्या चालीतून तो जाणवत होता. ते आत आले तेव्हा त्यांच्या घरचा फोन वाजत होता.
ते आपल्या नेहमीच्या रुबाबदार चालीने दिवाणखान्यातील फोन जवळ गेले. “किती वेळ वाजतोय हा कुणास ठाऊक ? घरी काय माणसे नाहीत की काय ?” असे म्हणत त्यांनी फोन उचलला.
“ मी रमेश जाधव बोलतोय ..” फोन कानाला लावत ते आपल्या नावाच्या उच्चारात रमेश यावर जास्त जोर देत म्हणाले. आपले नाव म्हणजे आपले व्यक्तिमत्व असते आणि तुम्ही ते ज्या पद्धतीने उच्चारता ..लोकांच्या समोर सादर करता यावरून समोरचा माणूस त्याच्या मनात तुमची एक प्रतिमा तयार करत असतो. तुम्ही जीवनात यशस्वी आहात का नाही ? या बद्दल समोरचा एक आडाखा बांधत असतो . आपण एक मातब्बर छायाचित्रकार आहोत आणि समाजात आपल्याला एक वजन आहे हे समोरच्याच्या मनात सतत बिंबवायला हवे असे रमेश जाधवांचे मत होते. त्या नुसार त्यांनी आपली चाल ..आपले बोलणे आणि आपला पोशाख खूप विचार करून ठरवला होता. ते पन्नाशीत आले होते पण ते अजूनही चाळीस वर्षाचे असावेत असे वाटत असे. दररोज सकाळी योगासने आणि प्राणायाम आणि नंतर घरापासून जवळ असलेल्या बागेत पळायला जाणे ..मग बागेतील दररोज भेटणाऱ्या मित्रांशी गप्पा. आत्ता त्यांनी NIKEची Track Pant आणि ब्रानडेड टीशर्ट घातला होता. निळसर रंगाची pant आणि गर्द हिरव्या रंगाचा टीशर्ट . माणसाने नेहमी कसे रुबाबदार दिसले पाहिजे. त्यांचे केस अजूनही काळे होते. धारदार नाक ..करारी डोळे ..ओठावर नीट कापलेली टोकदार मिशी ..गव्हाळ रंग आणि बांधेसूद शरीर, या सगळ्यांचा सार्थ अभिमान त्यांच्या शब्दातून ओसंडून वाहत असे ..नेहमी . तसेच तो आत्ता त्यांचे नाव सांगताना जाणवत होता ..
“ मी रमेश जाधव बोलतोय…”
“ नमस्कार जाधव सर ..मी अखिल भारतीय छाया चित्रकार संघातून किरण मुळीक बोलतो आहे. आपले अभिनंदन करण्यासाठी फोन करतो आहे. आपले छायाचित्र ‘ Please Save me’ याला या वर्षीचे पहिले बक्षीस मिळाले आहे. दहा लाख रुपये आणि मानपत्र असे हे बक्षीस आहे..”
“ धन्यवाद ..तुमचे आणि छाया चित्रकार संघाचे. आपण माझ्या चित्रातले सौंदर्य गुण हेरलेत आणि माझा सन्मान केल्या बद्दल ..” रमेश जाधव आपल्या आनंदावर नियंत्रण ठेवत म्हणाले. हे असले पुरस्कार आपल्याला नेहमी मिळतात आणि त्यात काही विशेष नाही असा समोरच्या माणसाचा ग्रह झाला पाहिजे असे रमेश जाधवांना दाखवायचे होते.
“ आपण आज दुपारी चार वाजता घरी थांबू शकाल का ? आमचे कार्यवाह अजित होळकर तुम्हाला भेटायला येणार आहेत ..हा सन्मान तुम्हाला मिळाल्याचे पत्र ते तुम्हाला देतील. पुरस्कार समारंभ मुंबई ला पुढच्या महिन्यात १० तारखेला आहे त्याचे आमंत्रण सुद्धा ते देतील ..”
“ मी नक्की थांबेन. अजित होळकर हे सुद्धा एक प्रसिद्ध छाया चित्रकार आहेत ..आमची ओळख आहेच. मला सुद्धा त्यांना भेटायला आवडेल ..”
मग थोडा वेळ असेच काहीतरी अती नम्र पणे बोलून रमेश जाधवांनी फोन ठेऊन दिला. समोरच्याशी नेहमी नम्र पणे आणि आपुलकीने बोलण्याची लकब त्यांनी आत्मसात केली होती. स्वतःचे मार्केटिंग करायला याचा खूप उपयोग होतो असा त्यांचा अनुभव होता.
“ उमा ! उर्मिले ..ताबडतोब बाहेर या ...एक आनंदाची बातमी आहे.” रमेश नी पुकारा केला . त्यांची मुलगी उमा आणि पत्नी उर्मिला लगबगीने बाहेर आल्या. बातमी ऐकून त्यांचा सुद्धा आनंद गगनात मावेना . मग उमाने विचारले ,
“ बाबा तो फोटो कुठे आहे ? आपण तो मस्त फ्रेम करून घेऊ.”
रमेशनी मग तो फोटो उमाच्या हवाली केला . ती थोड्या वेळाने तो फोटो फ्रेम करून आणणार होती. मग उर्मिला त्यांची पत्नी ..आपल्या सर्व नातेवाईक आणि मित्र मैत्रीणीना फोन करायच्या मागे लागली. रमेश मग किती तरी वेळ आपल्या आवडत्या खुर्चीत बसून त्या फोटो चा विचार करायला लागले .

कोल्हापूर ला मोठा पूर आला आहे ..पंचगंगा शहरात शिरली आहे अश्या बातम्या यायला लागल्या पासूनच रमेश जाधव कोल्हापुरात जाऊन तिथली अवस्था आपल्या कॅमेऱ्यात टिपून ठेवायला अधीर झाले होते. पण तिकडे जायचे रस्ते बंद आहेत ..शहरात जाणे म्हणजे जीवाला धोका आहे असे समजल्याने त्यांनी आपले जाणे पुढे ढकलले होते. थोडा पाऊस आणि पूर कमी झाल्यावर ते कोल्हापुरात पोचले होते. गावाबाहेर एका हॉटेल मध्ये त्यांनी मुक्काम ठोकला होता. मग आपल्या कॅमेराची bag घेऊन ते रिक्षाने गावाजवळ पोचले होते. तिथून चालत ते गावातील पूर पहायला बाहेर पडले . दिवसभर काहीही न खाता त्यांनी बराच भाग पिंजून काढला . पूर आता बराच उतरला होता .पण गावाचे नुकसान खूप झाले होते. किती तरी घरे पडली होती ..झाडे पडली होती ..रस्त्यात सगळीकडे चिखल आणि वाहून आलेली घाण पसरली होती. त्यांनी बरेच फोटो काढले पण त्यांना हवा तसा फोटो काही मिळत नव्हता. एखादी नाव भाड्याने घेऊन नदीच्या मुख्य पात्राजवळ जायला हवे होते. बरीच शोधाशोध आणि अनेक ओळखीच्या लोकांना फोन केल्यावर राष्ट्रीय संघ नावाच्या संस्थेचे लोक अनेक रबरी बोटी घेऊन लोकांना मदत पोचवायला जात होते . एका बोटीतून त्यानी रमेश जाधवांना घेऊन जायचे कबूल केले. . मग दुसरे दिवशी सकाळी दहाच्या वेळेस बोटीतून जाऊन तिथल्या परिस्थितीचे फोटो काढायचे . त्यांचा निश्चय पक्का झाला.

हा बक्षीस मिळालेला फोटो त्यांनी कसा काढला हे आठवून आतासुद्धा त्यांच्या अंगावर काटा आला. पंचगंगा नदी काठाचे एक छोटेसे गाव. त्या गावाचे नाव सुद्धा त्यांना आठवत नव्हते. का त्यांच्या अंतर्मनाला ती आठवण सुद्धा नको होती म्हणून ते नाव कुठेतरी आत खोल मनाच्या कोपऱ्यात दडून बसले होते ? कुणास ठाऊक ? राष्ट्रीय संघाच्या २ स्वयंसेवका सोबत त्यांच्या रबरी बोटीतून रमेश जाधव त्या गावात गेले होते. गावात बरेच पाणी शिरले होते ..घरांचे बरेच नुकसान झाले होते. घरा घरात जाऊन पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे यांचे वाटप करत त्यांची रबरी बोट गावाच्या मध्यभागी आली. येथून पुढे पाण्याचा ओघ खूप जोरात होता. डोंगरावरून येणारे पाणी थोड्याच अंतरावर असलेल्या नदीत वेगाने मिसळत होते. पाऊस आता थांबला होता तरी पाण्याचा जोर कमी झाला नव्हता. एका घरापाशी बोट बांधून स्वयंसेवक गुढघ्या पर्यंत येणाऱ्या पाण्यातून वाट काढत पाणी आणि अन्नाची पाकिटे वाटत होते. रमेश जाधव बोटीत बसून वेगवेगळे फोटो काढत होते. त्यांनी रेनकोट आणि पावसाळी बूट घातले होते. ते वेगवेगळ्या बाजूने नुकसानीचे फोटो काढत होते. तेवढ्यात एकदम काही स्वयंसेवक जोरात ओरडले. “ मुलगी पाण्यात पडली ..वाचवा वाचवा …”
जाधवांनी आपल्या डावीकडे बघितले तर ..एक लहान मुलगी पाण्याच्या प्रवाहा बरोबर वहात येत होती. जाधवांनी आपला कॅमेरा सरसावला. डोक्यात आपोआप त्यांचे आडाखे सुरु झाले.
अंतर किती आहे ? प्रकाश कसा आहे ? ती मुलगी आपल्या जवळ केव्हा येईल ? तेव्हा अंतर किती असेल ? त्यांनी झूम लेन्स फिरवली ..आता ती मुलगी त्यांच्या बोटीपासून अगदी सहा सात फूट आली. जाधवांनी लेन्स मधून पाहिले ..त्या मुलीने आपले दोन्ही हात उंच केले होते. चेहऱ्यावर भयचकित भाव ..तोंडावर आलेले अस्ताव्यस्त केस...तिचे काळेभोर डोळे जणू त्यांच्याकडे आशेने पहात होते. मग ती जाधवांच्या बोटी जवळ आली. तिने एक हात जाधवांच्या दिशेने उचलला. एकच क्षण ..जाधवांना वाटले जणू काळ थांबलेला आहे. खळाळत्या पाण्याचा आवाज ..लोकांचा आरडाओरडा ..त्यांना काही म्हणजे काही ऐकू येईनासे झाले ..त्यांनी कॅमेराचे बटन दाबले ...मग एक क्षणभर कॅमेराच्या स्क्रीन वर पाहिले ..सगळ्या यांत्रिक हालचाली . वर्षानुवर्षे फोटो काढण्याचा अनुभव ..जणू प्रतिक्षिप्त क्रिया. ..मग ते एकदम भानावर आले. गळ्यातला कॅमेरा एका हाताने बाजूला सरकवत पुढे झुकून आपला एक हात त्या मुलीच्या दिशेने केला. त्या मुलीच्या त्यांच्या दिशेने पुढे केलेल्या हाताचा त्यांना पुसटसा स्पर्श झाला असे त्यांना वाटले . का तो भास होता ? ती मुलगी पाण्याच्या ओघात पुढे जोरात ओढली गेली. हा हा म्हणता एकदम पाण्यात बुडाली. एका दोघांनी प्रवाहात उडी मारून त्या मुलीला शोधायचा प्रयत्न केला ..पण ती मुलगी एकदम दिसेनाशी झाली. त्या गढूळ पाण्याचा प्रवाह मग तसाच जणू काहीच घडले नाही अश्या अविर्भावात वहात राहिला. तिला शोधायला पाण्यात उतरलेले निराश होऊन कसे बसे परत आले. जाधव किती तरी वेळ सुन्न होऊन एकदा आपल्या कॅमेऱ्याकडे आणि एकदा पाण्याच्या प्रवाहा कडे पहात राहिले. ते तिथून परत कसे आले ..पुण्या पर्यंत प्रवास त्यानी कसा केला ? हे सगळे जाधवांना अगदी अंधुकसे आठवत होते.

दोन तीन दिवस असे बधीरतेने गेल्यावर त्यांनी काढलेला तो त्या मुलीचा फोटो चेक केला. आपण आत्तापर्यंत काढलेल्या फोटोत हा सर्वोत्तम फोटो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तो योग्य प्रक्रिया करून अखिल भारतीय छाया चित्रकार संघाच्या स्पर्धेसाठी पाठवून दिला. आत्तापर्यंत त्यांनी अनेक वेळा या स्पर्धेत भाग घेतला होता पण त्यांना नेहमी दुसरे किवा तिसरे बक्षीस मिळत असे. या फोटोला मात्र आपल्याला पहिले बक्षीस मिळणार याची त्यांना खात्री होती . आणि झाले सुद्धा तसेच ..

रमेश जाधवांना पहिले बक्षीस मिळाले . त्यांचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले. ते बक्षीस जाहीर झाले आणि जणू पुढचे काही दिवस त्यांच्या घरात धामधूम सुरु झाली. त्यांचे अभिनंदन करणारे फोन सारखे येत होते. घरात सारखे वेगवेगळ्या लोकांकडून कडून सारखे पुष्पगुच्छ येत होते. मग मुंबईला ते पुरस्कार घेण्यासाठी गेले. त्या समारंभाला त्यांची मुलगी उमा आणि पत्नी उर्मिला सुद्धा आले होते. त्यांचे किती तरी मित्र आणि प्रथितयश छायाचित्रकार उपस्थित होते. समारंभानंतर त्या सर्वांशी हस्तांदोलन करता करता त्यांचा हात दुखायला लागला.

मग किती तरी दिवस रमेश जाधव त्या प्रसिद्धीच्या झोतात स्वतःला विसरून गेले. किती तरी वृत्तपत्रांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. एका संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत दूरदर्शन वर आपली आपली मुलाखत ते पहात होते. मुलाखत संपल्यावर त्यांनी उमाचा आपल्या मुलीचा हात हातात घेतला ..आणि एका अतीव समाधानाने ते तिला म्हणाले ,
“ मग उमा एका प्रसिद्ध छायाचित्रकाराची मुलगी असल्याचा तुला अभिमान वाटतो आहे का नाही ?”

त्यांच्या बायकोने सुद्धा त्यांच्याकडे कौतुकाने पहात हसून त्यांना दाद दिली.
उमा मात्र एकदम गंभीर झाली. ती म्हणाली ,

“ नक्कीच अभिमान वाटतो बाबा. ..तुम्हाला हे बक्षीस मिळाले ..मला आनंदच आहे. तुमचे हे चित्र अतिशय वेधक आहे. सभोवतालचे वातावरण ..नदीचे खळाळते पाणी ..आणि तिचे ते रुद्र रूप आणि त्यातून असहाय्यपणे वाहून जात असणाऱ्या त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावरील भाव तुम्ही योग्य क्षणी कॅमेऱ्यात पकडले आहेत ..पण ..”
“ पण काय बेटा ? ..”
“ तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू ? ..”
“ नाही रागावणार ..तुझे मत मला नेहमीच अमूल्य वाटते.”
“ तुम्ही हे छायाचित्र मला दाखवले तेव्हापासून माझ्या मनात हा प्रश्न आहे. त्या वाहून जाणाऱ्या कोवळ्या मुलीचे पुढे काय झाले ? ..तिला पाण्यातून कुणी बाहेर काढले का ? तिला कुणी तरी वाचवले का ?”
रमेश जाधवांच्या अंगावर वीज पडावी असे झाले. उमाची ..या आपल्या मुलीची त्यांना मनातल्या मनात खूप भिती वाटे. ती किती तरी वेळा असे नको ते प्रश्न विचारीत असे. असे अंतरंगात भिडणारे प्रश्न तिने विचारू नयेत असे त्यांना नेहमी वाटे. त्यानी आपल्या भोवती हे प्रसिद्धीचे ..आपल्या उत्कृष्ठ छायाचित्रकार असण्याचे ..आपण खूप पैसा मिळवला आहे ..आपण खूप यशस्वी आहोत याचे जे एक वलय निर्माण केले होते ते भेदून थेट आपल्या अंतरंगात घुसायचे कसब हिने कुठून मिळवले ? ते बराच वेळ शांत बसले . त्यांनी पुन्हा एकदा तो प्रसंग डोळ्यासमोर आणला .नदीचा तो पूर ..ते उग्र रूप ..गढूळ पाणी ..रबरी बोटीत बसून फोटो काढणारे ते .... आणि त्या पाण्यातून वेगाने वाहत जाणारी ती लहान मुलगी . तिचे काळे भोर डोळे .. घाबरलेल्या हरणी सारखे .. त्यांच्या दिशेने केलेला तिचा लहानगा हात ...सगळे आठवले . मग आठवले आपल्या कॅमेऱ्यातून त्या मुलीकडे पाहणारे ते स्वतः...त्यांच्या डोक्यातील सभोवारच्या प्रकाशाची जाणीव ..कोणत्या कोनातून कॅमेरा रोखायचा ? चेहऱ्यावर कसा फोकस करायचा ? आणि त्यावेळी त्या मुलीच्या वाहत जाण्याचा वेग याचे गणित ..
सगळे आठवले. त्यांनी कॅमेराचे बटन दाबताच झालेला खर्र...टक..असा विशिष्ठ आवाज ..त्यांचा अतिशय आवडता ..सगळे आठवले. अगदी स्पष्ट .
“ मला नीटसे सांगता येणार नाही उमा .. मी कॅमेरा डोळ्या समोरून वरून बाजूला केला .. अवती भोवती लोकांचा आरडाओरडा चालू होता. एका दोघांनी पाण्यात उडी सुद्धा घेतली होती , पण त्यांना पाण्याच्या जोरामुळे परत यावे लागले. ..तोपर्यंत ती मुलगी प्रवाहाबरोबर पुढे गेली .. ..पुढे कोणी तरी तिला वाचवली असेल ...त्या क्षणी ..पाणी वाढते आहे आणि आपल्याला कॅमेरा सांभाळत सुखरूप परत पुण्याला परत जायचे आहे . ..इतकीच जाणीव माझ्या मनात होती.”
उमा एकदम जागेवरून उठली .त्यांच्या शेजारून उठली .जणू तिला त्यांच्यात आणि तिच्यात अंतर निर्माण करायचे होते. थोडी पुढे जाऊन खिडकीपाशी उभी राहिली. बाहेर पहात तशीच स्तब्ध .... मग हळूच तशीच त्यांच्याकडे न बघता म्हणाली ,
“ म्हणजे आपण काढलेला फोटो चांगला आला असेल का ? आपण कॅमेरा सहित सुखरूप परत जायला पाहिजे याची जाणीव होती ..पण त्या मुलीचे काय झाले ? असा पुसटसा प्रश्न सुद्धा तुमच्या डोक्यात नव्हता? .”
“ हे बघ उमा .मी छायाचित्रकार आहे .तो माझा व्यवसाय आहे. माझा कॅमेरा मला जीव कि प्राण आहे ..हे प्रश्न माझ्या डोक्यात असणारच ना ? आणि ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर समोर वाहून गेली. तिचे काय झाले ? हा प्रश्न कुठेतरी मनात नक्कीच होता. ” रमेश जाधव कसे बसे म्हणाले .
“ बरोबर आहे बाबा . तुम्ही छायाचित्रकार आहात ..पण त्या आधी तुम्ही माणूस आहात ना ? .” असे म्हणत उमा खिडकीपासून बाजूला झाली. मग परत त्यांच्या समोर येऊन उभी राहिली . अगदी त्यांच्या समोर . मग नेहमी प्रमाणे आपल्या उजव्या हाताने आपले केस डोळ्यावरून मागे घेत तिने अगदी सहज पणे प्रश्न केला ,
“ बाबा ,मला सांगा ...जर तुम्ही फोटो घेत नसता ..आणि त्या बोटीतून पुढे झुकून त्या मुलीचे हात पकडून त्या मुलीला तुमच्या बोटीत खेचले असते तर ती मुलगी वाचली असती का ?”
प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधवनी आपली मान खाली घातली . एक अस्पष्ट हुंदका त्यांच्या घशातून बाहेर पडला .आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही डोळ्यांवर घट्ट दाबून धरत ते अगदी अस्पष्ट पणे म्हणाले ,
“ हाच प्रश्न उमा मला त्या क्षणापासून छळतो आहे … फोटोच्या मागे लागलो नसतो तर ...मी त्या मुलीला वाचवू शकलो असतो का ? उत्तम छायाचित्रकार होण्याचा नादात माणूस म्हणून मी नालायक ठरलो का ? सर्वोत्तम फोटो मिळाला पण त्या साठी त्या अश्राप मुलीचा जीव गेला का ? नाही उमा ..माझ्याकडे तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही .”
मग प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधव सोफ्यावरून उठले आणि काहीही न बोलता आपल्या बेडरूम मध्ये निघून गेले आणि त्यांनी धाडकन दार लाऊन घेतले. तो आवाज मग किती तरी वेळ उमाच्या आणि उर्मिलेच्या मनात घुमत राहिला.

************************************************************************************.

तळटीप. माझी ही कथा जानेवारी २०२१ च्या "माहेर " या मासिकात प्रसिद्ध झाली आहे. मिसळपाव च्या वाचकासाठी इथे प्रसिद्ध करत आहे.

कथालेख

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

4 Jan 2021 - 6:02 pm | प्राची अश्विनी

कथा अंगावर आली...

Jayant Naik's picture

6 Jan 2021 - 6:54 pm | Jayant Naik

कथेच्या कौतुकाबद्दल आभार.

ओह... चर्र करणारी कथा

Jayant Naik's picture

6 Jan 2021 - 6:55 pm | Jayant Naik

कथेचा अपेक्षित परिणाम साधला कि लेखक आनंदी होतो.

चलत मुसाफिर's picture

4 Jan 2021 - 6:54 pm | चलत मुसाफिर

उद्या मेडिकल प्रवेश किंवा अन्य एखादी स्पर्धात्मक परीक्षा द्यायला निघालेल्या व्यक्तीला 'वाटेत झालेल्या अपघातातील जखमींना आधी इस्पितळात का पोचवले नाही?' असे कुणी विचारील.

त्या परीक्षेसाठी केलेली तयारी, घेतलेले परिश्रम, ती एकमेव संधी वाया गेली तरी चालेल, असे का? (फुकाचे प्रश्न विचारायला कुणाचे काय जाते?)

चुकीचे बोलत असेन तर स्पष्ट सांगा.

आनन्दा's picture

4 Jan 2021 - 8:58 pm | आनन्दा

बुडणाऱ्या माणसाला किंवा अपघातग्रस्त माणसाला, जिथे मदत उपलब्ध नाहीये तिथे, मदत न करता जाणे, याचे समर्थन होऊ शकत नाही...

तुम्ही अडकू नका, पण मदत उपलब्ध करून मग निघा की, कोणी अडवले आहे?

चांदणे संदीप's picture

5 Jan 2021 - 1:55 pm | चांदणे संदीप

चुकीचे बोलत असेन तर स्पष्ट सांगा.

चुकीचे बोलत आहात.

सं - दी - प

पिनाक's picture

5 Jan 2021 - 8:35 pm | पिनाक

चुकीचं बोलला आहात.

सगळ्या समाजातच हि बेफिकिरीची भावना वाढत आहे. ..मला काय त्याचे ? या भावनेने किवा त्याहूनही गोंडस दिसणारे भाष्य .. हे माझे काम नाही , अश्या ढाली पुढे करून आपली कातडी बचाव वृत्ती लपवायची ट्रिक अनेक जण करतात. पण आत कुठे तरी त्यांना नक्की माहित असते कि माणुसकीच्या दृष्टीकोणातून आपण नालायक आहोत. तुम्ही बाहेरून काहीही दाखवा ...तुमची सद सद विवेक बुद्धी ..तुम्ही कितीही त्याला खोल दाबून ठेवा ...तुम्हाला तुम्ही कोण आहात याचा आरसा दाखवते. हेच मला दाखवायचे आहे ..हे रूपक नाही ..सत्य आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2021 - 11:08 am | ज्ञानोबाचे पैजार

चांगली लिहिली आहे,

वाचताना अस्वस्थ झालो होतो

साधारण अशीच काहीशी गोष्ट त्या फोटोग्राफरची वाचली होती ज्याने खाणे शोधणार्‍याअफ्रीकन मुलाचा, ज्याच्या पाठी गिधाड उभे असते, त्याचा फोटो काढलेला असतो.

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2021 - 12:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवीन कॉर्टची कथा.

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

5 Jan 2021 - 5:50 pm | मराठी_माणूस

त्या वरच आधारीत असावी.

त्यान पुढ आत्महत्या केली नं ?

मला हा प्रश्न नेहमीच पडला आहे . तुम्हाला फोटो काढायला वेळ असतो ...विडीओ काढायला जमते ...बातमी लिहून ताबडतोब पाठवायला वेळ असतो पण साधा मदतीचा हात पुढे करायला वेळ नसतो ? पण मला या कथेत मला त्या घटनेपेक्षा त्या छायाचित्रकाराच्या मनातील आपण स्वतः नक्की काय आहोत ही स्व अनुभूती महत्वाची वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2021 - 12:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूलगी स्वतःचा जीव वाचावा म्हणून तिच्या आत काय आकांत चाललेला असेल असे वाटत होते.
छायाचित्रकाराने अगोदर माणूस असायला पाहिजे असे वाटले. कथा विचार करायला लावणारी.

-दिलीप बिरुटे

Jayant Naik's picture

6 Jan 2021 - 7:15 pm | Jayant Naik

अगदी बरोबर . प्रत्येकाने आधी माणूस असायला हवे.

मराठी कथालेखक's picture

5 Jan 2021 - 3:55 pm | मराठी कथालेखक

मुळात फोटोग्राफर म्हणून फक्त फोटोकरिता बचावकार्यासाठीच्या बोटीतून जाणेच चूक वाटते. उगाच बोटीतली जागा वा वजन का वाढवावे ? तितक्या वजनाची आणखी पाकिटे बोटीवर लादता आली असतीच किंवा आणखी एक स्वयंसेवक जावू शकला असता.
आपण मदत वा बचाव कार्याकरिता जात नाही आहोत एकूणातच फोटोग्राफर लोकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून दूर कुठे तरी बसून वा उभे राहून काय ते फोटो काढावेत. नाहीतरी मोठमोठ्या झूम व टेलिफोटो लेन्स असतातच मग दोनशे वगैरे मीटरवरुन फोटो काढत असताना "मी वाचवू शकलो असतो का ?" वगैरे अपराधीपणाची भावना पण मनात येणार नाही आणि कॅमेर्‍याच्या सुरक्षिततेसाठीही तेच योग्य..

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ अशासाठी, की तिथले वातावरण जगापर्यंत पोचवून ते वातावरण किती गंभीर आहे हे जगाला कळते आणि मग मदत अधिक प्रमाणात सुरू होते. पत्रकारितेचा किंवा फोटोग्राफर चा पेशा हा कशामुळे आवश्यक सेवेतच येतो.

तुमचा पेशा हा तुम्ही चढवलेला अंगरखा आहे. प्रथम तुम्ही माणूस आहात ...

Jayant Naik's picture

6 Jan 2021 - 7:18 pm | Jayant Naik

आपल्याला बक्षीस मिळावे ..पुलित्झर वगैरे वगैरे अश्या महात्वाकांक्षा तुम्हाला असे वेडे धाडस करायला लावू शकतात.

शशिकांत ओक's picture

6 Jan 2021 - 12:11 am | शशिकांत ओक

संकट समयी हात मागणाऱ्याच्या हाताला धरून वाचवणे ही प्रतिक्षिप्त क्रिया असली पाहिजे. नाहीतर माणुसकीला काळिमा लागेल.
हा अमानुष अत्याचार म्हणावा लागेल.

अगदी खरे आहे ओक साहेब ..पण आज परिस्थिती अशी आहे कि कुणालाच याचे काहीही वाटत नाही ... माझे काम ते नव्हे ..अश्या पळवाटा काढल्या जातात.

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 11:44 pm | मुक्त विहारि

संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे, हे अतिशय उत्तम...

आजकाल लोक अनेक कारणांनी मदत करत नाहीत . १.० हा माणूस सच्चा आहे का ? याला खरेच मदतीची गरज आहे का ? २.० उगीच पोलिसांचे किवा इतरही नसते लचांड मागे लागायला नको. ३.० हे माझे काम नाही . मला कुठे वेळ आहे ? इत्यादी ...इत्यादी.