रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
26 Jun 2020 - 11:21 am

हे भगवन्, ह्या एवढ्या सगळ्या शीट्सची नुसती नावं ऐकूनच माझे टाके आणि गात्रं ढिली व्हायला लागली आहेत...आता मी कसं करावं भगवन् ??

हे अर्जुना sss थांब.. असा भ्रमित होऊ नकोस..!
आता तू तयार आहेस.. आणि म्हणूनच मी GT चं परमगुह्यज्ञान तुझ्यासारख्या सगळ्या होतकरूंच्या झोळीत टाकतो आहे..ज्याच्या मदतीनं तू हा सबमिशन्सचा भवसागर तरून जाशील, अशी नितांत श्रद्धा बाळग.

अब आगे..!

# रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

*** साहित्य: बल्ब,स्वीच,टेबल,एक्सटेंशन बोर्ड, जाडजूड पुस्तके, बर्‍यापैकी लांबरूंद अखंड अशी स्वच्छ ग्लास, दोन ड्रॉईंग शीट्स, पेन्सिल,स्केल आणि खोडरबर.

***कृती:
प्रथमतः पुस्तकांचे एकावर एक असे दोन सेट टेबलवर रचून ठेवावे. त्यांच्यामध्ये बल्ब चालू करून ठेवावा.
मग त्या बल्बच्या वरती, थोडं अंतर राहील,अशा पद्धतीने ग्लास पुस्तकांवर रेस्ट करावी.
मग त्या ग्लासवर कुणीतरी कंप्लीट केलेली शीट अंथरून ठेवावी.
आणि त्या शीटवर आपली कोरी शीट ठेवावी.

दोन्ही शीट्सचे कोपरे तंतोतंत जुळवावे.
त्या शीट्स बरोब्बर एकाखाली एक येतील, अशा पद्धतीने, त्यांना पिन लावून फिट करून टाकावे.

***तत्व:
''बल्बचा उजेड ग्लासमधून आणि दोन्ही शीट्स मधून आरपार ट्रान्समीट होतो'', ह्या फिजिक्सच्या प्रिन्सिपलचं practical application आता लगेच आपल्या डोळ्यांना दिसेल.

खालच्या कंप्लीट झालेल्या शीटवरचा सगळा कंटेंट, तुम्हाला कोर्‍या शीटवर आपोआप पाझरताना दिसायला लागेल (आणि पहिल्यावहिल्या वेळी तुम्ही चकीत व्हाल.)

मग वरून झुकून कोर्‍या शीटवर लक्षपूर्वक फोकस करावं.
पेन्सिल आणि स्केल घेऊन हळूहळू 'आपल्या' कोर्‍या  शीटवर खालच्या शीटवरच्या ड्रॉइंगच्या बरहुकूम गिरवायला सुरुवात करावी.

कोर्‍या शीटच्या कुठल्याही एका कोपऱ्यापासून सुरुवात करून, हळूहळू खालची आख्खी शीट जशीच्या तशी कॉपी करावी.
बिल्डींग्जचे प्लान्स, इलेवेशन्स, सेक्शन्स, सगळे व्हर्टीकल- हॉरीझोंटल डाइमेन्शन्स, सिम्बॉल्स, अॅब्रीवेशन्स... सगळं कॉपी मारावं.
काही म्हणजे काही सोडू नये.

पण नंतर शीट्स बाजूला घेऊन आपल्या शीटवर 'स्वत:चंंच' नाव आणि रोल नंबर टाकावा..
कारण कधीकधी एखाद्या प्रतिभावंत कलावंताकडूनसुद्धा तंद्रीमध्ये 'खालचंच' नाव गिरवलं जाण्याचा संभव असतो..!

अजून एक प्रीकॉशन म्हणजे, ट्रेसींग झाल्यावर आपल्या शीटच्या मागच्या बाजूला, काळसर अस्पष्ट असे पेन्सिलचे मार्कींग्ज उमटलेले असतात.
एखादा खवट एक्झामिनर तेवढ्यावरूनच ओळखून तुम्हाला हाकलून देऊ शकतो किंवा चारचौघांत पुरेशी आब्रू काढू शकतो.

म्हणून GT मारल्याचा तेवढा पुरावा न विसरता चांगल्या स्वच्छ खोडरबरने नष्ट करून टाकावा.

(GT ओळखू येऊ नये म्हणून, अजूनही काही अत्यंत crucial गोष्टी, काही अनुभवसंपन्न आणि 'पोहचलेल्या' लोकांनी सांगून ठेवलेल्या आहेत, पण ते तू टक्के-टोणपे खाल्ल्यावर स्वत:च शिकशील तर बरं होईल, हे पार्थाss..!)

आणि शेवटी अशा खूप सार्‍या शीट्सच्या GT मारून, त्यांचं सुबक पंचिंग करून, आपण स्वत:च पूर्ण सेमिस्टरभर कंबरडं मोडेपर्यंत मेहनत घेऊन काढलेल्या आहेत, अशा चोरून दूध पिऊन माजलेल्या बोक्यासारख्या साळसूद अविर्भावानं, डुलत डुलत चेकींगला जावं.

***निष्कर्ष:

अशा रीतीने स्वत: ड्राफ्टर, ड्रॉईंग बोर्ड, रेफरन्सची डिझाईनची पुस्तकं, सगळी calculations करून करून, काढायला १५-२० दिवसही पुरले नसते..
त्या शीट्स‌ची भेंडोळी तुम्ही GT च्या मदतीनं अवघ्या एक-दोन दिवसरात्रीत खतम करू शकता...!

विडंबनविनोदलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2020 - 12:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त लेख आणि वाक्या वाक्याशी सहमत. ज्याने ईंजिनीयरिंग ड्रॉईंग १-२ वर्षे केले असेल त्यालाच ह्या सगळ्या प्रकाराची चांगली कल्पना येईल. एकाची असाईनमेंट सगळ्या वर्गाने कॉपी करणे ,एकाचे ड्रॉईंग सगळ्यांनी जीटी करणे, झेरॉक्स च्या झेरॉक्स पुन्हा पुन्हा काढणे ह्यावरच ईंजिनीयरिंगची गाडी पुढे सरकते, कारण नाहीतर स्व अभ्यास करायला वेळच राहत नाही.

विशेषतः उपनगरातील विद्यार्थी ट्रेनचा प्रवास, ६-७ तास कॉलेज, ठाणे,घाटकोपर ला असणारे क्लासेस यात ईतके अडकलेले असतात की जीटी म्हणजे वरदानच.

चौथा कोनाडा's picture

26 Jun 2020 - 1:13 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त खुसखुशीत लिहिलंय ! माझे इंजिनियरींगचे दिवस आठवले !
आमच्या बॅचला दोन जीटी एक्सपर्ट होते, नाममात्र दरात इतरांच्या शीट्स जीटी करून द्यायचे, त्या दिवसांत त्यांची खुप वट होती !

@राजेंद्र मेहेंदळे, चौथा कोनाडा ... धन्यवाद..! इंजिनिअरींगच्या खूप मजेशीर आठवणी आहेत.. इकडे टाकतोय .. :-)

-पाचपाटील

आपल्या देशातली कुत्र्याच्या छत्रीसारखी उगवलेली शिक्षणसम्राटांची ढीगभर अभियांत्रिकी महाविद्यालये हे असे 'जी टी' अभियंते घाऊक रेटने पैदा करतात. डोंबल्याचा जातोय देश पुढे. मला वाटते अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो अभियांत्रिकीच का करणार आहे आणि अभियंता झालेल्या प्रत्येकाला तो अभियंता नक्की का झाला आहे हा प्रश्न विचारायला हवा.

पाटिल's picture

26 Jun 2020 - 11:52 pm | पाटिल

@ एस...
विनोदनिर्मिती हा एकमेव उद्देश ठेवून हे लिहिलं गेलं आहे... तो उद्देश फेल गेल्याचं आपल्या प्रतिसादावरून स्पष्टच झालं आहे.
पण ह्याच्यामुळे आख्खा देश मागे-पुढे होणार आहे हे ह्याची लेखकाला काहीच कल्पना आलेली नव्हती...तरीही ह्यातून GT चं उदात्तीकरण करण्यासाठी हे आहे, असा आपला समज झाला असल्यास प्रस्तुत लेखक दिलगीर आहे..

अवांतर: बाय द वे, सात्त्विक संतापाच्या भरात का असेना, पण गोष्टींचं घाऊक स्वरूपात अतिसुलभीकरण किंवा प्रलयघंटावादीकरण करण्याची आपली पद्धत लेखकाला स्तुत्य वाटलेली आहे.

विथ काईंड रिगार्ड्स,
पाचपाटील

rahul ghate's picture

29 Jun 2020 - 11:26 am | rahul ghate

बरेचदा original शीट कमी मार्क्स अथवा correction मिळत असे व GT वाली शीट व्हेरी गुड असा शेरा घेऊन येते , तेव्हा original मालका चा चेहरा बघण्या सारखा व्हायचा

मजेशीर आहे एकदम, इंजिनियरच्या (खासकरून हॉस्टेल च्या) गोष्टी ऐकण्यासारख्या असतात. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा तेव्हा कॉलेज चा टॉपर होता, हि त्याच्याकडून नोट्स विकत घ्यायची २-३ वर्ष अगदी मंडई बार्गेनिंग करून शिव्या-बिव्या घालून. दोघांनी एकमेकांना १-२ लफड्यामध्ये मदत पण केली होती. आता कॉलेज संपल्यावर जमलं ह्यांचं. आता पण पोरं आसपास नसतील तर दोघे एकमेकांना मजेमजेत म, भ वाल्या शिव्या पण घालतात.

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2020 - 5:12 pm | चौथा कोनाडा

हॉस्टेल & नोट्स ; एक मजेशीर लव्हस्टोरी
:-))

हि त्याच्याकडून नोट्स विकत घ्यायची २-३ वर्ष अगदी मंडई बार्गेनिंग करून शिव्या-बिव्या घालून.>>>> :-)))

सौंदाळा's picture

30 Jun 2020 - 9:42 am | सौंदाळा

एकदा रात्री 11 ला क्लच प्लेटची GT मारायला बसलो, front view and side view (section view) होता. 4 जणांच्या शीट GT मारायच्या होत्या. 4 कोपऱ्यात चौघे बसलो होतो आणि धडाधड चालू झालो. शेवटची GT झाली तेव्हा रात्रीचे 2 वाजून गेले होते. सगळ्यांनी पटापट शीट आपापल्या कंटेनरमध्ये भरून पोबारा केला. सकाळी डायरेक्ट मास्तरसमोर गेलो. पहिल्या तीन जणांच्या शीट चेक झाल्या, चौथ्याने शीट मास्तरसमोर ठेवली आणि मस्तारसकट सगळे तीनताड उडाले. Section view चे hatching करताना काही ठिकाणी केले होते काही ठिकाणी राहिले होते, रात्री दोन जण haching ला बसले होते. सलग चौथी शीट असल्याने आलेला कंटाळा आणि अति शहाणपणा यामुळे ते अर्धवटच झाले होते. चौथ्याला पूर्ण सत्र मास्तरने पिळुन घेतला.

पाटिल's picture

30 Jun 2020 - 10:21 am | पाटिल

Section view चे hatching करताना काही ठिकाणी केले होते काही ठिकाणी राहिले होते...>> हा हा... हे असं होतंच कधी ना कधी :-)))

चौकस२१२'s picture

30 Jun 2020 - 5:00 pm | चौकस२१२

मास्तर लोक पण खरे ड्रॉईंग कोणते आणि जि टी कोणते हे जाणून घेण्यात पटाईत झाले असतात .. खास करून वर्तुळाकार आकार काढताना मुळापासून काढले असल्यास केंद्रबिंदू ला एक कंपास वापरल्याचे अणकुचीदार पणाचे लक्षण असते ते जर जि टी मध्ये विसरलात तर शंख करावा लागतो

सुक्या's picture

21 Aug 2021 - 1:26 am | सुक्या

हॅ हॅ हॅ . . .
असल्या गोष्टी आम्ही पहिले करायचो ... म्हणजे .. उगिचच खोडणे ... कंपास चे टोक दाबणे .. अगदी छोटी चुक करणे ... वगेरे वगेरे ..
मास्तर पण आमच्या कालेजात शिकलेले .. खाली पासुन वर पर्यंत बघुन लांब सुस्कारा सोडायचे ... बाकी काही नाही ..

श्रीरंग_जोशी's picture

21 Aug 2021 - 2:01 am | श्रीरंग_जोशी

इंजिनिअरींग ड्रॉइंग शीट्स च्योप्य पस्ते करण्याच्या प्रक्रीयेचे खुमासदार वर्णन आवडले.
मी अभियांत्रिकी शिक्षण नाही घेतले. पण ११वी १२वी ला व्होकेशनलमधे मेकॅनिकल होते. त्यामुळे इंजिनिअरींग ड्रॉइंग थोड्या प्रमाणात करावे लागले.
तेव्हा या प्रक्रियेला टोपो मारणे असा शब्दप्रयोग केला जात असे.

आम्ही प्लास्टिकच्या बादलीत बल्ब ठेवायचो आणि बादलीवर काच किंवा फायबरची ट्रान्सपरन्ट प्लेट ठेवायचो.

बाकी रेसिपीचे वर्णन खुमासदार केलेय. झोपेत रोल नंबर आणि नाव गिरवणारे आमच्याकडे पण होते ☺️
मस्त लेख.

कंजूस's picture

21 Aug 2021 - 7:55 pm | कंजूस

कॉपीनाम अध्याय एकोणिसावा आवडला.

शानबा५१२'s picture

22 Aug 2021 - 6:39 pm | शानबा५१२

पाटील सर आपण engineering करताना खुप श्रम केले असावेत, त्या श्रमाचे तुम्हाला फळ मिळेलच. जर ते खरे श्रम असतीले तर. कुठल्याच कॉलेजमध्ये तेवढा वेळ दीला जात नाही. मग असा आभ्यासक्रम का बनवतात? पण engineering ला market मध्ये DEMAND आहे म्हणुन engineering चे शिक्षकसुध्दा डोळेझाक करत असतील, तर पाटील भाऊ....... माझ्या शिक्षकांचा एक शब्द होता ह्याबाबतीत...ते माझे गणिताचे शिक्षक होते, ..तो शब्द होता : "कॉपीबहाद्दर".
माझे गणित अजुनही नाही चांगले झालेय. engineering च्या विद्यार्थ्यांचे गणित खुप चांगले असते असा माझा अजुनही समज आहे. मला पहील्यापासुन विज्ञान शिकायचे होते. मला कधीच हवी होती ती डीग्री मिळाली नाही, कधीच हवा होता तो जॉब नाही मिळाला.
पाटील भाउ आपण व मी घेतलेले शिक्षण कधीच जुनं व जुन झालंय. पण अजुनही market ला मध्ये DEMAND आहे, त्याच market
चे नाव 'शेअर मार्केट'.
प्रलयघंटावादीकरण obviously नाही करताय. But in this era, only real fun left is being with educated people - वरच मला नाही माहीती पण खालती माझ नाव होतं हो!!!

शानबा५१२'s picture

22 Aug 2021 - 6:40 pm | शानबा५१२

मध्ये* here * = typo.

तान्त्रिक शिक्षण प्रवासातल्या एका महत्वाच्या आडवळणाचे सुन्दर वर्णन.

सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे काहीवेळा GT च्या Quality Rating बद्दल बोलताना कुणा रसिकाकडून मिळालेला शेरा - एकदम "माशी to माशी" (म्हणजे खालच्या कागदावरची, माशा मारताना गारद झालेली माशी देखील वरच्या कागदावर झकास आलेली आहे म्हणजेच अगदी तन्तोतन्त copy झालेली आहे).