कविता आणि गजल दोन वेगवेगळे प्रकार आहेत.

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
9 May 2020 - 10:10 pm
गाभा: 

मिपावर काव्यलेखन स्पर्धा २०२० आयोजीत केली आहे. हे वाचून मनापासून आनंद आला.

सांप्रत काळात कवी आणि कवितांना इतर साहित्यप्रकारापेक्षा कमीपणाचे लेखले जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. "मला कवीता समजत नाही तरीपण वाचून मी प्रतिसाद दिला" - असे लिहीणे एकप्रकारे उपकार केल्यासारखे वाटते.
या पार्श्वभुमीवर मिपाने कवितांची स्पर्धा आयोजीत करणे अभिमानास्पद आहे.

सदर स्पर्धेतल्या कविता वाचल्या. त्यात कवितांचे सर्व प्रकार आहेतच पण गजल देखील समाविष्ट आहे.
माझ्या मते गजल हा काव्यप्रकार इतर काव्यप्रकारांपासून निराळा आहे. गजल ही तिच्या प्रकृतीनुसार अधीक अचूक आणि व्याकरणातील सक्षम असावी लागते. ( असे गजल अभ्यासकांचे मत आहे.) त्यामुळेच गजल लिहीणे आणि समजणे, चर्चा करणे जास्त प्रतिष्ठेचे समजले जाते. कला शाखा आणि विज्ञान शाखेत जी चढाओढ असते तेच येथे अपेक्षीत आहे.

अनेक काव्यवाचन स्पर्धांत गजला या गावून सादर केल्या जातात. त्यातील शेर मनाला भिडणारे असतात. त्यामुळे इतर काव्यप्रकारांतून गजल या काव्यप्रकाराला तेथे अधिक मान्यता मिळते. अशा मिश्र काव्यप्रकाराच्या सादरीकरणात गजल ला जास्त बक्षिसे आणि वहावा मिळाल्याचे मी स्वत: अनुभवले आहे.

प्रश्न गजल आणि इतर काव्य यांच्या द्वंदाचा नाहीये. हे दोन भिन्न काव्यप्रकार आहे. गजलेची प्रकृती निराळी आहे. दोन्ही काव्यप्रकार त्या त्या जागी श्रेष्ठ आहेत. यात कोणा एका काव्य रचनाकाराची बुद्धी श्रेष्ठ आणि दुसर्याची कनिष्ठ असे समजायला नको. परंतु ते तसेच होते. मिश्र काव्यप्रकार असतील तेथे गजल करणारे बाजी मारतात. त्यांचे सादरीकरण चांगले असते. त्यामुळे परिक्षकांवर त्यांची छाप पडते. गजलेला प्राप्त झालेले प्रतिष्ठेचे वलय इत्यादी गुण यावेळी उपयोगी पडतात. वास्तविक पाहता इतर काव्यप्रकारही तितक्याच ताकदीचे असतात.

काव्यमंचावर केवळ गजलेचे सादरीकरण असणारे कार्यक्रम नेहमी होत असतात. तेथे इतर काव्यप्रकार सादर होत नाहीत किंवा होवू दिले जात नाहीत. परंतु नेहमीच्या काव्यस्पर्धांत किंवा कविसंमेलनात इतर काव्यप्रकारांसोबत गजल देखील विनासायास समाविष्ट केली जाते नव्हे ती बक्षिसासदेखील पात्र ठरते. मिपावरील सध्याची काव्यस्पर्धा २०२० मध्येदेखील गजल आणि इतर काव्यप्रकार येत आहेत ही याचीच साक्ष आहे.

इतर काव्यप्रकार आणि गजल यामध्ये वाद घालून श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकार नसावा. दोन्ही साहित्य भगीनी आहेत. काव्याचे अलंकार आहेत.

मिपावर कविता आणि गजल असे दोन स्वतंत्र प्रकार (विभाग) असावेत असे मला वाटते. दोन्ही आपआपल्या जागी श्रेष्ठ आहेत. इतर संस्थळावर असल्या दोन्ही प्रकारांसाठी निरनिराळे विभाग आहेत.

या काव्यस्पर्धेत परिक्षक गजल आणि इतर काव्यप्रकार असा भेद परिक्षक करतील ही अपेक्षा.
(हे सारे लिहून एका वादाला सुरुवात केल्यासारखे वाटते आहे.)

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

10 May 2020 - 9:53 am | चांदणे संदीप

हे सारे लिहून एका वादाला सुरुवात केल्यासारखे वाटते आहे

संवाद व्हावा हीच इच्छा!

एक किस्सा सांगतो:
माझ्या ऑफिसमधला एक मित्र जो फक्त गझल लिहायचा. कधी माझ्या कवितांनाही दाद द्यायचा. मीही त्याच्या गजलांना दाद द्यायचो. पण पुढेपुढे मला त्याच्या गजलांमध्ये/शेरांमध्ये तोचतोचपणा किंवा एकसुरीपणा जाणवू लागला. तेव्हा मी त्याला म्हणालो, तू कविता का लिहित नाहीस. त्यावर त्याचे उत्तर मला हैराण आणि सार्‍या कवींना तुच्छ लेखणारे वाटले. तो म्हटला, "कविता काय, कोणी पण लिहू शकतो. त्यामुळेच कविता लिहिणे किंवा वाचणे मला आजिबात आवडत नाही." मग मी त्याला म्हणालो, आपण दोघे एक विषय घेऊया त्यावर कविता लिहूया, आणखी दुसरा विषय घेऊया आणि गजल लिहूया. आणि दोन्ही आपल्या ऑफिसातल्या मित्रांसमोर मांडूया. इथेच दूध का दूध का आणि पानि का पानि होईल. अर्थातच त्याने कविता लिहिलीच नाही. पण न लिहिण्याचे अजब कारण सांगितले की, कितीही प्रयत्न केला तरी कविता मला लिहिताच येईना. कविता मी लिहूच नाही शकत. झालं तो विषय तसाच अर्ध्यावर सुटला.

आणखी एक, मी गजल लिहिणारे असे पाहिले आहेत की शेरांच्या शेवटी येणारे सारे यमकांचे शब्द आधी शोधून, लिहून मग त्यानंतर त्यापुढच्या ओळी लिहायच्या. हे तरे बळेच प्रकरण झाले. त्यात प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते ही पळवाट आहेच, काहीही लिहायला. उदाहरणादाखल एक शेर लिहितो जो मी एक गजल वाचनाच्या कार्यक्रमात ऐकला होता. पहिल्या ओळीनंतर निघालेली वा! ही दाद दुसर्‍या ओळीनंतर मला माझ्या हातात त्याक्षणी अंडी किंवा सडके टोमॅटो पाहिजे होते असा विचार देऊन गेली होती. तो शेर होता....
विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले
आता बोला! इथे पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीशी संबंध नाहिये, तिथे एका शेराचा दुसर्‍या शेराशी संबंध असावा ही अपेक्षाच धरू नये. मला वाटते, हिंदी/उर्दूतून गजल मराठीत आणताना कुणी काव्यपंडितांनी मराठी गजलेला चुकीच्या वाटेवर नेले आहे.

माझ्या मते, प्रत्येक गजल ही एक कविताच असते. कविता/काव्य हाच आत्मा आहे. गजल्/अभंग्/विराणी/दोहे/गीत ही तर शरीरे आहेत.

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

10 May 2020 - 10:01 am | जव्हेरगंज

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले

फुटलो =)))))))))

राघव's picture

10 May 2020 - 10:11 am | राघव

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले
आता बोला! इथे पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीशी संबंध नाहिये, तिथे एका शेराचा दुसर्‍या शेराशी संबंध असावा ही अपेक्षाच धरू नये.

अशक्य हसतोय यावर.. अगदी सर्व भावना नीट पोचल्यात!!! =))

चांदणे संदीप's picture

10 May 2020 - 10:18 am | चांदणे संदीप

तुम्ही आणि जव्हेरभाऊ हसलात. मला चीड आली.
आयुष्यात हा शेर मी विसरणार नाही. त्यानंतर मी त्या वाचनाच्या कार्यक्रमातून उठून जो बाहेर पडलो तो आजतागायत कुठल्याही गजलांच्या कार्यक्रमाला गेलेलो नाही!

हा खेळ यमकं शोधून त्यावर नंतर लिहिण्यातल्या प्रकारामुळेच झाला असणार.

फूल - पिस्तूल.

सं - दी - प

चौथा कोनाडा's picture

10 May 2020 - 11:15 am | चौथा कोनाडा

राव,

ला

मॅच होतंय की !

:-)))

गज़ल-शेर यातले फारसे काही कळत नाही. पण आपण दिलेला शेर खरच छान आहे.
इथेही कवितेसारखंच होत असाव. एकच कविता रसिकाला त्याच्या वैचारीकदृष्ट्या वेगवेगळी भासते. तसच काहीसं.. तुम्ही दिलेला शेरातल्या पहील्या पंक्तीचा दुसऱ्या पंक्तीशी संबंध जोडायला मी जाणार नाही. पण शेरातली दुसरी ओळ, एखादा टिनएजर त्याच्या एका चुकीमुळे कसा गुन्हेगारीकडे वळु शकतो. हे सांगण्याचा प्रयत्न वाटतो आहे मला.. :)

प्राची अश्विनी's picture

10 May 2020 - 11:09 am | प्राची अश्विनी

सहमत.
पहील्या ओळीचा दुसरीशी संबंध नाही खरंय, पण तरीही मला शेर आवडला. मन्या यांनी सांगितलेला अर्थच मलाही वाटला.
असो, प्रत्येकाची आवडनिवड. कविता की गझल श्रेष्ठ हा वाद मला भरतनाट्यम आणि कथक यातल्या वादासारखाच निरर्थक वाटतो. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं.
पाभेंची सूचना मात्र पटली, गझल आणि कविता वेगळे विभाग असावेत.

कपिलमुनी's picture

18 May 2020 - 1:28 pm | कपिलमुनी

यासाठी गझल कार्यशाळा नावाचा प्रकार जबाबदार आहे. त्यात गझला पाडायला शिकवतात. टेक्निकली गझल असली म्हणजे झाले बाकी ट ला ट लावायचा.

कोणालाही गझल कार्यशाळा अटेंड करायची संधी।मिळाली तर सोडू नका, अफाट मनोरंजक कार्यक्रम असतो

पाषाणभेद.. सर्वप्रथम जूने दिवस आठवले..
मला वाटते. .स्पर्धेत पण तुमच्या कवितेला मी रिप्लाय देवून आलो आहे... कदाचीत इतक्या वर्षांनी पण मी तुमच्या शब्दशैली ला लक्षात ठेवले आहे म्हणजे तुमच्यात काही तरी जादू आहे म्हणुनच..

असो..

माझे मत मी मांडतो

मी खरे तर २४-१५ वर्षाचा होइ पर्यंत कधीच काही लिहिले नव्हते.. त्यामुळे कविता गझल असले प्रकार करण्या पेक्षा.. आपल्या भावनांना विचारांना प्रकट करणे मला जास्त श्रेष्ठ वाटते...
माझ्या जुण्या कविता म्हणजे कसले तरी उगाच लिहिलेले शब्द वाटतात आता, पण त्याला त्या त्या वेळेस चे विचार लगडलेले आहेत.
---------------------------------
गझल मला खुप आवडतात.. वाचायला...
लिहायला येत नाही.. तेव्हडी शब्दप्रतिभा माझयकडे नाही.. सुरेश भटांचे सप्तरंग हातात पडले आणि गझल च्या दुनियेत माझा प्रवेश झाला...

सार्‍या उदास वाटा कापित चाललो मी
होऊन मेघ काळा शापित चाललो मी ..

असा मतला (?) मी लिहिला..

पण वरती संदिप म्हणतात तसे.. शब्दप्रतिभे शिवाय गझल लिहिणे म्हणजे यमकाचे शब्द जुळवणे वाटायला लागले..
कारण गझल लिहायला शब्द संपदेचे भांडवल तितकेच चोख असावे लागते..
-----------------------
कविता हा ही माझा आवडता प्रकार , मुक्त छंद कविता मला खुप आवडतात..
अनेकदा मला वाटते, लेख लिहिताना , कथा लिहिताना लेखक त्रयस्त होऊन लिहितो प्रत्येक गोष्टीबद्दल..

कवितेत तसे नसत असे मला वाटते.. कवितेत येतात स्वताच्या मनाचे, विचारांचे नक्षिदार ठसे... आणि हे मला अवडतात..

म्हणुन मी कदाचीत एखादी कविता शब्दात निट वाटली नाही तरी त्या भावनेला साद देत वाचतो.. त्यात मला कुठे तरी सच्चा पणा जाणवतो..
भरकटणारे शब्द असले.. तरी मनाचे तरी दुसरे काय असते.. ते ही भरकटतेच..
म्हणुन मला त्याला ही असली कविता असते का ? असे कधीच म्हणलेले आवडत नाही...

---------------------------

कविता लिहिणे आताशा कमी झाले होते, पण या काव्य स्पर्धे मुळे माझ्या विचारांना मी गुंडाळून ठेवले होते.. कारण आपल्याला निट लिहिता येत नाही म्हणुन ते बाहेर काढत आहे.. आणि या बद्दल मी कायम मिपा चा र्‍हुणी राहिल..

आणि अश्या माझ्या वाटण्यामुळे ,, मला इतरांच्या कविता खुप आवडतात,, कारण त्या द्वारे मी जातो त्यांचा विचारात, त्यांच्या विश्वात...

काल ९ वर्षांनी बसुन काही तरी लिहिले त्यातले शेवटच्या ओळी मलाच आवडल्या , कारण त्या माझी मुलगी मोठी झाल्यावर माझी अवस्था दाखवत होत्या.. हे माझे विचार आहेत.. मग ते शब्दात उतरले ..कवितेत उतरले किंवा गझल मध्ये उतरले तरी मला काही फरक पडत नाही..

दूर चालली चिमणी माझी..
काळजाच्या आरपार...
थेंब थेंब मोती ओला..
ओघळला गालावर..
रिते झाले गाव माझे..
रित्या झाल्या भावना
दूर वाजते सनई चौघडे..
त्याला आभाळ पुरेना..

थांबतो ...

प्राची अश्विनी's picture

10 May 2020 - 11:16 am | प्राची अश्विनी

दूर चालली चिमणी माझी....
सुरेख.

जव्हेरगंज's picture

10 May 2020 - 11:10 am | जव्हेरगंज

दूर चालली चिमणी माझी..
काळजाच्या आरपार...
थेंब थेंब मोती ओला..
ओघळला गालावर..
रिते झाले गाव माझे..
रित्या झाल्या भावना
दूर वाजते सनई चौघडे..
त्याला आभाळ पुरेना..

क्या बात!! सही!!

सतिश गावडे's picture

10 May 2020 - 11:13 am | सतिश गावडे

चर्चेची प्रेरणा काहीही असो, चर्चा खुप चांगली सुरु आहे. दगडफोड्या भाऊ धन्यवाद.

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले

हा शेर लिहीणार्‍याने आधी मी फूल ठेविले - पिस्तूल ठेविले असं यमक ध्यानी ठेवून लिहीला आहे की तो ओघात लिहीला गेला आहे हा प्रश्न मनात आलाच. पहील्या ओळीतून जाणवते की हा दोन जिवलगांमधील संवाद आहे. नातं कोणतं असेल इथपर्यंत जाण्याची गरज नाही. मात्र दुसरी ओळ पहील्या ओळीतील संवादाशी विसंगत आहे हे मात्र नक्कीच.

कवितेची ताकद मला तेव्हा कळली होती जेव्हा मी शाळेत अभ्यासाला असलेली दया पवार यांची "कोंडवाडा" ही कविता वाचली होती.

कशाला झाली पुस्तकांची ओळख
बरा ओहळाचा गोटा
गावची गुरं वळली असती
असल्या इंगळ्या डसल्या नसत्या

ओहळाचा गोटा आणि गुरं वळणं यांच्याशी असलेला संबंध तुटून आता वीस वर्ष झालीत. मात्र या ओळी शिलालेखाप्रमाणे मनावर कोरल्या गेल्या आहेत. ही आहे कवितेची ताकद.

मला वाटते, हिंदी/उर्दूतून गजल मराठीत आणताना कुणी काव्यपंडितांनी मराठी गजलेला चुकीच्या वाटेवर नेले आहे.

हे हौशी नवशिक्या गझलकारांमुळे झाले असावे. नाही तर भाऊसाहेब पाटणकरांची गझल वाचून काय बिशाद होईल असं काही म्हणायची.

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

आता हरदासाची कथा मूळ पदावर आणूया. कविता आणि गझल यात गझलेला झुकतं माप नको. :)

चांदणे संदीप's picture

10 May 2020 - 11:33 am | चांदणे संदीप

हे हौशी नवशिक्या गझलकारांमुळे झाले असावे.

अगदी, अगदी!

सं - दी - प

मन्या ऽ's picture

10 May 2020 - 11:47 am | मन्या ऽ

वाह! दोन जिवलगांतील संवाद.. असा विचार केलाच नव्हता मी.

गज़लेत ज्या प्रकारे मात्रा, बाराखडी, मतला हे नियम लक्षात ठेवुन लेखन करावे लागते तसेच कवितेत वृत्त आहेत.
कवितेत आजकाल मुक्तछंद प्रकाराची चलती आहे. वृत्तांमधे मीटर सांभाळत योग्य शब्दांची निवड करण सगळ्यांनाच (मला स्वतःला) सहज जमत नाही.
गज़ल-कविता दोन्हीत शिकायला भरपुर वाव आहे. अस वाटत.
बाकी जाणकार चर्चेत सहभागी होतील. तेव्हा बरीच नवीन माहीती वाचायला मिळेल.. प्रतिक्षेत!

सचिन's picture

10 May 2020 - 12:40 pm | सचिन

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
.... ही सुरेश भटांची आहे .. झंझावात मधली...

पाषाणभेद's picture

10 May 2020 - 11:32 am | पाषाणभेद

@ संदीप
गजल चा प्रत्येक शेर स्वतंत्र असतो या मुद्याच्या मी मुद्दाम माझ्या लेखात समावेश केलेला नव्हता. तसे अनेक इतर मुद्देही आहेतच पण ते चर्चेदरम्यान यावेत. तर या स्वतंत्र शेराचा वापर करून लिहीलेली गजल दुसर्‍याला ऐकतांना तो ऐकणारा जर जाणीवेच्या दृष्टीने प्रगल्भ असेल तर त्याचे मानसीक ब्लड प्रेशर वाढते. एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर किंबहूना दुसर्‍या झाड्याच्या फांदीवर टॅन टॅन उड्या मारल्यासारखे ते होते. आपणच दिलेले उदाहरण पुरेसे आहे. आणि तो तसला शेर लिहून तुमचे झालेले अपराधी मन आपण उघड केलेत हा आपला मनाचा प्रांजळपण, नितळपणा, विषयाशी प्रामाणीकपणा दर्शवतो.
असलाच काहीतरी करण्याचा प्रकार मी येथे मुद्दामहून केला होता. तेव्हा अर्थातच कुणाला समजला नसेल अन मी देखील सांगितला नाही. पण आता ते सांगणे योग्य वाटते.

तर मुद्दा काय आहे की आहे गजल हा श्रेष्ठ काव्यप्रकार आहे. पण तो मुख्य कवितेचा उपप्रकार आहे. मोजून मापून तोलून प्रत्येक मात्रा, गण यांनी तो सजवावा लागतो. त्याचे श्रेष्ठत्व त्याच्यापाशी आहे. पण सामाजीक अंतरात जर दोन्ही काव्यप्रकार एकत्र आले (स्पर्धेदरम्यान, काव्यगायन/ वाचन आदी) तर गजलला दोन अंगूली श्रेष्ठत्व देवून त्यातली निवड करणे अयोग्य आहे. अशा स्पर्धांदरम्यान काव्यवाचनाचे सादरीकरणच महत्वाचे मानले जाते. आवाज, गजलकाराची देहबोली, त्याचे वय (तरूण, वयस्कर) दिसणे आदी मुद्दे महत्वाचे ठरतात - जे अनाठाई आहे. परिपुर्ण रसकोष, आषयाची घनता, गेयता, आकलन दृष्ट्या सोपेपणा, साधेपणा, सामान्य माणसाला समजेल असे रूपडे, शब्दसाधना आदी गुण मागे पडतात. नेहमीची अगदी चार ओळींची आशयसंपंन्न , मुक्तछंदीत कवीताही बाजी मारण्यालायक असतांना केवळ गायन, सादरीकरण, त्या गजलकाराचे मागचे वलय आदी मुद्यांमुळे गजल पुढे येते.

माझा मुख्य मुद्दा हा आहे की गजल या काव्यप्रकाराला प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र मंच असावा. आयोजकांनी दोहोंची सरमिसळ करू नये. मिपावरील काव्यस्पर्धेदरम्यानही हा काव्य डिस्टंस आयोजक पाळतील ही आशा. अन त्यामुळे कवितारचनाकारांना योग्य न्याय मिळेल ही आशा.

हा धागा वाचणार्‍यांनी आयोजकांपर्यंत ही मागणी पोहचवणे औचित्याला धरून आणि न्याय्य असेल.

@गणेशा
मुक्तछंद या काव्यप्रकारात तुमचा अधिकार आहे. जे मनात आहे ते तुम्ही तेथे लिहीता. सामाजिक दृष्ट्या प्रगल्ब असलेल्या जाणीवा तुम्ही तुमच्या कवितांमधून उतरवतात ते मिपाने पाहिलेले आहे. तुमचा हातखंडा ज्यात आहे तेच तुम्ही वापरावे.

आपण जे जुन्या काळी लिहीतो ते खूप वर्षांनी आपणच वाचाल्यास ते विचार त्यावेळी कसे सुचले, आपल्या हातून ती ती निर्मीती कशी झाली याबाबत आपल्यालाच आश्चर्यचकीत व्हायला होते. ती झालेली निर्मीती प्रतिभेची देणगीच असते. त्या आशीर्वादाचा तुम्ही उदारपणे स्विकार करावा. आणि यापुढेही लेखन करत राहावे.

याच धाग्यात तुम्ही लिहीलेली कवीता:

दूर चालली चिमणी माझी..
काळजाच्या आरपार...
थेंब थेंब मोती ओला..
ओघळला गालावर..
रिते झाले गाव माझे..
रित्या झाल्या भावना
दूर वाजते सनई चौघडे..
त्याला आभाळ पुरेना..

वाचून आपसूक डोळ्यात पाणी आले. बापाचे हृदय किंबहूना काव्यप्रतीभा असलेल्या बापाचे हृदय कसे रडवेले होते ते या चार ओळींत यतार्थ उतरले आहे.

कोणताही काव्यप्रकार असेना, पण तो लिहीत रहा.

चांदणे संदीप's picture

10 May 2020 - 12:37 pm | चांदणे संदीप

अशा स्पर्धांदरम्यान काव्यवाचनाचे सादरीकरणच महत्वाचे मानले जाते. आवाज, गजलकाराची देहबोली, त्याचे वय (तरूण, वयस्कर) दिसणे आदी मुद्दे महत्वाचे ठरतात - जे अनाठाई आहे. परिपुर्ण रसकोष, आषयाची घनता, गेयता, आकलन दृष्ट्या सोपेपणा, साधेपणा, सामान्य माणसाला समजेल असे रूपडे, शब्दसाधना आदी गुण मागे पडतात. नेहमीची अगदी चार ओळींची आशयसंपंन्न , मुक्तछंदीत कवीताही बाजी मारण्यालायक असतांना केवळ गायन, सादरीकरण, त्या गजलकाराचे मागचे वलय आदी मुद्यांमुळे गजल पुढे येते.

इथे तुम्ही गजल बाजी का मारते हे थोडक्यात लिहून तिचे पितळ उघडे पाडले आहेच. मग तुम्हांलाही असे का वाटावे की गजल आणि कविता एका मंचावर नको? होऊद्या काय व्हायचे ते. नाहीतरी जनरेट्यापुढे कुणाचे चालते?

तर मुद्दा काय आहे की आहे गजल हा श्रेष्ठ काव्यप्रकार आहे.

पण हे नक्की कशामुळे?
काव्याच्या अंगभूत सौंदर्याची जाण जशी कविला असणे अतिआवश्यक आहे ती तशीच रसिक वाचकालाही असणे जरूरीचे आहे. अन्यथा सामान्य वाचकाला "माझ्या लाल गुलाबाचा कसा हरवला वास, शोधित फिरलो मी वणवण कोस कोस" यात गुलाबाचा वास कसा हरवू शकतो असे वाटणे स्वाभाविक आहे. तात्पर्य, अशा वेळी गजलेला दोन अंगुली श्रेष्ठत्व द्यावे त्यांनी ज्यांना या ओळीतले काव्य समजत नाही. त्यामुळेच काव्य न समजणार्‍याने निव्वळ उथळ शब्दांनी खोल अर्थ निर्माण केलेल्या रचनेला म्हणजेच गजलेला श्रेष्ठ म्हणणे असा प्रकार चालू आहे.

गजल मराठीत येण्यापूर्वी कविता/अभंग्/विराण्या/भूपाळ्या/लावण्या कोणी लिहित नव्हते, वाचत नव्हते का? अचानक गजल श्रेष्ठ कशी झाली नक्की? हिंदीतही अनेक अफाट कविता आहेत. गजलाही आहेत. मी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, तमिळ, पंजाबी असे सगळे वाचतो. शोधून शोधून वाचतो. मला कुठेही कुठला अमुक एक काव्यप्रकार श्रेष्ठ वाटत नाही. गजला मी त्याच आवडीने वाचतो जेवढ्या आवडीने कविता वाचतो. नव्हे, तर मराठी हिंदी आणि उर्दूत गजला लिहितोही. म्हणजे, तसा प्रयत्न करतो.

उत्तम काव्याला वृत्ताचे बंधन नाही. ती गजल'च' असावी असा काही सोसही नाही. सारखं आपलं गजल श्रेष्ठ गजल श्रेष्ठ करीत जगल करून वाचकवर्ग मिळवायचा हा व्यावसायिक हेतू वाटतो मला. व्यावसायिक म्हणजे केवळ 'अर्थ'कारणच नाही तर आपला वावर, आपले काव्यजगतातले स्थान इ. इ.

गजल श्रेष्ठ असण्याबद्दलही माझे काहीही म्हणणे नाही. कवितेची जी याआडून मानहानी करवली जात आहे ती माझ्याच्याने नाही बघवत.

सं - दी - प

पाषाणभेद's picture

10 May 2020 - 11:47 am | पाषाणभेद

वरील प्रतिसाद टंकेपर्यंत माननिय सतिश गावडे, जव्हेरगंज भाऊ, प्राची ताई, मन्या, चौथा कोनाडा आदींचे प्रतिसाद येवून गेलेले होते. ते आता वाचले.

मला हा गजल आणि साधे काव्य (स्पेशल चहा आणि ऑर्डीनरी चहा!!) यावर खूप पूर्वी लिहाचेच होते. पण सामाजीक बंधन आणि इतरांपासून आपण काहीतरी वेगळे मुद्दे मांडतो आहे म्हणजे आपल्यातच काहीतरी वैगुण्य आहे असे वाटायचे. समुहापासून दूर जाण्याची जी भिती असते ती मनात होती. पण केव्हातरी असे लिहावेच वाटले आणि आज ते लिहीले.

सतिश यांनी जी दया पवार यांची "कोंडवाडा" ही कविता दिली ती वाचून शिक्षणाने मानवाच्या मनावर किती परिणाम होतो ते जाणवून दिले आहे. त्या म्हणतात:
कशाला झाली पुस्तकांची ओळख
बरा ओहळाचा गोटा
गावची गुरं वळली असती
असल्या इंगळ्या डसल्या नसत्या

अतिशय आशयसंपन्न ओळी सामाजीक प्रश्नाला वाचा फोडतात. अज्ञानात सुख असते ते पुस्तकांनी म्हणजेच शिक्षणाने हिरावून नेले आणि एका क्षणात त्यांचे जीवन प्रगल्भ झाले.

अशाच अर्थगर्भ ओळी कागदावर उतरतात आणि कविता आशयगर्भ, संपन्न होत जाते. ती वाचणार्‍याच्या जीवाचा ठाव घेत मनात उतरते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2020 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आणि गजलेचे आपापले वैशिष्ट्य आहे, परवा मिपाच्या काव्यस्पर्धेत काही कवितेचे जाणकार गजलेत कविता शोधतांना दिसले चालायचेच आपलं कविता, कवितेच्या सर्व प्रकार आणि गजलेवरही सारखंच प्रेम आहे.

बाकी चालू द्या...!

प्रचेतस's picture

10 May 2020 - 12:25 pm | प्रचेतस

लेख आणि प्रतिसाद आवडले.

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 May 2020 - 1:00 pm | बिपीन सुरेश सांगळे

ए खादा कवी समजा त्याच्या कवितेमधून - दोन ओळीत -एखादा विचार मांडतो
त्याला तेवढीशी दाद मिळत नाही
कारण -मराठी

तेच विचार दुसरा कवी हिंदी / उर्दू मधून मांडतो
तेव्हा ना कळणारे सुद्धा वावा म्हणून माना डोलवतात

हा भेदभाव का ? आपण मातृभाषेला दुय्यम लेखतो का ?

वाचकांनी त्यांचे अनुभव मांडावेत

चौकस२१२'s picture

12 May 2020 - 6:17 am | चौकस२१२

मूळ लेखाने मांडलेला मुद्दा कि "कविता स्पर्धा आणि गझल स्पर्धा " ह्या वेगवेगळ्या असाव्यात.. हा काहीसा पटतो ( दोन्ही मराठीतीलच त्यामुळे त्यात भाषेचा प्रश्न नाही)
आता आपण जे म्हणताय त्याबद्दल
"हा भेदभाव का ? आपण मातृभाषेला दुय्यम लेखतो का ?"
मुद्डमून भेदभाव कॊणी करीत असेल तर ते अयोग्यच आहे (यावर कौशल इनामदार या गीतकारांचे भाष्य शोधा चांगले आहे )
सर्वसाधारण पणे बघितला तर त्या त्या भाषेत तो तो गीत प्रकार जास्त प्रचलित आहे उदाहरण मराठीत भावगीत हा प्रकार जेवढा प्रसिद्ध आहे तेवढा तसं काही प्रकार हिंदी मध्ये किंवा उर्दू मध्ये नसावा ( अंदाज माझा)
आपण मराठी माणसांची गोची अशी होते ( कि जी कदाचित कन्नड माणसाची एवढी होत नसावी ) कि मराठी इतिहासातील उत्तरेकडील आलेले संबंध + हिंदी आणि आपली लिपी सारखी त्यामुळे सर्वसाधारण मराठी माणसाचं जीवनात हिंदी चा शिरकाव सहज झाला ..पर्यायाने कदाचित उर्दू ( साधी गहन नव्हे ) चा पण

हा मुद्दे याचा मुद्य्यांसारखा aahe की हिंदी चित्रपट उदयोग एवढा मोठा का? मराठी च्या मानाने.. अन त्याहून हि हॉलिवूड मोठा कारण लोकसंख्या केवळ
तिन्ही मध्ये चांगले काम चालतेच

संदीप, तुमच्या भावना पोचल्यात.
मागे एका मित्राला सांगीतले होते तेच तुम्हाला सुद्धा सांगतो. कलाकारानं भाव जाणणारं असावं पण फार भावुक असू नये. जर भाव जाणू शकला नाही तर संवेदनशून्य मन काय रचना करणार? आणि भावुक झाला तर त्या त्राग्यातून व्यक्त कसं होणार? लिप्त-अलिप्तपणाच्या सीमारेषेवर हा खेळ चाललेला असतो.

कोणतीही रचना - गद्य/पद्य काहीही.. केवळ लिहिण्यासाठी म्हणून लिहिलेली असली तर वाचणार्‍याला ती अपील होईलच असं नाही. पण जर आतून आलेली असेल तर ती भिडतेच, हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. तसंही जे आपल्या मनांत आहे ते समोरच्याला तसंच आणि तेवढ्याच ताकदीनं पोहोचेल असं लिहिणं, हे खरंच फार मोठं काम आहे. ती रचनाच मुळात मोठी असते!

गझलेबद्दल कविवर्य सुरेश भटांचंच म्हणणं आहे की गझलकारानं आधी उत्तम कवी असणं गरजेचं आहे. त्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर गझल म्हणजे पी.एच.डी. ची पातळी झाली. म्हणजे गझलेचं सगळं व्याकरण साधणं ही एक पायरी झाली. आणि ती भिडणारी असावी ही दुसरी पायरी झाली.

आता केवळ व्याकरण साधलं म्हणून एखाद्या रचनेला चांगलं म्हणायचं की लिहिलेलं भिडतं म्हणून चांगलं म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हाय काय अन् नाय काय... आपण कशाला त्यात डोकं दुखवून घ्यायचं? सरळ चांगल्याला अनुमोदन द्यावं आणि आवडत नाही त्याकडं सपशेल दुर्लक्ष करावं, हे सगळ्यात उत्तम. सगळ्यांतून चांगलं फक्त लक्षात ठेवण्याचा हा अभ्यास प्रसंगी खूप कामाला येतो. :-)

कानडाऊ योगेशु's picture

10 May 2020 - 7:46 pm | कानडाऊ योगेशु

गझल ही कवितेपेक्षा श्रेष्ठ आहे हे विधान चुकीचे आहे पण गझल ही इतर कवितांपेक्षा निश्चितच वेगळा प्रकार आहे. कारण गझलेचे स्वतःचे काही एक व्याकरण व नियम आहे व ते पाळले तरच ती रचना गझल ठरते आणि असे नियम पाळुन लिहिणे हे तसे कष्टसाध्य काम आहे. असे असल्यानेच बहुदा तत्सम गझल लिहिणारे पार्ट्यात जसे फुकाडे व बेवडे स्वतःचे ग्रुप करुन अलिप्त राहतत तसे करत असावेत. पण केवळ व्याकरण वृत्त पाळली म्हणुन एखादी रचना गझल होतेच असे नाही. गझलियत हा गझलेचा आत्मा आहे आणि तोच जर मिसिंग असेल तर उरलेली रचना म्हणजे केवळ शृंगारुन ठेवलेले कलेवर ठरते. दुसरा फरक म्हणजे कविता अक्षरशः सुचते पण गझलेच्या बाबतीत एखादा दुसराच स्ट्रायकिंग शेर सुचतो आणि बाकीच्या शेरांची मग जुळवाजुळ्व केली जाते.मुळात गझल हा एकटाकी लिहिण्याचा प्रकारच नाही आहे. स्वर्गीय सुरेश भटसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आधी गझलेची जमीन शोधा मग नंतरची बारा वर्षे तिची मशागत करा तेव्हा कुठे अस्सल गझल निर्माण होते.
परंतु काही कल्पना मुळात गझले मध्येच शोभुन दिसतात.
उदा. गुलाम अलींनी गायलेली "चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है" ही रचनाच पहा. पूर्ण रचनेत गतकाळातील प्रेमाच्या अगदी साध्या आठवणी आहेत. त्या जर कवितेच्या साच्यात लिहिल्या असत्या तर इतका प्रभाव शाली झाल्या नसत्या पण त्या साध्या आठवणींनाच गझलेच्या कोंदणात बसवल्या कि पूर्ण काव्यप्रकारच एक वेगळी उंची गाठतो.

चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है
हम को अब तक आशिकी का वो ज़माना याद है

तुझ से मिलते ही वो कुछ बेबाक हो जाना मेरा
और तेरा दांतों में वो उंगली दबाना याद है

खैंच लेना वो मेरा परदे का कोना दफ्फातन
और दुपट्टे से तेरा वो मुंह छुपाना याद है

तुझ को जब तनहा कभी पाना तो अज राह-ऐ-लिहाज़
हाल-ऐ-दिल बातों ही बातों में जताना याद है

आ गया गर वस्ल की शब् भी कहीं ज़िक्र-ए-फिराक
वो तेरा रो-रो के भी मुझको रुलाना याद है

तसे पाहायला गेले तर इथे अगदी साधे स्मरणरंजनच आहे पण पहिले द्विपदीचे पहिले कडवे वाचतान्च दुसरे काय असेल हा सस्पेन्स मनात निर्माण होतो.

तरीही माझ्यामते कविता लिहिणे अधिक आव्हानात्मक आहे कारण कवितेची जर मूळ कल्पनाच तकलादू असेल तर तिचा निबंध होण्याचा धोका असतो. गझलेत प्रत्येक सुटा शेर हीच एक कविता असल्याने एखाद्याच चांगल्या शेरावरही पूर्ण गझल तरुन जाते व तसेच गझलाकार व्याकरण वृत्त वगैरेंकडे लक्ष वेधुन थोडाफार तरी प्रतिकार करु शकतो.

चिगो's picture

13 May 2020 - 2:11 pm | चिगो

कानडाऊ योगेशु, पटलं तुमचं..

दुसरा फरक म्हणजे कविता अक्षरशः सुचते पण गझलेच्या बाबतीत एखादा दुसराच स्ट्रायकिंग शेर सुचतो आणि बाकीच्या शेरांची मग जुळवाजुळ्व केली जाते.

कविता सुचते, कधीकधी अक्षरशः फुटते.. कुठलीही घटना, संवेदना किती ठसठसती आहे, ह्यावरही कविता कि गझल (शेर) हे ठरतं. हे वरवर दिसत नाही, पण कविता स्त्रवत राहते, तर शेर एखाद्या बाणासारखा सन्नकन सुटतो.

वर कुणीतरी हिंदी/उर्दू आणि मराठीत असलेल्या जझल आणि त्यांना मिळणारी दाद, ह्याबद्दल लिहीलंय. मला वाटत नाही, कि इथे भाषेचा प्रश्न असावा. कदाचित भाषासामर्थ्याचा असेल.

असो. आताच सुचलेला शेर लिहीतो आणि प्रतिसाद संपवतो..

"ये माना कि मेरे गमों से सरोकार नहीं तुझे
मगर मुझसे मेरे जीने की वजह तो ना छिन.."

चौकटराजा's picture

11 May 2020 - 10:13 am | चौकटराजा

एकूणात काव्य , त्यातील दुर्बोधता , एखादा कवि की गीतकार , गजल ही कविता असते काय? मातीला सुगन्ध त्याच्या ऐवजी आकाशाला आला सुगन्ध असे म्हटल्याने काय बिघडते तो कवि चा जन्मसिद्ध हक्क आहे ," कला स्वान्त्सुखाय की देवाणघेवाण वगैरे विषयावर या वयात वाद घालायची मुळीच इच्छा नाही सबब आपली दोन अडीच ओळीतच लेखनसीमा !! ))))))))

राघव's picture

11 May 2020 - 11:13 am | राघव

एकूणात काव्य , त्यातील दुर्बोधता , एखादा कवि की गीतकार , गजल ही कविता असते काय?

जीव घेतला हो एका ओळीतच! _/\_ :-)

खिलजि's picture

11 May 2020 - 2:10 pm | खिलजि

शब्द ओले, कुणी पेरले ?

काय म्हणावे या पिकाला

कोय पेरुनी , ऊस उगवितो

गोडवा असे त्या काव्याला

गझलेमध्ये कविता असावी

कि कवितेमध्ये गझल पाहावी

तोष मजला कधी ना मिळे

वेचत जा तू भावना , गड्या

अंतर्नादाची ती मधुर फळे

गणेशा's picture

11 May 2020 - 6:15 pm | गणेशा

वाह

पाषाणभेद's picture

11 May 2020 - 6:19 pm | पाषाणभेद

नमस्कार हो खिलजि!

"तोष मजला कधी ना मिळे
वेचत जा तू भावना , गड्या
अंतर्नादाची ती मधुर फळे"

साहित्यातून तोष मिळतो आणि मनाची शांती होतेच कदाचित तोष हा रोषातही बदलण्याची क्षमता लेखणीत असते.
भावना तर आपण घेतोच. पण गजलेत प्रत्येक कडव्यात टॅन टॅन भावना असतात अन आपण तेवढे शार्प नाही. त्यामुळे आपल्या आवाक्यात नाही.

बाकी अंतर्नादाची मधुर फळे आपण चाखतोच.

बाकी खिलजी, तुम्ही समायोचित काव्य रचण्यात माहीर आहेत. मुख्य बोर्डावर लावा ही कविता.

(आजकाल वेळ नसल्यास इकडे येणे कमी होत आहे.)

प्रिती-राधा's picture

12 May 2020 - 12:12 am | प्रिती-राधा

कविता /गाणी /गझल /शब्द
या पेक्षा तो लिहिणारा माणुस खरा हवा
शब्द आपोआप मनात घर करतात

चौथा कोनाडा's picture

12 May 2020 - 12:29 pm | चौथा कोनाडा


+१

पर्फेक्ट !

एस's picture

12 May 2020 - 2:16 am | एस

कवितेचं आणि माझं कधीच जमलं नाही. ती त्या कोपऱ्यातल्या बाकावर बसली की मी ह्या कोपऱ्यातल्या बाकावर बसायचो. आमची खुन्नसच तशी असायची. तिकडं कवितेमागं जग येडं झालेलं असायचं, आणि इकडं ती आमच्याजवळून गेली की आम्ही शिव शिव शिव पुटपुटायचो. की फुटलंच तोंडाला तोंड. हीsss भांडणं... हीsss भांडणं... नंतर हिर्व्या देशात शेटल झाली म्हणे. चेपुवर रिक्वेष्ट आलेली एकदा. वृत्तात 'चापूनचोपून' बसणारी कविता मुक्त होताना 'सुटलेली' पाहून मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतानाही 'छाण मेंटेन केलंस हां' छाप कमेंटी टाकल्या होत्या उगीचच. नंतर आम्ही चेपुच बंद करून टाकलं. कविता कायमची कटाप!

गज्जल म्हणाल तर मा. ज्यु. समवेत समस्त रविकिरण मंडळींची यथेच्छ टर उडवणे हा आमचा पार्टटाइम धंदा असल्याकारणाने ती दिल्लीची पोरगी कालेजात कायम औटाफ रेंजच राहिली. त्या मतल्याला काफियाच मिळाला नाही कधी. गज्जलेच्या खोट्या प्रेमात खरेखुरे पागल होणारे तेव्हाही कमी नव्हतेच तसेही.

- अखिल मिपा शिवीमध्येच ओवी शोधा रे मंडळ!

(अवांतर - प्रतिसाद फार शिरेसली घेऊ नये ही बोथ साईडच्या प्रेमींना विनंती विशेष!)

गणेशा's picture

12 May 2020 - 8:49 am | गणेशा

भारी लिहिले आहे..
जणू सुटलेली कविता.. कायमची सुटली..
अन, शब्द सरस्वती मनात बसली..

- अखिल मिपा टेंपोत नाय तर रिक्षात बसवा मंडळ

चामुंडराय's picture

12 May 2020 - 6:52 am | चामुंडराय

हा हा हा ... भारी एक्का भाऊ

हि तर अपूणकीच्य कैफियत आहे अगदी !

कुमार१'s picture

12 May 2020 - 7:50 am | कुमार१

चांगली चर्चा. आवडली.

काव्य या या विषयावरून विजय तेंडुलकरांचा “बोटभर काव्य विचार” हा लेख आठवला. त्याचा मथितार्थ सांगतो.
समाजातील सामान्य लोक जरी स्वतः कविता करत नसले तरी ते आपल्या रोजच्या जीवनात काव्य जगत असतात. त्याची काही अफलातून उदाहरणे त्यांनी दिली आहेत. ती मुळातून वाचण्यातच मजा आहे

हा लेख ‘कोवळी उन्हे’ या पुस्तकात आहे. जरूर वाचण्यासारखा.

प्रमोद देर्देकर's picture

12 May 2020 - 9:00 pm | प्रमोद देर्देकर

पा भे, गणेशा तुम्ही कविता कोष साईट वर गेलाय का कधी ??

गणेशा's picture

13 May 2020 - 12:42 am | गणेशा

नाही गेलो कधी, का ओ भाऊ?

प्रमोद देर्देकर's picture

13 May 2020 - 9:24 am | प्रमोद देर्देकर

जे खास कवितेचे रसिक आहेत त्यांच्यासाठी खजिना ….

इथे भारतातल्या सर्व कविता, गजल, चारोळी लिहणार्यांची नोंद आहे. आपले भारताचे मान. माजी पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा आहेत.

कविता कोष

चांदणे संदीप's picture

13 May 2020 - 9:51 am | चांदणे संदीप

कविताकोष आणि हिंदीसमय.कॉम ह्या माझ्या दोन अत्यंत आवडत्या साईट्स आहेत ऑनलाईन वाचनासाठीच्या.
हिंदीसमय तर निव्वळ अप्रतिम खजिना आहे.

सं - दी - प

सतिश गावडे's picture

20 May 2020 - 12:34 pm | सतिश गावडे

हिंदीसमय.कॉम खरंच अप्रतिम आहे. सहज अहेतु़कपणे क्लिकक्लिकाट करताना हरिशंकर परसाई यांच्या "क्या किया आज तक क्या पाया?" या प्रसिद्ध कवितेचं पान उघडलं.

चांदणे संदीप's picture

20 May 2020 - 1:31 pm | चांदणे संदीप

जबरदस्त रचना आहे ती!
अजून शोधा... अशीच काही रत्नं सापडतील.

सं - दी - प

शीर्षक बघून कदाचित हा धागा वाचला नसता पण कधी नाही ते नवे प्रतिसाद न बघता नवे लेखन वर क्लिक केली त्यामुळे धागा लेखकाचे नाव दिसल्याने तो वाचला.

"मला कवीता समजत नाही तरीपण वाचून मी प्रतिसाद दिला

हे माझ्या बाबतीत अगदी खरे आहे. मला कवीता समजत नाही पण अगदी साध्या सोप्या भाषेत (म्हणजे जो देखे रवी ,वो देखे कवि असल्या छापाच्या सोडून ) असल्या तर काहीतरी अर्थबोध होतो आणि अपवादाने प्रतिसाद दिला जातो बाकी गझल वगैरे वाचण्या पेक्षा ऐकायलच जास्ती आवडतात.

आगाऊ म्हादया......'s picture

16 May 2020 - 2:11 pm | आगाऊ म्हादया......

नमस्कार पा भे, कालपासूनच मनात होतं की गझलबद्दल काही लिहावं जेणेकरून मनातील संभ्रम दूर व्हावेत म्हणून आज निवांत प्रतिक्रिया लिहायला बसलो.
मुळात कवितेपासून गझलला तोडावं हे काही मनाला पटलं नाही. कुठलीही गझल ही आधी एक उत्तम कविता असावी लागते. तिला स्वत:च व्याकरण आहे. त्या नियमात लिहायची म्हटली तर गझल; कविते इतकीच अवघड आहे.

भट साहेबांनी मराठी गझल सजवली, रुजवली. त्यांना मिळालेला मान ह्यासाठी आहे कारण उर्दू गझल तिच्या सर्व वैशिष्ट्यांसह त्यांनी आणली. भाऊसाहेबांची गझल त्या दृष्टीने अपूर्ण होती.
कवितेतील वृत्त, त्यामुळे येणारी गेयता, यमकं हे सगळं गझलला देखील लागू होतं.

मध्ये एक प्रतिसाद वाचला, कि स्टूल, पिस्तुल असलं काहीतरी एका गझलेत होतं. विनोदीच आहे हे. मी तर म्हणेन बावळटपणाचं. पण शितावरून भाताची परीक्षा होतेय ही. एखाद्या नवशिक्याने स्टेजवर काहीतरी मूर्खपणा केला तर त्याला आयोजक काय करतील? शिवाय गझलेत एक हझल म्हणू उपविभाग आहेच. ज्यात विनोदी गझलाच लिहिल्या जातात. हे वरील प्रसवणे त्यातील असू शकेल.
गझलेत अनेक प्रकार आहेत, त्यात मुसलसल गझल पण येते. ह्यात एकंच भाव पुढे पुढे नेलेला असतो, प्रत्येक शेरात वेगळा विचार (ख्याल) नसतो. त्यामुळे अशी गझल एखाद्या नवख्या माणसाने वाचली तर त्याला ती कविताच वाटेल हे नक्की. गझल हे परकीय प्रकरण आहे, आपल्या साहित्यात ते नको असाही एक सूर दिसतो जन-मानसात. त्यावर भट म्हणाले होते एका गझलेत की-

"आसवांनी मी मला भिजवू कशाला
एवढेसे दु:ख मी सजवू कशाला,

साय मी खातो मराठीच्या दुधाची,
मी कुणाचे उंबरे झिजवू कशाला?"

आणि खरं सांगतो पुण्यात गझल वाचनाचे कार्यक्रम होतात, अन हाऊसफुल होतात. लोकं उभं राहून कार्यक्रम पाहतात. इतकी मोहिनी आता पडली आहे गझलेची.

केवळ काही वाईट नमुन्यांमुळे गझलेबद्दल कुणाचं मत कलुषित राहू नये म्हणून हा लेखन प्रपंच आहे. म्हणूनच , गझलेच्या व्याकरणात न शिरता काही उत्तम नमुने इथे ठेवावेत हा हेतू आहे.

वैभव जोशी एका गझलेत म्हणतात-
" जसा व्याकूळ होतो ओंडका वाहून जाताना
तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना

जसे की दूरचे गाणे मनाचे स्वास्थ्यही नेते
तशी पडतेस तू कानी जगाआडून जाताना

तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान "होतो" मी
तुला वाचून जाताना, तुझ्यावाचून जाताना"

ह्या होतो मधील श्लेष पहा, दर्द आहे त्यात.

कौस्तुभ आठल्ये ह्या गझलकाराने लिहिलंय-
"सरी येणार की, झरणार की, आकाश म्हटल्यावर,
जराशी ओल तर उरणार की, आकाश म्हटल्यावर

बिघडले काय?, जाताना इथे रेंगाळली थोडी,
तुझ्यातच सांज घुटमळणार की, आकाश म्हटल्यावर"  किंवा

"प्राजक्ताचा जन्म मिळावा, समोर यावे दार तुझे,
अगदी नकळत स्पर्श हजारो, व्हावे वारंवार तुझे,

पुन्हा कधीही होणे नाही निवडणूक ह्या मनामध्ये,
तुझीच सत्ता जन्म सातही, कायमचे सरकार तुझे."

किती सुंदर लिखाण आहे हे! बरं; गझलेतील नुसता शेर फारच दीनवाणा वाटू शकतो म्हणून मी 'मतला' मात्र आवर्जून देतोय. ज्यात रदीफ म्हणजे अंत्ययमक, काफिया म्हणजे यमक आणि अलामत  (ह्याला मराठी व्याकरणात काय म्हणतात ठाऊक नाही) हे समजेल आणि शेराची मजा आणखी वाढेल.

सुशांत खुरसाळे ह्याने म्हटलंय की-
"उजेडासही काळोखाचा भार वगैरे असतो का?
आजकाल दुनियेत तुझ्या अंधार वगैरे असतो का

दिसतो आहे उभा भिकारी गजरे विकणाऱ्यासोबत,
त्याच्या पत्नीलासुद्धा शृंगार वगैरे असतो का?

अंत्ययमक पाहिलंत? "वगैरे असतो का?" असं भलं मोठं पण समर्थपणे वापरलं आहे.

आता मला माहित असलेले काही मराठीशी/ महाराष्ट्राशी नाळ असलेले शेर ऐकवतो, आय मीन लिहितो.

"भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही
रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही.

दे मला तू रात्र भरुनी अमृताचा एक प्याला
एक प्याल्याने कुणाचाही सुधाकर होत नाही"  इति वैभव जोशी.

किंवा

मधुसूदन नानिवडेकर एका गझलेत एसटी महामंडळाची सध्याची स्थिती रूपक म्हणून वापरत म्हणतात-
"भेटणे हे तुझे वादळासारखे
बोलणे मारलेल्या वळासारखे

प्रेम डबघाईला येत आले तरी
चालवूया 'महामंडळासारखे'."

अनिल आठलेकर हे मालवणीत सुंदर गझल लिहितात-
"येतत वगीच माझे डोळे भरान आता
लाव्लय भुतूरसुन मी टाळा म्हणान आता

तेतेच कासवाचे सांगू नको गजाली
केलेत पार सगळे रस्ते सशान आता

बोल्लय तुका 'सुखी रव', तितकोच धीर होतो
माका बघू नको तू पाठी फिरान आता"

खलीश नावाने लिहिणारे अनंत म्हणतात,

"आयुष्याचा बैल सजवतो रोजचं पोळा करतो
जुनी गोधडी पुन्हा उसवतो नवीन खोळा करतो

मी अर्थाच्या केशरगंधी अभिव्यक्तीने माझ्या,
सुखदु:खाचा अवघा परिसर मराठमोळा करतो."

आता इंग्लिश शब्द कवितेत असावेत की नाही हा वेगळा मुद्दा, पण गझलेने ते ही समर्थपणे पेलले आहे. घुसडल्यासारखं नाही वाटत. हे शेर बघा,
"नको उभारू असा दुरावा , एक फोन कर
ठरेल खोटा तुझाच दावा , एक फोन कर

रुसवे फुगवे प्रेमाचा हा भागच आहे
त्यानंतर संवाद असावा , एक फोन कर

क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढित असते
या गोष्टीला काय पुरावा , एक फोन कर..."
रुपेश देशमुखांची ही गझल होती.

बेफिकीर नाबाने एक गझल लिहितात, त्याचं खरं नाव मला माहित नाही,
ते असं म्हणतात-
"स्वप्न पडले की सफल होते असे नाही,
शब्द आले की गझल होते असे नाही

खूप आनंदात दोघे चालले होते
पण तरीही ते कपल होते असे नाही"

वैभव जोशींच्या ह्या शेरांशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही, ते लिहितात-
 
"बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला,
रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला,

खूप वर्षांनी तुला मी फेसबुकवर पाहिले,
स्क्रोल केल्यासारखा मग काळ सरकत राहिला"

काय लिहिलंय यार, सगळीच्या सगळी स्थिती उभी राहिली डोळ्यासमोर.

इतकी उदाहरणं दिली कदाचित लिहित राहिलो तर आणखी सुद्धा देऊ शकेन. किती रुळलीय गझल मराठीत, कवितेत. मग हे सर्व पाहता का बरं आपण तिला असं वेगळं स्थान द्यायचं? कवितेत मुक्त छंद हा प्रकार आपण मान्य केला आहेच की, मग गझलसुद्धा तशीच का स्वीकारू नये? मराठीला समृद्धच करणार आहे ती. तिला अशी दुय्यम आणि वेगळी वागणूक मिळू नये हीच माझी मनापासून इच्छा आहे.

गणेशा's picture

16 May 2020 - 2:46 pm | गणेशा

अप्रतिम प्रतिसाद..
आवडला.

"भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही
रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही.

वा

आगाऊ म्हादया......'s picture

18 May 2020 - 11:37 pm | आगाऊ म्हादया......

वैभव जोशी म्हणजे, डाय हार्ड फॅन झालोय मी त्याचा

मी नाव कुठे तरी ऐकले आहे असेच वाटत आहे.. नक्की आठवेणा..
लिंक आहे का सर्व लिखाणाची? वाचेल मी..?

माझ्या घराचे नाव पारिजात ठेवलेले आहे.

पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल, लयलुट करायची ती सुगंधाचीच.. हे वाक्य हि माझे खुप आवडीचे..
माझी आवडती फुले..

म्हणून पुन्हा वाचताना हा शेर हि तितकाच आवडला..

प्राजक्ताचा जन्म मिळावा, समोर यावे दार तुझे,
अगदी नकळत स्पर्श हजारो, व्हावे वारंवार तुझे,

लिंक आहे का सर्व लिखाणाची? वाचेल मी.. सगळे.
वरती '? ' चुकून पडला

वैभव जोशी म्हणजे.. जाऊ देत. खूप सुंदर लिहितात. एकत्रित लेखन मात्र सापडले नाही बॉ

आगाऊ म्हादया......'s picture

20 May 2020 - 6:20 am | आगाऊ म्हादया......

ह्या गझलकारांना मी स्वतः ऐकलं आहे आणि मग घरी आल्यावर गझला आठवून लिहिलीत, क्वचित प्रसंगी पुढच्या कार्यक्रमात पुन्हा सादर झाली तेव्हा लिहिलीय. आता त्या तोंडपाठ झाल्यात म्हणून भराभर लिहीत गेलो एवढंच

गणेशा's picture

20 May 2020 - 6:33 am | गणेशा

Ok..

मजेने : तुम्हीच सगळ्या आठवा आणि लिहा.. आम्ही वाचतो..

भुषण कटककर हे बेफिकीर या नावाने लिहीतात. त्यांनी गज़लेच्या व्याकरण- नियमांवलीवर लिहीलेल्या लेखाची लिंक सापडली तर देईल इथे.. अर्थात तस मिपाच्या धोरणात बसत असेल तर.

आगाऊ म्हादया......'s picture

20 May 2020 - 6:22 am | आगाऊ म्हादया......

यस्स, भूषण कटककर, एक कार्यक्रमांतून सांगितलेलं, मी विसरलो होतो

चौकस२१२'s picture

16 May 2020 - 2:21 pm | चौकस२१२

"तिला अशी दुय्यम आणि वेगळी वागणूक मिळू नये "

मला नाही वाटत कि कोणी मराठी गझलेला दुय्यम ठरवत आहे .. गझल हि स्वतःची इतकी परिपूर्ण आहे कि तिचं साठी वेगळे स्थान ठेवावे एखाद्या स्पर्धेत असे बहुतेक पाषाणभेद यांचे मूळ मत असावे असे वाटतो
असो आपण संधर्भ दिलेल्या मराठी गझला वाचून चांगले वाटले

आगाऊ म्हादया......'s picture

16 May 2020 - 2:28 pm | आगाऊ म्हादया......

माझा देखील सूर मुळात भेद नसावा असा आहे. म्हणून मी दुय्यम आणि वेगळी अशा दोन्ही शब्दांचा वापर केला आहे.

निनाद's picture

18 May 2020 - 8:45 am | निनाद

वृत्त बद्ध कविता असा वेगळा उपविभाग येथे असला पाहिजे त्यामुळे सकस काव्य शोधताना इतर कचरा रचना चिवडत बसाव्या लागणार नाहीत.
छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाही असा नियम असावा. छंद देणे बंधनकारक असावे. मग दर्ज्यामध्ये नक्कीच फरक पडेल.

छंद / वृत्त ठरवून कविता लिहिल्या जाते? छंद/वृत्त/अलंकार्/गण/मात्रा यातलं काहीही न समजता / माहित नसता, कविता होणं शक्य नाही?

तसं असेल तर मी जे काही थोडंफार लेखन आजवर केलंय, त्यात एकही कविता नाही असंच म्हणावं लागेल.

मी सुद्धा हेच लिहीणार होते.
कवी त्याच्या भावना तो कवितेत मांडत असतो. त्या भावना मुक्तछंदात असोत, गज़लेत असोत वा वृत्तबद्ध कवितांमध्ये. व्यक्त होण आणि ते इतरांपर्यत पोहोचण महत्वाच.

छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाही

ह म्हणजे लग्न न झालेली माणसे, नपुसंक असतात असे म्हणण्यासारखे आहे..

गझल आवडते मला.. खुप आवडते..
पण वृत्त नसलेल्या कविता हि तितक्याच जवळच्या वाटतात.. भावनेच्या त्या जसेच्या तसे रूप वाटते..

पण वृत्तात लिहिले पाहिजे, वृत्त पाहिजेच हि अवाजवी मागणी करणारे.. शब्दा वर हि हक्क गाजवू लागतात तेंव्हा?
मग ती गझल असु वा निव्वळ कविता.. त्याचे काय..ज्यावर अहंकार चिकटतो.. तो संपतो असे आपले मत..

शब्द हे शब्द असतात...ते प्रेमिका च्या गळ्यात हि हार बनतात..
कोठ्यावर हि फुलेच बरसवतात.. घरात असता ते तिथे हि फुलांचा वर्षाव करतात..
पण म्हणून कोणी फुलांचा बाजार मांडून, तीच खरी फुले असे म्हणत असेल तर अवघड आहे...

आगाऊ म्हादया......'s picture

20 May 2020 - 6:24 am | आगाऊ म्हादया......

अनेक उदाहरणं देता येतील ज्यात मुक्तछंद आहे पण तरीही त्या उत्तमकाव्य आहेत.

निनाद's picture

20 May 2020 - 8:11 am | निनाद

वृत्त बद्ध कविता असा वेगळा उपविभाग येथे असला पाहिजे त्या विभागात छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाही असा नियम असावा. छंद देणे बंधनकारक असावे.

आशा आहे आता स्पष्ट झाले असावे.

मनिष's picture

20 May 2020 - 5:42 pm | मनिष

हे अफाट आहे....वाचनखूण साठवतोय!