करोना हा खलनायक नव्हे नायकच : करोना महात्म्य ।।१।।

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
7 Apr 2020 - 8:36 pm

करोना महात्म्य ।।१।।
करोना हा खलनायक नव्हे नायकच

 

            होय.... करोना महात्म्यच. गेल्या काही दिवसापासून माझ्या आकलनाप्रमाणे मी करोना या विषयावर लिहितोच आहे पण यानंतर थोडीशी सुसंगती यावी आणि या स्फुट लेखांचा एकत्रित संग्रह व्हावा म्हणून सलग लेखमाला लिहिण्याचा विचार करतोय.

 

         या लेखमालेला नाव काय द्यायचे... असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा नाव "करोना महात्म्य" असे ठेवणे मला जास्त संयुक्तिक वाटले. असे वाटण्याचे कारण असे की, सहसा माहात्म्य थोर पुरुषाचे, थोर व्यक्तीचे लिहिले जाते आणि करोना व्यक्तीही नाही आणि थोरही नाही असे सकृद्दर्शनी वाटत असले तरी सुद्धा हेच नाव निवडण्याचा उद्देश असा की, आजच्या करोनाच्या स्थितीवरून उद्याच्या भविष्याचा वेध घेतला तर मला जरा स्पष्टपणे जाणवते आहे की, एकंदरीत करोना हा खलनायक न ठरता मानवजातीसाठी नायक ठरण्याचीच शक्यता जास्त आहे.

 

        संपूर्ण जागतिक मानवजातीच्या संस्कृतीची, अर्थव्यवस्थेची, विचाराची, राजकारणाची आणि समाजकारणाची दिशा सुद्धा करोना  बदलून टाकेल असे धूसर असे चित्र आज दिसायला लागले आहे. हे खरे आहे की करोनामुळे मनुष्यहानी होणार आहे पण जेव्हा जेव्हा युद्ध झाले, क्रांती झाली, जागतिक बदल झालेत तेव्हा तेव्हा मनुष्यहानी झालेलीच आहे. त्यानंतरच समाजव्यवस्थेची नव्याने पुनर्स्थापना झालेली आहे. त्यामुळे करोनामुळे मानवीविश्वाची जरी प्राणहानी झाली तरी पूर्वइतिहास लक्षात घेता करोनाला खलनायक ठरवता येणार नाही.

 

          करोनामुळे समाज सुधारला, बेशिस्त जनजीवन शिस्तीत आले, अहंकाराची जागा विनयतेने घेतली, शोषक आणि शोषित यांच्यातली दरी कमी झाली, अन्यायाची जागा न्यायाने घेतली, माणूस माणसासारखा वागायला लागला, माणूस माणसाचा सन्मान करायला लागला, किडलेल्या मनातील अनेक दर्प निघून गेले तर..... मानवजातीवर करोनाने अनंत उपकारच केले..... अशी दखल घेण्यास इतिहासाला भाग पडेल.  दुसरा भाग असा की, करोना आक्रमणकारी नाही. करोना कुणाचा जीव घेतच नाही. माणसाचा बळी घेत नाही. हे सर्व ज्ञात आहे की करोना एक निर्जीव पार्टीकल असून त्याला स्वतः चालता-बोलता-उडता येत नाही. तो कुणावर आक्रमण करू शकत नाही. तो तसा निर्गुण-निर्विकार आहे.

 

           याउलट माणसाचा बळी घेण्यास माणसेच कारणीभूत ठरत आहेत, ठरणार आहेत. जर करोनाचा जन्म चीनमध्ये झाला असेल तर तो समग्र जगामध्ये नाचायला-उडायला-बागडायला आणि माणसाचे जीव घ्यायला स्वतःहून गेलेला नाही. माणसांनीच त्याला चीनमधून उचललं आणि स्वखर्चाने वेगवेगळ्या देशात नेऊन ठेवलं. एका माणसाने दुसऱ्या माणसाला करोना सस्नेह भेट म्हणून दिला. एका हाताने दुसऱ्या हाताला आणि एका तोंडाने दुसऱ्या तोंडाला घास भरवावा तसा करोना भरवला. जर दोष माणसाचा असेल तर त्याचे पाप करोनावर ढकलण्याचे कारणच काय?

 

          जोपर्यंत कोणताही मनुष्य करोनाला घ्यायला जाऊन.... त्याला आपल्या घरात घेऊन येत नाही, घरात आल्यानंतर जोपर्यंत कोणताही माणूस त्याला आपल्या हाताने आपल्या तोंडात घालत नाही.... तोपर्यंत करोना स्वतःहून माणसाच्या शरीरात घुसत नाही. शरीरात घुसल्यानंतर सुद्धा करोना स्वतःहून माणसाच्या शरीराला काही इजा-हानी पोहोचवत नाही. आपले शरीरच त्याला नाकातोंडातून घशात आणि कशातून फुफ्फुसात घेऊन जाते....  पुढे जे काही होते ते सर्व माणसाचं शरीरच करत असते. करोना विषाणूचा गुणाकार सुद्धा करोना स्वतः करत नाही. निसर्गाने त्याला प्रजनन क्षमता दिलेलीच नाही. तो गुणाकार सुद्धा माणसाच्या शरीरात माणसाचेच शरीरच करत असते. 

 

          अशा तऱ्हेने आपलं शरीर आपलाच घात करत असते आणि त्यासोबतच इतर माणसांचा व मनुष्यजातीचाही घात करत असते.  माणसाने स्वतः काय करावे आणि काय करू नये याची शिस्त जर माणसालाच नसेल तर माणसाच्या दुर्गुणांचा दोष करोनाच्या माथी मारण्यात काहीही अर्थ नाही. जगाच्या कोणत्याही कोर्टात हा न्याय नेल्यास करोना अपराधी ठरू शकत नाही. हा दोष सर्वस्वी माणसांचा असल्याने दोषी ठरेल शेवटी माणूसच. करोना हवेतून पसरत नाही. करोनाची वाहतूक अन्य रोगांच्या जिवाणू सारखी मच्छर करू शकत नाही, सूक्ष्म किडेमकोडे करू शकत नाही. पशुपक्षी करू शकत नाही. 

 

        करोनाची वाहतूक व प्रसार केवळ आणि केवळ मनुष्यच करू शकतो. त्यामुळे आता माणसाच्या जीविताला भीती करोनापासून नव्हे तर माणसापासूनच निर्माण झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक पिढ्या सुखासीन आणि संरक्षित जीवन उपभोगायला मिळाल्याने माणूस स्वतःचे रक्षण स्वतः कसे करायचे.... हेच जर विसरला असेल तर हा दोष कोणत्या देवाचा, धर्माचा अथवा निसर्गाचा नसून दोष केवळ माणसाचा आहे. ज्याला जगायचे असेल त्याने स्वतःचे रक्षण कसे करायचे हे ठरवायचे आहे. मनुष्याचे रक्षण करायला नोकर-चाकर-अंगरक्षक-शिपाई-पोलीस-सैनिक या संकल्पना याक्षणी कालबाह्य झालेल्या आहेत.

 

- गंगाधर मुटे आर्वीकर

   दि. ०५/०४/२०२०

(क्रमशः)

=============

टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय किंवा तुमचे नाव घालून कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.

=============  

जीवनमानआरोग्यविचारआरोग्य

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2020 - 9:01 pm | चौथा कोनाडा

छान, कोरोनाचा सकारात्मक दृष्टिकोनातून लिहिलेला लेख आवडला.

करोनामुळे समाज सुधारला, बेशिस्त जनजीवन शिस्तीत आले, अहंकाराची जागा विनयतेने घेतली, शोषक आणि शोषित यांच्यातली दरी कमी झाली, अन्यायाची जागा न्यायाने घेतली, माणूस माणसासारखा वागायला लागला, माणूस माणसाचा सन्मान करायला लागला, किडलेल्या मनातील अनेक दर्प निघून गेले तर..... मानवजातीवर करोनाने अनंत उपकारच केले..... अशी दखल घेण्यास इतिहासाला भाग पडेल.

मी या वर फारसा आशावादी नाही. मानवाची प्रगती अश्या काही वेगवान चक्रावर आरूढ झालेली आहे कि हा तात्पुरता वेग कमी झालाय असे वाटते.
मानवाने कैक क्रांत्या पचवल्या, घातक असूनही त्या आत्मसात केल्या. कोरोनाला सुद्धा त्याच पद्धतीने मानव मनावर घेणार.
कोरोनाचा प्रभाव ओसरला की पहिले पाढे पंचावन्न !

चौकटराजा's picture

7 Apr 2020 - 10:07 pm | चौकटराजा

जग हे विकासाच्या एका विक्रुत पातळीवर पोहोचले आहे. विकास म्हणजे कोणते निकष याबाबत आरोग्य हे अगदी मागे पडले आहे. माझे सेकन्ड होम माझी सेकण्ड कार , मी माझी मुले, माझे भारीभारी मोबाईल , होटेलात भरम्साठ खादाडी अनावश्यक साड्या ,ब्युटी पार्लर ,निरनिरळे डेज , जोडून सुट्यातील चन्गळ ही रोजगार निर्मितीसाठी आवश्यक अशी त्याची शिफरस ही ! इन्धन समस्या, वायु समस्या , आर्थिक विषमता याकडे आपले द्यायचे म्हणून सरकारचे थोडे लक्ष , सामान्य माणसाचा कानाडोळा. एक प्रकारची नवश्रीमन्तीची आलेली धुन्दी. आज मितीला तरी इतकाच म्रुत्यूदर आहे की त्याने मानवाला मोठा धडा मिळणार नाही. काही माणसे सन्कटाची नुसती कल्पना करून सुधारतात ,काही हात पोळल्यावर सुधारतात तर काही हात पोळून बरा झाला की पुन्हा तो कसा भाजेल याची युक्ती शोधतात या न्यायाने काही माणसे आणखी सूज्ञ नक्की होतील . समाजातील विचारवन्त तर नक्की सुधारतील जर नव्या पिढीत ते असतील तर !!

शाम भागवत's picture

7 Apr 2020 - 10:42 pm | शाम भागवत

या अगोदरही अनेक साथी आल्या होत्या. पण त्यावेळेस आत्तासारखा माहितीचा विस्फोट झालेला नव्हता. त्यामुळे यावेळचा मृत्यूदर कमी असूनही सर्व जगाचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता त्यापेक्षा जास्त परिणामांची अपेक्षा करायला हरकत नसावी.

जग हे विकासाच्या एका विक्रुत पातळीवर पोहोचले आहे. विकास म्हणजे कोणते निकष याबाबत आरोग्य हे अगदी मागे पडले आहे. माझे सेकन्ड होम माझी सेकण्ड कार , मी माझी मुले, माझे भारीभारी मोबाईल , होटेलात भरम्साठ खादाडी अनावश्यक साड्या ,ब्युटी पार्लर ,निरनिरळे डेज , जोडून सुट्यातील चन्गळ ही रोजगार निर्मितीसाठी आवश्यक अशी त्याची शिफरस ही ! इन्धन समस्या, वायु समस्या , आर्थिक विषमता याकडे आपले द्यायचे म्हणून सरकारचे थोडे लक्ष , सामान्य माणसाचा कानाडोळा. एक प्रकारची नवश्रीमन्तीची आलेली धुन्दी. आज मितीला तरी इतकाच म्रुत्यूदर आहे की त्याने मानवाला मोठा धडा मिळणार नाही

हे सर्व बरोबर असेलही कदाचित, पण पण पण..

यापैकी "आजकाल" होणाऱ्या ज्या वाईट वाईट गोष्टी नोंदवल्या आहेत (उदा "भारीभारी मोबाईल , होटेलात भरम्साठ खादाडी अनावश्यक साड्या ,ब्युटी पार्लर ,निरनिरळे डेज , जोडून सुट्यातील चन्गळ" इ) त्यांचा करोना साथीशी काय संबंध आहे ते स्पष्ट करता येईल का?

म्हणजे दुर्गुण असतीलच पण काहीही घडलं की त्या दुर्गुणाला दोष देता येईल का अशी शंका.

आणि हे आजकालचं जे विकृत झालंय ते अजिबात नसताना, म्हणजे काळात जितके मागे मागे जावे तितक्या अधिकाधिक विनाशकारी भयानक रोग साथी, नैसर्गिक संकटे आलेली दिसतात.

तेव्हाही जग विकृत झालं होतं का? वीकएंड शिकारी दौरे, सेकंड महाल किंवा सेकंड अश्वरथ किंवा अनावश्यक पितांबरे असा माज लोक करू लागले होते का?

सुबोध खरे's picture

8 Apr 2020 - 11:40 am | सुबोध खरे

गवि
बाडीस

आजकालच्या जीवन पद्धतीला शिव्या देणे हि फॅशनच झाली आहे.

सोडा ना हि सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे संगणक आणि भ्रमणध्वनी आणि खेड्यात जाऊन राहा.

२४ तास हातात मोबाईल ठेवायचा आणि वर त्याला शिव्या द्यायच्या. नुसता भंपकपणा आहे.

हे म्हणजे सूरी हे कसे भयंकर धारदार जीवघेणे हत्यार आहे म्हणून रडारड करण्यासारखे आहे. तुम्हाला कसे वापरायचे याची बुद्धी नसेल तर उपकरणाला शिव्या कशाला द्यायच्या?

आमचे पूर्वज कसे हुशार आणि १०० वर्षे जगत होते त्यांची जीवनपद्धती हीच कशी बरोबर हे सांगताना श्री माधवराव पेशवे हे क्षयाने गेले. ताजमहाल पाहायला मुमताज जिवंत का नव्हती याचे कोणतेही स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही.

एवढेच नव्हे तर साध्या सर्पदंशाने किती तरुण माणसे नाहक मारत होती याबद्दल कोणी बोलत नाही.

बाकी तुमची जीवन पद्धती जाऊ दे खड्ड्यात.

१८७६-१८७८ या काळात दक्षिण भारतात आलेल्या दुष्काळात ५० लाख ते एक कोटी लोक मृत्युमुखी पडले तेंव्हा कुठे होती तुमची जीवन पद्धती?
https://en.wikipedia.org/wiki/Great_Famine_of_1876%E2%80%931878

१९४३ साली बांगलच्या दुष्काळात २०-३० लाख लोक मृत्यू मुखी पडले तेंव्हा कुठे होती तुमची जीवन पद्धती?
https://en.wikipedia.org/wiki/Bengal_famine_of_1943

१८४० च्या प्लेगच्या साथीत एक कोटी लोक मृत्युमुखी पडले तेंव्हा कुठे होती तुमची जीवन पद्धती?
https://en.wikipedia.org/wiki/Third_plague_pandemic

बापू मामा's picture

8 Apr 2020 - 5:15 pm | बापू मामा

आपले करोनापुराण खरोखरीच योग्य आहे.
करोना हा निश्चितच धर्म व जाती निरपेक्ष आहे. हिंदु, मुसलमान, ईसाई, पारशी, बौद्ध..... कोणताच धर्म करोना मानत नाही.
करोनाने आपला वेगळा धर्म स्थापन केलेला दिसतोय.- "करोना ग्रस्त पॉझिटिव्ह"एकप्रकारे तो धर्मसंस्थापकच आहे. फक्त फरक हाच की इतर धर्मिय इश्वराला भजतात.
करोनाग्रस्त करोनाचा द्वेष करतात.

वामन देशमुख's picture

11 Apr 2020 - 8:53 am | वामन देशमुख

छान विनोदी लिखाण केले आहे बरं का, धागाकर्ते!

म्हणजे, लेखात तोडलेले अकलेचे तारे पाहून कोणालाही असेच वाटेल नाही का?

प्रमोद देर्देकर's picture

11 Apr 2020 - 9:49 am | प्रमोद देर्देकर

प्रतेयक वेळी एक माणुस दुसर्‍या माणसाची अक्क्ल का बरे काढतो ?

अरे तुम्हाला नाही पटत तर वाचा आणि सोडुन द्या किंवा लेखाकाचे नाव पाहुन तो लेख उघडूच नका ना.

तुमच्या चालु घडामोडींच्या धाग्यांवर ते कधी तरी फिरकलेले पाहिलेत का तुम्ही?

नाही ना मग सोडुन द्या ना.

डीसिक्लेमर :- ते लेखक माझे कोणी नातेवाईक नाहीत की ओळखीचेही नाहीत ना हा माझा डु आयडी आहे.

वामन देशमुख's picture

12 Apr 2020 - 7:56 am | वामन देशमुख

भावना पोहोचल्या.